body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
तो दारात उभा. उंच, सावळा, सडपातळ, कुरळे केस, डोळ्यांवर चश्मा. त्याची दाढी त्याला शोभत होती. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं तेज. ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाने भारावली. आपल्या घरी कुणीतरी पाहुणे येणार आहेत, ते स्वामी आत्मानंदांचे शिष्य आहेत, एवढी चर्चा तिने ऐकलेली होती. तिला वाटलं, असेल कुणीतरी म्हातारा दाढीवाला. त्याच्या पायांत चपला नव्हत्या. तो अनवाणीच आला होता. ती नेमकी त्याच्यासमोरच. मध्यम. उंचीची, गोरी, देखणी. वय सतरा. काॅलेजच्या पहिल्या वर्षाला. केस मोकळे सोडलेले. थोडे थोडे दोन्ही खांद्यांवरून पुढे. मधले केस पाठीवर. माॅड. कपाळावर कुंकू नाही. हातात फक्त एक कडं. तो अस्खलित इंग्लिशमध्ये म्हणाला, "मायसेल्फ राघवेंद्र कृष्णमूर्ती. आय वाँट टु मीट मिस्टर प्रभाकर." त्याचं बोलणं ऐकून ती भांबावली. "प्रभाकर, येस. माय ब्रदर. प्लीज कम इन. बी सीटेड. आय विल काॅल हिम." ती कसेबसे इंग्लिश शब्द जुळवत, चाचरत बोलली. तो आत आला. सोफ्यावर बसला. तिने भावाला, प्रभाकरला बोलावलं. प्रभाकर बाहेर आला. कृष्णमूर्तींना बघून त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू फुटलं. कृष्णमूर्तींना सोडायला गाडी आलेली होती. तिच्यात ड्रायव्हिंग सीटवर बसलेला, पाॅश कपडे घातलेला एक माणूसही आता आत आला. प्रभाकरने त्याचंही स्वागत केलं. तिची आणि कृष्णमूर्तींची ओळख करून दिली. तिला सांगितलं, "आईला म्हणावं चहा आणि खाणं पाठवून दे."
ती आत गेली. पुन्हा बाहेर आली. दोघांचं बोलणं ऐकायला. तिला कृष्णमूर्ती जबरदस्त आवडलेला होता. ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाने भारावली. तिचा दादा प्रभाकर आणि कृष्णमूर्ती इंग्लिशमध्येच बोलत होते. त्याला हिंदीही येत नव्हतं, मराठी तर सोडाच. ही खरी मोठी पंचाईत. त्याच्याशी गप्पा कशा मारणार?
तिचा दादा प्रभाकर आध्यात्मिक प्रवृत्तीचा होता. तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा. घरातली देवपूजा रोज तोच करायचा. तो मेडिकल कॉलेजमधून पास आउट होऊन आला होता आणि आता एम.डी. करत होता. त्यांचे वडील नोकरी करायचे. रिटायरमेंटला आले होते. आई गृहिणी होती.
त्या दोघांच्या संभाषणातून तिला कळलं की आर. कृष्णमूर्ती मूळचा मद्रासचा होता. तो एम.एस्सी.पर्यंत शिकला होता. आता मुंबईला राहत होता. तो चपला वापरत नाही. स्वामीजींचा उपदेश त्याला पटला आणि तो त्यांचा शिष्य झाला. भारी पगाराची नोकरी सोडून धर्मकार्यात आला. आता तो आत्मानंद मिशनचं काम करतो. गावोगावी फिरतो. भगवद्गीता त्याला तोंडपाठ आहे. तिचा तो अर्थ सांगतो. तत्त्वज्ञान विशद करून सांगतो. मोठमोठ्या सभांतून बोलतो. त्याला संस्कृत भाषा उत्तम बोलता येते.
दादा विचारत होता, म्हणून तो हे सगळं सांगत होता. अतिशय नम्रपणे. अवघडल्या स्वरात. आमच्या गावात त्याला आत्मानंद मिशनचं काम सुरू करायचं होतं. त्यासाठीच तो आला होता. गावातल्या एका प्रतिष्ठित डॉक्टरांकडे, डॉक्टर पानशांच्या भल्यामोठ्या बंगल्यात तो उतरला होता. आज संध्याकाळीच पानसेंच्या हाॅलमध्ये ग्रूप सुरू होणार होता. दादाने आणि पानसेंनी सभासद गोळा केले होते. माईक, स्पीकर्स सगळी व्यवस्था होती. चाळीस सदस्य होते.
