माझा वेटलॉस - एक प्रवास

Primary tabs

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in काथ्याकूट
13 Oct 2021 - 11:38 pm
गाभा: 

गेल्यावर्षीच्या जानेवारी महिन्यात अस्मादिक सहकुटुंब जवळच्याच स्टेट पार्क आणि नॅचर रिझर्वमध्ये गेले होते. तिथे एक चांगल्यापैकी ट्रेल दिसला. साधारण मध्यम उंचीच्या एका टेकडीवर चढून जायचं आणि खाली उतरायचं असा तो जेमतेम अर्ध्या-पाऊण मैलाचा ट्रेल होता. गेल्या अकरा वर्षांपासून मायभूमीपासून लांब असल्याने सह्याद्रीशी ताटातूट झालेली त्यामुळे ट्रेकींगचं अपार वेड असलं तरी माझी उपासमार झालेली. आता तसा मी मुळातच बाळसेदार आणि गुटगुटीत आणि गेल्या अकरा वर्षात चांगलंच वजन वाढलेलं असलं तरीही ही टेकडी चढायची संधी मी तशीच सोडून देईन हे शक्यच नव्हतं, त्यामुळे उत्साहाच्या भरात तो उद्योग केला खरा, पण तो चांगलाच अंगाशी आला!

घरी जेमतेम पोहोचेपर्यंत माझा उजवा पाय - तंगडं म्हणणं जास्तं श्रेयस्कर - मुख्यत: त्याची टाच वाईट ठणकायला लागली. पेन किलर घेऊनही काही फरक पडत नाही म्हटल्यावर झक् मारत डॉक्टरचे पाय धरणं आलं. त्यांनी रीतसर एक्सरे काढला आणि त्यात टाचेच्या हाडाचा अगदी बारीकसा तुकडा निघाल्याचं दाखवलं. मग आयुष्यात पहिल्यांदा (आणि देवकृपेने शेवटचीच वेळ ठरो) व्हीलचेअरमध्ये बसण्याची आणि बर्‍याच वर्षांनी कंबरड्यावर इंजेक्शन घेण्याची वेळ आली! मी एकवेळ वाटेल तितक्या गोळ्या घेईन, अगदी एरंडेल आरामत पिऊ शकेन पण इंजेक्शन या गोष्टीची मला भयंकर भीती वाटते. का माहीत नाही पण इंजेक्शन म्हटलं की पुलंच्या हातावर देवीचा चर खणून बुजवणारी अपूर्वाईतली ती डॉक्टरीणच माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यातच भारतात असताना ज्यांच्याही संबंध आला त्या डॉक्टर आणि त्यापेक्षाही नर्सेस यांनी तर इंजेक्शनची अशी काही दहशत निर्माण केली आहे की बोलायची सोय नाही! पण इथल्या नर्सबाईनी मात्रं ते इंजेक्शन इतक्या हलक्या हाताने दिलं की तेवढ्यासाठी दुसरा पाय मोडून घ्यावा की काय असं मला वाटलं!

अर्थात मला झालेला हा आनंद त्या गोर्‍या डॉक्टरना मात्रं फारसा रुचला नसावा कारण अत्यंत खत्रूड चेहरा करुन - राज्यसभेत बोलणारी जया भादुरी आणा डोळ्यासमोर - त्याने मला सांगितलं,

"यू नीट टू लूज सम वेट मिस्टर यॅटीन! टू मच प्रेशर ऑन युवर फूट!"

"माय फूट लेका!" हे मी आपलं मनात म्हणालो, पण वरकरणी हसून मान डोलवली आणि गुमान बाहेर पडलो.

