श्रीगणेश लेखमाला २०२० - अण्णासाहेब

अनिकेत अजित पुजारी's picture
अनिकेत अजित पुजारी in लेखमाला
31 Aug 2020 - 8:45 am

1

आयुष्यात लोक उगाच भेटणं हा योगायोग म्हणावा लागेल. पण ज्या भेटलेल्या व्यक्ती आपल्यासाठी आठवणीत राहतात, त्यांचा आदर आणि त्यांच्याबद्दलच्या भावना काही औरच असतात. अण्णासाहेब देशपांडे हे असंच माझ्या आठवणीतलं एक नाव. आई महिला मंडळामध्ये कार्यकारी सभासद असल्यामुळे अण्णासाहेब देशपांडे आणि शुभाताई दोघांशी ओळख झाली होती. काही वर्षांपूर्वी एक प्रथा होती. हळदीकुंकवाचा कार्यक्रम असला की आई एक लिस्ट बनवून द्यायची. त्यामध्ये तपशील लिहिलेला असायचा आणि प्रत्येकाच्या नावासमोर सही घेऊन यायचं काम माझं असायचं. आमचं घर न्यू कॉलनीतच होतं. अण्णासाहेबांचं घर अगदी दहा पावलांवर होतं. जेव्हा जेव्हा हळदीकुंकवाचं आमंत्रण द्यायला जायचो, तेव्हा चिवडा, भडंग, फरसाण खायला मिळायचं अन त्या खादाड वयात आई बाजूला नाही, त्यामुळे भीती नाही म्हणून मीसुद्धा कधी नको म्हणायचो नाही. त्यांच्या घराला लागूनच सुरेश सरदेसाईंचं घर. दर रविवारी गाण्याचा क्लास असायचा. जर रविवारी कुठे दौरा नसला तर अण्णासाहेब घरी असताना, क्लास संपला की आम्हाला घरी बोलवायचे आणि मग आम्हा ३-४ जणांची मेजवानीच असायची. माझ्यासोबत दोन मुली असायच्या. तात्त्विक वागणुकीनुसार त्या 'नको' म्हणायच्या आणि मी निरागस पण मनात राग ठेवून त्यांच्याकडे बघायचो. तरी खायच्याच. त्या वेळचे ते दिवस असेच होते. मी लहान होतो, पण काही आठवणी धुक्यासारख्या धूसर न होता, दगडांवरच्या रेषाप्रमाणे अढळ आणि अटळ आहेत.

अण्णासाहेबांना लहान मुलांबद्दल वाटणारं प्रेम जाणवत असल्यामुळे भीतियुक्त आदर नसून एक प्रेमळ आदर होता. कधी कधी अण्णासाहेब माझ्या घरी यायचे. पण बॅलन्स शीटमध्ये मी त्यांच्या घरी जाण्याच्या एन्ट्रीज जास्त आहेत.

२० जुलै म्हणजे श्रीहरी विद्यालयासाठी एक महत्त्वाचा दिवस. चौथीमध्ये असेन बहुतेक. त्या वेळी शैलेश दाणी सरांनी संध्याकाळच्या कार्यक्रमाचं 'नानांच्या आठवणी' हे दर वर्षीचं भाषण त्या वर्षी मला दिलं होतं. पाठांतरात तसा कच्चा होतो मी. पण दाणी सरांनी त्यांच्या आठवीच्या क्लासमध्ये बोलावून मुलांच्या वह्या तपासत असताना चांगली घोकमपट्टी करवून घेतली होती. घरी नुसतं भाषण केलं की आई रागवायची आणि तिच्या सांगण्यावरून नंतर त्यामध्ये मग भाव ओतले गेले. कारण आईला तो एक भाषणाचा टिपिकल आवाजाचा फॉर्मॅट आवडायचा नाही. त्यामुळे पाठांतराबरोबर त्यामध्ये ते भाव कसे आणले जातील ह्याची तालीम आईने करवून घेतली. कधी नाही ते पहिल्यांदा इतकं मोठं भाषण पाठ केलं होतं. याआधी फक्त प्रार्थनेच्या वेळी शाळेत पंचांग पाठ करायचं आठवतंय.

