शिवछत्रपतींची तब्बल वीस वर्ष राजधानी असलेल्या राजस दुर्ग राजगडाच्या संरक्षणासाठी आजुबाजुला गडांचा घेरा असणे आवश्यक होता. तसा तो आहे देखील. पश्चिम बाजु तोरण्यासारख्या बलदंड गडाने रोखून धरली तर उत्तर बाजु सिंहगडाने सांभाळली.पुर्वेला पुरंदर सर्व आक्रमणे आपल्या पोलादी छातीवर झेलण्यासाठी समर्थ होता. राहिली दक्षीण बाजु. या बाजुला तुलनेने दुय्यम गड असले तरी तीन गडांची एक साखळी असल्यामुळे एक भक्कम फळी निर्माण झाली आहे. यातील आग्नेयेला रोहिड खोर्यातील रोहिडा उर्फ विचित्रगड खडा आहे, तर गोप्या घाट, वरंध घाट आणि सुपे नाळीवर देखरेख करण्यासाठी कावळ्या किल्ला नजर रोखून बसला आहे. या सर्वांच्या तुलनेत काहीश्या दुय्यम घाटवाटा या परिसरात आहेत. यामध्ये वाघजाई, चोरकणा,चिकणा, कुंभनळी आणि अस्वलखिंड या वाटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या परिसरात एका गडाची उभारणी करण्यात आली. या गडाचे नाव आहे "जननीचा दुर्ग".
अर्थात "जननीचा दुर्ग" हे कागदोपत्री नाव असले तरी परीसरात अथवा गावात किल्ल्याचा पत्ता विचारला तरी उत्तरही अपेक्षित मिळते, “मोहनगड? नाही बा. असलं काही न्हाई इथ्ये. ह्यो डोंगुर दुर्गाडीचा. त्याला जन्नीचा डोंगुरबी म्हणत्यात. ह्ये असं जा रानातून”. त्यामुळे उत्तम म्हणजे पत्ता विचारताना दुर्गाडी किल्ला अथवा जननीचा डोंगर असा उल्लेख करावा.
गडावर चढण्यासाठी वाटा दोन. पहिली वाट दुर्गा मंदिरासमोरूनच सुरु होवून नैऋत्येकडून चढणारी. दुसरी वाट दुर्गामंदिरापासून अजून ४ किमी पुढे जात ‘दुर्गाडी’ गावातून.
या गडासंदर्भात अलीकडच्या काळात झालेली घडामोड म्हणजे पुण्याच्या सचिन जोशीं यांनी २००८ साली केलेल संशोधन. त्यांच्या मते पुर्णपणे विस्मरणात गेलेला मोहनगड उर्फ जसलोडगड म्हणजेच दुर्गाडी/जननीचा डोंगर. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये बाजी प्रभू देशपांडे ह्यांना लिहिलेल्या पत्रात हिरडस मावळातील मोहनगड किल्ल्याचा उल्लेख आहे. पण या किल्ल्याची स्थाननिश्चिती झाली नव्हती. त्यामुळे कावळ्या किल्ला हाच मोहनगड उर्फ जासलोडगड असल्याचे मानले जात होते. (काही अभ्यासकांचे हे मत आजही कायम आहे.) सचिन जोशीच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी जननीचा डोंगर येथे उपलब्ध असलेल्या अवशेषांचा अभ्यास करून व दुर्गस्थापत्याचे निकष लावून मोहनगड हा किल्ला वरंधा घाटातील जननी देवीच्या डोंगरवर होता असा शोधनिबंध ' भारत इतिहास संशोधक मंडळात सादर केला. अर्थात वैयक्तिक मला हे मत मान्य नाही. एकतर महाराजांनी लिहीलेल्या पत्रात स्पष्टपणे तटबंदी व इतर बांधकामे करावी असा आदेश आहे. जननीच्या गडावर नावाला देखील तटबंदी दिसत नाही.शिवाय गडही दुय्यम आहे. तेव्हा हा गड बांधण्यात महाराज सुरवातीच्या कालखंडात फार खर्च करतील असे वाटत नाही. कारण तेव्हा स्वराज्याची उभारणी सुरु होती. तेव्हा अश्या दुय्यम गडावर बांधकाम न करता प्राधान्य महत्वाच्या गडाला दिले जाणार हे ओघाने आलेच. जननीच्या दुर्गच्या तुलनेत कावळ्या केव्हाही महत्वाचा गड असल्यामुळे शिवाय कावळ्या किल्ल्यावरुन मोठा परिसर दिसत असल्यामुळे सहाजिकच बांधकाम करण्यासाठी कावळ्या गडाला झुकत माप दिले जाईल हे नक्की. शिवाय कावळ्या गडाचे क्षेत्रफळही जास्ती आहे. तेव्हा कावळ्या किल्ला हाच मोहनगड उर्फ जासलोडगड असणार.
