आठवणीतील किडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
18 Jun 2021 - 9:32 pm

आपल्या आयुष्यात अनेक कीटक (किडे) -मुंग्या पक्षी प्राणी आलेले असतात. कीटकाची दुनियाच वेगळी आहे. कीटकाचा पर्यावरण म्हणून उपयोग आहे. अनेक आवडते, नावडते कीटक आपल्याला अधुन-मधून दिसत असतात. पावसाळा आला की कीटक दिसायला लागतात. आपला अनेकदा या कीटकाशी चांगला परिचय असतो. आपणास या सर्वांची आठवणही येत असते कारण आपला या कीटकाशी जुना स्नेह असतो. आपला हा धागा त्याच किड्यासंबंधी आहे. लहानपणी आपण यातल्या अनेक किड्यांशी मैत्री केलेली आहे. आपण तासंतास त्यांच्याबरोबर घालवला आहे, अशा आपल्या आठवणींचा हा धा्गा. आम्ही लहानपणी भिंग म्हणून या किड्यांशी खेळायचो. बोरीच्या झाडांवर, काटेरी झाडांवर हे भिंग सापडायचे. भुंग्यांसारख्या याचा आवाज यायचा. मानेजवळ दोरा बांधायचा. आणि तो उडायला लागला की त्याच्यामागे फ़िरायचे. आपण लहानपणी फार क्रूरपणे यांच्याशी वागलो असे वाट्ते. काचेच्या डब्यात बोरीचा पाला आणि हे कीटक किडे सांभाळले अर्थात ते जगायचे नाहीत. पण पुन्हा नव्याने, मित्रांबरोबर अनेक बोरी-बाभळींवर याला शोधत गेला. आम्ही भिंग म्हणायचो तर याला काही ठिकाणी पाचपिंगेही म्हणतात.
घुगी, उंट तर काही ठिकाणी याचं नाव घुंगरपाळ. मातीत गोल आळे केलेले. एक-दोन इंच असलेले याचं गोल घर असायचं. सापळाच लावलेला असतो. भुसभुशीत मातीत त्या गोल घरात मुंग्या बारीक किडे पडले-घसरले की घराच्या टोकाशी खाली असलेला हा किडा आपलं भक्ष्य मातीत ओढून घेऊन जायचा. किडा दिसायला बेकार असला, तर त्याचं पोट-पाठ अगदी नरम असे. आता जालावर शोधत होतो, त्याला पाहून आपण काहीही करत होतो असं फिलिंग आलं. बाकी, याचं घर कितीतरी वेळा उकरून छोट्याश्या काचेच्या डबीत हे किडे सांभाळले आहेत. यांची गोल गोल घरांची एक वस्तीच असायची भारी दिसायचे ते सगळे. रात्री मोडलेली घरे पुन्हा सकाळी अगदी व्यवस्थित दिसायची नवा डाव नवा खेळ अशा स्वरुपात.
रोलर किडे, शेणाचे बारीक गोळे करून उलट सुलट होत हे किडे ढकलत चाललेले दिसायचे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे किडे खरे तर उपयोगाचे असावेत. पण एक किडा काही वेळ उलटा होऊन गोल गोल तो शेणाचा गोळा ढकलतो तर दुसऱ्या बाजूचा सरळ गोळ्याला ढकलत चालताना दिसतो. पहिला काही वेळ थकला किंवा त्यांची जी काही भाषा असेल त्या प्रमाणे खांदेपालट व्हावी तसे ते आपापल्या जागा बदलून पुन्हा तो बारका गोळा ढकलून घेऊन जाताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कुठून कुठे सुरू असतो काही माहिती नाही. पण, हा खेळ आम्ही पोरं तासंतास बघत असायचो.

रेशीम किडे, पैसा, घुल्या, अशी कितीतरी किडे- कीटक आपणास आठवत असतील. आपल्या काही आठवणी असतील. सोबत काही विशेष माहिती असेल तर, छायाचित्र आणि माहिती याचं स्वागत आहे. असं म्हणतात की सर्व जग नष्ट झालं तरी हे कीटक राहतील. आपल्या आजूबाजूला असा अनेक सृष्टीतला हा पसारा आपल्यासमोर पडलेला असतो. आपल्या सहवासातील अशा कीटकाच्या गोष्टीसाठीचा हा धागा. आपलं सर्वांचं स्वागत आहे. (छायाचित्र जालावरून साभार)

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

18 Jun 2021 - 9:52 pm | आग्या१९९०

मृगकिडा ' लाल मखमल ' आणि काजवे पूर्वी शहरातही सापडायचे. खेडेगावी दुकानात विकायला असायचे हे मखमल किडे. मुलं विकत घ्यायची काडेपेटीत ठेवायला. आता दोन्हीही कीटक खेडेगावातही दिसत नाहीत.

