डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)

Primary tabs

संन्यस्त खड्ग's picture
संन्यस्त खड्ग in काथ्याकूट
15 Oct 2020 - 2:43 pm
गाभा: 

Eही १७६५ सालची गोष्ट. डेनिस डिडरोट आतापर्यंत ५२ वर्षाचा झाला होता. त्याने खूप जास्त पुस्तके वाचलेली होती आणि जणू त्याची लायब्ररीच त्याच्याकडे होती. तरी त्याने त्याचे पूर्ण आयुष्य गरिबीत काढलेले होते. त्याच्या मुलीच्या लग्नासाठीसुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते.
एकेदिवशी रशियाची त्यावेळेची राणी कँथरीनला डिडरोटच्या ह्या गरिबीबद्दल माहित झाले. तिने डिडरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच ५० हजार डॉलर्स किंवा आताचे जवळपास साडेतीन करोड रुपये डिडरोटला देऊ केले. आणि डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला.
त्याने लगेच त्या पैशातून "स्कार्लेट रॉब" म्हणजे एक उच्च्प्रतीचा सदरा विकत घेतला जो अतिशय महागडा होता. हा सदरा वापरत असतांना त्याला अचानक जाणवले की आपण घालतोय अतिशय उच्चप्रतीचा सदरा आणि आपल्या घरात त्याच उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या, किचन रूममधल्या वस्तू बदलल्या, फर्निचर बदलले आणि अशा सगळ्या नवीन वस्तू विकत घेतल्या ज्यामुळे आता पूर्ण घर आणि सदरा एकमेकांना शोभून दिसत होते.
परंतु हे सगळे करण्यामध्ये तो पूर्णतः कंगाल झाला आणि त्याच्या नावावर असलेले कर्ज जास्तच वाढून गेले. त्याने हे सगळे दुखः कष्टाने सहन केले आणि हे सगळे आपल्या एका निबंधांत नमूद करून ठेवले.
ह्याला मानसशास्त्रात "डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)" म्हणतात. मोठ्या कंपन्या, विक्रेते, डेव्हलपर्स ह्या इफेक्टचा वापर छुप्या पद्धतीने करतात.
तुम्ही ३०००० हजाराचा मोबाईल घेणार. मग तुम्हाला काहीतरी कमी वाटेल मग तुम्ही अजून ५०० रुपयाचा गोरील्ला ग्लास लावणार. ५००-६०० रुपायचे महिन्याला कव्हर बदलणार. जिथे ५०० रुपयाचा हेडफोन कामी आला असता तिथे ३००० चा हेडफोन घेणार कारण तो मोबाईलला जास्त शोभून दिसेल. एखादा निळ्या रंगाचा मस्त शर्ट घेतला की त्याला मेचींग असलेले घड्याळ, किंवा पँट घेणार.घरी मस्त मोठा टिव्ही आणला की चांगला टेबल आणणार, त्याला टाटा स्काय लावणार, HD वाहिन्या सुरु करणार. रंग चांगला लावला की खिडकीला पडदे लावणार, सजावट करणार.
डिडरोट इफेक्ट एका वाक्यात थोडक्यात सांगायचा झाला म्हणजे : "एक नवीन वस्तू विकत घेतली असता तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआप कमी होतो आणि तो वाढविण्यासाठी आपल्या हातून नकळतपणे जास्त खर्च होतो."
तुम्हीच पहा, सगळे विक्रेते छुप्या पद्धतीने डिडरोट इफेक्टचा वापर करतात. एक साधा चहा वाला तुम्हाला चहासोबत सिगारेट देऊ का विचारतो? SIM विकणारा ३ किंवा ४ महिन्याचे packs टाकून द्यायचे म्हणतो, एक laptop विकत घेतांना त्यासोबत २-३ हजाराचा antivirus टाकून मिळतो. लिंबू, आद्रक, टमाटे घेतल्यावर तुम्हाला म्हटले जाते " आले मिरची पण घ्या की!!". भांडे घेतल्यावर त्याच्यावर ५० रुपयात नाव कोरून मिळते, झाडं विकत घेतली की १०० रुपयाला त्याच खत मिळते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.
आपण घेतो एक वस्तू आणि दुसऱ्या वस्तू आपोआप घ्यावेसे वाटतात भले त्यांची गरज आपल्याला नसते . आणि अशा पद्धतीने आपण एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारसे महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू त्या पण गरज नसतांना घेऊन टाकतो. आणि आपल्याला कळतसुद्धा नाही. ह्याला "spiralling consumption" म्हणतात म्हणजे एकामुळे दुसऱ्या अनेक गोष्टी गरजेचे वाटणे आणी विकत घेतल्या जाणे.
लक्षात ठेवा, हा "डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)"!!
ही मानवी मनाची वागणूक आहे, ह्युमन टेन्नडन्सी!! आणि ह्याला थांबवले जाऊ शकते. ह्याचे परिणाम भयानक आहेत का?? मी सांगेल जास्त भयानक आहेत. कारण परिणाम उघड्या डोळ्यांनी नाही दिसत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करतच जातो आणि खूप उशिरा लक्षात येत हे सगळे.
माणसाला खर्च करण्याची भीती वाटत नाही. त्रास होतो तो हिशोब न लागण्याचा!! - व.पु.काळे
तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारायचा. "मला ह्या वस्तूची खरच गरज आहे का?" उत्तर हो आले तर आहे त्या किमतीत न घेता रिसनेबल किमतीत वस्तू शोधावी.
वस्तूंची उपयोगिता किती त्यानुसार त्यांना विकत घ्यायचे, ना की स्वतःचे ते किती स्टेटस वाढवतील त्यामुळे.समोरच्याने दुसरी वस्तू दाखवली तरी भान विसरायचे नाही. लक्षात ठेवायचे की, "वस्तू मस्त, भारी वाटली तरी तिचा तुमच्या आनंदाशी आणि उपयोगितेशी काडीचा संबंध नाही." आनंद वाटत असला तरी तो क्षणिक असतो. कालांतराने आनंद जातो आणि पैसेसुद्धा!!
"डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)"!!
माहिती संदर्भ :
Understanding the Diderot Effect (and How To Overcome It)

