body {background-image: url("https://i.postimg.cc/JhGSHjSZ/rsz-1lights-new.jpg");}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding-bottom:16px;background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");}
#borderimg {
border: 10px solid transparent;
padding: 15px;
border-image: url(https://i.postimg.cc/GhRwyFRv/border.png) 30 stretch;
}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
गाई-म्हशी माझे सखे सांगाती
गुरं हाकलायची काठी माझ्या हाती नेमकी कधी आली, हे आता मला आठवत नाही. पण ती काठी हातात आल्यानंतर बरीच वर्षं मी गुरं राखली आणि त्या जोडीला शेतीची कामंही केली.
आमचं गाव तसं ७०-८० घरांचा उंबरा असलेलं एक खेडेगाव. गावात चौथीपर्यंत शाळा. साखर मीठ मसाला कांदे बटाटे इत्यादी गोष्टी मिळतील अशी काही घरगुती किराणा मालाची दुकानं गावात होती. मात्र मोठ्या खरेदीसाठी तीन किलोमीटरवरील गोरेगावला जावं लागे. तीच गत शाळेची. पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी गावातील पोराटोरांना गोरेगावची वाट धरावी लागे. गावातून गोरेगावला जायला तीन रस्ते - एक सरकारी सडक, जिचं आमच्या लहानपणी डांबरीकरण न झाल्याने ती दगड आणि धुळीचा कच्चा पण बर्यापैकी रुंद रस्ता होता. ही सडक वळणा-वळणांनी गोरेगावला जायची, त्यामुळे हा रस्ता 'लाँकट' होता. त्यामुळे पायी चालणारे फक्त पावसाळ्यात सडकेचा वापर करत. इतर वेळी वाहनंच वापरत हा रस्ता. दुसरा रस्ता गावातून होळीच्या शेतातून निघून अगदी सरळ शेतांच्या बांधांवरून सरळ निघत गोरेगावच्या कुंभारवाड्याजवळ सडकेला मिळायचा. हा रस्ता उन्हाळ्यात अगदी धोपट वाटायचा. तसं उन्हाळ्यातही कालव्याचं पाणी आलं की शेतांचे बांध ओले झाले की वाट निसरडी व्हायची, पण तरीही लोक सांभाळत याच वाटेने जायचे. हा रस्ता होता मधला रस्ता. गोरेगावला जाण्यासाठी आमच्या गावातून तिसराही रस्ता होता. त्याचा वापर मात्र आमचे गाववाले कमी आणि उणेगावचे लोक जास्त करत. हा रस्ता काळ नदीला लागून जात जात थेट गोरेगावला मोहल्ल्यात निघायचा. हा रस्ता होता खालचा रस्ता.
मला आता पुसटसं आठवतं की अगदी सुरुवातीला मी गुरं याच रस्त्यांच्या आजूबाजूला असलेल्या शेतांमध्ये राखली. कारण त्या लहान वयात गावापासून फार दूर जायची भीती वाटायची. आमचं गाव एका छोट्याशा डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं. त्यामुळे काही मोठी मुलं डोंगरावर, तसंच डोंगराच्या पलीकडेही गुरं चरायला नेत. ती मुलं सोबत असतील तर मी ही तिकडे गुरं नेत असे. मात्र एकट्याने कधीच तिकडे जाण्याचं धाडस झालं नाही. कारण गाव दृष्टीआड झाला की मला एकट्याला भीती वाटत असे.
शाळेच्या दिवसांमध्ये रोज सकाळी शाळेत जाण्याआधी मला गुरं चारून आणावी लागत. शनिवारी अर्धा दिवस शाळा असायची, तेव्हा संध्याकाळी गुरं चारायला न्यावी लागत. रविवारी दोन्ही वेळा. आणि दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत तर सुट्टी संपेपर्यंत दोन्ही वेळ गुरं चारावी लागत. गुरं चारताना अनेक गंमतीजमती करता यायच्या, मोकळ्या माळरानांवर वारा प्यायल्यागत मनसोक्त हुंदडता यायचं, पाण्यात मनसोक्त डुंबता यायचं, कैर्या, करवंदं, बिब्बा अशा अनेक गोष्टी झाडावरुन तोडून खाता यायच्या. एक ना अनेक गंमतीजमती. मात्र काही वेळा रडवेले करणारे प्रसंगही यायचे.
हल्ली शहरी मित्रांसमवेत पावसाळ्यात कुठे फिरायला गेलो तर जे निसर्गसौंदर्य पाहून ते हरखून जातात, तसं निसर्गसौंदर्य आमच्या गावी नुसतं गावाबाहेर पडलं की दिसायचं. हिरवंगार गवत, ओसंडून वाहणारी नदी आणि नाले, खळखळणारे झरे आणि जोडीला कोकणातील धो धो पाऊस. अशा वातावरणात गुरं राखायला न्यायची मजा काही औरच असायची. अंगावर एक दुमडलेली सिमेंटची पिशवी असायची, जिला जुनी माणसं 'खोळ' म्हणायची, किंवा छत्री असायची. मात्र काहीही असलं तरी पाऊस इतका जोरात यायचा की भिजणं अपरिहार्य असायचं. नदीच्या कडेला जपून जायचो, कारण नदी दुथडी भरून वाहते पावसाळ्यात. चुकून पाण्यात पडलो तरी बाहेर येण्यासाठी जिवाचा आकांत करावा लागायचा, इतका पाण्याला रेटा असायचा. थोडा मोठा झाल्यावर मित्रांसह डोंगराच्या पलीकडे गुरं नेऊ लागलो. तिकडे पंधरा-वीस फूट रुंदीचा ओढा आहे. उन्हाळ्यात त्याला गुडघाभर पाणी असतं. मात्र पावसाळ्यात हा ओढा दुथडी भरुन वाहतो. ओढ्याच्या पलीकडे तेव्हा ओसाड शेतजमीन होती. आम्ही पावसाळ्यात त्या ओढ्यात गुरांना पलीकडे जाण्यासाठी चेपायचो आणि आम्ही गाई-म्हशींच्या शेपट्या पकडून पलीकडे जायचो. जेव्हा पाऊस संततधार पडायचा, तेव्हा या ओढ्यालाही पूर यायचा. आणि या पुरात गुरांच्या शेपट्या पकडून पलीकडे जाणं हे मोठे धाडसाचं काम असायचं. आम्ही ते करायचो, मात्र घरच्यांना त्याची खबर लागू द्यायची नाही. नाहीतर ओरडा खावा लागायचा.
