श्रावणाच्या निमित्ताने आणि लॉकडाऊनमुळे देवळे बंद आहेत शंकराची. म्हणजे नावाजलेली बंद आहेत. पण हे खिरेश्वर पाहता येईल.
कालच माळशेज घाट परिसर फिरून आलो. खूप पाऊस नसणे आणि अजिबात नसणे याचा मध्य गाठून जावे लागते. म्हणजे धबधबे, सृष्टीसौंदर्य दोन्ही मिळते. सध्या लॉकडाऊनमुळे पर्यटनाच्या जागा फारच थोड्या शिल्लक आहेत. धार्मिक स्थळेही बंदच आहेत. मित्रांचा भीमाशंकर ट्रेकचा ( खांडस मार्गे) आग्रह होता पण देऊळच बंद असल्याने एकूण फसणार हे सांगून माळशेज घाटातले खिरेश्वर सुचवले. जवळच्या खिरेश्वर गावाजवळचे म्हणून हे नाव. परंतू नागेश्वर हे नाव आहे. इथूनच एक वाट हरिश्चंद्रगडाकडे जाते. दोनवेळा गेलो आहे.
आम्ही कल्याणहून बसनेच जाऊन आलो. रस्ता उत्तम आहे. शहाड स्टेशनजवळचा दोनशे फुट भाग सोडल्यास खड्डा कुठेच नाही.
जावे कसे आणि कुठे आहे -
या नकाशात पिंपळगाव जोगा धरणाचा बांध मुख्य कल्याण नगर रस्त्याला मिळतो तिथेच NH61 लिहिले आहे. तोच "खुबी बंधारा स्टॉप".
बंधाऱ्याचा रस्ता पांढरा दिसतो आहे. त्यावरून जाणे.
कल्याण नगर रस्त्याला पुणे नाशिक रस्ता "आळे" गावाजवळ छेदतो. त्यास आळेफाटा नाका म्हणतात. पुण्याकडून येणाऱ्यांनी इकडे कल्याण रोडला वळावे.
कल्याणवरून माळशेज घाटमार्गे जाणाऱ्या सर्वच बसेस घाट चढल्यावर लगेचच "एमटिडीसी स्टॉप" नंतर दोन किमिवर "खुबी बंधारा स्टॉप" इथे येतात. इथेच बंधाऱ्यावरूनच चार किमी रोडने गेल्यावर देऊळ येते. कारने येता येते. (आम्ही चालत गेलो.)
माळशेज घाट हेच पर्यटन स्थळ म्हणून सरकारने मान्य केल्याने व्ह्यु पॉइंट्स बनवायचा मार्ग मोकळा झाला. आणि घाटातच अस्ताव्यस्त पार्किंग करणे थांबले. एकूण चार मोठे धबधबे पॉईंट्स, एक बोगदा असे पाच ठिकाणी कार पार्किंग दिले आहे. पुण्याचे लोक वरून खाली येत असल्याने त्यांनी दोन धबधबे आणि बोगदा व्ह्यु पॉइंट करून परत वर जावे. शेवटपर्यंत तळाच्या "सावरणे" गावापर्यंत उतरण्याची गरज नाही. वर गेल्यावर खिरेश्वर करून परत जाण्यात ट्रिप आटोपशिर राहते.
माळशेज घाट - जुन्नर परिसर पर्यटन
यामध्ये खालील ठिकाणे येतात. पर्यटकांचे वयोमान, आवड,आणि काळवेळ लक्षात घेऊन ट्रिप आखणे गरजेचे आहे. म्हणजे आटोपशिरपणा राहतो.
१) हरिश्चंद्र गड
२) खिरेश्वर देऊळ ( नागेश्वर),काळू धबधबा.
३) शिवनेरी,
४) लेण्याद्री आणि लेणी.
५) चावंड
६)निमगिरी
७) हडसर
८) माणिकडोह
९) नाणेघाट
१०) जुन्नर बाजार ( रविवार. तांदुळ आणि कडधान्ये)
११)जुन्नर परिसरांतील इतर लेणी डोंगर.
१२) माळशेज घाट पायी फिरणे.
१३) ओझर गणपती.
१४) खोडाड रेडिओ दुर्बिण भेट.
१५) तमाशाची पंढरी नारायणगाव, पण तिथे आता काय आहे माहिती नाही.
( तुम्हास माहिती असलेल्या जागा वाढवा.)दोनतीन जागा एका ट्रिपमध्ये घेऊन आनंद वाढवता येईल.
फोटो १
देऊळ खिरेश्वर
फोटो २
देऊळ खिरेश्वर समोरून.
फोटो ३
छतावरची शिल्पे. १६ आहेत. अंधारामुळे फोटो गंडले.
फोटो ४
विष्णू. गर्भगृहाच्या वेशीवर. शंकराचे देऊळ असले तरी विष्णू आहे.
फोटो ५
झरा. देवळाभोवती वाहतो.