आतून खाणं आलम. कृष्णमूर्तींच्या पुढे आईने खाण्याच्या डिशेस ठेवल्या. तो इंग्लिशमध्ये म्हणाला, "साॅरी, पण मी हे खाऊ शकणार नाही. सकाळी माझी योगासनं आणि वर्कआउट झाल्यानंतर मी डॉक्टर पानसेंकडे ब्रेकफस्ट केला आहे. आता मी फक्त लाइम ज्यूस पिईन. साॅरी." तो माफी मागत म्हणाला. दादाने आईची ओळख करून दिली. त्याने आईला साष्टांग नमस्कार केला. आईशी इंग्लिशमध्ये बोलला. आईनं हसतहसत फक्त मान डोलावली.
ती मंतरल्यागत हे सर्व पाहत होती. किती नम्रपणे, हलक्या आवाजात बोलत होता तो! आवाजाला एक छान बेस होता. त्याच्या तरुण, उमद्या वयाला किंचित न शोभणारा. कोचावरही तो ताठ बसला होता. मानही ताठ. चेहऱ्यावर प्रसन्न नम्रता. मसल्स कमावलेले. कुरळे केस नीटनेटके कापलेले. असाच ,असाच आपला प्रियकर हवा! हाच आपला जीवनसाथी हवा! ती वेड्यागत विचार करत होती. आईने मराठीत विचारलं, "मिसेस बरोबर आल्यात का?"
त्यातला फक्त 'मिसेस' शब्द ऐकून तो इंग्लिशमध्ये म्हणाला, "नो मिसेस. आणि येणारही नाही. मी लग्न करणार नाही. बॅचलर राहून मिशनचं काम करणार. आपल्या धर्माचा प्रसार करणार. सोशल वर्क करणार. भगवान श्रीकृष्णाची शिकवण सगळ्यांना सांगणार." आईला त्याचं बोलणं आवश्यक तेवढं कळलं. त्याचं इंग्लिश सफाईदार होतं. त्यात साउथ इंडियन हेल नव्हते.
तिची थोडी निराशाच झाली. हा जन्मभर बॅचलर राहणार? पण.. असू दे ना! मीही स्वामींची शिष्या होईन. धर्मप्रसार करत कृष्णमूर्तींबरोबर भारतभर हिंडेन. मला त्याचा सहवास तर मिळेल!
तो लिंबू सरबत पिऊन जायला निघाला. जाताना तिच्याकडे बघत तिला नमस्कार करून म्हणाला, "सिस्टर, यू ऑल्सो कम फाॅर इव्हिनिंग सेशन. वुई एक्स्पेक्ट यंगस्टर्स टु पार्टीसिपेट इन अवर मिशन." तिने मानेने होकार दिला आणि म्हटलं, "शुअर."
त्याने म्हटलेल्या सिस्टर या संबोधनाकडे तिनं दुर्लक्ष केलं. तिने त्याला वाकून नमस्कार केला, "गाॅड ब्लेस यू. हरि ॐ." तो म्हणाला आणि निघून गेला. भारलेल्या अवस्थेत ती त्याच्या जाण्याच्या वाटेकडे बघत होती. तो ऐटीत गाडीत बसला. एक वळण घेत गाडी निघून गेली.
संध्याकाळच्या त्याच्या लेक्चरला जायचं तिने निश्चित केलं. काॅलेजमधे तीन वाजता शेवटचं लेक्चर होतं. सेशन संध्याकाळी सहा वाजता होतं. अभ्यासाचं नुकसान नव्हतं. तिने प्रभाकरला म्हटलं, "मीही येते तुझ्याबरोबर कृष्णमूर्तींच्या लेक्चरला." आई म्हणाली, "एरवी देवाची पूजा कर म्हटलं तर करत नाहीस. आणि आज त्यांचं गीतेवरचं लेक्चर ऐकायला जाणार आहेस का?"
तिने म्हटलं, "पूजेत कर्मकांड आहे. लेक्चरमध्येव फिलाॅसाॅफी आहे धर्माची. फरक आहे दोन्हींत."
"जा बाई, म्हणजे मला संध्याकाळी स्वयंपाकात मदत नाहीच. तुला स्वयंपाक यायला पाहिजे. लग्नानंतर करावा लागेल." आई वैतागून म्हणाली.
"मी लग्नच करणार नाही. बॅचलर राहणार. कृष्णमूर्तींसारखी. सोशल वर्क करणार." ती म्हणाली.
