....या जगण्यावर शतदा प्रेम करावे
तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की ज्या गोष्टीचा आपल्या मनात विचार चालु असतो, तीच गोष्ट अचानक डोळ्यासमोर येते. काल तसंच झालं. वाचन करीत असताना एका शब्दापाशी अडखळले, तो शब्द होता..जिजीविषु. आधी वाटलं, काहीतरी चूक असावी. त्याजागी त्याच्याच जवळपास जाणारा, थोडासा अनवटच पण क्वचित प्रसंगी एेकलेला विजिगीषु म्हणजे विजयाची इच्छा असलेला असा शब्द असावा. पण म्हटलं थोडं शोधुन पाहावं तर याही शब्दाचा अर्थ सापडला. जिजीविषु म्हणजे जगण्याची इच्छा असलेला आणि जिजीविषा म्हणजे जगण्याची दुर्दम्य इच्छा ! Survival instinct!
सरपणाला काढलेल्या लाकडाला जेव्हा पालवी फुटली..
त्याचे त्यालाच कळेना जगायची ही जिद्द कुठली?
हीच ती जिजीविषा!
Survival instinct म्हणजे नेमकं काय हे जर खरंच जाणुन घ्यायचं असेल तर 127 hours हा इंग्रजी सिनेमा पाहा. सत्यघटनेवर बेतलेला. अॅरन राल्स्टन हा गिर्यारोहक त्याच्या उटा येथील साहसी मोहिमेदरम्यान एका कपारीत अडकतो. मग सुरु होतो जगण्यासाठीचा संघर्ष. केवळ अर्धी भरलेली पाण्याची बाटली , डिजीटल कॅमेरा, एक दोर आणि एक वापरलेले ब्लेड या सामग्रीनिशी. त्या कपारीत अडकलेल्या अवस्थेत तो एक नाही,दोन नाही, तब्बल पाच दिवस सात तास अन्नपाण्याविना झुंजत काढतो. एक वेळ अशीही येते की त्याच ब्लेडने त्याला त्याचा हात मनगटापासुन विलग करावा लागतो. पण तो तग धरतो, जगण्याच्या दुर्दम्य इच्छेने. कुठुन येते ही?
फार पूर्वी कुठेतरी वाचलेली एक गोष्ट आठवते. असं म्हणतात, जपानी लोकांना जिवंत, ताजे मासे खायला खुप आवडतात. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा जहाजांवर Refrigeration facility उपलब्ध नव्हती. त्यामुळे साहजिकच समुद्रात खोलवर गेलेली जहाजे किनाऱ्यास लागेपर्यंत मासे जिवंत राहत नसत. मग जहाजांवर मोठ्या पाण्याच्या हौदाची सोय करण्यात आली. आता मासे किनाऱ्यावर येईपर्यंत जिवंत तर असायचे, पण अगदी निस्तेज, चेतनाशून्य ! मग एका अनुभवी माणसाने शक्कल लढवली. त्याने त्या हौदात एक मोठा मासा सोडला. आता मात्र स्वतःला वाचवण्यासाठी सर्व मासे सावध आणि चपळ राहू लागले. जे या बदललेल्या परिस्थितीशी जुळवुन घेऊ शकले नाहीत, ते मोठ्या माशाच्या भक्ष्यस्थानी पडले.
So feeling fear is a good sign that your survival instincts are intact.
आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेले असताना प्रत्येकाच्यासमोर आव्हान तर आहेच. व्यापारउदीम ठप्प आहे, नोकरदारांच्या नोकरीवर गदा आलेली आहे. शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ मिळेल याची शाश्वती नाही. नेहमी दिमाखात मिरवणारा फुलांचा राजा गुलाब आज ग्राहकांअभावी मातीत मिसळला जातोय. हातावर पोट आहे अशांची अवस्था तर त्याहुन बिकट आहे. प्रगत देशांमध्ये कमी लोकसंख्या, उत्तम आरोग्ययंत्रणा, स्वच्छतेबाबत जागरुकता असतानाही तिथे मृत्युचे थैमान चालू आहे. अशा परिस्थितीत आपल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष देऊन ताशेरे मारत मदतीची अपेक्षा करत बसण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीशी समायोजन करुन आपली अनुकूलन क्षमता (adaptability) वाढवणे जास्त गरजेचे आहे कारण शेवटी डार्विनचा उत्क्रांतीवाद हेच सांगतो.. There is always struggle for survival and survival will be of the fittest!