आता प्रामाणिकपणे सांगायचं तर आडवं-तिडवं वाढलेलं वजन कमी कर असं सौभाग्यवती गेल्या किमान दोन - तीन वर्षांपासून सांगत होती, पण घर की मुर्गी दाल बराबर म्हणतात तसं मी तिच्या बोलण्याकडे कानाडोळा करत होतो आणि शेवटी त्या गोर्‍या डॉक्टररुपी सोनाराकडून कान टोचून घ्यावे लागलेच. पायाला पलिस्तर मारायची वेळ सुदैवाने आली नाही पण दोन दिवस कुबड्या घेऊन आणि नंतर जवळपास महिनाभर तो जाड बूट घालून फिरावं लागलं. तसा बूट घालून मी दुकानात गेलो की लोकांच्या नजरांमध्ये अगदीच हत्ती नाही पण गेंडा किंवा पाणघोडा जंगलात उंडारायचं सोडून पायात बूट घालून इथे काय करतोय असा प्रश्न दिसायचा! एकदोनदा तर माझ्या नाकावर शिंगं वगैरे उगवलं नाही ना किंवा पाणघोड्यासारखा आ SS वासला जात नाही ना याची मी हळूच खात्री करुन घेतली.

तंगड्याच्या या दुखण्यातून सावरतोय तोच करोनाच्या कृपेने गेल्या मार्च महिन्यात पुढची सूचना मिळेपर्यंत सर्वांना कंपल्सरी 'वर्क फ्रॉम होम'ची सूचना पाठवण्यात आली. आयटीचा जॉब असल्याने एका जागी बसून असलेलं काम आणि त्याचा नॅचरल परिणाम म्हणजे दिसामासाने आणखीनच वाढणारं वजन! त्यात वाटेल त्या वेळेस मॅक्डोनाल्ड आणि तत्सम फूड जॉईंट्समधल फास्ट फूड आणि फ्रेंच फ्राईस, फरसाण, चीज टोस्ट आणि बटरमध्ये बुडवलेले नान आणि इतर अगणित वाटेल त्या गोष्टी चवीने खाण्याची खवय्येगिरी मुरलेली त्यामुळे वयाची पंचेचाळीशी (४५) गाठायच्या आत आम्ही वजनाची सेंच्युरी (१०५ किलो!) ठोकलेली होती. त्यातच, एक्सरसाईज वगैरेच्या बाबतीत आधीच उल्हास आणि लॉकडाऊनमुळे आणखीनच फाल्गुनमास! त्यामुळे दिसामासाने मी सगळ्या बाजूने अगदी मनमुराद वाढत होतो.

हे सगळं अगदी सुशेगात सुरु असतानाच जुलै महिन्यात एक दिवस फेसबुकवर वजन कमी करण्याची माझा शाळकरी मित्रं असलेल्या पद्माकरची पोस्ट पाहिली. सुरवातीला अर्थातच 'ये अपने बस की बात नहीं' आणि कशाला सुखाचा जीव दु:खात लोटायचा म्हणून मी गिव्हअप मारलाच होता, पण आमच्या शाळकरी मित्र-मैत्रिणींपैकी काही जणांनी पद्माकरकडे वेटलॉस सुरु केल्याचं आणि त्यांना चांगले रिझल्ट्स मिळत असल्याचं त्यांच्या बोलण्यात आलं तेव्हा आपणही ट्राय करुन पाहवा असं डोक्यात आलं आणि अखेरीस अस्मादिकांनी पद्माकरला एकदाचा फोन केला.

माझे खाण्यापिण्याचे षोक आणि लाईफस्टाईल पद्माकरला सांगितल्यावर त्याने नक्कीच कपाळाला हात लावला असावा अशी मला दाट शंका आलीच! पण त्याने अगदी राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा दोघांचा पेशन्स एकत्रं केल्यावर किती होईल तितक्या पेशन्सने सगळं ऐकून घेतलं आणि मला असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित आणि सविस्तर उत्तर दिलं. तरीही शिफ्टींगच्या निमित्ताने मी चालढकल केलीच, पण नवीन घरी शिफ्ट झाल्यावर आणि बर्‍यापैकी सेटल झाल्यावर अखेर एकदाचे अस्मादिक या भानगडीत पडायला तयार झाले.

आता मुख्य संकट उभं राहिलं ते म्हणजे डाएटचं!