ती जाणार होतीच. कृष्णमूर्तींनी स्वतः तिला आमंत्रण दिलं होतं.
संध्याकाळी ती दादाबरोबर गेली. बाबा कामावरून आले, पण ते त्यांच्याबरोबर गेले नाहीत. म्हणाले, "ह्या प्रभाकरची एकेक फॅडं असतात. मी नाही येणार."
कृष्णमूर्तींचं लेक्चर उत्कृष्ट झालं.
लेक्चर सुरू करण्यापूर्वी ते गीताध्यान म्हणाले, "ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं....."
नंतर गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला कर्मयोग त्यांनी सोपा करून सांगितला. सोप्या इंग्लिशमधून ते बोलत होते. अतिशय प्रभावी ऐकत राहावा असा आवाज. त्या आवाजाच्याच कुणीही प्रेमात पडावं. ती तर पडलीच होती. स्वच्छ, स्पष्ट संस्कृत शब्दोच्चार. बोलताना कोणताही अभिनिवेश नाही. त्यांच्याबरोबर श्लोक म्हणायला एक तरुण, सुंदर सावळी, साडी नेसलेली मुलगी होती. तिला तिचा मत्सर वाटला. वाटलं. ती कृष्णमूर्तींना आवडत असेल का? वाटलं, उद्या तिच्या जागी मी असणार. मी श्लोक वाचणार आणि ते अर्थ सांगणार. प्रत्येक वेळी अर्थ सांगून झाला की, ते त्या मुलीकडे वळून पाहत म्हणत, "सिस्टर, रीड द नेक्स्ट श्लोका." म्हणजे ते तिलाही सिस्टर म्हणत होते.
लेक्चर संपलं. सगळ्यांनाच लेक्चर आवडलं. कृष्णमूर्ती आठ दिवस आमच्या गावात राहणार होते. आठ दिवस ते फक्त दुसऱ्या अध्यायावरच बोलणार होते.
दादा आणि ती घरी जायला निघाले. कारमध्ये बसता बसता ती दादाला म्हणाली, "गीतेची एक प्रत घेऊ या. अर्थासकट. मी रोज वाचणार आहे."
दादा हसला. तिने पुस्तक घेतलं.
ती घरी आली. आईला म्हणाली, "उद्यापासून मी साडी नेसणार. तुझे ब्लाऊज आतून टाचून घालेन. कुंकू लावणार रोज."
आई तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली.
ती पूर्ण बदलली. साडी, कुंकू, हातात बांगड्या. बाकी अलंकारांचा तिने त्याग केला. केस वर बांधायला लागली. रोज गीता वाचायची. तिने चपला घालणं सोडून दिलं. सगळीकडे अनवाणी जायला लागली. ती गंभीर झाली. ती मॅच्युअर झाली.
रोज ती लेक्चर ऐकायला जायची. रोज कृष्णमूर्तींबरोबर गीताध्यान म्हणताना तिच्याही नकळत तिच्या डोळ्यांतून अश्रू अनावरपणे वाहायचे. एक विलक्षण भावनातिरेक तिच्या मनात दाटून यायचा.
कृष्णमूर्ती आता जाणार. नंतर कुठे, कधी, कसे भेटतील? आपणहि जाऊ या का त्यांच्याबरोबर? ते जातील तिथे जाऊ या. काॅलेज राहू दे. अभ्यास राहू दे. सगळं सोडून देऊ. धर्मप्रसारासाठी आयुष्य वेचू.
इतक्या तरुण वयात सर्वसंगपरित्याग करून धर्मप्रसार करणारे कृष्णमूर्ती किती उमदं व्यक्तिमत्त्व!
तिनं हातात जपमाळ घेतली. ओढल्या जाणाऱ्या प्रत्येक मण्यासोबत ती पुटपुटू लागली, "कृष्णमूर्ती, कृष्णमूर्ती, कृष्णमूर्ती!"
आठ दिवस झपाटल्यासारखे गेले. संपले. संपून गेले. सरले. अखेर तो दिवस उजाडला. कृष्णमूर्ती जायला निघाले. जाताना त्यांच्या घरी आले. ती बाहेर आली नाही. त्यांना निरोप देण्याचं धैर्य तिच्यात नव्हतं. काल रात्री तिला झोप लागली नाही. तिचे डोळे रडून रडून सुजले होते.
कृष्णमूर्ती दादाला म्हणाले, "गिव्ह धिस टू सिस्टर."
