दिवाळी अंक २०२१ : ||गुरुकृपा हि केवलं||

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

||गुरुकृपा हि केवलं||

रोज आपले निरूपण संपवताना आचार्य दुसऱ्या दिवशी कोणत्या पाठाने दिवसाची सुरुवात करायची ते सांगत असत. आम्हा सर्व शिष्यांकडून त्यांची अपेक्षा असे की रात्रभर आम्ही त्या पाठावर चिंतन करावे व दुसऱ्या दिवशी त्यावर खंडन-मंडन करावे. रोज सायंकाळी वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे पाठ मिळत व उद्या आता यावर काय बोलायचे यावर विचार करण्यात सारी रात्र सरून जात असे.

एका दिवशी आचार्यांनी घेतलेला श्लोक होता
दुर्जन: सज्जनो भूयात सज्जन: शांतिमाप्नुयात्।
शान्तो मुच्येत बंधेम्यो मुक्त: चान्यान् विमोच्येत्॥

मी रात्रभर त्यावर विचार करत होतो. या श्लोकाचा शब्दश: अर्थ घ्यायचा, तर 'दुर्जन लोक सज्जन होऊ दे, सज्जन लोकांना शांती लाभू दे, शांती लाभलेल्या लोकांना मुक्ती मार्ग सापडो, आणि या मुक्ती मार्गावर चालणाऱ्यांनी इतरांना ह्या मार्गावर चालण्यास साहाय्य करावे.'
दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हा अर्थ सांगितला, तेव्हा आचार्यांच्या चेहऱ्यावर एका मंद स्मित आले. ते म्हणाले, “शब्दःश अर्थ बरोबरच आहे. पण दुर्जन लोकांना असे एकदम सज्जन का बरे व्हावेसे वाटेल? किंवा सज्जन लोकांना शांती का बरे मिळवावीशी वाटेल?” आम्ही सर्व शिष्य एकदम शांत झालो. असा विचार आम्ही कधी केलाच नव्हता.

इतका वेळ मातीत रेघोट्या काढत बसलेला गिरी अचानक म्हणाला, “पण जगात दुर्जन लोक असतात तरी कुठे? मला तर आजपर्यंत एकही दुर्जन व्यक्ती भेटलेली नाही.” त्याच्या या वाक्यावर सर्व शिष्य जोरदार हसले. “महाभारतातला युधिष्ठिरच ना रे तू? तुला कसे बरे कोणी दुर्जन वाटेल?” बाकीचे शिष्य त्याची टिंगल उडवीत म्हणाले. आचार्य मात्र यावर नाराज झालेले दिसले. पण त्यांनी आपली नाराजी प्रकट न करता आणखी एक दृष्टान्त सांगितला -

भानुवेन जगत्सर्वम भासते यस्य तेजसा|| अनात्मकमसतुच्छ किं नु तास्यावाभासकम||

ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने जग प्रकाशित होते, त्याप्रमाणे ब्रह्माच्या प्रकाशाने सर्व जग आत्मभिन्न (अनात्म) मिथ्या आणि तुच्छ असे प्रत्ययाला येते, त्या ब्रह्माला प्रकाशित करणारे काय बरे असणार आहे? पण अशा स्वयंप्रकाशी आत्म्यांच्या सहवासात आलेल्या इतर लोकांना आपोआपच प्रकाशाची वाट दिसायला लागते. सूर्य ज्याप्रमाणे प्रकाश देताना कधीही भेदभाव करत नाही, तसेच ज्यांना प्रकाशाची गरज आहे, त्यांना प्रकाशाची वाट दाखवणे हे ज्ञानमार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आम्हाला सर्वांना समजले की आम्ही गिरीची चेष्टा केलेली आचार्यांना आवडली नव्हती, म्हणून त्यांनी हा दृष्टान्त दिला होता.