आग्या१९९०'s picture

18 Jun 2021 - 10:10 pm | आग्या१९९०

ब्लिस्टर नावाचा किडा होता,तो अंगाखाली आल्यास त्या भागातील त्वचेला पाणीदार फोड याचचे. दुसरा ह्याच जातीचा किडा पकडायला गेल्यास शरीरातून पिवळ्या रंगाचा उग्र वासाचा फवारा मारायचा ज्याने जोरदार चटका बसायचा. तीस एक वर्षापूर्वी ह्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आता तर एखाद दुसरा किडा दिसतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2021 - 8:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण म्हणता तो ब्लिस्टर कीड़ा कधी दिसला नाही. पण त्याचं काम पूर्वी मात्र हमखास दिसायचं. मानेवर, कपाळावर तो कीड़ा म्हणे रगडला गेला की खरं तर तो चावतो की काय ते माहिती नाही. पण पाणीदार फोड़ पाहिलेले आहेत.

आता ब्लिस्टर कीड़ा शोधणे आले.

-दिलीप बिरुटे

MipaPremiYogesh's picture

26 Jun 2021 - 3:25 am | MipaPremiYogesh

समयोचित धागा

सौन्दर्य's picture

18 Jun 2021 - 11:07 pm | सौन्दर्य

माझ्या लहानपणी आम्ही मातीतून हा किडा उकरून काढत असू. त्याला तळहातावर ठेवून "भुईमोरा, भुईमोरा वाट दाखव" असे म्हंटल्यावर तो तळहातावत आपल्या घराच्या दिशेने चालायला लागायचा असं काहीसं आठवतंय.

एक किडा हात लावल्याबरोबर वाटण्यासारखा गोल, वाटोळा होत असे व कितीतरी वेळ तसाच राहत असे. आम्ही १९६५ साली मालाडला राहत होतो त्यावेळी काजवे अगदी घरात येत असत. पकडलेले काजवे काचेच्या छोट्या बाटलीत ठेवत असू जे बिचारे सकाळी मेलेले आढळायचे.

गुल्लू दादा's picture

19 Jun 2021 - 12:04 am | गुल्लू दादा

बऱ्याच आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद सर. आता वाईट वाटते लहानपणी खूप क्रूर वागलो त्याचं. लेख बराच रिलेट झाला.

किडे पाहायला आवडतात. पण नावे जाणण्याचा कधी प्रयत्न केला नाही. .
१. हे हिरवे हिरो कायम दिसतात. असेच लाल सुद्धा असतात.
२) असा पुंजका बऱ्याचदा दिसला आहे.

३) घरं.

४) सुरवंट !

५) ???

मातीत ज्वालामुखीचे तोंड असल्यासारखे घर बांधणारा किडा असतो त्याची एक गंमत असते. सुताचा छोटासा गोळा आत टाकला तर तो पुन्हा बाहेर फेकून देतो.

कॉमी's picture

19 Jun 2021 - 12:46 am | कॉमी

समान फोटो शोधले असता-

१. पहिला हिरवा कीडा- लिची शिल्ड बग किंवा ज्यूल बग
२. शेवटचा हिरवा किडा- ग्रीन फ्लॉवर बिटल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2021 - 8:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुक्रमांक दिलेल्या तीनची घरंही काडीने उकरली आहेत. काय मजबूत घरं बांधतात हे भूंगे. या भुंग्यांची कायम भिती बसलेली. भक्त पुंडलिक सिनेमा होता. पुण्डलिकाच्या मांडीवर आई वडील असतात आणि दारात पांडुरंग आलेला. परीक्षा घ्यायची म्हणून भुंंगा त्या मांडीला कोरतो. ते वाहते रक्त वगैरे... हे राम. अशी ती भुंग्याची दहशत. :)

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

21 Jun 2021 - 3:06 pm | कंजूस

जवळ न जाता फोटो काढायला काय करता?

कॉमी's picture

21 Jun 2021 - 3:42 pm | कॉमी

जवळूनच काढलेत मी. अर्धा किंवा कमी फूट अंतरावर मोबाईल धरून काढलेत. मोबाईलचा कॅमेरा बरा असला तरी लांबून इतके स्पष्ट फोटो येत नाहीत.

उगा काहितरीच's picture

19 Jun 2021 - 7:25 am | उगा काहितरीच

शीर्षक वाचून वाटलं होतं की काही विडंबन वगैरे आहे बहुतेक. पण हे तर खरोखरच्या किड्यावरच आहे की.
रच्याकने, किडे त्यांच्या शरीराच्या मानाने खूप जास्त शक्तीवान असतात. माणसाला त्यांच्या एवढं वजन उचलता येत असलं असतं तर माणसाने १-२ हजार किलो वजन सहज उचललं असतं वगैरे डिस्कव्हरी वर पाहिल्याचं आठवतं.
बाकी लेख, फोटो आणि प्रतिसाद पण छान आहेत . हे वेगळं सांगायला नको.

कुमार१'s picture

19 Jun 2021 - 7:35 am | कुमार१

फोटो आणि प्रतिसाद पण छान आहेत !

वा. विशेष धागा आहे. आवडला.

कोंकणात पावसाळा सुरु झाला की किडेकीटकांची गणती अशक्य असे.

सर्वात पहिले म्हणजे शेकडोंच्या संख्येने पेव फ़ुटणारे पैसेकिडे. ते सर्वत्र वळवळत आणि चपलेने चेचले गेले की एक विशिष्ट उग्र वास पसरे. तो पावसाळी हवेशी जोडला गेला आहे.

मग लाल मखमली किडे. मृगकिडे म्हणत असू.

