श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी…

Mandar Ayachit's picture
Mandar Ayachit in लेखमाला
29 Aug 2020 - 6:19 am

1
आठवणी…. आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अंदाज येत नाही, पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग एक असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचेही तसेच असते.. वपु असे म्हणाले होते. आज एका मित्राने ग्रूपमध्ये मिसळपावरच्या स्पर्धेची माहिती टाकली आणि मग काय, मिसळचे नाव ऐकताच मला मुंग्यांच्या वारुळात पडल्यासारखे वाटले आणि संपूर्ण अंगामध्ये मुंग्या थयथयाट करू लागल्या. मुंग्या पार डोक्यापर्यंत गेल्या.

मिसळपाव… तब्बल दीड वर्ष झाले खाऊन. कॉलेज संपले, बंगलोरला नोकरी लागली आणि पुण्याहून बंगलोरला यावे लागले. एखाद्या प्रेयसीशी प्रेमभंग व्हावा आणि पुढील जीवन विरहात व्यतीत करावे, तसेच काहीतरी झाले.

मला आणखी आठवतो तो क्षण. सात वाजता कात्रजवरून बंगलोरला जायची माझी बस होती. दोन दिवस चाललेले पॅकिंग आणि सर्वांचे भेटण्यासाठी चाललेले दौरे यातच मी व्यग्र होतो. तेवढ्यात माझे जिवलग मित्र भेटायला आले. ज्यांच्यासह मी माझे आतापर्यंत सर्वात आनंदाचे क्षण घालवलेले होते, ते असा असा चेहरा करून आलेले होते, जणू मी माहेरी जात आहे. 'बाबुल की दुवाएं लेती जा तुझको सुखी संसार मिले, पुणे की कभी ना याद आये बंगलोर मे उतना प्यार मिले' असे गाणे जोरजोरात म्हणत ती आगाऊ पोरे आली. मग आमच्या गप्पा बराच वेळ रंगल्या होत्या.

मध्येच श्री म्हणाला होता, "काय पाहुणे, बंगलोरला म्हणा की स्वारी, तू लेका, पहिलीच मजल एवढ्या दूर मारलीये. ३-४ महिन्यांमध्ये हा विसरून जाईल आपल्याला." सर्वांनी त्याला दुजोरा दिला होता. हिरमुसलेल्या चेहर्‍याने मी सर्वांना आश्वासन दिले, "नाही रे भावांनो, येत जाईन मी तुम्हाला भेटायला. बंगलोर काय, ८०० किमीवर तर आहे. रात्री बसलो की सकाळी इथे. मग सगळे जण मस्त कल्ला टाकू आपला नेहमीचा." माझी ही नेतेगिरी सर्वांनी हेरली. ही नुसती आश्वासने आहेत. पण मी तरी काय करणार? सध्या केवळ मी आश्वासने देऊ शकत होतो. भविष्य कोणी पाहिले आहे, आणि पुढे काय होणार कोणास ठाऊक. मग काय, माणूस स्वप्ने आणि आश्वासने यातच आनंद मानून घेतो.

मी तेव्हा म्हणालो होतो, "चला लेकांनो, आज पार्टी माझ्याकडून. आप्पाकडे जाऊन मिसळ खाऊ. मी तुमच्याशी कॉल, व्हिडिओ कॉलवर तर बोलू शकेन, पण मिसळ कशी खाऊ?" यावर सर्वांची एकसाथ टिप्पणी आली, "साहेबांना मिसळची पडली आहे, आमची काहीच पर्वा नाही." आम्ही सर्व जण आमच्या आप्पाकडे गेलो. नेहमीप्रमाणे जाऊन बसलो. आप्पांनादेखील माहीत होते ही पोरे काय खातात. त्यांनी टेबलावर ४ मिसळपाव आणून ठेवले आणि पेलाभरून थंडगार ताक आणायला विसरले नाहीत. आप्पा आम्हाला नेहमी म्हणायचे, "तुम्ही मला जणू माझ्या पोरासारखेच आहात." मी मिसळपावकडे डोळेभरून पाहिले होते. माझ्या डोळ्यामध्ये असलेली छप्पन सशांची व्याकूळता कोणापासून लपलेली नव्हती. ताटामध्ये सजलेल्या वाट्यांना मी तान्ह्या बाळाला जसे अलगद उचलावे तसे उचलून बाजूला ठेवले होते. बारीक चिरलेला कांदा आणि त्यात असलेली कोथिंबीर स्वतंत्र उमेदवारासारखे उभे होते. बाजूला असलेल्या लिंबाच्या दोन फोडी, शेव, फरसाण, शेंगदाणे, गूळ यांनी आपापले स्थान पटकावले होते. तिखट व साधा रस्सा यांनी आपले आजीवन सभासदत्व प्रकट केले होते. विविध मसाले, मटकी, पोहे, तसेच नाना पदार्थांनी सजलेली मिसळ पावासकट सिंहासनावर विराजमान झालेली होती. राजाने आज्ञा करावी आणि सर्वांनी प्रश्नांचा भडिमार करावा तसा आम्ही ताव मारला, खाताना सर्व जण तल्लीन झाले होते. या वेळी माझी मन:स्थिती वेगळीच होती. मी खातच होतो, जोपर्यंत मन भरत नाही. असे वाटत होते, जणू शेवटचीच खातो आहे. आणि जेव्हा तृप्तीचा ढेकर आला, तेव्हा समोर पाहिले तर सर्वांचे केव्हाच खाऊन झाले होते आणि ते माझ्याकडे पाहत बसले होते. माझ्या ताटात एकही कण शिल्लक नव्हता. या वेळी माझ्या या खाण्यावर आम्ही खूप हसलो होतो. बरोबरच होते, १ वर्ष काय मला येता येणार नव्हते पुढे.