गिरी त्यांचा आवडता शिष्य होता. खरे तर आचार्य काय शिकवतात हे त्याला नीटसे उमगते की नाही, हे कधी कळायचेच नाही. वर्गात त्याचे लक्ष कधीच नसायचे. सदानकदा हा फूलपाखराच्या मागे धावण्यात, आचार्यांच्या पायावर वाहण्याकरता फुले तोडण्यात किंवा त्या फुलांची माला गुंफण्यात मग्न असायचा. वर्गात तो बसायचा तो केवळ आचार्यांच्या सहवासात बसायला मिळायचे म्हणून. सायंवंदनेचे श्लोक सुरू झाले की हा आचार्यांच्या संध्येची तयारी करण्यात व्यग्र व्हायचा. कोणत्याही वादविवादात तो कधी भाग घ्यायचा नाही की आचार्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्याला कधी उत्तरे देता आली नाहीत. तो आपला सदानकदा आचार्यांच्या सेवेत मग्न असायचा. पहाटे आचार्य उठायच्या आधी हा त्यांच्या कुटीसमोर हजार असायचा. त्यांच्या प्रात:वंदनेपासून ते संध्येपर्यंत प्रत्येक गोष्टीची तयारी हा करून ठेवायचा. आणि आचार्य रात्री कुटीत झोपायला गेले की मागच हा झोपायला जायचा. आचार्यांचाही त्यावर भारी जीव होता. तो अध्ययन वर्गात दिसला नाही की आचार्य कोणाला तरी त्याला शोधायला पाठवायचे. बऱ्याच वेळा हा नदीच्या किनाऱ्यावर पाण्यात पाय सोडून स्वत:शी एकटाच काहीतरी बोलत बसलेला असायचा.

असो, तर थोडे विषयांतर झाले. मी काय सांगत होतो की आचार्य रोज सायंकाळी एखादा पाठ मनन करण्याकरता देत असत. त्या दिवशी त्यांनी सायंकाळी घेतलेला श्लोक होता -

महास्वप्ने मायाकृतजनिजरामृत्युगहने, भ्रमन्तं क्लिश्यन्तं बहुलतरतापैरनुदिनम्।
अहंकारव्याघ्रव्यथितमिममत्यन्तकृपया, प्रबोध्य प्रस्वापात्परमवितवान्मामसि गुरो॥

मायेने निर्माण केलेल्या स्वप्रात जन्म, जरा आणि मृत्यूच्या महारण्यात भरकटलेल्या व प्रतिदिन नवनव्या दु:खाच्या योगाने क्लेष पावणाऱ्या, अहंकाररूपी व्याघ्र्यामुळे भयकंपित होऊन आपल्या चरणांशी शरण आलेल्या मला, हे गुरुदेव, आपण कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता केवळ अत्यंत कृपाळूपणे या महामोहानिद्रेतून जागृत करून मोठ्या अनर्थापासून रक्षिले आहे. आचार्यांनी हाच श्लोक का बरे घेतला असेल, याचा विचार करत मी निद्रादेवीच्या अधीन झालो.

वयाच्या आठव्या वर्षीच आचार्यांचे वेदाध्ययन पूर्ण झाले होते, त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला आणि गुरुशोधार्थ बाहेर पडले व नर्मदेच्या तिरावर तपश्चर्या करणाऱ्या गोविंदभगवत्पादांच्या पायाशी जाऊन पोहोचले. गोविंदभगवत्पाद हे गौडपादाचार्यांचे शिष्य.

गौडपादाचार्यांच्या केवलाद्वैत संप्रदायाची परंपरा साक्षात भगवान नारायणांपासून सांगितली जाते. नारायण, ब्रह्मदेव, वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक्र येथपर्यंत ही साक्षात पितापुत्र परंपरा आहे; तर शुक्रशिष्य गौडपाद, अशी परंपरा लाभलेल्या गोविंदभगवत्पादांच्या मार्गदर्शनात आचार्य बाराव्या वर्षी ते सर्वशास्त्रपारंगत झाले होते. सोळाव्या वर्षीच प्रस्थानत्रयीवर भाष्य करणारे आचार्य आता झपाटल्यासारखे जगाच्या कल्याणाकरता अविश्रांत वणवण करत होते.

