श्रीगणेश लेखमाला २०२० - पडद्यावरचे चित्रपट

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in लेखमाला
31 Aug 2020 - 8:40 am

1
९०च्या दशकातला सुरुवातीचा काळ. मला चांगलं आठवतंय, जातीयवादी दंगलींमुळे आणि बाॅम्बस्फोटांच्या मालिकेमुळे लोकांमध्ये भीतिदायक वातावरण पसरलं होतं. त्यानंतर लातूरचा भूकंपही बरीच मोठी मनुष्यहानी करून गेला होता. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांसाठी आणि त्यातल्या त्यात मुंबईकरांसाठी हा काळ थोडासा तणावग्रस्तच होता. पण या तणावग्रस्त वातावरणातही मुंबईतल्या चाळी-वाड्यांमधून होणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मध्यमवर्गीय माणसांना विरंगुळ्याचे दोन-चार क्षण सुखाने जगता यायचं. जानेवारीतल्या प्रजासत्ताक दिनापासून ते डिसेंबरातला नाताळ, नववर्षपूर्व दिनाची संध्या.. लोकांना एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करायला कोणतंही निमित्त पुरायचं. या सर्व कार्यक्रमांत गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. उत्सवासाठी महिनाभर आधीपासूनच सुरू होणारी लोकांची लगबग, विसर्जनाच्या दिवशी रिकाम्या मंडपात शेवटची आरती झाल्यानंतरच संपायची. या गणेशोत्सवाप्रमाणेच आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम असायचा आणि तो म्हणजे चाळीतली सत्यनारायणाची वार्षिक पूजा!

नृत्याच्या आणि गाण्यांच्या स्पर्धेप्रमाणे या पूजेमध्ये सर्वात मोठं आकर्षण असायचं पडद्यावरच्या सिनेमाचं! पूजेच्या दिवशी रात्री दहा-अकराच्या दरम्यान पडद्यावरचा सिनेमा सुरू व्हायचा तो अगदी दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत चालायचा. बहुतेक चाळीतल्या, वाडीतल्या पूजा या एप्रिल-मे महिन्यात सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतरच असत, त्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी घरातल्यांची मुळीच आडकाठी नसे.

सरसकट मध्यमवर्गीयांच्या घरात टीव्ही नावाची चैन नव्हती. त्यामुळे शनिवारी-रविवारी दूरदर्शनवर लागणाऱ्या सिनेमांचा प्रेक्षकवर्ग मर्यादित असायचा. अगदी हजारभर रुपयांत संपूर्ण कुटूंबाचा महिन्याचा किराणा भरणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी चित्रपटगृहातल्या बाल्कनीचं साठ रुपयांचं तिकिटही खूप महाग वाटण्याचा तो काळ. रेडिओच्या विविधभारतीवर लागणाऱ्या विविध उच्च दर्जाच्या कार्यक्रमांतून श्राव्य स्वरूपात लोकांचं मनोरंजन व्हायचं. त्यामुळे सामाजिक कार्यक्रमांमध्ये साहजिकच दृश्य स्वरूपात मनोरंजन करू शकणाऱ्या पडद्यावरच्या चित्रपटांना मोठी मागणी असायची.

सिनेमे किती आणि कोणते ठेवायचे, हे पूजेच्या चर्चेमध्ये आधीच ठरवलं जायचं आणि त्यातही खासकरून बच्चनच्या सिनेमांना जास्तीची पसंती असायची. जास्त जमलेल्या वर्गणीमधून क्वचित एखाद्या वर्षी एकदम दोन दोन सिनेमे बघण्याची पर्वणी मिळायची. त्यातून बऱ्याचदा दोन्ही हिंदी सिनेमे असायचे किंवा मग एक हिंदी आणि एक मराठी (बहुतांशी लक्ष्याचे) असे दोन असायचे. लोकांची उत्सुकता वाढावी, म्हणून आठवडाभर आधीपासूनच चाळीतल्या मुख्य फलकावर रंगीत खडूंनी सिनेमाची जाहिरात केली जायची. त्यातून एखादा सुपर डूपर हिट सिनेमा असेल, तर झाडून सगळी चाळ सिनेमा पाहायला जमायची. पूजेच्या दिवशी सकाळपासूनच लहान पोरं बसण्याच्या जागेवरून भांडणं करायची.

