वॉटरगेट (भाग १)
______________________________________________________________________________
वॉटरगेट दरोडा प्रकरणात पकडलेल्या ५ जणांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यांची तपासणी करताना त्यांच्याकडे २,३०० डॉलर्स, प्लॅस्टिकचे हातमोजे, घरफोडीची हत्यारे, वॉकीटॉकी, पोलिसांचे संभाषण ऐकण्यासाठी रेडिओ स्कॅनर, कॅमरा, फोटो काढण्याचे ४० रोल्स याबरोबरीने अश्रूधूर सोडणारी छोटी बंदूक व इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे सापडली. ही उपकरणे ते डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयात लपवून ठेवणार होते. त्याच बरोबरीने एक डायरी सुद्धा होती ज्यात व्हाईट हाउसचा एक अधिकारी होवार्ड हंटचा दूरभाष क्रमांक लिहिलेला होता.
या ५ जणात एक जण होता जेम्स मॅकॉर्ड (जयुनिअर) जो पूर्वी सीआयए मध्ये काम करीत होता आणि निक्सनच्या पुनर्निवडीसाठी स्थापण्यात आलेल्या Nixon's Committee to Re-Elect the President (CREEP) चा सदस्य होता.
दुसर्या दिवशी या ५ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी वॉशिंग्टन पोस्टचा पत्रकार बॉब वूडवर्ड सुद्धा न्यायालयीन कामकाजाचे वार्तांकन करण्यासाठी न्यायालयात उपस्थित होता. पैसा हाच या दरोड्यामागील उद्देश असावा अशी सर्वांचीच समजूत होती. तुमचा व्यवसाय काय असे न्यायाधिशांनी सर्वांना विचारल्यानंतर, मी पूर्वी सीआयए अधिकारी होतो असे जेम्स मॅकॉर्डने अभिमानाने सांगितले. हे ऐकल्यानंतर वूडवर्ड एकदम दचकला. हा साधा दरोडा नसून काहीतरी वेगळाच प्रकार असे त्याला वाटायला लागले. सुरूवातीच्या प्रश्नोत्तरात जी माहिती मिळाली त्यामुळे एक अस्पष्ट चित्र व त्याचे एकसंध नसलेले तुकडे त्याच्या मनात जमा होऊ लागले.
रिचर्ड निक्सन
१९५२ मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे आयसेनहॉवर राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आले होते. त्यांनी उपाध्यक्ष म्हणून रिचर्ड निक्सन यांची निवड केली होती. आयसेनहॉवर १९६१ पर्यंत राष्ट्राध्यक्ष होते व निक्सन याच काळात उपाध्यक्ष होते.
१९६० मध्ये निक्सन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक लढविली होती. परंतु जॉन केनेडींच्या लोकप्रियतेसमोर त्यांचा निभाव लागला नाही व पराभव झाला. १९६४ मधील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक ते लढले नाहीत. परंतु १९६८ मध्ये तत्कालीन उपाध्यक्ष ह्युबर्ट हम्फ्रेंचा पराभव करून ते राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आले.
१९४५ मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी निक्सन प्रथम सिनेटचे सदस्य झाले. ते तेव्हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात तरूण सिनेट सदस्य होते. ते आपल्या कट्टर साम्यवादविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. १९६० मध्ये निक्सन यांनी पहिल्यांदा जॉन केनेडींविरूद्ध अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढविली. परंतु त्यात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. १९६२ मध्ये त्यांचा कॅलिफोर्निया राज्यपालपदाच्या निवडणुकीतही पराभव झाला. परंतु १९६८ मध्ये त्यांनी दुसर्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढविली व चुरशीच्या लढतीत ते अगदी थोड्या फरकाने विजयी झाले.
आपल्या कारकीर्दीत त्यांनी व्हिएतनाम बरोबरील युद्ध थांबविणे व चीनशी संबध सुरळीत करणे याला प्राधान्य दिले. १९७२ मध्ये मॉस्कोला भेट देऊन द्विपक्षीय संबंध सुधारणे व शस्त्रे कमी करणे यासाठी रशियाबरोबर महत्त्वपूर्ण करार केले.
