इंग्लंड साठी ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज चे जे महत्व आहे ते आमच्या गावाच्या साठी लायब्रेरीचे. ग्रामीण वाचनालय म्हणून भली मोठी पाटी लावली असली तर गावाचे लोक ह्याला वाचनालय सोडून सर्व काही म्हणत. लायबेरी, लिब्रेरी आणि बरेच काही. सुनीताबाई ह्या आमच्या लायबेरियन. प्रत्येकाला लायब्रेरीरीयन म्हणजे गॅझेटेड ऑफिसर बरे का म्हणून ठणकून सांगत असत. आमच्या गावाचे हे वाचनालय बरेच जुने होते, म्हणजे माझ्या पणजोबांनी सुद्धा तिचा लाभ घेतला होता. ह्या वाचनालयांत एकूण ६ कपाटे होती आणि त्यातील सर्व पुस्तके आमच्या घरातील सर्व लोकांनी आणि शानू गुराख्याने वाचली असावीत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
जगाच्या पाठीवर मी खूप भ्रमंती केली आहे पण अनेक लोकांनी रॉबिन्सन क्रुसो, किंवा टॉम सोयर ह्या कथा वाचल्या नाहीत हे ऐकून मला आश्चर्य वाटते. मार्क ट्वेन आपल्या कॅलिफोर्नियातील ट्रकि गावांत राहत असत. मी मुद्दाम हुन गेले आहे पण त्यांची विशेष अशी छाप ह्या गावावर राहिली नाही. लहान असताना मिसिसिपी रिव्हर ची वर्णने मी वाचली होती आणि शानू गुराख्याला विचारले कि आमच्या ह्या ओहोळा पेक्षा किती मोठी असेल ? त्याकाळी सर्वांत मोठी नदी पहिली होती ती मांडवी नदी (पणजीच्या जवळ हि थोडी जास्तच रुंद आहे). त्याच्या मते ती आमच्या ओहोळाच्या किमान १०० पट मोठी असावी. त्याने मांडवी वगैरे पाहिली नव्हती.
आमच्या लायबेरीत सर्व नेहमीची मराठी पुस्तके होतीच (गोट्या, चिंगी, फास्टर फेणे वगैरे) पण इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे होती. मग जयंत नारळीकर ह्यांची छान पुस्तके होती. जूल्स ची पृथ्वीच्या गर्भात प्रवास, असिमोव ची पुस्तके होती (मराठी भाषांतर). रॉबिन्सन क्रुसो, टारझन, मोबी डिक, सिंदबाद, आलीस इन वंडरलँड, ड्रॅक्युला, फ्रँकेन्स्टन आणि बरीच काही. स्पॅनिश आणि फ्रेंच पुस्तकांचे अनुवाद सुद्धा होते "डॉन कीहोते" (मराठी लेखकाने ह्याला क्विझॉट केले होते). माझ्या स्पॅनिश मित्रांना मला डॉन कीहोते वाचून ठाऊक आहे ह्याचे भयंकर आश्चर्य आणि त्याचा उच्चार क्विझॉट नसून कीहोते आहे हे ऐकून मी चाट.
बरे फक्त पुस्तके असे ह्यांना संबोधणे चुकीचे ठरेल. हि पुस्तके म्हणजे एक वाण होते. बहुतेक पुस्तकांचे बायंडिंग सुटून, पाने जीर्ण झाली होती. मी कुठलेही पुस्तक घरी आणले तर आजी "मी वाचले तेंव्हा चांगले होते" असे म्हणून कौतुकाने आणि आपुलकीने गम वगैरे लावून पुस्तकाची बांधणी पुन्हा ठीक करत असे. गांवातील अनेक पिढ्या ह्या कथांवर वाढल्या होत्या. माझे तीर्थरूप आणि मातोश्री ह्यांनी काही पुस्तके मूळ इंग्रजी भाषेंत सुद्धा वाचली होती त्यामुळे मराठी भाषांतरकाराने काही मूर्खपणा केला असेल तर ती मला सांगायची.
हिंदी पुस्तके ह्या लोकप्रियतेला अपवाद होती. हिंदी पुस्तके सरकारने फुकट पाठवली असली तरी लोकांना आवड नव्हती त्यामुळे ह्या कपाटाला मी सोडून कोणीच गिर्हाईक नसायचे. आचार्य चतुरसेन, बाबू देवकी नंदन खत्री, त्यांचे सुपुत्र दुसरे खत्री, महादेवी वर्मा, अशी पुस्तके होतीच पण त्याशिवाय अग्निपुत्र अभय, शाकाल, अदृश्य कंकाल असली थोडीशी चावट प्रकारची पुस्तके सुद्धा होती. हिंदी भाषेवर माझे खूपच प्रभुत्व लहानपणापासून होते त्यामुळे मी अधाश्याप्रमाणे हि पुस्तके वाचून काढली.
