खरं बोलायचं झालं तर मी या लॉकडाऊनचे आभार मानतो. त्याचे कारण असे आहे कि बऱ्याच दिवसांनी, नेमकं सांगायचं तर साधारण अडीच तीन वर्षांनी काही तरी वाचायला किंवा इतर काही छंद वगैरे पुन्हा नव्यानं जोपासायला हाताशी मोकळा वेळ मिळालाय ह्या लॉकडाऊनमुळे.
साधारण फेब्रुवारीच्या मध्यापासूनच या कोरोनाच्या संकटाचे पडसाद व्यावसायिक आयुष्यात डोकवायला सुरुवात झालेली होती परंतु का कुणास ठाऊक 'आपल्याकडे काही होत नसतंय' हि एक बेफिकिरीची भावना मनात होती हे नाकारण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मार्च एंडला गाठायचा मनाशी ठरवलेला आकडा गाठण्याची धावपळ सुद्धा जोमाने सुरूच होती.
साधारण मार्चचा पंधरवडा उलटून गेल्यावर धोक्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली आणि त्यानुसार हालचाली सुरु केल्या परंतु तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली होती. ज्या काही ऑर्डर्स मार्चच्या शेवटच्या आठवड्यात डिस्पॅच करायच्या होत्या त्या बोंबलल्या होत्या. वेळ अशी होती कि कारखान्यात तयार असलेल्या उपकरणांपैकी जवळपास सत्तर टक्के उपकरणे हि मार्च मधेच पुरवायची होती आणि उरलेली एप्रिल मध्ये पुरवायची होती. आमच्या नेहमीच्या पद्धतीने डिस्पॅच आधी क्लायंट व्हिजिट होते, नंतर त्यांचे क्वालिटी इंजिनियर येऊन इन्स्पेक्शन वगैरे करून मग उपकरणाला हिरवा कंदील दाखवतात. परंतु तोपर्यंत बऱ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना प्रवासाला मनाई केलेली असल्याने कुणी येऊ सुद्धा शकत नव्हते आणि म्हणूनच मी हि सगळी उपकरणे अनिश्चित काळासाठी बोकांडी घेऊन बसणार होतो अशी चिन्हे निर्माण व्हायला लागली होती.
झाले असे होते कि स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यापासूनचे हे तिसरे आर्थिक वर्ष होते आणि गेल्या दोन वर्षात मिळून जितका धंदा झाला होता त्याहून जास्त या वर्षी जानेवारीपर्यंतच केलेला होता. त्यामुळे साहजिकच आत्मविश्वास दुणावलेला होता आणि काही नवीन प्रोजेक्ट्स अत्यंत कमी वेळात म्हणजेच मार्च एंडला पूर्ण करायचे वायदे करून नव्या ऑर्डर्स मिळवलेल्या होत्या, त्या अनुषंगाने बरीचशी अतिरिक्त रक्कम सुद्धा गुंतवली गेलेली असल्यामुळे जरा ताणच आला होता.
यथावकाश मुख्यमंत्र्यांनी लॉक डाऊन जाहीर केला आणि वीस मार्च रोजी आम्ही कारखान्याला टाळे लावून घरी आलो. त्यानंतर चार पाच दिवस तरी दिवसभर काही ना काही कामे फोनवरून अथवा मेलामेली हि चालू होतीच त्यामुळे वेळ घालवायचा कसा या प्रश्नाची तीव्रता कमी होती. चोवीस तारखेच्या रात्री पंतप्रधानांनी येऊन पूर्ण देश बंद केल्याची घोषणा केल्यावर मात्र खऱ्या अर्थाने सर्व कामे ठप्प होत पूर्ण बंद झाली. घरी बसून करण्यासारखी काही कामे उरलेली तर नव्हतीच. मायबाप सरकारने इन्कम टॅक्स, जीएसटी रिटर्न्स वगैरे धंदे उरकण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली असल्यामुळे त्या आघाडीवरही करण्यासारखे काही नव्हते. कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या पगाराची व्यवस्था लावून मग मी हापिसच्या कामाला क्वारंटाईन करून टाकले. कर्नाटक,आंध्र ,गुजरात, पश्चिम बंगाल वगैरे भागातील आमच्या कस्टमरचे लोकांचे हापिसं बंद होऊन त्यांचे फोन अथवा मेल यायचे बंद झाले आणि आता आपण खऱ्या अर्थाने रिकामटेकडे झाल्याची जाणीव झाली. हि जाणीव गडद करून द्यायला आजूबाजूचे वर्क फ्रॉम होम करणारे आयटीवाले होतेच.
