body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
संसार मांडला की जा-ये, आला-गेला असतेच. 'अतिथी देवो भव' ही आपली भारतीय संस्कृती आमच्या उभयतांच्या अंगी चांगलीच भिनली होती.
त्यातून प्रशस्त घर मध्यवर्ती भागात मुंबईला. आणि आमचे बरेचसे आप्त महाराष्ट्राबाहेरील. त्याशिवाय माझ्या पतिराजांच्या नोकरीमुळे ते जसे देश-विदेशात जात, तसेच देश-परदेशातून त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये अनेक जण ट्रेनिंग घ्यायला, तसेच द्यायलासुद्धा येत. घेणारे साधारण सहा महिने ते वर्षभर असत.
इन्स्टिट्यूट, होस्टेल आणि घर एकाच प्रशस्त आवारात. घरापासून लांब राहिल्याने साहजिकच ते ट्रेनी ओळख वाढवत घरी बोलावले तर अगदी उत्सुक असत.
तर फिलिपाइन्सच्या दोघी जणी ट्रेनिंगला आल्या होत्या
साधारण २८-२९ वयाच्या असतील. चांगला परिचय झाला होता. एका रविवारी "नाश्ता करायला येऊ का?" त्यांनी विचारले.
नाही म्हणायला कारण त्या दिवशी फोडणीचा भात केला होता. आदल्या दिवशीचा उरलेला!
पण हे म्हणाले, "येऊ दे त्या आपणहोऊन येत आहेत तर!"
फोडणीचा भात खाऊन त्या खूप खूश झाल्या.
एक म्हणाली, "वुई ऑलसो प्रिपेयर धीस दिश, बत वुई दु नॉत पुत तरमरिक! वुई पुत तोतोनत."
बराच वेळ कळेना. मग लक्षात आले की "we do not put turmeric. We put coconut."
माझ्या नणंदेसाठी वरसंशोधन चालू होते. आपल्या इथे वधुवर सूचक मंडळ असतात आणि आपण स्थळे शोधू शकतो, ही कल्पना त्यांना इतकी आवडली! त्यांच्याकडे आपले आपण जमवायचे. मोठीचे झाल्याशिवाय धाकटीने नाही करायचे.
माझ्या भाच्याचे बारसे होते. एकीने कापड माझ्याकडून घेऊन छान कुंची शिवली.
एकदा दोघे जर्मन एक्स्पर्ट्स आले होते.
ट्रेनिंग घेणारे व देणारे ह्या पाहुण्यांमध्ये फरक असायचा.
जर्मन पाहुण्यांनी आपले महाराष्ट्रीय जेवण कसे असते? असे विचारले.
ते दोघे येणार, म्हणून मी अगदी चटणी, पंचामृत, काकडी कोशिंबीर, अळू पातळभाजी, साधेवरण-भात-लिंबू-तूप, बटाटा भाजी, पुरणपोळी इत्यादी अस्सल बेत केला.
दोघे इतके खूश झाले की "परत जाण्यापूर्वी परत असंच करा, आम्हाला आवडेल" असे म्हणाले. फॉरमॅलिटीज राह्यल्या नाहीत. कोणी स्वयंपाकाचे कौतुक केले की गृहिणींना आवडते. मीही अपवाद नाही.
तसेच साउथ आफ्रिकेहून ट्रेनिंग घ्यायला आलेले - कृष्णवर्णीय उंचनिंच, दात पांढरे शुभ्र, कुरळ्या केसांची जणू काही टोपीच डोक्यावर घट्ट बसवली आहे असे वाटावे. दारातून वाकूनच यावे लागले त्यांना.
जरा बोलणे सुरू होत नाही, तोच एक जण उठला, मी उभी होते तिथे आला आणि त्याच्या हाताशी माझा हात धरून म्हणाला "why this difference?"
मी काही गोरीपान वगैरे अजिबात नाही. रंग स्वच्छ आहे, पण त्याच्या हाताच्या तुलनेत फरक नक्कीच!
मी तर घाबरलेच!
आम्ही तर कोणत्याही प्रकारे रंगभेदाबद्दल काही दाखवले नव्हते.
वातावरण थोडे गंभीर झाले.
पण तो खळखळून हसला आणि म्हणाला, "Oh! God has done this mischief."
You are so sweet!
वातावरण एकदम निवळले. सगळे जण मनापासून हसले.
माझा जीव भांड्यात पडला.
अजूनही आमच्या जेवणात अधूनमधून आठवण करून देणारे इराणी पाहुणे!
ती मजा औरच.
