श्रीगणेश लेखमाला २०२० - परतवाडा सुपर.. !

aschinch's picture
aschinch in लेखमाला
27 Aug 2020 - 5:55 am

1

"फलाट क्रमांक तीनवर लागलेली गाडी सहा वाजताची परतवाडा सुपर बस असून बस मध्ये कुठेच थांबणार नाही. परतवाड्याला थेट जाणाऱ्या प्रवाशांनीच गाडीत बसून घ्यावे!" अशी घोषणा लाउडस्पीकरवरून अमरावती बस स्थानकाच्या बाहेरसुद्धा ऐकू यायची आणि प्रवाशांची पावले जलदगतीने बसकडे वळायची!

१९८०च्या सुमारास परतवाडा एसटी डेपोने अमरावती विनाथांबा बस सुरू केली आणि ही बस प्रचंड लोकप्रिय झाली. याआधी अमरावतीला जाणाऱ्या बसेस भुगाव, आसेगाव, पूर्णानगर, वलगाव अशा अनेक ठिकाणी थांबत, मजल-दरमजल करीत अमरावतीला पोहोचत किंवा परत येत! अमरावती हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे परतवाड्याहून अमरावतीला जाणारे खूप लोक असत. व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, कोर्टकचेरीवाले, हॉस्पिटलला जाणारे असे अनेक लोक असत! त्यांना लवकरात लवकर अमरावतीला पोहोचून, कामे आटपून पुन्हा रात्रीच्या आधी घरी परतायचे असे! त्यांच्यासाठी ही सुपर बस म्हणजे एक वरदानच ठरली! दर एक तासाने या बसेस परतवाडा आणि अमरावती या दोन्ही ठिकाणाहून निघत.

संध्याकाळी सहाच्या अमरावती परतवाडा सुपरमध्ये खिडकीजवळची जागा मिळणे म्हणजे एखादे अढळपद मिळाल्यासारखेच वाटे. ते प्रवासी मग खिडकीतून ज्या लोकांना जागा मिळाली नाही, त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत! पण बहुतेक मंडळी एकमेकांना चांगली ओळखत असल्यामुळे "अबे, माझ्यासाठी जागा ठेव जो" अशी विनंतीहि करण्यात येई. मी त्या वेळी अमरावतीला शिकत होतो आणि दर शनिवार-रविवारी घरी परतवाड्याला धाव घेत असे. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या बसमध्ये खिडकीजवळची जागा मिळणे म्हणजे मोठा पराक्रम गाजवण्यासारखे वाटे!

अमरावती परतवाडा जेमतेम पन्नास किलोमीटर आणि एक तासाचा प्रवास! पण अजूनही तो कायमचा मनावर कोरला गेलेला आहे. बाकी गाड्या अमरावती शहरातून गर्दीतून वाट काढून जात. पण ही सुपर बस मात्र त्याला अपवाद होती! ही बस गाडगेनगर, विदर्भ महाविद्यालय, इंजीनिरिंग कॉलेज या रमणीय मार्गाने भन्नाट वेगाने अमरावती शहरातून बाहेर पडे. संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा वृक्षांच्या रांगा होत्या. त्यामुळे थंड, स्वच्छ वाऱ्याच्या झुळका बस मध्ये येत. त्यावेळी एसी बसची संकल्पना नसूनही एसी सारखाच अनुभव येई.

बघता-बघता बस वलगावच्या पुलाजवळ येऊन पोहोचे. बसमध्ये उजव्या बाजूला बसलो, तर स्व. गाडगेबाबांच्या स्मरणस्थळाचे आणि आश्रमाचे दर्शन होई. वलगावच्या पुलावरून जाताना नदीला पाणी असेल तर खूपच मजा येई. वलगाव पार होईपर्यंत बसमधील अर्धे प्रवासी थंड वाऱ्यामुळे गाढ झोपी जात. फार उत्साही असलेली मंडळीच जागी राहून बाहेर बघत. काही मिनिटातच सुपर बस पूर्णानगर, आसेगावला येऊन पोहोचे. आसेगाव म्हणजे अर्धे अंतर कापण्याची खूण!