शेवटी ठरवलं कि आपणच आता काही तरी टाइमपास शोधावा. धाकटा बंधू त्याच्या खोलीत कोंडून घेऊन वर्क फ्रॉम होम करतो ते नेमके कसे दिसते हे पाहायला दोन चार वेळा डोकावून झाले, काही ठोस हाताला लागेना मग तिथून काढता पाय घेतला. इकडून तिकडून रिव्ह्यूज गोळा करून नेटफ्लिक्स, प्राईम वर काही मालिका बघायला सुरुवात केली पण शेंडेफळ सतत आजूबाजूला बागडत असल्याने तेही धड बघणे होईना, अर्धे लक्ष टीव्हीकडे अन अर्धे खोलीत कुणी येतंय का याकडे. शेवटी पॉज , रिवर्स अन फॉर्वर्डचा करत बसायचा कंटाळा आला अन ते हि सोडून दिले. वाचायची अर्धवट राहून गेलेल्या पुस्तकांपैकी काही बाहेर काढली आणि वाचायला सुरुवात केली. नेमके त्यात नेमाडेंचे हिंदू हाताशी लागले, मग तासाभराने हे पुस्तक आपण परत कधीच हातात सुद्धा धरायचे नाही असा दृढनिश्चय करून गपगुमान दुसऱ्या पुस्तकांकडे वळलो. घरकामासाठी येणाऱ्या बायकांना सोसायटीने बंदी घातल्यावर मात्र घरातील कामांची विभागणी झाली आणि वेळ पटापट जायला लागला.स्वयंपाक घरात नवनवीन प्रयोग करणे चालू केले. वेळचं वेळ असल्यामुळे चकल्या,चिवडा आणि शंकरपाळे बनवायला शिकून घेतल्या.
चारेक दिवसांनी तारीख वार याचे भान सुटल्यावर काल हा भास आहे हे संक्षींचे म्हणणे आठवले आणि तो लेख उपसून वाचला. त्या दिवशी तारीख पाहिली तर निघाली नेमकी ३१ मार्च. मनाशीच म्हटलं कि च्यायला नेमका काय फरक पडतो राव तारखे फिरकेनी, ज्या तारखेसाठी गेले कित्येक महिने उरस्फोड करून धावत होतो ती येऊन गेलेली सुद्धा कळली नाही आणि आता तर त्याचे काही दुःख सुद्धा नाही. काल हि वस्तुस्थिती नसून कल्पनाच असली पाहिजे यांवर विचार करण्यात दोनेक दिवस गेले.शेवटी त्यातील काही गोष्टी पटायला सुद्धा लागल्या.
पण याचा अर्थ असा होत नाहीये कि विरक्ती वगैरे येतेय किंवा हे सर्व मिथ्या आहे असे वाटू लागलंय. जसजसा या लॉकडाऊनला सरावात चाललोय तसतसे आपण तर आता हा लॉकडाऊन सुद्धा उपभोगायला लागलोय. म्हणजे माणूस हा चंगळवादी, भौतिक सुखांच्या मागे धावणारा एक उपभोगी वृत्तीचा प्राणी आहे आणि तो त्याच्या मागे पळत राहणार हेचं अंतिम सत्य. कारण उद्या हे निर्बंध हटल्यावर माणसं यंत्रवत परत पळायला सुरुवात करणारच आहेत आणि हा बॅकलॉग भरून काढायला कदाचित पहिल्यापेक्षा जास्त वेगाने.
प्रतिक्रिया
28 Apr 2020 - 8:40 am | राघवेंद्र
मस्त लिहीले आहे.
28 Apr 2020 - 3:32 pm | मोदक
+११
28 Apr 2020 - 9:43 am | कंजूस
छान!
28 Apr 2020 - 9:55 am | गवि
उत्तम लेख. आवडला.
28 Apr 2020 - 11:07 am | टर्मीनेटर
छान लेख!
+१००
28 Apr 2020 - 11:20 am | वामन देशमुख
छान लिहिलंय.
खरंतर मी लॉकडाउन एंजॉय करतोय. म्हणजे, कायमचं घरून काम करायला मिळालं तर मला ते आवडेलच.
28 Apr 2020 - 11:28 am | जव्हेरगंज
नेमकं लिहिलंय.
आवडलं!!
