वसंतोत्सव साजरा.

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
14 May 2021 - 3:36 pm

गुढी पाडवा या सणाच चैतन्य म्हणजे वसंताने नटलेली सृष्टी! इवल्या इवल्या पोपटी,गुलाबीसर रंगांची चैत्र पालवी झाडांनी अंगा खांद्यांवर पांघरलेली.गुलमोहर,बहवाचे,पळसाचे लाल ,पिवळे ,केशरी असे नानविध रंगीबेरंगी तोरण बांधलेली सृष्टी !उन्हाची दार सूर्याने अर्धवट उघडली असल्याने वसंताची मंद झुळूक अनुभवता येते कारण नंतर सूर्याची ही पूर्ण उघडलेली कवाड ग्रीष्मात सृष्टीला तप्त करणार.
एरवी दुर्लक्षित असणारे कडुलिंबाची फुले वापरून बनविलेला कडू प्रसाद हा आरोग्य संवर्धन करणाऱ्या अशा अनेक वनस्पती बहारलेल्या आहेत याकडे लक्षकेंद्रित वेधतात.म्हणूनच बारीकशा लिंबाच्या फुलांनी,डहाळ्याने ती गुढी अतीमोहक भासते.
वसंतोत्सवात निसर्गाची मुक्त पाखरे कोकिळाबाई आपल्या मधुर कुंजनाने आसमंत मधुर करत असतांना आंब्याचा मधुर सुवास गात्रांना वसंताच्या प्रेमात आणखिनच भिजवतात.परिपक्व होत जाणाऱ्या वसंतात याच आंब्याच्या रसाने मानवाची रसना तृप्तता अनुभवणार असते.प्रेमाचा वसंत सर्व प्राणीमात्रात मिलनोत्सुक असतो.

चित्रा नक्षत्रात चै.शु. तृतीयेला माहेरी, चैत्र गौरीचे आगमन थाटात होते.ही चैत्रगौरी म्हणजे पार्वतीचे, पतिव्रतेचे रूप मानले जाते .पती शंकरासमवेत ती कैलासाहून माहेरी आली असून तिला शंकरासह लाकडी,पितळी, किंवा चांदीच्या पाळण्यात बसवून झुला झुलवून कौतुक केले जाते.महाराष्ट्रात काही ठिकाणी अन्नपुर्णेलाच चैत्रगौरीचा मान दिला गेला असून तिची स्थापना होते.वसंतात बहरलेल्या अनेक फुलांनी विशेषतः मोगऱ्याच्या ,चाफ्याच्या फुलांच्या माळांनी हा झुला रोज सजवताना ,मखमाली अत्तराने शरीर सुगंधित होऊन वसंत मनात फुलत ,बहरत नाचत असतो.
devi
मग हा वसंतोत्सव हळदी कुंकवाच्या दिवशी घरी सौदर्यपूर्ण अवतरतो.दारापुढे चैत्रातली विशेष रांगोळी ‘चैत्रांगण‘ रेखाटली जाते.मध्यभागी शिव-पार्वती झोपाळ्यावर बसले असून अवती भवती पवित्र आयुधे,शुभ चिन्हे,शुभ देवता रांगोळीने रेखाटून वसंतद्वार सजते.
chaitrangan
गौरीला अलंकाराने ,वस्त्राने सजवून तिच्याभोवती कल्पकता सादरीकाराणाची चढाओढच!आरासात फुलांच्या आकारात मांडलेली रसदार व पाणीदार फळांची मेजवानी निसर्गाने कशी चपखल मांडली आहे,टरबूज खरबूज हे जास्तीत जास्त पाण्याची मात्रा असणारी फळे,त्यांच्या सेवनाने शरीरातील पाण्याची मात्रा उष्णतेत स्थिर राखण्यास मदत होते.वसंतातील राजा आंब्याचे कैरी रूप आणि तीच गुळाबरोबर तयार पन्ह किंवा कोकम सरबत शरीराला उष्मापासून थंड ठेवते.कैरीची डाळ ,मोड आलेल्या हरभऱ्याची डाळ जीवनसत्वांची भरघोस मात्रा देतात.आलेल्यांचे स्वागत करतांना चंदनाचा लेप हाताला लावून त्यावर शिरा रेघाटताना चंदनसा बदन हे गाण मनात रुंजि घेत राहते.
aaras
चैत्रातली नवमी रामनवमीला प्रसाद देखील चण्याची उसळ असते,वसंतात रानमेव्यातील रानातल्या,शेतातल्या डाळीने भांडार भरतात.वसंतातल्या जत्रा यात्रा एकत्रित वसंतोत्सव साजरा करण्याचा मुहूर्तच !.
हळू हळू हा वसंत वैशाखात झुकतो तेव्हा फुलांचे रंग आता पांढरट होत शेंगा फुटू लागतील. उन्ह थोडेसे अधिक चटका द्यायाला सुरुनात करतात ,आंब्याच्या रसाचे मारलेले फुरर्के वसंत हाच ऋतुराज आहे हे वदवून घेईल. कोणच्याही हृदयात स्थान मिळवायचा मार्ग पोटातून जातो हे वसंत ऋतूला ठाऊक असेल म्हणूनच त्याने आंब्याचा मोसम स्वत:कडे राहून ठेवला असणार.
घरातला आणि हृदयातला वसंत असाच फुलत रहावा.
-भक्ती

जीवनमान

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

14 May 2021 - 4:20 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.
वाल्मिकीरामायणात किष्किंधाकांडातील पहिल्याच अध्यायात वसंत ऋतूचे अप्रतिम वर्णन आले आहे.

मुक्त विहारि's picture

14 May 2021 - 5:15 pm | मुक्त विहारि

आवडले

धन्यवाद प्रचेतस आणि मुवि .
वाल्मिकीरामायणात किष्किंधाकांडातील पहिल्याच अध्यायात वसंत ऋतूचे अप्रतिम वर्णन आले आहे.

वाचायला पाहिजे.मला ऋतु म्हणलं की दुर्गा भागवत यांच्या ऋतुचक्र आठवत.मला माहिती मिळाली आहे की विश्वास वसेकर यांचं नवीन ऋतु बरवा हे पुस्तक यात अजून सध्याच्या ऋतुचक्रची रसाळ वर्णने आहेत.
एक नमुना -जुलै
https://weeklysadhana.in/view_article/vishwas-vasekar-nave-rutuchakra-Jul

कंजूस's picture

15 May 2021 - 5:35 am | कंजूस

मला प्रसादातले खाऊ दिसत आहेत.

Bhakti's picture

15 May 2021 - 10:03 am | Bhakti

मिनी फराळ!

चांदणे संदीप's picture

15 May 2021 - 1:07 pm | चांदणे संदीप

आवडला. मला याकाळात गुलमोहोर पाहायला खूप आवडतो. सोबतीला बहावा असेल तर कातीलच! नुकतेच गुलमोहोराबरोबर दुसर्‍या एका जांभळ्या अनामिक फुलांची जुगलबंदी फारच आवडून गेली होती. फोटो देत आहे.
1

सं - दी - प

गॉडजिला's picture

15 May 2021 - 2:38 pm | गॉडजिला

काही जुन्या आठवणींची किमया...

सुंदर गुलमोहर आणि परपल फुलं.