प्रेमकहाणी १९६० सालची

Primary tabs

सरिता बांदेकर's picture
सरिता बांदेकर in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amप्रेमकहाणी १९६० सालची

“चला, सर्व समारंभ मस्त पार पडला. मला जरा टेन्शन होतं, नेहमी आपण बारीकसारीक गोष्टीत आई-अप्पांचा विचार घेत असतो आणि त्यांना सरप्राइज द्यायचं म्हणून त्यांच्या नकळत सर्व ठरवलं. पण सगळं मस्त झालं. जेवणही छान होतं. आई तर त्या पैठणीमध्ये खूपच सुंदर दिसत होती, अप्पा शेरवानीमध्ये थोडे अवघडलेले होते प्रथम, पण नंतर त्यांनीसुद्धा एन्जाॅय केलं.” राघव आपल्या ताईला - मीनाला सांगत होता.

मीना -”आता उद्या सकाळी फ्रेश होऊन व्हिडिओ लावू या.“

राघव - ”अगं हो, त्यासाठी आम्ही आधीच उद्याचा सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची ॲार्डर दिलीय. मालती म्हणाली की जेवण बाहेरून आलं तर आम्ही बायकासुद्धा व्हिडिओ बघू आणि सगळ्या भावंडांच्या गप्पा होतील निवांत.”
मीना खूश झाली. आज पुष्कळ वर्षांनी सगळे एकत्र आलोय, नाहीतर एकाला जमतं तर दुसर्‍याला नाही. मुलांच्या शाळा, स्वत:चं ॲाफिस, नवर्‍याचं ॲाफिस आणि इकडे सगळ्यांनी एकत्र यायचं म्हणजे आईवर कामाचा बोजा. नाहीतर मालतीला रजा घ्यायला लागणार.
मीना राघवला म्हणाली, ”अरे, अप्पांची पंचाहत्तरी आणि आई-अप्पांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा करायचं तू ठरवलंस, तेव्हापासून सगळे जण या दिवसाची वाट बघत होतो. “
राघव म्हणाला, “अगं, उद्या बघ आणि एक सरप्राइज प्लॅन आहे सगळ्यांसाठी.”
मीनाने किती विचारलं, पण त्याने काहीही सांगितलं नाही. मालतीला विचारलं तर ती म्हणाली, ”मला तर काहीच बोलले नाहीत ते.”

सकाळी सगळे उठल्यावर सगळ्या मुलांना राघवने सांगितलं की "तुम्ही सगळे तयार होऊन या, आज आणि एक सोहळा होणार आहे." मुलांनी काय काय म्हणून विचारलं, पण त्याने काहीच सांगितलं नाही आणि लवकर आवरून तयार राहायला सांगितले. तेवढ्यात कालचा व्हिडिओ काढणारा माणूस आला. राघवने मालतीला त्या लोकांचे चहापाणी बघायला सांगितले आणि स्वत: आवरायला रूममध्ये गेला.

सगळ्यांचं चहा पाणी झालं होतं,राघवनी सगळ्यांना सांगितलं , “ चला प्रत्येकानी आपापली जागा पकडा, आता एक सरप्राईज मिळणार आहे तुम्हाला.जे कुणी ते ओळखेल त्याला किंवा तिला मस्त बक्षीस मिळणार आहे.”

एव्हढे बोलून त्याने फोटोग्राफरला आपला कॅमेरा सेट करायला सांगितला.आणि परत सगळ्यांकडे वळला आणि विचारलं ,” तुम्ही सगळे तयार आहात का?हे जे सरप्राईज आहे ते अर्थातच आई अप्पांबद्दल आहे. कुणी ओळखू शकेल का??”
सगळ्यांनी एकदम बोलायला सुरूवात केली.पण राघवनी सगळ्यांना सांगितलं की एका एकानी बोला.मग एकेकानी सांगितलं की आई अप्पा कुठे तरी फिरायला जाणार , कुणी म्हणाले नाच करणार, कुणी म्हणाले गाणे म्हणणार. कुणाचंच ऊत्तर बरोबर नव्हतं.