28 Apr 2020 - 11:36 am | प्रचेतस
तुझा कारखाना, त्यातली मशिनरी सगळं स्वतःहून पाहिलं असल्याने लेख एकदम मनाला भिडला. उद्योजकांच्या अडचणी वाढत असूनदेखील हे सगळं तू सकारात्मकतेने घेतल्याने उत्तम.
बाकी नेमाडेंचे हिंदू खूप पकाऊ पुस्तक आहे. माझे तर पैसे वायाच गेलेत ते विकत घेऊन. पाहिली दीडेकशे पाने तर पूर्ण असंबद्ध आहेत. मला त्यांचे कोसला देखील आवडले नव्हते.
आता हे लॉकडाऊन संपल्यावर तुझ्याहातच्या विविध पाकृ खायला येणार आहेच.
28 Apr 2020 - 4:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं...! बाय द वे, बाकी, त्या नेमाड्यांच्या समृद्ध अडगळीत आपणही कधी रमलो नाही. हातात घेतलं की पहिली काही पानं उलटली की नंतर वाचू असेच फ़िलिंग नेहमी राहीले.
बाकी, आपण पुढच्या भेटीत त्यांचा कारखाना बघायला जाऊ. बार्बीक्यूत जेवू घाला. बदल्यात, तरीही येतो वास फ़ुलांना हे म.वा.धोंडाचं पुस्तक चाळत होतो त्यात मर्ढेकरांची असलेली एक सुंदर कविता आत्ता पेष्टवतो. दवांत आलीस भल्या पहाटी असे तिचे शिर्षक आहे. आवडल्या ओळी अशा.
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!
तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!
अहाहा ! काय सुंदर आहे. या कवितेबद्द्ल अगदी निवांत झालो की बसून बोलु कुठेतरी.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2020 - 4:31 pm | प्रचेतस
तुम्ही इकडं या तर खरं, मग जाऊ सगळीकडे, इकडील काही खास ठिकाणं दाखवतो, कार्ला भाजेला जाऊन संध्याकाळी बार्बेक्यूला जाऊयात.
बाकी मर्ढेकर म्हटले की 'पिपात मेले ओल्या उंदीर' हीच कविता डोळ्यासमोर येते, आपण दिलेली कविता मस्तच आहे.
मर्ढेकरी काव्यावर एक लेख अवश्य येऊ द्यात.
पिपात मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या,मुरगळल्याविण;
ओठावरती ओठ मिळाले;
माना पडल्या,आसक्तिविण.
गरिब बिचारे बिळात जगले,
पिपात मेले उचकी देउन;
दिवस साडला घार्या डोळी
गात्रलिग अन धुऊन घेउन.
जगायची पण सक्ति आहे;
मरायची पण सक्ति आहे;
उदासतेला जहारी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळे
ओठावरती जमले तेही
बेकलाइटी,बेकलाइटी!
ओठावरती ओठ लागले;
पिपात उदिर न्हाले!न्हाले
28 Apr 2020 - 11:13 pm | संजय क्षीरसागर
लयीचं जबरदस्त आकलन, साध्या सोप्या शब्दांचा अत्यंत परिणामकारक वापर आणि कमालीची सौंदर्यदृष्टी म्हणजे बासींची कविता !
कविता इतकी उघड की तिला वेगळया रसग्रहणाची गरजच नाही ! पुनर्वाचन हेच त्यांच्या कवितेचं रसग्रहण !
बासींची कविता कळली नाही असं कुणीही म्हणू शकत नाही आणि तशी कविता आजपर्यंत कुणालाही जमली नाही .
तुम्ही दिलेल्या या सुरेख ओळी याची साक्ष देतात :
तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!
28 Apr 2020 - 12:02 pm | चौथा कोनाडा
अर्रर्र ...
बाबौ ! नेमाडेंचे चतुष्ट्क वाचून काढले (त्यालाही बरीच वर्षे झाली) त्यांचे लेखन आवडले. आता हिंदू वाचायची म्हणतोय !
पण तुमी असं लिहिलंय मग अवघड आहे
28 Apr 2020 - 12:33 pm | सुबोध खरे
माणूस हा चंगळवादी, भौतिक सुखांच्या मागे धावणारा एक उपभोगी वृत्तीचा प्राणी आहे आणि तो त्याच्या मागे पळत राहणार हेचं अंतिम सत्य.
असे प्रामाणिकपणे लिहिणारी माणसे फार कमी आहेत.