पण लायबेरीचे सर्वांत चांगले सेक्शन म्हणजे मॅगझीन. अर्थांत एका खोलीच्या लायबरीच्या एका टेबलाला मी सेक्शन म्हणत आहे हे चाणाक्ष वाचकांनी ताडले असेल. इथे सर्व वृत्तपत्रे आणि मॅगझिन्स सुनीताबाई व्यवस्थित मांडून ठेवत असत. मग सकाळ झाली कि बाजारांतील सर्व मंडळी इथे येऊन बातम्या वाचून चर्चा करत. लायबेरींत शांतता ठेवायची असते हे वाक्य फक्त भिंतीवर लिहिलेले असायचे, पुणेकर मंडळी सिग्नल आणि नो एंट्रीला जितके महत्व देतात तितकेच महत्व गावकरी ह्या पाटीला द्यायचे. सुनीताबाई सुद्धा हिरीरीने सर्व गप्पांत भाग घ्यायच्या. बदल्यांत खानावळीचा कामत त्यांना सकाळी फुकट चहा आणि संध्याकाळी चहा आणि बटाटावडा पाठवायचा.
माझ्या घरी असंख्य पेपर येत असल्याने पेपरचे मला अप्रूप नव्हते. अप्रूप होते ते फिल्मफेर फेमिना इत्यादी मासिकांचे. आधी असली मासिके येत नसत पण सुनीताबाईनी चार्ज घेतल्यापासून फ्रॉन्टलयीन आणि आणखीन एक मॅगझीन बंद करून हि दोन सुरु केली. गांवातील एका रिटायर्ड शिक्षकांनी स्वखर्चाने चंपक आणि चांदोबा ठेवले होते. चंपक ह्या पुस्तकाविषयी मला विलक्षण संताप होता. कागदाची नासाडी असेच मला वाटायचे. ह्या उलट चांदोबा. तिळ्या बहिणी, अस्वल्या मांत्रिक, अपूर्व अश्या अजब कथा ह्यांत येत असत. माझ्यासाठी ह्या कथा म्हणजे कधी कधी सुपारी खाणार्या माणसाने एकदां LSD वगैरे घ्यावी तसे होते. पोरे बहुतेक करून स्पोर्ट्सस्टार कि अश्या काही मासिकांच्या मागे असत. त्याचा सेंटरफॉल्ड चोरायचा त्यांचा धंदा. विस्डम नावाचे इंग्रजी मासिक साधे सोपे होते. त्याच्या आवरणावर नेहमीच एका लहान मुलाचा फोटो असायचा हि परंपरा आज सुद्धा चालू आहे. ह्यांतील कथा, विनोद साधे सोपे असायचे.
लायब्रेरीत एक ऍटलास होता. होता म्हणजे असावा, कारण हि फक्त रुमर होती, कस्तुरीम्रुगाच्या कस्तुरी प्रमाणे किंवा नागमणी प्रमाणे कारण ऍटलास मध्ये जगांतील सर्व नकाशे असतात असे फक्त ऐकून ठाऊक होते आणि हे पुस्तक प्रचंड महाग असायचे त्यामुळे कुणीच त्याला कपाटातून बाहेर काढत नसत. मला अप्रूप अश्याचेच कि कसे बरे सर्व रस्त्यांचे नकाशे एका पुस्तकांत मावत असतील ? आणि असे पुस्तक मुळी छापावेच का ? कारण हे पुस्तक बरोबर घेऊन प्रवास करणे कठीण नाही का होणार ? ह्या प्रश्नाची उत्तरे माझ्यापुरती अनुत्तरित राहिली कारण मी आजपर्यंत ऍटलास पाहिलेला नाही. सरळ टेरासर्वर ह्या संकेतस्थळाशी संपर्क आला. गुगल मॅपच्या साधारण ५ वर्षे आधी हि मंडळी जगाचे सॅटेलाईट मॅप देत असत.
लायब्ररीरीतील सर्वांत प्रसिद्ध पुस्तक म्हणजे चिमणराव, चिमणरावांचे चर्र्हाट. आमचा शिक्षकांच्या मते ह्या पुस्तकासाठी अक्षरशः मारामारी व्हायची. आणि का ते मी समाज शकते. मी चिमणराव इतक्या वेळा वाचला आहे कि चिमणराव, गुंड्याभाऊ, काऊताई, मोरू, मैना सर्व काही घरचीच मंडळी वाटतात. लायबेरींत पु ल देशपांडे ह्यांचे एकही पुस्तक नव्हते, स्वामी, मृत्युन्जय अशी पुस्तके सुद्धा नव्हती. कारण लायबेरी जुनी होती. सरकारी कृपेने येणारी बहुतेक पुस्तके भिकार असायची पण गांवातील लोकांनी दान म्हणून दिलेली पुस्तके आणि सुनीताबाईनचा शिस्तबद्ध स्वभाव ह्यामुळे लायबेरी व्यवस्थित चालत होती.
सुनीताबाई अत्यंत शिस्तबद्ध होत्या. खरेतर सर्व पुस्तके त्यांनी कुठेही कोंबली असती तरी त्यांना कुणी काही म्हटले नसते. पण त्या काटेकोर पणे पुस्तकें मांडून ठेवत. वर्क एथिक म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकावे. मग एक दिवस त्यांनी मला लायब्ररी हे एक शास्त्र आहे, त्याचा इतिहास काय, पुस्तकांची वर्गवारी कशी असते इत्यादी इत्यंभूत माहिती दिली. मग त्यांचे एक छोटे कपाट होते ते नेहमी चावीबंद असायचे. एक दिवस सुनीता बाईनी मला ते उघडून दिले. हे सौभाग्य माझ्या ओळखीतील कुणालाच भेटले नव्हते. ह्या कपाटांत मग काही विशेष पुस्तके होती. "वयांत येताना" वगैरे कुणा डॉक्टर प्रभूंची. ह्या ज्ञानाचा मला नक्कीच फायदा झाला.
