श्रीगणेश लेखमाला २०२० - जीवनातील पहिले महायुद्ध

प्रणव बनसोडे's picture
प्रणव बनसोडे in लेखमाला
30 Aug 2020 - 8:30 am

1

मित्रांनो, महायुद्ध म्हटले की तलवार, रणगाडा, बंदुका, भाले इ. गोष्टी आल्याच. पण मी ज्या महायुद्धाचा उल्लेख येथे करत आहे, ते शीतयुद्ध-cum-महायुद्ध आहे. हे युद्ध आहे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे! आता तुम्हाला वरील उतार्‍याचा अर्थ कळला असेल. माझ्या बाबतीत दहावा वर्ग काय ठरला, याचे हे छोटे चित्र आपल्या डोळ्यासमोर मांडतो. विद्यार्थ्यांनो, आपण जी कोणतीही परीक्षा आपल्या आयुष्यात देतो, ते म्हणजे एक युद्धच आहे. युद्धाचा अर्थ भांडण, वैर नसून संकटांना सामोरे जाणे व तोंड देणे होय. याचप्रमाणे इयत्ता दहावीला दिलेले तोंड किंवा आपल्या साध्या भाषेत 'दिवे लावणे'.

मी इयत्ता नववी हे वर्ष ७८% घेऊन ‘अ’ श्रेणीत उत्तीर्ण झालो. इंग्लिश विषयात तेव्हा मला शंभरपैकी एक्क्याण्णऊ (९१/१००) इतके गुण होते व मी आमच्या संपूर्ण ९व्या वर्गात इंग्लिशमध्ये प्रथम क्रमांकाचा (मुलांमधून) होतो व अखिल ९वा वर्ग मातोश्री माईसाहेब मुखरे शिक्षण प्रसारक मंडळी, पुसद यातील दुसरा विद्यार्थी. ती मजा दोन दिवसांतच संपली आणि इयत्ता दहावीचा क्लास चालू झाला. उन्हाळ्यातसुद्धा कुण्या गावाला जाता आले नाही. नुसता दिवसभर क्लास करायचा. जुलै १ला शाळा नियमतपणे सुरू झाली. अभ्याससुद्धा जोमात चालू होता. नोव्हँबरमच्ये शाळेने पाऊण कोर्स संपविला व दहावीमुळे शाळेला सुट्टी लागली. आठवड्यात फक्त शनिवारी जावे लागे प्रॅक्टिकलसाठी. क्लासच्याही शिक्षकांनी ऑक्टोबर एंडिंगला कोर्स संपविला. आता शाळेत, क्लासमध्ये आणि घरी फक्त सराव पेपर्स सोडवायचे होते. मी माझा संपूर्ण अभ्यासक्रम संपविल्यानंतर घरीच पेपर सोडवून बघितले व चांगल्या शिक्षकांकडून तपासून घेतले. तेव्हा माझी टकेवारी जवळपास ७०% भरली. आपणास आणखी सराव केला पाहिजे असे वाटले, पण काही कारणांनी किंवा गर्वाने समजा, मी अभ्यास करणे जणू सोडूनच दिले.

याचा परिणाम अतिशय लवकर दिसला. जानेवारी २००६मध्ये आमच्या क्लासने PBTEची परीक्षा घेतली, त्यात मला फक्त ६०% मिळाले. माझी आई शिक्षिका असल्याने तिला या गोष्टीचे फारच वाईट वाटले. तिने मला थोड्या चांगल्या रितीने मार्गदर्शन केले. माझ्या मामांनी सांगितलेल्या पद्धतीनेसुद्धा मी अभ्यासाला सुरुवात केली. याचा मला अतिशय जास्त फायदा झाला.

शेवटी परीक्षेचा दिवस आला. दिनांक ७ मार्च २००६ला आमचा पहिला पेपर मातृभाषा मराठी (कुमारभारती). सकाळी सहा वाजल्यापासनू सर्व इष्ट चाहत्यांचे दूरध्वनी येण्यास प्रारंभ झाला. सर्व जण परीक्षेसाठी शुभेच्छा देत होते.

मला परीक्षाकेंद्र माझीच शाळा असल्याने काहीच प्रश्न नव्हता. शेवटी १० वाजता मी परीक्षेला गेलो. माझे वडील मला रोज परीक्षेला सोडण्यास व घेण्यास येत असत. असे करत करत सर्व ९ पेपर झाले. आता शेवटचा पेपर उरला होता आणि सहा दिवस सुट्ट्या आल्या. ते सहा दिवस फार मोठे वाटत होते. मात्र अभ्यासही तेवढाच होता. बरोबर ते दिवस संपत गेले.