पावसाळ्यातील आणखी एक गंमत म्हणजे खेकडे पकडणं. वर सांगितलेल्या ओढ्यापलीकडील ओसाड शेतजमिनीत खेकड्यांची असंख्य बिळं असायची. आमच्याकडे मुठीच्या आकाराचा ऑफ व्हाइट रंगाचा खेकडा पावसाळ्यात सापडतो. मुठीच्या आकाराचा असल्याने 'मुठ्या' असंच म्हणतात त्याला. या खेकड्याचं इंग्लिश 'वाय' आकाराचं बीळ असतं. बिळाची वरची दोन टोकं जमिनीवर उघडतात, तर खालचं टोक जमिनीत खोलवर जातं. पावसाळा गेला की हे मुठे जमिनीकडील टोकात पुर्ण आठ महिने दडी मारून बसतात (हायबरनेशन) आणि पावसाळ्यात वर येतात. पाऊस पडू लागला की हे मुठे वर येतात आणि कुणाची चाहूल लागताच चटक्न बिळात जातात. हे खेकडे पकडण्याची एक युक्ती आम्ही तेव्हा वापरत असू. एखाद्या बिळावर खेकडा दिसून आत गेला किंवा बिळात खेकडा आहे असा अंदाज आला, तर आम्ही त्या बिळात चिखल आत दाबत असू. जसजसा चिखल पुढे सरकेल, तसा खेकडा पुढे सरकतो. पुढे सरकताना जर तो खेकडा जमिनीकडील टोकात गेला, तर काही उपयोग होत नाही. मात्र खेकडा जर त्या टोकाच्या पुढे असेल, तर चिखलाच्या रेट्यामुळे खेकड्याला जमिनीवरील दुसर्या टोकाने बाहेर पडावंच लागतं. हे दुसरं टोक कुठे आहे हे पाण्याचे बुडबुडे कुठून येतात त्यावरून लगेच कळे. आम्ही हा उपद्व्याप करुन खेकडा बाहेर पडल्यावर तिथे उभा असणारा आमचा सवंगडी पटकन पकडत असे. पकडलेले खेकडे मग आम्ही सुतळीने एकामागोमाग बांधून मुठ्यांची मोठी माळ बनवत असून आणि घरी परतताना ही माळा गुरं राखायच्या काठीला बांधून ती काठी उंचावत युद्ध जिंकून आलेल्या विजयी वीरांच्या आविर्भावात आम्ही गावात शिरत असू.
याच ओढ्यात आम्ही उन्हाळ्यात कधी कधी शिंपले पकडत असू. तसं उन्हाळ्यात या ओढ्याला जेमतेम गुडघाभर पाणी असायचं. मात्र काही ठिकाणी खोल डोह होते, ज्यांना आम्ही आमच्या बोली भाषेत 'ढव' म्हणत असू. या ढवात उन्हाळ्यात शिंपले चांगले मिळत. एक नाक मुठीत धरुन पाण्यात सूर मारायचा, तळाला जाऊन रेतीत हात घालून शिंपला मिळतोय का हे चाचपडायचं आणि शिंपल्यासारखं काही हाताला लागलं की ती वाळू मुठीत घेऊन वर यायचं. पाण्याबाहेर डोकं काढल्यावर पाहायचं की आपण खरंच शिंपला आणला आहे की दुसरंच काही. तसा शिंपले खाण्याचा फारसा सोस कुणाला नसायचा. मात्र शिंपले स्वतः पकडण्याची गंमत वेगळीच असायची.
तेव्हा पाणी असं मुबलक असताना आम्ही मासेमारी मात्र कधी केली नाही. खरं तर गळाने मासे पकडणं अतिशय सोयीचं होतं तेव्हा. एकदा गुरं माळरानावर चरू लागली की वेळच वेळ असायचा आमच्याकडे. मात्र गळ पाण्यात टाकून मासा गळाला लागण्याची वाट पाहत बसणं हा तसा कंटाळवाणा प्रकार असल्याने त्या वाटेला कुणी जायचं नाही.
