श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (१)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in लेखमाला
12 Sep 2021 - 9:26 am

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}

श्रीगणेश लेखमाला २०२१

चिरंजीवी

चिरंजीवित्व म्हणजे नक्की काय असेल? काल मापन संपेपर्यंत जिवंत राहाणं; कालांता पर्यंत मृत्यू न येणं; म्हणजे चिरंगीजित्व असेल का? पण जरी मृत्यू येत नसला तरीही शरीर पेशींमध्ये सुक्ष्मगतीने का होईना पण बदल तर होत असतीलच ना? जीवन धर्म - शरीर धर्म तर कोणालाही चुकलेला नाही. आप्त-स्वकीय सोबत नसलेलं, बदलत्या काळासोबत होणारे बदल स्वीकारणं अवघड जात असताना देखील जगत राहाणं किती अवघड असेल? भारतीय पुराण काळातील कथांमध्ये सांगितल्याप्रमाणे सात मानव आहेत ज्यांना चिरंजीवित्व प्राप्त झालं आहे.

अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमांश्च बिभीषणः।
कृपः परशुरामश्चैव सप्तेते चिरंजीविनः॥

अश्वत्थामा, बळी राजा, व्यास मुनी, हनुमान, राजा बिभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सात चिरंजीवी आहेत. यातील बळी राजा आणि परशुराम हे सत्ययुगातले आहेत, हनुमान आणि बिभीषण हे त्रेता युगातले तर कृपाचार्य, व्यास महर्षी आणि अश्वत्थामा हे द्वापार युगातले. हे सगळे जरी चिरंजीवी असले तरी प्रत्येकाचे चिरंजीवित्वचे कारण संपूर्णपणे वैयक्तिक आणि वेगळे आहे.

सत्य युगातील बळी राजा असुर योनीतील असूनही अत्यंत सत्शील आणि न्यायसम्मत राज्य करत होता. अत्यंत दानी बळी राजा भक्त प्रल्हादाचा नातू होता. एक अशी कथा देखील आहे की इंद्राने कपटाने बळी राजाच्या पित्याचा वध केला होता. त्यामुळे पृथ्वीवरील राज्य प्रस्थापित झाल्यानंतर बळी राजाने त्याचा मोर्चा स्वर्गाकडे वळवला आणि इंद्राशी युद्ध करून त्याला स्वर्गातून हाकलून दिले. इंद्राने विष्णुकडे धाव घेतली. विष्णूने वामन अवतार घेतला आणि तो बळी राजाकडे गेला. युद्ध जिंकल्यानंतर बळी राजाने मोठा यज्ञ केला होता आणि त्यानंतर दान देण्यासाठी नावाजलेला बळी राजा दान देण्यास उभा राहीला. त्यावेळी वामन अवतारातील विष्णूने तीन पावलांइतकी जमीन दान मागितली. बळी राजाने ते मान्य करून अर्ध्य सोडले. तत्क्षणी वामन अवतारातील विष्णूने विश्व रूप धारण करत पाहिले पाऊल स्वर्गावर ठेवले. दुसरे पाऊल पृथ्वीवर ठेवले... आणि मग बळी राजाकडे वळून म्हणाला अरे तू जे जिंकले होते ती जमीन तर मी दोन पावलांमध्ये प्राप्त केली. तरीही तिसरे पाऊल अजून आहेच. त्यावर बळी राजाने तिसरे पाऊल माझ्या मस्तकी ठेवावे; असे वामन अवतारी श्रीविष्णूला सांगितले. वामनाने तिसरे पाऊल तर ठेवले; परंतु आपण कोण आहोत हे माहीत असूनही बळी राजा दान देण्यास कचरला नाही हे समजून श्रीविष्णू त्यांच्या मूळ रुपात आले आणि त्यांनी बळी राजाला वर मागण्यास सांगितले. बळी राजाने सस्मित चेहेऱ्याने म्हंटले; "देवा, मी आनंदाने पाताळचे राज्य स्वीकारतो परंतु माझी एकच इच्छा आहे की तुम्ही माझ्या राज्याचे द्वारपाल व्हावे." श्रीविष्णूने ते मान्य केले. आता ज्या राज्याचा द्वारपाल प्रत्यक्ष श्रीविष्णु आहे तिथे यम देखील जाणे शक्य नसल्याने बळी राजा चिरंजीवी झाला.