१९७२ मध्ये पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी त्यांनी Committee to Re-Elect the President (CREEP) या नावाची एक समिती स्थापन केली होती जिचे काम होते विरोधकांवर व त्यांच्या कुटुंबियांवर गुपचुप पाळत ठेवणे, त्यांचे दूरभाष संभाषण चोरून ऐकून ते ध्वनीमुद्रित करणे, खोटी कागदपत्रे बनविणे, या सर्व बेकायदेशीर गोष्टींसाठी सरकारी यंत्रणा वापरणे, विरोधकांवर मात करण्यासाठी Slush Money व Hush Money अशा संद्येने ओळखला जाणारा बेहिशेबी पैसा वापरणे, विरोधकांच्या नावाने अफवा पसरवून त्यांची बदनामी करणे व काहीही करून दुसऱ्यांदा निवडणुक जिंकणे. अमेरिकेचे माजी अॅटर्नी जनरल जॉन मिचेल हे या समितीचे प्रमुख होते.
त्यांच्या काळात सीआयए, एफबीआय अशा सरकारी तपासयंत्रणांना सुद्धा Rat Fucking म्हणजे Dirty Tricks साठी वापरले गेले.
१९७२ मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षांतर्गत निवडणुकीत एडमंड मस्की हे अत्यंत तगडे उमेदवार प्राथमिक फेरीत आघाडीवर होते. त्यांना फ्रेंच कॅनडियन वंशाच्या लोकांबद्दल राग आहे व त्यांनी स्वत:च असे आपल्याला सांगितले असा दावा करणारे पत्र (हे पत्र Cannuck letter या नावाने प्रसिद्ध आहे) एका मोठ्या वॄत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांची प्रतिमा खूप डागाळली व त्यामुळे त्यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. नंतर या प्रकरणाचा FBI कडून तपास झाला व हे पत्र बनावट असून ते CREEP या निक्सनना मदत करणार्या समितीनेच बनविले होते हे तपासांती आढळले. परिणामी डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांच्या जागी जॉर्ज मॅकगव्हर्न या तुलनेने दुर्बल उमेदवाराला उमेदवारी दिली. हे फारसे लोकप्रिय नव्हते. त्यामुळे १९७२ मध्ये निक्सन दुसर्यांदा अगदी सहज विक्रमी मतांनी निवडून आले. त्या निवडणुकीत निक्सनना एकूण ५३७ इलेक्टोरल मतांपैकी तब्बल ५२० मते मिळाली होती. ५० पैकी ४९ राज्यात त्यांना बहुमत मिळाले होते व एकूण मतांपैकी ६०.७ % मते त्यांना मिळाली होती. मॅकगव्हर्नना फक्त District Of Columbia व Massachusett ही दोनच राज्ये जिंकता आली होती. निक्सनचा विजय हा अमेरिकेच्या इतिहासातील विक्रम होता व तो अजूनही अबाधित आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात वॉटरगेट प्रकरण उघडकीस येऊनही व त्यात निक्सनचा हात असल्याची चर्चा होत असूनही त्यांना हा प्रचंड विजय मिळाला होता.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या ५ महिने आधी वॉटरगेट कॉम्प्लेक्समधील डेमोक्रॅटिक पक्षच्या मुख्य कार्यालयात गुपचुप चोरून ऐकणारे बग्ज बसविणे व तेथील कागदपत्रांच्या गुपचुप नकला करून घेण्याची योजना सुद्धा CREEP नेच बनविली होती. डेमो़क्रॅटिक पक्षाची निवडणुक योजना आधीच गुपचुप समजून घेणे यासाठीच ही योजना बनविली गेली होती. या ५ जणातील ४ जण पूर्वी CIA साठी काम करीत होते.