शेवटी राघवने बोलायला सुरूवात केली,
“आता मी काय सांगतोय तिकडे सगळ्यांनी नीट लक्ष द्या.
लहानपणी जेव्हा मित्रमंडळी सुट्टीत मामाकडे, मावशीकडे,आत्याकडे,काकांकडे रहायला जायची तेव्हा मी नेहमी हट्ट करायचो की मला पण सुट्टीत कुठेतरी जायचंय.
आई तेव्हा रडत रहायची आणि अप्पा चप्पल घालून बाहेर पडायचे पण दोघांनीही कधीच मला नातेवाईक नसल्याचे कारण सांगितले नाही. पण मी जेव्हा काॅलेजला गेलो तेव्हा मला अप्पांच्या मित्राकडून त्याचे कारण समजले.
या दोघांनी ५० वर्षांपूर्वी घरातून पळून जाऊन लग्न केले होते.त्यात अप्पा कोकणस्थ ब्राम्हण आणि आई सारस्वत म्हणजे मांस/मच्छी खाणारी म्हणजे माफीचा प्रश्नच नाही. त्यामुळे आई/अप्पा कुणाचेच नातेवाईक आपल्याला माहित नाहीत. त्यांच्या नात्याला ५५ वर्ष झाली आणि लग्नाला ५०.
तर तो प्रवास त्यांनी आपल्या सगळ्यांना उलगडून दाखवावा .
अशी माझी विनंती आहे.”
यावर सगळ्यांनी जोरात बरोबर आहे असा ओरडा केला.
आणि आई/अप्पा, आजी /अप्पा चा ओरडा सुरू झाला.
प्रथम यशवंतराव आणि शांताबाईंनी काहीही सांगण्यास नकारच दिला,पण सगळ्यांच्या आग्रहास्तव दोघेही तयार झाले.
राघवने कॅमेरामनला खूण केली आणि कॅमेरा सुरू करायला सांगितलं. त्याला तो संपूर्ण इतिहास कॅमेरात कैद करायचा होता.
राहूल एव्हढा एक्साईट झाला होता की त्याने प्रश्नांची सरबत्ती चालू केली.
“ वाॅव!! आजोबा, तुम्ही आजीला पहिल्यांदा आय लव्ह यू म्हटल्यावर आजीची काय रिॲक्शन होती??तुमचा पहिला व्हॅलेंटाईन डे कुठे सेलिब्रेट केलात??आजीला गिफ्ट कुठचे आवडायचे??तुमची फिरायला जायची फेव्हरिट जागा कुठची?कुठचा सिनेमा पहिल्यांदा बघितला??

राघव म्हणाला,”अरे थांब थांब.अशी प्रश्न ऊत्तरं नाहीत तर त्यांना आठवणीत रमू देत. आणि आपण प्रेक्षक म्हणून ते सगळं अनूभवायचं. तो काळ वेगळा होता. त्यावेळी फोन नव्हते.सरसकट हाॅटेलमध्ये खायला जाणे,सिनेमाला जाणे वगैरे गोष्टींना महत्व नव्हतं तरी त्यांच्या प्रेमाचा प्रवास कसा होता. इतकी वर्ष कुणालाच या गोष्टींची कल्पना नव्हती.आता सगळ्यांनी शांत रहा आणि आपण ऐकूया.
राघवचं जेव्हा अप्पांकडे लक्ष गेलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं ते खरंच भूतकाळात पोचले होते.
यशवंतरावांनी बोलायला सुरूवात केली
“ माझी ११ वीची परिक्षा झाली आणि मी रत्नागिरीहून मुंबईला आलो.दूरचा चुलतभाऊ दादरला एकटाच रहात होता. त्याने मला आसरा दिला. त्याचे शेजारीच एक गोव्याचे कुटुंब राहत होतं.पक्कं मासे खाऊ.मला तर त्यांच्या जेवणाच्या वासानी पण मळमळायला लागायचं.त्यांच्या खोलीत कायम माशांचा वास यायचा.त्यामुळे मी त्यांच्यापासून लांबच राहत होतो.
पण एक दिवस त्यांची भाची आली गोव्याहून. १०वीत होती.
इकडच्या शाळेत ॲडमिशन घेतली होती.ठेंगणी,ठुसकी, गोरी गोरी पान.बघितल्याक्षणी कुणालाही आवडेल असा एक गोडवा तिच्या चेहर्यावर होता.चेहर्यावर कायम प्रसन्न भाव, आणि काहीतरी गुणगुणत असायची.आवाज पण गोड होता.चालताना पायातल्या पैजणांचा हळूवार आवाज कानावर पडावा असं सारखं वाटत रहायचं.
मला दुसरं काही सुचतच नव्हतं तेव्हा.
आता मी त्या काकूंच्या घरी काही ना काही कारण काढून जायला लागलो. मला त्या माशांच्या वासाचा त्रास वाटेनासा झाला.
तिला याची काहीच कल्पना नव्हती.ती नवीन ठिकाणी ,परक्या घरात शिक्षणासाठी आली होती.माझ्यासारखीच गाववाल्याच्या घरी तिची सोय तिच्या आई वडिलांनी केली होती.ती कुणाला मावशी, कुणाला ताई म्हणत होती आणि तिने माझा चक्क दादा करून टाकला आणि मी जरा नर्व्हस झालो.
पण ती गणित आणि इंग्लिशचे धडे घ्यायला स्वत:हूनच यायला लागली.मला पण एका प्रिंटींग प्रेसमध्ये नोकरी लागली होती. आणि मी माॅर्निंग काॅलेजला ॲडमिशन घेतली.