नृत्य-गाण्यांच्या स्पर्धेचा कार्यक्रम संपेतो सिनेमावाली मंडळी त्यांच्या सगळ्या सामानासकट हजर व्हायची. तोपर्यंत चाळीतली झाडून सगळी मंडळी गोधड्या-पाधड्या घेऊन जागा पकडून सिनेमा सुरू व्हायची वाट बघत बसलेली असायची. बरीचशी लहान पोरं वाट पाहून बसल्या जागेवरच आडवी व्हायची. यथावकाश सिनेमावाली माणसं मैदानाच्या वा रोडच्या मधोमध दोन बाजूंना रोवलेल्या बांबूंवर त्याचा पांढराशुभ्र पडदा लावून घ्यायची. कधी हा पडदा बराच मळकट कळकटही असायचा. मग थोड्या अंतरावर जुन्या प्रकारच्या प्रोजेक्टरसाठी जागा केली जायची. त्याच्या बाजूलाच सिनेमाच्या रिळांचा डबा ठेवलेला असायचा. त्यांच्या या सगळ्या सेटिंगदरम्यान मंडळातली काही मोठी पोरं भाव मारण्यासाठी उगाच मागे-पुढे करायची. सगळं व्यवस्थित लावून झाल्यावर मग सगळ्यांच्या संमतीने पडद्यावर सिनेमाला सुरुवात व्हायची. सिनेमा सुरू झाला रे झाला की पहिल्याच नावाला टाळ्या-शिट्टयांचा मोठा गजर व्हायचा. सिनेमा पाहताना जमलेल्या प्रत्येक माणसाला कोण आनंद व्हायचा, हे आत्ता शब्दात सांगणं कठीण आहे. थेटरातला सिनेमा आवाक्याबाहेरचा असल्यामुळे पडद्यावरचे हे सिनेमे तेव्हा जल्लोशपूर्ण वातावरणात पाहिले जायचे. या अशाच सिनेमामध्ये अमिताभ बच्चनचा गिरफ्तार आणि हम, मनोजकुमारचा देशभक्तिपर क्रांती, जितेंद्र-शत्रुघ्नचा खुदगर्ज, नाना-राजकुमार जोडगोळीचा तिरंगा पाहताना लहानपणी जाम धम्माल अनुभवायला मिळाल्याचं लख्ख आठवतंय.

काळाची स्थित्यंतरं होत गेली. भारतात सुरू झालेल्या जागतिकीकरणामुळे लोकांच्या हातात बर्‍यापैकी पैसा खुळखुळू लागला होता. ओनिडा, व्हिडिओकाॅन, सॅन्सुईच्या ब्लॅक अँड व्हाइट, कलर टीव्ही सेट्सनी मध्यमवर्गीयांच्या घरात हळूच शिरकाव केला होता. थिएटरमधला सिनेमा महिन्याभरातून एकदा तरी पाहिला जात होता. टीव्हीच्या जोडीला व्हीसीआर आल्यामुळे, हवा तो सिनेमा पाहता येणं सहज शक्य होऊ लागलं होतं. त्यामुळे सार्वजनिक पूजेतल्या कार्यक्रमांतून पडद्यावरच्या सिनेमांएवजी हिंदी-मराठी ऑर्केस्ट्रांची हळूहळू मागणी होऊ लागली. कलाकारांना समोर 'लाइव्ह' गाणी गाताना, नाचताना पाहणं लोकांना पडद्यावरच्या नाच-गाण्यापेक्षा जास्त आवडू लागलं होतं. जसं त्या विविधरंगी ऑर्केस्ट्रांचं फॅड सुरू झालं, तसा पडद्यावरचा सिनेमा त्या पडद्याच्या घडीप्रमाणे कायमचा गुंडाळला गेला आणि लोकांच्या विस्मरणातही गेला.
2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

भारी लिहिले आहे किसना.. एकदम सारे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतायेत..
तू एकदम भारी लिहिले आहे, प्रत्येक घटना आणि चाळीतील माणसांची व्यक्तिचित्रे लिहायला घेतली तर बटाट्याच्या चाळी सारखे मस्त लेखन करशील..
घे मनावर..

