मिशन कुंभार्ली (सायकलवरून कुंभार्ली घाटाची सफर)

मालविका's picture
मालविका in भटकंती
1 Sep 2020 - 3:22 pm

मिशन कुंभार्ली

श्रीनिवास बरोबर राहून सायकलचं वेड चांगलंच लागलंय आता. त्यात कोरोना , लॉकडाऊनमुळे कुठेही बाहेर पडणं, भेटणं बंद झालंय. सुरवातीचे लॉकडाऊनचे महिने नवीन रेसिपी कर, ईशान बरोबर अंगणात खेळ, शेतावर चालायला जा यात गेले. पण जसजसा हा लॉकडाऊन वाढला नि पावसाळा सुरु झाला, वातावरण आणखीनच बोअरिंग व्हायला लागलं. यातच चिपळूण सायकलिंग क्लब ची स्थापना झाली नि त्यातले मेंबर्स नवीनवीन ठिकाणी सायकलच्या फेऱ्या मारायला लागले . शेवटी मी पण त्यांच्यात सामील व्हायचं म्हटलं पण त्यांच्या वेगाशी माझा वेग काही जुळेना नि माझ्यासाठी म्ह्णून श्रीनिवास थांबून पाठी पडायचा. त्यापेक्षा त्याला त्याच्या ग्रुप बरोबर सोडून दिला नि मी ‘एकला चलो रे’ करत अलोरे – पोफळी – शिरगाव अशा सायकलच्या चकरा मारायला लागले . कधी कोणी नसलं कि श्री यायचा बरोबर. एखाद्या दिवशी पाऊस अजिबात नसेल तर ईशानला देखील आम्ही घेऊन जायचो.

अशाच एका दिवशी श्री आणि मित्र स्वप्नील कुंभार्ली घाट सायकलने चढून आले. पावसाळ्यात कुंभार्ली घाट म्हणजे स्वर्ग असतो. त्यात सायकलने जरी दम लागला तरी आजूबाजूच्या निसर्गाने वेढलेल्या परिसरातून जाणं हा तितकाच आल्हाददायक अनुभव असणार यात शंकाच नव्हती. त्यात स्वप्नील फोटोग्राफर. काय सुंदर सुंदर फोटो काढलंन त्याने. बासच मी पण कुंभार्ली घाट सायकलने जाणार. ठरवलंच. रोजची सायकलची प्रॅक्टिस होतीच. व्यायाम देखील चालू होता. शिवाय काही शार्प टर्न सोडले तर बाकी घाट ग्रॅज्युअल आहे चढायला हे श्रीनिवासच मत पडलं. आज जाऊ उद्या जाऊ करत मुहूर्त काही लागत नव्हता. पोफळी हुन रोज थोडं थोडं पुढे नेत अंतर वाढवत होते. त्यामुळे हळूहळू कल्पना येत होती चढाची नि स्वतःची सुद्धा.

एक दिवस सकाळी श्रीनिवास आणि त्याचे मित्र सकाळी ६ ला निघाले कुंभार्ली चढायला. मी माझ्या नेहमीचा रूटला माझ्या स्पीड ने जात होते. वातावरण इतकं स्वच्छ आणि मस्त होतं. मी पोफळीहून पुढे नेहमीप्रमाणे सुरवात केली. थोडं पुढे आजही गेले पण आज जराही थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ सूर्यप्रकाश होता , एकही ढग नव्हता तरीही हवेत सुखद गारवा होता त्यामुळे आज, घाट सुरु झाल्यावर साधारण ५ किमी वर सोनपात्राच देऊळ तिथवर जमल्यास जाऊ असं म्हणून सायकल चालवत राहिले. आणि थोड्याच वेळात पोचले पण…काय बरं वाटलंय माहितेय!आणि माझा आत्मविश्वास पण वाढला . सोनपात्रापर्यंत चढवलं तर पुढेही जमेल याची जाणीव झाली नि मस्त वाटलं. स्वतःवरच खुश झाले. श्रीनिवासला आल्यावर सांगितलं तेव्हा तो देखील खुश झाला. चला म्हणजे कुंभार्ली सर करायची तयारी झाली तर.