So let's be the part of the fittest community ! आपल्याला तग धरायचा आहे पुन्हा बहरण्यासाठी...फुलासारखं..अंतःप्रेरणेने...कोमल देहात कणखरता जागवत...परिसीमा गाठत जिजीविषेची...
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी ।
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे।
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे॥
प्रतिक्रिया
30 Apr 2020 - 2:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह ! नंबर एक लेखन.
अनेकदा. काही चमत्कार झाल्यसारखे वाटावे तसं अनेकदा. असो. पहिल्या ओळीला गुंतलो होतो. लॉकडाऊनच्या काळातच कोणीतरी सिनेमा सुचवला म्हणून पाहिला होता आवडला. तो जेव्हा कपारीत अडकला तेव्हा त्याला भेटलेल्या दोन पोरी मदतीला याव्यात असं सारखं वाटत होतं. पण तो जेव्हा हात सोडवून घेण्यासाठी त्याला मनगटाला वेगळं करायची वेळ येते तो क्षण पाहवत नाही. आपण म्हणता तसे जगण्याची दुर्दम्य इच्छा माणसाला काहीही करायला लावते.
बाकी, स्वच्छतेच्या बाबतीत आपण उल्लेख केला त्यावर काल मिपावरच्या एका दीर्घ प्रतिसादात वाचलं तेव्हा मला असंच फिसकन हसू आलं. आपल्याकडे रुग्णांची संख्या कमी व्हायला आपला गलिच्छपणा अर्थात अस्वच्छता हेही एक कारण आहे, त्याला सतत सामोरं जाऊन आपण आपली एक प्रतिकार शक्ती वाढवलेली आहे, खरं खोटं काय असेल ते असेल पण कधी कधी वाईटातही चांगलं घडतं असं म्हणावे वाटते. अर्थात स्वच्छता ही असलीच पाहिजे.
बाकी, कोरोनाने असंख्य संकटे आणली आहेत त्यातून बाहेर पडूच. आता अडकलेल्या कामगारांना लोकांना आपापल्या राज्यात चार मे नंतर जायची परवानगी देणार आहेत म्हणे, लोकांचे लोंढे पुन्हा वाहतील. जगरहाटी हळूहळू सुरुच होणार आहे. ''अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी''
आपण नेहमी वेगळ्या विषयावर लिहिता मिपावर येत राहा लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
30 Apr 2020 - 4:16 pm | प्रचेतस
अत्यंत सकारात्मकतेने केलेलं लेखन. माणसाची ही जगण्याची दुर्दम्य इच्छाच त्याला ह्या महामारीपासून वाचण्याचे, जगण्याचे बळ देत राहील.
30 Apr 2020 - 4:26 pm | गणेशा
तुम्ही खुप सुंदर लिहिले आहे.. एकदा नाही पुन्हा पुन्हा वाचावे असे.. आवडले..
सरपणाला काढलेल्या लाकडाला जेव्हा पालवी फुटली..
त्याचे त्यालाच कळेना जगायची ही जिद्द कुठली?
हे तर वाक्य जबरदस्त आहे..
बाकी शरीर आणि मन यांची तंदुरुस्ती हीच पुढील जीवनाची गुरुकिल्ली राहणार आहे हे नक्कीच..
30 Apr 2020 - 5:58 pm | चौथा कोनाडा
पालवीची चारोळी कविता सुरेख आहे. चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांची ही चारोळी.
त्यांच्या जवळजवळ सर्वच चारोळ्या सुंदर आहेत, १९९५ साली हा छोटेखानी पॉकेट कवितासंग्रह घेतला होता,
तेंव्हा झपाटून गेलो होतो त्या कवितांनी ! बहुतेक सर्व चारोळ्या पाठ आहेत !
30 Apr 2020 - 6:19 pm | कुमार१
चौ को >>> +१११
..ही कशी वाटते ...
‘इथं वेडं असण्याचे
खूप फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत’
30 Apr 2020 - 7:15 pm | चौथा कोनाडा
खुपच सुंदर आहे, कुमार१ !
खरंच, थोडंफार वेड आहे म्हणूनच मिसळपाव वर रमतो असं वाटतं !
चंगोंच्या चारोळ्या वेळोवेळी आठवत असतात, रिलेट होत असतात !
कलावंत लोक सर्जक होत असताना स्वतःला कसे वेगळे करत असतात !
30 Apr 2020 - 5:48 pm | चौथा कोनाडा
अतिशय पॉझिटिव्ह विचार देणारा लेख !