त्यांनी एक जपमाळ दादाच्या हातात ठेवली. ते झटकन वळले आणि गाडीत जाऊन बसले. त्यांच्या पायांत चपला नव्हत्या.
त्यानंतर वर्षांमागून वर्षं गेली, दशकांमागून दशकं गेली. तिने पुढे लग्न केलं. त्याआधी ती दोन-तीनदा प्रेमातही पडली. आता तिला नातवंडं होण्याची वेळ आली. ती स्थिरावलीय. तिचं रुटीन सुरु आहे. ती मजेत आहे. 'त्या'ने दिलेली जपमाळ तिच्या माहेरीच कुठेतरी सामानात गळबटलीय.
'तो' तिला पन्नास वर्षांत पुन्हा भेटलेला नाही. पत्र नाही. निरोप नाही. फोन नाही. मेसेजही नाही.
तिच्याकडे आता एका वेळी वेगवेगळ्या चपलांचे पंधरा जोड आहेत.
प्रतिक्रिया
2 Nov 2021 - 2:12 pm | गवि
सुटसुटीत आकाराची पण उत्तम कथा. आवडली.
2 Nov 2021 - 2:17 pm | मुक्त विहारि
छान आहे
2 Nov 2021 - 3:27 pm | सौंदाळा
एकदम प्रॅक्टिकल
किशोरवयात वाटणारे तत्कालीक आकर्षण, मस्त लिहिले आहे.
2 Nov 2021 - 3:42 pm | श्वेता२४
शेवट वाचला आणि हसूच आलं.
2 Nov 2021 - 4:48 pm | श्वेता व्यास
फार कमी लोक इतक्या कमी वयात विचारांवर ठाम असतात, ज्या गोष्टीची भुरळ पडेल त्याप्रमाणे वागणं बदलत जातं, हे गोष्टीतून छान अधोरेखीत झालं आहे.
3 Nov 2021 - 3:47 am | पाषाणभेद
कृष्णमूर्ती सगळे जाणून असावेत.
3 Nov 2021 - 7:17 am | राघवेंद्र
मस्त कथा एकदम आवडली
4 Nov 2021 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजी कथा आवडली. आजीची लेखनाची शैली भारी असते. पात्र उभे करण्याची आणि प्रसंग उभे डिक्टो मनासमोर उभे करण्याची हातोटी एकदम क्लास. लैच भारी. 'ती' बदलली हे बरं झालं. मला वाटलं आयुष्याचं मातेरं करुन घेते की काय. मला या बुवा वगैरे लोकांची कायम भिती वाटते. भावनेच्या भरात काही शब्द देवून बसू आणि आयुष्यात तिसरंच काही त्रांगडं उभे राहील. मस्त गं आजी. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
11 Nov 2021 - 12:42 pm | तुषार काळभोर
+१
4 Nov 2021 - 8:08 pm | Nitin Palkar
नवथर वयातलं भारावलेपण खूप छान टिपलंय
5 Nov 2021 - 6:07 pm | चौथा कोनाडा
भारून जाण्याची युवावस्था.
तिला सिस्टर म्हटल्यावर वाईट वाटले..
बिचारीची एकतर्फी लवस्टोरी तिथेच संपली !
सुंदर ओघवते लेखन
आजी + १
5 Nov 2021 - 9:29 pm | सौ मृदुला धनंजय...
खूप सुंदर कथा
6 Nov 2021 - 12:21 pm | चित्रगुप्त
कथा आणि लेखनशैली आवडली.खूप छान लिहीले आहे.
6 Nov 2021 - 12:37 pm | प्रचेतस
आजींचे लेखन नेहमीच आवडते. सहजसुंदर शैली.
10 Nov 2021 - 5:19 pm | प्राची अश्विनी
+११
8 Nov 2021 - 6:41 pm | श्रीगणेशा
एवढा वेळ गंभीरतेच्या वाटेनं जाणाऱ्या गोष्टीनं अचानक विनोदी वळण घेतलं, तेही एकाच वाक्यात! :-)
कथा आवडली.
9 Nov 2021 - 1:40 pm | राजेंद्र मेहेंदळे
नकळत्या वयात भारावुन जाणे वेगळे ,पण पुढे आयुष्यभर ते सांभाळणे कठीण.बरे झाले जपमाळ माहेरीच गळबटली ते. नाहीतर चणे आहेत तेव्हा दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत अशी अवस्था झाली असती.
11 Nov 2021 - 6:22 am | सुधीर कांदळकर
कथा आवडली. ओघवती प्रसन्न शैली आवडली. धन्यवाद.