मी काकूंची छोटी छोटी काम करायला सुरूवात केली, जेणे करून मला त्यांच्या घरी रोज २/३ वेळा जाता येईल.माझ्या लक्षात आलं की हिला केसात फुलं माळायला फार आवडतात.तिचे केस पण चांगले लांबसडक होते.दर रविवारी जेव्हा केसांवरून नहाण्याचा कार्यक्रम असायचा तेव्हा शिकेकाईचा घमघमाट नाकात भरून घेताना एकदा सावंत काकांनी हटकलं होतं. विचारत होते काय रे भटा तुला माशांचा वास एव्हढा आवडतो?? त्या वासावर जेवतोयस की??मी आपला कसनुसा हसलो आणि माझी चोरी पकडली गेली नाही म्हणून जरा सुखावलो होतो.
मी आता काकूंना रोज फूलं द्यायला लागलो, त्यांना म्हटलं तुमच्या देवीसाठी आणतो.खरं म्हणजे हिला फूलं खूप आवडायची.पण तिच्या काही लक्षात आलं नव्हतं, मग मीच एक दिवस काकूंना म्हटलं काकू ही फूलं केसात माळली तरी चालतील ना??मग काकू स्वत: पण फूलं माळायच्या आणि हिला पण द्यायच्या.कधी कधी मोगरा नाहीतर मदनबाण मिळाला की ही स्वत: बाहेर बसून सुरेख गजरा तयार करत असे.मग तो गजरा केसात माळल्यावर हिचं गुणगुणणं दिवसभर चालूच असायचं.
आतापर्यंत चाळीतल्या टवाळ मुलांच्या लक्षात यायला लागलं होतं काहीतरी वेगळे चालू आहे. त्यांनी माझी टवाळी करायला सुरूवात केली होती.सारखं मला दादाभाई नवरोजी म्हणायचे.
मग विचार केला की आता हिम्मत करून आपल्या भावना हिच्या पर्यंत पोचवायच्याचं.मग बिनाका गीतमालावर ऐकलेलं “फूल तुम्हे भेजा है खतमे”आठवलं.आणि हिम्मत करून एका लिफाफ्यात सोनचाफा ठेवला आणि तो लिफाफा तिच्या गणिताच्या वहीत ठेवला.नशीब तो लिफाफा काकूंनी नाही बघितला.हिने तो लिफाफा बघितला आणि मला म्हटलं” दादा,तुम्ही फूल माझ्या हातात द्यायला पाहिजे होतं. लिफाफ्यात ठेवल्यामुळे चुरगळलं ना फूल. आता डोक्यात माळता नाही येणार मला.”
तिने तो गुलाबी लिफाफा दिला परत आणि फूलाच्या पाकळ्या वासासाठी वहीतच ठेवल्या.
लिफाफा परत घेताना माझ्या मनाला झालेल्या वेदना तिच्या लक्षात नाही आल्या.ती खूष होती आणि वहीचा वास घेत होती.
तिला आपलं प्रेम समजावं यासाठीचा माझा आटापिटा चालू होता.चाळीत खूप जणांच्या लक्षात माझं वागणं लक्षात यायला लागलं होतं. येता जाताना सावंतकाका नाहीतर पडबिद्री विचारायचे काय नोकरी आणि अभ्यास यातच लक्ष आहेना?? का भरकटतंय मन??टवाळ मुलं मला दादाभाई नौरोजी म्हणत होते.
शेवटी एक दिवस तिच्या शाळेच्या वाटेवर उभा राहिलो.आणि तिला सांगितलं तू मला दादा म्हणू नकोस. तर हिचे आपलं मग काय म्हणणार? तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा नांवानी कसं हाक मारणार??
मी तिला सांगितले की तू नुसतं अहो म्हटलंस तरी चालेल.
पण हिचं आपलं एकच पालुपद अहो नवर्याला म्हणतात . मी काय तुमची बायको आहे का अहो म्हणायला.मी तुम्हाला दादाच म्हणणार.
मी एव्हढा वैतागलो होतो की तिला म्हटलं तू जर मला दादा म्हटलंस तर मी तुला शिकवणार नाही.
त्यामुळे ती शिकायला यायची बंद झाली मग चाळीतल्या टवाळ मुलांनी चिडवायला सुरूवात केली दादाभाई नवरोजींचे काहीतरी बिनसले आहे.
मग तिच्या मैत्रीणींनी तिला सांगितले की अगं कदाचित त्याचे तुझ्यावर प्रेम असेल.म्हणून रोज रोज फूलं आणून देतो,तरी तुला कळत नाही का?आणि तुला त्यांनी दादा म्हणू नकोस असे पण सांगितले ना.विचार कर काय कारण असेल.