याशिवाय या गडाचा आणखी एक संदर्भ म्हणजे प्रख्यात साहित्यिक आणि दुर्गप्रेमी श्री. गो.नि.दांडेकर उर्फ अप्पा यांनी गडांच्या पार्श्वभुमीवर काही पुस्तक लिहीली. उदा. राजमाचीच्या पार्श्वभुमीवर "माचीवरील बुधा", राजगडाच्या पार्श्वभुमीवर "वाघरू", तुंगच्या पार्श्वभुमीवर "पवनाकाठचा धोंडी", कर्नाळ्याच्या पार्श्वभुमीवर "जैत रे जैत". तसेच त्यांनी या जननीच्या दुर्गच्या पार्श्वभुमीवर एक कांदबरी लिहीली आहे, "त्या तिथे रुखातळी".
जननीचा दुर्ग परिसराचा नकाशा
मुंबईहुन जननीचा दुर्ग किल्ल्यास भेट देण्यासाठी सर्वप्रथम महाडमार्गे वरंधा घाट गाठावा लागतो. मुंबई ते वरंधा घाट हे अंतर १९२ कि.मी असुन वरंधा घाटात आल्यावर तेथुन ८ कि.मी अंतरावर शिरगाव आहे. शिरगाव पार केल्यावर पुढील वळणावर उजवीकडे दुर्गाडी गावाचा फाटा लागतो. पुण्याहुन भोरमार्गे आल्यास हा फाटा शिरगावच्या अलीकडे डाव्या बाजुस आहे.
शिरगावातून दिसणारा दुर्गाडी / जननीचा दुर्ग ईथून जाताना उजव्या हाताने वर चढायचे.दुर्गाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव शिरगाव पासुन ४.५ कि.मी. अंतरावर आहे. पुण्याहून भोरमार्गे दुर्गाडी हे अंतर १०२ कि.मी आहे पण भोरपासून वरंधा घाटाचा रस्ता अतिशय खराब आहे.
गावकरी याला दुर्गाडीचा किल्ला म्हणून संबोधतात.
शिरगाव गावातून देखील एक वाट आहे परंतु तेथे उभा चढ आहे. दुर्गाडी गावातून किल्ल्याला जायची वाट सोपी आणि कमी चढाची आहे. शिरगाव गावातून किल्ल्याच्या दिशेने पाहता, डावीकडे जी खिंड दिसते त्याच्या पलीकडे दुर्गाडी गाव आहे.
दुर्गाडी गावात हनुमान मंदिराकडे आल्यावर रस्त्याच्या उजवीकडे एक कच्चा रस्ता गावामागील टेकडीवर असलेल्या जननीदेवीच्या मंदिराकडे जातो. गावकऱ्यांनी किल्ल्यावरील देवीचे मंदिर अलीकडील काळात या टेकडीवर बांधले आहे. हे अंतर साधारण १.५ कि.मी. असुन खाजगी वाहनाने आपल्याला या मंदीरापर्यंत जाता येते. यामुळे गड चढण्याचा अर्धा तास कमी होतो. मुक्कामासाठी मंदिर योग्य आहे पण पाण्याची सोय नाही.
मंदिरात ‘जनी अंधारी बाजी’ अशी पाटी. मूळच्या देवळीवर सभामंडप बांधून काढलेला. मंदिरासमोर काही मूर्ती आणि ५-६ वीरगळ मांडून ठेवलेले.
दुर्गाडीहून
दुर्गाडीहून त्या खिंडीपर्यंत एकदम सोप्पा रस्ता आहे.