#संपादित

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

15 Oct 2020 - 2:46 pm | महासंग्राम

आमच्या उधळपट्टीला असं काही इफ्फेक्ट वगैरे म्हणत असतील माहिती नव्हते. मस्त माहिती

टर्मीनेटर's picture

15 Oct 2020 - 2:58 pm | टर्मीनेटर

रोचक माहिती!
संतपद प्राप्त झालेले लोकं आणि काही तुरळक व्यक्ती ह्याला अपवाद असण्याची शक्यता नाकारली नाही तर जवळपास आपण सर्वांनीच हा "डिडरोट इफेक्ट" व्यावहारिक जीवनात नक्कीच अनुभवला असेल 😀

Gk's picture

15 Oct 2020 - 5:18 pm | Gk

छान

संजय क्षीरसागर's picture

15 Oct 2020 - 10:24 pm | संजय क्षीरसागर

ते चुकून का काही अक्षेपार्ह भाग वगळल्यानं ?

कायप्पावर वाचलंय यापूर्वी.. तुमचेच आहे का ते?

वीणा३'s picture

16 Oct 2020 - 8:06 am | वीणा३

आम्ही यावर २ उपाय करतो :
१. कुठलीही वस्तू हवी असेल आवडली असेल तर कमीत कमी १ महिना घ्यायची नाही.
२. कमीत कमी त्या वास्तूच्या ३ ब्रँड चे ऑनलाईन रिव्ह्यू बघायचे. बरेच वेळा असं झालय कि जी गोष्ट घ्यायची इच्छा होती त्यात काही मोठा प्रॉब्लेम समजलाय जो डील ब्रेकर होता. ती वस्तू घेणं शक्यच नव्हतं.

या उपायांनी आमची आयत्या वेळची खरेदी जवळपास बंद झालीये. आणि याचे फायदे :
१. पैसे वाचतात.
२. वस्तू पडून राहत नाहीत.
३. घरातली जागा पण वाचते.
४. जी वस्तू या सगळ्या चाळणीतून घरात येते ती पूर्ण वापरली जाते.
५. बाहेर फिरायला गेलं कि खरेदीत उगाच वेळ जात नाही, तो अजून भटकायला मजा करायला वापरता येतो.