लायब्रेरीच्या काही गोष्टी विलक्षण आणि आठवणीत राहणाऱ्या होत्या. इथे द्वितीय महायुद्ध ह्या विषयावर प्रचंड साहित्य होते. कदाचित ६० च्या दशकांत भारतीयांत ह्या विषयाची जास्त उत्सुकता असावी आणि त्याकाळची हि पुस्तके ह्या लायब्रेरीत पोचली असावीत. पण त्याशिवार क्रीडा ह्या विषयावर भयंकर साहित्य होते. फक्त सुनील गावस्कर चे सनी डेझ नाही तर आणखी बरीच काही होती. टेनिस चा इतिहास, ऑलिम्पिक, पोहणे, सर्कस वगैरे विषयावर. कविता हा विषय शून्य प्रमाणात होता. भयकथा नव्हत्याच पण गुन्हा ह्या विषयावर प्रचंड साहित्य होते. कदाचित काही मोठ्या लायब्रेरी बंद पडल्या आणि त्यातील एक सेक्शन मधील कपाट इथे पाठवून दिले असावे असे माझे वडील म्हणत.
इंग्रजी पुस्तके कमीच होती पण मी सर्वप्रथम वाचलेले पुस्तक म्हणजे टू सिटीस हे चार्ल्स डिकन्स ह्यांचे पुस्तक. मग जेन ऑस्टिन ह्यांचे इमा वाचले. पण आवडली ती मात्र ऑस्कर वाईल्ड आणि हेन्री ह्यांची पुस्तके.
मी अनेक लायब्रेरी पहिल्या आहेत. मडगाव ची गोमंत विद्या निकेतनची, पणजीची सेंट्रल, पुण्यातील भांडारकर संस्थेची, IIT मुंबईची, लंडन पब्लिक, न्यूयॉर्क पब्लिक इत्यादी. ह्यांच्या कडे पहिले असता त्या भागांतील समाजावर त्या वाचनालयाचा आणि वाचनसंस्कृतीचा किती मोठा प्रभाव पडला आहे हे लक्षांत यते. आणि वाचनालय म्हणजे फक्त पुस्तक वाचण्याचे स्थान आहे असे नाही. गांवातील लोक हि गरज ओळखतात आणि ती भागवण्यासाठी एकत्र येऊन हि संस्था निर्माण करतात. विद्यापीठाप्रमाणे हि संस्था बंद असत नाही तर ती सर्वाना खुली. इथे विचारांचे आदान प्रदान अगदी उस्फुर्त आणि मुक्त असते. "नरसिंव्ह राव गेट्स करार करून देश विकायला निघालेत" म्हणून ठणकावून सांगणारा काशिनाथ न्हावीही इथे असतो आणि "टीव्ही ने संस्कृती कशी खराब झाली हे सांगणारे सदानंद मास्तर हि असतात", गृहशोभिकेतून रेसिपी शोधणारी नीता ताई असते आणि पेपर मधील शब्दकोडे सोडवणारा गोपाळ दादा. (गोपाळ दादा आधी कोडे निर्मात्याचे नाव बघत, ब्राह्मण असेल म्हणजे जोशी, देशपांडे वगैरे तरच सोडवत, आणि दुसरे काही आडनाव दिसले तर मग "ह्यांना कसचे येते कोडे डिसाईन करायला?" म्हणून सोडून देत. ह्यांची बायको लग्नाच्या दुसऱ्याच आठवड्यांत एका बस चालकाबरोबर पळून गेली होती हे नंतर समजले.)
अमेरिकेत रॉकफेलर हे सर्वांत श्रीमंत व्यक्ती होते. त्यांनी अमेरिकेत लायब्रेरीचे जाळे विणले, असे म्हटले जाते कि त्याचा संपुन अमेरिकन समाजावर प्रचंड प्रभाव पडला, आमच्या गावांतील लायबेरी पाहून मला तरी त्यांत आश्चर्य वाटत नाही.
मग काळ बदलला. सरकारने "सुधारणा" म्हणून लाकडी कपाटे नेवून कांच नसलेली गोदरेज ची कपाटे पाठवली. खिडकीत बसून रोमियो ची वाट पाहणारी ज्युलिएट अचानक हिजाब घालून आंत लपावी तसे झाले. नवीन पुस्तके म्हणून भिकार दर्जाची नेशनल बुक ट्रस्ट इत्यादींची पुस्तके आली. पाने ३० पण कथा २ ओळींची असला दळिद्री प्रकार होता. मग नेहरू ह्यांचे चरित्र, काँग्रेसी सत्तेच्या लढ्याचा इतिहास, कुणा दोन पैश्यांच्या राजकीय नेत्याचे चरित्र, तथाकथित विद्रोही साहित्य, छुपे कम्युनिस्ट लोकांचे साहित्य (रशियन पुस्तकांचे भाषांतर) वगैरे पुस्तके वाढली. सुनीता बाई रिटायर झाल्या. नवीन कोण तरुण आला त्याला इंग्रजी वाचता सुद्धा येते कि ह्याची शंका होती. एका रेड्याने लायब्रेरीत शिरून धिंगाणा घालावा तशी लायब्रेरीची अवस्था होत गेली. लायब्रेरीत गोळा होऊन गप्पा मरणाऱ्यांच्या वयोवृद्ध कंपूवर यमदेवाने जमावबंदी आणली. इंडियन एक्सप्रेस ची पाने टाइम्स ऑफ इंडिया मध्ये सापडली जाऊ लागली तर द हिंदू कचऱ्याच्या पेटीत, आणि त्याची गच्छंती होऊन मग मिड डे येऊ लागला. त्यातील किंगफिशर गुड्स टाईम्स चा टुडेज मॉडेल चा फोटो पाहण्यासाठी जास्त गर्दी होऊ लागली. काही मंडळी मग लायबेरीच्या बाहेर सिगारेट फुंकू लागल्या. काशिनाथ न्हावी मरून त्याच्या दुकानात कर्नाटकातून कोणी खान येऊन धंदा करू लागला.