मला देण्यात आलेला डाएट प्लान म्हणजे यादीच्या श्रीकाराखाली सगळे नकारच होते. माझं सगळ्यात मोठं दु:ख म्हणजे मला अतिप्रिय असलेला चहा प्यायचा नाही आणि भात खायचा नाही! आता भात खायचा नाही म्हटल्यावर माझा काशिनाथ नाडकर्णी झाला आणि मी "काहीतरी काय हो, भात काय सोडा?" हे विचारलंच, पण पद्माकरने मला जवळपास अगदी आमच्या वाजयेयी सरांच्या स्टाईलमध्ये चक्क दमच दिल्यावर मग न करुन सांगतो कोणाला? अर्थात एकदा सुरवात केल्यावर भात, चहा आणि इतरही बर्‍याचशा गोष्टी न खाणं हे प्रत्यक्षात वाटलं त्यापेक्षा बरंच सोपं आहे हे हळूहळू माझ्या लक्षात आलं. सुरवातीच्या आठवड्याभरानंतर तर त्याची सवयच होऊन गेली. हातात छडी घेतलेल्या वाजपेयी सरांच्या अवतारात पद्माकर समोर दिसायचा हे देखिल एक कारण होतंच! आता आमचे वाजपेयी सर म्हणजे दामले मास्तरांचे डोंबिवली व्हर्शन होतं, त्यामुळे चुपचाप सांगितलेल्या सूचनेचं पालन करणं हा एकमेव मार्ग होता!

माझ्यासमोरचं दुसरं संकट होतं ते म्हणजे एक्सरसाईजचं. सुरवातीला रोज अर्धा तास फक्त चालण्याचा एक्सरसाईज करायचा असं मला बजावलं होतं. त्यावेळी माझं दोंद इतकं वाढलेलं होतं की सलग दहा-पंधरा मिनिटं भराभर चालल्यावरही माझी फासफूस होत होती. पहिल्याच दिवशी अर्धा तास चालताना शेवटीशेवटी मी शब्दश: पाय ओढत होतो. सुमारे आठ - दहा दिवसानंतर हळूहळू शरीराला सवय झाली आणि कधी औंसभरही कमी न झालेलं माझं वजन हळूहळू नक्कीच कमी होईल हा मलाच विश्वास वाटू लागला आणि तसं ते कमी होत गेलंही. दोरीच्या उड्या मारायचा मोह होत होता दोरीचं टोक हातात धरुन मौन या विषयावर तास - दोन तास बोल बोल बोलणारे आचार्य बाबा बर्वे डोळ्यासमोर आले आणि तो विचार मी सोडून दिला.

माझं वजन पंधरा किलोच्या आसपास कमी झालेलं असताना नेमका विंटर सुरु झाला. बाहेर झकासपैकी बर्फ पडलेला मला बेडमधून उठण्यास डिस्करेज करायचा पण एव्हाना आतापर्यंतच्या कमी झालेल्या वजनाने पूर्वी येत असलेला आळशीपण आणि शैथिल्य, थोडंफार मेहनतीचं काम केलं तर लगेच होणारी दमछाक कमी होत असल्याची - थोडक्यात स्टॅमिना वाढल्याची - जाणिव झाली आणि खरं सांगायचं तर मॉर्निंग वॉकचं व्यसन लागल्यासारखं झालं होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे ढेरीवर आवळलेला पट्टा आणखीन आवळता येतो असा साक्षात्कार झाल्यावर आपण पर्फेक्टली योग्य ट्रॅकवर आहोत याची पक्की खात्री पटली. त्यानंतर फक्त कन्सिस्टंसी ठेवणं, खाण्याचा कितीही मोह झाला तरी नको ते अरबट-चरबट खाणं टाळणं आणि रिपीट द सेम प्रोसेस नेक्स्ट डे अगेन! अर्थात यात मध्ये अपरिहार्य असलेला प्लॅटू आलाच आणि दिवाळीच्या आठवड्याभरात तर काहीशे ग्रॅम्सनी वजन वाढलं सुद्धा, पण पुन्हा ट्रॅकवर येणं फारसं कठीण गेलं नाही हे देखिल तितकंच खरं!

माझ्या या वेटलॉसचं श्रेय पद्माकरला आहेच पण त्यापेक्षाही जास्त कोणाला असेल तर ते अर्थातच सौभाग्यवतीना! मुलांना सांभाळून, त्यांचा अभ्यास, शाळेचे सगळे सोपस्कार यावर कटाक्षाने लक्ष ठेवतानाही माझ्या खाण्याच्या वेळा (आणि नखरे) सांभाळणं, रोज न चुकता मला मॉर्निंग वॉकला हाकलणं आणि सतत मला एन्करेज करत राहणं हे तिने वर्षभर अगदी व्रतस्थपणे केलं आणि याचा परिणाम म्हणजे...