चतुर. त्यांच्यातले लाल तुलनेत संख्येने कमी असायचे, हिरवे आणि निळे मुबलक.

लाल चतुर म्हणजे सर्वात खतर्नाक, हिरवे शक्यतो टाळावे आणि निळे मात्र सेफ (पकडायला) अशी आपली आपण विभागणी आम्ही पोरांनी केली होती. निळा चतुर बिनधास्त पकडून त्याच्या शेपटीला दोरा बिरा बांधून सोडणे.. म्हणजे उडता दोरा पहायला मिळतो आणि पुन्हा पकडणे सोपे जाते वगैरे. यात काही क्रूर आहे असं वाटतही नसे. बालमनही सैतानाचा हातच.. असो.

कोंकणात केसाळ सुरवंटाला कसरुंड म्हणत असत. ते छतावर आणि भिंतींवर अमाप असत. खाज आणणे हे मुख्य काम.

घुंगुरपाळा हा पावसाळ्यात नसला तरी एरवी सगळीकडे खड्डे करुन बसलेला असे. हे खड्डे म्हणजे त्याचे सापळे असतात हे ज्ञान त्या वेळी नव्हते. काडीने बराच वेळ टोकरले की तो दिसे. मग त्याला तळहातावर ठेवायचे. की त्याच्या हलण्याने तळहाताला गुदगुल्या होत. मग "घुंगुरपाळया घुंगुरपाळया काशीची वाट दा sss खव" असे म्हणत राहायचे. किडा एखाद्या रैंडम दिशेत वळला की ती दिशा काशीची असे आम्ही शंभर टक्के मानत असू. वास्तविक आम्हाला काशीची दिशा जाणून काय करायचे होते हा बेसिक प्रश्न. पण ते एक असो.

या किड्यांना हाताळायला अजिबात भीती किंवा किळस वाटत नसे याचं आता आश्चर्य वाटतं.

किडे अतिचिवट आहेत. आपल्याहून जास्त काळ उत्क्रांत आणि लवचिक आहेत.

हिमयुग आले, अणुबॉंब पडला, जग पुरते गाडले गेले तरी किडे हे होते, आहेत आणि असतील. रहे ना रहे हम पण हे किडे विश्व व्यापून दशांगुळे उरतीलच.

प्रचेतस's picture

19 Jun 2021 - 9:03 am | प्रचेतस

'किडे' आवडले.

किड्यांच्या बर्‍याच आठवणी आहेत. लहानपणी शहरातही कजावे हमखास दिसायचे. एखादा काजवा पकडायचा आणि काडेपेटीला भोक पाडून त्यात ठेवायचा आणि रात्री आंधार करुन सोडून द्यायचा. तो लुकलुकताना पाहून मौज वाटे. आता मात्र काजवे पाहायला जंगलात जावं लागतं. राजमाचीच्या रस्त्यावर, भोरगिरीला, भंडारदर्‍याला हजारो काजवे झगमताना पाहिले आहेत.

रातकिड्यांची किरकिर कान किटवणारी. नुसताच आवाज, किडा दिसत नसे. भीमाशंकरला एकदा मुक्काम केलेला असताना मोकळे आवार असल्याने भरपूर रातकिडे होते, सहज दिसायचे.

रातकिड्यांसारखाच एक दिवसकिडाही असतो त्याचे नाव विसरलो, झिंगूर की कायसे असे आहे. ओसाड माळरानात, जंगलात हे हमखास असतात खूप मोठा आवाज असतो ह्यांचा.

एकदा सुधांशू नूलकरांसोबत भाजे लेणी पाहण्यास गेलो असता त्यांनी तुतीच्या पानावर स्वतःच्या लाळेपासून घर करणारा किडा दाखवला होता.

मृगाचे लाल किडे पूर्वी हमखास दिसत. मृगाचा पहिला पाऊस पडला की हे लाल मखमली पाठीचे किटक जमिनीतून बाहेर येत आणि तुरुतुरु चालू लागत.

a---a

एकदा महाबळेश्वरला मधुमक्षिका पालन केंद्रात गेलो असताना त्यांचे पोळे हातात धरले होते, भारी वाटले.

a

शेवटी काय ह्या पृथ्वीवर किटकांचे अधिराज्य आहे. ते मानवाच्या उदयापूर्वी होतेच आणि अस्तानंतरही राहतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2021 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली, मृगाचे लाल किडे आता फारसे दिसत नाही. मधमाशांच्या पोळ्यांचा बोर्ड आणि आपला फोटोही मस्त. तरुणपणाचा आहे वाटतं. ;) (ह.घ्या)

बाय द वे, तो 'झींगुर' नावाचा कीड़ा लैच बेक्कार. इतका आवाज असतो त्याचा की विचारू नका. आम्ही त्याला 'विठ्ठल' म्हणतो. कर कटावर असलेला का कीड़ा लैच कान किटवतो.
photo_2021-06-19_09-35-31

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

19 Jun 2021 - 10:49 am | आग्या१९९०

जंगलात रातकिडे शोधणे हे सर्वात कठीण काम. आवाजाच्या दिशेने जा त्याच्या विरुद्ध दिशेने जा चारी बाजूनं सारख्याच तीव्रतेने आवाज येतो,अगदी भूलभुलैया. रातकिड्यांचा रंग झाडाच्या खोडाच्या सालीसारखा असल्याने सहज दिसून येत नाही. त्यामुळे सापडला की त्यांची रवानगी काडेपेटीच्या खोक्यात व्ह्यायची. तोच आमचा ट्रांजिस्टर रेडिओ असायचा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2024 - 9:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

photo_2024-06-12_21-35-46

छायाचित्र सरांच्या सौजन्याने

मृगाचे लाल किडे पूर्वी हमखास दिसत. मृगाचा पहिला पाऊस पडला की हे लाल मखमली पाठीचे किटक जमिनीतून बाहेर येत आणि तुरुतुरु चालू लागत.

