॥ करोनाष्टके ॥
घरी बैसोनी शिणलो रे , पकलो रे रामराया ।
परमदिनदयाळा, त्वरीत हर रे करोना ॥
कहर याचा जगभर, नावरे आवरीता ।
स्पर्ष होताच पसरे, तूच रे एक त्राता ॥ १ ॥
कुणी तरी अकलेचे, पाजळती दिवे रे ।
करोना वरील उपाये, होई हैराण मी रे ॥
त्याच त्याच फॉर्वर्डनी, नेट ते व्यर्थ जाई ।
रघुपती मती माझी, कुंठीत होत जाई ॥२॥
हापिसा मध्येच रामा, सर्वही जन्म गेला ।
किती एक दिवस रात्री, माझ्या मी एक केल्या ॥
घरून काम करण्याची, सवय कैसी जडावी ।
सकाळी उठून वाटे, हापिसची बस धरावी ॥ ३ ॥
कितीही लाटली तरी, पोळीचा गोल नाहीं ।
दयार्द्र नजरेने, त्या कडे पत्नी पाही ॥
रोजच जेवाणांत, नवनवे अन्न हावे ।
अनुदिनी वरणभाते, मन कैसे भरावें ॥ ४ ॥
नऊ वाजता पहातो, जीवनपट राघवाचा ।
माध्यांन्नी मग दिसे रे, पुढिला जन्म त्याचा ॥
सवयी बदलून गेल्या, मागल्या सर्व काही ।
हॉटेल सिनेमा मॉलची, राहिली गरज नाही ॥ ५ ॥
अजापुत्रा सम भासे, मुखमंडल आरशात ।
मास्कच्या पाठीमागे, ते बरे लपतात ॥
केश संभार माझा, नावरे आवरीता ।
सलून कधी उघडेल, सांग ना लोकनाथा ॥ ६ ॥
जळूनी जळूनी चरबी, ती कितीशी जळावी ।
चार भिंतीच्या आत, काय मॅरेथॉन पळावी ॥
तळमळ होते रे, विशाल ते पोट बघता ।
परंतू जिव्हा ही, नावरे आवरीता ॥ ७ ॥
धनी गेले का आहेत, शर्ट पॅन्टीस विचारे ।
लुंगी उसळून सांगे, हाल माझे बघा रे ॥
अष्टौप्रहर सतत मी, त्यांस चिकटून राही ।
क्षण भर रामा रे, मोकळा श्वास नाही ॥ ८ ॥
प्रभात फेरीस अजूनही, वानरे रोज जाती ।
घरी बसून बसून म्हणे ती, मर्कटे बोर होती ॥
पोलीस होती हैराण, बाळलीलांनी यांच्या ।
काळजी समाजाची, नाही खिजगणतीत त्यांच्या ॥ ९ ॥
निसर्गा पुढे सदैव, मानव बहू थीटा रे ।
नसावा कधी मानसीं, ज्ञानगर्वाचा फुगा रे ॥
लॉकडाउनची सुसंधी, व्यर्थ जाऊ नये रे ।
जळमटे अंतरीची, समूळ घालावी रे, ॥ १० ॥
सबळ प्रभू माझा, राम लावण्यकोटी ।
म्हणवुनि मज पोटीं, लागली आस मोठी ॥
दिवस गणित बोटीं, ठेवूनि प्राण कंठीं ।
झडकरी सोडावी रे, ही कराल मीठी ॥ ११ ॥
अंती एक विनंती , तूजला लोकनाथा ।
नको अति अंत पाहू, आमुचा रे अनंता ॥
झडकरि झड घालीं, धांव पंचानना रे ।
लवकर संपवावी, लॉकडाउनची सजा रे ॥ १२ ॥
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
24 Apr 2020 - 9:20 am | कुमार१
छान .
>>>>
+११११.
24 Apr 2020 - 9:25 am | वामन देशमुख
मस्त लिहिलंय, पैजारबुवा!
लॉक डाउन मालिकेतील पद्यमय लिखाणाचे स्वागत.
- काव्यरसिक वामन
24 Apr 2020 - 9:49 am | चौकटराजा
व्यथा अफलातून आहे ! आपल्या पिढीला अडचण अशी कधी दिसलीच नाही. माणसे शिकत गेली नोकर्या मिळत गेल्या ! आयुष्याला नको एवढा वेग आला . हव्यास वाढला . परदेशी जाउन नोकरी करायची हेच आयुष्य सार्थकी आहे असे वाटू लागले. तुमच्यापेक्षा खरे वैतागलेले असतील तर ते पोलीस , नर्सेस डॉक्टर व त्याहूनही अधिक लस शोधून काढण्यासाठी तन मन अर्पण करणारे जीव शास्त्रज्ञ ! ही फक्त सुरुवात आहे ! कोरोना हे एक हिमनगाचे टोक आहे असे डॉ अभय बंग यांनी म्हटलेले आहे.