एक सर्वसामान्य चोरी अशा तर्हेनेच या प्रकरणाकडे प्रारंभी पाहिले जात होते. परंतु बॉब वूडवर्डच्या मनात शंका येऊ लागल्या होत्या. त्या शंकांची उत्तरे त्याला सापडत नव्हती. या ५ चोरांना कोणी वकील दिले, वकीलाला पैसे कोण देणार आहे असे काही प्रश्न त्याच्या मनात घोळत होते. त्याने त्या वकीलालाही विचारून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु समाधानकारक माहिती मिळली नाही. एफबीआय ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत होती त्याविषयी सुद्धा त्याच्या मनात संशय होता.
(क्रमशः)
_________________________________________________________________________________________
CREEP (Nixon's Committee to Re-Elect the President) - निक्सनच्या पुनर्निवडीसाठी स्थापण्यात आलेली समिती
प्रतिक्रिया
11 May 2021 - 8:27 pm | शाम भागवत
छान चाललीये मालिका.
11 May 2021 - 8:37 pm | कॉमी
छान. रोचक आहे मालिका...
(आगाऊ सूचना- वूडवर्डचं नाव पुढे सुद्धा येणार असेल तर वुडवर्ड्स मधलं 'स' नको.)
11 May 2021 - 10:05 pm | श्रीगुरुजी
वुडवर्ड हा या प्रकरणातील ३ नायकांपैकी एक नायक आहे. त्याचे नाव पुढे अनेकदा येणार आहे. पुढील भागापासून वुडवर्ड असे लिहितो.
11 May 2021 - 9:18 pm | कुमार१
रोचक आहे मालिका.
11 May 2021 - 9:36 pm | चंद्रसूर्यकुमार
छान लेखमाला.
काही सुधारणा सुचवितो. इतक्या चांगल्या लेखमालेला बारीकसारीक त्रुटींचेही गालबोट नको.
पॉप्युलर व्होटमध्ये १९६० ची निवडणुक तोपर्यंत २० व्या शतकातील सर्वात निसटती अध्यक्षीय निवडणुक होती. केनेडींना निक्सनपेक्षा अवघी ०.१७% मते जास्त मिळाली होती. पण इलेक्टोरल व्होटमध्ये केनेडींनी ३०३ मते मिळवली.
केनेडी जिंकले त्यात टेक्सस आणि इलिनॉय या राज्यांमध्ये त्यांना मिळालेला विजय महत्वाचा ठरला. इलिनॉयमध्ये केनेडी अगदी ०.२% ने जिंकले. या दोन राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान झाले. आणि त्यापैकी बहुसंख्य मते केनेडींना मिळाली होती. या राज्यांमधील निकालांना आव्हान द्यावे असे निक्सन यांच्या प्रचाराच्या टिममधील सहकाऱ्यांचे म्हणणे होते. पण निक्सन यांनी तसे करायला नकार दिला.
याविषयी नंतर वाचले त्यावरून कळले की केनेडींचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार (जे केनेडींच्या हत्येनंतर पुढे अध्यक्ष झाले) लिंडन बी जॉन्सन हे टेक्ससचे पॉवरफुल सिनेटर होते. Can we connect the dots? तसेच इलिनॉयमध्ये शिकागो शहर आणि शेजारच्या कुक काऊंटीमध्ये केनेडींना भरपूर आघाडी मिळाली तर राज्याच्या जवळपास इतर सगळ्या भागातून निक्सन यांना आघाडी मिळाली. पण शिकागो शहरातून केनेडींना आघाडी मिळाल्याने केनेडी इलिनॉय जिंकले. आणि त्यावेळी शिकागोचे महापौर होते डेमॉक्रॅटिक strongman रिचर्ड डॅली. अर्थात ते एक कारण निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाले हे सिध्द करायला पुरेसे नाही. पण झाले असे की स्वत: रिचर्ड निक्सन