अहं...! तो लाल मखमली किटक म्हणजे त्याला काही ठिकाणी रोहिणी असेही म्हणतात म्हणे. पण, मिरुग, मृगाचा, म्हणजे हा किटक, जो पाऊस येईल अशी कल्पना देतो. आमचे कवी मित्र, शिक्षक आणि शेतकरी असलेले श्री.लक्ष्मण खेडकर सरांनी फोटो पाठवला आणि धाग्याची आठवण झाली.
-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

19 Jun 2021 - 10:08 am | कंजूस

मुख्य म्हणजे उजवीकडे, डावीकडे चित्रं आणि लेखन सरकवल्याने बरं वाटतंय.
फोटो - पूर्वीच्या मोठ्या फिल्म क्याम्राने किड्यांचे macro किंवा फुलपाखरांचे फोटो दुरून घेणे फार खर्चीक होतं. आता मात्र डिजिटल सेन्सरने सोपे झाले. काजव्यांचे विडिओ/फोटो फेसबुक / युट्युबवर आहेत . त्यापैकी एक
https://youtu.be/F7GJT16KSnM

राजमाचीच्या भैरोबा देवळाच्या ओसरीत रात्री राहिल्यावर समोरच्या झाडांवर काजव्यांचा रात्रीस खेळ चाले पाहिला आहे. कधी ओसरीतही येतात.

कॉमींचे फोटो आवडले. सर्वांचे प्रतिसादही छान. एकूण मजा आली.

हाॅलिवूडच्या काही अप्रतिम अॅनिमेशन पटांपासून (A bugs life, Antz, Ant bully, Horton Hears a Who! सारखे भन्नाट कल्पनांवर आधारीत) ते आपल्या साैथचा कसला तो मख्खी (ज्या हिरो माशी होऊन पुनर्जनम घेतो आणि स्वतःच्या मृत्युचा बदला झेतो.) काय कायसा दे मार मसालापट असो, किड्यांनी मानवाला नेहमीच भुरळ घातली आहे.
किड्यांच्या आठवणी नसणारा माणुस विरळाच असावा. काही सुखद, काही नकोशा वाटणाऱ्या, तर काही अगदी विसराव्या म्हटलं तरी आठवणाऱ्या. त्यामुळे हा धागा पाहून संमिश्र भावना जाग्या झाल्या आहेत.
वाचेची नवीनच ओळख झालेल्या माझी फुलपाखराची ओळख 'फुलकाफुलू' अशी झालेली. ते भिरभिरणारं रंगेबिरंगी पाखरू रांगणाऱ्या मला फार आवडायचं. थोडा मोठा झाल्यावर टेकडीवर असणाऱ्या शाळेत जाताना असंख्य फुलझाडं त्यावर भिरभिरणारी पाखरं, चतूर यांचा मागे मागे फिरताना शाळा कधी यायची कळायचं ही नाही. एकदा फुलपाखरु पकडलंही. सोडल्यावर त्याच्या पंखांचा पिवळा रंग बोटांना लागला. ते मात्र फार उडू शकलं नाही नंतर. तेव्हा हळहळलो. त्यानंतर पुन्हा कधी फुलपाखरू पकडलं नाही. चतुरांचे पंख त्या मानाने बळकट. ते नेहमी पकडायचो. पकडलेला चतूर छातीवर मेडल सारखा ठेवायचो. तो ही वेडा बराच वेळ बसून राहायचा. मन भरलं (किंवा त्याचं गांगरलेपण कमी झालं) की उडून जायचा.
पावसाळ्यात दिसणारी गोम , त्या घरात तर येवढ्या यायच्या की नकासमोर पाहून चालावे ही शिकवणच विसरलो.
वर काहींनी उल्लेखले घुंगरपाळे मी अनेक वर्षे गावाला समुद्रावर पाहत आलोय. (नाव मात्र अलिकडेच समजले.) मुंग्या पकडून त्या गोल खड्ड्यात टाकायचे पालथे धंदेही अनेकदा केलेत.