या वाटेने थोडे वर आल्यावर समोरच दक्षिणोत्तर पसरलेला गडाचा डोंगर दिसतो. या डोंगराची एक धार पुर्वेकडे आपल्या डाव्या बाजुस असलेल्या खिंडीत उतरलेली दिसते. खिंडीत उतरलेल्या या धारेवरूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे.याठिकाणी एक वीरगळ पहायला मिळतो.वीरगळावर शिवलिंगपूजा करणारे साधक आणि वीराला स्वर्गात घेऊन निघालेले देवदूत/ अप्सरा हे नेहमीचे दृष्य दिसते. वास्तविक हा गड तसा दुय्यम, इथे कोणती लढाई झाल्याची नोंद नाही, तरीही हा वीरगळ कोणाचा ? याचे उत्तर मिळत नाही. शिरगावातुन किल्ल्यावर येणारी वाट या खिंडीतच येते.
मंदिराच्या मागील बाजुने वर चढत जाणारी वाट जननीच्या गडावर जाते. या वाटेने गावकऱ्यांची सतत ये-जा असल्याने वाट चांगलीच मळलेली आहे. पुढची वाटचाल उघड्या-बोडक्या उभ्या दांडावरून आहे.सहाजिकच उन्हा असेल तर हा टप्पा त्रासदायक होतो.
या ठिकाणी गडावर जाण्याची दिशा बाणाने दर्शविली आहे. येथुन डोंगर चढुन दोन तीन पठारे पार करत आपण किल्ल्याच्या डोंगराखाली येतो. येथुन थेट किल्ल्यावर जाणारी वाट नसुन किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला या डोंगराला वळसा घालुन जावे लागते. हि वाट घनदाट जंगलातुन जाते. या वाटेने आपण किल्ल्याखालील डोंगराच्या दुसऱ्या टोकावर येतो.
या ठिकाणी गावकऱ्यांनी लहानशी घुमटी उभारलेली आहे. शिरगावातुन गडावर येणारी दुसरी वाट या घुमटीकडे येते. माथ्याला अर्धवळसा घालत आडव्या वाटेने गडाच्या ईशान्य धारेवर आपण पोहोचलेलो असतो.धारेवरून पल्याड जननी दुर्गाचा कातळमाथा आणि पदरातल्या गर्द देवराईची झाडी खुणावू लागलेली असते.
आपण पोहोचलेलो असतो.धारेवरून पल्याड जननी दुर्गाचा कातळमाथा आणि पदरातल्या गर्द देवराईची झाडी खुणावू लागलेली असते.
येथुन गडावर जाण्यासाठी एकच वाट असुन हि वाट कड्याला लागुन पुढे जाते.त्या पुढे धारे वरून चढायच आणि मग कड्याला डावीकडे ठेऊन हिरव्यागार जंगलातून वळसा मारायचा.
खांब टाके
माथ्याच्या २० मी अलिकडे आहे डावीकडे उतरत जाणारी वाट. या वाटेने खाली उतरले असता कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी दिसतात. यातील दोन टाकी मातीने बुजलेली असुन तिसऱ्या खांबटाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. कातळात खोदत नेलेलं दोन साधे खांब असलेलं पाण्याचं टाके. नक्कीच जुनं. फार उपसा नसल्याने प्यावसं वाटावं, असं नितळ नाही. अगदीच पाणी जवळ नसेलच, तर पाणी गाळून घेता येईल.
शेजारी एक कोरडं टाकं अर्धवट खांबांची खोदाई करून सोडलेलं. पल्याड ओहोळापाशी तिसऱ्या टाक्याची खोदाई सुरुवातीलाच सोडलीये. टाकी पाहुन मागे फिरावे व जननी देवीच्या मंदिरात यावे. मोहनगडाची यापुढची वाट बहुतांशी कातळातून, त्यामुळे ठिकठिकाणी कातळात साध्या पायऱ्या खोदलेल्या.
कुठेकुठे पायऱ्या खणताना लावलेल्या सुरुंगासाठी खणलेले खळगे. इतक्या सगळ्या पायऱ्या आणि सुरुंगाच्या खुणा बघता या पायऱ्या नक्की कधीच्या - मूळच्या किल्ल्याच्या, की अलिकडच्या काळात गडावर देवीला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी खणलेल्या हे सांगणं अवघडचं.
पायथ्यापासुन मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी दिड ते दोन तास लागतात.