या निवडणुकांच्या निकालांना आव्हान द्यायच्या मनस्थितीत नसले तरी त्यांच्या सहकाऱ्यांनी ते दिले. त्यातून कोर्टाने हवाई राज्यातील निकाल फिरवले आणि ते राज्य निवडणुक झाल्यानंतर सहा-आठ महिन्यांनी केनेडींकडून काढून रिचर्ड निक्सनना दिले. तसेच शिकागोमधील तीन निवडणुक कर्मचाऱ्यांना निवडणुकीत गैरव्यवहार केले म्हणून तुरूंगवासाची शिक्षा झाली होती. तसेच शिकागो शहर आणि शेजारच्या कुक काऊंटीच्या काही भागांमध्ये केनेडींना ९०% मते मिळाली होती. एखादा नेता कितीही लोकप्रिय असला तरी एकदम ९०% मते मिळणे आणि इतर गोष्टी (मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान होणे, नेमके लिंडन जॉन्सन यांच्या राज्यात आणि रिचर्ड डॅली यांच्या शहरातच तसे होणे वगैरे) लक्षात घेतल्या तर काहीतरी काळेबेरे होते हे म्हणायला नक्कीच वाव आहे. अमेरिकेत Conservative Rightist movement होती त्याचे आधारस्तंभ सिनेटर बॅरी गोल्डवॉटर (जे पुढे १९६४ मध्ये लिंडन जॉन्सन यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभूत झाले) यांनी पण केनेडी फ्रॉड करून जिंकले असे जाहीरपणे म्हटले होते.
हो. १९६८ मध्ये निक्सन यांनी उपाध्यक्ष ह्युबर्ट हम्फ्रे यांचा पॉप्युलर व्होटमध्ये ०.७% मतांनी पराभव केला. इलेक्टोरल कॉलेजमध्ये मात्र ३०१ मते मिळवून आरामात विजय मिळवला. त्यापूर्वीचे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी कृष्णवर्णीयांना मताधिकार दिला आणि गोर्या-कृष्णवर्णीयांच्या वेगळ्या शाळा हा प्रकार बंद केला. त्यामुळे अलाबामा आणि आजूबाजूच्या पाच राज्यांमध्ये त्याविरूध्द प्रतिक्रिया उमटली. या राज्यांमध्ये वर्णद्वेष अधिक प्रखर होता. त्यातून डेमॉक्रॅटिक पक्षात फूट पडली आणि अलाबामाचे माजी (आणि भावी) गव्हर्नर जॉर्ज वॉलेस यांनी तिसरा उमेदवार म्हणून निवडणुक लढवली. त्यामुळे अलाबामा, लुईझियाना वगैरे राज्यांमधून निक्सनना विजय मिळाला. अन्यथा १९६८ मध्येही निक्सनना व्हाईट हाऊस गाठणे कठीण झाले असते.
हो. १९७२ नंतर कोणाही उमेदवाराला ६०% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. पण इलेक्टोरल कॉलेजमध्ये १९८४ मध्ये रॉनाल्ड रेगनना ५२५ मते होती. त्यांनीही ५० पैकी ४९ राज्ये जिंकली होती.
जर निक्सनना इतका प्रचंड मोठा विजय मिळाला तर त्याची काही चिन्हे त्यांना सहा महिने आधी कळली नसतील? तसे होणे थोडे कठीण आहे. तेव्हा अशा लांड्यालबाड्या करायची खरं तर गरज नसावी. तसे न करताही ते आरामात जिंकू शकत होते. पण निक्सनना ५० पैकी ५० राज्ये जिंकायची महत्वाकांक्षा होती त्यामुळे असे काही करायची दुर्बुध्दी त्यांना झाली. हा मुद्दा मी नंतरच्या भागात आणणार होतो पण या भागातच आकड्यांचा उल्लेख असल्याने या भागावरील प्रतिसादातच हे लिहिले.
11 May 2021 - 10:03 pm | तुषार काळभोर
भिती? हाव? मूर्खपणा? किंवा सगळेच!
11 May 2021 - 10:17 pm | श्रीगुरुजी
धन्यवाद!
इलेक्टोरल मते आणि प्रत्यक्ष मते यातील फरक बर्याचदा विसरला जातो.