फोटो ६
लेणी. देवळाच्या जवळच आहे.
फोटो ७
हरिश्चंद्र गडाचा डोंगर.
फोटो ८
पिंपळगाव जोगा धरण. पूर्वी इथेच फ्लेमिंगो येत.
फोटो ९
याच देवळाजवळून १६ फेब्रुवारी २००४ शिवरात्री अगोदर हरिश्चंद्र गडाकडे जात असताना प्रसादासाठी थांबलो होतो. त्यावेळेस मिळालेले उत्सवाचे पत्रक.
बसने प्रवास केल्याने घाटात थांबून फोटो काढता आले नाहीत. फक्त दृष्ये पाहिली.
फोटोग्राफरांनी अवश्य जावे असे ठिकाण.
प्रतिक्रिया
27 Aug 2021 - 4:25 pm | शाम भागवत
छान.
मुलाला दाखवतो. त्याला सुट्टी असेल तर जाऊन येईन.
27 Aug 2021 - 5:08 pm | Bhakti
मस्त!
निसर्ग, राऊळे, ऐतिहासिक वारसा आणि पाऊस संपूर्ण मनसोक्त भटकंती!
27 Aug 2021 - 5:44 pm | श्रीगुरुजी
छान माहिती!
जुन्नरजवळच कोठेतरी बिबट्या निवारा केंद्र आहे असे वाचले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पकडलेले बिबटे वनात परत सोडण्यापूर्वी तेथे काही काळ ठेवले जातात.
27 Aug 2021 - 7:20 pm | राजेंद्र मेहेंदळे
माणिकडोहला आहे ते निवारा केंद्र
27 Aug 2021 - 7:21 pm | राजेंद्र मेहेंदळे
https://wildlifesos.org/locations/wildlife-sos-leopard-rescue-centre/
27 Aug 2021 - 8:36 pm | चौथा कोनाडा
छान, मस्त ट्रिप. सुरेख फोटो !
आटोपशीर प्लान दिल्यामुळे माळशेज-खिरेश्व्वर करयला हवा !
27 Aug 2021 - 11:25 pm | गोरगावलेकर
आठ-नऊ वर्षांपूर्वी माळशेज पहिले आहे. खिरेश्वर मात्र नाही पहिले अजून. एक रात्र एम टी डी सी च्या रिसॉर्टमध्ये मुक्कामाला होतो. येथील वेगवेगळ्या व्ह्यू पॉइंटहून खूप सुंदर परिसर नजरेस पडतो. हॉटेलचे जेवण ठीकठाक. दुसरा पर्यायच नाही कारण आसपास दुसरे हॉटेलच नाही. आता काही फरक पडला असेल तर माहित नाही.
घाटातील रस्त्यात दिसणारे धबधबे
आपल्या लेखात उल्लेखलेला हाच तो छोटासा बोगदा
बोगद्याजवळील पॉइंटहून दिसणारे लहान लहान असंख्य धबधबे
याच सहलीत लेण्याद्री व ओझर हि ठिकाणेही पहिली.
लेण्याद्री
वरून दिसण्याऱ्या लेणीच्या पायऱ्या व परिसर.
सभोवती दगडी भिंत असलेले ओझरचे विघ्नेश्वर मंदिर. मंदिराच्या मागे कुकडी नदीच्या पात्रात बोटिंगची व्यवस्था आहे.
28 Aug 2021 - 6:16 am | कंजूस
आता धबधब्याखाली जाण्यासाठी पायऱ्या आणि कठडे लावले आहेत. तर समोरच्या बाजूला पार्किंगचे साइडिंग काढले आहे. ट्राफिकला अडथळा न करता मौज घेण्याची उत्तम सोय आहे. बोगद्याच्या एका बाजूने दरीपर्यंत जाऊन पाहता येते. हा सर्वात लोकप्रिय पॉइंट झाला आहे.
लहानथोर सर्वांसाठीच एकूण हा परिसर करमणूकीसाठी चांगला झाला आहे.
एमटिडीसी प्रॉपर्टी ठेक्याने खासगी हॉटेलवाल्याला दिली आहे. पूर्वी फक्त रेस्टॉरंट देत असत. जेवण चांगलेच असे.
28 Aug 2021 - 4:31 am | फारएन्ड
सुंदर फोटो आणि माहिती. लेण्याद्रीला अनेकदा गेलो आहे. आवर्जून जाण्यासारखे आहे. ओझरही छान आहे. लेण्याद्री, शिवनेरी व ओझर बहुधा एका दिवसात करता येत असेल. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडाही आहे.
आळेफाटा शब्द एसटीच्या संदर्भात इतक्या वेळा पाहिला/ऐकला आहे की मूळ आळे नावाचे गाव आहे हे कधी डोक्यातच आले नाही :)
28 Aug 2021 - 7:46 am | श्रीरंग_जोशी
वाह, हिरवाईने नटलेल्या माळशेज घाट परिसराच्या भटकंतीचे फोटोज व वर्णन आवडले.