गडावर मुक्काम करायचा असल्यास ४-५ जण या मंदिरात राहू शकतात. मंदिरात जननी मातेची सुंदर घडीव मुर्ती असुन आवारात तुळशी वृंदावन व नंदी आहे. भिडे नामक स्थानिक भक्ताने इथल्या जुन्या जोत्यावर नवीन जननीचं मंदिर बांधून काढलंय. ते जुनं जोतं मंदिराचंच होतं, की किल्लेदाराच्या घरट्याचे हे सांगणे अवघड.मंदिराच्या मागील बाजुने माथ्यावर जाण्यासाठी वाट असुन माथ्यावर गवतात लपलेला एक लहान चौथरा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही.
मंदिरा मागील पाउल वाटेने वर चढल्यावर आपण किल्ल्याच्या टोकावर पोहोचतो. दुर्गाडी पायथ्यापासून ३०० मी आणि समुद्रसपाटीपासून ११०० मी उंचावर आलेलो. गडावरून अग्गदी जवळ बघितल्यास ६-७ घाटवाटा सहजी दिसल्या - वाघजाई, चिकणा, कुंभेनळी, चोरकणा, कामथे, न्हावणदीण आणि वरंध. या घाटांवर नजर-नियंत्रण ठेवणारं, टेहेळणीचं ठिकाण म्हणून जननीचा दुर्गाचे महत्त्व. इथून नैऋत्येला प्रतापगड, वायव्येला रायगड-पोटला डोंगर ,तळ्ये गावाजवळचं जननीचं शिखर,खाली कोकणात मंगळगड उर्फ कांगोरी दुर्ग उठवलेला,वायव्येला कावळ्या व दक्षीणेला रायरेश्वरचे पठार आणि उत्तरे व पश्चिमेला सह्यकण्यामधील घाटवाटा (फडताड, शेवत्या, भिकनाळ, मढेघाट, उपांड्या, आंबेनळी, गोप्याघाट) आणि उत्तरेला तोरणा-राजगड सहजीच नजरेसमोर होते. ३६० अंशातल्या सह्याद्रीदर्शनाने आणि भर्राट वाऱ्याने आपण फ्रेश झालेले असतो.
गडावर सपाटी अशी नाहीच शिवाय तटबंदी, बुरुज यासारखे कोणतेही बांधकाम दिसत नाही त्यामुळे हा किल्ला असावा का? असा मनात प्रश्न आल्याशिवाय रहात नाही. फारतर मोहनगड जावळीच्या खोऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने, प्रतापगडाच्या युद्धाच्या आधी मोहनगडावरही थोडी पूर्वतयारी केली गेली असू शकेल. त्यामुळे पत्रात उल्लेख केल्या प्रमाणे बाजींनी दुर्गाडी / मोहनगड / जासलोडगड कितपत वसवला असेल या बद्दल शंकाच येते. एकूण केवळ घाट वाटांवर लक्ष ठेवण्याकारीताच दुर्गाडी चा वापर झाला असेल. तोच मोहनगड वा जासलोडगड आहे का याबद्दल अजूनही शंकाच येते.
तरीही ईथला अनवट निसर्ग अनुभवायला आणि भन्नाट भटकंतीचा अनुभव घेण्यासाठी जननीच्या दुर्गला जरुर भेट द्या.
जननीच्या दुर्गाची व्हिडीओतून सफर
माझे सर्व लिखाण तुम्ही एकत्रित वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची
संदर्भग्रंथः-
१) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
२) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
३) साईप्रसाद बेलसरे, समीर पटेल यांचे लिखाण
४) त्या तिथे रुखातळी- गो.नि.दांडेकर
प्रतिक्रिया
31 Oct 2020 - 4:17 pm | मराठी_माणूस
पहिल्या फोटोत लाल फूले दिसत असलेल्या , निष्पर्ण अशा झाडाचे नाव काय आहे ?
31 Oct 2020 - 5:40 pm | स्वच्छंदी_मनोज
त्या झाडाचे पांगारा असे नाव आहे. उन्हाळ्यात खास करून एप्रील मे महीन्यात याला अशी लाल फुले येतात. इंग्रजीत याला कोरल ट्री किंवा याच्या खास फुलांवरून टायगर क्लॉ ट्री असेही म्हणतात.
6 Nov 2020 - 9:02 am | प्रचेतस
उत्तम लिहिलंय.
खांबटाक्यांच्या रचनेवरुन नक्कीच हा दुर्ग प्राचीन असावा. शिवाय वीरगळही १०/१२ व्या शतकातले दिसत आहेत. मस्त एकदम.