श्रीगणेश लेखमाला २०२० - पेशंट एच एम

आनंदिनी's picture
आनंदिनी in लेखमाला
1 Sep 2020 - 7:00 am

1

पेशंट एच एम

जाताजाता सहज कानावर पडलेली गाण्याची एखादी ओळ कधीकधी वर्षानुवर्षांपूर्वीची आठवण घेऊन येते. कधी विचार केलाय की ही आठवण नेमकी कुठून येते? हीच नव्हे, तर इतर साऱ्या लहान-मोठ्या आठवणी कुठे असतात? आणि जर आपल्याला इतक्या वर्षांपूर्वीची एखादी गोष्ट रंग-गंधासकट आठवते, तर मग परवा भेटलेल्या त्या माणसाचं नाव कसं काय आठवत नाही! बऱ्याच जणांना कदाचित हे माहीत असेल की स्मृतींचे अल्पकालीन (तात्पुरत्या - मी दुपारी काय जेवले) आणि दीर्घकालीन (मी पहिलीत असताना माझी मैत्रीण कोण होती) असे दोन प्रकार आहेत. पण हे आपल्याला, संशोधकांना पहिल्याप्रथम कसं कळलं?

हेनरी (H) मोलेसन (M), म्हणजेच वैद्यकीय जगतात सर्वात प्रसिद्ध असणाऱ्या अमेरिकन पेशंट 'एच एम'मुळे स्मृतींबद्दलचं आपलं ज्ञान कैक पटींनी वाढलं आहे. एच एम ७ वर्षांचा असताना सायकलवरून पडून त्याला इजा झाली. त्यामुळे त्याला फीट्स (आकडी) येऊ लागल्या. फीट्स येण्याचं प्रमाण इतकं वाढलं की त्याला सर्वसाधारण आयुष्य जगणं अशक्य होऊन बसलं. त्याच सुमारास डॉक्टर स्कॉव्हिल नावाचा एक तरुण सर्जन अशा रुग्णांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करीत असे. मेंदूचा काही भाग काढून टाकल्याने रुग्णांना येणाऱ्या फीट्स कमी होतात, हे डॉक्टर स्कॉव्हिलने पाहिलं होतं. एच एमवर हा प्रयोग करून पाहावा, असं सर्वांच्या संमतीने ठरलं. १९५३ साली २७ वर्षांच्या एच एमवर शस्त्रक्रिया करून त्याच्या मेंदूचा काही भाग काढून टाकण्यात आला. सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे त्याला फीट्स येणं बरंच कमी झालं, पण एच एमला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. शास्त्रक्रियेनंतर एच एमच्या मेंदूने नवीन घटनांच्या स्मृती साठवणं जवळपास बंदच केलं. डॉक्टर ब्रॅंडा मिल्नर ही संशोधिका वर्षानुवर्ष दररोज एच एमला भेटत असे, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या टेस्ट्स, प्रयोग करीत असे. पण रोज तिला एच एमला स्वतःची ओळख नव्याने करून द्यावी लागत असे. एच एम दुपारी काय जेवला, किंवा जेवला की नाही हेही थोड्या वेळाने त्यच्या लक्षात नसे. पण काही शिकलेली कौशल्यं - उदाहरणार्थ, आरशात चित्र बघून ते चित्र कागदावर काढणं तो दिवसेंदिवस आत्मसात करीत होता. म्हणजेच त्याच्या मेंदूचा नसलेला भाग या कामांसाठी अत्यावश्यक नव्हता. एच एमचा बुद्ध्यंकसुद्धा शस्त्रक्रियेनंतर वाढला होता.