एकेकाळी वाचनाव्यतिरिक्त अनेक गोष्टी होत असणारी हि संस्था, गांवातील काव्य शास्त्र विनोदाचे स्थान, आमच्या गावाचे केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्ड, राजीव गांधी मुत्रालया प्रमाणे टाळण्याची जागा बनून राहिली आणि लोक आता ह्याला सरकारी वाचनालय म्हणतात. सरकारी नोकरीचा प्रोग्रॅम. सध्या इथे नक्की कोण जातो हेच ठाऊक नाही.
प्रतिक्रिया
23 Feb 2021 - 10:27 pm | मास्टरमाईन्ड
हा फारसा नाही आवडला
हे
आणि
हे मजेशीर वाटलं.
मुत्रालयाला पण नांव देतात?
24 Feb 2021 - 2:07 am | साहना
ह्या वाचनालयाच्या बाजूला एक सार्वजनिक मुत्रालय होते. खरे तर ती फक्त भिंत असावी. त्याच्या समोरील भिंतीवर फक्त पोस्टर्स असत आणि त्याच्या मागे पुरुष मंडळी कारभार उरकरत. इतर दुकानाच्या जवळ बांधल्याने ह्याची घाण सर्व बाजारांत पसरत. कुणी तरी त्याला गांधीगृह नाव ठेवले होते आणि काळाच्या ओघांत ते राजीव गांधी झाले. त्याला सर्व लोक राजीव गांधी भिंत म्हणूनच संबोधित.
> गोपाळ दादा आधी कोडे निर्मात्याचे नाव बघत, ब्राह्मण असेल म्हणजे जोशी, देशपांडे वगैरे तरच सोडवत, आणि दुसरे काही आडनाव दिसले तर मग "ह्यांना कसचे येते कोडे डिसाईन करायला?" म्हणून सोडून देत.
धन्यवाद. आपली टीका बरोबर आहे. प्रकाशित केल्यानंतर एडिट करता येत नाही त्यामुळे मी काढून टाकू शकत नाही. हा सत्य विनोद होता त्यामुळे मी लिहिला पण कदाचित लोकांच्या भावना वगैरे दुखावतील हे लक्षांत नाही घेतले.
23 Feb 2021 - 10:55 pm | सौंदाळा
हेच म्हणतो,
आधीच्या भागांच्या तुलनेत हा लेख तेवढा आवडला नाही. कदाचित व्यक्तिचित्र नसल्याने असेल.
24 Feb 2021 - 7:33 am | आनन्दा
मला तरी आवडला. प्रारएक भाग विनोदी असलाच पाहिजे असे नाही.
तुमच्या लेखनातून एका गावाचे स्थित्यंतर दिसत आहे. वाचायला मजा येत आहे.
24 Feb 2021 - 9:06 am | ज्ञानोबाचे पैजार
स्थित्यंतर छान टिपले आहे
पैजारबुवा,
24 Feb 2021 - 9:17 am | पिनाक
आवडला. लहानपणी वाचनाचा प्रचंड आधाशीपणा होता. अर्थात त्यावेळी टीव्ही वगैरे प्रकार नव्हतेच किंवा दूरदर्शन 1 आणि 2 होते. मी वाचलेले बहुतांशी साहित्य fantasy प्रकारातले म्हणता येईल. पण मराठीत हे साहित्य फार कमी होते (भारा भागवत हे एक प्रमुख नाव). त्यामुळे जोपर्यंत इंग्रजी साहित्य वाचण्यापर्यंत त्याचे ज्ञान कमावले नाही तोपर्यंत quality वाचनाचा प्रॉब्लेम च होता. इंग्रजी ने मात्र एक नवीनच विश्व खुले झाले जिथे ना विषयांचा तोटा होता, ना पुस्तकांचा.
24 Feb 2021 - 11:32 am | साहना
मराठी भाषेंतील रम्यकथांचे विश्व फारच सुमार दर्जाचे आहे. नाथमाधवांचे वीरधवल हे विशेष पुस्तक समजले जाते पण वाचले तेंव्हा तितके खास वाटले नाही. त्यामानाने हिंदी साहित्यांत सुद्धा जबरदस्त रम्यकथा आहेत. आचार्य चतुरसेन शास्त्री टोळकेन पेक्षा कमी आहेत असे म्हणू शकणार नाहीत. बाबू देवकीनंदन खत्री तर एकदम जबरदस्त.
24 Feb 2021 - 9:47 am | कंजूस
विनोद प्रत्येक ड्रावरात आहे.
लिहीत राहा.
24 Feb 2021 - 6:30 pm | योगी९००
लेख आणि लायब्ररीचे वर्णन आवडले. चिमणरावांचे चर्हाट हे माझे पण आवडते पुस्तक आहे.