पण जी आहेत ती स्थीतीशी जास्त चांगले जुळवून घेऊ शकल्याने जास्त यशस्वी आणि जास्त समाधानी आहेत.
अन्यथा झेपत नसले तरी अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या जडजंबालात अडकून न घर का ना घाट का अशी स्थिती झालेलेच जास्त दिसतात.
28 Apr 2020 - 12:34 pm | संजय क्षीरसागर
काल हा भास आहे ही निर्विवाद वस्तुस्थिती आहे कारण दिवस आणि रात्र हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यानं तयार होतात. सूर्य कायम प्रकाशमान आहे.
अर्थात, जगात कालही संकल्पना सुविधा निर्माण करते हे नक्की ! पण काल हा भास आहे या आकलनामुळे त्याचा धसका संपतो आणि व्यक्ती कालाचा वापर सोयीसाठी पण सहज करु शकते. त्यामुळे विरक्ती न येता उलट कार्यक्षमता वाढते.
काल या कत्पनेला पराभूत करायचा एकमेव मार्ग म्हणजे वेळेपूर्वीच सगळी कामं संपवणं हा आहे.
एक उदाहरण बघा >
क्यू फोरची टिडीएसची रिटर्न्स मे एंड पर्यंत भरता येतात पण क्लायंटसना पार्टी पेमंटबरोबरच टिडीएस भरायला सांगितल्यानं एप्रिलच्या पहिल्या आठवडयातच रिटर्न्सचं काम तमाम झालं होतं ! आता एक्स्टेंशन मिळो किंवा नाही, शून्य फरक आहे.
28 Apr 2020 - 12:54 pm | चौकटराजा
गणा ए गणा ..... मी चौकट राजा बोलतोय .... हा हा ! आजून हाय तिथच ऱ्हायाला हाय काय ? क्षीरसागर ना नमस्कार सांगा ! आजच एक किलोच्या कुरडया पाडून दिल्या ! (असे काही तरी चालू आहे) वासलेकर यांच्या मते झटका काहीसा म्हणजे दीड वर्षे रोजंदारीला नक्की बसेल पण जगात फारसा फरक बिरक काही पडणार नाही ! जग असेच वेगाने व ताणतणावात पुढे चालू राहील.माणूस चुकांतून शिकणारा की ना शिकणारा प्राणी आहे ते फार व्यक्तिपरत्वे बदलते .समाज काही फारसा चुकांतून बोध घेत नसतो.करोना चा व्हायरस येणे ही काही मानवी समाजाची चूक आहे असे अजून तरी प्रकाशात आलेलं नाही पण आपण एकूण आरोग्यावर कमी खर्च करतो ( निदान भारत तरी ) हे वास्स्तव आहे ! आरोग्ग्यावर जास्त खर्च करा अशी मागणी मुळी करोनाच्या या आक्रमणाचा धडा म्हणून समाजातून होणारच नाही असा माझा तरी अंदाज आहे. जसे कायदे कडक बनविले तरी गुन्हेगारी काही थांबत नाही तसे उपभोगी आयुष्य म्हणजे नक्की काय .. हे ठरविण्यात जग फरपटत जाणार ! पुढच्या पिढयांना असे फरपटत जाण्याची खरे तर गोडी लागली आहे !
28 Apr 2020 - 2:59 pm | गणेशा
भारी, मस्त लिहिले आहे.. एका कारखाण्याशी निगडीत असलेले वाचायला मिळाल्याने छान वाटले. याबाबतीत काहीच अनुभव नाही..
28 Apr 2020 - 4:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रामाणिक कथनांची मालिका आवडतेय. आपल्या कंपनीतील कामाचं केलेलं प्लॅनिंग आणि वास्तवाशी भिडून प्रसंगाला भीडून सामोरं कथानक पोहचलं. तुम्ही म्हणता तसं आता लॉकडाऊनला सरावलोय पण तरी अधून मधून पोरांना विचारतो आज काय वार आणि आज काय तारीख. कॅलेंडरकडरवर नजर टाकून येतोच. किती दिवस झाले असे स्वतःशीच बोलतो. आणि किती रुग्ण किती वाताहात ते पुन्हा सुरु होते. माणसाची सर्व धडपड सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी चाललेली असते. शारिरीक गरजा सुरक्षितता आली की आपलं कोणीतरी हवं असतं आणि आपण कोणाचे तरी असलो पाहिजे या प्रेम भावनेचं आयुष्य सुरु होतं. वेगळंच काही तरी सुरु झालं वाट्तं
हं तर, सकाळीच धागा वाचला होता प्रतिसाद लिहायला घेतला की नाडीपट्टीची आठवण आली. तिकडे रंगलो. काही जुने धागे मिपावर वाचत बसलो. आज घरातली सर्व पुस्तके लावू म्हटलं अर्धी पुस्तके काढून यादी करत बसलो. कंटाळा आला त्याचाही.