बरोबर वर्षभरात माझं कमी झालेलं ३३ किलो वजन!
तिच्याशिवाय मला हे कोणत्याही परिस्थितीत हे शक्यच झालं नसतं!

बिल कीन म्हणतो
Yesterday is a history, tomorrow is a mystery, today is a gift that's why its called present!

अस्मादीक म्हणतात
Being fit with a good health is a present only you can give to yourself!

रुटीन, डाएट आणि एक्सरसाईज

वेट लॉस करायला सुरवात केल्यावर मी खाणं बंद केलेल्या गोष्टी -

सकाळचा चहा / कॉफी ज्यातून डायरेक्ट साखर जाते.!
भात, दूध अगदी पूर्णपणे बंद, अगदीच शक्य नसेल तर अर्धी वाटी भरुन ब्राऊन राईस.
पोळी एकावेळच्या जेवणात - फारतर १ किंवा १ १/२, शक्यतो भाकरी - ज्वारी किंवा बाजरीची, तांदुळाची नाही.
लोणचं, नारळाची चटणी अशा तेलकट आणि कॉलेस्ट्रॉल वाढवणार्‍या गोष्टी अजिबात बंद.
तळलेले पदार्थ - भजी, वडे, फ्राईज वगैरे अजिबात बंद.
ब्रेड, बर्गर, पिझ्झा, वेफर्स वगैरे अजिबात बंद.
उपासाला - साबुदाण्याची खिचडी / बटाट्याचा कीस पूर्णपणे बंद.

रोजचं डाएट -

ब्रेकफास्ट - ८ ते ९ दरम्यान - हर्बल टी, प्रोटीन शेक किंवा २ अंड्यांचं ऑम्लेट किंवा अंडी उकडून

लंच - १२ ते १ दरम्यान - १ किंव १ १/२ भाकरी, भाजी / चिकन किंवा फिश करी किंवा शॅलो फ्राय किंवा बेक केलेलं, वरण किंवा दुसरी डाळ आणि जोडीला सॅलाड किंवा फक्त चिकन / फिश / अंडी घातलेलं भरपूर सॅलाड.

दुपारचा स्नॅक - ४ ते ५ दरम्यान - सकाळी खाल्ली नसल्यास उकडलेली अंडी किंवा मुगाचे किंवा इतर कडधान्याचे डोसे किंवा प्रोटीन बार्स.

रात्रीचं जेवण - अगदी लाईट सॅलाड किंवा चिकन / व्हेजिटेबल सूप / लोणी काढलेलं ताक.

उपासाच्या दिवशी - महिन्यातून फक्त संकष्टीचा उपास आणि वर्षभरात आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र.

ब्रेकफास्ट - फक्त हर्बल टी

लंचला - भगर आणि दाण्याची आमटी किंवा भाजणीचं थालिपीठ

दुपारचा स्नॅक - अगदी थोडेसे केळ्याचे वेफर्स - महिन्यातून फक्त एकच दिवस उपास - संकष्टीचा.

डिनर - १ किंवा १ १/२ भाकरी, भाजी.

जास्तीत जास्त प्रोटीन्स इनटेक - चिकन / फिश, डाळी, मूग आणि कडधान्य उकडून किंवा डोसे / घावन करुन.

एक्सरसाईज -

दिवसातून एकदा सकाळी ५ - ६ मैल (८-९ किमी) चालणं / जॉगिंग - हे अर्ध्या तासापासून सुरु करुन हळूहळू वाढवत नेलं.

आठवड्यातून चार दिवस संध्याकाळी ४ - ५ मैल सायकलींग - विंटर संपल्यानंतर एप्रिल महिन्यापासून सुरु केलं जेव्हा वजन साधारण ८५ किलोपर्यंत आलं होतं.

रोज १२ सूर्यनमस्कार.

Stay healthy, stay blessed!