मैत्रीणीनी असे लक्षात आणून दिल्यावर ती मला टाळायला लागली.मग मी पण फक्त घिरट्याच घालत राहिलो.प्रेम व्यक्त कसं करावं काहीच कळत नव्हतं असे बरेच महिने गेले निघून .
आता तिला पण माझी सवय झाली होती. मला घरी यायला उशीर झाला की ती रूमच्या बाहेर ऊभी असायची.मी आलेलं बघितलं की आकाशाकडे बघत नमस्कार करून घरात पळून जायची.
आणि तिची नजर मला शोधायची.उगीचच गॅलरीत येऊन सुकलेले कपडे खालीवर करायची.काहीतरी गोडाचं केलं की वाटी घरी यायला लागली. माझ्या चुलत भावानी विचारलंसुद्धा हल्ली काकू एव्हढ्या लाड का करतायत.
मग सुट्टीच्या दिवशी काहीतरी कारण सांगून ती बाहेर पडायची निघताना काकूंना जरा मोठ्याने सांगायची मी जरा बागेत जाऊन येते.मग मी पण बाहेर पडायचो आणि रस्त्याच्या दुसर्या कडेने चालत रहायचो. लक्ष मात्र एकमेकांकडे असायचं.कधी शब्दाची देवाणघेवाण झालीच नाही.पण दोघंही रविवारची वाट बघत असायचो.
एक रविवारी काकूंकडे पूजा होती त्यामुळे त्या दिवशी बाहेर पडता आले नाही.नंतर बघितले तर ही एकटीच बाहेर ऊभी राहून डोळे पूसत होती. मी इतका अगतिक झालो होतो की आपण तिचे डोळे पूसू शकत नाही.पण तेव्हाच मनाशी ठरवलं काहीही झालं तरी हिच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही .
हिला काही सांगून फायदाच नव्हता.मग हिच्या मैत्रीणीला गाठलं. ती त्यातल्या त्यात हुशार होती या विषयात.ना.सी.फडके हे तिचे आवडते लेखक त्यामुळे मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगताच तिने मला मदत करीन असे सांगितले.
रविवारी ती हिला घेऊन बागेत आली आणि तिने सरळ हिला सांगितले की ह्यांचं तुझ्यावर प्रेम आहे.तुझं काय म्हणणं आहे यावर??यावर हिचे बोलणे??????
ही नुसती लाल लाल झाली होती. मी तर निराशच झालो, मला वाटले ती रागाने लाल लाल झालीय. त्यामुळे थोडा घाबरलोसुद्धा.त्या दोघींना तिथेच सोडून बागेतून तडक घरी आलो.त्या दिवशी न जेवता तसाच झोपलो. भावाने विचारले तब्येत बरी आहेना, मी मानेनीच हो म्हणून सांगितले.
नंतर तिच्याकडे बघायची हिम्मत होत नव्हती, एक आठवडा तसाच गेला मग हिच्या मैत्रीणीने सांगितले की रविवारी ४ वा. बागेत या तेव्हा जरा गर्दी कमी असते. मी ३ वाजताच घरातून निघालो आणि मारूतीच्या देवळात जाऊन बसलो. रात्री उशीराच परत आलो. काकूंनी आवाज दिला काय रे यशवंता फूलं आणत नाहीस तो??
मी आपलं हां काकू तो फूलवाला गावाला गेलाय सांगून वेळ मारून नेली.
मग हिच्या मैत्रीणीने शेवटी रस्त्यात गाठलंच. “काय हो प्रेमवीर, कुठे गेले तुमचे प्रेम?? का आला नाहीत बागेत?”
मी म्हटलं “ अहो तुम्ही बागेत गर्दी नसताना बोलावलंत.मला वाटलं आता आपलं काही खरं नाही.”
हिच्याकडे बघितलं तर ही आपली गालातल्या गालात हसत होती.हिची मैत्रीण म्हणाली “अहो, असे घाबरून प्रेम वगैरे होत नसतं.तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार आम्ही? मध्येच घाबरून पळून गेलात तर?”