वाडीतही अनेक किडे दिसायचे. शेणात राहणारा त्यावरच पोसणारा शेणकिडा, रंगीत लेडीबग्ज, रात्री माझीच हिरवी म्हणत आपलं बुड चमकवत उडणारे काजवे. (हे आजही प्रिय आहेत)
भुंग्यांची दहशत मात्र पार महाभारता पासुन. पण तोच भुंगा जेव्हा 'घेई छंद मकरंद' मधुन भेटीस आला तेव्हा मात्र आपण त्याचे फॅन झालो.
काही वर्षांमागे रेलिंगवर असलेल्या सुरवंटावर आईचा हात पडला तिच्या बोटात त्याचे काटे लागले. तेव्हा तिला ते काही जाणवलं नाही. पण मग दुसऱ्या दिवशी बोट दुखायला लागलं. काटा येवढा रुतून तुटला की निघता निघेना. ति काही तेवढ्यासाठी डाॅक्टरांकडे गेली नाही. पण तिच्या बोटात तो काटा राहीला तो राहीलाच. आता तो भाग टणक झालाय. गेल्यावर्षी गावाला परसात झाडं लावत असताना माझा पाय तश्याच एका सुरवंटावर पडला अगदी अलगद. काही तरी टोचतय कळताच वरचेवर उचलला तर हे महाशय खाली दिसले. पाय दुसरीकडे टेकताच असह्य वेदना झाल्या. पाय उचलून पाहतो तर बोटांच्या पेरामध्ये असंख्य केसांचा पुंजका. (पूर्ण वजनाने पाय टाकला असता तर काय झालं असतं कल्पनाही करवत नाही.) शक्य तेवढे काटे/केस काढले पण ते येवढे बारीक की काढताही येईनात. पाय तर टेकवत नव्हता. बाबा म्हणाले की शेणात पाय दे आणि तेच चोळ पायाला. लहान असताना शेणात पाय पडल्या काही वाटयचं नाही. आता मात्र मुद्दाम पाय द्यायचा म्हटल्यावर उगाच किळस वाटली. पण ते काटे तर येवढे टोचत होते की बस रे बस. आईने लगेच शेजारहून शेण मागवले. त्यात मी पाय घातला. थोडावेळ ते तसच पायने ते तुडवलं. दोन मिनीटांनी पाय धुतला आणि काय तो चिमित्कार म्हणावा मी दोन्ही पायांवर धड उभा राहीलो. =))

असे हे किडे ज्यांनी मनाचे अनेक कोपरे व्यापलेले आहेत त्या सर्वांबद्दल लिहीत बसलो तर दिवस कमी पडतील. तुर्तास थांबतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2021 - 10:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है, मस्त आठवणी. लिहिलंय खूप छान. धन्स. बाकी, गोम एक भयंकरच गोष्ट आहे.
चतुर म्हणजे 'देवाचा वाहन' घोडा. म्हणून त्याला लै इज्जत मान आमच्याकडे.

गंपासेठ, लिहिते राहा आणि येत राहा. पाककृतीचंही विसरु नये. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

19 Jun 2021 - 10:27 am | प्रचेतस

बाकी मोबाईल किडे, ओएस किड्यांवरदेखील देखील लिहिलं असतंत तर अजून भारी झालं असतं ;)

गॉडजिला's picture

19 Jun 2021 - 3:04 pm | गॉडजिला

मोबाईल किडे, ओएस किड्यांवरदेखील देखील लिहिलं असतंत तर अजून भारी झालं असतं

हे काय प्रकरण आहे ? असे किडे असतात की ते मात्र एक रूपक आहे ?

कंजूस's picture

19 Jun 2021 - 11:38 am | कंजूस

मोबाइल रूट करणे?
त्यावर सरांनी बरेच लिहिले होते पण हे का करावं लागतं समजायचं नाही.

मदनबाण's picture

19 Jun 2021 - 3:02 pm | मदनबाण

सर्व फोटो आवडले ! :)

@ कंजूस मामा
फोन रुट करणे म्हणजे त्याचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर अ‍ॅक्सेस मिळवणे. काही अ‍ॅप्लिकेशन्स [ फायरवॉल, अ‍ॅटॉमिक क्लॉक] हा अ‍ॅक्सेस असल्या शिवाय तुम्हाला वापरता येत नाहीत.
तुमचा फोन तुम्ही जर रुट केलात तर तुमच्या फोनची वॉरंटी ब्रिच होते. [ म्हणजे जर फोन वॉरंटी कालावधीत असेल तर ती मिळणार नाही].

जाता जाता :- जाहिरात...
कोळी आणि टोळ
फुलपाखरु भाग १
फुलपाखरु भाग २

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Photography is the story I fail to put into words.”:- Destin Sparks