भाषण झालं. सगळ्यांनी कौतुकही केलं आणि हळबे सरांनी माझी माहिती काढली. दोन-तीन दिवसांनंतर अण्णासाहेबांचा आईला फोन आला की ते आणि हळबे सर घरी येतायत आणि हळबे सर आणि अण्णासाहेब घरी आले. हळबे सरांशी त्या दिवशीची माझी पहिलीच भेट होती. हळबे सर हे किती मनमोकळं व्यक्तिमत्त्व आहे, हे मला पहिल्याच भेटीत जाणवलं. चहापाणी, गप्पा झाल्या आणि दोघांनी झालेल्या भाषणाचं कौतुकास्पद बक्षीस म्हणून दोन गोष्टींची पुस्तकं दिली. नवनीतचं गोष्टींचं त्या काळातलं ते महागडं पुस्तक होतं.

अण्णासाहेबांची अशीच आणखी एक आठवण. शाळेत कर्नाटक सरकारतर्फे प्रतिभा कारंजीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. पाचवीत असताना मी भाग घेतला होता आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिला आलो. मध्ये बरेच महिने लोटले. एके दिवशी अचानक आईला अण्णासाहेबांचा फोन आला. "मला तुमच्या मुलाविषयी बोलायचं आहे. होईल तितक्या लवकर घरी या." फोन ठेवल्या ठेवल्या आईचा मला पहिला प्रश्न, "काय केलं आज शाळेत? कुणाशी भांडलास?" कारण शाळेच्या सचिवांचा असा फोन येणं आणि ताबडतोब आई-पप्पांना बोलावणं म्हणजे दुसरा विचार डोक्यात येऊ शकतच नाही. तसा मी रोज कुणाबरोबर तरी भांडायचो. पण अशा वेळी "नेहमी खरे बोलावे" ही व्याख्या हाताळली तर शिक्षा आपल्यालाच होणार हे माहीत असल्यामुळे मी निर्लज्जासारखा "नाही आई" म्हणालो. पण तरी आईला शंका होतीच. मी मात्र आता भिऊन गेलो होतो. दीड-दोन तासांनंतर आई-पप्पा घरी आले आणि मग कारण कळलं. मैसूरहून शाळेला पत्र आलं होतं की प्रतिभा कारंजीच्या गाण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धा मैसूरमध्ये होणार आहेत आणि त्यामध्ये माझं नाव आणि बाकीचा तपशील होता. सरदेसाई सरांनीच शिकवलेलं कन्नड गाणं आणि त्याची प्रॅक्टिस पाहण्यासाठी स्वतः अण्णासाहेब क्लासच्या वेळी येऊन गाणं ऐकायचे. त्यांनी ती स्पर्धा इतकी मनावर घेतली, त्यामुळे मी मैसूरला जाऊ शकलो. इतर स्पर्धक वयाने मोठे होते. ते सगळा वाद्यवृंद सोबत घेऊनच आले होते. मात्र मी तिथे नुसता गायलो. त्यामुळे तिथला निकाल काय लागला ते अजूनही मला कळलेलं नाही. कारण लगेच निघायचंसुद्धा होतं. शाळेत नंतर कुणीतरी म्हणालं की तिसरा क्रमांक आला, पण माहीत नाही. तिथे बरंच शिकायला मिळालं. त्यांच्या गाण्याची शैली, त्यांचं त्यामध्ये असलेलं प्रभुत्व हे सगळं बघितलं. जर अण्णासाहेबांनी ते पत्र नुसतंच फाइलमध्ये ठेवलं असतं, तर कदाचित मी मैसूर आणि ती स्पर्धा त्या वयामध्ये अनुभवलीच नसती. थोरामोठ्यांचे आशीर्वाद हे असेच असतात, जे सतत प्रोत्साहन देत असतात आणि नवीन काही करण्यासाठी प्रवृत्त करत असतात.

नंतर अण्णासाहेबांनी उगार सोडलं आणि मी पुढच्या शिक्षणासाठी धारवाडला गेलो. त्यानंतर त्यांच्याशी कधीच कॉन्टॅक्ट झाला नाही. अचानक काही दिवसांपूर्वी आईला कुणाचा तरी फोन आला. आणि आई एकदम आश्चर्याने "कधी?" वगैरे विचारू लागली आणि नंतर मला बातमी कळली. इतकी वर्षं आठवणीत राहिलेले अण्णासाहेब त्या दिवशी हे जग सोडून निघून गेले होते. विश्वास ठेवणं कठीण होतं. कल्पनाच करवत नव्हती.