शस्त्रक्रियेनंतर एच एमच्या नवीन स्मृती तयार होणंच फक्त थांबलं नव्हतं, तर शस्त्रक्रियेआधीच्या ११ वर्षांच्या काळातील बहुतेक गोष्टीसुद्धा त्याला आठवेनाशा झाल्या होत्या. सत्तावीस वर्षांचा एच एम, त्याच्या स्वतःच्या आठवणीत एक सोळा वर्षांचा मुलगा होता. त्यामुळे आरशात स्वतःला एका पोक्त माणसाच्या रूपात पाहून तो हैराण होत असे. एच एमच्या मेंदूचा विशिष्ट भाग शस्त्रक्रियेत काढण्यात आला होता आणि शस्त्रक्रियेनंतरच त्याला स्मृतिभ्रंश झाला होता. त्यामुळे त्याच्या मेंदूच्या काढलेल्या भागांशी संबंधित त्याच्या स्मृतिभ्रंशाचा सखोल अभ्यास करणं संशोधकांना शक्य झालं. त्यात एच एम नेहमी हसतमुख, साऱ्या प्रयोगांना पूर्ण सहकार्य करणारा आणि उत्साही होता.

डॉक्टर ब्रॅंडा मिल्नरनंतर त्यांच्या साहाय्यक डॉक्टर सुझॅन कॉरकिन यांनीही जवळजवळ चाळीस वर्षं एच एमवर संशोधन केलं. परंतु एच एमवर संशोधन करण्याचा हक्क फक्त आपल्यालाच आहे, असा पुढे पुढे डॉक्टर कॉरकिन यांचा ग्रह झाला. यासाठी त्यांच्यावर टीकाही झाली. पण डॉक्टर कॉरकिन हयात असेपर्यंत त्यांनी आपला हेका कधीही सोडला नाही. संशोधनासाठी मृत्यूनंतर स्वतःच्या मेंदूचं दान करणारा एच एम, २००८मध्ये वयाच्या ८२व्या वर्षी हे जग सोडून गेला. त्याचा मेंदू पुढील संशोधनासाठी शरीरातून काढून घेण्यात येत असताना शवविच्छेदन बघणाऱ्या डॉक्टर कॉरकिन यांनी त्या क्षणी त्यांच्या डायरीमध्ये त्यांच्या मन:स्थितीचं वर्णन ‘ecstatic’ (उत्सुक) असं केलं. एखाद्याने स्वतःच्या कार्यात इतकं बुडून जावं की त्याचं माणूस असणं मागे सुटून जावं, असं काहीसं झालं. एच एमवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर स्कॉव्हिलचा नातू यालाही एच एमच्या केसवर काम करण्याची इच्छा होती, पण डॉक्टर कॉरकिन यांनी ती तर धुडकावून लावलीच, शिवाय एच एमबद्दलची बरीच अप्रकाशित कागदपत्रं इतर कोणाच्या हातात पडू नयेत म्हणून त्यांनी नष्ट केली. पेशंटने काहीच हातचं राखू नये आणि संशोधकाने अजिबात नियंत्रण (controlling) सोडू नये.. केवढा हा विरोधाभास!

१९२६ मध्ये जन्मलेल्या एच एमने २००८मध्ये ८२व्या वर्षी हे जग सोडेपर्यंत आयुष्यभर neuroscienceच्या विकासासाठी वेगवेगळ्या टेस्ट्स दिल्या, प्रयोगांत भाग घेतला. सत्तावीस वर्षांचा हा तरुण त्याचं आयुष्य सुधारण्यासाठी एका शस्त्रक्रियेला सिद्ध झाला आणि त्याचं पूर्ण आयुष्यच एक प्रयोग होऊन बसलं. आज त्यांच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनीही त्यांच्या मेंदूच्या भागांवर संशोधन सुरू आहे. आपल्या स्मृती आणि मेंदूचे भाग यांच्या अभ्यासात एच एमने जे योगदान दिलं आहे, त्यामुळे वैद्यकीय जगतावर आणि त्याचा लाभ घेणाऱ्या आपल्या सर्वांवरच त्याचं मोठं ऋण आहे.

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

1 Sep 2020 - 5:50 pm | चौथा कोनाडा

हेनरी मोलेसन ( एचएम ) ची अतिशय रोचक कहाणी !