उन्हाळ्यात गवत वाळून डोंगर-माळरानं ओकीबोकी व्हायची, तरीही गुरं फिरवून आणावी लागायचीच. कुठं थोडंफार वाळलेलं गवत असलं तर असलं, नाही तर नुसताच फेरफटका व्हायचा. दोन-तीन तास झाले की गुरं पाण्यावर न्यायची आणि घरी आणायची, असा शिरस्ता असायचा. पण पावसाळ्यापेक्षा उन्हाळा जास्त चांगला जायचा. कारण पावसाने घातलेली बंधनं सुटायची. 'होल वावर इज आवर' अशी खलाटी (गावालगतची शेती) मोकळी मिळायची. हवी तिकडे गुरं नेता यायची. उन्हाळ्यात मोकळ्या माळरानावर गुरं चरायला लावली की आम्ही 'इटू' नावाचा एक भन्नाट खेळ खेळायचो. एक हातात मावेल इतका लाकडी किंवा चपलेचा वगैरे रबरी तुकडा घ्यायचा, गडी समसमान वाटून घ्यायचे. उजवीकडे साधारण अर्धा किलोमीटर अंतर आणि डावीकडे तेवढंच अंतर सोडून मध्यभागी सर्वांनी उभं राहायचं. दोन्ही टीमनी आपली हादा (हद्द) ठरवायची आणि मग तो इटू काठीने उडवत उडवत आपल्या हद्दीला भिडवायचा. हॉकी या खेळाची ती गावठी आवृत्ती होती. खेळ चालू झाला की आम्ही जिवाच्या आकांताने इटूला आपल्या हद्दीत नेण्याच्या प्रयत्न करत असू. खूप दमायला व्हायचं. कारण इथे बंदिस्त ग्राउंड नसायचं, तर मोकळं माळरान असायचं. कुणी कसाही फटका मारायचा आणि इटू कसाही कुठेही उडायचा.
तेव्हा मी कधीतरी गावातील एकाकडील टीव्हीवर बर्फावरील स्केटिंग पाहून एक वेगळाच खेळ शोधून काढला होता. पावसाळा संपून डोंगरावरचं गवत वाळू लागलं की ते निसरडं होतं. डोंगरउतारावर मळलेली वाट सोडून जर आपण या वाळलेल्या गवतावर चालण्याचा प्रयत्न केला, तर आपण त्या निसरड्या गवतावरून घरंगळत जातो, हे लक्षात आल्यानंतर मला बर्फावरचं स्केटिंग आठवून युक्ती सुचली. मी एक वाळलेल्या बांबूची 'कांब' घेतली. कांब म्हणजे बांबू अनेक भागात उभा चिरल्यानंतर जे तुकडे मिळतात ते. तर अशी एक दोन फूट आकाराची कांब घेतली. तिला बाहेरील बाजूने थोडंसं तेल लावलं. गुरांकडे गेल्यावर डोंगरमाथ्यावर गेलो. ती कांब गवतावर ठेवून त्यावर एकामागे एक पाय ठेवून उकिडवे बसलो. दोन्ही हात दोन्ही बाजूला टेकवले आणि मग होडीची वल्ही वळवावी, तसं हाताने जमिनीवर जोर देत कांब डोंगरउताराकडे सरकवू लागलो. त्या टीव्हीतल्या बर्फावरील खेळाप्रमाणे मी डोंगरउतारावरून वेगाने खाली सरकत होतो. फक्त इथे मी कांबीवर उकिडवा बसलो होतो आणि कांब हाताने सरकवत होतो. माझं पाहून इतर मुलंही हा खेळ खेळू लागली होती. अगदी एकदा ही कांब वेगाने खाली येत असताना एका छोट्या दगडाला अडकून मी त्यावरून उडालो होतो आणि दोन-तीन कोलांट्या खाल्ल्या होत्या. त्यात मी माझा एक दातही गमावला होता. मात्र आम्ही खेळ चालूच ठेवला होता.
मार्च महिना सुरू झाला की गुरांकडे वेगळीच धमाल असायची. कारण तेव्हा जाळीमध्ये कच्ची करवंदं आणि आंब्यांच्या झाडांवर छोट्या छोट्या कैर्या दिसू लागायच्या. कच्ची करवंदं किंवा कैर्या तिखटमिठाबरोबर खायला मजा यायची. एप्रिल-मेमध्ये करवंदं आणि आंबे पिकू लागायचे. करवंदांच्या बहुतेक जाळी खुरट्या असायच्या. त्यामुळे थोडीफार धडपड करून जमिनीवर उभं राहूनच करवंदं काढता यायची. मात्र काही जाळी खूपच मोठ्या आणि उंच असायच्या. अशा जाळींच्या मध्यापर्यंत चढावं लागायचं आणि मग वरची करवंदं काढता यायची. आंबे काढताना मात्र कसरत करावी लागायची. आंब्याच्या झाडावर चढण्यासाठी आम्ही आंब्याच्या बुंध्याला विळखा घालत असू आणि मग हात आणि पाय वर सरकवत झाडावर चढत असू. मात्र जर आंब्याच्या झाडाचा बुंधा कवेत न मावण्याइतका मोठा असेल, तर आमचं नेहमीचं टेक्नीक चालत नसे. अशा वेळी आम्ही जर माळावर गवताच्या मोळ्या असतील, त्या आंब्याच्या बुंध्यालगत एकमेकांवर रचून त्या मोळ्यांच्या साहाय्याने आंब्याच्या झाडावर चढत असू. जर गवताच्या मोळ्या नसतील, तर एखाद्या सवंगड्याच्या खांद्यावर उभं राहून झाडाच्या बुंध्याचा आधार घेत हाताशी येणार्या फांद्यांना लटकत झाडावर चढत असू.
गुरांकडे अशा सार्या गंमतीजमती होत असल्या, तरी काही वेळा काही वेगळ्याच गोष्टी घडत असत. आणि त्यामुळे घरच्यांचा ओरडा खावा लागे. त्यातली एक गोष्ट म्हणजे गुरं चुकणं.