सौंदाळा's picture

19 Jun 2021 - 2:55 pm | सौंदाळा

सर रॉक्स!!
शाळेत जाताना आजूबाजूच्या झाडाझुडुपांमध्ये पानाच्या खालच्या बाजूला लाल टणक पाठीचे चमकदार किडे असायचे. आम्ही त्याला काचकीडा म्हणायचो. ते काड्यापेटीत बंद करून दप्तरातून शाळेत घेऊन जायचे, तास चालू असताना हळूच काड्यापेटी थोडीशी उघडून बघायची आणि शेजारीपाजारी पास करायची एकदम थ्रिलिंग वाटायचे.
लाल मुंग्या राक्षसाच्या आणि काळ्या मुंग्या देवाच्या असायच्या. लाल मुंगी हातापायावर दिसली तर चिरडून टाकली जायची तर काळी मुंगी फुंकर मारून उडवून लावली जायची.
एकदा आत्याकडे गेलेलो तेव्हा बूट अंगणात आंब्याच्या झाडाजवळ ठेवले होते ते रात्रभर तिकडेच राहिले आणि सकाळी खेळायला जाताना मोजा पायात घातला तर त्यात सुरवंट. खाजवून खाजवून पायावर बारीक पुरळ आले आणि नंतर तर त्या भागाची संवेदनाच गेली. पाय पूर्ण बरा व्हायला आठवडा गेला.
आणि जळवांबद्दल काय सांगू सर, कास तलाव,ठोसेघर धबधबा बघायला गेलो होतो, येताना एका मित्राच्या मानेवर जळू दिसली. सगळ्यांनी चेक केले तर प्रत्येकाच्या अंगावर किमान दोन जळवा निघाल्या. त्यानंतर जळवांबरोबर भरपूर चकमकी झाल्या.
एकदा ऑफिसमधून शुक्रवारी विकेंड ट्रिप म्हणून दापोलीला निघालो होतो. निघायला अंमळ उशीरच झाला. भोर, वरंधा घाट, महाड या रस्त्याने वरंधा घाट उतरता उतरता खूपच अंधार झाला. त्यात एका मित्राला मळमळायला लागले म्हणून घाटातच कडेला गाडी थांबवली आणि रस्ता क्रॉस करून दरीच्या बाजूला गेलो तर काय सांगावे!! दरीतले बरेच पुंजके काजव्यांमुळे चमकत होते. अविस्मरणीय दृश्य.
सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.
आता पावसाळ्यात कीटकांची बरीच वाढ होते काही चुकार कीटक घरात पण घुसतात, लाईटभोवती फिरत राहतात. पूर्वी तापलेल्या बल्बवर झेप घ्यायचे त्यांचे पंख जळून दिव्याखाली पडायचे आणि कीटक तडफडत राहायचे आता रस्त्यावर, घरात एलईडी आलेत त्यामुळे हे कित्येक मृत्यू कमी झालेत. पण किड्यांची दिव्यावर झेप घ्यायची ओढ कुठून येत असावी काही समजत नाही. असो
लिहीत राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2021 - 3:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भिंग,पाचपिंगे आणि तुमच्याकडील काचकिडे बहुदा एकच असावे. लालमुंग्या, काळ्या मुंग्या,मुंगळे, पंखावाले मुंगळे यांची एक दुनिया आहेच. काजवेही आपल्या सर्वांच्या पिढ्यांच्या वाट्याला आलेले. फ़क्त आपण उल्लेखलेल्या जळवांचा सहवास अजिबात नको. आपापल्या विभागानुसार त्याची प्रचलित वेगवेगळी नावं. आमच्याकडे जळू म्हणून एकदम फ़ेमस. नदीतून जातांना, मासे पकडणा-यांच्या वाटेला यांचा सहवास अनेकदा लाभलेला पाहिलेला आहे. एकदा की ती शरीराला चिकटली मग काढणे मुश्कील होऊन बसते. शरीरातील रक्त ओढत असते. शरीरातील दुषित रक्त काढण्यासाठी 'हिरुडा’ जातींच्या जळवांचा वापर केला जातो म्हणे, अर्थात ही सांगोवांगी माहिती. पण, हे जळवांचं प्रकरणही भयंकरच आहे. (छायाचित्र जालावरुन)

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

19 Jun 2021 - 6:14 pm | आग्या१९९०

शरीरातील अशुद्ध रक्त काढण्यासाठी पूर्वी न्हावी लोक जळवा लावायचे काम करत. अशुद्ध रक्त संपले की जळू आपोआप गळून पडायची. एखादी जळू तट्ट फुगायची अशा वेळेला न्हावी तिच्या तोंडावर तंबाखूचे पाणी सोडायचा,जळू पटकन गळून पडायाची.

कंजूस's picture

19 Jun 2021 - 7:06 pm | कंजूस

किडे पाचगणीला फार. झुडपात असतात. एखादा दिसलाच तर तो फादीच्या मागे फिरतो. टकटक टक. टकटक टक असा मोठा आवाज करतात. या पावसाळी दिवसांत यांच्या जोडीला बेडुक टराराव ट्राट्राट्रा .

अभिजीत अवलिया's picture

19 Jun 2021 - 7:38 pm | अभिजीत अवलिया

छान लेख.
लहानपणी चतुर आणि पैसा किड्याला मी प्रचंड त्रास दिलाय. खूप शिव्याशाप दिले असतील त्यांनी मला. चतुरच्या शेपटीला धागा बांधून त्यांना उडवायचो. काजव्यांना काडेपेडीत ठेवून तो नैसर्गिकरित्या मरण पावला की त्याची बॅटरी काढून घ्यायची असल्या कल्पनेने बरेच काजवे पकडायचो. 'बॅटरी' कधीच मिळाली नाही.
गेले काही महीने शेतघरात मुक्काम असल्याने प्रचंड वेगवेगळे किडे घरात आलेले पाहीलेत. मार्च ते मे हा उन्हाळ्याचा काळ म्हणजे किडेच किडे. एकदा तर घरात घुसलेल्या एका किड्याला रुमालात पकडून बाहेर टाकणार तेवढ्यात त्याने त्याची छुपी नांगी तळहातात घुसवली. दोन आठवडे तळहात ठणकत होता. पण आता वयानुरुप आलेल्या शहाणपणामुळे त्याचा जीव घेतला नाही.
झुरळ, गोम व डास सोडून अन्य कोणत्याही किड्याचा मी जीव घेत नाही. मुलांनाही घेऊ देत नाही.
कोकणातल्या माझ्या गावी जायचे म्हणजे प्रवासात येणारे दाजीपूरचे जंगल हे किड्यांची व फुलपाखरांची मंदियाळी. एकदा मध्यरात्री एकच्या सुमारास ह्या भागातून प्रवास करत असताना अक्षरश: झुंडीने फुलपाखरांनी व किड्यांनी गाडीच्या हेडलाईटवर धडक मारुन जिवन संपवलेले अनुभवले आहे.