त्यांनी आपल्या जीवनकालात वेदांचे महत्त्व पुन:प्रस्थापित केले. त्याकरिता चार दिशांना चार वेदपीठे चालू केली व तेथे आपल्या शिष्यांची नियुक्ती केली. त्यांच्यासाठी आचार-विचार-विहाराचे दंडक घालून दिले.

आचार्यांकडे शांती, क्षमाशीलता, विलक्षण तेज, सरलत्व, निर्ममत्व, कनवाळूपणा हे अत्यंत अतुलनीय गुण होते. जसे त्रेतायुगात वसिष्ठ ऋषी, द्वापरयुगात व्यास महर्षी, तसे आम्हा शिष्यांच्या मते ते कलियुगातील जगद्गुरू आहेत, ज्यांनी व्यासांच्या ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहिले, त्यांना आणखी दुसरी योग्य उपाधी काय बरे असू शकते?

एकीकडे त्यांच्या ग्रंथरचनाही सुरू असायच्या. आचार्य सांगतील ते आणि त्यांनी सांगितले तसे भूर्जपत्रांवर लिहून काढणे, त्याची क्रमवार मांडणी करत पुन्हा तपासणे, सुवाच्य अक्षरात लिहून काढणे आणि अंतिम ग्रंथरचना आचार्यांकडून मंजूर करून घेणे हेदेखील आम्हा शिष्यांचे काम होते.

दिवसेंदिवस त्यांना मानणारा वर्ग जसा वाढत होता, तसाच त्यांचा त्यांचा शिष्यवर्गही वाढत होता. आचार्य त्यांच्या काही शिष्यांपेक्षा वयाने लहान होते. पण त्यांचा अधिकार मात्र मोठा होता. त्यांनी आपले कार्य पुढे सुरू ठेवण्याकरिता अनेक तोडीस तोड असे शिष्यसुद्धा तयार केले, त्यांनी कर्ममार्गी मंडनमिश्र यांना वादात जिंकून ज्ञानमार्गाकडे वळवले व ह्याच मंडनमिश्रांनी पुढे सुरेश्वराचार्य या नावाने नैष्कर्म्यसिद्धी व बृहदारण्यकवार्तिक असे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले.

आचार्य हा एका असा एक महासागर होता, ज्यात अद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, निर्गुण ब्रह्मज्ञान यांच्याबरोबरच सगुण साकार भक्तीच्या धारा एकत्रितपणे प्रवाही होत्या. त्यांनी हे अनुभवले होते की अद्वैत भूमीवरचा जो परमात्मा निर्गुण निराकार ब्रह्म आहे, तोच परमात्मा द्वैताच्या भूमीवर सगुण साकार रूपात आपल्या भेटीला येतो. ते नेहमी सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारच्या उपासनांचे समर्थन करीत असत. त्यांच्या मते हे दोन्ही मार्ग भिन्न नसून तो केवळ त्याकडे पाहणाऱ्याच्या दृष्टीला झालेला भ्रम आहे. दोन्ही मार्गांचा अंतिम उद्देश आत्मज्ञान आहे. त्यांनी ‘ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या’ असा उद्घोष केला आणि तरीसुद्धा शिव, पार्वती, गणेश, विष्णू इत्यादी अनेक देवतांची स्तुती करणार्‍या भक्तिरसपूर्ण स्तोत्रांच्या रचना ही केल्या. ‘सौन्दर्य लहरी’, ‘विवेक चूड़ामणि’ यासारख्या श्रेष्ठतम ग्रंथांची त्यांनी इतक्या लहान वयातच रचना केली होती. प्रस्थानत्रयीवर भाष्यही लिहिले होते.

श्रीमद्भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषदे यांना सामुदायिकपणे 'प्रस्थानत्रयी' असे म्हटले जाते. वेदान्ताचे हे तीन प्रमुख स्तंभ मानले जातात. उपनिषद हे श्रुती प्रस्थान, श्रीमद्भगवद्गीता हे स्मृती प्रस्थान तर ब्रह्मसूत्रे ही न्याय प्रस्थान म्हणून ओळखली जातात.

याशिवाय त्यांनी तत्त्वज्ञानविषयक अनेक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे आणि तत्सम काव्ये रचली होती.