परत मध्ये काही दिवस गेले पण मुहूर्त लागत नव्हता. आणि मग जो पाऊस सुरु झाला तो काही थांबायचं नाव घेईना. मी हिरमुसली होऊन कधी एकदा पाऊस कमी होईल याची वाट बघत बसले. कुंभार्ली सोडा इथे रोजचा सायकलचा राऊंड पण मारून होत नव्हता. २ आठवडे होऊन गेले पण पाऊस कमी नाहीच. शेवटी १५ ऑगस्ट उजाडला. सकाळी पावसाची रिपरिप चालू होतीच. श्रीनिवासला म्हटलं आज जरा पाऊस जाऊन येऊन आहे. आज दुपारी निघूया कुंभार्लीला जाऊन येऊ. हो नाही करता करता दुपारी २ ला निघायचं ठरवलं. श्रीनिवासचा एक मित्र मनोज भाटवडेकर पण यायला तयार झाला. श्रीनिवास मला सहज मागून गाठेल म्हणून मनोज दादा येईपर्यंत श्रीनिवास वाट बघत थांबला नि पुढे निघाले. मी पोफळी क्रॉस करून पुढे निघाले तरी या दोघांचा पत्ता नव्हता. इथपर्यंत पावसाने न पडून चांगली साथ दिली होती. पण पुढच्या चढाला सुरवात केली नि मुसळधार पाऊस कोसळायला लागला. मी एका झाडाच्या आडोश्याला थांबले. थोडा पाऊस ठीक आहे पण हा म्हणजे अगदीच जास्त होता. तोवर पाठून हे दोघे आलेच. श्रीनिवासला म्हटलं परत जायचं का तर म्हणाला सोनपात्रा पर्यंत जाऊ नि ठरवू. तसा घाटात सलग पाऊस नसतो कमी जास्त ढग असतात तसा असतो. मग परत सायकल हाणायला सुरवात केली. पुढे खरंच पाऊस कमी झाला. हळूहळू पोहोचत सोनपात्रा आलं एकदाच.

इथूनच परत फिरावं का असं वाटत होत. पण श्रीनिवास धीर देत होता काही नाही होत चला जाऊया. इथे येईपर्यंत आम्हाला ४ वाजले. माथ्यावर जायला ५ वाजतील असा अंदाज केला. मग चला परत एकदा पॅडल मारायला सुरवात. एरवी हे पोरगे जातात तेव्हा भरपूर फोटो काढतात पण यावेळी पाऊस एवढा होता कि फोटो काढणे कठीण होत होत. तरीही बऱ्याच वळणांवर श्रीनिवास पुढे जाऊन थांबायचा नि आमचे फोटो काढायचा.

पावसाळ्यात कुंभार्ली घाटात कणीस विकणाऱ्या नि चहा, भज्यांच्या बऱ्याच गाड्या असतात यावेळी कोरोनाने त्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसलं. अशाच एका खोपट्याशी गेलो नि परत पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली. मग त्या खोपट्याच्या आश्रयाला गेलो . त्यांच्याचकडे घोटभर चहा घेतला नि थोडा पाऊस कमी झाल्यावर परत चढ चढायला सुरवात केली. श्रीनिवास म्हणाला त्याप्रमाणे कधी पाऊस तर कधी नुसता वारा असा प्रवास चालू होता. चढ खरंच ग्रॅज्युअल होता त्यामुळे खूप त्रास नाही झाला तरी मांड्या दुखायला लागल्या होत्या. पाऊस असल्याने एक गोष्ट झाली ती म्हणजे जरी आम्ही दमत असलो तरी उष्णेतेने घाम निघून जे दमायला होते ते नाही झाले. सतत पाऊस असल्याने अंग गार होत होत.

