श्रीवर्धन (राजमाचीचा मोठा किल्ला) गावातून (उधेवाडी)
१९९६ची गोष्ट असेल. क्लबने तेलबैला क्लाइंबिंग ठरवलं होतं. मी बदलापुरातून सँडहर्स्ट रोडला येणार आणि तिथून परत लोणावळा, याच्याऐवजी मी लोणावळा बस स्टँडवर भेटतो.. असं तिकडे कळवलं होतं. ते संध्याकाळी सातच्या आसपास तिथे पोहोचणार होते. काही अपरिहार्य कारणाने मोहीम ऐन वेळी रद्द झाली. पण त्या काळी मोबाइल आजसारखे सररास उपलब्ध नसल्याने मला निरोप देणं शक्य झालं नाही. रात्री उशिरापर्यंत वाट बघत बसलो. तिथे स्टँडवर डासांमुळे झोपही येईना. अस्वस्थ येरझाऱ्या घालत होतो. ३ वाजले. इतक्यात एक ग्रूप तिथे आला. सगळे भटके होते, पण कुठल्या क्लबचे वाटत नव्हते. त्यातल्या एकाला ओळखलं. हा बदलापुरातलाच. ते छोटं गाव असल्याने चेहऱ्याने बहुतेक सगळे सगळ्यांना ओळखत असत. त्याला परिस्थिती सांगितली. तो त्याच्या ग्रूपात चल म्हणाला. सगळेच नवखे मला, पण लवकरच त्यांच्यात मिसळून गेलो.
रात्रीच चालायला सुरुवात केली. तुंगारली डॅमकडून घळीतून चालत राजमाची. तोवर क्लबतर्फे ट्रेक करायची सवय. हा राजमाचीदेखील तीनेकदा करून झाला होता. पण यांच्यासोबतचा अनुभव अगदीच वेगळा. क्लबचं बेतशुद्ध प्लॅनिंग, लीडर्स, सीनियर्स, को-लीडर्स, थांबायच्या जागा, किती वेळ वगैरे सारं काही ठरलेलं. शिवाय त्याला काहीसा प्रोग्रामचा किंवा एक्झरसाइजचा फील. पण इथे सगळंच अगदी निवांत. सगळ्याला आनंदयात्रेचा आविर्भाव. त्यात सगळे जे.जे. स्कूलमधले पासआउट्स. त्यामुळे कलाकार कलंदर व्यक्तिमत्त्व एकेक.
जिथे राहणार-जेवणार, त्या बबन सावंतांना खोळंबायला लागू नये, म्हणून जेवायच्या वेळा पाळायच्याच. बाकी तिकडे घरच्यासारखा वावर. कुणी कागद-रंग-ब्रश घेऊन कुठे दरीच्या टोकावर वा तळ्यावर जाऊन चित्र काढतोय, किंवा २-३ जण थडीच्या आंब्याकडे कैऱ्या पाडतायत, कुणी पडवीत पसरून गप्पा करतायत, कुणी झोपा काढतोय, कुणी देवराईत पक्षी ऐकत निवांत बसून आहे.. असं काहीही सुरू असायचं. त्यात राजमाचीची खास होळी! दुसऱ्या दिवशी तळ्यावर ३-४ तास केलेला कल्ला, होळीची राख, गोठ्यातील ताजं शेण, वस्त्रगाळ माती वगैरे वापरून खेळलेली धुळवड. खूपच धमाल होती.
थडीचा आंबा
होळी
ही राजमाची फेरी अतिशय भारावणारी होती. माझ्या नेहमीच्या डोंगरवाऱ्यापेक्षा अगदी वेगळी. नंतर आजवर दर होळीला नक्की आणि इतर वेळी जेव्हा जमेल तेव्हा राजमाची वारी झाली. तिथल्या गावाशी माझीही ओळख झाली. तिन्ही ऋतूंत, दिवसभरात कधीही, कधी चालत, कधी बाइकवर, कधी कोंदिवड्यावरून चढून येत, तर कधी तिकडून उतरून असंख्य वेळा राजमाची अनुभवली. कधी भैरोबाच्या माळावर गप्पा-गाणी करत, तिथेच तार्यांनी खच्चून भरलेल्या आकाशाखाली, भणाण वाऱ्यात अंगाचं मुटकुळं करून झोप काढली, कधी तळ्यावर पाण्यात कुडकुडणाऱ्या चंद्र प्रतिबिंबासोबत रात्र जागवली.