आपल्या अजोड आणि विद्वत्तापूर्ण तर्कानी त्यांनी शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य आणि कौमार्य हा वादच संपुष्टात आणला होता आणि पंचदेवोपासनेचा मार्ग मोकळा केला. त्यांनी आसेतुहिमालय संपूर्ण भारताची यात्रा केली होती व देशाला सांस्कृतिक, धार्मिक, दार्शनिक, आध्यात्मिक व भौगोलिक एकतेच्या सूत्रात गुंफण्याचे महत्कार्य अंगिकारले होते.

साधक गुरूच्या मार्गदर्शनाखाली नियमाने आणि निष्ठेने साधना करू लागला की, साधकाची बुद्धी शुद्ध होऊन त्याला जे उच्चकोटीचे आंतरिक अनुभव येतात, ते सांगताना आचार्य म्हणत की -
न दृष्टीलक्ष्याणि न चित्तबंधो न देशकालौ न च वायुरोध:|
न धारणा-ध्यान-परिश्रमो वा समेधमाने सती राजयोगे –

अर्थात सदगुरुकृपेने मिळालेली साधना नियमितपणे करण्याने साधकामध्ये राजयोग उत्तम रितीने वृद्धिंगत होऊ लागतो. साधकाला त्याची बुद्धीच शिवमय झाल्याने दृष्टीपुढे ध्यानाकरिता कोणत्याही लक्ष्याची गरज उरत नाही. त्याला आपले चित्त ध्येयवस्तूच्या ठिकाणी लावावे लागत नाही. त्याला देशकालाचे भान विसरण्याची अथवा वायुनिरोधाची खटपट करावी लागत नाही. त्याला ध्यान, धारणा, इत्यादींचे परिश्रम पडत नाहीत. सगळे काही केवळ सद्गुरुकृपेने आपोआपच होते.

आचार्यांच्याच शब्दात सांगायचे झाले, तर “ चिदानंद रूपं शिवोsहं शिवोsहं". अशी अवस्था गुरुकृपेने प्राप्त होते.

आचार्यांनी अद्वैत मताचा प्रसार करत भ्रमण करत असताना लोकजीवन जवळून पहिले. ज्ञानापेक्षा भक्तिमार्ग लोकांना सोपा वाटतो. मात्र ज्या समाजाचा बुद्धिभेद झाला आहे, त्याला नेमकी दिशा दाखवण्यासाठी त्यांनी शिव, पार्वती, गणपती, विष्णू, कृष्ण, पांडुरंग, श्रीराम, लक्ष्मीनृसिंह अशा विविध देवरुपांवर स्तोत्रे रचली.

आचार्यांनी अनेक ग्रंथ लिहून आपले अद्वैत मत त्यात सविस्तर मांडले. ‘विवेकचूडामणि’, ‘अपरोक्षानुभूति’ ‘उपदेशसहस्त्री’ ‘सर्ववेदान्तसिद्धान्त सारसंग्रह’ अशा विविध ग्रंथांमधून आचार्य अद्वैत तत्त्वज्ञानाची सुसंगत मांडणी करताना दिसतात.

‘विवेकचूडामणि’ ही तर आचार्यांच्या सर्वोत्कृष्ठ रचनांपैकी एक आहे.

‘ब्रह्म हेच केवळ सत्य, शाश्वत आहे. दृश्य विश्व हा त्या ब्रह्मावर अज्ञानामुळे होणारा भास आहे. अज्ञानाच्या आवरणामुळे ब्रह्माचे मूळ स्वरूप झाकले गेले आहे व त्या जागी विश्वाचा भास होतो आहे' हा विचार स्पष्ट करण्यासाठी ते आम्हा शिष्यांना रज्जु-सर्प, शुक्ति-रजत असे व्यावहारिक दृष्टान्त देऊन सोपे करून सांगत.