निसर्ग मात्र अप्रतिम नटला होता. काय सुंदर वाटत होत. ढग निघून गेले नि जरा मोकळं झालं कि खाली पसरलेली दरी त्यातून वाहणारी नदी लख्ख दिसत होती. एरवी शांत असणारी नदी गेले काही दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसाने गढूळ पाणी घेऊन वाहत होती. त्यामुळे अगदी स्पष्ट दिसत होती. आपण ढगांमधून आरपार जातोय हे इतकं छान वाटत होत ना! एकीकडे चढ चढून दम लागत होता तर एकीकडे हे वातवरण परत मन प्रसन्न करीत होतं. प्रत्येक वळणावर गेल्यावर घाटमाथा दिसतोय बघायचे मी. पण ढगांमुळे काहीच अंदाज येईना. हळूहळू एक एक वळण चढत होतो.

निसर्ग बहरून आला होता. वाटेत असंख्य धबधबे लागत होते. जवळपास प्रत्येक ठिकाणी थांबून फोटो काढावासा वाटत होता. पण हातात वेळ नव्हता त्यात वरून पाऊस कोसळत होता. त्यामुळे आता काही झालं तरी घाटमाथा सर करायचा.

प्रत्येक चढाच्या वेळी एवढंच अंतर पाठी परत सायकल चालवत जायचंय हे आठवून खरं तर पोटात गोळा येत होता. पण आत्मविश्वास जरा जास्तच होता. रोज व्यायाम करतोय सायकलिंगची प्रॅक्टिस आहे, नि शिवाय बाकीच्यांना जमत तर मला का नाही जमणार हि जाणीव यामुळे घाट चढायला उत्साह येत होता. मोह पाडणारा निसर्ग अवतीभवती होताच. थेट रस्त्यावर पाणी ओतणारे धबधबे जागोजागी कोसळत होते. आम्ही ओले चिंब झालोच होतो. कुठल्याही ठिकाणी आणखी भिजायला काहीच हरकत नव्हती पण वेळ नव्हता. तरीही एका धबधब्यापाशी थांबून एक फोटो घेतलाच.

श्रीनिवास ने एक दोन चढात शूटिंग करायचा प्रयत्न पण केला पण आमचे चेहरे न दिसता फक्त काळ्या आकृत्या सायकल चालवत आहेत असं दिसत होत .
शेवटी मजल दरमजल करीत एका शेवटच्या वळणावर माथ्यावर असणारं हॉटेल दृष्टीस पडलं. इतकं बरं वाटलं. एवढं एकच वळण झालं कि आलाच टॉप…. हुश्श! एवढा वेळ घेतलेल्या कष्टांचं चीज झालं.मग अगदीच ३ /४ मिनिटात पोहोचलो. आधी माथ्यावर पोहोचल्याचे फोटो काढून घेतले.

इतकं समाधानी वाटत होतं. बरोबर थर्मास मधून कॉफी नेली होती ती प्यायली पण शेजारच्या टपरीवरून भज्यांचा वास व्याकुळ करत होता. तसाही लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बाहेर काहीही खाल्ल नव्हतं. प्रचंड इच्छा झाली नि श्रीनिवास तयार झाला. एक प्लेट भजी सांगितली.

मस्त थंड वातावरणात, गरम कॉफी नि दमलेले तरीही समाधानी आम्ही. परफेक्ट कॉम्बिनेशन .
पण या सगळ्यात आम्हाला पोहोचवायला ५.३० झाले . रोज ७ ला होणार काळोख पावसाने लवकर अंधार करत होता . त्यामुळे भजी खाउन कॉफी पिऊन ६. १५ ला तिथून निघालो.