हे हल्ली मुलाला पण करायला लावतो. काहीही हवं म्हणाला कि १ महिना थांब हे सांगतो. आणि त्यालाहि २-३ ब्रँड चे २ चांगले २ वाईट रिव्ह्यू वाचायला लावतो. त्यालाही सवय लागलीये याची आता.

अगदी हेच लिहिण्यासाठी मी स्क्रोल केले होते .

खालील नियम पाळते :
- एका दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त खर्च करायचा तर किमान ५ दिवस आणि एक आठवड्याच्या कमाई पेक्षा जास्त खर्च करायचा असेल तर किमान १ महिना थांबायचे.
- ब्रॅण्ड लॉयल्टी निर्माण केली आहे, अमेरिकेत हे थोडे सोपे पडते. सर्व काही कॉस्टको मध्ये घ्यायचे. त्यांची सर्वांत उंची मेम्बर्शीप आणि क्रेडिट कार्ड वगैरे घ्यायचे. इतर कुठेही विंडो शॉपिंग साठी जायचे नाही.
- अनेकदा मोठे खर्च करताना हि वस्तू आम्ही किती वर्षे वापरू आणि त्या नियमाने प्रति दिवस किती खर्च येईल हे पाहावे. अनेक वेळा हे गणित एकदा केले कि वस्तू घेवीशी वाटत नाही.
- कुठलीही वस्तू जास्त काळ वापरली जात नाही तर कॉस्टको मध्ये परत तरी द्यायची नाहीतर कुठे तरी सेकंड हॅन्ड मघ्ये विकून तरी द्यायची. नाही तर कुना गरजू व्यक्तीला फुकट द्यायची.

चौकटराजा's picture

16 Oct 2020 - 11:09 am | चौकटराजा

मी स्वतः एक श्रीमन्त व्हायला अत्यन्त योग्य माणूस आहे असा माझ दावा आहे. याला कारण मला अपरिमित गोष्टीची आवड व आस आहे ! पियानो विकत घ्यायची ऐपत आहे पण सन्गीताची आवड नाही. टी व्ही अगदी लाखाचा घ्यायची ऐपत आहे पण तो पहायचीच आवड नाही ,गाडी फक्त पार्किन्ग मधे लावायचीच हौस आहे असे अनेक लोक मी दररोज पहात असतो.

तम्बाखू , सिगारेट ,पान ,दारू इतके माझे शौक स्वस्त नाहीत. तर जगप्रवास ,भरपूर क्वालिटी सन्गीत ऐकण्यासाठी बोस सारखे स्पीकर, अत्यंत स्पष्ट आवाज व चित्र असलेले टीव्ही,सुरकुत्या न पडणारे उच्च दर्जाचे बेडशीट, हलक्या वजनाचे पण मजबूत ,पायाला जखमा करणार नाहीत असे बूट, अतिशय उच्च दर्जाचा सिन्थ सन्गीत वाजविण्यासाठी ही काही उदाहरणे मला श्रीमन्त का व्हावेसे वाटते याची. यात कुठेही मित्राना पार्ट्या, नातेवाईकाना मेजवान्या असा प्रतिष्ठेचा मामला नाही की दहा अन्गठ्या घालण्याची आस नाही. यात असे एक दिसून येईल की यातील प्रत्येक वस्तूची उपयोगिता सिद्ध अशी आहे . यात कोणताही आपण म्हणता तसा इफेक्ट नाही. माझा शर्ट भारी आहे म्हणजे मला सिन्थ महागडा विकत घ्यायला हवा असे आहे का .... ?

मला यातील कित्येक गोष्टीचे जबरदस्त आकर्षण आहे ते आवडीमुळे .. ती आपल्याकडे वस्तू आहे याच्या गर्वामुळे नव्हे. मग मी काय करतो , आवड तर पुरविली गेली पाहिजे पण ती आपल्या ऐपतीतही बसली पाहिजे हे पहातो. मी केलेली ही तडजोड माझा पराभव ही असतो कारण मी गुणवत्तेशी तडजोड करतो पण विजय ही असतो की मी तडजोड करून का होईना माझी आवड मारली नाही !!!

सुबोध खरे's picture

16 Oct 2020 - 11:12 am | सुबोध खरे

उत्तम लेख.