रात्रीच्या अंधारात वार्‍याने हलणारी जमिनीवर पडलेली दोरी जशी लांबून दोरी म्हणून कळत नाही, तर तिथे तिच्या जागी सापाचा भास होतो किंवा समुद्रकिनारी पडलेला उन्हाने चमकणारा शंखाचा तुकडा ‘शंख’ म्हणून कळत नाहीं, चांदीचा तुकडा वाटतो, तसेच ब्रह्म अज्ञानामुळे ब्रह्म म्हणून न कळता त्या जागी विश्वाचा भास होतो. हा भास नाहीसा होतो तो अज्ञानाचे आवरण नाहीसे झाले की आणि हे आवरण नष्ट व्हायचे असेल, तर ‘सदसद्विवेक’ माणसाकडे असायला हवा, शाश्वत काय, अशाश्वत काय हे ओळखण्याचे सामर्थ्य हवे. हे सामर्थ्य सत्संगाने येते, अभ्यासाने येते, असे आचार्य सांगत.

केळीचा बुंधा सोलत गेले तर शेवटी जसे काहीच उरत नाही, तसे विश्व म्हणजे काय हे समजून घेण्याकरता त्याच्या मुळाशी गेले तर विश्व म्हणून वेगळे असे काही नाहीच आहे, हेच लक्षात येते. अनेक अवघड विषय आचार्य असे अतिशय सोप्या भाषेत सांगायचे.

ज्या प्रकारचा श्रोता समोर बसलेला असेल, त्याप्रमाणे त्यांचे दृष्टान्त बदलायचे. त्यांच्यासमोर आलेली व्यक्ती महापंडित असो किंवा एखादा सामान्य मनुष्य, ते त्याला क्षणात आपलेसे करून टाकायचे आणि आपले मत त्याला पटवून द्यायचेच.

परत एकदा थोडे विषयांतर झाले.. मी गिरीची गोष्ट सांगता सांगता आचार्यांची गोष्टच सांगत बसलो. आता पुन्हा आपण आपल्या मूळ गोष्टीडे वळू या.

तर मी काय सांगत होतो की आमच्याबरोबर शिकणाऱ्या गिरीचे लक्ष अध्ययनापेक्षा इतर गोष्टीत जास्त असायचे. तो सर्व शिष्यांचा टवाळीचा एका विषय होता. उगाच जड जड प्रश्न विचारून त्याची इतर शिष्य भंबेरी उडवायचे. पण गिरी मात्र आचार्यांची सेवा करण्यात व्यग्र असायचा.

दुसऱ्या दिवशी पाठ सुरू झाल्यावर आचार्यांनी काल सांगितलेला श्लोक पुन्हा म्हटला.

महास्वप्ने मायाकृतजनिजरामृत्युगहने, भ्रमन्तं क्लिश्यन्तं बहुलतरतापैरनुदिनम्।
अहंकारव्याघ्रव्यथितमिममत्यन्तकृपया, प्रबोध्य प्रस्वापात्परमवितवान्मामसि गुरो॥

त्यावर उत्तर देताना कोणीतरी “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरा” असे प्रतिपादन केले तर कोणी “आचार्य देवो भव” अशी आचार्यांची स्तुती केली,

तर कोणी आचार्यांचा “ अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम तत पदम् दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः” हा श्लोक त्यांनाच ऐकवला.

मी माझ्या विवेचनाची सुरुवात
देवो रुष्टे गुरुस्त्राता गुरो रुष्टे न कश्चन:।
गुरुस्त्राता गुरुस्त्राता गुरुस्त्राता न संशयः।।
(देव कोपला तर त्या कोपापासून गुरु आपल्याला वाचवू शकतो, पण गुरूच जर कोपला तर त्याच्या कोपापासून आपल्याला एकच व्यक्ती वाचवू शकते, ती म्हणजे फक्त गुरु, गुरु आणि केवळ गुरूच.)
अशी केली. त्यावर आचार्य केवळ मंदपणे हसले, पण काहीच बोलले नाहीत.

अनेक जण अनेक प्रकारे बोलले, पण आचार्यांचे लक्ष त्याकडे जणू नव्हतेच. ते कोणालातरी शोधत होते. शेवटी न रहावून मी विचारले “आचार्य काय झाले? कोणाची वाट पहात आहात? आम्ही सगळे या श्लोकाचे विवेचन आपल्याकडून ऐकण्यास उत्सुक आहोत.”