24 Feb 2021 - 10:39 pm | तुषार काळभोर
ह्या एका प्रकाराचं मला लहानपणापासून लई अप्रूप. सदस्यत्वाची लई हौस.
कधीच पूर्ण नाही झाली. :(
25 Feb 2021 - 8:51 am | बबन ताम्बे
आमच्या गावातील लायब्ररी मला आठवते. ग्रामपंचायत चालवत होती. अगदी माफक फी होती. लहानांसाठी रामायण, महाभारत, चांदोबा, फास्टर फेणे, एकलव्य, किशोर , खूप काही वाचायला होते. गुलबकावली, सिंदबाद वगैरे वाचल्याचे आठवते.
वाचनावर त्यावेळची पिढी पोसली म्हणायला हरकत नाही.
आपला लेख खूप आवडला.
25 Feb 2021 - 5:33 pm | चौथा कोनाडा
छान लेख ! शिस्तबद्ध सुनीताबाईंचे व्यक्तिचित्र आवडले !
माझ्या गावच्या ग्रंथालयाची आठवण झाली. हे नगर वाचनालाय नदीकिनारी उंच घाटावर बांधलेले होते.
वाचनालयाच्या बाल्कनीतून नदीचा निसर्गरम्य परिसर दिसायचा. वार्याच्या सुखद झुळुका यायच्या. वाचून झाले इथं येऊन बसणे आणी परिसर न्याहाळणे म्हणजे परमसुख असायचे. शाळेत असताना आठवी, नववी, दहावी अशी तिन्ही वर्षे पडि़क असायचो. मित्रांना कुठेही सापडलो नाही तर ते मला वाचनालयात शोधायला यायचे.
या वाचनालयाने मला आयुष्यात बरेच काही दिले !
25 Feb 2021 - 11:45 pm | सिरुसेरि
छान लेख . अशी लायब्ररी गावामधे असणे हि गावासाठी मानाची आणी प्रगतीची संधी आहे .
26 Feb 2021 - 11:51 am | मुक्त विहारि
धन्यवाद
26 Feb 2021 - 1:11 pm | राजेंद्र मेहेंदळे
ही केवळ लायब्ररी नव्हे तर संस्कृती असते. टि.व्ही. आणि संगणकाच्या आधीच्या जमान्यात ज्ञान मिळवायचा एकमेव मार्ग म्हणजे फक्त वाचन होता.
मग ते वर्तमानपत्र असो, की पुस्तके,कादंबर्या,कथा,कविता,मासिके,पाक्षिके आणि साप्ताहिके,दिवाळी अंक.
सार्वजनिक वाचनालय कल्याणची आठवण झाली.
26 Feb 2021 - 7:02 pm | चलत मुसाफिर
तुम्ही फार छान व तटस्थपणे लिहिता.
'अस्वल्या'बद्दल:
मला वाटतं ती 'धूमकेतु'नावाची क्रमशः येणारी कथा होती व त्यात भल्लूक मांत्रिक नामक पात्र होते.
28 Feb 2021 - 10:37 am | साहना
27 Feb 2021 - 2:26 pm | मदनबाण
लेखन आवडले, जितके मला जाणवले त्यानुसार हे एकाच दमात [ बैठकीत ] केलेले लिखाण वाटते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manmohana Tu Raja Swapnatla... :- Hamaal De Dhamaal
3 Mar 2021 - 1:53 am | साहना
हो. सर्व काही एकाच दमात केलेले लिखाण आहे. खूपच व्यस्त कामातून विरंगुळा म्हणून हे लेखन केले जाते.
28 Feb 2021 - 2:07 am | चित्रगुप्त
@ साहना: व्वा. झकास लेख.
लेख अतिशय आवडला. 'लायब्ररी' हा जुन्या काळातील सर्वच साहित्यप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी पणजोबांपासून घरातील सर्व पिढ्यांनी एकाद्या लायब्ररीचा लाभ घेतला असल्याचे उदाहरण दुर्मीळच असावे.
हा लेख वाचताना लहानपणी वाचलेल्या - रॉबिन्सन क्रूसो, टॉम सॉयर ( -आणि हकलबरी फिन) मॉबी डिक, ज्यूल व्हर्न चे 'समुद्री सैतान' आणि पृथ्वीच्या गर्भातील प्रवास, डॉन 'क्विक्झोट', सिंदबादच्या सफरी, 'अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा' वगैरे पुस्तकांच्या आठवणी जागृत झाल्या.
अगदी लहानपणापासून आजतागयत टारझन, चांदोबा आणि 'चिमणरावाचे चर्हाट' या तर अगदी मर्मबंधातल्या ठेवी.
इंदौरच्या सुप्रसिद्ध 'साहित्य सभा' या खास मराठी लायब्ररीतून 'टारझन' च्या (सुरेश शर्मा यांनी केलेल्या मराठी अनुवादाच्या) वीस का चोवीस भागांची अनेक पारयणे केली. त्यातला खास आवडीचा भाग (बहुतेक पाचवा ) म्हणजे टारझन घनदाट जंगलातील 'ओपर' नामक सोन्याच्या विटांच्या प्राचीन शहरात जातो, तिथे त्याच्यावर मोहित झालेली 'ला' नामक राणी वगैरे असलेला भाग. 'जेन' पेक्षा त्या 'ला' चेच भारी आकर्षण वाटायचे आणि ती मदालसा कशी दिसत असेल याची कल्पना करताना र्हदयात आगळीच धडधड व्हायची. त्या पुस्तकांमधे चित्रे नव्हती. आज हा प्रतिसाद लिहीताना पंचावन्न-साठ वर्षांनंतर 'ला' ची आठवण झाली आणि गूगलवर शोध घेतल्यावर तिची जी चित्रे मिळाली, ती त्या वयात बघायला मिळाली असती तर कलेजा खलासच झाला असता.