24 Apr 2020 - 10:08 am | सौंदाळा
अफलातून काव्य पैंजारबुवा
24 Apr 2020 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रश्न १ ला. कवीने कवितेतून कोणता आशय व्यक्त केला आहे. सोदाहरण स्पष्ट करा. गुण : १२
उत्तर : प्रस्तुत कविता ज्ञानोबाचे पैजार उर्फ बुवा यांनी 'माझे मिपाचे साहित्य प्रयोग' या काव्य उर्फ सरसकट साहित्य लेखन संग्रहातून निवडली आहे. या कवितेत कवी लॉकडाऊनच्या काळातील चित्रण करीत आहे. लॉकडाऊनच्य काळातील जनजीवनावर जो काही परिणाम झाला आहे त्याची दाहकता वरील कवितेतून येतांना दिसते. लॉकडाऊनच्या काळातील ज्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याची चित्तर कथा 'करोनाष्टके' यातून आलेली आहे. करुनाष्टके ही कारुण्यपूर्ण भावनेनी भरलेली असतात मात्र इथे 'करोनाष्टके'तून कोव्हीड १९ कडे कवी आपलं लक्ष वेधू इच्छितो. ही कविता अत्यंत हलकी-फूलकी आणि तरल संवेदना जागवणारी आहे. पहिल्या चार ओळीतून वयोमानाने आणि परिस्थितीमुळे थकल्याची भावना कवी व्यक्त करत आहे. जेवण-झोपणे आणि शिल्लक काही मध्यानरात्रीपर्यंत काम-काज उरकून 'पकलो रे रामराया' ही भावना सामान्य माणसाच्या बोथट झालेल्या भावनेचं चित्रण आहे.
पुढीच चार ओळीतून जो आशय व्यक्त झालेला हे तो अतिशय सुंदर आहे. 'कुणी तरी अकलेचे, पाजळती दिवे रे' या ओळीतून त्यांनी कोणीही येतो आणि काहीतरी उपाय सांगतो असा आशय आहे. एक चीड एक संताप त्यातून दिसून येतो. दुसरा दिव्यांचा संबंध लोकांनी ज्या रात्री हातात दिवे घेऊन मिरवणूका काढल्या त्या संदर्भात नसला तरी आपण तसे अर्थ काढू शकतो. माध्यमांद्वारे तेच तेच येणारे फॉर्वर्डस याने कवी वैतागून गेला आहे. माझी मती कुंठीत झाली आहे, असे कवी वरील ओळीतून आपल्या निदर्शनास आणू इच्छितो.
बाकीचं उत्तर दिवसभरात नीवांत किंवा भविष्यात कधीही लिहीनच. सध्या चार गुणांचे उत्तर लिहिले आहे. मोबाईलला एक ओएस टाकायची आहे. मग निवांत येतो इकडे.
-दिलीप बिरुटे
24 Apr 2020 - 5:12 pm | प्रचेतस
=))
25 Apr 2020 - 12:09 am | मित्रहो
_/\_
25 Apr 2020 - 9:01 am | नावातकायआहे
_/\_
24 Apr 2020 - 11:19 am | मदनबाण
जळूनी जळूनी चरबी, ती कितीशी जळावी ।
चार भिंतीच्या आत, काय मॅरेथॉन पळावी ॥
तळमळ होते रे, विशाल ते पोट बघता ।
परंतू जिव्हा ही, नावरे आवरीता ॥ ७ ॥
वा उस्ताद वाह ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kya Yahi Pyar Hai (The Unwind Mix) by Meiyang Chang & Shashaa Tirupati
24 Apr 2020 - 12:02 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा ......
जबराट लिहिलंय ! मज्जा वाटली वाचताना !
या ओळी जास्तच ममत्वाने वाचल्या, आरश्यात स्वतः थोबडा निरखून आलो ... अन जाम हसलो या ओळींना.
24 Apr 2020 - 12:05 pm | नि३सोलपुरकर
प्रभात फेरीस अजूनही, वानरे रोज जाती ।
घरी बसून बसून म्हणे ती, मर्कटे बोर होती ॥
पोलीस होती हैराण, बाळलीलांनी यांच्या ।
काळजी समाजाची, नाही खिजगणतीत त्यांच्या .
- बुवा राम राम घ्यावा _/\_.
24 Apr 2020 - 1:23 pm | प्रशांत
मस्त लिहिलंय..!
24 Apr 2020 - 1:39 pm | सतिश गावडे
वा, भारी लिहीले आहे पैजारबुवा.
24 Apr 2020 - 2:11 pm | इरामयी
Corona Go, Corona Go... Go Corona!
24 Apr 2020 - 2:38 pm | चांदणे संदीप
ओए पैजारबुवा, त्वाड्डा ज्वाब नई! फुटलोच मी! =))
किती ओळी क्वोट करू असं झालं मला, त्यामुळे तो विषय सोडून दिला मी.
अखिल भारतीय मिपाविडंबकवशीघ्रकाव्यसंघ यांच्यातर्फे आपणास एक शाल व श्रीफळ देण्यात येत आहे त्याचा आपण स्वीकार करावा ही अतिनम्र विनंती.