माळरानावर किंवा खलाटीत गुरं चरायला सोडल्यावर आम्ही खेळात दंग होत असू. गुरांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे काही वेळा गुरं चरत चरत नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे जात. काही वेळा गुरं इतकी दूर जात की शोधूनही सापडत नसत. काही वेळा गुरं बाजूच्या गावांमधील शेतात शिरत आणि मग ते लोक गुरांना हाकलत हाकलत आपल्या गावात नेऊन बांधून ठेवत असत. गुरं जर सकाळच्या वेळेत चुकली, तर दिवसभर घरच्यांना न सांगता शोधता येत. मात्र संध्याकाळी गुरं चुकली तर मात्र घरच्यांना सांगावंच लागे. अशा वेळी घरच्यांना सांगितल्यावर ओरडा तर खावा लागेच, मात्र घरच्यांबरोबर रात्रभर ब्याटरीच्या उजेडात गुरं शोधावी लागत. जर कुणी बांधली नसतील, तर दोन-चार किलोमीटरवर कुठेतरी गुरं सापडत. मात्र शेजारच्या एखाद्या गावातील कुणी गुरं बांधली असतील तर तो त्याच्या पिकात गुरं शिरलेली असल्याने सहजासहजी गुरं सोडत नसे. अशा वेळी त्याला विनंती करून, त्याच्या हाता-पाया पडून, तर काही वेळा अगदी नुकसानभरपाई म्हणून पैसे देऊन गुरं सोडवून आणावी लागत.
म्हशींना पाण्यात डुंबायला खुप आवडतं. मग ते पाणी नदीचे प्रवाही पाणी असो वा मोठ्या खड्डयात साचलेलं डबक्यातलं पाणी. मात्र या त्यांच्या आवडीचा आम्हा गुराख्यांना काही वेळा खूप ताप होत असे. म्हशी नदीत शिरल्या की पाण्याबाहेर यायला नाखूश असत. काही वेळा आवाज देऊन त्या पाण्याबाहेर येत. मात्र काही वेळा स्वतः खोल पाण्यात जाऊन त्यांना बाहेर हाकलावं लागे. मात्र म्हशी खुपच खोल पाण्यात गेल्या असतील आणि तितक्या खोल पाण्यात जाण्याचं धाडस नसेल, तर म्हशी स्वतःहून बाहेर येण्याची वाट पाहण्यापलीकडे काहीच करता यायचं नाही.
म्हशींच्या या पाण्यात डुंबण्याच्या आवडीचा सर्वात जास्त त्रास व्हायचा तो दिवाळीच्या सुट्टीत गुरं राखताना. पाऊस थांबलेला असायचा. शेतातलं पाणी आटून चिखल सुकत चाललेले असायचे. काही शेतांमध्ये म्हशींना डुंबता येईल इतपत जरा मोठे खड्डे असायचे. त्यात मात्र पाणी असायचं. त्यामुळे म्हशी त्या पाण्यात डुंबायला जायच्या. मात्र काठावर चिखल गाळ असायचा आणि म्हशी त्या गाळात रुतून बसायच्या. त्यातून बाहेर निघताच यायचं नाही त्यांना. एखादी धडधाकट म्हैस असेल तर जिवाच्या आकांताने जोर करून त्यातून बाहेर पडायची. मात्र म्हैस जर म्हातारी किंवा हडकुळी असेल, तर ती सुरुवातीला थोडी धडपड करून नंतर मात्र अवसान टाकून मान चिखलात टाकून पडून राहायची. मग गावातून माणसं बोलावून आणून दोरी, लाकडी वासे अशा गोष्टी वापरून अगदी युक्तीने अशा म्हशीला काढावं लागे. हे सगळं झाल्यावर घरच्यांचा ओरडा खावा लागत असे, कारण "म्हैस त्या चिखलात गेली, तेव्हा तू कुठे होतास?" असा घरच्यांचा प्रश्न असे.
दिवसातील किमान दोन-तीन तास गुरांच्या सहवासात राहिल्याने आमच्या बालमनात त्या गुरांविषयी प्रेम, जिव्हाळा असे. गाई-म्हशींची, बैलांची नावं ठेवतात. बरीचशी नावं त्यांच्या शारीरिक ठेवणीवरून ठेवलेली असतात. म्हणजे कपाळावर पांढरा ठिपका असेल तर चांदी किंवा चांद्या, म्हैस जाफराबादी असेल तर तिच्या शिंगाना एक विशिष्ट वळण असतं, अशा शिंगाच्या म्हशीला 'गुजरी' हे नाव ठेवलं जात असते. गाईच्या केसांची लव तांबूस रंगाची असेल तर तिचं नाव तांबी ठेवलं जाई. आमची चांदी म्हैस एकदा गौरी आगमनाच्या दिवशी व्यायली होती. तिला जी पारडी (म्हशीचे स्त्रीलिंगी पाडस) झाली, तिचम नाव आम्ही 'गौरी' ठेवलं होतं. गुरं चरायला सोडली की त्यांना नेहमी पुढे पुढे जायचं असतं. अशा वेळी आम्ही त्यांना त्यांच्या नावाने आवाज देऊन मागे फिरायला सांगत असू. एकदा-दोनदा आवाज देऊन जनावर मागे फिरलं नाही, तर आणखी मोठ्याने आवाज वाढवत त्वेषाने आम्ही काय करू हेही सांगत असू. उदाहरणार्थ, चांदी म्हैस माघारी फिरत नसेल तर "चांदे, मांगं फिर, नाय तं व्हलटून मारीन." व्हलटून मारणं म्हणजे हातातील गुरं राखायची काठी फेकून मारणं. गुरांनाही हा राग कळे बहुधा. अशा रागाने मारलेल्या हाकेनंतर गुरंही माघारी फिरत.