127 hours हा इंग्रजी सिनेमाची कहाणी रोचक आहे, असे दोन चार सिनेमे पहिलेत, आता हा ही सिनेमा पहायला हवा.
There is always struggle for survival and survival will be of the fittest ! हे अगदी खरंय !
या पुढं जो शारिरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे तोच तरेल !
30 Apr 2020 - 6:07 pm | Prajakta२१
चांगला लेख
पु ले शु
30 Apr 2020 - 7:14 pm | Nitin Palkar
सकारात्मक विचार नेहमीच मनाला आणि शरीरालाही बळ देतात.
30 Apr 2020 - 8:11 pm | चौकटराजा
"बॉडी ऍट वॉर " या पुस्तकाने इम्युनॉलॉजिस्ट डॉ .जॉन ड्वायेर यांनी " माईंड द अन एक्स्प्लोर्ड अलाय " असे एक प्रकरणच टाकले आहे.क्लिनिकली मरणाचा उमेदवार म्हणून घोषित झालेला रोगी काही वेळेस बरा होऊन घरी जातो. हे मनामुळे घडते असे त्यांना वाटते. आता तो खरेच मनामुळे बरा होतो की आपल्या शास्त्रात ना बसणारे म्हणून " विल पॉवर " वगरे निष्कर्ष काढला जातो यावर वाद होऊ शकतात .माझे निरीक्षण असे आहे की सकारात्मक दृष्टीकोन आपलयाला बदलतो परिसराला नाही.त्यामुळे तितकाच त्याचा उपयोग.उदा मी कितीही सकारात्मक असलो व मला पोहायला येत नसेल तर मी बुडणारच . किंवा पोहायला येत असूनही किनाऱ्या पर्यंतचे अंतर माझ्या क्षमते पेक्षा अधिक असेल तरीही बुडणारच !
सार्वजानिक सकारात्मकता हा प्रचंड अशक्य असा विषय आहे .लॉकडाऊन ला प्राणीशास्त्राचा पाठींबा असला तरी अर्थशास्त्राचा नाही. अशा वेळी कसली सकारात्मकता आपण आणू शकतो ? फक्त वयक्तिक जीवनात सकारात्मकतेचे फायदे जरूर असतात . पण जिद्द ही मानसिक अवस्था साकारात्मकतेपेक्षा वेगळी आहे . बर्याच वेळा एखाद्या उदिष्टपूर्तीचे श्रेय तिला ना मिळता " साकारात्मकतेला " मिळते.
30 Apr 2020 - 11:05 pm | सौ मृदुला धनंजय...
वा !!
क्या बात है .अप्रतिम लेख. प्रतिसादही खूप सुंदर आहेत.
1 May 2020 - 12:16 am | मित्रहो
खूप छान लेख सकारात्मक विचार करायला लावणारा लेख आहे.
1 May 2020 - 10:35 pm | प्रशांत
फारच छान लिहता...
पु ले शु
2 May 2020 - 12:28 am | शेर भाई
सद्य परिस्थितीत सगळीकडे जी नकारात्मकता भरून राहिली आहे, ती काही प्रमाणात दूर करण्यासाठी तुमच सकारात्मक लेखन खरंच स्तुत्य आहे.
2 May 2020 - 7:10 am | सौंदाळा
सुंदर लेख
जिजीविषा शब्द पहिल्यांदाच ऐकला
लॉकडाऊन ला प्राणीशास्त्राचा पाठींबा असला तरी अर्थशास्त्राचा नाही
+१
हे फक्त जगात स्वीडनला समजलं असं वाटतंय.
2 May 2020 - 7:40 am | चांदणे संदीप
जिजीविषु आणि जिजीविषा प्रथमच वाचनात आलेले शब्द.
जपानी लोकांची माशांना जिवंत किनार्यावर नेण्याची गोष्ट आवडली. याच धर्तीवर मी मित्रांना नेहमीच गमतीत सांगत असतो की, माणसाला काम करण्यासाठी जर कोण प्रेरणा देत असेल तर त्या म्हणजे ईएमआयच्या तारखा! ह्या जितक्या जास्त असतील माणूस तेवढाच कामात बिझी असेल. :)
स्वगतः कोरोना फोरोना मेरा कुच नही बिगाड सकता जब तक मै मेरा होम लोन नही चुकाता. सर्व ईएमआय भरेपर्यंत तरी मोक्ष नाहीच्च!
सं - दी - प
2 May 2020 - 1:13 pm | सान्वी
छान लेख...