येताना कष्ट घेतले त्याच सार्थक हा उतार करणार होता. पाऊस अजूनही कोसळतच होता. तिथे थांबलेली माणसं चौकशी करत होती. एवढ्या पावसातून नका निघू म्हणून सांगू पाहत होती पण वेळ कमी असल्याने इलाज नव्हता . पहिल्या ४/५ पॅडल मध्ये गियर सेट करून घेतले नि घाट उतरायला सुरवात झाली . घाटात पावसाचा लपाछपीचा खेळ चालूच होता. एक वळणावर धो धो पाऊस दुसरीकडे नुसतेच ढग इकडून तिकडे जातायत तर पुढच्या वळणावर भणभण वारा. अगदी मोहवणारी दृश्य होती. एका बाजूला धबधबे अंगावर येतायत तर दुसरेकडे वारा. अप्रतिम. डोळ्यांनी पाहता येत होतं ते कॅमेरात बंदिस्त कारण कठीण होतं . यातच एक गोष्ट लक्षात आली की चढ चढण सोपं होत पण उतरणं कठीण. मला वाटलेलं अरे झूssssम करून मस्त उतरू पण वाऱ्याने , पावसाने ते अवघड केलं होत. रस्त्यात खड्डे, वरून पावसाचा मारा, रस्त्यावरची खडी, डोंगावरून येणार पाणी, माती यामुळे ब्रेक दाबताना पण सायकल स्लिप होणार नाही याची काळजी घ्यावी लागत होती. एकही पॅडल मारायची गरज पडत नव्हती . उताराचा मस्त अनुभव मिळत होता. जरी सावधगिरी बाळगत होतो तरीही आता पायाला विश्रांती मिळाली होती. अक्षरशः नुसते बसून आम्ही खाली आलो. जो चढ चढायला आम्हाला दोन ते तीन तास लागले तोच चढ उतरायला आम्हाला अर्धा-पाऊण तास जेमतेम लागला . पोफळीला आलो आणि अंधार वाढला. पण आता नेहमीचा रस्ता होता. भराभर पॅडल मारायला सुरवात केली. आता कुठेही थांबायचे नाही हे ठरवले होते. त्याप्रमाणे ज्या स्पीडने पाऊस पडत होता त्या स्पीडने पॅडल मारली जात होती. काही करून अंधार पडायच्या आत घरात पोचायचं हेच टार्गेट होत डोळ्यासमोर. समोरून येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशात रस्ता दिसत होता आणि सायकल हाणत होते. शेवटी एकदाचे ७. १५ ला घरात पोचलो. बरं वाटलं .
बरेच दिवसांपासून लिस्ट वर असलेला कुंभार्ली घाट सर करून झाला होता. समाधान होत. वेळ जरा चुकलीच होती तरीही. मनासारखे फोटो काढून झाले नव्हते. परत त्यासाठी जायची तयारी आहे रोजचा व्यायामाने त्रास जाणवत नव्हता. आल्यावर आता अंगात एनर्जी नाही असं काही झालं नाही. मी आधी इतकीच फ्रेश होते. पुढच्या वेळी हाताशी पुरेसा वेळ घ्यायचं निश्चित केलं. भर पावसात सायकलने कुंभार्ली सर करणं जरा धाडसाचं होत. पण मजा वाटली . आता वाटत, हा वेडेपणा करायची खरंच गरज होती का? अजून ४ दिवसांनी काय फरक पडला असता? पण तेव्हा तसं काही वाटलं नाही. तेव्हा ते वेड डोक्यावर बसलेलं होत नि त्यामुळे ते करून झालं हेच खरं.

दुसरी एक मजा म्हणजे आम्ही करतो त्या राईड मोजण्यासाठी फोनमध्ये वेगवेगळी ऍप्स असतात . आम्ही एकावेळी ४ ऍप्स चालू केली होती. श्रीनिवासची सगळी अप्स गंडली तर माझ्या सगळ्या ऍप्स नि साधारण बरोबर डेटा दाखविला. बरेच जण strava हे ऍप वापरतात . श्रीनिवासच हे ऍप बहुतेक वेळा मोजण्यात मार खात. तर माझं रनकीपर हे ऍप अजून कधी रडलं नाहीये . काय माहित नाही पण श्रीनिवासचा डेटा कुठल्याही ऍप ने नीट मोजला नाही त्यामुळे त्या सगळ्या ऍप्स नि तो निराश झाला . तर माझी सगळी राईड सगळ्या ऍप्सनि रेकॉर्ड केल्याने मी मनातल्या मनात हसत होते .