28 Aug 2021 - 10:26 am | सौंदाळा
मस्तच, देवळाचा पहिला फोटो खूपच छान आहे
28 Aug 2021 - 5:07 pm | प्रचेतस
मस्त भटकंती.
नागेश्वर महादेवाचे देऊळ सुरेख आहे. द्वारपट्टीकेवर एक ओळीचा खंडित शिलालेख आहे. "क्षीरेश्वर (खिरेश्वर) गावाजवळील नागेश्वर महादेव" असा काहिसा अर्थ आहे. अनंतशयनी महादेवाची मूर्ती सुरेख आहे. छतावर दिक्पाल आणि त्यांच्या शक्ती, गणेश, गणेशिनी, स्कंद, सूर्य अशा मूर्ती आहेत. तुमच्या एका फोटोत सूर्याची मूर्ती अगदी व्यवस्थित ओळखू येतेय. देवळाभोवतीचा झरा आणि लेणे अतिशय सुरेख आहे. लगेच जायचीच इच्छा होतेय.
28 Aug 2021 - 6:14 pm | कंजूस
लोनाडची आठवण आली. तोच काळ असावा काय? ( http://www.misalpav.com/node/34627 लेखातला पहिला फोटो)
पण मुख्य म्हणजे बौद्ध लेणी नाहीत, शैव वैष्णव आहेत.
28 Aug 2021 - 6:26 pm | प्रचेतस
हो, लेण्यांचा काळ साधारण ९/१०व्या शतकातला असावा असा अंदाज. आंबिवली लेण्यांशी जास्त मिळत्याजुळत्या वाटतात स्तंभ शैलीवरून.
मंदिर १२ व्या शतकातले असावेसे वाटते. हरिश्चंद्रेश्वराला समकालीन.
28 Aug 2021 - 6:52 pm | सतिश गावडे
प्रवासवर्णन आणि फोटो आवडले.
हा फोटो विशेष आवडला.
30 Aug 2021 - 2:06 am | रीडर
छान माहिती
30 Aug 2021 - 8:37 am | चौकस२१२
छान माहिती .. एक शंका,, देवळे बंद पण त्या पायऱ्यांवरील गर्दी बघता , ना मास्क ना अंतर ? मग कोविद एवढा आटोक्यात आली कि काय?
कधी एकदा भारतात भेट देता येईल असे झालाय म्हणून "आंखो देखा हाल" काय आहे ती माहिती वेगवेगळ्या लोकांना विचारून काढतोय... म्हणून हा प्रश्न
30 Aug 2021 - 8:47 am | कंजूस
देवळे बंद पण त्या पायऱ्यांवरील गर्दी बघता ,
तो जुना लेख/ फोटो आहेत. आता सर्व बंद आहे.
31 Aug 2021 - 12:53 pm | टर्मीनेटर
अत्तापर्यंत माळशेज घाटात असंख्य वर्षासहली करून झाल्या आहेत पण खिरेश्वर मंदिर मात्र नाही पाहीलय अजुन.
फोटो छान आहेत (लेखातले आणि प्रतिसादातलेही).
31 Aug 2021 - 1:26 pm | प्रचेतस
मी काढलेले माळशेज घाटाचे फोटोज
काळूचा वोघ
31 Aug 2021 - 2:04 pm | टर्मीनेटर
सुंदर आहेत सर्व फोटोज!
31 Aug 2021 - 5:05 pm | शाम भागवत
+१
31 Aug 2021 - 4:59 pm | चौथा कोनाडा
वाह, प्रचेतस, पावसाळी माळाशेजची सुंदर सफर घडवली ! जबरी फोटो !
31 Aug 2021 - 6:07 pm | Bhakti
अहाहा!क्या बात!
31 Aug 2021 - 4:04 pm | कंजूस
परवा बसमध्ये एका लहान मुलीने विचारलं"वरून पाणी कोण टाकतंय?"
एक धबधबा थेट बसच्या टपावरच कोसळत असतो.
31 Aug 2021 - 4:58 pm | चौथा कोनाडा
किती निरागस !
👶
31 Aug 2021 - 8:53 pm | गॉडजिला
आई शप्पथ =))
एक नंबर _/\_
1 Sep 2021 - 2:21 pm | राजेंद्र मेहेंदळे
हरीश्चंद्र गड करताना एकदा खुबी फाट्यावरुन वरुन जाताना आणि एकदा नळीच्या वाटेने चढुन खुबीवरुन येताना हे मंदिर बघितले आहे. पण ते हिवाळ्यात. दुपारच्या वेळी असणारा थंडावा आणि दमली पावले त्यामुळे झक्क झोप काढली होती.
हे पावसाळी फोटो मस्तच आहेत. आता एकदा पाचनई वरुन जायला पाहिजे आणि येताना हे मंदिर बघावे म्हणतो. धन्यवाद कंजुस