हे ऐकल्यावर हिने मैत्रीणीकडे बघून डोळे वटारले आणि तिचा हात दाबून तिला जरा दटावले.मला मैत्रीण बोलली ते हिला आवडलं नव्हतं. मी जरा सुखावलोच.आपल्याबद्दल हिला काहीतरी वाटतेय,या विचाराने जरा हुरूप आला.
मग रविवारी ४ वा. आमची भेटण्याची वेळ ठरली. त्या भेटीत आम्हाला हिच्या मैत्रीणीकडून खूप सूचना मिळाल्या.
म्हणजे भेटी कशा ठरवायच्या,कुठे भेटायचे वगैरे त्यासाठीची एक सांकेतिक भाषा ठरली.
त्याप्रमाणे आमच्या भेटायच्या जागा, वेळ ठरायची.म्हणजे केसावरून हात फिरवणे, टाॅवेल वाळत घालणे किंवा वेणी पुढे मागे करणे.आणि मग कित्येक महिने आम्ही त्यात यशस्वी झाले होतो.कधी बागेत, कधी रेल्वे प्लॅटफार्मवर तर कधी देवळात भेटयचो. एकदा तर काकूंनी हिला मच्छी मार्केटमध्ये पाठवलं होतं, तिकडे जोडीने गेलो होतो.
आमची ही आयडिया चाळीतल्या टवाळ मुलांच्या लक्षात आली मग ती बदलावी लागली.
मग पत्र लिहायचे म्हणजे लांबलचक नाही पण २/४ शब्दांचे पत्र त्यात कुठे भेटायचे , किती वाजता वगैरे. ते पत्र शेजारच्या बंड्याकडे द्यायचे मग तो चाॅकलेटच्या बोलीवर ते पत्र पोचवायचा. पण एकदा ते पण त्या मुलांच्या हाती लागले आणि आमचं बिंग ऊघडं पडलं .कारण ते लोक येता जाता स. का. पाटील ऊद्यान ४ वा. असं सारखं घोकायला लागले मग ते पण बंद झालं.
एका पत्राचे तर सार्वजनिक वाचन झाले होते
एकदा झोप येत नाही म्हणून झोकात प्रेम पत्र लिहीले, ते लिहीता लिहीता मला झोप अनावर झाली आणि मी बाहेर गॅलरीत झोपत असल्यामुळे कुणीतरी हळूच काढून घेतले.
अर्थात त्या पत्राचं जाहीर वाचन सुरू झालं,मुद्दाम ही इकडून तिकडून जाताना.
तिला माहित नव्हतं कि ते मीच अर्धवट लिहीलेलं पत्र आहे पण मीच गाढवपणा करून तिला सांगितलं. मी लिहीलेलं पत्र कुणीतरी मला झोप लागल्यावर पळवलंय, आणि त्याचे जाहीर वाचन चालू आहे.हिला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिने माझ्याशी अबोला धरला. तिचं म्हणणं मी असा वेंघळेपणा केलाच कसा??
तिचा रुसवा काढण्यासाठी मला फार प्रयत्न करावे लागले शेवटी कशीबशी समजूत काढली.
गोष्टी सुरळीत होतायत असं वाटत असताना एक नवीनच संकट ऊभं राहीलं.हिच्या भावानी तिच्यासाठी स्थळं बघायला सुरूवात केली.आता मी ठरवलं कि घरी सांगून घरच्यांची संमती घ्यायची. नाहीतरी दोघांचे भागेल एव्हढा पगार होताच आणि आई पण विचारत होती मामाची मुलगी करणार का म्हणून.
मी ४ दिवसाची रजा काढून रत्नागिरीला गेलो. आई/वडिलांना सगळं सांगितलं की ते संमती देतील असं वाटलं होतं पण जात आडवी आली. आईचं म्हणणं तिला फक्त कोकणस्थ ब्राम्हणच मुलगी सून म्हणून पाहिजे. देशस्थ किंवा कर्हाडे पण चालणार नाही. आणि परजातीच्या त्यातून मांस/मच्छी खाणार्या मुलीशी लग्न केलं तर घराचे दरवाजे कायमचे बंद. आम्ही मेलो तरी आमचं तोंड बघायचं नाही.आई वडील दोघंही एकदम कर्मठ.
तसाच निराश होऊन परत आलो. तर मुंबईत आल्यावर आणि एक बातमी वाट बघत होती. हिला बघायला आलेल्या पहिल्याच स्थळाकडून पसंती आली होती. काकू खूप खूष होत्या. मुलाचे स्वत:चे ४ खोल्यांचे घर होते, सरकारी नोकरी होती.
सरकारी नोकरी म्हणजे सुख ,अशीच लोकांची धारणा होती.
आमच्या खाणा खूणा झाल्या आणि दुसर्या दिवशी भेटायचं ठरवलं.हिच्या मैत्रीणीला पण बोलावलं म्हटलं तिच्याकडे काहीना काही उपाय असेलच. हिने तर आल्या आल्या रडायलाच सुरूवात केली.मला काहीच सूचत नव्हतं. हिची मैत्रीण माझ्याकडे बघायला लागली मी नाही अशी मान हलवली आणि तिला कळलं मला संमती नाही मिळाली.
मग तिने आधी हिला शांत करायला सुरूवात केली.तिला विचारलं की मुहूर्त कधीचा आहे? ही म्हणाली अजून गुरूजींनी मुहूर्त सांगितला नाहीय.
मग त्या मैत्रीणीने मला विचारलं ,तुमच्या बरोबर कुणी येऊ शकेल असा मित्र आहे का?२ असतील तर बरं होईल. नाहीतर मला माझ्या भावाला सांगायला लागेल. आणि आमची एक मैत्रीण आहे तिला बोलवू म्हणजे ४ साक्षीदार झाले २ तुमच्या कडून २ हिच्याकडून.
मग खोली भाड्याने बघायला सुरूवात करूया, असं ठरलं.
नशीबाने थोडे पैसे होते त्यात एक खोली भाड्याने मिळाली.आता कामावरून थोडं कर्ज काढलं आणि मंगळसूत्राची खरेदी करायला निघालो. पण फार पैसे लागणार होते म्हणून हिच्या मैत्रीणीच्या सल्ल्याने मंगळसूत्राच्या वाट्या घेतल्या आणि काळे मणी घेतले.आणि तिनेच काळे मणी आणि वाट्या ओवून मंगळसूत्र तयार केले.कारण थोडे पैसे स्वैपाकासाठीची भांडी, स्टोव्ह पाणी भरण्यासाठी पिंप वगैरे साठी शिल्लक ठेवले.