असो राईड खूप मजेची आणि अनुभव पूर्ण झाली . विशलिस्ट मधली एक विश टिक करून झाली . परत जायची तयारी झालेली आहे. बघूया परत कधी जायची वेळ येतेय .

–धनश्रीनिवास

(मिपावर फोटो चिकटवणे अजून जमले नाही त्याबद्दल क्षमस्व! फोटोसाठी ब्लॉग ची लिंक देत आहे.)
http://shrigokhale.in/mission-kumbharli-ghat_15-08-2020/

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

1 Sep 2020 - 3:59 pm | महासंग्राम

जबरदस्त वर्णन, हे असं काही वाचलं कि माझ्यातल्या आळशी माणसाला खूप लाज वाटते

टीपीके's picture

1 Sep 2020 - 5:00 pm | टीपीके

+१

क्या बात!! मस्त फ्रेश वाटलं.. खुप छान.

बेकार तरुण's picture

1 Sep 2020 - 4:47 pm | बेकार तरुण

मस्त वर्णन

अप्रतिम.. निव्वळ अप्रतिम.
फोटो आणि सफर दोन्ही हि जबरदस्त.

निनाद's picture

2 Sep 2020 - 10:57 am | निनाद

खुप छान, असेच भटकत रहा आणि आम्हाला फोटो देत रहा.

निनाद's picture

2 Sep 2020 - 11:00 am | निनाद

फोटो पाहून अगदी लगेच जाऊन यावेसे वाटले. निळे आकाश आणि ढग मस्त आले आहेत.

प्रशांत's picture

2 Sep 2020 - 11:04 am | प्रशांत

या वर्षी सायकल ने जायचे होते......

वा! पावसातले सायकलिंग आवडले.
--------------

रूट ट्रेसिंगसाठी ( ट्रेकिंगला) मी ही apps वापरतो.

१) My Tracks ( Daniel Quin)
https://play.google.com/store/apps/details?id=com.zihua.android.mytracks
खूप जुने app आहे. पण चालते.

२) Endomondo : running and walking
( https://play.google.com/store/apps/details?id=com.endomondo.android )

GPS settings - low accuracy, device only वर ठेवतो तरीही चालतात. शिवाय ब्याट्री ड्रेन होत नाही.

Strava app चे रेंडिशन गंडलंय नवीन अपडेटनंतर असे रिव्युत लिहिलय.

जेव्हा रुट ट्रेसिंगसाठी app वापरायची असतात त्या भागाचा ओफलाईन map अपडेट करणे आवश्यक असते.

हँडसेटमधली RAM कमी असल्यास app बरोबर चालत नाहीत.

कंजूस's picture

2 Sep 2020 - 12:55 pm | कंजूस

एक फोटो ब्लॉगवरूनच आणला

फोटो >> open in new tab >>copy address link>> use in template.

template

<img src="लिंक" width="100%"/>

Paste in the mipa.

मालविका's picture

7 Sep 2020 - 4:01 pm | मालविका

धन्यवाद ! पण नाही अजून जमले . श्रीनिवास ने मिपा वरच्या काही मित्रांची मदत घेतली पण नाही जमत .

कंजूस's picture

7 Sep 2020 - 4:30 pm | कंजूस

प्रयत्न करा.
पहिल्या फोटोची लिंक फोटोवर क्लिक करून open in new tab केल्यावर अड्रेस बारमधली.

http://shrigokhale.in/wp-content/uploads/2020/08/IMG_20200726_071939-768...