आसेगाव आले की बरेच प्रवासी मधूनच झोपेतून उठून "आसेगाव आले का?" असे विचारत. त्यामुळे त्यांना अर्धे अंतर कापल्याचे समाधान मिळे. "मागे गेले" असे उत्तर मिळाले की ते परत डोळे मिटून झोपायला मोकळे! आणखी एक डुलकी घेईपर्यंत गाडी मग भूगावला पोहोचे.
एव्हाना संध्याकाळ गर्द झालेली असे आणि थोडा अंधार पडलेला असे. इवलेसे भुगाव मागे टाकून, बस भूगोलच्या पुलावरून वळण घेई. भुगावच्या नदीला कधी पाणी नसायचेच, पण पाऊस वगैरे चांगला असेल तर नदीला कधीकधी पाणी असायचे. मग पुलावरून बस जाताना "चांगले पाणी आहे या वर्षी नदीला" असे काही कौतुकास्पद उद्गारही निघायचे.

भुगाव मागे पडले की झोपलेली नेहमीची सराईत मंडळी अकस्मातपणे जागी व्हायची. काही जण डोळे चोळायचे, काही जण सामान व्यवस्थित आहे ना याची खातरी करून घ्यायचे, आया आपल्या मुलांना उठवून स्वेटर वगैरे घालू लागायच्या. कारण आता परतवाड्याची चाहूल लागायची, परतवाड्याचे लाईट दुरून दिसू लागत. त्यातही ज्या मंडळींना अचलपूर फाट्यावर उतरायचे असे, ती मंडळी सरसावून बसत. बस सुपरफास्ट असल्यामुळे काही वेळातच तोंडगाव फाटा, अचलपूर नाका पार करून अचलपूर फाट्याला थांबायची. अमरावती सोडल्यानंतरचा बसचा हा पहिलाच थांबा. काही लोक तेथे उतरायचे आणि बस मग पुढे मार्गस्थ व्हायची. एव्हाना बसमधले दिवे लागलेले असत. साधारणतः दिवेलागणीच्या सुमारास सुपर बस परतवाडा बस स्थानकावर येऊन थांबायची!

तीच बस जर अमरावतीला परत जात असेल, तर मग बसमधून लोक उतरायच्या आधीच, जाणारे लोक दाराजवळ चढण्यासाठी गर्दी करत. बसमधून उतरलेले प्रवासी वेगवेगळ्या मार्गाने घरचा रस्ता पकडत. बरेचसे लोक तर चालतच घराकडे निघत. त्या वेळी परतवाड्यात ऑटोरिक्षा नव्हत्या, त्यामुळे साध्या रिक्षा खूप होत्या! त्या सायकलरिक्षात बसून घराकडे प्रवास सुरू होई. गाव लहान असल्यामुळे रिक्षावाले सगळ्यांनाच ओळखत. त्यामुळे पत्ता सांगायचे काम पडत नसे. रिक्षावाले "काय भाऊ, खूप दिवसांनी आज गावाकडे?" किंवा "ताई, सध्या कोणत्या गावाला असता?" अशी आपुलकीने विचारपूसही करायचे. परतवाड्याची बाजारपेठ पार करून रिक्षा घराजवळ येऊन थांबायची आणि हा संस्मरणीय प्रवास संपायचा!!

कितीतरी वर्षे, कितीतरी वेळा मी हा प्रवास केला आहे. पण प्रत्येक वेळी कधी एकदा घरी पोहोचतो असे वाटे. घरात येताच आईची विचारपूस, आजीने केलेले लाड, बाबांची चौकशी सुरू व्हायची. प्रथम गरमागरम चहा आणि मग कांद्याचे थालीपीठ किंवा आवडीचा दुसरा एखादा पदार्थ, या सगळ्यामुळे त्या प्रवासाचा शिण काही क्षणातच दूर होई. घरात मिळालेला ऊबदार जिव्हाळा खूप सुखदायक वाटे!

त्या काळात सुपर बस म्हणजे परतवाड्याचे एक सांस्कृतिक केंद्रच झाले होते. जे लोक एरवी कधी भेटत नसत, तेही बसमध्ये अवश्य भेटायचे. शाळेतील शिक्षक, जुने मित्र, गावातील सन्माननीय व्यक्ती, लग्न होऊन परगावी गेली एखादी ताई असे अनेक लोक बसमध्येच भेटायचे. एखादा जुना मित्र भेटला तर मग गप्पांमध्येच एक तासाचा प्रवास संपून जायचा आणि पुन्हा सुपरमध्ये भेटायचा वायदा होऊनच प्रवास संपायचा. बसमध्ये शिक्षक, वयोवृद्ध व्यक्ती किंवा महिला असली तर तिला उठून जागा देण्याचे सौजन्य त्या काळी लोकांमध्ये होते. एखादे शिक्षक जर बसमध्ये भेटले तर, सध्या कुठे असतो, काय करतोस याची आस्थेने चौकशी करायचे! बसमधील बहुतेक लोक एकमेकांना ओळखत असल्यामुळे तो जणू एका मोठ्या कुटुंबातील लोकांनी एकत्र केलेला प्रवासच वाटे, एवढेच काय, तर बसचे चालक-वाहकही या मोठ्या कुटुंबाचाच एक भाग असत! त्यांनाही बहुतेक सगळे लोक ओळखत आणि "एवढ्यात या बसवर दिसला नाहीत?" अशी त्यांचीही चौकशी करत. असे ते दिवस होते!