तोपर्यंत कोर्टात नोटीस दिली होती.
पण चाळीतल्या टवाळ पोरांना कुणकुण लागली काहीतरी गडबड आहे.त्यांनी हिच्या दादाला लक्ष ठेवायला सांगितले आणि त्याने आम्हाला दोघांना बोलताना बघितले. ही घरी पोचली तेव्हा तो वाटच बघत होता. त्याने हिला विचारलं तुम्ही दोघं नाक्यावर उभं राहून का बोलत होतात.काही लपवण्यासारखं काही आहे का?? हिने नाही म्हणून सांगून त्याचा काही विश्वास बसला नाही.
त्याने फर्मान काढले की हिला एकटीला बाहेर जाऊ द्यायचे नाही.कुणीतरी बरोबर सोबतीला असेल तरच बाहेर पाठवायचं. चाळीत या दोघांबद्दल कुजबुज चालू आहे. मुलाकडच्या लोकांपर्यंत काही पोचले तर लग्न मोडायचं .

मी दुसर्या दिवशी रोजच्या प्रमाणे काकूंना फूलं दिली, त्यांनी ती घेतली पण मला जवळ बसवून घेतलं आणि अगदी प्रेमाने समजवले .”अरे यशवंता,आता ना तू फूलं आणू नकोस हो,
आमचा राम आणतोय फूलं. तुला कशाला त्रास?”
मी त्यांना म्हटलं,अहो काकू त्रास कसला त्यात, तेव्हढाच पूजेला हाथभार म्हणून मी आणतो हो फूलं.पण तुम्ही म्हणत असाल तर नाही आणणार मी ऊद्या पासून फूलं.
काकूंना जरा अवघडल्यासारखं वाटत होतं पण मुलाचं म्हणणं पण पटत होतं. मग मी घरी आलो तर गॅलरीत टवाळ मुलं फिदी फिदी हसत होती, एकजण म्हणाला पण आले प्रेमवीर. मी त्यांच्या चिडवण्यकडे दुर्लक्ष केलं पुस्तक वाचत बसलो.
हीची मैत्रीण रोज गप्पा मारायला तिच्याकडे जात होती त्यामुळे एकमेकांची खूशाली कळत होती.नोटीस देऊन २५ दिवस झाले होते आता खरी परिक्षा होती ती म्हणजे हिला घरातून बाहेर कसं काढायचं याची. मग हिच्या मैत्रीणीकडूनच एक आयडिया मिळाली. हिचे काही नवीन फॅशनचे ब्लाॅऊज होते तसे शिवायचे म्हणून तिने २ ब्लाॅऊज मागून घेतले.ते स्वत:कडे ठेवले.मी २ साड्या २ मॅचिंग परकर असे तयार ठेवले होते बाकिचं सामान लग्नानंतर खरेदी करू असं ठरवलं होतं. या सगळ्यामध्ये हिच्या मैत्रीणीची खूप मदत होत होती.

आणि तो दिवस ऊजाडला.............

सकाळी १० /११ वाजता चाळीतली वर्दळ जरा कमी असते म्हणून आम्ही जेवणानंतरची वेळ रजिस्ट्रारकडून घेतली होती.हिच्या मेत्रीणीनी सांगितल्याप्रमाणे हिने सकाळपासून ३/४ वेळा पोटांत कळ येण्याचे नाटक केले होते. त्यामुळे परत ११ वा. ही जेव्हा संडासला जायला निघाली तेव्हा काकूंनी विचारले अगं औषध आणायला जाऊया काय? का घरचंच औषध घेतेस. हिने म्हटलं नको डाॅ. नको घरचंच घेते.