परशुराम कथा देखील अशीच काहीशी अचंबित करणारी आहे. परशुरामांना त्यांच्याहुन मोठे असे सहा भाऊ होते. त्यांचे पिता जमदग्नी ऋषी होते. ते एकदा संध्येसाठी बसले होते त्यावेळी त्यांना अर्ध्य देण्यासाठी जल हवे होते. त्यांनी त्यांच्या पत्नीस; रेणुका मातेस; जल आणून देण्यास सांगितले. रेणुका मातेला जल देण्यास विलंब झाला आणि जमदग्नी ऋषींना खूप राग आला. त्या रागाच्या भरात त्यांनी आपल्या पुत्रांना रेणुका मातेचा वध करण्यास सांगितले. त्यावेळी परशुराम तेथे नव्हते. सहाही पुत्रांनी मातेचा वध करण्यास नकार दिला. त्यामुळे जमदग्नी ऋषींचा राग अजूनच वाढला आणि त्यांनी आपल्या सहाही पुत्रांना भस्मसात केले. त्याचवेळी परशुराम तिथे आले. जमदग्नी ऋषींनी परशुरामांना रेणुका मातेचा वध करण्यास सांगितले. परशुरामांनी कोणताही विचार न करता तत्क्षणी रेणुका मातेचा वध केला. ते पाहून जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला. आपले म्हणणे लगेच मान्य केले यामुळे ते परशुरामांवर खुश झाले आणि त्यांनी हवा तो वर माग म्हंटले. त्यावेळी परशुरामांनी आपले सहाही भाऊ आणि माता रेणुका यांना परत जिवंत करण्याची विनंती जमदग्नी ऋषींना केली. जमदग्नी ऋषींनी देखील हसत हसत ती विनंती स्वीकारली आणि त्या सर्वांना परत एकदा जीवन दान दिले. त्यानंतर त्यांनी परशुरामांना स्वतः आशीर्वाद देऊन चिरंजीवित्व बहाल केले.

त्रेता युगातील हनुमंत आणि बिभीषण हे दोघे चिरंजीव हे श्रीरामांच्या आशीर्वादाने त्या पदाला पोहोचले आहेत. श्रीराम-रावण यांच्यातील युद्ध संपल्यानंतर श्रीरामांनी बिभीषणाला लंकेचे राज्य दिले. त्यावेळी बिभीषण अत्यंत दुःखी होता. 'देवन, मी माझ्या स्वतःच्या भावांचा विनाश केला हा विचार मला कालांता पर्यंत दुःख देईल. त्यामुळे मला हे राज्य नको. आता हा देह आपल्या साक्षीने कायमचा अग्निस अर्पण करावा अशी इच्छा आहे.' असे बिभीषणाने म्हणताच श्रीरामांनी त्याला जवळ घेतले आणि सांगितले; "बिभीषणा. वत्सा, तू असे म्हणणे योग्य नाही. राजा, तुझे जिवीतकार्य अजून संपलेले नाही. कोणीही कितीही दूषणे दिली किंवा आरोप केले; तरीही आपण आपल्या विवेकबुद्धिपासून आणि सारासार विचारशक्तिपासून विचलित होऊ नये; हा पुढील काळासाठी अत्यंत आवश्यक असा विचार त्या काळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुझे असणे आवश्यक आहे. त्यामुळे मी तुला चिरंजीवित्व बहाल करतो." असे म्हणून त्याला चिरंजीव केले.

लव-कुश परत आल्यानंतर आणि सीतेने स्वतःला भूमातेमध्ये सामावून घेतल्यानंतर श्रीरामांचे मन राज्यकारभारात लागत नव्हते. त्यामुळे जल समाधी घेऊन जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी हनुमंताने देखील त्यांच्या सोबत निर्वाण करण्याचा मानस बोलून दाखवला. 'मला सतत तुमच्या नामस्मरणात राहायचे आहे भगवान.' हनुमान म्हणाला. त्यावेळी श्रीरामांनी हनुमानास सांगितले की अजून तुझे अवतार कार्य संपलेले नाही. काही दिवस लव - कुश यांच्या सोबत त्यांना राज्यकारभार करण्यास मार्गदर्शन कर आणि त्यानंतर कली युगापर्यंत भक्तीरूप सार जनमानसात रुजविण्याचे काम तू कर.. असे सांगितले आणि हनुमंतास चिरंजीवित्व बहाल केले.