माहेरची साडी :-), तिरंगा, क्रांती, कर्मा, राम लखन आणि लक्ष्याचे, अशोक सराफ चे आणि बच्चन चे असंख्य चित्रपट मी पडद्यावर आणि नंतर vcr वर पाहिलेले आहेत त्यामुळे तर आणखिन मस्त वाटले

तू आणि मी एकाच वयाचे, त्यामुळे या आठवणी जवळजवळ सारख्या..
फरक इतकाच की मुंबई -पुणे सारख्या शहरात मी रहात नसत, मी पाहिलेले काही सिनेमे हे गावाला मामा च्या गावाला ही.

उरुळी कांचन ला रंगपंचमी ची यात्रा झाली की live नाटक असे. पूज्य. मणिभाई देसाई यांच्या मुळे तमाशा गावातून हद्दपार झालेला होता.
या नाटकासाठी ground वर, चटया घेऊन जागा पकडण्यासाठी काय ती गडबड आमची.

लिहीत रहा किसना.... वाचत आहे..

एक सामान्य मानव's picture

31 Aug 2020 - 10:11 am | एक सामान्य मानव

आमच्या गल्लीत सिनेमा असला की दर वर्षीचा एक ठरलेला आयटम. सिनेमा सुरु व्हायच्या आधी अन्धार झाला की कोणीतरी साप साप असे ओरडायचे. मग बसलेले सगळे घाबरुन पळायचे. लाइट लावा असा ओरडा व्हायचा. हे होण्यात जो वेळ जायचा त्यात साप म्हणणारे पट्कन जागा पटकवायचे. आणि हे दर वर्षी झाले तरी मन्ड्ळी फसायची.

किसनदेवा, तपशीलवार आणि सर्व बारकावे पकडत पण पाल्हाळिक न होता लिहिणे हे तुझं खास वैशिष्ट्य इथेही दिसतं. तुला अचाट स्मरणशक्ती लाभलेली आहे हे एकूण लेखनातून जाणवलेलं आहे.

टर्मीनेटर's picture

31 Aug 2020 - 10:49 am | टर्मीनेटर

छान लिहीलंय!
लहानपणी पडद्यावर दोन-तीन चित्रपट पाहील्याच्या आठवणी ताज्या झाल्या. गम्मत म्हणजे दाखवलेले चित्रपट आधीच पाहीलेले असल्याने मुद्दाम ते प्रोजेक्टरच्या बाजुने न बघता त्याच्या विरूद्ध बाजुने पाहीले होते. असे केल्याने पडद्यावर दिसणारी दृष्ये वेगळीच दिसत. डावीकडचा नायक उजवीकडे तर उजवीकडची नायीका डावीकडे, उजवीकडुन येणा-या गाड्या डावीकडुन येताना दिसत. त्यात एक वेगळीच मजा यायची :)
असो... गेले ते दिवस, राहील्या त्या आठवणी!

पलिकडल्या बाजूने.. अगदी अगदी.

त्यातही काही ठिकाणी वारा येऊन पडदा शिडाप्रमाणे टरटरुन फुगणे आणि एका बाजूने अंतर्वक्र मोठ्ठा म्याग्निफाइड कार्टून हिरो तर दुसरीकडून बारका बहिर्वक्र हिरो असंही बघितलंय. लाफिंग ग्यालरी...