नंतर काही वर्षांनी परतवाडा सुटले. शिक्षणासाठी, पोटासाठी नागपूर, मुंबई गाठावी लागली. आणि शेवटी दूरवरच्या बंगळुरूमध्ये बस्तान बसवले. माणसाच्या नशिबाच्या रेषा किती विचित्र असतात? कुठूनही माणसाला कुठेही घेऊन जातात! आईसुद्धा माझ्याबरोबरच बंगळुरूला येऊन राहिली. आम्ही परतवाड्याचे घरही विकले आणि परतवाड्याशी असलेला संपर्क कमी झाला. दोन वर्षांपूर्वी तर आईही हे जग सोडून आणि आम्हाला पोरके करून गेली!

गेल्या काही वर्षांमध्ये मी अमेरिका, इंग्लंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांमध्ये प्रवास केला आहे. पण परतवाडा सुपरने केलेला हा प्रवास मात्र मनात कायमचा रुतून बसला आहे! ते गाव, तिथली माणसं, मित्रमंडळी, आमचे ते घर आणि तिथल्या आठवणी हृदयात नेहमीसाठी घर करून बसल्या आहेत!

- या वर्षीच्या सुरुवातीला, अनेक वर्षानंतर परतवाड्याला कुटुंबीयांसमवेत गेलो होतो. चांदूरबाजार मार्गाने कारने आम्ही परतवाड्यात प्रवेश केला. तोंडगाव मंदिर, अचलपूर नाका, अचलपूर फाटा, विदर्भ मिल्स, बसस्थानक, जयस्तंभ चौक इ. पार करीत आम्ही गावात शिरलो. गाव ओळखू येऊ नये इतके बदलले आहे. सगळीकडे दुकानेच दुकाने! बऱ्याच लोकांजवळ कार दिसत होत्या. काही चेहरे ओळखीचे वाटले, पण आता अनोळखी चेहरेच जास्त!

आमच्या जुन्या घरातही गेलो. तेच घर, तेच फाटक, स्वयंपाकघर, देवघर सगळे तसेच होते, पण जिवापाड प्रेम करणारी आपली माणसे मात्र आता कुठेच नव्हती. विशेषतः आईची उणीव प्रकर्षाने जाणवली आणि अचानक डोळ्यात पाणी दाटून आले! मी काही क्षणातच तिथून बाहेर पडलो.

दूर कुठेतरी रफीचे ते विद्ध करणारे गाणे मनात जागे झाले -

जिनके साथ लगाये तूने अरमानो के मेले,
भिगी आखो से ही उनकी, आज दुवाये ले ले !
किस को पता अब इस नगरीमे कब हो तेरा आना!
चल उड जा रे पंछी, के अब ये देस हुआ बेगाना!

*****************************
अविनाश चिंचवडकर
बंगळुरू

avinashsc@yahoo.com

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

गणेशा's picture

27 Aug 2020 - 8:25 am | गणेशा

सुपर लिखान..
शेवटचे 2-3 पॅरेग्राफ तर खुप ओघवते आणि मस्तच..

जूने घर.. गाव.. यांच्या खास आठवणी मनात रुजलेल्या असतात.
तुम्ही प्रवास.. त्याच्या आठवणी.. एसटी ची लगबग मस्त सांगितली आहे.

लिहीत रहा..

aschinch's picture

30 Aug 2020 - 12:10 pm | aschinch

मनःपूर्वक आभार!

चौकटराजा's picture

27 Aug 2020 - 10:48 am | चौकटराजा

एकतर विदर्भात माझा वावर कधी न झाल्याने ते परतवाडा, चादूरबाजार, अमरावती ई नावे देखील उत्सुकता वाढवणारी . त्यात तुमची लेखन शैली व संवेदनशीलता यानी भारावून गेलो . तुमचा लेख या मालेतील साहित्यिक मूल्य असलेला उत्तम लेख आहे ! खरोखरच !

aschinch's picture

29 Aug 2020 - 10:02 pm | aschinch

खूप आभारी आहे!

चौथा कोनाडा's picture

27 Aug 2020 - 1:26 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्त सुरेख लेखन !
अश्या बसेस म्हणजे एक संस्कृतीच. आयुष्यभराला आठवणी देऊन जातात.
लेखाच्या शेवटी माझ्या गावाची आठवण आली. असाच हळुहळू दुरावत गेलो गावापासून. गेले ७-८ वर्षे गावी जाण्याचा योग आलेला नाहीय !

सिरुसेरि's picture

27 Aug 2020 - 4:01 pm | सिरुसेरि

सुरेखा आठवणी .

चौथा कोनाडा's picture

6 Sep 2020 - 1:21 pm | चौथा कोनाडा

सुरेखा आठवणी .

तुमच्या त्या सुरेखाच्या आठवणी देखील येऊ द्यात :-)))

MipaPremiYogesh's picture

27 Aug 2020 - 4:58 pm | MipaPremiYogesh

खूप छान लेख . रम्य त्या आठवणी .साधारण किती सालच्या आठवणी असतील ह्या? ती एसटी लालपरी सारखी होती का?

तुमच्याकडे जर त्या एसटी चा फोटो असल्यास पाठवा , आमच्या सारख्या एसटी प्रेमींना तेवढंच छान वाटेल.

खुप धन्यवाद! या आठवणी बऱ्याच जुन्या म्हणजे १९८० च्या आहेत. हो साधी लाल बसच होती त्याकाळात! नंतर एशियाड बसेस आल्यात.
मी काही फोटो पाठवले होते, पण कदाचित जागेअभावी प्रकाशित करता आले नसावे.

महासंग्राम's picture

27 Aug 2020 - 5:03 pm | महासंग्राम

जबरदस्त लिखाण

पुलेशु

सुमो's picture

28 Aug 2020 - 3:46 am | सुमो

आठवणी. गावाकडच्या घरच्या आणि तिथे घेऊन जाणा‌र्‍या लालपरीच्या.
छान लिहिल्याहेत.

पु.ले.शु.

aschinch's picture

29 Aug 2020 - 10:02 pm | aschinch

खूप धन्यवाद!

प्रशांत's picture

28 Aug 2020 - 7:45 am | प्रशांत

लिहत रहा..

पु.ले.शु.

तुषार काळभोर's picture

28 Aug 2020 - 11:50 am | तुषार काळभोर

गावाकडचा यष्टीचा प्रवास म्हणजे सांस्कृतिक अनुभव असतो, हे नक्की!

टर्मीनेटर's picture

28 Aug 2020 - 1:08 pm | टर्मीनेटर

लेख आणी लेखनशैली दोन्ही आवडले!
लाॅकडाउन काळात एक राजस्थानी मायनींग काॅंट्रॅक्टर आणी त्याचे दोन (परतवाड्याचे) मायनींग मशीन ॲापरेटर्स आमच्या सोसायटीत अडकुन पडले होते. त्यांच्यामुळे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा नावाचे गाव नुकतेच मला माहिती झाले असले तरी ह्या लेखात ते परिचीत वाटले हे श्रेय तुमच्या लेखनशैलीचे आहे.

धन्यवाद आणी पुढील लेखनास शुभेच्छा!

सगळ्यांना खुप धन्यवाद! मिसळपाव वरील माझ्या पहिल्याच लेखाला मिळालेला प्रतिसाद खुप उत्साह वर्धक आहे!

नूतन's picture

29 Aug 2020 - 7:46 pm | नूतन

लेखन आवडलं.मला ST बसच्या प्रवासाचा अनुभव खूपच कमी आहे आणि विदर्भात तर नाहीच .पण वर्णन वाचून चित्र डोळयासमोर उभं राहिलं.
माझी परतवाड्याशी ओळख झाली ती गोनीदांच्या स्मरणगाथेतून.

धन्यवाद! अचलपूर - परतवाडा ही जोड गावे आहेत. या गावांना उज्ज्वल साहित्यिक परंपरा आहे! प्रा. स्व. श्री. राम शेवाळकर यांचे हे गाव! याशिवाय गोनिदा, अरुण साधू, पू. भा. भावे यासारख्या महान साहित्यिकांचे येथे वास्तव्य राहिले आहे!

विजुभाऊ's picture

30 Aug 2020 - 2:48 pm | विजुभाऊ

काय छान ओघवते लिहीलय हो.
खूपच छान वाटलं वाचताना.
असाच अनुभव येतो नाशीक कोल्हापूर सातारा येथे पण.
सातार्‍याहून पुण्याला जायला विना थाम्बा बस सुरू झाली तेंव्हा असाच अनुभव यायचा

अनिंद्य's picture

2 Sep 2020 - 3:14 pm | अनिंद्य

छान लिहिले आहे.