.
'चांदोबा' बद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. सुंदर चित्रांनी नटलेल्या चांदोबाची अगदी आतुरतेने वाट बघत असायचो. साहित्य सभेतल्या बाल विभागात चांदोबाचा दिवाळी अंक वाचायची उत्सुकता दोन-तीन महिने आधीपासूनच लागलेली असायची. त्यातली 'शंकर' आणि 'चित्रा' यांनी काढलेली चित्रे खूप आवडायची. मात्र पुढे कुण्या 'व्हपा' VAPA नामक चित्रकाराची ओंगळ, बटबटीत मुखपृष्ठे/चित्रे येऊ लागली, ती अजिबात आवडायची नाहीत. त्या चित्रांमुळे चांदोबातला रस हळू हळू ओसरू लागला होता. मात्र माझ्यातला चित्रकार बालपणी चंदोबानेच घडवला, हे नक्की.
.
.
'चंपक' मासिकाबद्दल तुमचा अभिप्राय वाचून मौज वाटली. या मताशी मी सहमत असलो, तरीही याच चंपक मधे 'डिंकू' नामक बेडकाचे पात्र निर्माण करून मी अनेक वर्षे पुष्कळ चित्रकथा लिहील्या/चित्रीत केल्या होत्या, आणि त्यामुळेच दिल्लीतली सुरुवातीची वर्षे मला तिथे तग धरून रहाणे शक्य झाले होते.
'चिमणरावाचे चर्हाट' तर माझ्या बालपणीच्या काळातले सर्वात लोकप्रिय पुस्तक असावे. मला - आणि माझ्या भाच्याला देखील - यातले अनेक उतारे तोंडपाठ असायचे. " पिंजर्यामधे व्याघ्र सापडे, बायका-मुले मारिती खडे" .... "दुसरी काडीही वार्याने विझली, मग तिसरी न पेटवता सरळ चौथी पेटवून तिने विडी शिलगवली" ... वगैरे वाक्ये अजून आठवतात. आमच्या घरी 'चर्हाट'ची जी जुनी आवृत्ती होती, तीत 'सी.ग. जोशी' नामक चित्रकाराची काहीशी बाळबोध, ओबडधोबड वाटणारी चित्रे होती, पण त्यातले चिमणराव, गुंड्याभाऊ, काऊ, मोरू, मैना, चिमणरावांची आई वगैरे पात्रांचे आणि प्रसंगांचे चित्रण कमालीचे होते. चि.विं.च्या लेखनाचा अगदी अर्क त्यात उतरलेला होता. मात्र नंतर प्रकाशित झालेल्या नवीन आवृत्तीत मात्र सी.ग. ऐवजी शि.द. फडणीस यांची चित्रे होती. या चित्रात व्यावसायिक सफाईदारपणा असला, तरी ती अगदीच सपक, बुळबुळीत, विरस करणारी होती. (सिद्धहस्त व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी अगदी हाच मुद्दा एका लेखातून सविस्तरपणे मांडलेला आहे) फडणिसांनी चि.विं.च्या उदात्त, अर्थगर्भ, निर्व्याज मिश्किल विनोदाचे एकाअर्थी 'कार्टूनीकरण' केले. माझा अगदी हाच आक्षेप वॉल्ट डिस्नेच्या अलिकडील टारझन वगैरेवरील कॉमिकांबद्दल आहे. हल्ली नेटवर टारझन हुडकायला जावे, तर जुन्या उतमोत्तन चित्रकारांनी चित्रित केलेल्या टारझनऐवजी कार्टूनीकरण केलेली टारझन-चित्रेच टनावारी समोर आदळतात.
.
.
वरीलपैकी पहिली तीन चित्रे सी.ग. जोशी यांची, तर शेवटले रंगीत 'बुळबुळीत सफाईदार कार्टूनीकरण' वाले मुखपृष्ठ फडणीसांचे .
संगीताच्या बाबतीतला असाच एक अनुभव म्हणजे रविंद्रनाथांनी अगदी तरूणपणी (इ.स. १८७७-१८८४ ) 'भानुसिंग' या टोपणनावाने रचलेल्या 'भानुशिंगेर पोदाबोली'(पदावली) मधील 'श्रावण गगने घोर घनघटा' हे गीत. शांतिनिकेतनात रविंद्रनाथांच्या आश्रयात वाढलेली 'आश्रमकन्या'- कणिका बंदोपाध्याय यांचे अतिशय भावपूर्ण तरल गायन, त्यातील विरहिणी राधिकेची व्याकुळ आर्तता, पावसाळी रात्रीचे वर्णन, मृदुंगाच्या घुमार्यातून साधलेला मेघांचा गडगडाट एकीकडे, तर लताबाईनी गायलेल्या मशारनिल्हे गाण्यात वरील गोष्टींचा सर्वथा अभाव. असो.