द्वापर युगातील कृपाचार्य हे जन्मतःच चिरंजीव होते अशी वंद्यता आहे. कृपाचार्य आणि त्यांची भगिनी कृपी यांचे पिता शरद्वान ऋषी हे मोठे धरुर्धर होते. शास्त्र-अस्त्रपरंगत अशा शरद्वान ऋषींनी तपश्चर्या करण्यास सुरवात केल्यावर इंद्र घाबरला आणि त्याने जानपदी या देवकन्येला शरद्वान ऋशींची तपश्चर्या भंग करण्यास पाठवले. शरद्वान ऋषी जानपदीवर भाळले आणि पुढे कृप-कृपीचा जन्म झाला. मात्र माता-पिता दोघांनीही या मुलांचा त्याग केला आणि आपापल्या मार्गाने निघून गेले. कृप आणि कृपी ही दोन्ही बाळं राजा शंतनूला मिळाली असे मानले जाते. शंतनू राजाने त्यांचे पालन केले. कृपाचार्य आपल्या वडिलांप्रमाणे जन्मतःच धनुर्विद्येत अत्यंत पारंगत होते. त्याचप्रमाणे त्यांना इतर अस्त्र-शस्त्र विद्यांचे ज्ञान देखील उत्तम होते. त्यामुळे ते कौरव-पांडवांचे राजगुरू झाले. महाभारतीय युद्धानंतर कृपाचार्य हे पांडवांसोबत गेले. पुढे उत्तरेच्या मुलाला, परीक्षिताला; देखील कृपाचार्यांनी अस्त्रविद्या शिकविली असे मानले जाते. या संपूर्ण जीवन प्रवासात कृपाचार्यांच्या मृत्यूचा उल्लेख कधीही कुठेही मिळत नाही. त्यामुळे ते जन्मतः च चिरंजीवी होते; या मान्यतेला आधार मिळतो.

ऋषी पराशर आणि मत्स्यगंधा किंवा योजनगंधा किंवा सत्यवती यांचे पुत्र म्हणजे वेद व्यास. जन्मतःच महर्षी व्यासांना चारही वेदांचे पूर्ण ज्ञान होते; म्हणूनच त्यांना वेद व्यास म्हंटले जाते.

शंतनु आणि सत्यवती पुत्र चित्रांगद आणि विचित्रविर्य यांच्या मृत्यूनंतर सत्यवतीच्या आग्रहाखातर अंबा आणि अंबिका या विचित्रविर्य पत्नींना महर्षी व्यासांकडून पुत्र प्राप्ति झाली आहे. महाभारताचे लेखनकर्ते, वेद-पुराण निर्माते वेद व्यास यांना त्यांच्या पित्याकडून महर्षी पराशरांकडून चिरंजीवित्वाचे वरदान मिळाले आहे.

चिरंजीवित्व प्राप्त झालेल्यांमध्ये सर्वात शेवटी अश्वत्थामा येतो. गुरू द्रोणाचार्य आणि कृपी यांचा पुत्र अश्वत्थामा अत्यंत पराक्रमी आणि अस्त्र-शस्त्र विद्या पारंगत होता. जन्मतःच त्याच्या टाळूवर एक चमकणारा मणी होता. त्यावेळी ब्रह्मस्त्र जाणणारे केवळ परशुराम, अर्जुन, कर्ण आणि अश्वत्थामा होते. दुर्योधनाच्या मृत्यूनंतर आणि विशेषतः आपले पिता द्रोणाचार्य यांच्या मृत्यूमुळे संतापलेल्या अश्वत्थाम्याने ब्रह्मस्त्राचा वापर करून पांडवांच्या सर्व पुत्रांचा वध केला. श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याला ब्रह्मस्त्र परत घेण्यास सांगितले असता त्याने ती विद्या येत नसल्याचे सांगितले. त्यावेळी श्रीकृष्ण सुदर्शनाच्या मदतीने अभिमन्यू पत्नी उत्तरेच्या गर्भातील परीक्षिताचा जीव वाचवू शकला होता. जी विद्या पूर्णपणे येत नाही तिचा वापर केवळ रागाच्या भरात अश्वत्थाम्याने केल्याने श्रीकृष्णाने त्याच्या टाळूवरील रत्न काढून घेतले आणि त्याला चिरंजीवित्वाचा शाप दिला. अशा प्रकारे अश्वत्थामा देखील चिरंजीव झाला.

असे आपल्या पुराणातील हे सात चिरंजीव! कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक असे आपल्या पुराण कथांमधील चिरंजीवींबद्दल मी का सांगते आहे. पण गेले काही दिवस माझ्या मनात एकच विचार डोकावतो आहे, जर हे चिरंजीव आज या कलियुगात आले; आणि फक्त आलेच असे नाही तर ते जी तत्व, विचार, साधना घेऊन आजवर जगत आहेत ती तत्व, विचार, साधना त्यांनी आपल्या समोर ठेवली तर?
____________________

सिद्धार्थ एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा. जन्मतः तोंडात सोन्याचाच नाही तर हिरे-माणके जडवलेला चमचा घेऊन जन्मलेला. आज तो एक अत्यंत उमदा तरुण आहे.... अत्यंत हुशार मुलगा. तत्वनिष्ठ असलेला सिद्धार्थ जर मानत आलं तर मात्र कोणाच्याही हाती लागण्याच्या पलीकडच्या कृती करतो. वडिलांसोबत तो ऑफिसमध्ये रोज जात होता. पण कधीतरी अचानक त्याच्या हाती एक जुनं पुस्तक पडलं आणि......

क्रमशः

-ज्योति अळवणी.