परतवाडा शेवाळकर यांचे गाव हे माहित होते पण गोनिदा, अरुण साधू, पू. भा. भावे याबद्दल पहिल्यांदा वाचले.

स्मिताके's picture

6 Sep 2020 - 8:58 pm | स्मिताके

छान आहे लेख. एसटीचं वातावरण डोळ्यांसमोर उभं केलंत. पु. लं. च्या "म्हैस" मधल्या एस्टीची आठवण आली.

aschinch's picture

13 Sep 2020 - 9:00 pm | aschinch

खूप मोठी compliment

श्वेता२४'s picture

7 Sep 2020 - 5:07 pm | श्वेता२४

शेवट मन हेलावून टाकणारा.बऱ्याच वर्षांपू्र्वी माहेरचं घर विकलं गेलं. आता कधी जाणं झालं आणी त्या जागेसमोरुनही गेलं तरी मनात कालवाकालव होते. तुमच्या लेखामुळे मला माझ्या माहेरच्या घराची आठवण झाली.

aschinch's picture

13 Sep 2020 - 8:59 pm | aschinch

धन्यवाद

श्रीरंग_जोशी's picture

10 Sep 2020 - 9:25 am | श्रीरंग_जोशी

या लेखासाठी चिंचवडकर साहेबांचे मनापासून आभार मानतो.

अमरावतीकर असल्याने हा लेख म्हणजे अंतःकरणाजवळचा आहे. परतवाड्याशी नातेवाइकांमुळे थोडाफार संबंध असला तरी ही बस अमरावतीतल्या ज्या मार्गावरून जाते त्या व्हिएमव्ही (विदर्भ महाविद्यालय) रस्त्यावरून ट्युशन, कॉलेज वगैरेच्या निमित्ताने ५ वर्षे रोजच जाणे येणे व्हायचे. माझा संबंध मात्र या रस्त्याबरोबर नव्वदच्या दशकाच्या मध्यापासून आला. बरेचदा परतवाडा-अमरावती विनाथांबा बस दिसायची. बहुधा ९८-९९ साली राज्य परिवहन मंडळाच्या उत्साही कर्मचार्‍यांनी किमान दोन बसेसला उत्कृष्टपणे चित्रे रंगवून सजवले होते. एका ठिकाणी तिकिटाच्या रकमेचाही उल्लेख असायचा (प्रथम रु. २१ नंतर रु.२२ पाहिल्याचे आठवते).

परतवाड्यात राहिलो नसलो तरी तालुक्याच्या ठिकाणी (वरुड, चांदूर रेल्वे) लहानपणी काही वर्षे घालवली असल्याने शहरांच्या तुलनेत अधिक जिव्हाळ्याचे सामाजिक वातावरण, गावात कुठेही गेलो तरी कुणी ना कुणी ओळखीचे भेटणे हे सर्व माझ्या अनुभवविश्वाचा जवळचा भाग आहे.
बाकी अचलपूर ही जुन्या काळी वर्‍हाड प्रांताची राजधानी होती हे तिसरीच्या भूगोलात शिकलो होतो :-).

लेखाच्या समारोपाचे गीत(चल उड जा रे पंछी) मलाही अत्यंत प्रिय आहे. याच भावनांच्या जवळ जाणारे दुसर्‍या चित्रपटातला माझ्या आवडत्या ओळींनी प्रतिसादाचा समारोप करतो.

जो घरोंको है चले, उन्हे क्या डरायेंगे फासलें
जो घरोंको है चले, उन्हे क्या डरायेंगे फासलें!!

aschinch's picture

13 Sep 2020 - 8:59 pm | aschinch

खूप धन्यवाद!

सोत्रि's picture

11 Sep 2020 - 6:57 pm | सोत्रि

अनेक वर्षानंतर परतवाड्याला कुटुंबीयांसमवेत गेलो होतो. चांदूरबाजार मार्गाने कारने आम्ही परतवाड्यात प्रवेश केला.

लहानपणी ज्या गावी पोहोण्यासाठी एसटीची लाल गाडी आणि काही किलोमीटरचे अंतर पायी कापावे लागायचे त्या गावी आज गाडीतून जाताना, फक्त एकदाच पहिल्यावेळी, एक वेगळेच आणि अनोखे फीलींग असते. पण नंतरच्या फेर्‍यांमधे ती हुरहुर नसते जी लहानपणीच्या प्रत्येक फेरीत असायची.

सुंदर लेखन!

- (भरपूर एसटी प्रवास केलेला) सोकाजी

aschinch's picture

13 Sep 2020 - 8:59 pm | aschinch

खरेच आहे!