बापूसाहेब's picture

20 Jun 2021 - 4:24 pm | बापूसाहेब

लेखन विषय आवडला.

लहानपणी खुप चतुर पकडलेत.. त्यांना दोरे बांधून उडवायचो. हल्ली चतुर शहरात सोडा.. गावी पण दिसतं नाहीत. त्यावेळी त्यांना चतुर, घोडा किंवा शेंबडी माशी म्हणायचो.

निळे, काळे, लाल शेपूट असणारे खुप चतुर सापडत होते. एक प्रकारच्या चतुर किड्यामध्ये त्याची शेपूट काळी आणि पिवळी पट्या पट्याची होती. तो चतुर सहसा कोणालाही सापडत नसे.

कोनाकृती खडयामध्ये राहणारा किडा ज्याचे खरे नाव माहिती नाही. ते देखिल खूप पकडले. त्यांना पकडणयासाठी एखादी मुंगी त्यांच्या घरट्यात सोडायची आणि मग पटकन त्याला पकडायचे.
कोणाकडे सगळ्यात मोठा किडा सापडतो याबाबत नेहमीच चढाओढ असायची.

फुलपाखरे तर खूप सापडायची. कित्येक रंगीबेरंगी फुलपाखरे पकडुन एखाद्या बॉक्स मधे ठेवायची.
लहानपणी एकदा मी जवळपास २ फूट लांब असणारे फुलपाखरू पकडले होते. पण नंतर भीती वाटल्याने सोडून दीले.

पैसा नावाचा एक आळी सारखा दिसणारा चॉकलेटी कलर चा किडा पावसाळा सुरू झाला की पाहायला मिळतो. लहानपणी अमाची अशी अंधश्रद्धा होती की त्या किड्याला मारल्यास खरोखरचा पैसा मिळतो. त्या नादात शेकडो हजारो पैसा किडे मारलेत.

आम्हीं मुल काजवे गोळा करून रात्री त्यांचा लाईट शो करायचो. पण आता काजवे पाहून जवळपास १५-२० वर्ष झालीत..

अजुन बरेच किडे आहेत ज्यांच्यासोबत खेळलो. त्याना मारले. कित्येकांना डब्यात बंद केले. कित्येकाना पाळीव प्राणी समजून पाळले.
आजकाल ची स्मार्टफोन मध्ये गेम खेळनारी, jr केजी, सीनिअर केजी, प्ले ग्रुप , मग शाळा आणि क्लास च्या फेऱ्यात अडकले ली मुल पाहिली की वाईट वाटत.

Bhakti's picture

20 Jun 2021 - 8:31 pm | Bhakti

वाह!
मस्तच लिहिलंय सगळ्यांनी आणि लहानपणीच्या करामती:)
प्रचिही छान आहेत.कीटकशास्त्र सोप्या भाषेत.
मी बालपणी मुंगळ्याचा जीव गेल्यावर रीतसर दफणविधी केला होता.त्यावर फुलं वाहिली होती.
लेडी बग नावाचा किडा मुलगी पाहत असलेल्या लेडी बग कार्टून मुळे समजलं.ती मला सतत आजूबाजूला असणारे किडे दाखवते त्यामुळे माझीही निरीक्षण शक्ती वाढत आहे.
काजव्यांचा आगपेटीत ठेवण्याचाही प्रकार केलाय,आता एकदा डोळेभरून काजव्यांच झाड पाहायचं आहे .
१
सूर्यफुलावर मधुघट भरतांना मधमाशी!

२
रंगीत फुलपाखरू!

कंजूस's picture

20 Jun 2021 - 8:41 pm | कंजूस

तर एखादा कलादालन धागा काढा किटकांच्या फोटोंचा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2021 - 10:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ग्रामीण भागातील सार्वजनिक वीजेच्या खांबाखाली हा मोठा किडा मी अनेकदा पाहिला. टपाटप पडतांना आणि वीजेच्या प्रकाशाभोवती भिरभिरतांना आणि दुस-या दिवशी कुठे तरी उलटे पालटे होऊन इहलोकाची यात्रा संपलेली असायची. हा किडाही फार दिवसात दिसला नाही. (छायाचित्र जालावरुन साभार)

विजुभाऊ's picture

22 Jun 2021 - 11:00 am | विजुभाऊ

मस्त लेख आहे मास्स्तर.
शीर्षकावरून अगोदर वाटले की तुम्ही खोडीलपणा केलात की काय.
अनेक कीटक आहेत.
एकदा सातारजवळच्या कण्हेर ला गेलो होतो. तेथल्या धरणाच्या रेस्टहाऊसवर मुक्काम होता. सरपटणारे आणि मागील बाजूने गाडीच्या हेडलँप प्रमाणे दिसावेत तसे पण हिरवा प्रकाश फेकणारे किडे पहिले.
त्य अनंतर तसले किडे कधीच दिसले नाहीत.