दोघे पुरुष व तीन महिला ट्रेनिंगला आले होते. काही दिवसांनी त्यांनी श्री. काळे यांना विचारले की "आम्ही तुम्हाला त्रास देऊ का? आमची एक इराणी डिश तुमच्याकडे बनवली तर चालेल का?"
श्री. काळे म्हणाले की "आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत. कसं काय जमणार? व्हेरी व्हेरी सॉरी!"
"No, no, We know that you are pure vegetarian. That's why we are requesting you. We will bring all the ingredients."
मग त्या तिघी आमच्या घरी आल्या.
मी विचारले की "काय काय लागेल?" तर मी तयारी करून ठेवीन.
एकीने सांगितले की "rice , French beans, Tomatoes, salt!"
"That's all?" मी आश्चर्याने विचारले.
डिशचे नाव 'इराणी पुलाव' आणि तेजपत्ता, दालचिनी, चक्रफूल, लवंग, मोठे वेलदोडे, काजू, मिरे ह्यापैकी एकही खडा मसाला किंवा पूड कसलेही नाव नाही?
परत विचारले असता त्यांनी अगदी मनापासून सांगितले की "खरंच काही नकोय, फक्त Thick bottom vessel is must! Do you have?"
हो, आहे ना!
मी त्यांना सांगितले की "आमच्याकडे सध्या पाहुणे आले आहेत, तर सगळ्यांसाठी जमेल ना?"
आम्ही घरातले ७ जण, माझ्या दोघी बहिणी सहकुटुंब, ते ८ जण आणि हे इराणी ५ जण. "So totally we will be 20 members.."
त्या पटकन म्हणाल्या, "No problem at all."
झाले तर मग.
जाड बुडाच्या मोठ्या पातेल्याची निवड झाली. पितळी थिक बॉटम पातेले बाजूला काढले.
मी सांगितले की "आम्ही वर्षभराचे गहू, तांदूळ, तेलाचा डबा घेतो, तरी तांदूळ व तेल तुम्ही आणू नका."
बासमती आणि आंबेमोहोर दोन्ही दाखवले. बासमती एकदमच पसंत पडला.
येणारा रविवार ठरवला. संध्याकाळी डिनरला 'इराणी पुलाव'.
अमच्या सारखे मनात येत होते की नुसते टोमॅटो, फ्रेंचबीन्स.. कसा काय लागेल तो पुलाव?
आम्ही पुऱ्या करून ठेवल्या. हो! नाही आवडला तर असू दे. उरल्या तर दुसऱ्या दिवशी नाश्ता!
स्वीट डिश म्हणून फ्रूट सॅलड केले. तेव्हा फ्रूट सॅलडची चलती होती. दुधात भिन्न भिन्न फळे घालू नयेत असे आजकाल म्हणतात.
रविवार संध्याकाळी आल्या आल्या एकीने दहा मोठ्या वाट्या भरून तांदूळ स्वच्छ धुऊन पाण्यात भिजत घातले. दोघा पुरुषांनी अडीच किलो फरसबी स्वच्छ धुऊन कोरडी करून रेषा काढून तिरकी तिरकी बारीक ज्या सफाईने चिरली की आम्ही बघतच राहिलो. कामाची सवय कळत होती.
एकीने मिक्सरमधून टोमॅटो ज्यूस काढला. आता जी पुलाव बनवणारी होती, तिने आम्हाला प्रमाण सांगितले - एक वाटी तांदूळ तर एक वाटी चिरून फरसबी आणि अडीच वाट्या टोमॅटो ज्यूस. फार दाट असेल तर दोन वाट्यांना अर्धी वाटी पाणी मिसळायचे.
जड बुडाचे मोठे पातेले गॅसवर चढवले. तेल टाकून तापल्यावर त्यात फरसबी टाकली. खमंग होईपर्यंत परतली. घरभर खमंग मस्त वास पसरला होता. मग टोमॅटो ज्यूस टाकून मीठ घालून छान उकळी आली.
आता फरसबीच्या जोडीला टोमॅटोचाही वास!
चांगली उकळी आल्यावर भिजवलेले तांदूळ टाकले. मीठ टाकलेच होते. छान खदखदायला लागला भात, तसे तिने माझ्याकडे "थिक क्लॉथ" मागून घेतले होतेच, ते ताटाला गुंडाळून भातावर ठेवले. गॅस मंद केला. नंतर तिने पुलाव शिजला की नाही ते एकदाही पाहिले नाही. चाळीस मिनिटांनी गॅस बंद केला. तोपर्यंत आम्ही टेबलावर प्लेट्स, भांडी, वाट्या सगळे ठेवले होतेच. कैरीचे ताजे लोणचे होतेच.