सं - दी - प
24 Apr 2020 - 10:03 pm | रश्मिन
+११११११११
पैजारबुवा __/\__ स्वीकारा ..!! अगदी तालात गात गात वाचले ! झक्कास रचना :-)
24 Apr 2020 - 3:09 pm | चौकस२१२
अँड द अवॉर्ड गोज टू....पैंबू
24 Apr 2020 - 4:04 pm | सान्वी
अगदी मार्मिक कविता, मस्तच... यातून सगळीच व्यथा यथार्थपणे पोचतेय...
24 Apr 2020 - 5:12 pm | प्रचेतस
खल्लास लिहिलंयत करोनाष्टके. मजा आली.
24 Apr 2020 - 10:10 pm | मूकवाचक
+१
24 Apr 2020 - 6:14 pm | गणेशा
भारी.. मस्त लिहिले आहे,
बिरुटॅ सरांचा प्रतिसाद पण भारी.
मी हे धागे ओपन पण केले नव्हते ..
मला वाटाले रोज कोण कोण काय करते आहे हे असेल यावर म्हणुन फिरकलो पण नव्हतो
आताच २९ वा आणि तुमचा धागा वाचला आवडला..
सरपंचांनी साण्गितल्या बद्दल त्यांचे धन्यवाद, त्यांच्याशी बोलुनच हे धागे कळाले
लिहितो लवकर साधेसे मी पण
24 Apr 2020 - 7:07 pm | मोदक
फोटो टाक तुझ्या धाग्यात..
मग आंम्ही लिहू की
"आमचा गणेशा झाला... फोटो दिसत नाहीत"
आमचा बदला पूर्ण होईल. :D
25 Apr 2020 - 9:07 am | गणेशा
मी बदला घेउ देणार नाही.. :)
24 Apr 2020 - 7:17 pm | सतिश गावडे
साधेसे नको, जरा भारीच लिही. आणि फोटो टाकलेस तर योग्य त्या परमिशन दे अल्बमला, नाही तर आमचा गणेशा व्हायचा :)
24 Apr 2020 - 6:16 pm | सस्नेह
पैजारबुवा, __/\__
=))
24 Apr 2020 - 7:10 pm | मोदक
हेच बोल्तो...
भारी हो पैजारबुवा..!! __/\__
24 Apr 2020 - 6:59 pm | स्मिताके
सुरेख आहेत करोनाष्टके.
24 Apr 2020 - 7:09 pm | शब्दसखी
खूपच छान!!
लॉकडाउनपीडितांची भावना परफेक्ट मांडली आहे!!
24 Apr 2020 - 7:50 pm | सौ मृदुला धनंजय...
वा !! अप्रतिम.
24 Apr 2020 - 10:08 pm | Prajakta२१
खूप छान
फार छान लिहिले आहे
25 Apr 2020 - 12:14 am | मित्रहो
मस्त एकदम
नमन
25 Apr 2020 - 2:04 pm | ज्योति अळवणी
खूपच मस्त. आवडली कविता
25 Apr 2020 - 10:11 pm | जेम्स वांड
पाय करा इकडे ! काय ती प्रतिभा अन काय ते लेखन तिच्यायला!
26 Apr 2020 - 8:17 am | गणेशा
आज निवांत वाचली पुन्हा.. . मागे पळवत वाचली होती.. काय मस्त लिहिले आहे कविता वा..
मला ही कडवी तर लय आवडली..
हापिसा मध्येच रामा, सर्वही जन्म गेला ।
किती एक दिवस रात्री, माझ्या मी एक केल्या ॥
घरून काम करण्याची, सवय कैसी जडावी ।
सकाळी उठून वाटे, हापिसची बस धरावी ॥ ३ ॥
कितीही लाटली तरी, पोळीचा गोल नाहीं ।
दयार्द्र नजरेने, त्या कडे पत्नी पाही ॥
रोजच जेवाणांत, नवनवे अन्न हावे ।
अनुदिनी वरणभाते, मन कैसे भरावें ॥ ४ ॥
जळूनी जळूनी चरबी, ती कितीशी जळावी ।
चार भिंतीच्या आत, काय मॅरेथॉन पळावी ॥
तळमळ होते रे, विशाल ते पोट बघता ।
परंतू जिव्हा ही, नावरे आवरीता ॥ ७ ॥
28 Apr 2020 - 6:10 pm | खिलजि
पैंबुकाका हि कालच वाचली होती पण प्रतिक्रिया देऊ शकलो नाही .. एकदम फर्मास झालीय .. मस्तच
29 Apr 2020 - 1:45 pm | टर्मीनेटर
पद्य , काव्याची आवड नसूनही समजण्यास सोपी आणि अर्थपूर्ण अशी ॥ करोनाष्टके ॥ आवडली हो पैजारबुवा!
29 Apr 2020 - 5:15 pm | तुषार काळभोर
काव्य भिडलं, पार आत पर्यंत घुसलं.दहा वीस वर्षांनी कोरोना च्या आठवणी काढताना हे कोरोनाष्टक नक्की आठवेल.
2 May 2020 - 7:01 am | अभिजीत अवलिया
उत्तम काव्य.