पण चांगली माणसं आणि त्यांचं अस्तित्व हे मनात कायम घर करून राहतं.

माझ्यासाठी महत्त्वाच्या माणसांपैकी एक असलेले अण्णासाहेब. त्याशिवाय ह्या आठवणी इतक्या पक्क्या लक्षात राहणं अशक्य होतं. त्यांच्याबद्दलचा तो प्रेमळ आदर अजूनही तसाच होता, आहे आणि राहील.
2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

31 Aug 2020 - 1:32 pm | चौथा कोनाडा

व्वा, अण्णासाहेबांचं व्यक्तिचित्र अतिशय सुंदर उतरलंय !

मी लहान होतो, पण काही आठवणी धुक्यासारख्या धूसर न होता, दगडांवरच्या रेषाप्रमाणे अढळ आणि अटळ आहेत.

कधी कधी अण्णासाहेब माझ्या घरी यायचे. पण बॅलन्स शीटमध्ये मी त्यांच्या घरी जाण्याच्या एन्ट्रीज जास्त आहेत.

स्वतः अण्णासाहेब क्लासच्या वेळी येऊन गाणं ऐकायचे. त्यांनी ती स्पर्धा इतकी मनावर घेतली, त्यामुळे मी मैसूरला जाऊ शकलो.

जर अण्णासाहेबांनी ते पत्र नुसतंच फाइलमध्ये ठेवलं असतं, तर कदाचित मी मैसूर आणि ती स्पर्धा त्या वयामध्ये अनुभवलीच नसती. थोरामोठ्यांचे आशीर्वाद हे असेच असतात, जे सतत प्रोत्साहन देत असतात आणि नवीन काही करण्यासाठी प्रवृत्त करत असतात.

हे तर खासच !

अनिकेत अजित पुजारी, लेखन आवडले, शैली देखिल सुंदर आहे ! लिहित रहा !

सिरुसेरि's picture

31 Aug 2020 - 2:09 pm | सिरुसेरि

सुरेख आठवणी आणी लेखन . मिरजकडुन रेल्वेने बेळगावला जाताना पहिले / दुसरे स्टेशन लागते ते उगार गावाचे . तेथिल शिरगावकर यांचा साखर कारखाना ( उगार शुगर लिमिटेड ) , जोग हॉस्पिटल , नीट नेटकी वस्ती असलेले गाव अशा गोष्टी ऐकल्या आहेत .

विनिता००२'s picture

31 Aug 2020 - 4:54 pm | विनिता००२

सुरेख व्यक्तिचित्रण :)

गणेशा's picture

31 Aug 2020 - 5:46 pm | गणेशा

अप्रतिम लिहिले आहे..
अण्णासाहेब हे व्यक्तिमत्व तर ठळक जाणवते.. पण त्याच बरोबर तुमचे भाव वाक्या वाक्यातून चित्रित होतात..

निव्वळ अप्रतिम लेखन आणि आठवण..

लिहीत रहा असेच छान छान..

aschinch's picture

31 Aug 2020 - 6:59 pm | aschinch

अनिकेत, छानच लिहिले आहे! पूर्वीचे शिक्षक असे गुणग्राहक आणि प्रोत्साहन देणारे होते.

पण चांगली माणसं आणि त्यांचं अस्तित्व हे मनात कायम घर करून राहतं.
**अशी माणसं मिळन भाग्यच!

माझ्यासाठी महत्त्वाच्या माणसांपैकी एक असलेले अण्णासाहेब. त्याशिवाय ह्या आठवणी इतक्या पक्क्या लक्षात राहणं अशक्य होतं.
** अगदी खुपचं छान वाटलं वाचतांना.अप्रतिम!

सुमो's picture

1 Sep 2020 - 4:44 am | सुमो

व्यक्तिचित्र.

पु.ले.शु.

MipaPremiYogesh's picture

2 Sep 2020 - 3:29 pm | MipaPremiYogesh

खूप सुंदर. अशा प्रकारचे शिक्षक आणि विद्यार्धी दोन्ही दुर्मिळ झाले आहे सध्याच्या काळात. खूप छान लिहिले आहे. लिहीत राहा. साधारण कुठल्या वर्षीच्या आहे ह्या आठवणी ?

शा वि कु's picture

2 Sep 2020 - 4:00 pm | शा वि कु

पुलेशु.

श्वेता२४'s picture

2 Sep 2020 - 10:59 pm | श्वेता२४

आवडलं.