वरील दोन्ही गीते इथे ऐका:
१. कणिका बंदोपाध्याय यांचे श्रावण गगने घोर घनघटा...
२. लताबाईंचे श्रावण गगने
शब्दकोडी सोडवणारे गोपाळदादा यांची आठवण मजेशीर वाटली. अश्या वल्ली प्रत्येक गावात असतात. या संदर्भात असे म्हणावेसे वाटते, की अनेक वर्षांपूर्वीच्या, कुठल्यातरी गावातल्या एकाद्या व्यक्तीचे छोटेसे व्यक्तिचित्र, ती व्यक्ती जशी होती, तसेच्या तसे मांडण्यात काहीही वावगे नाही. याबद्दल कोणताही दोष लेखनकर्त्याच्या माथी येत नाही. तसे दोषारोपण आज कुणी करणे हे अप्रस्तुत आहे. तुमच्या लेखनातला (आणि बहुधा स्वभावातला पण) मिश्किल मोकळेपणा आणि धीट रोखठोकपणा हे तुमचे वैशिष्ट्य आहे. उगाचच कुणाच्या भावना दुखावतील वगैरे पॉलिटिकली करेक्टपणा करण्यात ते वैशिष्ट्य धूसर होऊ देऊ नये. (चंपक मासिकाबद्दल तुमचे मत ऐकून माझ्या भावना वगैरे दुखावण्याऐवजी मला गम्मतच वाटली)
शेवटल्या परिच्छेदात बदलत्या काळात झालेली लायब्ररीची अधोगती, वाताहत आणि दुर्दशा मनाला चटका लावून गेली. आपल्याकडील अनेक जुन्या उत्तमोत्तन संस्थांची अशीच वाताहत झालेली सर्वच ठिकाणी दिसून येते. इंदुरातील जनरल लायब्ररी, होळकरांचा वैभवशाली लालबाग पॅलेस (याचे हल्लीचे दळभद्री नाव काय, तर म्हणे 'नेहरू केंद्र'. भरजरी शालूची शेवटी लक्तरे व्हावीत, तसे त्याचे आजचे स्वरूप आहे) आमचे प्रिय आर्टस्कूल, या सर्वांची अशीच दुर्गती झालेली मी बघितली आहे.
शेवटी काही प्रश्नः तुमच्या त्या लायब्ररीत चिपळूणकर पिता-पुत्रांचा 'अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा' हा विलक्षण अद्भुत ग्रंथ होता का? असल्यास त्यात ब्रिटिश चित्रकारांची चित्रे होती की नंतरच्या काळातली थिल्लर चित्रे? तसेच सुरेश शर्मांचे 'टारझन'चे भाग होते का ? बाबुराव अर्नाळकरांच्या धनंजय-छोटू, काळा पहाड, झुंजार वाल्या रहस्यकथा होत्या का ? नेमाडेंचे 'कोसला, बिढार जरीला झूल' होते का? मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित यांचे पंतकाव्य होते का? चिंतामणि वैद्य संपादित 'महाभारत' होते का? आणि हिंदी भाषेवर लहानपणापासून खूपच प्रभुत्व असण्याचे मुख्य कारण काय होते ?
तुमच्या समर्थ लेखणीतून अश्याच उतमोत्तम आठवणींची खैरात होत राहो. एवढ्या काळानंतर ओपरची राणी 'ला' इची भेट घडवून आणल्याबद्दल खास आभार.
28 Feb 2021 - 2:32 am | साहना
आपली प्रतिक्रिया वाचून माझे डोळे खरोखरच पाणावले आहेत त्यामुळे तूर्तास मी इथे आणखी लिहीत नाही काही वेळाने लिहीन.
आपले जुने कपडे, लहानपणतील खेळणी, बाहुल्या वगैरे ज्यांच्याशी आपले प्रचंड प्रेम होते त्यांना काळाच्या ओघांत आपण एका कपाटांत बंद करून ठेवले आणि नंतर विसरून गेले. मग एक दिवस अचानक ते कपाट उघडले आणि त्या सर्व गोष्टी भसा भसा बाहेर पडल्या, आणि त्यांना पाहून आपल्या आठवणींचा बांध फुटावा असे माझे झाले आहे (आपली प्रतिक्रिया वाचून).
28 Feb 2021 - 12:09 pm | साहना
> अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा
हो हा ग्रंथ नककीच होता. चित्रे आठवणीत नाहीत पण ग्रंथ बराच म्हणजे बराच जुना होता त्याचे कव्हर जुन्या प्रकारचे लाल कपड्याचे होते आणि फाटून लक्तरे झाले होते.
चांदोबाचे चित्रकार ह्यांचे मागील काही महिन्यातच निधन झाले अशी वार्ता कानावर आली. मला लहानपणापासून हि चित्रे कशी बरे ते काढत असावेत ह्याचे खूप आश्चर्य वाटत आले आहे. हनुमान, विष्णू आणि विक्रम म्हटले कि डोळ्यासमोर चांदोबातील चित्रे येतात. भूत म्हटले कि पांढरी आकृती चांदोबातील आठवते.
> आमच्या घरी 'चर्हाट'ची जी जुनी आवृत्ती होती, तीत 'सी.ग. जोशी' नामक चित्रकाराची काहीशी बाळबोध, ओबडधोबड वाटणारी चित्रे होती, पण त्यातले चिमणराव, गुंड्याभाऊ, काऊ, मोरू, मैना, चिमणरावांची आई वगैरे पात्रांचे आणि प्रसंगांचे चित्रण कमालीचे होते. चि.विं.च्या लेखनाचा अगदी अर्क त्यात उतरलेला होता.