तेव्हा संडास बाहेर असायचे ते आमच्या फायद्याचं ठरलं.
तिने डबा संडासात ठेवला आणि हळूच चाळीच्या बाहेर पडली. चाळीच्या बाहेर हिची मैत्रीण आणि माझा मित्र टॅक्सी घेऊन उभे होते.त्या टॅक्सीत बसून ती आम्ही भाड्यानी घेतलेल्या खोलीत आली. साडी बदलली आणि रजिस्ट्रार ॲाफिसमध्ये आली.मी नेहमीप्रमाणे सकाळीच निघालो होतो. आणि ॲाफिसमध्ये अर्धा दिवस सुट्टी घेतली आणि रजिस्ट्रार ॲाफीसमध्ये पोचलो.
बरीच लोकं होती. काही लोक कुटुंबाबरोबर आले होते काही आमच्यासारखे पळून आलेले होते.
आमचा नंबर ३.३० वा. आला. सह्या करताना हाथ थरथरत होते.पण एक समाधान वाटत होते आता आपण मोकळे झालो. एकमेकांशी बोलताना कुणी बघेल ही भीती नाही . आपल्याला कुणी वेगळे करू शकणार नाही याचा आनंद पण होत होता. आम्ही दोघांनी एकमेकांना हार घातले आणि रजिस्ट्रार आणि बरोबरच्या लोकांना पेढे दिले.
आता वेळ गृहप्रवेशाची होती.भाड्याच्या खोलीत गृहप्रवेश केला आणि तसेच हिच्या घरी जायचं ठरवलं.कारण हिच्यासाठीची शोधाशोध सूरू असेल आणि काय काय वाढून ठेवलं असेल असा विचार करत चाळीत प्रवेश केला.
“आले,आले “ असा एकच कल्ला झाला.
हिला संडासला जाऊन बराच वेळ झाला म्हणून शोधा शोध चालू होती, नेमकं त्याच वेळेला पोस्टमननी एक पोस्ट कार्ड आणून दिले. ते माझ्या वडिलांनी चुलत भावाला पाठवलं होतं. त्यात मी लग्नासाठी संमती घ्यायला आलो होतो आणि आम्ही संमती दिली नाहीय तरी त्याला ४ समजूतीच्या गोष्टी सांगाव्या , असं लिहीले होते.
ही गायब असल्यामुळे त्या पत्राचं जाहीर वाचन झालं होतं आणि सगळे जण आमच्या स्वागतासाठी उभे होते.आणि काकूंनी रडायला सुरूवात केली “ मी काय सांगू हिच्या आई वडिलांना.कशी तोंड दाखवू त्यांना.”
आम्ही दोघंही खाली मान घालून उभे होतो,आमचं लग्न झालं होतं त्यामुळे आता काय करावं हे त्या लोकांना कळत नव्हतं.माझ्या चुलतभावानी आधीच माझं सामान ट्रंकेत भरून ठेवले होते.मला सांगितलं की आता तुम्हा दोघांना ईकडे राहता येणार नाही.आणि अशा रितीने वधूवरांची पाठवणी झाली.
आम्ही दोघांनी ती रात्र बसूनच काढली.कळत नव्हतं आपलं प्रेम सफल झालं म्हणून आनंद मानावा. या सगळ्यात हिच्या मैत्रीणीची खूप मदत झाली होती. ती सकाळी सकाळी तिच्या घरून पोहे घेऊन आली आणि आम्हाला बळे बळे खाऊ घातले आणि आम्हाला पटकन तयार व्हायला सांगितलं.
आम्ही दोघं तयार झालो आणि ती आम्हाला घेऊन मुंबादेवीच्या देवळात घेऊन गेली. तिकडे देवीच्या पाया पडून झाल्यावर ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. तिच्या आईला तोपर्यंत आमच्या प्रेमविवाहाबद्दल काहीच माहित नव्हतं. सगळं समजल्यावर तिने जवळ जवळ आम्हाला घरातून हाकलूनच दिले आणि आमच्या समोर स्वत:च्या मुलीला आमच्यापासून लांब राहण्यास सांगितलं.
पण एव्हढे असूनसुद्धा ती आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.
पण आमचं दुर्दैव असं की आमच्या लग्नानंतर लवकरच ती आम्हाला सोडून गेली. तिला डबल टायफाॅयड झाला होता आणि त्यातच ती गेली.शेवटी शेवटी तर आम्हाला तिला भेटतासुद्धा येत नव्हतं कारण तिच्या आईने आम्हाला मनाई केली होती.
पण जवळचं कुणीच नसल्यामुळे आम्ही आता एकमेकांची जास्त काळजी घ्यायला लागलो होतो.हिला पण पोस्टात नोकरी लागली आणि मी पदवीधर झाल्यावर बॅंकेत लागलो होतो. चणचण पैशांची नव्हती तर माणसांची होती. मग चाळीतून फ्लॅटमध्ये राहयला आलो.
मी कधीतरी गोमांतकमधून हिच्यासाठी फिशकरी आणायचो पण हिने निक्षून सांगितले की मी आता जोशी आहे त्यामुळे मांसाहार करणार नाही.नदी पूर्णपणे सागरात मिसळून गेली होती. आता नदीचं वेगळे अस्तित्व नव्हतंच.
नंतर मुलं झाली बाळंतपणासाठी माहेरी कधी जाणार असं शेजारी पाजारी विचारायचे पण आम्ही सांगायचो की आई वयस्कर असल्यामुळे नाही जाणार.
या विषयावर बोलायचे नाही असं आमचं जणू ठरलं होतं. कधी चर्चा नाही, कधी रडारड नाही पण एकमेकांच्या घरच्यांबद्दल कुणाला काही कळू द्यायचे नाही हे न बोलताच ठरलं होतं.
खरं तर आम्हाला कधी गोष्टी बोलून दाखवाव्या लागल्या नाहीत.न बोलताच दुसर्याच्या मनातलं कळत होतं.हिची ती मैत्रीण असती तर तुमची मावशी/ आत्या झाली असती.
आता मागे वळून बघताना फक्त एकच खंत वाटते. की आपण हा प्रेमविवाह केला तो आपला स्वार्थ होता का?
आपल्याला दोघांना एकत्र येण्यासाठी आपण जी किंमत मोजली तीची कधी भरपाई होईल का??”
एव्हढे बोलून यशवंतराव थांबले आणि त्यांनी शांताबाईंकडे नजर टाकली. शांताबाईंच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.
त्यांनी फक्त मान हलवून मूक संमती दिली.
यशवंतरावांच्या डोळ्यांत पाणी तरळत होतं.त्यांनी हात जोडले आणि राघव,मीनाला म्हणाले की ,”मला क्षमा करा पण जेव्हा आम्ही लग्न केलं तेव्हा हा विचार कधी केलाच नाही. मुलांसाठी आत्या,काका, मामा, मावशी ही नातीसुद्धा तेव्हढीच महत्वाची असतात. आम्हाला वाटलं होतं की होईल सुरळीत पण आम्हीसुद्धा कधी प्रयत्न केला नाही घरच्यांचे मन वळवण्याचा. जगण्याच्या संघर्षात या गोष्टी राहूनच गेल्या. आम्हाला तुम्ही क्षमा करा.”
राघव आणि मीना झटकन आई,अप्पाच्या जवळ गेले. आणि त्यांचे हात हातात धरून म्हणाले,”अप्पा खरंतर मीच तुमची क्षमा मागायला पाहिजे. सुट्टीत मित्रमंडळी नातेवाईकांच्या घरी जायची खरी पण तुम्ही आम्हाला नवीन नवीन ठिकाणी नेऊन तिथला इतिहास, भूगोल माहित करून देत होतात.आमच्या ज्ञानात दरवर्षी भर पडत होती. पण कधी दुसर्या नातेवाईकांची कमी तुम्ही आम्हाला भासू दिली नाही.आपलं कुटुंब परिपूर्ण आहे. आणि तुम्ही दोघेही आदर्श आई वडिल आहात.”
मीनाचा मुलगा आलोक म्हणाला,” मी ठरवलंय की मी पण आजी आजोबांच्या सारखं लव्हमॅरेज करणार. “
त्याची ताई त्याच्या टपलीत मारून म्हणाली ,”आधी आर्कीटेक्ट तर हो.घर बांध मग घरवाली शोध.”

