चादर ट्रेक - १

जगप्रवासी's picture
जगप्रवासी in भटकंती
17 Apr 2021 - 5:14 pm

नेरक धबधबा

येतोस का चादरला ? इति शार्दूल दादा.
हो - दुसऱ्याच क्षणाला माझं तत्परतेने उत्तर.
पण जागा आहेत का? सगळ्या बुक झाल्या होत्या ना - परत मी
एक गळालाय, तू येतोस का ते सांग, नाहीतर दुसऱ्याला विचारतो - चिडलेला शार्दूल
मी येतोय, दुसऱ्या कोणाला विचारू नकोस - अतिउत्साहीत मी.

चादर ट्रेकला जायला होकार तर दिला पण त्यासाठी लागणारे पैसे, हापिसातून सुट्ट्या आणि सगळ्यात महत्वाचं गृह मंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार होती. नंतर बघू, असं म्हणून मनातल्या मनात स्वप्न रंगवायला लागलो. चादर ट्रेक - ३ वर्षांपूर्वी एका मित्राच्या गप्पातून या ट्रेकची माहिती कळली तेव्हापासूनच माझ्या बकेट लिस्ट मध्ये सामील झाला होता. कितीतरी वेळा आंतरजालावर चित्र पाहिले होते पण आता प्रत्यक्षात ते अनुभवण्याचा क्षण येणार होता.

चादर ट्रेकबद्दल थोडंसं. आंतरजालावर चादर ट्रेक बद्दल व्हिडीओ आणि माहिती बरीच आहे पण थोडक्यात सांगतो. भारतातल्या सगळ्यात कठीण समजल्या जाणाऱ्या काही ट्रेक पैकी एक आहे हा चादर ट्रेक. भारताच्या लडाख भागातील सिंधू नदीची उपनदी असलेली झंस्कार नदी ही तिथे असलेल्या अति शीत तापमानामुळे गोठते आणि पाण्याचा वरचा थर गोठून त्याची एक चादर तयार होते जी किमान ३ फूट ते काही ठिकाणी १२ फूट देखील असू शकते, त्या बर्फाच्या चादरीवरून आपण ५५ किलोमीटर चालत जायचं अशी ट्रेकची साधारण रूपरेखा. टिलडो पर्यंत रस्ता होण्याआधी हा ट्रेक ९० किमी चा होता पण रस्ता बनवल्यामुळे बर्फाची चादर आता नीट बनत नसल्यामुळे हा ट्रेक टिलडो पासून ठरवला गेला. बीआरओ आता निम्मू पर्यंत रस्ता बनवत आहे त्यामुळे काही वर्षांनी हा ट्रेक अजून कमी किमीचा होण्याची शक्यता आहे. झंस्कार नदीच्या दऱ्यांची खोली ६०० मीटर आहे परंतु नदीच्या पात्राची रुंदी हि जास्त नसल्यामुळे सूर्यकिरणे खालपर्यंत पोहोचत नसल्यामुळे तापमान नेहमीच कमी असते. हिमालयातील अत्यंत कठीण अश्या अतिशीत हिवाळी वातावरणात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील चादर ट्रेक म्हणजे प्रतिकूल निसर्गाचा अविस्मरणीय आविष्कारच. डिसेंबर शेवट ते फेब्रुवारी हा चादर ट्रेकचा उत्तम काळ. आणि कालावधी लडाखची चादर ट्रेक संस्था जी सरकारच्या अखत्यारीत येत ती ठरवते. बर्फाची चादर व्यवस्थित झाली आहे की अजून कमी जाड आहे हे पडताळून पाहिल्यावर हिरवा सिग्नल दिला जातो. लेह पासून " टिलडो” या ट्रेकच्या सुरुवातीच्या बेस कॅम्प पर्यंत गाडीने जावं लागत जे अंतर लेह पासून साधारण ६५ किलोमीटर आहे आणि ते १०३९० फूट उंचावर आहे. नंतर सुरु होतो पायी प्रवास जो लोअर शिंगरा कोमा, अपर शिंगरा कोमा (१०५५० फूट), टीब्ब केव्ह (१०७६० फूट) असे करत नेरक (११,१५० फूट) या जागी जाऊन संपतो. तिथे अतिसुंदर असा गोठलेला धबधबा आहे. चादर बद्दल माहितीचा दुवा - Chadar trek - Wikipedia