मी आतापर्यंत गुरं हाच शब्द वापरला आहे लेखात. या गुरांमध्ये गाई असत, म्हशी असत, बैल असत आणि गाई-म्हशींची पाडसं असत. रेडा क्वचित असे. रेडा जन्मण्याचं प्रमाण कमी असे की रेडा जन्माला आला की त्याला दूध देण्यात आबाळ होऊन तो लहानपणीच मरे, हे मला आता नेमकं सांगता येणार नाही. मात्र पाडसं दगावण्याचं प्रमाण खूप असे. आमच्याकडे देशी गाई असत. त्या देशी गाईंना दूध खूपच कमी असे. एका वेळेला अर्धा लीटर दूध खूप झालं, अशी अवस्था असे. त्यामुळे गाय दुधाच्या घरच्या वापरासाठी पाळली जात असे. मुलींना सासरी गेल्यावर माहेराहून गाय आंदण देण्याची पद्धत होती तेव्हा. आमच्या आईलाही आजोबांनी एक गाय दिली होती. ती गाय आम्ही माझ्या आजोळहून बैलगाडीला बांधून आमच्या गावी आणली होती. तिला ज्या कच्च्या रस्त्याने आणलं होतं, तो रस्ता आज पुणे-दिघी महामार्गाचा भाग आहे. आज त्या रस्त्याने गावी जाताना ती जुनी आठवण मनात ताजी होते.
गावातील बहुतेकांचा दुधाचा व्यवसाय हा शेतीचा जोडधंदा होता. गावात बहुतेकांकडे म्हशी असत. तेव्हाही म्हशींच्या किमती पंधरा-वीस हजाराच्या आसपास असत. म्हैस किती लीटर दूध देते, यावर म्हशीची किंमत ठरते. त्यामुळे दर हंगामात नवीन दुभती म्हैस घेणं परवडत नसे. एकदा व्यायल्यानंतर म्हैस आठ-दहा महिने दूध देऊन नंतर माजावर येते. म्हैस माजावर आली की बेभान होते. जर म्हैस गोठ्यात बांधलेली असतानाच माजावर आली, तर जागच्या जागी पाय आपटते, हंबरडा फोडते. मात्र जर म्हैस चरायला नेल्यावर मोकळी असेल आणि मग माजावर आली, तर ती बेभान होऊन पळत सुटते. अशा म्हशीला काबूत आणून रेड्यापर्यंत नेणं एक दिव्य असे. मी वर म्हटलंय तसं रेड्यांचं प्रमाण कमी असे, त्यामुळे काही लोक म्हशींना रेतन करण्यासाठी रेडा पाळत. त्याला चांगलं खाऊ घालून त्याला धष्टपुष्ट केलं जातं. अशा रेडेवाल्याकडे माजावर आलेली म्हैस नेऊन त्याच्या रेड्याकडून म्हशीचं रेतन केलं जाई. तसं गोरेगावात पशू आरोग्य केंद्रात कृत्रिम रेतन होत असे, मात्र तसे कुणीच करत नसे. लोकांचा नैसर्गिक रेतनावरच जास्त विश्वास होता. हा प्रकार गाईंच्या बाबतीत नसायचा. जी म्हैस दूध देते, तिला आमच्याकडे 'तानी म्हैस' म्हणतात, तर जी दूध देत नाही, जिला रेडा लावलेला आहे तिला 'पाडशी म्हैस' म्हणतात. बर्याच जणांकडे जितक्या तान्या म्हशी असत, तितक्याच पाडशा म्हशी असत. त्या आलटून पालटून गाभण राहत आणि पाडसाला जन्म देत. हा पूर्ण कालावधी जवळपास दहा महिन्यांचा असतो. बहुतेक वेळा पावसाळा हा म्हैस विण्याचा काळ असे. त्यामुळे दर वर्षी पावसाळ्यात हमखास खरवस खायला मिळे. घरी खरवस बनवल्यानंतर तो शेजारीपाजारी आणि नातेवाइकांमध्ये वाटण्याची पद्धत होती. हा खरवस भेंडीच्या पानात दिला जाई. (खायची भेंडी नव्हे, हे भेंडीचं वेगळं झाड असतं मोठं.)
घरात मी मोठा होतो. त्यामुळे मी गुरं राखायची जी काठी उचलली, ती माझी अकरावी संपल्यानंतरच खाली ठेवली. पुढचं बारावीचं वर्ष मी अभ्यासात झोकून दिलं आणि तेव्हापासून गुरांची जबाबदारी लहान भावंडांनी घेतली. त्यानंतर मी क्वचित कधीतरी गुरं फिरवून आणत असे. पुढे यथावकाश इंजीनियरिंग झालं. नोकरी लागली. अमेरिकेला गेलो. गुरं सांभाळणं हे कष्टाचं काम होतं आणि आता दुधाचा व्यवसाय करण्याची गरज राहिली नव्हती, त्यामुळे मी घरच्यांना गुरं विकून टाकायला सांगितली. पुढे एक महिन्याच्या सुट्टीवर भारतात आलो होतो, तेव्हा रिकामा गोठा पाहून डोळे भरून आले होते. माझ्या बालपणाशी नातं सांगणारा एक दुवा निखळला होता.