आता वेळ झाली, सकाळी सहा वाजताच सूर्योदय झाला व जन्म घेतला २२ मार्च २००६ने. आज शेवटचा पेपर होता. मी दैनंदिनीप्रमाणे आचरत गेलो. या शेवटच्या पेपरला गेलो. पेपर झाला. शेवटची घंटा वाजताच सर्व पेपर गोळा करण्याआधीच संपूर्ण शाळाभर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा चालू केला. सर्व शाळा आमच्या जल्लोशाने दुमदुमुली होती. सर्व पेपर घेऊन वर्गशिक्षक बाहेर पडताच सर्व विद्यार्थी मैदानात गेले. शिक्षकगणसुद्धा हा जल्लोश पाहतच होते. आज कोणत्या सिनेमाला जायचे हाच विचार व चर्चा चालू होती. मी सर्व मित्रांचा निरोप घेऊन वडिलांसमवेत घरी परतलो. माझ्या चेहर्‍यावरचा आनंद बघण्यास माझी आई ‘बनसोडे बंगल्याच्या’ महाद्वारात उभी होती.

शेजारी म्हणाले, “प्रणव, टेन्शन अगदी संपल्यायासारखं वाटतं ना?” मी उत्तरलो, “मी टेन्शन घेतलंच नव्हतं.” माझी ऐन दहावीत वर्तणूक उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यागत होती. मग उन्हाळ्यात तर मौजच मौज. मी अतिशय आनंदात उन्हाळा घातला. चार महिने अतिशय मौज केली. धमाल केली. आता रिझल्ट लागायची वेळ आली, तेव्हा मात्र कधी न आलेले टेन्शन मला सतावायला लागले. २१ जूनचा निकाल २६ जूनवर पोस्टपोन केला, तेव्हा श्वास घेतला. इतक्या सिंपल वर्तणुकीत माझ्या कर्माने माझ्यावर झडप घातली. मला फत ६५% मिळाले. मला लगेच आठवले की, ‘जैसी ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर.'

मी लगेच बाहेरगावी शिकायला जायचा निर्णय घरच्या मंडळींना सांगितला व त्यांनी तो पूर्ण केला. कारण या संपूर्ण आयुष्याचे ओझे वाहण्यास समर्थ व्हायचे आहे. या वर्षासाठी ज्यांनी मला मदत केली, त्यांचा मी ऋणी आहे.

माझे मामा (किशोर जाजू) म्हणत, "पिके ७०%च्या वर मुळीच जाणार नाही." त्यांचा अंदाज खरा झाला. या सर्व गोष्टीत मी परमपूजनीय मातोश्रीला जी आशा होती, ती पूर्ण करू शकलो नाही, ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय वाईट आहे. यानंतर मी सदैव तिची मान उंचावेल अशीच झेप घेण्याचा प्रयत्न करीन.

आणि जीवनातील पहिले महायुद्ध संपले.

प्रणव बनसोडे (पिके), बंगलोर

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

गणेशा's picture

30 Aug 2020 - 10:22 am | गणेशा

चांगले लिहिले आहे..
महायुद्धात मात्र कमी हाणामारी झाली.. अजून आठवणी येऊद्या..

चौथा कोनाडा's picture

30 Aug 2020 - 1:24 pm | चौथा कोनाडा

युध्दस्य कथा रम्य: उक्तीनुसार तुम्च्या युद्धाची कहाणी देखील रोचक झालीय ! मस्त लिहिलंय !
माझेही १०वीचे वर्ष आठवले ! ९ वीला ८७% पडल्यामुळे सुखद धक्का बसला होता. १० वी ला सरांनी मला "तू ९२-९४ % पाडू शकतोस" असा आत्मविश्वास दिला होता,
पण ते वर्ष आणि अभ्यास फार गंभीरपणे न घेतल्याने १०च्या निकालात ८०% च्या खाली गेलो, सरांनी बोलवून कान उघाडणी केली होती !

मस्त विषय! दहावी हे जर पाहिले महायुध्द असेल तर बारावी दुसरे महायुध्द असते! त्यापण आठवणी वाचायला आवडेल!