चादर ट्रेकला जितका खर्च येईल तितका माझ्या खात्यात जमा झाला पाहिजे या बोलीवर गृह मंत्र्यांकडून परवानगी मिळाली. चला एक गड सर झाला. हापिसात १० दिवसांच्या सुट्ट्या सांगून ठेवल्या. आता वेळ होती या अवघड देहाला ट्रेक साठी तयार करायची. सह्याद्रीची सवय होती पण आता हिमालयाशी गाठ होती. “ट्रेक दि हिमालयाज” या संस्थेच्या साईटवरून कठीण पातळी असलेल्या ट्रेकसाठी स्टॅमिना वाढवण्यासाठीचा व्यायामाची माहिती घेतली आणि त्यानुसार चालणे, सूर्यनमस्कार, बैठका सुरु केल्या. एका मित्राच्या साहाय्याने विमानाच्या सीट बुक केल्या, माझ्या आधी तिकिटे बुक केलेल्या शार्दूल ला बऱ्याच कमी किमतीत मिळाल्या पण त्यामुळे लडाखवरून येताना त्याला बराच मनस्ताप सहन करावा लागला जो पुढे सांगेनच. हिमालयात पहिल्यांदाच जात असल्यामुळे काय घ्यावं आणि काय नाही हे माहित नसल्यामुळे नेटवरून माहिती शोधणं सुरु झालं. डिकॅथलॉनला जाऊन गरजेच्या वस्तूंची खरेदी केली आणि आर्थिक भार कमी करण्यासाठी काही गोष्टी गोराईच्या नंदूकडून भाड्याने घेण्याचं ठरलं आणि जाण्याच्या आदल्या आठवड्यात जाऊन घेऊन आलो. सुका खाऊ बराच घेतला जेणेकरून पोटाला त्रास न होता कमी खाण्यात जास्त एनर्जी मिळू शकेल.

सामान
सामान

चादर ट्रेक साठी तयारी म्हणून जानेवारी महिन्यात राजगडला जाऊन आलो. नियमित व्यायामामुळे, चालण्यामुळे खूप फायदा झाला. वजन कमी झालं नसलं तरी स्टॅमिना वाढून दमछाक कमी झाली त्यामुळे आत्मविश्वास चांगलाच दुणावला. जसजसा प्रस्थानाचा दिवस जवळ येत होता तसतसं पोटात गुदगुल्या होत होत्या.

पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे चिंता होतीच पण त्यापेक्षा कितीतरी पटीने उत्सुकता होती. तसेच लेकीला सोडून इतके दिवस राहिलेलो नसल्यामुळे उदास देखील वाटत होते, अगदी मिश्र अशा भावना होत्या. बोर्डिंग पास घेताना काउंटर वर खिडकीजवळची सीट असेल तर द्या असं विचारलं पण नशीब खराब त्यामुळे आहे त्याच सीटवर समाधान मानावं लागलं. १५ जानेवारी २०२० ला मुंबईहून दिल्लीसाठी प्रयाण केले. दिल्ली येथील तापमान देखील माझ्या सारख्या मुंबईत राहणाऱ्या माणसाला न मानवणारे, दिल्लीला उतरलो तापमान ७ डिग्री से. (अजून पण प्लस मधेच होतो ) यावरूनच लेह येथे माझ्या पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज आलाच होता. पूर्ण रात्र दिल्लीच्या विमानतळावर काढून सकाळी ६ ला दिल्लीहून लेहला जाणाऱ्या विमानात बसलो. सकाळी लेह येथे विमानाचे आगमन होतानाच हिमशिखरे खुणावत होती. हिवाळ्यातील हिमशिखरांचे सौन्दर्य काही न्यारेच. विमानातून बाहेर येताच सामना होता उणे तापमानाशी. उतरताच असा काही झटका होता तो कि काही क्षणांत ब्रह्माण्ड काय असते ते आठवले. म्हणतात ना "All Best Things are Wild" तसंच काहीतरी. लेह विमानतळ, अत्यंत टुमदार देखणे, लडाखी संस्कृतीला साजेसे "कुषोक बकुळा रिम्पोचे" विमानतळ, भारतीय सैन्याच्या देखरेखीखाली असलेले विमानतळ.

कुषोक बकुळा रिम्पो
कुषोक बकुळा रिम्पोचे यांचा विमानतळावर असलेला फोटो

जगप्रवासी

क्रमशः
तळटीप : हा धागा ट्रेकची सुरुवात आणि माझ्या लेखनाची बऱ्याच अवधीनंतर सुरुवात असल्यामुळे त्रोटक आहे, पुढचे भाग बऱ्याच फोटो सकट असतील. तसेच बऱ्याच कालावधी नंतर लिहीत असल्यामुळे शुद्धलेखनात बऱ्याच चुका सापडतील त्याबद्दल क्षमस्व.
प्रसिद्ध नेरक धबधबा आंतरजालावरून साभार

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

17 Apr 2021 - 5:24 pm | सौंदाळा

मस्तच, वाचतोय
पूभाप्र

प्रसाद_१९८२'s picture

17 Apr 2021 - 5:39 pm | प्रसाद_१९८२

छान झालेय. मात्र फोटो दिसत नाहीत.