प्रचेतस's picture

22 Jun 2021 - 11:34 am | प्रचेतस

हे सरपटणारे किडे म्हणजे काजव्यांच्या अळ्या (larvae) असतात, ह्या अळ्या देखील प्रकाश फेकत असतात, पावसाळ्यात शक्यतो जंगलात दिसतात.

विजुभाऊ's picture

22 Jun 2021 - 8:12 pm | विजुभाऊ

बरोबर मी या पावसाळा संपता संपता नवरात्रात पाहिल्या होत्या.
मला अगोदर वाटले होते की नवीन कोणती किडे आहेत.
या अळ्या पुन्हा कधीच पहायला मिळाल्या नाहीत.
एका दुर्मीळ प्रजातीचा शोध लागला असे वाटत होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jun 2021 - 11:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डान्सर उर्फ तुडतुडा म्हणून हा किडा प्रसिद्ध आहे. हिरवाकच्च रंग असतो. गवतात आपल्या रंगामुळे गवताशी त्याचा रंग मॅच होऊन जातो. चुकून-माकुन कधी कधी आपल्या गवतांच्या लॉनवरही पोहचतो. हा किडा सतत आपलं अंग हलवत राहतो म्हणून त्याचं नाव डान्सर. त्या किड्याची मागे-पुढे अशी असं सारखी हलचल -तुडतुड सुरु असते. फार काळ स्थिर राहात नाही. प्रार्थना किडा म्हणूनही याला ओळखला जातो. गवतात रहिवास असल्यामुळे कधी कधी गाय-बैल अथवा कोणा प्राण्यांच्या पोटात हा किडा गेल्यास जणावरांचे पोट फुगते. प्रसंगी प्राण्यांच्या जीवावरही बेतल्या जाते म्हणे. तपशीलवार माहिती नाही. पण डान्सर म्हणून ओळख आहे. योगायोगाने काल भेट झाली. छायाचित्र आपलंच.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jun 2021 - 11:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाकतोड्याचा फोटोसाठी रुमाल टाकून ठेवतो.

-दिलीप बिरुटे

किल्लेदार's picture

26 Jun 2021 - 3:02 am | किल्लेदार

2021-06-25_05-27-41

2021-06-25_05-26-33

2021-06-25_05-25-38

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2021 - 5:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सगळेच भारी...अनुक्रमे लंबर दोनचं लैच आवडलं.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

26 Jun 2021 - 4:38 pm | Bhakti

3

सोत्रि's picture

27 Jun 2021 - 3:54 am | सोत्रि

चतुर पकडायला भिती वाटायची तेव्हा त्याची लहान आवृत्ती, सुई, पकडायचा सराव करून भिती घालवायची दिक्षा सिनीयर मित्रांकडून मिळीलेली. सरांमुळे त्या आठवणी ताज्या झाल्या!

सुई

Bhakti's picture

27 Jun 2021 - 10:50 pm | Bhakti

फळमाशी -ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर याची आठवण आज आली.जेनेटिक्सचे आमचे अख्खे स्पाटिंगचे मार्क याच्या डोळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारावर अवलंबून असायचे.
मॉर्गन यांना यांच्या गुणसूत्र अभ्यासासाठी नोबेल मिळाला होता.
:)
फोटो जालाहून.

2

किसन शिंदे's picture

28 Jun 2021 - 3:36 pm | किसन शिंदे

.

गेल्या आठवड्यात हा किडा पाहायला मिळाला. त्याच्या पाठीवर मानवी चेहर्‍यासारखा आकार दिसतोय.

तुषार काळभोर's picture

28 Jun 2021 - 4:03 pm | तुषार काळभोर

गुरू चेला नावाची एक गोड सुपारी/बडीशेप मिळायची. त्याच्या पुडीवर असाच एक चेहरा असायचा.
w

गॉडजिला's picture

28 Jun 2021 - 7:11 pm | गॉडजिला

हे उलटा पुलटा चित्र एकदम भारी आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2021 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कीड़ा भारीय. किड्याची तोंंड़ाकडील बाजू खाली असल्यामुळे त्याचं मानवीय रूप एकदम जबरा आलेय.मजा आली.

-दिलीप बिरुटे

अनिंद्य's picture

28 Jun 2021 - 10:44 pm | अनिंद्य

अरे वा, वेगळाच विषय - धागा, प्रतिसाद दोन्ही उत्तम.

पावसाळ्यात हमखास दिसणाऱ्या 'हेलिकॉप्टर' किड्यांचे फोटो कोणी नाही काढले का ?

प्रार्थना करणारे मंटिस
Praying mantis हे दिसण शुभ असते म्हणे! फोटो ऐवजी व्हिडिओ काढायला पाहिजे होता.खरच आपलं भक्ष्य सोडून दोन सेकंद माझ्याकडे पाहत होता :)पाळीव किटक आहे म्हणे !OMG!!1