त्यांनी माझ्याकडे पाहत मंद स्मित केले, जणू मी त्यांच्या मनातलेच ओळखले होते. ते म्हणाले “आपला गिरी कुठे दिसत नाही तो? कुठे आहे कोणाला माहीत आहे का? तो आल्याशिवाय मी माझे विवेचन कसे सुरु करू?”

एका शिष्य पटकन उठला आणि म्हणाला, “क्षमा करा आचार्य, आपण त्याच्याकरता का थांबायचे? तसेही त्याला विद्याभ्यासात काही रस नसतो. त्याचे सगळे लक्ष भलतीकडेच असते. त्याच्याकडून खंडन-मंडनाची अपेक्षा करणे म्हणजे बाभळीकडून मधुर आम्रफलाची अपेक्षा करण्यासारखे आहे.”

खरे तर आचार्यांना आपल्या शिष्याचे हे बोलणे आवडत नव्हते. पण त्यांचा मूळ स्वभावच मृदू असल्याने त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण तो शिष्य काही थांबायला तयार नव्हता. तो पुढे म्हणाला, “दुर्जनः सुजनीकर्तु यत्नेनापि न शक्यते। संस्कारेणापि लशुनं कः सुगन्धीकरिष्यति॥“ अर्थात मुळात जो दुर्गुणी, अज्ञानी, मूर्ख मनुष्य आहे, कितीही प्रयत्न केले तरी त्याचे रुपांतर शहाण्या सज्जन माणसात कसे होईल? लसणावर संस्कार करून त्याला सुवासिक करणे कोणाला तरी शक्य आहे का?

आम्ही सगळे शिष्य हा प्रतिवाद ऐकून अवाक झालो होतो. कधीही न पाहिलेला आचार्यांचा संताप आज आपल्याला अनुभवायला मिळणार याची आम्हाला खातरीच पटली होती. पण इथे काहीतरी वेगळेच घडता होते. आचार्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित काही जराही कमी झाले नाही.

त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबायची विनंती केली आणि त्यांनी बसल्या जागेवरून गिरीला जोरात हाका मारली, “गिरी, जिथे असशील, जसा असशील तिथून ताबडतोब आमच्या समोर ये.” आचार्यांचा पुकारा संपतो न संपतो तोवर गिरी धावत पळत धडपडत तिथे आला आणि त्याने आचार्यांच्या पायावर नम्रपणे डोके टेकवले.

आचार्यांनी अतिशय प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, “गिरी.. आम्ही काल जो श्लोक सांगितला, त्यावर तुला काय प्रतिपादन करायचे आहे?”

गिरीने डोळे उघडले. आता त्याच्या डोळ्यात आता एका वेगळीच चमक दिसत होती व चेहऱ्यावर एक आत्मविश्वास झळकत होता. धडपडत धावत ठेचकाळत तिथे आलेला तो हा गिरी नव्हताच. हा कोणी तरी वेगळाच माणूस भासत होता. आचार्यांनी नुसता त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि जणू तो आमूलाग्र बदलून गेला होता. आता काहीतरी वेगळेच घडणार आहे, याची आम्हाला जाणीव होत होती.

आचार्य म्हणाले, “बोल गिरी बोल, आम्ही सगळे तुझे म्हणणे ऐकायला उत्सुक झालो आहोत.”

आचार्यांवर अनन्य श्रद्धा असलेल्या गिरीने पाठ घेण्यास सुरवात केली. आणि काय आश्चर्य! त्याचे अज्ञान मावळून सरस्वती त्यावर प्रसन्न झाली. अत्यंत नम्रपणे आणि भक्तिपूर्ण अंतःकरणाने त्याने आचार्यांची स्तुती म्हणण्यास प्रारंभ केला. कारुण्यरसाने ओथंबलेले स्तोत्र म्हणत असतांना त्याचा कंठ सद्गदित होत होता. त्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या.