बाय द वे, या अंतर्वक्र, प्रसरण पावलेल्या दृश्यात अमिताभ (त्यावेळचा उच्चारी "अमिताबच्चन") हातात एक चप्पल धरुन कोणालातरी तिचा साईज नंबर सांगतोय की विचारतोय असं दृश्य अजूनही डोळ्यासमोर आहे. बाकी तपशील आठवत नाही.

विनिता००२'s picture

31 Aug 2020 - 12:54 pm | विनिता००२

गणपतीत प्रोजेक्टर वर उपकार दरवर्षी असायचाच. थरथराट पण पाहीलेला आठवतोय. :) मज्जा असायची

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2020 - 12:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लिहिलंय देवा. आठवणी सुरेख. उत्तम लिहिता तुम्ही अधुन मधुन असा हात सैल सोडत राव्हा...!
आपल्या आठवणीमुळे आमच्याही तंबू सिनेमाच्या आठवणी हलायला लागल्या.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

31 Aug 2020 - 5:09 pm | चौथा कोनाडा

भारी आठवण ! पडद्यावरचे सिनेमे गावाकडे गणेशोत्सवात पाहिले होते ज्याम धमाल यायची !
इतक्या गंमतीजंमती व्ह्यायच्या की पुढिल काही महिन्यांपर्यंत गप्पांसाठी पुरायच्या.
शहरात आल्यावर आख्खी रात्र जागून व्हिडोचा सिनेमा पाहण्याचे योग आले. पण नंतर सकाळी ड्युटीसाठी बाहेर पडायला लागायचे त्यामुळे रात्री जागून सिनेमा पहाणे परवडेनासे झाले ! नंतर घरो घरी टिव्ही, चॅनेल्स आल्यावर ही सारवजनिक गंम्मत अनुभवायला मुकलो !
किसनराव, तुमच्या या लेखामुळे त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या !
मस्त नॉस्टेल्जिक लेखन !

aschinch's picture

31 Aug 2020 - 6:50 pm | aschinch

आमच्या गावच्या बहिरमच्या यात्रेत रात्रभर तंबू टॉकीज मध्ये एका पाठोपाठ चित्रपट बघायचो. कारण बाहेर खूप थंडी असायची, त्यामुळे आत जरा उबदार वाटायचे. सकाळी मेंदूत एकदम गोंधळ उडायचा. एका पिक्चर ची स्टोरी दुसऱ्यात मिक्स व्हायची! मस्त आठवणी जागविण्यासाठी धन्यवाद!

सुमो's picture

1 Sep 2020 - 4:40 am | सुमो

पडदा सिनेमाच्या. मस्त माहौल पकडलायत.
एक रील संपले की त्याचा चट चट असा आवाज आणि पुढचे रील सुरु होताना १०-९-८ असा चमकत्या आकड्यांचा काऊंटडाउन हे आठवून गेलं...

तुषार काळभोर's picture

1 Sep 2020 - 4:02 pm | तुषार काळभोर

असा प्रकार आमच्याकडे गणेशोत्सवात व्हायचा. नव्वदीच्या उत्तरार्धात. आम्ही वर्गणीतून राहिलेल्या पैशातून व्हीसी आर आणि कॅसेट आणायचो. साठ की शंभर रुपयांत vcr आणि २० रुपयात कॅसेट. नवीन पिक्चर ३० रुपये.
एक मराठी पिक्चर माहेरची साडी किंवा लेक चालली सासरला किंवा तेव्हा गाजलेला महेश कोठारे पट. दुसरा नवीन हिंदी. अन् तिसरा खास आकर्षण रामसे पट.
कार्यक्रम साडेआठ नऊ ला सुरू व्हायचा. सर्वाधिक उत्साही बाल कार्यकर्ते मराठी पिक्चर चा इंटर्वल व्हायच्या आधी झोपायची. गृहिणी मराठी पिक्चर बघून जायच्या. तरुण मंडळी नवीन पिक्चर बघत बसायची. मग मुली निघून जायच्या. मग शेवटी तरुण कार्यकर्ते अन काही गृहस्थ दो गज जमीन के नीचे, पुराण मंदिर,पुरणी हवेली बघत राहायचे.