२७ वर्षांच्या एच एमवर शस्त्रक्रिया करून त्याच्या मेंदूचा काही भाग काढून टाकण्यात आला. सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे त्याला फीट्स येणं बरंच कमी झालं, पण एच एमला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. शास्त्रक्रियेनंतर एच एमच्या मेंदूने नवीन घटनांच्या स्मृती साठवणं जवळपास बंदच केलं. डॉक्टर ब्रॅंडा मिल्नर ही संशोधिका वर्षानुवर्ष दररोज एच एमला भेटत असे, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या टेस्ट्स, प्रयोग करीत असे. पण रोज तिला एच एमला स्वतःची ओळख नव्याने करून द्यावी लागत असे. एच एम दुपारी काय जेवला, किंवा जेवला की नाही हेही थोड्या वेळाने त्यच्या लक्षात नसे.

बाप रे !

हेनरी मोलेसन सारख्या परोपकारी माणसाने मानवतेच्या कल्याणासाठी स्वतःला वैद्यकिय संशोधनाच्या हवाली करावे, आणि मृत्यूनंतरही मेंदू संशोधनासाठी द्यावा हे केवढे थोर आहे !

धन्यवाद, आनंदिनी या सुंदर लेखाबद्दल !
लेख व लेखनशैली आवडली.
लिहित रहा !

गणेशा's picture

1 Sep 2020 - 6:00 pm | गणेशा

Oh, मला हे काहीच माहित नव्हते..
आठवणीच्या संशोधनाची गोष्ट आवडली..

येथे सांगितल्या बद्दल धन्यवाद.

गणेशा's picture

1 Sep 2020 - 6:01 pm | गणेशा

हेनरी मोलेसन
याबद्दल आदर वाटला.. हे सांगायचे राहून गेलं

तुषार काळभोर's picture

1 Sep 2020 - 6:33 pm | तुषार काळभोर

एचेम, त्याला कदाचित त्याने किती प्रचंड महत्त्वाचं कार्य केलंय, तेसुद्धा माहिती नसेल. तरी त्याला अभिवादन.

लेखमालेच्या विषयाला साजेसा तरीही अत्यंत वेगळा लेख.

धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

1 Sep 2020 - 6:55 pm | टर्मीनेटर

विलक्षण माहितीपूर्ण लेख!

नूतन's picture

1 Sep 2020 - 10:21 pm | नूतन

माहितीपूर्ण लेख.

सुमो's picture

2 Sep 2020 - 5:28 am | सुमो

वेगळ्याच विषयावरचा आणि हे‌न्‌री मोलेसन यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता जागी करणारा लेख.

विनिता००२'s picture

2 Sep 2020 - 1:14 pm | विनिता००२

माहितीपूर्ण लेख. :)

aanandinee's picture

3 Sep 2020 - 12:09 pm | aanandinee

चौथा कोनाडा, गणेशा, पैलवान, टर्मीनेटर, नूतन, सुमो, विनिता आपल्या प्रतिक्रियांकरिता मनःपूर्वक आभार . वैद्यक शास्त्रात प्रत्येक शोध लागतो तेव्हा त्यामागे असे एच एम सारखे कितीतरी unsung heroes असतात. आठवणीच्या निमित्ताने ही माहिती सगळ्यांशी share करता आली.

स्मिताके's picture

8 Sep 2020 - 11:59 pm | स्मिताके

असेच आपले आणखी माहितीपूर्ण लेखन वाचायला आवडेल.

सोत्रि's picture

3 Sep 2020 - 12:42 pm | सोत्रि

लेख उत्तम!

- (एच एम बद्दल आदराची भावना झालेला ) सोकाजी

सुधीर कांदळकर's picture

8 Sep 2020 - 6:35 am | सुधीर कांदळकर

वेगळ्या विषयावरचा लेख आवडला. खरे तर सुझॅन कॉरकिनचाही मेंदू तपासायला हवा होता असे वाटले. छान लेखाबद्दल धन्यवाद.

एचएम यांचे खरंच कौतुक व आदर वाटला. या उत्कृष्ठ लेखाबद्दल धन्यवाद.