त्याने स्तोत्ररचनेकरता वापरलेले वृत्तही साधेसुधे नव्हते, तर तो चक्क तोटकवृत्तामध्ये त्याची रचना आचार्यांसमोर गायला लागला. तोटकवृत्त हे एक अवघड वृत्त आहे. आणि या वृत्तात रचना करण्याकरता विलक्षण प्रतिभेची गरज असते. गिरी म्हणत होता -

विदिताखिल शास्त्र सुधा जलधे, महितोपनिषत्-कथितार्थ निधे ।
हृदये कलये विमलं चरणं, भव शङ्कर देशिक मे शरणम् ॥ १ ॥

(हे सर्व शास्त्रांच्या ज्ञात्या, तू तर उपनिषदे कोळून प्यायली आहेस, तुझ्या चरणांशी मला स्थान दे, गुरुवर्य शंकराचार्य, मला ज्ञान द्या.)

करुणा वरुणालय पालय मां, भवसागर दुःख विदून हृदम् ।
रचयाखिल दर्शन तत्त्वविदं, भव शङ्कर देशिक मे शरणम् ॥ २ ॥
(हे करुणानिधान, तुझ्या असीम कृपेनेच हा अज्ञानाचा भवसागर मी पार करू शकेन. मी मूढमती. मला ना वेद-शास्त्र समजतात, ना तत्त्वज्ञान. हे गुरुवर्या, माझ्या मनी ज्ञानाची ज्योत चेतवा.)

भवता जनता सुहिता भविता, निजबोध विचारण चारुमते ।
कलयेश्वर जीव विवेक विदं, भव शङ्कर देशिक मे शरणम् ॥ ३ ॥
(आम्हा शिष्यांचा तूच तारणहार आहेस, आम्हाला अनाकलनीय असा निजबोध तू सहजतेने उकलून दाखवतोस, जिवाशिवाची भेट घडेल असा ज्ञानबोध मला द्या गुरुदेव.)

भव एव भवानिति मे नितरां, समजायत चेतसि कौतुकिता ।
मम वारय मोह महाजलधिं, भव शङ्कर देशिक मे शरणम् ॥ ४ ॥
(तुम्ही तर साक्षात शिवाचा अवतार आहात, मला तुम्ही परब्रह्मस्वरूपच वाटता, तुमचा सहवासानेदेखील एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती येते. हे गुरुदेव, या मोहमायेच्या विळख्यातून माझी सुटका करा.)

सुकृते धिकृते बहुधा भवतो, भविता समदर्शन लालसता ।
अति दीनमिमं परिपालय मां, भव शङ्कर देशिक मे शरणम् ॥ ५ ॥
(मलादेखील तुमच्याप्रमाणे समदर्शी व्हायचे आहे. क्षणोक्षणी माझ्या हातून सत्कृत्ये घडावी असे मला वरदान द्या. मी तुम्हाला शरण आलो आहे. हे गुरुदेव, मजवर कृपा करा.)

जगतीमवितुं कलिताकृतयो, विचरन्ति महामाह सच्छलतः ।
अहिमांशुरिवात्र विभासि गुरो, भव शङ्कर देशिक मे शरणम् ॥ ६ ॥
(लोककल्याणास्तव कित्येक अवतारी पुरुष या जगात येऊन गेले. तुम्ही त्यांचा मुकुटमणी आहात. या अंधकारमय जगतातून मुक्ती मिळवण्याकरता हे ज्ञानसूर्या, मला प्रकाशाचे वरदान दे.)

गुरुपुङ्गव पुङ्गवकेतन ते, समतामयतां न हि कोपि सुधीः ।
शरणागत वत्सल तत्त्वनिधे, भव शङ्कर देशिक मे शरणम् ॥ ७ ॥
( हे गुरुश्रेष्ठा, तू अनेकांचा मार्गदर्शक आहेस. तुझी तुझ्या शिष्यांवर अतिव माया आहे. तेव्हा हे गुरुदेव, मला पथदर्शन करा.)