आजही कधी बाल्कनीतून पाऊस पाहतो, तेव्हा मला माझ्या बालपणीचा माळरानांवर धो धो कोसळणारा पाऊस आठवतो. डोंगरउतारावर चरणारी गुरं आठवतात आणि मनात ओळी झरू लागतात...
आज दुपारपासून धो धो पाऊस पडतोय
अगदी कोकणातल्या पावसासारखा.
तसा मी इथे आहेच कुठे?
मी आता कोकणातच पोहचलो आहे,
त्या हिरव्यागार डोंगर टेकड्यांवर,
दुथडी भरून वाहणार्या ओढ्यांकाठी
सर सर तिरासारखे पाणी कापत जाणारे तुम्ही
अन तुमच्या पाठोपाठ मी
किती छान होतं ना आपलं आयुष्य?
फक्त आपणच होतो आपल्या आयुष्यात
फक्त तुम्ही आणि मी.
गाव सोडलं आणि त्याबरोबर मी तुम्हालाही सोडलं
आज तुमच्या आठवणींनी मन व्याकूळ झालंय
डोळे भरून आलेत तुमच्या आठवणींनी..
आजुबाजूला कुणी नाही म्हणून बरं आहे,
नाही तर मला थेट पावसातच जाऊन उभं राहावं लागलं असतं.
कुठे असाल तुम्ही सारे आता?
खरं तर तुम्ही नसालच आता,
गाई-म्हशींना कुठे वीसेक वर्षांपेक्षा अधिक आयुष्य असतं...
प्रतिक्रिया
14 Nov 2020 - 12:14 pm | माम्लेदारचा पन्खा
उत्कट लिखाण ....
14 Nov 2020 - 12:39 pm | सोत्रि
वाह्ह!
लहानपणीच्या आठवणी जाग्या करून शेवटी भावूक करून गेला लेख.
गावी गुरं (जित्राबं) राखायला गडी होते, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे त्यांच्याबरोबर बऱयाच वेळा गुरं राखायला जाऊन सुरपारंब्या खेळायचो. धमाल आठवणी आहेत त्या.
विषेशकरून हे:
👍
- (जित्राबं राखलेला) सोकाजी
14 Nov 2020 - 3:14 pm | कंजूस
आयुष्याचा आहे. वाचता वाचता बसलो चिखलात डुंबत.
14 Nov 2020 - 3:18 pm | सिरुसेरि
सुरेख अनुभव . हेच खरे जिवाचे मैतर . रत्नावानी गायी छान , शोभती या माझ्या .
14 Nov 2020 - 3:55 pm | आंबट चिंच
काळजाला भिडणारे लेखन आवडले.
काळ कसा भर्रकन निघुन जातो आणि त्या बरोबर आपलं बालपणही नै?
14 Nov 2020 - 6:28 pm | प्रचेतस
अत्यंत सुरेख लिहिलंय. तुझ्या मनातील गुरांविषयीची आत्मियता माहित आहेच. तुझ्यासोबत तुझ्या गावी फिरताना शेत, नदी, तुझे घर आदी सर्व पाहिलेले असल्याने लेख अगदी मनाला भिडला.
खूप सुरेख.
14 Nov 2020 - 7:09 pm | शा वि कु
कविता काळजाला भिडली.
प्रेम रोमान्स विषयाची व्याप्ती पण नव्याने कळाली :)
14 Nov 2020 - 9:26 pm | टर्मीनेटर
रम्य आठवणी आणि सखे सांगाती आवडले 👍
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
14 Nov 2020 - 11:31 pm | सौंदाळा
अप्रतिम, उत्कट लेख धन्यासेठ,
समारोपाची कवितादेखील सुंदरच.
15 Nov 2020 - 12:16 pm | प्रकाश घाटपांडे
आमच्या शेतात गायी म्हशी असायच्या. त्या सांभाळायला शंकर असायचा. बैलगाडीची कामे गोविंदा करायचा. पानमळ्याचे काम सहादू करायचा. नांगर पाभार चंदू करायचा. गोठा बहीरी सांभाळायची. पंप इंजिनची कामे मारत्या करायचा. मला गायी वासरांकडून डोके चाटून घ्यायला फार आवडायच. म्हशींच्या, किंवा मारक्या बैलांच्या वाटयाला मला गडी जाउ द्यायचे नाहीत.
15 Nov 2020 - 5:25 pm | सुधीर कांदळकर
आपला गुराखी ते अभियंता हा प्रवास केवळ नेत्रदीपक आहे. मुख्य म्हणजे आपण मातीला विसरलां नाहीत. छान लेख, धन्यवाद.
16 Nov 2020 - 9:50 am | कुमार१
सुंदर लेख.
16 Nov 2020 - 10:24 am | निनाद
अगदी चित्रदर्शी लेखन केले आहे, आवडले!
शेवट पण अगदीच चटका वाटला. प्राणी सोडले/विकले की फार त्रास होतो - असे शक्य तो करू नये/होऊ नये
16 Nov 2020 - 6:25 pm | चांदणे संदीप
आयुष्य म्हणजे आठवणींचे मोती. काही लहान काही मोठे. काही शुभ्र काही काळे. त्यातल्या त्यात आपल्या लहानपणीचे मोती टपोरे आणि जास्त चमकदार असतात. ते असेच कधीतरी काढून माळून घ्यायचे असतात.