बच्चे कंपनीला पहिल्यांदा वाढून दिले.
मोठ्या वाडग्यात पुलाव काढून घेतला होता. जसा पुलाव संपत आला, तसा जिने केला ती म्हणाली, "वेट अ मिनिट".
हलक्या हाताने तिने सगळा पुलाव वाडग्यात काढला. हलक्या हाताने तळाशी जमलेली खमंग खरपूस खरपुडी सफाईदारपणे सुरीने काढली आणि ताटात ठेवली.
"परफेक्ट" सगळे एका आवाजात म्हणाले.
खरोखरच ती खमंग फरसबी, भाताला आलेला टोमॅटोचा रंग एकदमच 'परफेक्ट.'
एक जण म्हणाला, "That's the skill. She is master chef."
बघता बघता पुलाव फस्त! पुऱ्या फस्त, फ्रूट सॅलड फस्त. बच्चे कंपनी तर पुलाववर खूश!
त्या मंडळींना टम्म फुगलेल्या पुऱ्या, लोणचे इतके आवडले की विचारूच नका
त्यांची आवडती इराणी पुलाव डिश त्यांना करता आली. बऱ्याच खवय्यांना आवडली. सगळे समाधान पावले. आम्हालाही प्रश्न पडला होता की पुलाव आणि त्यात घालायला खडा मसाला, काजू, कांदा, मटार काहीही नकोय, तर कसा लागेल? एवढ्या दहा मोठ्या वाट्यांचा खपेल की नाही? पण खरोखरच पातेले चाटून पुसून साफ केले नाही, एवढेच! अगदी नावालाही उरला नाही. ती खरपूस खमंग खरपुडी सर्वांना दिली. अहाहा!
नंतर बरेचदा आमच्याकडे 'इराणी पुलाव' होऊ लागला. पण खरे सांगू? तशी खमंग खरपूस खरपुडी मला प्रत्येक वेळी जमतेच असे नाही.
तुमच्यापैकी कोणाला पाककृती प्रयोग करण्यात रस असेल तर जरूर करा. जमली भट्टी तर कळवा.
एक निरीक्षण मुद्दाम सांगावेसे वाटते की इराणमध्ये त्या वेळी सुधारणावादी राजाची राजवट होती. स्त्रीला शिक्षण, स्वातंत्र्य मिळाले, त्याबद्दल त्यांना खूप कृतज्ञता होती. हे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवायचे.
तर असे हे इराणी पाहुणे आले. ती रविवार संध्याकाळ व इराणी पुलाव स्मरणात राहील. आपण म्हणतो की "अन्नदाता तथा भोक्ता पाककर्ता सुखी भव!", त्याचाच हा प्रत्यय!!
अनुराधा काळे
9930499598
प्रतिक्रिया
3 Nov 2021 - 10:56 pm | मुक्त विहारि
छान लिहिले आहे
3 Nov 2021 - 11:41 pm | श्रीगुरुजी
खूप छान लिहिलंय.
4 Nov 2021 - 12:11 pm | अमरेंद्र बाहुबली
छान आहे लेख. बनवून पाहीन. इराणी पुलाव
4 Nov 2021 - 12:28 pm | कंजूस
टोमाटो पुलाव.
4 Nov 2021 - 12:29 pm | चित्रगुप्त
विविध अनुभव खूप छान मांडले आहेत. इराणी पुलाव लवकरच करून बघावा म्हणतो. केल्यावर कळवतो.
मिक्सीतून टमाटर काढल्यावर गाळून घ्यावे लागतात का ?
4 Nov 2021 - 1:43 pm | प्रदीप
अनुभवकथन.
फक्त एकच, Philippines हा उच्चार, फिलीपीन्स असा आहे, फिलिपाईन्स नव्हे.
4 Nov 2021 - 2:19 pm | सोत्रि
ईराणी पुलावाच्या डीटेल्ड रेसिपीबद्दल धन्यवाद!
-(खवय्या आणि बल्लव असलेला) सोकाजी
4 Nov 2021 - 10:00 pm | मनो
आमच्याकडे चेलोकबाबी (چلو کبابی) म्हणजे भात-कबाब नावाचे इराणी रेस्टॉरंट आहे, तिथे हा पुलाव मिळतो का पाहायला पाहिजे. तिथेही मसाले न वापरता अस्सल इराणी पदार्थ चांगले मिळतात. अर्थात खमंग खरपूस खरपुडीसाठी घरीच बनवला पाहिजे ...