विदिता न मया विशदैक कला, न च किञ्चन काञ्चनमस्ति गुरो ।
दृतमेव विधेहि कृपां सहजां, भव शङ्कर देशिक मे शरणम् ॥ ८ ॥
(ज्ञानप्राप्ती कशी करावी हे मला ठाऊक नाही, पण ज्ञानतृष्णेने मी व्याकूळ झालो आहे. हे कृपानिधान, आपण या अबोध बालकाचा हात धरून त्याची पावले योग्य दिशेने वळवावी.)

भल्याभल्यांना न झेपणाऱ्या तोटक वृत्तात गिरी तल्लीन होऊन गात होता आणि आम्ही सर्व शिष्य अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होतो. ही गुरुकृपा नव्हे, तर आणखी काय आहे?

या प्रसंगानंतर आचार्य गिरीला गमतीने तोटकाचार्य म्हणायला लागले आणि पुढे त्याचे हेच नाव रूढ झाले. तोटकाचार्यांनी पुढे इतकी प्रगती केली की पुढे जाऊन ते आचार्यांनी त्यांना बदरिकाश्रमी स्थापना केलेल्या जोतिर्मठाचे प्रमुख झाले.

प्रखर ज्ञानसूर्य आणि तरीही शीतल असलेल्या या 'तापहीन मार्तंडाला', श्री शंकराचार्यांना वंदन करून हे लेखन-पुष्प त्यांच्या विमलचरणी विनम्र भावाने अर्पण.

नमस्तस्मै भगवते शंकराचार्यरूपिणे| येन वेदांतविद्येय मुदधृता वेदसागरात||
अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रवित | षोडशे कृतवान भाष्यं द्वात्रींशेत्रीं शेमुनीरभ्यगात||
(ज्यांनी वेदसागराचे दोहन करून वेदान्तविद्या बाहेर काढून त्या विद्येच्या नवनीताने सामान्य लोकांचा उद्धार केला, अशा श्रीशंकराचार्यांना वंदन. वयाच्या आठव्या वर्षी चारही वेदांमध्ये निष्णात होऊन बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण होऊन, सोळाव्या वर्षी भाष्ये लिहून श्रीमद्शंकराचार्य बत्तिसाव्या वर्षी समाधिस्थ झाले.)

ज्ञानोबाचे पैजार

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

2 Nov 2021 - 3:23 pm | अनन्त्_यात्री

आवडली.
तोटकाष्टकाचा अर्थ थोडा विस्ताराने द्यायला हवा होता.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Nov 2021 - 6:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

विस्तारभयास्तव मी हात अखडून घेतला. नाहितर त्यावर लिहिण्यासारखे बरेच काही आहे.
तोटकाष्टकावर मधे रामकृष्ण मठाच्या ग्रंथालयात एक पुस्तकच मिळाले होते.
पण तोटकाष्टक स्वतः म्हणण्यात किंवा ऐकण्यात जी गंम्मत आहे ती त्या बद्दल वाचून येत नाही.
पैजारबुवा,

Jayant Naik's picture

2 Nov 2021 - 7:01 pm | Jayant Naik

अतिशय सुरेख विवेचन. गोष्टी रूपाने मांडल्याने मस्त वाटले. अभिनंदन.

पाषाणभेद's picture

2 Nov 2021 - 8:09 pm | पाषाणभेद

आचार्य, नमो नम:

राघव's picture

2 Nov 2021 - 8:28 pm | राघव

भाऊराया, मनःपूर्वक धन्यवाद. खूप आवडले आहे हे. सुंदर.
गुरुकृपा म्हणजे काय हे कळायला सुद्धा गुरुकृपाच लागते. त्रिवार नमन _/\_

तुषार काळभोर's picture

3 Nov 2021 - 5:33 pm | तुषार काळभोर

किती छान लिहिलंय!
गुरुकृपेचं अतिशय छान विवेचन..

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 5:44 pm | मुक्त विहारि

उत्तम गुरू लाभायला नशीब लागते

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

3 Nov 2021 - 8:17 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान.

MipaPremiYogesh's picture

4 Nov 2021 - 10:20 pm | MipaPremiYogesh

सुंदर लिहिले आहे

ही ओळख आवडली.. या ओळखिबद्दल धन्यवाद