Disclaimer - हा वरचा डाएट प्लॅन मी फॉलो केलेला आहे जो माझ्या बॉडीला पर्फेक्ट सूट झाला. प्रत्येकाच्या ज्याप्रमाणे शारिरीक गरजा असतील, जर काही औषधं सुरु असतील तर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा अशी नम्र विनंती. काही अधिक-उणं झाल्यास मी जबाबदार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

- स्पार्टाकस

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

14 Oct 2021 - 12:12 am | कपिलमुनी

छान अनुभव शेयर केला आहे.
माझ्याही याच प्रवासाची हळूहळू सुरुवात आहे.
8 आठवड्यात 108 वरून 103 वर आलो आहे.

ज्यांना वेट लॉस करायचा आहे, त्याने आहार तज्ज्ञांकडून सल्ला नक्की घ्यावा. दर महिन्याला वजन आणि शरीराची मापे यानुसार आहार बदलून घ्यावा.

सल्ला घेऊन तब्येतीनुसार व्यायाम करावा .
उदा - मला धावणे , दोरी उड्या टाळायला सांगितले आहे. रस्त्यावर/ मैदानात वेगात चालायला सांगितले आहे.
90 च्या खाली आलो की व्यायाम प्रकार बदलणार आहेत.

कंजूस's picture

14 Oct 2021 - 5:47 am | कंजूस

A
१) तुमचं वजन प्रमाणाबाहेर अधिक आहे हे कोण कशाच्या आधारावर ठरवतो?
२)समजा तुमच्या शरीराला असलेलं वजन राखण्याची गरज असेल तर?
_____________________________________
B
क्रमांक (२) साठी काय टेस्टस आहेत?

______________________________________
C
लेखकहो,
अ) तुमच्या टाचेचं हाड मोडलं ते चुकीच्या पद्धतीने पायऱ्या उतरल्यानेही होऊ शकतं.
ब) डोंगर चढताना दम लागणे हे सरावाच्या अभावानेही होऊ शकतं.
_______________________________

स्पार्टाकस's picture

14 Oct 2021 - 6:13 am | स्पार्टाकस

बॉडी हाईट - वेट प्रपोर्शन चार्ट नावाचा काही प्रकार असतो हे ऐकलं आहे का?

आपल्याकडे सैनिक आणि शेतकरी होते त्यांना मोठी कष्टाची आणि वजनाची कामे करावी लागत.
अडीच तीन किलो वजनाची तरवार घेऊन लढाईला उतरणे. अंगावर चिलखतही घालत. तर हे करण्यासाठी त्याचं वजन किती असावं?
शेतकरी जो लाकडाचा नांगर खांद्यावर टाकून गावाबाहेरच्या दोनचार किमी अंतरावरच्या शेतात नेतो त्या शेतकऱ्याचं वजन किती असावं?नांगर सहज पंधरा वीस किलोंचा असेल.
गावाबाहेरच्या विहिरीवरून दोन घागरी पाणी आणणाऱ्या बाइचं वजन किती असावं?
Gas cylinder 25 किलो होम डिलिवरी करणारा माणूस काही इमारतीत चौथ्या मजल्यावर जातो त्याचं वजन किती असावं?
त्यालाही चार्ट लावायचा का?

अमेरिकन त्रिशंकू's picture

15 Oct 2021 - 8:16 pm | अमेरिकन त्रिशंकू

वजन आणि ताकद यांची गल्लत होते आहे.

कपिलमुनी's picture

14 Oct 2021 - 2:14 pm | कपिलमुनी

वजन किती असावे हे तुम्ही म्हणता तसे ज्याच्या त्याच्या प्रकृती आणि व्यवसायपूरक असावे.

फॅट % मात्र कमी हबे. बॉक्सर, वेट लिफ्टर , यांचे वजन जास्त असले तरी मसल्स वेट जास्त असते, फॅट कमी असते.

Bhakti's picture

14 Oct 2021 - 6:52 am | Bhakti

डाएट प्लॅन दिला हे छान झालं.ह्यावरच स्वतः साठी काम करतेय.गेल्या दीड वर्षात २० किलो कमी झालंय,सगळे म्हणतात जुनी गोलू भक्ती कुठे गेली ;) :) भारी शेप येतोय.
५००दोरी उड्या
१०००० स्टेप
४० मि.HIIT,Lower body,Full Body etc exercise
१० सूर्यनमस्कार
यापैकी दिवसाला कोणतेही दोन.
Fat loss is fun!