सं - दी - प
16 Nov 2020 - 7:16 pm | चौकटराजा
मला आठवतेय या झाडाच्या पानातून वा देठातून पोपटी फ्लोरोसेन्स असलेला रंग मिळत असे. आमच्या मूळगावाला ( आन्दर मावळ ) भेन्डीचे ,बकुळीचे, अळूचे ( गोल तपकीरी फळ ), बिट्टीचे ,शेवरीचे अशी आता फक्त नावे उरलीत अशी अनवट झाडे होती. बाकी आम्बा, कळक ,फणस पळस ई ही होती. मी तब्बल ५२ वर्षानी आमच्या गावी गेलो ,ते फाणसाचे झाड अजूनही आहे ! आमच्या घरी रमी, चान्दी अशी नावे असलेल्या म्हशी ,गुजा नाव असलेला बैल ,बैल बैलगाडी सर्व होते. त्या काळी मावळात भरपूर करवन्दाच्या जाळ्या होत्या आज पवनचक्या झाल्या आहेत .सारेच बदलले. आपल्या स्मरण रंजनाने मी ही भूतकाळात गेलो. मस्त लेख आहे हो !
16 Nov 2020 - 9:23 pm | प७९
_/\_
16 Nov 2020 - 9:48 pm | श्रीगुरुजी
बालपणीच्या आठवणी सुरेख!
16 Nov 2020 - 9:57 pm | चित्रगुप्त
अतिशय तरल, उत्कट आणि तेवढाच बारीक सारीक तपशील, न ऐकलेले शब्द आणि शहरी लोकांना दुर्मिळ अशा माहितीने भरलेला लेख अतिशय आवडला. असे समृद्ध बालपण म्हणजे पुढील संपूर्ण आयष्यासाठी मौल्यवान खजिनाच. तुमच्या मागोमाग बालपणीच्या जरा वेगळ्या वातावरणातल्या विश्वात मन ओढले गेले. अनेक आभार
17 Nov 2020 - 12:09 am | स्मिताके
खूप सुरेख. कविता आवडली. पुलेशु.
17 Nov 2020 - 2:18 pm | उगा काहितरीच
सुरेख !
17 Nov 2020 - 7:57 pm | मित्रहो
तुम्ही आम्हाला तुमच्या बालपणात घेऊन गेलात. अगदी तुमच्यासोबत गाई म्हशी घेऊन रानात फिरतोय, मधेच पाण्यात डुंबतोय अशा भावना निर्माण झाल्या. खूप गोड आठवणीचे खूप सुंदर कथन. रेडे का जगत नाही याचा खरच शोध घ्यायला हवा. दूध तर म्हैस असली तरी तोडले जाते.
सर्वत्र सारख्याच समस्या आहेत. विदर्भात सुद्धा आता गाई म्हशी कमी झाल्यात, कारण चाऱ्याला परवडत नाही. बैल सुद्धा शेतातील मोजक्या कामात लागतात सर्वत्र यांत्रिकीकरण. चुकीचे आहे असे नाही कारण त्याशिवाय उत्पादन वाढत नाही.
17 Nov 2020 - 9:40 pm | तुषार काळभोर
तुम्ही तर एकदम अस्सल गाववाले निघालात.
18 Nov 2020 - 12:13 am | सान्वी
हे सगळं वातावरण मामाच्या घरी अनुभवलं आहे. माझ्या आजोळी शेती होती आता मामा करतो. पूर्वी गोठा गुरांनी भरलेला राहायचा, गाडीसाठी आणि शेतकामासाठी बैलजोडी, गाई, शेळ्या असे सगळे एकत्र सुखनैव नांदायचे. धारोष्ण दूध आणि त्याची चव न विसरण्यासारखी. शेळ्यांच्या दुधाला थोडासा वास यायचा कसलातरी पण पौष्टिक असायचे. आता चाऱ्याची उपलब्धता आणि यांत्रिकीकरण यामुळे खूप कमी प्रमाण झालंय. गाईंच्या डोळ्यातले भाव मला खूप शांत आणि प्रेमळ वाटत आलेत नेहमीच.
18 Nov 2020 - 2:31 am | गामा पैलवान
सतिश गावडे,
सुंदर लेख आहे. प्रत्ययी आहे. सगळा काळ डोळ्यासमोर उभा राहिला.
आ.न.,
-गा.पै.
18 Nov 2020 - 11:26 am | गोंधळी
रम्य आठवणी.
मस्त..
18 Nov 2020 - 12:54 pm | चौथा कोनाडा
व्वा, किती सुरेख लिहिलंय ! गाई-म्हशीच्या जगात रंगून गेलो वाचताना. चित्र तंतोतंत डोळ्यापुढं उभं राहिलं.
गुरं चारताना अनेक गंमतीजमती करता यायच्या, मोकळ्या माळरानांवर वारा प्यायल्यागत मनसोक्त हुंदडता यायचं, पाण्यात मनसोक्त डुंबता यायचं, कैर्या, करवंदं, बिब्बा अशा अनेक गोष्टी झाडावरुन तोडून खाता यायच्या.
निसर्गसौंदर्य आमच्या गावी नुसतं गावाबाहेर पडलं की दिसायचं. हिरवंगार गवत, ओसंडून वाहणारी नदी आणि नाले, खळखळणारे झरे आणि जोडीला कोकणातील धो धो पाऊस. अशा वातावरणात गुरं राखायला न्यायची मजा काही औरच असायची.
👌
हे आणि असे बाकीचेही परिच्छेद हे म्हंजे परफेक्ट शब्दपेंटिंग !