ती टाकली टेम्प्लेटात-

<img src="http://shrigokhale.in/wp-content/uploads/2020/08/IMG_20200726_071939-768..." width="100%"/>

लेखात संपादन करून टेम्प्लेट पेस्ट करा
असा दिसेल फोटो.

MipaPremiYogesh's picture

2 Sep 2020 - 6:34 pm | MipaPremiYogesh

वाह तुमचे सायकलिंग सुरु झाले तर परत..मस्त. मी फोटो ब्लॉग वरून जाऊन पहिले. खूप मस्त निसर्ग आहे. नेहेमीप्रमाणे छान लिहिले आहे. स्वप्नील ह्यांचे फोटो पाहायला मिळतील का?

मालविका's picture

7 Sep 2020 - 4:04 pm | मालविका

फेसबुक वर स्वप्नील संजय दाभोळकर सर्च केल्यावर त्याच्या वॉल वर दिसतील

मालविका's picture

7 Sep 2020 - 4:08 pm | मालविका

किंवा डॉ स्वप्नील दाभोळकर फोटोग्राफी या पेज वर

दुर्गविहारी's picture

2 Sep 2020 - 7:40 pm | दुर्गविहारी

वा ! मजा आली वाचायला !

चौकटराजा's picture

2 Sep 2020 - 8:08 pm | चौकटराजा

मूळ ब्लॉग वर जाऊन फोटो पाहिले. मी कोळथरे येथे गेलो आहे . दाभोळ जेटीवर पण . आपले कौतुक अशासाठी की आपण आतापासून आपल्या मुलाबरोबर सहवास व संवादाचा आनन्द घेत आहात. फोटो अगदी सुन्दर आलेत.

संजय खांडेकर's picture

7 Sep 2020 - 2:22 pm | संजय खांडेकर

खूपच छान , फोटो तर अप्रतिम.
जन्मगाव आणि बालपण पोफळी असल्यामुळे अगदी घरी पुन्हा गेल्यासारखे वाटले.
सोनपात्राजवळील "विहंगम दृश्यम " असा फलक आजही आठवतो (१९७६-७७ सालचा).
कांदा भजी पाहून कोयना बस स्टॅण्डवरील बटाटेवडे आठवले.

सुरेख आणी उत्साही प्रवास कथन . फोटोही मस्त . +१

मालविका's picture

7 Sep 2020 - 4:05 pm | मालविका

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद !

सुधीर कांदळकर's picture

8 Sep 2020 - 6:49 am | सुधीर कांदळकर

लेखन, प्रकाशचित्रे आवडली. वळणावरचे प्रकाशचित्र जास्त आवडले. धन्यवाद.

अन्या बुद्धे's picture

12 Sep 2020 - 8:04 pm | अन्या बुद्धे

सुंदर लिखाण. तुम्हाला घरीच मस्त साथीदार मिळालाय.. भरपूर भटका आणि लिहीत रहा..

जगप्रवासी's picture

15 Sep 2020 - 3:01 pm | जगप्रवासी

स्ट्राव्हाचा माझा पण अनुभव बकवास आहे त्यापेक्षा आदिदासच रनटास्टिक ह्या ऎपने आतापर्यंत व्यवस्थित अंतर दाखवलंय आणि तेच वापरतोय.

जगप्रवासी's picture

15 Sep 2020 - 3:18 pm | जगप्रवासी

स्ट्राव्हाचा माझा पण अनुभव बकवास आहे त्यापेक्षा आदिदासच रनटास्टिक ह्या ऎपने आतापर्यंत व्यवस्थित अंतर दाखवलंय आणि तेच वापरतोय.

गोरगावलेकर's picture

8 Oct 2020 - 9:22 pm | गोरगावलेकर

फोटोही सुंदर. लेख आधी वाचला होता पण लॉगिन क्वचितच करते त्यामुळे प्रतिसाद दिला नव्हता.