11 Nov 2021 - 1:44 pm | अनिंद्य
शेवटच्या वाक्याला एकदम हसू फुटले !
मलाही आयुष्यात दोनदा संन्यास घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती, अर्थात त्याला 'असले' काही कारण नव्हते :-) आज प्रेमवर्षाव करणाऱ्या स्वतःच्या गोतावळ्याकडे पाहून येणारी तृप्ती आणि आनंद बघता दोन्ही वेळा घडलेली माघार किती योग्य होती ह्याची जाणीव होते.
उत्तम लेखन.
11 Nov 2021 - 8:03 pm | मदनबाण
आजी चकली सारखेच कुरकुरीत लेखन आवडले !
दशकांमागून दशकं गेली. तिने पुढे लग्न केलं. त्याआधी ती दोन-तीनदा प्रेमातही पडली.
आजी, हल्ली दर आठवड्याला पाखरांचे "क्रश" बदलतात म्हणे ! :)))
मदनबाण.....
12 Nov 2021 - 2:43 pm | एकनाथ जाधव
सुन्दर आणि सुटमुटीत
13 Nov 2021 - 12:50 pm | आंबट गोड
ही तुमचीच तर गोष्ट नाही ना?
:-)
13 Nov 2021 - 9:07 pm | मित्रहो
शेवटपर्यंत कथा मस्त ताणली शेवट तर एकदम भारी. आवडली.
15 Nov 2021 - 11:10 am | आजी
गवि-कथा आवडली हे वाचून बरं वाटलं. थॅन्क्स.
मुक्तविहारी-सुटसुटीत पण छान प्रतिसाद.
सौंदाळा-धन्यवाद.
श्वेता २४-तुम्हांला कथेच्या शेवटी हसू आलं?पण मला ते अभिप्रेत नव्हतं.
श्वेता व्यास-'भुरळ'हा योग्य शब्द वापरलात.
पाषाणभेद-'कृष्णमूर्ती सगळं जाणून असावेत.'हा तुमचा मर्मग्राही अभिप्राय. त्याचं उत्तर 'अर्थात् जाणून असणार'असे आहे.
राघवेंद्र-आभारी आहे.
प्रा.डाॅ.दिलिप बिरुटे- कथेतले कृष्णमूर्ती पात्र हे कुणी 'भोंदू बुवा'नाहीत. खरोखरच गीतेचे, हिंदू धर्माचे निष्ठावान,गाढे अभ्यासक आहेत असे अभिप्रेत आहे. बाकी, 'लिहिती राहेन'हे आश्वासन देते.
तुषार काळभोर-धन्यवाद.
चौथा कोनाडा-अभिप्राय वाचून समाधान वाटले.
सौ.मृदुला धनंजय-थॅंक्स.
चित्रगुप्त-अभिप्राय वाचून बरं वाटलं.
प्रचेतस-माझं लिखाण नेहमीच आवडतं हे वाचून आनंद झाला.
प्राची अश्विनी-धन्यवाद.
श्रीगणेशा-कथेचा शेवट तुम्हांला वाटतो तसा विनोदी नाही. त्यात उपहास आहे.
राजेंद्र मेहेंदळे-खरंय तुमचं!
सुधीर कांदळकर-आभारी आहे.
अनिंद्य-तुमच्यासारखीच संन्यास घेण्याची इच्छा बऱ्याच जणांना होते.आणि 'आपली माणसं 'मिळाली की ती विरुनही जाते.
मदनबाण-"माझे लिखाण चकलीसारखे कुरकुरीत'! थॅन्क्स.
एकनाथ-तुमचा अभिप्राय ही सुंदर आणि सुटसुटीत.
आंबटगोड-प्रत्येकाच्या आयुष्यात असे भारून जाण्याचे प्रसंग येतातच. कधीतरी अशा निरीक्षणांतून कुठेतरी कथेचा जर्म सापडतो. त्या अर्थाने ही प्रत्येकाचीच गोष्ट आहे.
मित्रहो-अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
दिवाळी भरभराटीची आणि समृद्धीची आरोग्याची गेली असेलच. तुमच्या आनंदात मीही सहभागी आहे. या कथेची भरभरून वाचनं झाली. भरपूर प्रतिसाद आले. सर्वांचेच मनःपूर्वक आभार.
15 Nov 2021 - 12:00 pm | कर्नलतपस्वी
कथा आवडली. "साद देती हिमशिखरे ", ग प्र प्रधानांच्या पुस्तकाची आठवण आली. शेवट अपेक्षित होता.