पैसै देताना मी आप्पांना म्हणालो, "आप्पा, आता वर्षभर काय येणं शक्य नाही. बंगलोरला चाललो आहे. नोकरी मिळाली तिकडे." आप्पांना तेव्हा माझे भलतेच कौतुक वाटले होते. पोरगे एवढ्या लांब स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी चालले आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते, जेव्हा त्यांचे आशीर्वाद घ्यायला मी त्यांया पाया पडलो होतो. बाकी आप्पांचा कट्टा म्हणजे आमचे दुसरे घरच. या कट्ट्याने कितीतरी सुखाचे, दु:खाचे क्षण पाहिलेले, भांडणे, रुसणे, हसणे, फुगणे, गोंधळ, काळजी असे असंख्य क्षण पाहिलेले. खरेच, या मिसळपावची चव आणि कट्ट्याची आठवण सोबत असलेल्या या जिवलग मित्रांमुळे आणखीनच दृढ राहिली

आज दीड वर्ष झाले मला बंगलोरमध्ये अडकून. एक वषाचेे ट्रेनिंग संपून दहा दिवस घरी जायची योजना कोरोनाच्या राक्षसाने तुडवून काढली. बंद पडलेली दुकाने, भकास झालेली शहरे, ओसाड पडलेले रस्ते.. खरेच या सर्वांनी मनाच्या भक्कम तटबंदीचे बुरूज ढासळून पाडले. त्यामध्ये बंद पडलेल्या आमच्या कट्ट्याबद्दल आप्पांनी आणि मित्रांनी मला जेव्हा फोनवर सांगितले, तेव्हा मात्र मन बेचैन झाले. मी तेथे का नाही, याचे दु:ख होते.आहे.

इंग्लंडंमध्ये असताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते,
शुक पंजरी वा हरीण शिरवा पाशी
ही फसगत झाल तैशी
भूविरह कसा सतत साहू यापुढती
दशदिशा तमोमय होती
ने मजसी ने परत मातृभृमीला
सागरा प्राण तळमळला |

तशी काहीशी अवस्था आज माझी या ठिकाणी झाली आहे. माझी महाराष्ट्र भूमी, तेथे मिळणारे निरनिराळे खाण्याचे पदार्थ, माझे जिवलग मित्रमैत्रिणी, नातेवाईक, मराठी बांधव यांची पदोपदी आठवण येते. वपु म्हणतात - आठवणी या चांदण्यांसारख्या असतात, कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही. तसेच आज असंख्य आठवणी मुंग्यांप्रमाणे या वारुळामधून बाहेर पडत आहेत. यातील एक म्हणजे गणराज. या वर्षी आपला गणराय वाजतगाजत येणार नाही, याची खंत वाटते आहे. खरेच, काही आठवणी मनाच्या कोपर्‍यात सतत घर करून राहिलेल्या असतात, त्या कधीच विसरू शकत नाही. जसे फरसाणाशिवाय मिसळ नाही, तसाच आठवणीशिवाय माणूस नाही.

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

गणेशा's picture

29 Aug 2020 - 10:05 am | गणेशा

छान लिहिले आहे..

चौथा कोनाडा's picture

29 Aug 2020 - 1:14 pm | चौथा कोनाडा

व्वा मस्त ! अप्पांबरोबरचा मिसळ-निरोपाचं ह्रुद्य वर्णन केलंय !

आप्पांना तेव्हा माझे भलतेच कौतुक वाटले होते. पोरगे एवढ्या लांब स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी चालले आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते, जेव्हा त्यांचे आशीर्वाद घ्यायला मी त्यांया पाया पडलो होतो. बाकी आप्पांचा कट्टा म्हणजे आमचे दुसरे घरच. या कट्ट्याने कितीतरी सुखाचे, दु:खाचे क्षण पाहिलेले, भांडणे, रुसणे, हसणे, फुगणे, गोंधळ, काळजी असे असंख्य क्षण पाहिलेले. खरेच, या मिसळपावची चव आणि कट्ट्याची आठवण सोबत असलेल्या या जिवलग मित्रांमुळे आणखीनच दृढ राहिली

हे तर खासच !
लिहित रहा !

टर्मीनेटर's picture

29 Aug 2020 - 1:40 pm | टर्मीनेटर

छान लिहीलंय!
मिपावर स्वागत आणि पुढील लेखनास शुभेच्छा!

सुमो's picture

31 Aug 2020 - 7:26 am | सुमो

मस्त.
पुलेशु.

मिसळ चे वर्णन वाचूनच तोंडाला पाणी सुटले! मंदार, एकदम भन्नाट लिहिलं आहे !

सुबोध खरे's picture

5 Sep 2020 - 12:08 am | सुबोध खरे

छान लिहिलंय