याचे अजून एक उदाहरण म्हणजे नवीन मोटार घेतली कि त्याच्या ऍक्सेसरी शोरूम मध्ये तिप्पट भावात विकत घेतल्या जातात ( परफ्युम, फ्लोअर मॅट , सीट कव्हर इ).

नवीन मोटार एकही ऍक्सेसरी न लावता तशीच बाजारात घेऊन जा. तेथे हव्या त्या ऍक्सेसरीज तेंव्हाच विकत घ्या नंतर आळस येतो.

यापैकी सीट कव्हर हि एक पूर्ण अनावश्यक ऍक्सेसरी आहे. कारण ती ७-८ वर्षे वापरली जाते आणि जेंव्हा काढली जाते तेंव्हा लक्षात येते कि आतल्या सीट नव्याच्या नव्या आहेत. पण तोवर गाडी विकायची वेळ येते

चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते?

तुमच्या शेजाऱ्याने विकत घेतली कि.

पहिले उत्तम उदाहरण आहे व्हॅक्युम क्लिनर. घेतल्यावर दोन ते तीन वेळेस वापरून होतो (सोफा नि मोटारीतील आसन व्यवस्था प्रथम साफ केली जाते) आणि मग तो माळ्यावर धूळ खात पडून राहतो

दुसरे उदाहरण आहे मायक्रो वेव्ह ओव्हन. यातील गरम करणे हा हेतू सोडला तर इतर कन्व्हेक्शन ग्रील इत्यादी सोयी ९० % वेळेस वापरल्या जात नाहीत.

कपिलमुनी's picture

16 Oct 2020 - 1:42 pm | कपिलमुनी

कापडी सीट असतील तर रेक्झिन किंवा लेदर कव्हर बरे पडते.

श्वेता२४'s picture

16 Oct 2020 - 3:20 pm | श्वेता२४

या प्रवृत्तीला असं काही विशिष्ट नाव असेल असं वाटलं नव्हतं.

तुषार काळभोर's picture

16 Oct 2020 - 6:24 pm | तुषार काळभोर

बायका शेजारणी कडे बघून साडी, दागिने घेतात असे विनोद बऱ्याचदा होतात. त्यात बऱ्यापैकी वास्तव असेलही.

पण हा डिद्रोट इफेक्ट टाळण्यामध्ये बायका पुरुषांपेक्षा साधारणपणे जास्त एक्स्पर्ट असतात, असं मला वाटतं.
एखादी खरेदी पुढे कशी, कधी, किती ढकलायची हे बायकांना जास्त चांगलं कळतं.

सुबोध खरे's picture

16 Oct 2020 - 7:17 pm | सुबोध खरे

एखादी खरेदी पुढे कशी, कधी, किती ढकलायची हे बायकांना जास्त चांगलं कळतं.

काय सांगताय?

आमच्या कडे अहमदाबादला घेतलेल्या २०० रुपयांच्या बांधणीच्या ओढणी साठी अख्खा २००० रुपयांचा ड्रेस विकत घेतला गेल्याचे मला आठवते आहे. वर

त्या ड्रेसला शोभेल अशी ७००रुपयांची चप्पल सुद्धा.

पोचमपल्ली, म्हैसूर, ढाका ,इरकल, महेश्वर, इंदूर, कांजीवरम, बनारस, पैठण हि गावे पुरुषांवर अत्याचार करण्यासाठी वसवली गेली असे कुणीतरी म्हटल्याचे आठवते.

तुषार काळभोर's picture

16 Oct 2020 - 7:23 pm | तुषार काळभोर

हे म्हणजे नालासाठी घोडा घ्यायचा प्रकार झाला :D

मग मी सुदैवी म्हणायचो..

दीपक११७७'s picture

18 Oct 2020 - 10:26 pm | दीपक११७७

छान माहीती,

१. पण त्या माणसाला एवढे पुस्तकं वाचुनही, फार अक्क्लं नव्हती असे दिसते, असो.

२. मी बरेच महाभाग असे पाहिले आहेत जे नविन दुचाकी गाडी घेतल्यावर तिचे सिट काढुन डुप्लीकेट सिट बसवतात आणि ते वापरतात.

३. सोनी टिव्हीचा रिमोट तसाच ठेवुन जुना रिमोट वापरतात.

४. काट कसर आणि अर्थव्यवस्था व पगारवाढ एकत्र नांदु शकत नाही.