रेडमी नोट फाइव्ह प्रोला पुन्हा ऑक्सीजन स्टेबल ओएस टाकली. तिकडेच रमलो. पुन्हा तेच अॅप्लीकेशन्स टाकणे पुन्हा कॉन्टेक्ट्स टाकणे या लफ-यार मेमरी कार्ड फॉर्मेट झालं असे काही तरी होईल अशी पाल चुकचुकत होतीच. फोटोचा बॅकप दोनदिवस अगोदर घेतला म्हणून ते शिल्लक राहीले. बाकी काय काय गेलं हे देवालाच आणि त्या मेमरीकार्डलाच माहिती, त्यामुळे कही खुशी कही गम. च्यायला, तीस जीबी फोटो झालेत हे खूप झालेत काय डीलीट करावे समजत नाही.
मिपावर पडीक आहेच. मिपावर अधून मधून येरर येतोय. मालक, चालक, प्रशासक,व्यवस्थापन आणि साहित्यिक बंधूंनो. एकमेव आधार मिपा आहे, आमच्या आनंदाशी नका खेळू रे....! धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2020 - 5:49 pm | सरनौबत
वा गणामास्तर! स्वतःच व्यवसाय असूनदेखील ह्या काळात इतके सकारात्मक लिहिल्याबद्दल अभिनंदन. घरी बसून अजून काय-काय टाईमपास करत आहेत ते अजून सविस्तर येऊ दे. बाकी लेख छान
28 Apr 2020 - 6:49 pm | मदनबाण
चारेक दिवसांनी तारीख वार याचे भान सुटल्यावर काल हा भास आहे हे संक्षींचे म्हणणे आठवले आणि तो लेख उपसून वाचला. त्या दिवशी तारीख पाहिली तर निघाली नेमकी ३१ मार्च. मनाशीच म्हटलं कि च्यायला नेमका काय फरक पडतो राव तारखे फिरकेनी, ज्या तारखेसाठी गेले कित्येक महिने उरस्फोड करून धावत होतो ती येऊन गेलेली सुद्धा कळली नाही आणि आता तर त्याचे काही दुःख सुद्धा नाही. काल हि वस्तुस्थिती नसून कल्पनाच असली पाहिजे यांवर विचार करण्यात दोनेक दिवस गेले.शेवटी त्यातील काही गोष्टी पटायला सुद्धा लागल्या.
मास्तर... अवं नोकरदार मंडळी पगाराच्या तारखेवरच डोळा ठेवुन दररोज धावतात बघा ! कालातीत / अजरामर व्यक्तीसाठी काल भास आहे असे म्हंटले तर ते योग्य ठरावे, मर्त्य मानवाला काळाचे भान ठेवण्या शिवाय पर्याय नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mere Dil Ka Tumse Hai Kehna ( Cover) | Armaan | Shankar Ehsaan Loy & Chitra
28 Apr 2020 - 11:25 pm | संजय क्षीरसागर
पण जगातल्या कोणत्याही व्यक्तीनं (पार नोबेल लॉरेटपासून कुणीही), वाट्टेल त्या फोरमवर काल वास्तविक आहे हे सिद्ध करुन दाखवावं !
वेळ केवळ घडयाळात आणि तारीख कॅलेंडरमधे आहे > या दोन्हीही मानवी कल्पना आहेत. त्या कल्पना निर्विवादपणे उपयोगी आहेत.
अस्तित्वात केवळ प्रक्रिया आहे पण काल हा निव्वळ भास आहे
31 May 2020 - 4:41 pm | संगणकनंद
सर, ते मध्यंतरीच्या काळाचं काय लफडं आहे मग?
28 Apr 2020 - 9:47 pm | सौ मृदुला धनंजय...
छान लेख.
28 Apr 2020 - 11:50 pm | movaku
व्वा वाह
29 Apr 2020 - 6:37 am | रीडर
IT सोडून वेगळ्या क्षेत्रातील अनुभव वाचायला मिळाला.
गुंतवलेले पैसे वसूल होऊन फायदा हातात येईपर्यंत संयम ठेवणे सर्वांनाच शक्य होत नाही.