Bhakti's picture

17 Apr 2021 - 6:04 pm | Bhakti

मस्तच!छान लिहिलंय!
काश फोटो दिसले असते,(पुढच्या भागात :))

कंजूस's picture

17 Apr 2021 - 7:53 pm | कंजूस

जाणार नाही. तरीही दीपक गुप्ताचा एक विडिओ पाहिला.
https://youtu.be/uLK2NA-kr1c
( चादर ट्रेक खर्च किती येतो. )

मुक्त विहारि's picture

17 Apr 2021 - 8:31 pm | मुक्त विहारि

वाचत आहे

अमर विश्वास's picture

17 Apr 2021 - 9:27 pm | अमर विश्वास

चादर ट्रेक .. एक आव्हानात्मक ट्रेक

पण फोटो दिसत नाहीत ...

गॉडजिला's picture

17 Apr 2021 - 9:34 pm | गॉडजिला

पुढिल लेखाची वाट बघिन्ग...

प्रचेतस's picture

18 Apr 2021 - 7:53 am | प्रचेतस

लिहिलंय छान पण फोटोंच्या बाबतीत गणेशा झालाय.

फोटो दिसत नसल्याने निराशा झाली..

आणि माझा चादर ट्रेक २०२० चा कॅन्सल करावा लागला याबाबत जास्त दुःख आहेच..
वाचत आहे

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2021 - 11:57 am | चौथा कोनाडा

एक्सायटींग लिहिलं आहे, पण फोटो दिसत असते तर आणखी मजा आली असती !

गोरगावलेकर's picture

19 Apr 2021 - 8:22 am | गोरगावलेकर

छान सुरुवात. टाका लवकर पुढचा भाग

फोटोवर जाऊन राईट क्लिक करून "copy image url" वरती क्लिक केले, नंतर आलेली पूर्ण url कॉपी करून मिपाच्या इन्सर्ट इमेज url मध्ये सेव्ह केली. आपल्या मदत पानावरती जाऊन पाहिले पण गुगल फोटोज बद्दल माहिती नाहीये. कृपया मदत करा.

१) फोटो एका अल्बममध्ये टाका.
२) तो अल्बम उघडा. तिथे वरच्या सेटिंग्ज मध्ये 'शेअर'करा. लिंक येईल त्याखाली 'anyone with the link can view' हा पर्याय निवडा. म्हणजे हा पूर्ण अल्बमच स्पेशली पब्लिक शेअर्ड झाला.
३) ते झाल्यावर मागे जाऊन पुन्हा अल्बमस तपासल्यावर या नावाखाली 'shared' असे दिसले पाहिजे. शिवाय anyone with the link can view' हेसुद्धा झाले आहे का बघा.
४) आता या अल्बमात टाकलेला प्रत्येक फोटो लिंक कुणालाही दिल्यावर दिसतोच.
-----------
लिंक काढणे -
वरील गोष्टी करून खात्री केल्यावर तो अल्बम उघडणे.
एकेक फोटो उघडून 'share' link copy करणे. आता हा फोटो' anyone with the link can view' यामध्येच असल्याने याचीही लिंक तशीच असते ती वापरा.

----------------------
हे वाचून लगेच शेअर केला अल्बम म्हणून हेच फोटो लगेच दिसणार नाहीत. वरील गोष्टी क्रमाने एकेक करत जाऊन लिंकस नव्याने पुन्हा काढाव्या लागतील. लेखात देता आले नाहीत तर प्रतिसादात द्या.

पुढच्या भागांंत ही कृती करा.

जगप्रवासी's picture

27 Apr 2021 - 12:49 pm | जगप्रवासी

पण फोल्डर उघडून सेटिंग्ज मधील शेअर वर क्लीक केलं पण तिथे पब्लिक शेअर येत नाहीये. सगळ्यात वर invite to album आलं आहे आणि खाली to करून इमेल आयडी टाईप करायला आलंय. तळाला लिंक कॉपी करण्यासाठी, फेसबुक आणि ट्विटर च शेअरिंग ऑप्शन आलं आहे.

कंजूस's picture

29 Apr 2021 - 6:03 am | कंजूस

डेस्कटॉप साईट करून पाहा. पण मोबाईल पेजवरही ओप्शन्स दिसतात. तिन्ही ब्राउजरला दिसतात.
to करून इमेल आयडी टाईप करायला आलंय. इथेच change हा पर्या य दिसतो त्यावर क्लिक करा.

समजा अल्बमला पर्याय सापडत नसला (आहेच) तर प्रत्येक फोटोला करा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Apr 2021 - 4:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

पहीला भाग वाचुन पुढचे वाचायची उत्सुकता चाळवली आहे. दुसरा भाग आलाय का?

गोरगावलेकर's picture

28 Apr 2021 - 11:14 pm | गोरगावलेकर

आता येऊ द्या पुढचा भाग लवकर

छान लिहिलंय, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत

जगप्रवासी's picture

30 Apr 2021 - 5:43 pm | जगप्रवासी

इतर वाचकांचे देखील आभार व प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद