श्रीगणेश लेखमाला २०२० - राजमाचीचे दिवस..

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in लेखमाला
23 Aug 2020 - 7:00 am

1

श्रीवर्धन (राजमाचीचा मोठा किल्ला) गावातून (उधेवाडी) श्रीवर्धन (राजमाचीचा मोठा किल्ला) गावातून (उधेवाडी)

१९९६ची गोष्ट असेल. क्लबने तेलबैला क्लाइंबिंग ठरवलं होतं. मी बदलापुरातून सँडहर्स्ट रोडला येणार आणि तिथून परत लोणावळा, याच्याऐवजी मी लोणावळा बस स्टँडवर भेटतो.. असं तिकडे कळवलं होतं. ते संध्याकाळी सातच्या आसपास तिथे पोहोचणार होते. काही अपरिहार्य कारणाने मोहीम ऐन वेळी रद्द झाली. पण त्या काळी मोबाइल आजसारखे सररास उपलब्ध नसल्याने मला निरोप देणं शक्य झालं नाही. रात्री उशिरापर्यंत वाट बघत बसलो. तिथे स्टँडवर डासांमुळे झोपही येईना. अस्वस्थ येरझाऱ्या घालत होतो. ३ वाजले. इतक्यात एक ग्रूप तिथे आला. सगळे भटके होते, पण कुठल्या क्लबचे वाटत नव्हते. त्यातल्या एकाला ओळखलं. हा बदलापुरातलाच. ते छोटं गाव असल्याने चेहऱ्याने बहुतेक सगळे सगळ्यांना ओळखत असत. त्याला परिस्थिती सांगितली. तो त्याच्या ग्रूपात चल म्हणाला. सगळेच नवखे मला, पण लवकरच त्यांच्यात मिसळून गेलो.

रात्रीच चालायला सुरुवात केली. तुंगारली डॅमकडून घळीतून चालत राजमाची. तोवर क्लबतर्फे ट्रेक करायची सवय. हा राजमाचीदेखील तीनेकदा करून झाला होता. पण यांच्यासोबतचा अनुभव अगदीच वेगळा. क्लबचं बेतशुद्ध प्लॅनिंग, लीडर्स, सीनियर्स, को-लीडर्स, थांबायच्या जागा, किती वेळ वगैरे सारं काही ठरलेलं. शिवाय त्याला काहीसा प्रोग्रामचा किंवा एक्झरसाइजचा फील. पण इथे सगळंच अगदी निवांत. सगळ्याला आनंदयात्रेचा आविर्भाव. त्यात सगळे जे.जे. स्कूलमधले पासआउट्स. त्यामुळे कलाकार कलंदर व्यक्तिमत्त्व एकेक.

जिथे राहणार-जेवणार, त्या बबन सावंतांना खोळंबायला लागू नये, म्हणून जेवायच्या वेळा पाळायच्याच. बाकी तिकडे घरच्यासारखा वावर. कुणी कागद-रंग-ब्रश घेऊन कुठे दरीच्या टोकावर वा तळ्यावर जाऊन चित्र काढतोय, किंवा २-३ जण थडीच्या आंब्याकडे कैऱ्या पाडतायत, कुणी पडवीत पसरून गप्पा करतायत, कुणी झोपा काढतोय, कुणी देवराईत पक्षी ऐकत निवांत बसून आहे.. असं काहीही सुरू असायचं. त्यात राजमाचीची खास होळी! दुसऱ्या दिवशी तळ्यावर ३-४ तास केलेला कल्ला, होळीची राख, गोठ्यातील ताजं शेण, वस्त्रगाळ माती वगैरे वापरून खेळलेली धुळवड. खूपच धमाल होती.

थडीचा आंबा
थडीचा आंबा

होळी
होळी

ही राजमाची फेरी अतिशय भारावणारी होती. माझ्या नेहमीच्या डोंगरवाऱ्यापेक्षा अगदी वेगळी. नंतर आजवर दर होळीला नक्की आणि इतर वेळी जेव्हा जमेल तेव्हा राजमाची वारी झाली. तिथल्या गावाशी माझीही ओळख झाली. तिन्ही ऋतूंत, दिवसभरात कधीही, कधी चालत, कधी बाइकवर, कधी कोंदिवड्यावरून चढून येत, तर कधी तिकडून उतरून असंख्य वेळा राजमाची अनुभवली. कधी भैरोबाच्या माळावर गप्पा-गाणी करत, तिथेच तार्‍यांनी खच्चून भरलेल्या आकाशाखाली, भणाण वाऱ्यात अंगाचं मुटकुळं करून झोप काढली, कधी तळ्यावर पाण्यात कुडकुडणाऱ्या चंद्र प्रतिबिंबासोबत रात्र जागवली.
2
3

कधी शिकारीसाठी गावकऱ्यांसह दोन दिवस जंगलात काट्याकुट्यात भटकलो, कधी दरीत पाय सोडून सूर्यास्त अनुभवले. कधी सर्पदंश झालेल्या गावकऱ्याला घोगड्याच्या डोलीत टाकून गावकऱ्यांसोबत खांदे बदलत, धावत १९ किलोमीटर लोणावळ्यात गेलो, तर कधी बबनच्या मुलीच्या - आशाच्या लग्नात धुमशान नाचलो. कधी होळीला गावभर बोंबलत अनवाणी फिरलो, कधी शंकराच्या मंदिरात अंधाऱ्या गाभाऱ्यात डोळे मिटून काही तास बसून राहिलो.

देवराईतून तळ्याकडे
देवराईतून तळ्याकडे

1

दरीत पाय सोडून बसायची जागा
दरीत पाय सोडून बसायची जागा

गडावरून भैरोबा..
गडावरून भैरोबा..

राजमाचीने मला काय दिलं? ट्रेकिंग तर मी करतच होतो. राजमाचीचं सांगायचं, तर दोनदा कर्जत-कोंदिवडे-कोंढाणे वाटेने आणि एकदा लोणावळाकडून असं येणं झालेलंच. गाव दिसलं होतंच तेव्हाही, पण गावातून पाणी घेणं यापलीकडे संबंध नव्हता. गड फिरलो दोनेक तासात आणि परत गेलो. गावाचा अनुभव नाही, त्यांच्या अडचणींची गंधवार्ता नाही, त्यांचे सण, आनंद याची कल्पना नाही. एका दिवसात दोन तासांत जे जितकं दिसलं तितकंच. रात्री चांदीच्या रसात भरून आलेली दरी दुपारी भट्टीवर ठेवलेल्या कढईगत कशी धगधगत असते, याचा गंध नाही. क्षणभरही न थांबता सतत पाच दिवस कोसळणारा पाऊस कसा असतो याचा अनुभव नाही. एक काठी हाती घेऊन गाई वाचवायला वाघाशी नडणाऱ्या गावकऱ्याच्या हिमतीशी ओळख नाही, ना त्यांचा खास सेन्स ऑफ ह्यूमर माहीत.

इथे तीन-चार दिवस काढले की परत मुंबईच्या धबडग्यात चार महिने काढायची क्षमता येते. एकट्याने सूर्यास्त पाहताना वा देवराईत बसून पक्ष्यांची किलबिल ऐकताना अंतरात्मा भरून पावतो. स्वतःची स्वतःशीच निवांत भेट होते. माठ पाझरावा तसा मी पाझरतोय आणि हातावर वगैरे चमकतोय तो घाम नसून पाझरलेला आनंद आहे, असं वाटू लागतं. सुख आणि आनंद यातला फरक समजायला लागतो. माझं काय भाग्य म्हणून मला तळ्याभोवतीच्या झाडांवर काजव्यांनी केलेली लखलख आरास पहायला मिळाली? असे प्रश्न पडायला लागतात.

आज जवळपास पंचवीस वर्ष झाली. अनेक जणांना तिथे घेऊन गेलो. ते गाव नजरेसमोर बदलत जाताना बघितलं. तिथला हरेक दगड ओळखीचा झाला, तरी तिथे जायची ओढ कमी होत नाही.

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर आठवणी... सुंदर वर्णन...
शेवट तर अप्रतिम..

राजमाची मला ही खुप आवडतो, पावसाळ्यात.. धुक्यात.. पाऊसपाण्यात राजमाची खुपच भावतो..
राजमाची ची गंम्मत दाखवायला, काजव्यांची आरास दाखवायला गेल्या वर्षीच मुलीला तिच्या पहिल्या रात्र ट्रेक ला न्हेले होते..
मंदिर तर अप्रतिम.. त्या तळ्यात हि उगाच पोहलो आहे मी..

बाकी जिथे जाईल तिकडची, माणसे, त्यांचे कष्ट, त्यांच्या जगण्याच्या हरएक कला अप्रतिम, तुम्ही सांगता तसे मात्र आता त्यांच्याशी इतके एकरूप होता येत नाही, काम असेल, किंवा इतर कारणे पण जीवन इतके फास्ट झालेय कि ह्या हिरव्या वनराईतील माणसांना मनमुराद खुप भेटणे.. त्यांच्या सनात, घरात, उत्सवात सामिल होणे जमत नाही.. या बाबतीत तुम्ही भाग्यवान..

सकाळी नंतर असाच तिथल्या मुलांबरोबर गप्पा मारतानाचा हा अलीकडला एक त्यांचा फोटो,
कदाचीत काही वर्षांनी हीच पिढी आपल्या स्वागता साठी तिथे असेल..
1

भेटू कधी राजमाचीच्या वाटेवर..

अन्या बुद्धे's picture

23 Aug 2020 - 11:43 pm | अन्या बुद्धे

जरूर भेटू.. होळीला 99% असतोच मी तिथे..

मीही हरवलो वर्णन वाचून. फोटो छान.

------------------
बाकी गणेशा, मुलांचे फोटो देऊ नये म्हणतात. ( मायबोलीवरून काढायला लावतात.)

तुषार काळभोर's picture

23 Aug 2020 - 11:26 am | तुषार काळभोर

आंतरराष्ट्रीय आणि हूच्चभ्रू लोकांचं संस्थळ आहे. तिथल्या हूच्चभ्रू अन नाकाने कांदे सोलणाऱ्या चर्चांपेक्षा इथल्या राजकीय चिखलफेक असलेल्या चर्चा जास्त दर्जेदार वाटतात.
त्यांचं त्यांच्यापाशी.

कंजूस's picture

23 Aug 2020 - 5:06 pm | कंजूस

सहभागी किंवा सभासद आंतरराष्ट्रीय आणि हूच्चभ्रू लोक असण्याचा संबंध नसून मायबोलीचे रेजिस्ट्रेशन दोन वर्षांपूर्वी पुण्यातून ( भारतातून) अमेरिकेत फिरवल्याने मंडळ काटेकोरपणे नियम पाळत असेल.

अन्या बुद्धे's picture

23 Aug 2020 - 11:43 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद! :)

खूपच सुंदर वर्णन आणि फोटो ही, खास करून चंद्र बिंबाचा. तुमचे अनुभव तुम्ही खूप कमी शब्दात मांडता नाहीतर प्रत्येक अनुभव अजुन विस्ताराने वाचायला आवडलं असतं.

अन्या बुद्धे's picture

23 Aug 2020 - 11:45 pm | अन्या बुद्धे

हात ठरवून आखडता ठेवला.. नाहीतर हरितात्या कधी होतो लक्षातही येत नाही.. :)

तुषार काळभोर's picture

23 Aug 2020 - 11:28 am | तुषार काळभोर

मनातल्या भावना खूप सुंदर मांडल्यात.

अन्या बुद्धे's picture

23 Aug 2020 - 11:46 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद! :)

राघव's picture

23 Aug 2020 - 12:13 pm | राघव

भापो! :-)
लेखन अप्रतीमच. फोटूही छानच आहेत.

टर्मीनेटर's picture

23 Aug 2020 - 12:13 pm | टर्मीनेटर

छान लिहीलंय ! फोटोही सुंदर आहेत.
काॅलेजला असताना एकदाच राजमाचीला जाणे झाले असल्याने तिथले फार काही आठवत नव्हते पण फोटो बघीतल्यावर त्या परीसराचे चित्र पुन्हा डोळ्यांसमोर उभे राहीले.

@ गणेशा :- लहान मुलांचा फोटो छान आहे.

चौथा कोनाडा's picture

23 Aug 2020 - 1:12 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेखन आणि तितकेच सुंदर फोटो !
ज्याने ज्याने राजमाची ट्रेक केलाय श्रीवर्धन आणि मनरंजन अनुभवलेत त्याच्या मनाच्या कप्प्यात राजमाचीला स्पेशल स्थान असते.
माझ्याही ट्रेक आणि मुक्कामाच्या आठवी जाग्या झाल्या.

चौकटराजा's picture

23 Aug 2020 - 2:10 pm | चौकटराजा

जुन्या आठवणी आपण जेंव्हा मांडतो त्यावेळी त्याकालचा परिसर, लोकांचे परस्पर सम्बन्ध, सामाजिक घटना माणसांच्या त्याकाळतील सुख दु:खाच्या कल्पना ,राजकीय परिस्थिती ई चा मागोवा जरूर आहे. उद्या मी १९७० साली पुण्यातील राहुल थिएटरला सिनेमाला गेलो ,गर्दी होती,पाऊस पडत होता अशी आठवण लिहिली तर त्याला त्यावेळचे तिकिट दर ,सिनेमाचे नाव ,एक्खादी त्यावेळची जाहिरात असे सन्दर्भ आले नाहीत तर ते लिखाण गहिरे होणार नाही .निदान अशी माझी तरी धारणा आहे !

अन्या बुद्धे's picture

23 Aug 2020 - 11:48 pm | अन्या बुद्धे

तुमचं म्हणणं बरोबर आहे पण लिखाण खूपच पसरट झालं असतं अशी भीती वाटली.. जुन्या आठवणींची चव चाखणे इतकाच उद्देश होता..

नूतन's picture

23 Aug 2020 - 2:51 pm | नूतन

सुंदर लेखन आणि तितकेच सुंदर फोटो !

अन्या बुद्धे's picture

23 Aug 2020 - 11:49 pm | अन्या बुद्धे

थांकू!

थडीचा आंबा हा कोकण वाटेवर आहे का?

अन्या बुद्धे's picture

23 Aug 2020 - 11:52 pm | अन्या बुद्धे

प्रश्न नीट समजला नाही.. गावाकडून तळ्याकडे जाताना देवराई डाव्या हाताला ठेऊन गेलं की दिसतोच तो. तिथून उजव्या हाताला दरीपलीकडे लोहमार्ग आणि खंडाळा वगैरे नजरेत येतं.

प्रशांत's picture

23 Aug 2020 - 8:25 pm | प्रशांत

फोटोही १ लंबर.

कधी जायचे बोला...

अन्या बुद्धे's picture

23 Aug 2020 - 11:52 pm | अन्या बुद्धे

पाऊस ओसरू द्या. नोहेबर नंतर कधीही.. सध्या करोना लफडं पण आहेच

अरिंजय's picture

23 Aug 2020 - 11:43 pm | अरिंजय

मस्त लिहिलंय. फोटोज् भारी.

अन्या बुद्धे's picture

23 Aug 2020 - 11:53 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद! :)

दुर्गविहारी's picture

23 Aug 2020 - 11:52 pm | दुर्गविहारी

अप्रतिम लिहिले आहे. जियो ! :-)

अन्या बुद्धे's picture

23 Aug 2020 - 11:53 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद दादा!

प्रचेतस's picture

24 Aug 2020 - 7:14 am | प्रचेतस

मस्त लिहिलंय एकदम.
माझ्याही राजमाचीच्या आठवणी उचंबळून आल्यात :)

अन्या बुद्धे's picture

24 Aug 2020 - 12:14 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!

शा वि कु's picture

24 Aug 2020 - 7:46 am | शा वि कु

फोटो पण सुंदर.

सुधीर कांदळकर's picture

24 Aug 2020 - 8:32 am | सुधीर कांदळकर

अनोळखी लोकांबरोबर गेलात हे फार आवडले. ठिकठिकाणी मुलांचे चित्रे काढणे छानच. लेखनशैली आवडली. प्रकाशचित्रांनी चार चांद लावले. आवडले. धन्यवाद.

अन्या बुद्धे's picture

24 Aug 2020 - 12:14 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!:)

केडी's picture

24 Aug 2020 - 8:37 am | केडी

काय कमाल लिहिलंय रे!

अन्या बुद्धे's picture

24 Aug 2020 - 1:22 pm | अन्या बुद्धे

थांकू! :)

अन्या बुद्धे's picture

24 Aug 2020 - 1:23 pm | अन्या बुद्धे

थांकू!:)

चांदणे संदीप's picture

24 Aug 2020 - 10:28 am | चांदणे संदीप

वाचून माझ्या आजवरच्या दोन राजमाचीच्या फेऱ्या आठवल्याच.

लेखन आवडले.

सं - दी - प

अन्या बुद्धे's picture

24 Aug 2020 - 12:15 pm | अन्या बुद्धे

थांकू!

. कधी होळीला गावभर बोंबलत अनवाणी फिरलो, कधी शंकराच्या मंदिरात अंधाऱ्या गाभाऱ्यात डोळे मिटून काही तास बसून राहिलो.
मस्तच!!
दोनदा राजमाचीला जायचा योग आला होता नाही जमलं...आता पुढचा हाच टप्पा घ्यावा म्हणते.!!फोटो छान आहेत.

अन्या बुद्धे's picture

24 Aug 2020 - 12:17 pm | अन्या बुद्धे

इतरवेळी जाच.. पण होळी जमवा.. आता भर बराच ओसरलाय पण तरी वैशिष्ट्यपूर्ण असते होळी.. खास माहोल!

बेकार तरुण's picture

24 Aug 2020 - 2:06 pm | बेकार तरुण

मस्त लेख.... राजमाची माझाही पहिला वहिला ट्रेक होता..... फार मजा आली होती...

अन्या बुद्धे's picture

24 Aug 2020 - 11:43 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!

अभिरुप's picture

24 Aug 2020 - 2:31 pm | अभिरुप

अनुभव तुम्ही घेतलात आणि अनुभुती मात्र आम्हाला मिळाली इतकं सुंदर लिहिलंय.
तुम्ही अनुभवलेला प्रत्येक क्षण आमच्यापर्यंत पोहोचला यातच या लेखाचे यश आहे.

अन्या बुद्धे's picture

24 Aug 2020 - 11:44 pm | अन्या बुद्धे

थांकू! :)

चित्रगुप्त's picture

24 Aug 2020 - 2:53 pm | चित्रगुप्त

जबरदस्त अनुभव, अनुभूति, वर्णन आणि फोटो. सर्वच अप्रतिम.
'थडीचा' आंबा म्हणिजे काय, मज निरोपावे.

अन्या बुद्धे's picture

26 Aug 2020 - 3:04 pm | अन्या बुद्धे

तसा आडबाजूचा.. एकटाच.. म्हणून थडीचा आंबा नाव असावं पडलेलं..

गामा पैलवान's picture

26 Aug 2020 - 10:40 pm | गामा पैलवान

अन्या बुद्धे,

नदीथड म्हणजे नदीचा किनारा. यावरनं मला वाटतं की थड म्हणजे सीमारेषा असावी. गावसीमेवर आंबा कोकणात तरी ठिकठिकाणी दिसतो. असा काहीसा अर्थ असावा.

आ.न.,
-गा.पै.

अन्या बुद्धे's picture

28 Aug 2020 - 9:15 am | अन्या बुद्धे

यप.. बरोबर असावं.. देवराई आणि त्या पलीकडे हा आंबा..

कंजूस's picture

28 Aug 2020 - 9:30 am | कंजूस

गावातून तळ्यावर जातांना देवराईत जे बरेच मोठे आंबे ( झाडं) आहेत त्याची सर्वांची फळं आंबट ढस्स आहेत।
तर कोंदिवडे वाटेतून वर आल्यावर गावाच्या अगोदर वाटेत एकटे झाड आहे त्यास गोड फळे आहेत. आणि खरवंडीला गणेश देवळापासून जी काही पंचवीसेक झाडे ( आमराईच ती) आहेत ती सर्व गोडच. ती फळं मी स्याकमध्ये भरून घेतो आणि वाट चढताना 'mango frooty.

अन्या बुद्धे's picture

28 Aug 2020 - 4:36 pm | अन्या बुद्धे

खरंय

ट्रेक काय असतो कशाशी खातात याचा आमच्या खानदानी शी दूर दुरचा संबंध नव्हता पण लग्न झाल्यावर ऑफिसातलया माझ्या हौशी मित्र मैत्रीणिनी मला बळच भूलिस पाडुन " कर्नाळ " ट्रेक घडवून आणला , ऐन पावसाळ्यात 2018 च्या काय मजा आलि सांगू एकदम नवीन अनुभव , ट्रेक ला येताना ग्रिप वाले शूज किती आवश्यक असतात ते मला फ्लोटर्स घालून 2- 3 वेळेस चिखलात घसरून पडल्यावर समजल ,पाठिला sack त्यात खाउ पाण्याच्या बॉटल , त्यावर रेनकोट त्यात वर पाऊस ! न पायला हाताला सतत चावनारे कीटक ! पण माथ्यावर गेल्यावर तीथल आजुबाजुच सौंदर्य पाहुन ,हरळून जायला झाल होत , खाली ज्जे उतरताना दिसतील त्यांना " ओ अजुन किती चढाएच विचारणारी मी वर एकदम हरवून गेले होते बस्स तेव्हदाच एक अविस्मरणीय अनुभव आहे माझ्याकडे माझ्या एकमेव ट्रेकचा :)

अन्या बुद्धे's picture

24 Aug 2020 - 11:45 pm | अन्या बुद्धे

व्हा सुरू.. वाट कसली बघताय!?

रसायनीकडून कर्नाळा करा. सोपा. उतरताना या मेन कर्नाळा गेटला उतरा.