सुरसंगम's picture

14 Oct 2021 - 7:18 am | सुरसंगम

आत्तापर्यंत जेवढं इथं आणि बाहेरील लेख वाचून ( आधी स्वत:च्या अरबरट चरबट खाण्या च्या सवयीने वाढलेलं ) वजन कमी करण्यासाठी इतरांची जी धडपड बघतो तेव्हा देवाचे आभार मानतो.
साला कधीपण कायपण खा, कीतीही खा वजन 60 च्या पुढे कधी गेलंच नाही.

फक्त जिने चढणे आणि भरपूर चालणे एवढाचं काय तो व्यायाम.

(शाकाहरी संगम )

टीपीके's picture

14 Oct 2021 - 10:12 am | टीपीके

अगदी अगदी

टीपीके's picture

14 Oct 2021 - 10:16 am | टीपीके

72 किलो म्हणजे छानच प्रगती केलीत. अभिनंदन

अवांतर : तुम्ही पण डोंबिवलीकर का? टिळकनगर शाळा?

इकडे किती डोंबिवलीकर कंजूस काका? संगणकानंद? मुवि?

स्पार्टाकस's picture

14 Oct 2021 - 7:00 pm | स्पार्टाकस

हो, जन्माने आणि संस्काराने डोंबिवलीकर टिळकनगरचाच.

कंजूस's picture

14 Oct 2021 - 8:26 pm | कंजूस

डोंबोलीकर!

स्पार्टाकस's picture

14 Oct 2021 - 8:30 pm | स्पार्टाकस

एकेकाळचा वजनदार :)

माझं वजन ६२ किलो. तरुणपणी ७३ होतं.

पण अजूनही वीस किलो उचलून नेऊ शकतो.
शंभर झालं तरी चालेल. पण वीस पंचवीस किलो वाहता आलं पाहिजे.

कंजूस's picture

14 Oct 2021 - 10:56 am | कंजूस

इकडे किती डोंबिवलीकर कंजूस काका? संगणकानंद? मुवि?

स्पा आहे. पण तो येत नाही. कारण मिपावरचे भुतंप्रेमी आइडी संपले आहेत.

रंगीला रतन's picture

14 Oct 2021 - 11:53 am | रंगीला रतन

मी पण :=)

चला शनिवारी डोंबिवली कट्टा करूया

टर्मीनेटर's picture

14 Oct 2021 - 1:19 pm | टर्मीनेटर

वेळ आणि ठिकाण ठरवा... मी पण असेन हा शनिवार रविवार डोंबिवलीत 👍

१) एमाइडिसी एसटी डेपो मस्त जागा आहे.
कुणी नसतं . भरपूर जागा आहे बसायला. घरडा सर्कलपाशी बसून खायला गप्पा मारायला हॉटेल्स आहेत.
म्हणजे बरेच जण त्या भागातील असतील तर ती जागा बरी आहे.
२) स्टेशनजवळ (पूर्व) म्हणजे फडके रोड गणपती देवळापाशी. समोर गुरुकृपा मिसळवाला आहे. डोंबिवली पश्चिमवाल्यांनाही बरी पडेल जागा. मध्यवर्ती.

एकदा का ओळख झाली की मग पुढच्या कट्ट्यासाठी जागा आणि वेळ ठरवू.

शनिवार दुपार 1 ते 3 गुरुकृपा ला चालेल का?

कंजूस's picture

15 Oct 2021 - 12:42 pm | कंजूस

तुमच्या सोयीने.

तुषार काळभोर's picture

14 Oct 2021 - 11:54 am | तुषार काळभोर

बरोबर वर्षभरात माझं कमी झालेलं ३३ किलो वजन!

भारी!!