निक्सनच्या पहिली टेर्म संपत असताना अमेरिकेत व्हिएटनाम युद्ध विरोध वाढत चालला होता. आपल्या दुसर्या निवडणुकीवर त्याचा परीणाम होईल असे निक्सनना वाटत असावे. त्यातूनच वॉटरगेट प्रकरणाला त्यांनी मान्यता दिली असावी. एडमंड मस्की या तुलनेने तगड्या प्रतिस्पर्ध्याला खोटे पत्र प्रसिद्ध करून स्पर्धेतून बाहेर काढणे हे सुद्धा त्यांच्या मनातील असुरक्षितता दर्शविते. मुळात या योजनेचा मास्टरमाईंड कट्टर उजव्या, हुकुमशाही विचारांचा होता. त्याच्याविषयी एक संपूर्ण भाग येणार आहे. कदाचित मनातील असुरक्षिततेमुळे निक्सनने त्याच्या या कारस्थानाला मान्यता दिली असावी.
11 May 2021 - 9:50 pm | तुषार काळभोर
रोचक मालिका आहे.
11 May 2021 - 10:42 pm | नावातकायआहे
+३
11 May 2021 - 9:59 pm | Bhakti
+१
11 May 2021 - 11:00 pm | खेडूत
वाचतो आहे..एकुणात या निवडणुका आणि राजकारण नव्याने समजत आहे.
( भागाच्या शेवटी संदर्भ वाचनाचे दुवे दिलेत तर अजून सविस्तर वाचून बारकावे समजणे सोपे जाईल.)
11 May 2021 - 11:07 pm | श्रीगुरुजी
सर्व संदर्भाचे दुवे सर्वात शेवटच्या भागात देणार आहे.
12 May 2021 - 10:39 am | मोहन
रोचक मालिका. अमेरिकेतले निवडणूक गैरव्यवहार वाचून गंमत वाटली. त्यामानाने भारताचा निवडणूक आयोग अभिनंदनास पात्र आहे .
12 May 2021 - 11:04 am | चौथा कोनाडा
हा ही लेख भारी !
मस्त चालली आहे मलिका.
पुभाप्र !
12 May 2021 - 11:11 am | वामन देशमुख
माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक अशी ही लेखमाला वाचतो आहे.
वॉटरगेट प्रकरण हे जगभरातल्या राजकीय भानगडींमधले कदाचित सर्वाधिक चर्चिले गेलेले प्रकरण असावे. अर्थात त्याहून अधिक व्याप्तीची अनेक प्रकरणे आहेतच.
12 May 2021 - 11:23 am | सुबोध खरे
माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक अशी ही लेखमाला
+१००
12 May 2021 - 6:38 pm | चौकटराजा
भारत देशात एक फक्त शैली आहे ती अशी की विरोधी पक्षानी सत्ताधारी पक्षाला शह म्हणून काहीतरी इन्क्वायरी ची मागणी करायची ,जरासे रान पेटवायचे मग एखादा राजीनामा येतो त्यातून राजकीय करियर संपते . त्याने ज्याचे करियर सम्पते त्याच्या पक्षातील काहीना आनन्दच होतो . पण कोणताही राजकीय व्यक्ती निर्णायक लढाई खेळत नाही. आता तपशील आठवत नाही पण अन्तुले केस मात्र मृणाल गोरे यानी निकालपर्यन्त लावून धरली. सुरेश कलमाडी , शीला दीक्शित, खडसे या प्रकरणात ते दोषी की निर्दोष हे जनतेला आज पर्यन्त कळालेले नाही !
12 May 2021 - 7:10 pm | मुक्त विहारि
सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद
13 May 2021 - 12:51 am | कपिलमुनी
बेकायदेशीर गोष्टींसाठी सरकारी यंत्रणा वापरणे, विरोधकांवर मात करण्यासाठी Slush Money व Hush Money अशा संद्येने ओळखला जाणारा बेहिशेबी पैसा वापरणे, विरोधकांच्या नावाने अफवा पसरवून त्यांची बदनामी करणे व काहीही करून दुसऱ्यांदा निवडणुक जिंकणे.