7 Nov 2021 - 7:51 am | जुइ
इराणी पुलाव करायला पाहिजे एकदा.
7 Nov 2021 - 10:06 pm | मित्रहो
खूप छान अनुभव कथन
इराणी पुलावची रेसिपी नोट करून ठेवली आहे
9 Nov 2021 - 10:38 pm | सौंदाळा
,मस्तच, अजूनही बरेच अनुभव किस्से असतील तर ते पण लिहा.
10 Nov 2021 - 4:17 am | अनन्त अवधुत
हा त्या लोकांचा ठरलेला विनोद आहे का?
माझ्यासोबत पण अगदि हाच विनोद एकाने केला होता. फक्त त्याने माझा हात हाती धरला नव्हता.
ईराणी पुलावाच्या तपशिलवार कृती बद्दल धन्यवाद.
10 Nov 2021 - 12:55 pm | चौथा कोनाडा
व्वा, मस्तच !
इराणी पुलाव करतानाचे वर्णन वाचून तोंपासू
😋
सुंदर लेखन !
16 Nov 2021 - 12:25 pm | श्वेता व्यास
इराणी पुलाव रेसिपी आवडली, करुन बघायला हवा.
29 Nov 2021 - 5:56 am | अनन्त अवधुत
कसल्याही मसाल्या शिवाय केलेला पुलाव म्हणून थोडी धाकधुक होती.
पण चव घेतल्यावर जाणवले कि ती भिती व्यर्थ होती.
पुलाव एकदम छान लागतो. छान, सोपा, सुटसुटीत, आणि लज्जतदार पदार्थ.
भांड्याच्या बुडाशी लागलेला सोनेरी, खरपूस भात पण चवदार.
5 Dec 2021 - 11:49 pm | नूतन सावंत
झकास पाहुणे आणि त्यांचे अनुभवही.इराणी पुलाव तर खासच.नक्की करून पाहीन.लेखनशैली आवडली.
6 Dec 2021 - 5:53 pm | जेम्स वांड
लेख खूप आवडला मला, मला आलेले काही अनुभव
१. मोरक्कन लोक - दिसायला साधे पण रूपवान आणि गप्पीष्ट गोष्टीवेल्हाळ, त्यांना मुंबईतील (अनायसे तेव्हा रमजान सुरू असल्यामुळे) मोहम्मद अली रोडवर खादाडीला घेऊन गेलो होतो, नंतर कामानिमित्त त्यांना हैदराबादला नेऊन बावर्ची मध्ये बिर्याणी पण घातली होती, परत आल्यावर थेट पुरणपोळी आणि मसालेभात इतकं वाईड स्पेक्ट्रम खाऊ घातलं होतं, हे लोक खाण्याचे भोक्ते होते, त्यांनी सांगितलेली (अन नंतर डिस्कव्हरीवर बघितलेली) निमुळत्या टोकाचं झाकण असलेली ताजीन नावाची कूकिंग मेथड, मराकश मधील प्रचंड विस्तारित "खाऊ गल्ली" असलेला चौक इत्यादी खादाड चविष्ट देवाणघेवाण भरपूर झाली होती.
२. ईराणी - आमच्याकडे दोन इराणी मुली आणि एक मुलगा आले होते कामानिमित्त. "इराणी मुली जगातील सर्वाधिक सुंदर असतात" हे साक्षात सोनेरी ब्राऊन केस असणाऱ्या अन निळसर डोळ्यांच्या इराणी ललनेकडून ऐकणे हा एक धडधड वाढवणारे प्रकरण असते खरेच, बेसिकली त्यांच्या म्हणण्यानुसार ते प्रथम एक "पर्शियन" आणि नंतर एक "मुसलमान" आहेत, त्यांना आपली पर्शियन मुळे, ग्रँड बाजार, पार्सेपोलिसचे रुइन्स वगैरेचा कोण अभिमान, त्यांच्यामते इराणी क्रांती ही एका अतिरेकातून जन्माला येऊन स्वतःच अतिरेकी लेव्हलला गेल्यामुळे एकंदरीत इराणी जनतेचा विलक्षण बल्ल्या झालेला आहे.
पुढे इराणला व्हिजिट करण्याचा अनुभव तर आला नाही पण एकंदरीत त्या पोरी पोरांचा आत्मविश्वास, उमेद अन वागण्यातील शालीनता, ग्रेस इत्यादी पाहता पर्शियन लोकांचा हा सुंदर देश एकदा तरी पाहायचा मानस आहेच.
6 Dec 2021 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इराणी पुलाव आणि आठवणी आवडल्या. लिहिण्याची शैली सुरेख आहे. लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे