.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
श्री गोपाळ गणपती मंदिर - फर्मागुढी, गोवा.
गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर पणजी पासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर आणि फोंड्याच्या ३ कि.मी. अलीकडे असलेल्या फर्मागुढी पठारावर छत्रपति शिवाजी महाराज ' किल्ल्याच्या (पूर्वीचे नाव 'किल्ले फोंडा') अगदी समोर 'श्री गोपाळ गणपती मंदिर' आहे.
प्राचीन आणि अर्वाचीन हिंदू स्थापत्यशास्त्राचा संगम बघायला मिळणाऱ्या गोमंतकातील फारच थोड्या मंदिरांपैकी हे एक मंदिर असून ह्या सुंदरशा छोटेखानी मंदिराचे बांधकाम गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत श्री. दयानंद बांदोडकर ह्यांनी केले आणि त्यांच्याकडे असलेल्या पंचधातूच्या गणेशमूर्तीची २४ एप्रिल १९६६ रोजी ह्या नव्या मंदिरात स्थापना केली.
ह्या ठिकाणी असलेल्या मूळ जुन्या मंदिराबाबत एक कहाणी सांगितली जाते ती अशी कि, बांदिवड्याचे राजे असलेल्या सौंधेकरांच्या पदरी चाकरीस असलेल्या 'हापो' नावाच्या गुराख्याला सुमारे १०० वर्षांपूर्वी माळरान असलेल्या ह्या पठारावर गाई चरायला घेऊन आला असताना ह्याठिकाणी फूटभर उंचीची श्री गणेशाची दगडी मूर्ती सापडली आणि त्याने नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या मंडपात तिची स्थापना केली होती. गोपालन करणारा गुराखी म्हणजे 'गोपाळ' आणि गोपाळाने स्थापन केलेला हा गणपती असल्याने त्याचे नाव 'गोपाळ गणपती'.
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे दीपमाळ आहे. मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असून येथे दरवर्षी गणेश जयंती उत्सव भाविकांच्या लक्षणीय उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि भाविकांना देवस्थानतर्फे महाप्रसाद दिला जातो.. यादिवशी दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रात्री भजन आणि अन्य कार्यक्रम होतात. अनंत चतुर्दशीला गुढी उभारण्याची ह्या मंदिरात प्रथा आहे.
याशिवाय संकष्टी, अंगारकी व विनायकी चतुर्थीला मंदिरावर रोषणाई केली जाते आणि भाविकांच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागतात. मी गेलो होतो त्यादिवशी अनायसे संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे मला अचानकपणे श्रींचे दर्शनहि घडले आणि रोषणाईही पाहायला मिळाली. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असूनही करोना पर्वातील निर्बन्धांमुळे फार गर्दीही नव्हती.
फर्मागुढीच्या या गोपाळ गणपतीच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या इमारतीत प्रशस्त अशी सभागृहे आहेत आणि त्यांचा वापर लग्न तसेच इतर मंगल कार्यासाठी केला जातो. फर्मागुढीचे पठारा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने कायम या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असते. गोपाळ गणपतीवर गोमंतकीयांची आणि हिंदू धर्मियांची श्रद्धा आहेच पण विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने या मंदिराला आवर्जून भेट देतात. हे मंदिर किल्ल्याच्या समोरच असल्याने किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांना आपसूक देवदर्शनही घडते.
फर्मागुढीच्या या गोपाळ गणपती मंदिरा समोर असलेला सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहने बांधलेला 'फोंडा किल्ला' (Ponda Fort) हा 'फर्मागुढी किल्ला' (Farmagudi Fort) नावानेही प्रसिद्ध असला तरी आता 'छत्रपति शिवाजी महाराज किल्ला' म्हणून ओळखला जातो.
१६६४ साली शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केले तेव्हा फोंडा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात अपयश आले. पुन्हा १६७५ साली जोरदार आक्रमण करून महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावर ताबा मिळवला पण १६ व्या शतकाच्या अखेरीस छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिकून घेतला. अनेक घनघोर लढायांचा साक्षीदार असलेल्या ह्या किल्ल्याचे खंदक, तटबंदीचे प्राचीन अवशेष आता शिल्लक नाहीत आज जो किल्ला दिसतो त्याचे बहुतांश बांधकाम नव्याने केले आहे.
किल्ल्यावरुन दिसणारे 'श्री गोपाळ गणपती मंदिर'
लहानसा असला तरी हा किल्ला, त्यातला महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि बगीचा प्रेक्षणीय आहे.
( फर्मागुढीला संध्याकाळी पोचलो तेव्हा किल्ला बंद व्हायची वेळ होत आली असल्याने उपलब्ध असलेल्या कमी वेळात आधी किल्ला पाहून नंतर मंदिरात गेलो त्यावेळी बऱ्यापैकी अंधार पडला होता त्यामुळे फोटो फार काही चांगले आले नाहीयेत. मंदिराचा पहिला फोटो जालावरून साभार. )
-टर्मीनेटर
प्रतिक्रिया
17 Sep 2021 - 2:54 pm | रंगीला रतन
लेख आवडला.
माझ्या पुतणीने ME फार्मागुडीच्या इंजिनीरिंग कॉलेज मधून केले आहे. तिने शिकत असताना या मंदिराचे आणि किल्ल्याचे फोटो पाठवले होते. आता देवळाचा रंग बदललेला दिसतोय पहिले वेगळा होता.
17 Sep 2021 - 9:35 pm | टर्मीनेटर
बरोबर आहे तुमचं. पूर्ण मंदिराचा फोटो शोधताना जे फोटो जालावर दिसत होते त्यातल्या बऱ्याच फोटोंमध्ये मंदिराचा रंग वेगळाच दिसत होता. मोठ्या मुश्किलीने (पहिला फोटो) आताच्या रंगाचा सापडला.
हो मंदिर आणि किल्ल्याच्या थोडंसच आधी इंजिनिअरिंग कॉलेजचे कॅम्पस दिसले होते.
धन्यवाद.
17 Sep 2021 - 5:38 pm | तुषार काळभोर
टिपीकल सुशेगाद गोवा!
17 Sep 2021 - 10:13 pm | टर्मीनेटर
दक्षिणेकडे जाताना मधला प्रचंड रहदारीचा रस्ता सोडला तर डावीक्डचा किल्ला आणि उजवीकडचा मंदिर परिसर एकदम सुशेगात...
17 Sep 2021 - 5:16 pm | चौथा कोनाडा
सुंदर माहिती. किल्ले फोंडा आणि श्री गोपाळ गणपती मंदिराचे फोटो ही सुंदरच !
परिसरही किती शांतनिवांत आहे !
17 Sep 2021 - 5:45 pm | कुमार१
लेख आवडला. समयोचित.
फोटो मस्तच !
17 Sep 2021 - 6:54 pm | Bhakti
किल्ले फोंडा खुप नाव ऐकलं होतं ,छान माहिती मिळाली.
17 Sep 2021 - 9:48 pm | ज्ञानोबाचे पैजार
लेख आणि फोटो फारच आवडले
पैजारबुवा,
17 Sep 2021 - 10:06 pm | प्रचेतस
वृत्तांत आणि फोटो एकदम झकास.
मंदिर अगदी टिपिकल गोवन शैलीत आहे, रंगीबेरंगी.
खूप छान दिसतात ही मंदिरे आणि सजवतातही उत्तम.
17 Sep 2021 - 10:31 pm | टर्मीनेटर
@ चौथा कोनाडा, कुमार१, Bhakti, ज्ञानोबाचे पैजार आणि प्रचेतस
प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार 👍
@ प्रचेतस
हो, पण करोना काळातील निर्बंधांमुळे ताज्या फुलांची सजावट कमी होती असे त्यावेळी सोबत असलेल्या गोव्यात रहाणार्या बहिणीने सांगीतले, म्हणजे इतर वेळी किती छान सजवत असतील गाभारा ह्याची मी फक्त कल्पनाच करु शकतोय 😊
18 Sep 2021 - 6:22 am | कंजूस
अगदी बाहेर उभे राहूनही आत गाभाऱ्यापर्यंत पाहता येतंय ही व्यवस्था चालू ठेवण्याबद्दल मंडळाचे आभार.