श्रीगणेश लेखमाला २०२१

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

12 Sep 2021 - 12:31 pm | तुषार काळभोर

सप्त चिरंजीवींचा परिचय आवडला. आणि त्यांच्या आधुनिक काळातील प्रवेशाची कल्पनाही रोचक आहे.

इंद्राएव्हडे कपटि आणखि कोणीच नसावे हा स्वताला देवांचा/स्वर्गाचा राजा कसा काय म्हण्वुन घेतो ? याच्या पाठि उभे राहणार्‍याना काय म्हणावे ?

रेणुका दुसर्‍या कपलचा प्रणय लाइव बघण्यात रंगुन गेल्याने जल आणण्यास उशीर झाला… म्हणुन तिला मारवली. संध्या चुकल्याचे पाप मोठे की मनुष्यवधाचे ? कोण डॉक्टर आपल्या बायकोला तंदुरुस्त करायची खात्री बाळगतो म्हणुन आधी तिला गंभीर जखमी तरी करेल ?

बाकी सिध्दार्थची कथा वाचण्यास उत्सुक…

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Sep 2021 - 4:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

पुढचा भाग कधी?

पैजारबुवा,

असल्या देवांच्या कथा वाचुन ज्यांनी या कथा प्रथम लिहिल्यात त्यांच्याबद्दल उगाच हसू येते..कसे सुचत असेल असले सगळे?
आणि आपल्यातल्या अनेकांना पण ते खरे वाटते याचे हि कुतूहल आहेच...

सिद्धार्थ ला पण असेच वाटले तर बरे होईल....

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 8:06 pm | गॉडजिला

according to फतवाह- ए - पात्याचु - ए - इल्म तुम्ही नक्कि गट क्रमांक दोन मधिल आहात…

Bhakti's picture

12 Sep 2021 - 9:22 pm | Bhakti

आपल्यातल्या अनेकांना पण ते खरे वाटते याचे हि कुतूहल आहेच...मलापण आधी खर्या वाटत असत.त्याऐवजी तांत्रिक शिक्षणाला आणखिन वेळ द्यायला पाहिजे होता.:)

टर्मीनेटर's picture

12 Sep 2021 - 8:54 pm | टर्मीनेटर

मस्त सुरुवात 👍
पुढचे भाग लवकर येउदेत.

पुढील कथेच्या प्रतिक्षेत..

प्रचेतस's picture

13 Sep 2021 - 9:24 am | प्रचेतस

सुरेख सुरुवात.

सोत्रि's picture

13 Sep 2021 - 9:44 am | सोत्रि

जर हे चिरंजीव आज या कलियुगात आले;

त्यांना यावं का लागावं? ते जर चिरंजीव आहेत तर ते आताही अस्तित्वात असायलाच हवेत पण ते कोणालाच माहिती का नाहीत?
चिरंजीव असावार्‍यांनी अज्ञातवासात असायला हवं का? तसं असेल तर मग त्या चिरंजीव असण्याचा उपयोग काय आणि कोणाला?

- (चिरंजीवी असलेला) सोकाजी

प्राची अश्विनी's picture

13 Sep 2021 - 11:00 am | प्राची अश्विनी

कथा आवडल्या.

चित्रगुप्त's picture

15 Sep 2021 - 4:57 am | चित्रगुप्त

पौराणिक पात्रांची पार्श्वभूमि असलेल्या सध्याच्या युगातील व्यक्तींच्या कथा हा खूपच रोचक प्रकार असलेल्या आगामी कथा वाचायची उत्सुकता लागली आहे.पुढील भाग लवकर येऊ द्यावा.

ज्योति अळवणी's picture

15 Sep 2021 - 12:47 pm | ज्योति अळवणी

गणेश लेखनमालेमध्ये लिहिते आहे. नक्की बघा

नीलस्वप्निल's picture

15 Sep 2021 - 5:50 pm | नीलस्वप्निल

पुढील भागाची वाट पहात आहे

ज्योति अळवणी's picture

16 Sep 2021 - 2:19 am | ज्योति अळवणी

16 तारखेला 5 वा भाग प्रकाशित होईल

कल्पना छानच. वाचतो आहे.

अनिंद्य's picture

16 Sep 2021 - 11:57 am | अनिंद्य

कल्पना झकास आहे !

सप्तचिरंजीवींबद्दल एका तमिळ लेखकाचे पुस्तक/ नाटक आहे (मी इंग्रजीत भाषांतर वाचले होते) - ते कलियुगात सक्रिय झाले तर अशीच काहीशी थीम होती. फक्त त्यांच्याकडे अष्टचिरंजीवी असतात - मार्कंडेय ऋषींना आठवे चिरंजीव मानतात. नाव विसरलो.

आता तुमचा टेक वाचायला उत्सुक आहे.