कधी शिकारीसाठी गावकऱ्यांसह दोन दिवस जंगलात काट्याकुट्यात भटकलो, कधी दरीत पाय सोडून सूर्यास्त अनुभवले. कधी सर्पदंश झालेल्या गावकऱ्याला घोगड्याच्या डोलीत टाकून गावकऱ्यांसोबत खांदे बदलत, धावत १९ किलोमीटर लोणावळ्यात गेलो, तर कधी बबनच्या मुलीच्या - आशाच्या लग्नात धुमशान नाचलो. कधी होळीला गावभर बोंबलत अनवाणी फिरलो, कधी शंकराच्या मंदिरात अंधाऱ्या गाभाऱ्यात डोळे मिटून काही तास बसून राहिलो.
देवराईतून तळ्याकडे
दरीत पाय सोडून बसायची जागा
गडावरून भैरोबा..
राजमाचीने मला काय दिलं? ट्रेकिंग तर मी करतच होतो. राजमाचीचं सांगायचं, तर दोनदा कर्जत-कोंदिवडे-कोंढाणे वाटेने आणि एकदा लोणावळाकडून असं येणं झालेलंच. गाव दिसलं होतंच तेव्हाही, पण गावातून पाणी घेणं यापलीकडे संबंध नव्हता. गड फिरलो दोनेक तासात आणि परत गेलो. गावाचा अनुभव नाही, त्यांच्या अडचणींची गंधवार्ता नाही, त्यांचे सण, आनंद याची कल्पना नाही. एका दिवसात दोन तासांत जे जितकं दिसलं तितकंच. रात्री चांदीच्या रसात भरून आलेली दरी दुपारी भट्टीवर ठेवलेल्या कढईगत कशी धगधगत असते, याचा गंध नाही. क्षणभरही न थांबता सतत पाच दिवस कोसळणारा पाऊस कसा असतो याचा अनुभव नाही. एक काठी हाती घेऊन गाई वाचवायला वाघाशी नडणाऱ्या गावकऱ्याच्या हिमतीशी ओळख नाही, ना त्यांचा खास सेन्स ऑफ ह्यूमर माहीत.
इथे तीन-चार दिवस काढले की परत मुंबईच्या धबडग्यात चार महिने काढायची क्षमता येते. एकट्याने सूर्यास्त पाहताना वा देवराईत बसून पक्ष्यांची किलबिल ऐकताना अंतरात्मा भरून पावतो. स्वतःची स्वतःशीच निवांत भेट होते. माठ पाझरावा तसा मी पाझरतोय आणि हातावर वगैरे चमकतोय तो घाम नसून पाझरलेला आनंद आहे, असं वाटू लागतं. सुख आणि आनंद यातला फरक समजायला लागतो. माझं काय भाग्य म्हणून मला तळ्याभोवतीच्या झाडांवर काजव्यांनी केलेली लखलख आरास पहायला मिळाली? असे प्रश्न पडायला लागतात.
आज जवळपास पंचवीस वर्ष झाली. अनेक जणांना तिथे घेऊन गेलो. ते गाव नजरेसमोर बदलत जाताना बघितलं. तिथला हरेक दगड ओळखीचा झाला, तरी तिथे जायची ओढ कमी होत नाही.
प्रतिक्रिया
24 Aug 2020 - 8:42 pm | सिरुसेरि
सुरेख आठवण आणी फोटो .
24 Aug 2020 - 11:45 pm | अन्या बुद्धे
थांकू!:)
24 Aug 2020 - 11:41 pm | बिपीन सुरेश सांगळे
सुंदर .
24 Aug 2020 - 11:46 pm | अन्या बुद्धे
धन्यवाद!:)
25 Aug 2020 - 2:28 am | वीणा३
मस्त लेख. मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांच्याबरोबर दर वर्षी एकतरी ट्रेक करायचा विचार आहे , असे लेख वाचून ते दर वेळेला आठवतं.
26 Aug 2020 - 3:05 pm | अन्या बुद्धे
नक्की! हा भारी आनंद मिस करूच नये..
26 Aug 2020 - 9:28 am | सुमो
फोटो आणि उत्तम लेखन.
बढिया !
26 Aug 2020 - 3:06 pm | अन्या बुद्धे
धन्यवाद!
26 Aug 2020 - 10:04 pm | शलभ
खूप मस्त लिहिलंय. तुमच्याबरोबर एकदा जाऊ राजमाची ला.
28 Aug 2020 - 9:16 am | अन्या बुद्धे
आवडेलच.. :)
28 Aug 2020 - 11:32 pm | स्मिताके
सुरेख लेख आणि चित्रे.
29 Aug 2020 - 4:31 pm | अन्या बुद्धे
धन्यवाद!:)
8 Sep 2020 - 6:15 am | अनिता
आतिशय उत्कट वर्णन! खरोखर गावाशी एकरुप झाले आहात...
दगडी मन्दिराचा फोटो खासच....( ऑईल पेन्टने मन्दिर र॓गवले नाही हे फार फार आवड्ले.....