बाकी किल्ल्याच्या रंगरंगोटीबद्दल काय बोलणार.
18 Sep 2021 - 10:31 am | ॲबसेंट माइंडेड ...
मंदिर आणि किल्ला सुंदर आहेत.
18 Sep 2021 - 11:31 am | गोरगावलेकर
मंदिराचे, किल्ल्याचे फोटो आणि वृत्तांत सर्वच भारी
18 Sep 2021 - 5:20 pm | टर्मीनेटर
@ कंजूस, ॲबसेंट माइंडेड ... आणि गोरगावलेकर
प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार 🙏
18 Sep 2021 - 7:00 pm | सुधीर कांदळकर
पाहुण्यांना मालवण गोवा दाखवतांना खूप वेळा गेलो आहे. मंदिराचे रंगरूप पार बदलले आहे. फारसा गजबजलेला नसलेल शांत परिसर फार आवडतो. येथील भव्य सुवर्णगणेशमूर्ती सुंदर आहे.
तत्त्वज्ञानाऐवजी ऐतिहासिक तपशील दिल्यामुळे मजा आली. शिवाजी महाराजांच्या फोंड्याचा विजयात येसाजी कंकांचा उल्लेख शाळेत असतांना कुठेतरी वाचल्याचे अंधुक आठवते आहे. मस्त लेख. धन्यवाद.
18 Sep 2021 - 7:47 pm | टर्मीनेटर
हो सुधीरजी बरोबर आहे तुमची आठवण! पुढे संभाजी राजांच्या शासन काळात येसाजी कंक फोंडा किल्ल्याचे किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी ३००० सैन्यासह हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी केलेल्या आक्रमणात अवघ्या ३०० मावळ्यांसह लढताना येसाजी कंक जायबंदी झाले होते तर त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हा धारातिर्थी पडला होता. पण किल्ला राखण्याचा पराक्रम त्यांनी केला होता.
आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे 🙏
21 Sep 2021 - 5:23 pm | अथांग आकाश
लेख व फोटो आवडले!

21 Sep 2021 - 5:50 pm | सौंदाळा
हे मंदीर बाकी मंदीरांच्या (मंगेशी, शांतादुर्गा, महालक्ष्मी वगैरे) तुलनेत छोटेखानी आहे पण खूपच सुबक आणि सुंदर आहे.
अजुन एक आठवण म्हणजे लहानपणी कितीतरी वेळा लोकल बसने फर्मागुडीला उतरुन या गणपतीचे दर्शन घेऊन समोरच्याच अतीतीव्र उतारावरुन दुतर्फा झाडीतुन खाली असलेल्या नागेशीच्या देवळात पळत जायचो त्याची आठवण झाली. आई बाबांना पण चालताना वेग नियंत्रीत करता यायचा नाही इतका खतरनाक उतार होता / आहे.
आता कारने जाताना ती मज्जा येत नाही.
21 Sep 2021 - 9:29 pm | चौथा कोनाडा
आता कारने जाताना ती मज्जा येत नाही.
आता परत पळत जावा !
:-)
29 Sep 2021 - 1:47 pm | टर्मीनेटर
@ अथांग आकाश आणि सौंदाळा
आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे 🙏
@ सौंदाळा- तुमची आठवण आवडली!
शांतादुर्गा मंदिर त्यावेळी गोव्याबाहेरुन आलेल्या लोकांसाठी बंद होते (मंदिरातील सर्व पुजारी करोना पॉजीटिव्ह झाल्याचे कारण सांगितले गेले) अर्थात आधि ते अनेकवेळा बघीतले असल्याने निराशा वगैरे नाही झाली. आता त्या मंदीराचा फोटो पाहताना तो मिपा छायाचित्रण स्पर्धेत लॉकडाउन विभागासाठी पाठवायला हवा होता असे वाटतंय 😀
तसेच फोंड्याजवळच्या बोरी येथे नव्याने बनलेले, "पश्चिम शिर्डी" म्हणुन ओळखले जाणारे साईबाबा मंदिरही छान आहे.