वेट लॉस करायला सुरवात केल्यावर मी खाणं बंद केलेल्या गोष्टी -

सकाळचा चहा / कॉफी ज्यातून डायरेक्ट साखर जाते.!
भात, दूध अगदी पूर्णपणे बंद, अगदीच शक्य नसेल तर अर्धी वाटी भरुन ब्राऊन राईस.
पोळी एकावेळच्या जेवणात - फारतर १ किंवा १ १/२, शक्यतो भाकरी - ज्वारी किंवा बाजरीची, तांदुळाची नाही.
लोणचं, नारळाची चटणी अशा तेलकट आणि कॉलेस्ट्रॉल वाढवणार्‍या गोष्टी अजिबात बंद.
तळलेले पदार्थ - भजी, वडे, फ्राईज वगैरे अजिबात बंद.
ब्रेड, बर्गर, पिझ्झा, वेफर्स वगैरे अजिबात बंद.
उपासाला - साबुदाण्याची खिचडी / बटाट्याचा कीस पूर्णपणे बंद.

हेच करून मी जाने-२० ते एप्रिल-२० या चार महिन्यात ९४ ते ८२ असा प्रवास केला होता.
जोडीला व्यायाम केला असता तर, ७५ शक्य झालं असत्ं. पण कंटाळ्याने घात केला!

बेकार तरुण's picture

14 Oct 2021 - 1:35 pm | बेकार तरुण

लेख आवडला....
वजन कमी करणे अशक्य अवघड काम असते !! वाढवणे तितकेच सोपे...

तुम्हाला निरोगी जीवनशैली साठी अनेक अनेक शुभेच्छा....

हा काही साधा प्रश्न नाही खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे...
वजन ह्या विषयात जे व्यावसायिक डॉक्टर,आहार तत्न आहेत ते व्यवसाय कसा वाढेल ह्या हेतू नी प्रचार करत असतात.
माणसाचे वजन किती असावे..
वजन तज्ञ सांगतात ते उंची शी सम प्रमाण असावे म्हणजे 165 cm उंची असेल तर 65 किलो असावे ..
हे सूत्र साफ चुकीचे आहे.
Bmi नुसार कोण ओव्हर weight आहे हे ठरवता येत नाही..
पैलवान लोक ,किंवा ज्यांचे स्नायू मजबूत आहेत ह्यांचे वजन हे जास्त असते.
ह्याचा अर्थ ते ओव्हर weight आहेत असा नसतो.
आहारातून किती एनर्जी मिळते आणि किती खर्च होते ह्या वर पण वजन अवलंबून नसते.
किरकोळ वजन असणारे भरमसाठ जेवत असतात खूप मोठ्या कॅलरीज घेत असतात पण त्याचे व्यायाम करून ज्वलन करत नाहीत तरी त्यांचे वजन 1 ग्राम नी पण वाढत नाही.
आणि व्यायाम पासून उपाशी राहण्या पर्यंत सर्व केले तरी खूप लोकांचे वजन 1 kg नी कमी होत नाही.

सरिता बांदेकर's picture

14 Oct 2021 - 2:30 pm | सरिता बांदेकर

अभिनंदन, तुम्ही मनावर घेतलंत आणि करून दाखवलं.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
आणि एक विनंती तुमची प्रगती लिहीत रहा म्हणजे इतरांसाठी तो प्रवास प्रेरणादायक होईल.
वजन कमी झालं की परत वाढू देऊ नका.
परत एकदा अभिनंदन.

सौंदाळा's picture

14 Oct 2021 - 4:59 pm | सौंदाळा

लेख छानच आणि अभिनंदन
मनोनिग्रहाची कसोटी लागली असेल.

चौथा कोनाडा's picture

14 Oct 2021 - 5:14 pm | चौथा कोनाडा

बरोबर वर्षभरात माझं कमी झालेलं ३३ किलो वजन!

लै भारी. आणि डायट सांभाळला म्हणजे लईच मोट्टी अचिव्हमेंट म्हणायला लागेल!
प्रेरणादायी धागा !

खुसखुशीत लेखन छानच आणि हाद्रिक अभिनंदन !

बाजीगर's picture

15 Oct 2021 - 2:04 am | बाजीगर

सुंदर लेख,
देखणी शैली,
अभिनंदन, शुभेच्छा

गामा पैलवान's picture

15 Oct 2021 - 6:07 pm | गामा पैलवान

स्पार्टाकस,

शेवटी करून दाखवलं तर ! :-) १०५ --> ७३ हा बराच मोठा प्रवास आहे. नेटाने पार पाडल्याबद्दल अभिनंदन बरंका.

आ.न.,
-गा.पै.