शेवटाला दिलेली रचना देखजील सुंदर !
वाह, सगा साहेब _/\_ !
18 Nov 2020 - 2:48 pm | बबन ताम्बे
बालपणीच्या रम्य आठवणीत घेऊन गेलात तुम्ही. शेवट तितकाच भावूक करून गेला. ज्यांचे खेड्यात बालपण गेलेय त्यांच्यासाठी हा तुमचा लेख पुनः प्रत्ययाचा आनन्द देतो. अतिशय उत्कट लिखाण.
19 Nov 2020 - 11:07 am | ज्ञानोबाचे पैजार
सुरेख लिहीले आहे धनाजीराव
पैजारबुवा,
19 Nov 2020 - 11:12 am | बेकार तरुण
लेख खूप म्हणजे खूपच आवडला....
19 Nov 2020 - 11:58 am | आवडाबाई
सध्या सुरु असलेल्या how it started-how it's going ट्रेन्डसाठी योग्य !
19 Nov 2020 - 1:13 pm | प्रदीप
सहजसुंदर लिखाण अतिशय आवडले.
21 Nov 2020 - 5:48 pm | सतिश गावडे
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार !!!
हल्ली तसे काही लिहायचा कंटाळा येतो, मात्र दिवाळी अंकाच्या निमित्ताने लिहीता झालो आणि मिपाकरांना हे स्मरणरंजन आवडलं हे वाचून छान वाटलं.
24 Nov 2020 - 8:31 pm | अभिजीत अवलिया
आठवणी आवडल्या. गुरे राखायला मिळाली नाहीत पण दर मंगळवारी शाळेचे पटांगण शेणाने सारवायचे असा नियम होता. ते शेण गोळा करण्याच्या नावाखाली दोन तीन लेक्चर बुडवून बोंबलत फिरणे, नदीवर जाऊन मासे पकडणे, करवंदे गोळा करत फिरणे अशा गोष्टी करायला खूप मजा यायची.
26 Nov 2020 - 3:32 pm | राजेंद्र मेहेंदळे
कोकणातले त्यावेळचे जीवन सही सही डोळ्यापुढे उभे केलेत. पनवेल,वडखळ,आपटा,पेण,नागोठणे,रोहा,माणगाव,महाड्,गोरेगाव सारख्या कुठल्याही कोकणी गावाला सहज उपलब्ध असणारा निसर्ग, शांत जीवन यांत्रिकिकरणाने हळुहळु संपवले आहे याची भयाण जाणीव पुन्हा एकदा झाली. आता सगळीकडे एन.ए./सातबारा,गुंठेवारी नाहीतर मामाचा गाव वगैरे गोंडस नावे दिलेली खिसा रिकामा करणारी रिसॉर्ट.
कालाय तस्मै नमः
7 Dec 2020 - 7:41 pm | अनिंद्य
निसर्ग- गुरांसोबतचे जगणे, स्मरणरंजन आवडले.
8 Dec 2020 - 2:59 pm | गोरगावलेकर
बालपण खेडेगावातच गेले असल्याने सर्व गोष्टी जवळून अनुभवल्या आहेत.
8 Dec 2020 - 4:03 pm | Rajesh188
आणि बालपणीच्या सुरेख आठवणी आयुष्यातील असा काळ जो नेहमीच हवाहवासा वाटतो.
आयुष्यातील सुवर्ण क्षण च म्हणा ना.
तुमचा लेख वाचता वाचता आम्ही पण आमच्या त्या काळात गेलो .
डोंगर दर्यात फिरलो आठवणी ताज्या झाल्या.
शेवटच्या ओळी तर खूप च छान.
9 Dec 2020 - 1:43 pm | Rajesh188
आमच्या घरी 2 म्हशी,1 वासरू पूर्ण वाढ झालेले,आनि 2 शेरड्या आणि त्यांची पिल्ल असे प्रकार होते .
ह्या जे गायीचे वासरू होते त्याचा आणि माझा 36 चा आकडा होते मोका बघून त्याचा पूर्ण राग ते माझ्यावर काढायचे .
तरी त्याला पण मी घेवून डोंगरात जात असे .
पावसाळ्यात .
गौरी नावाची म्हैस होती तिला ते वासरू जबरदस्त घाबरून असायचे त्या मुळे माझी रक्षण karti तीच गौरी असायची तिच्या पासून लांब आणि त्या वासराच्या जवळ शक्यतो जातच नसे.
डोंगरात गुर सोडली की डोंगरातून वाहणाऱ्या झर्या न वर लहान लहान धरणे बांधणे असेल उद्योग चालू असायचे .
त्या तीन प्रकारचे तीन.
म्हशी जास्त वर चढू शकत नसत,गायीचे वासरू खूप वर पर्यंत डोंगरात चरत जायचे तर शेर्ड्या अगदी कड्यात अवघड ठिकाणी पण जायच्या.
पण वेळ झाली की ते खाली उतरून येत असत.
11 Dec 2020 - 5:27 pm | नीलकंठ देशमुख
तुम्हीलिहिलेलं प्रथमच वाचले .खूप छान लिहिलंय. लिखाण शैली मस्त आहे .आवडले.
11 Dec 2020 - 5:34 pm | नीलकंठ देशमुख
गावाशी लहानपणी जुळलेलं नातं तुटत नाही. कितीही मोठे झालो तरी. माझे पण असेच आहे. गाव सुटून किती दशके झाली...अजूनही जून्या आठवणी पाठ सोडत नाहीत.