अळीवाचे लाडू

मनस्विता's picture
मनस्विता in पाककृती
19 Sep 2021 - 11:12 pm

माझ्या आईच्या माहेरी खूप मोठं कुटुंब. मला ५ मावश्या आणि २ मामा. त्यातली एक मावशी त्या मानाने जवळ राहायची आणि म्हणून आमचं खूप येणं-जाणं होतं. आम्ही मावशीकडे जायचो तसंच ती पण आमच्याकडे यायची. तिच्या घरापासून बस स्टॅन्ड साधारण ५-७ मिनिटांच्या अंतरावर. त्यामुळे आमच्याकडे  यायच्या एसटीच्या वेळेआधी १० मिनिटे घरातून बाहेर पडले तरी चालायचे. त्यात ती गाडीत जागा पकडण्यासाठी माझ्या मावसभावाला एसटीच्या मागच्या खिडकीतून चढायला लावायची.

तर ह्या सगळ्या गडबडीत तिला आमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करून आणायच्या असायच्या. निघायच्या पाऊण-एक तास आधी वड्यांचे मिश्रण परतायला घेणार आणि निघायच्या जेमतेम आधी त्याच्या वड्या पाडून आमच्यासाठी डब्यात घालून आणणार. वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करणे तिचा  हातखंडा. त्यामुळे वड्या हमखास चांगल्याच झालेल्या असणार.

पण हे सगळं मी आत्ता का सांगत आहे? तर मावशीचा ह्या बाबतीतला वारसा पुढे चालवायचं काम मला मिळालं आहे. गौरीपूजनाच्या दिवशी मैत्रिणीकडे सवाष्ण म्हणून बोलावले होते. आणि तिला आवडतात म्हणून मला अळिवाचे लाडू न्यायाचे होते. तरी खवलेला नारळ, गूळ आणि अळीव आदल्याच रात्री एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवले होते. तिच्याकडे साधारण १ वाजता जायचे होते. तर त्या मिश्रणाला चटका देऊन तिच्या पुरते लाडू वळायला मला पाऊण वाजला. पटपट न्यायचे होते तेवढे लाडू वळले आणि डब्यात नेले. त्याआधी घरच्या गणपतीलादेखील नैवेद्य दाखवला आणि धावतपळत आमचं गलबत मैत्रिणीच्या घरच्या किनाऱ्याला लागलं.

एवढं पुराण सांगितल्यावर पाककृती व उरलेल्या काही लाडवांचा फक्त फोटो इथे देत आहे.

Aleev ladoo

साहित्य:
नारळ २ खवून
अळीव ५० ग्रॅ
गूळ २ वाट्या चिरून
साखर १/२ वाटी
तूप १ चमचा
वेलदोडे ५-६ पूड करून  

कृती:
१. खवलेला नारळ, गूळ, साखर व अळीव एकत्र करून ४-५ तास ठेवावे. त्यामुळे अळीव भिजले जातात.
२. हे सर्व साहित्य व तूप जाड बुडाच्या पातेल्यात अथवा कढईत घेऊन बारीक गॅसवर गरम करायला ठेवावे.      
३. अधून मधून झाऱ्याने हे मिश्रण परतून घ्यावे.
४. हे कितपत गरम करायचे तर गूळ पूर्ण विरघळून मिश्रण कोरडे झाले पाहिजे.
५. मिश्रण खूप कोरडे होऊ देऊ नये. किंचित ओलसरपणा हवाच.
६. गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे.
७. वेलदोड्याची पूड मिश्रणात घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
८. आता लाडू वळायला घ्यावेत. हे लाडू फार मोठे नसतात. जरा लहानसरच वळायचे.

टिपा:
१. साखर न घालता नुसत्या गुळाचे देखील लाडू करू शकता. अश्या वेळी १/४ वाटी गूळ वाढवायचा.
२. नारळात बराच ओशटपणा (fats) असतो त्यामुळे तुपाचे प्रमाण शक्यतो जास्त नको.
३. हे लाडू थोडे उष्ण असतात त्यामुळे शक्यतो हिवाळ्यात करून खातात.                  

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

20 Sep 2021 - 10:11 am | गॉडजिला

.

मनस्विता's picture

25 Sep 2021 - 8:07 pm | मनस्विता

बऱ्याच प्रयत्नाअंती मी फोटो अपलोड करू शकले होते. त्यामुळे माहीत नाही का दिसत नाहीये.

गॉडजिला's picture

26 Sep 2021 - 11:01 am | गॉडजिला

फोटोला/त्याच्या फोल्डर ला पब्लिक ॲक्सेस नसावा त्यामूळे तुम्हाला कदाचित फोटो दिसत असतील कारणं तुम्ही गुगल लॉगिन केलं आहे पण मला ते दिसत नाहित

Bhakti's picture

20 Sep 2021 - 10:25 am | Bhakti

छान पाकृ आहे.
माझ्या डिलिव्हरीनंतर मला खायला सांगितले होते ,कोणालाच येत नव्हते.यू ट्युब वगैरेवर पण तेव्हा नाही सापडले.आईने ह्याला त्याला विचारून केले,छान झाले होते... मस्त असतात चवीला,परत करणार आहे.

मनस्विता's picture

25 Sep 2021 - 8:09 pm | मनस्विता

कारण तसे करायला खूप सोपे आहेत.

दिपक.कुवेत's picture

20 Sep 2021 - 2:48 pm | दिपक.कुवेत

मला प्रचंड आवडतात हे लाडू. आजी (आईची आई) छानच करायची. हे लाडू खाताना अळीव दाताने अजून बारीक करायला मला खुप आवडत आणि मुळात कितिहि खाल्ले तरी समाधान होत नाहि. पण लवकर खायला लागतात नाहितर ओल्या नारळामुळे काहि दिवसानी वास येतो. कधी केले नाहित आता प्रयत्न करीन म्हणतोय. एक शंका - अळीव एकत्र करुनच भीजवायचे ना? वेगळे असे पाण्यात नाहि ना?

मनस्विता's picture

25 Sep 2021 - 8:12 pm | मनस्विता

वर कृतीमध्ये दिले आहे तसे अळीव, गूळ आणि नारळाचा चव असे सगळे एकत्र मिसळून ४-५ तास ठेवावे. त्यातही अळीव फुलून येतात.

तसेच नारळाच्या पाण्यात किंवा सध्या पाण्यात १-२ तास अळीव भिजून ठेवून वापरता येतात.

hrkorde's picture

20 Sep 2021 - 8:01 pm | hrkorde

ह्याच मिश्रणात दूध घालून शिजवले की खीर होते

मनस्विता's picture

25 Sep 2021 - 8:17 pm | मनस्विता

पण गुळामुळे दूध नासण्याची शक्यता असते.

माझी आई खीर करण्यासाठी अळीव आदल्या रात्री पाण्यात भिजत घालते. दुसऱ्या दिवशी अळीव, दूध, साखर आणि वेलदोड्याची पूड एकत्र करून उकळून खीर करते.

कंजूस's picture

20 Sep 2021 - 8:37 pm | कंजूस

बरोबर.
पण हल्ली खाणारे आणि करणारे फारच कमी झाले आ हेत.

खरं तर खाण्याचे प्रमाण पण आहे. अलिकडे कित्येक जण हे लाडू करून विकतात. आणि घेऊन खाणारे पण असतात.

सरिता बांदेकर's picture

26 Sep 2021 - 10:49 am | सरिता बांदेकर

मस्त. अळीवाचे लाडू खूप छान लागतात पण फार कमी केले जातात.
अशी अळीवाचे लाडू घेऊन येणारी मैत्रीण मला आवडेल.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

26 Sep 2021 - 9:46 pm | सौ मृदुला धनंजय...

खूपच सुंदर लागतात हे लाडू.