एकदम खरे. आणि त्यांत खाली एक ओळ सुद्धा असायची अगदी obvious अशी. चिमुताईच्या लग्नासाठी दोन फोटो काढले जातान्त ज्यांत एकांत ती मॉडर्न तर दुसऱ्यांत ती थोडी कर्मठ दाखवली जाते (माझ्या कडे PDF आहे).
> चंपक मासिकाबद्दल तुमचे मत ऐकून माझ्या भावना वगैरे दुखावण्याऐवजी मला गम्मतच वाटली
मला लहानपणी तसे वाटायचे म्हणून मी तसे लिहिले. ह्याचे कारण सोपे होते, जी प्रघल्भता चांदोबात होती ती मला चंपक मध्ये आढळली नाही (टिंकल मध्ये सुद्धा नाही). पण लहान मुलांच्या मनोरंजनासाठी जे अथक प्रयत्न चंपक चालविणाऱ्यानी घेतले आहेत त्यांच्या बद्दल प्रचंड आदर आहे. त्याकाळी असले धंदे आणि व्यवसाय चालवणे सोपी गोष्ट नव्हती. आज काळ सुद्धा चांगले "illustration" करणारे लोक खूप कमी भेटतात. डिंको ची आठवण नाही पण एक कावळ्याची कथा असायची त्याची आठवण आहे.
> बाबुराव अर्नाळकरांच्या धनंजय-छोटू, काळा पहाड, झुंजार वाल्या रहस्यकथा होत्या का ?
दुर्दैवाने नव्हत्या. काळा पहाड च्या कथा वडिलांनी वाचल्या होत्या. ते खूप नॉस्टॅल्जिक पद्धतीने सांगत पण हि पुस्तके मी कधीच वाचली नाहीत.
> चिंतामणि वैद्य संपादित 'महाभारत' होते का?
खूप खंड असलेले ते मूळ महाभारत का ? काही खंड मी वाचले होते.
> वरीलपैकी पहिली तीन चित्रे सी.ग. जोशी यांची, तर शेवटले रंगीत 'बुळबुळीत सफाईदार कार्टूनीकरण' वाले मुखपृष्ठ फडणीसांचे .
मी ते विकत नाही घेतले ह्याचे कारण ते मुखपृष्ठ. जोशींचे लिखाण निव्वळ विनोदी होते असे नाही, त्यांत त्यांच्या वैयक्तिक जीवनातील व्याकुळता सुद्धा होती. त्यांचिये अनेक मुले मरण पावली. त्यामुळे त्यांना ती "पक्ष्या" प्रमाणे वाटायची. कारण ती घरटे सोडून उडून जातात. म्हणून सर्व पात्रें पक्षी आहेत. पण मुखपृष्ठ चिमण राव म्हणजे जणू काही बोक्या सातबंडे असल्याप्रमाणे रेखित केले आहे.
> हिंदी भाषेवर लहानपणापासून खूपच प्रभुत्व असण्याचे मुख्य कारण काय होते ?
आमच्या मातोश्रींचे बालपण कानपूर मध्ये गेले तिला हिंदी आवडायचे आणि तिच्याकडे तिची पेटी भरून हिंदी पुस्तकें होती. मराठ्यांचा इतिहास ह्या विषयावरील एक हिंदी पुस्तक होते ज्यातून शिवाजी महाराज ते राजाराम महाराज पर्यंतचा इतिहास मी सर्वप्रथम वाचला. आई हिंदी निपुण असल्याने काही अडथळा येत नसे.
मराठी आणि हिंदी साहित्यांत कमालीचा फरक आहे. मला वाटते "noir" हा कथा प्रकार (आणि इलुस्ट्रेशन) मला भयंकर प्रिय होते. हिंदीत ह्या प्रकारच्या कथा खूप असायच्या मराठींत किमान मला आढळल्या नाहीत. त्याशिवाय स्त्री पात्रांना मध्यभागी ठेवून केलेले लिखाण सुद्धा हिंदी भाषेंत जास्त होते. कधी कधी ते थोडे salasious प्रकारचे असले तरी मला ते आवडायचे. त्यामुळे हिंदी भाषेवर प्रभुत्व निर्माण झाले.
28 Feb 2021 - 5:51 pm | शाम भागवत
@चित्रगुप्त,
@साहना,
दोघांच्याही प्रतिक्रिया आवडल्या.
माझाही भूतकाळ जागा झाला.
मी सगळे चांदोबे केश कर्तनालयात वाचले.
😀
28 Feb 2021 - 5:44 pm | मुक्त विहारि
कडक
15 Jun 2023 - 4:21 pm | चांदणे संदीप
गविकाका कृपेने हा लेख वाचायला मिळाला. कसा काय सुटला होता देव जाणे. असो, वाचन हे सगळ्यात पहिलं प्रेम. त्यानंतर संगीत आणि त्याच्याही नंतर सिनेमा. त्याच्यामुळेच वाचनाशी संबधित जे-जे असेल ते वाचायला आवडतेच. वाचनाशी संबधित ८४ चेरींग क्रॉस रोड हे पुस्तकही भारी आहे.
सं - दी - प