तिच्या बोलण्याने वातावरण हलकं फुलकं झालं.
राघवने त्या दोघांना दटावून गप्प केलं. तो आणि मीना आपल्या आई वडिलांकडे बघत होते.दोघेही भावुक झाले होते.
यशवंतराव आणि शांताबाई भूतकाळात हरवले होते.
त्यांनी एकमेकांच्या सोबतीने थोडेफार गमवलं होतं पण खूप काही मिळवलं होतं.

सौ सरिता सुभाष बांदेकर

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 7:09 pm | टर्मीनेटर

@सरिता बांदेकर

'प्रेमकहाणी १९६० सालची'

ही तुमची कथा फार आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

सरिता बांदेकर's picture

18 Nov 2020 - 10:15 am | सरिता बांदेकर

धन्यवाद

विजुभाऊ's picture

17 Nov 2020 - 1:54 pm | विजुभाऊ

वा आवडली कथा.
साधी सोपी सरळ

सरिता बांदेकर's picture

18 Nov 2020 - 10:14 am | सरिता बांदेकर

धन्यवाद, गोष्ट ६० च्या दशकातली म्हणून साधी , सोपी.
तेव्हाचं आयुष्य तसंच होतं.

प्राची अश्विनी's picture

18 Nov 2020 - 10:01 pm | प्राची अश्विनी

+11

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2020 - 9:58 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,
मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे
पण कथा वाचल्याबद्दल धन्यवाद

स्मिताके's picture

18 Nov 2020 - 9:22 pm | स्मिताके

>> तेव्हाचं आयुष्य तसंच होतं.

हो, खरं.. अगदी डोळयांसमोर उभं केलंत. सुंदर.

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2020 - 9:56 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

अथांग आकाश's picture

18 Nov 2020 - 10:45 pm | अथांग आकाश

प्रेमकहाणी आवडली!!!
.

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2020 - 9:56 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 3:42 pm | ज्ञानोबाचे पैजार

१९६० चा काळ अगदी अलगद उभा केला आहे छोट्या छोट्या वर्णनातून,
सुरेख लिहिली आहे, सुरुवातीचा गोतावळा वाचताना कथा अशा वळणाने जाईल असे वाटले नव्हते,
मग अप्पा जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हापासून एकदम घट्ट पकड घेतली कथेने ती शेवटपर्यंत सूटलीच नाही
पैजारबुवा,

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2020 - 9:57 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

मित्रहो's picture

22 Nov 2020 - 10:55 am | मित्रहो

१९६० सालातली प्रेमकथा आवडली. अगदी त्या काळानुसार लिहिली आहे. त्यावेळेस जे शक्य होते त्याचा विचार करुन लिहिली आहे. घरच्यांचा आडमुठेपणामुळे त्या दोघांना एकट्याने आयुष्य काढावे लागले. बाकी कथेच्या शेवटल्या वाक्यात कथेच सार आहे.

सरिता बांदेकर's picture

23 Nov 2020 - 8:57 am | सरिता बांदेकर

धन्यवाद

फ्रुटी's picture

24 Feb 2021 - 3:43 pm | फ्रुटी

छान प्रेमकहाणी

सरिता बांदेकर's picture

25 Feb 2021 - 10:03 am | सरिता बांदेकर

धन्यवाद