लॉकडाऊन : बत्तीसावा दिवस

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in काथ्याकूट
25 Apr 2020 - 3:19 pm
गाभा: 

p {
text-align:justify;
font-size:17px;}

h6 {
text-align:center;
font-size:17px;
}

अनेक घटना/गोष्टी आपल्या जीवनात पहिल्यांदाच घडत असतात किंवा कराव्या लागत असतात. त्यातून मिळणारे अनुभवही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी सुखाची, आनंदाची अनुभूति मिळते तर कधी दुःख, मन:स्ताप पदरी पडतो. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून आयुष्यात पहिल्यांदाच घडलेल्या काही घटना, कराव्या लागलेल्या/करायला जमलेल्या गोष्टींसाठी २०२० साल आत्तापर्यंत तरी माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. जानेवारी ते आता जवळपास संपत आलेल्या एप्रिल ह्या ऊण्यापुऱ्या चार महिन्यात आलेल्या चांगल्या/ वाईट अनुभवांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे करतोय!

जानेवारी महिन्याच्या पूर्वार्धात रुग्ण म्हणून हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याची वेळ माझ्यावर आयुष्यात पहिल्यांदाच आली. ह्या पहिलटकर रुग्णाची सेवा-शुश्रुषा करण्याचा बहूमान मिळाला तो डोंबिवलीच्या AIMS हॉस्पिटलला.
झालं असं होतं की जवळपास दीड वर्षापूर्वी चमक भरल्याचे निमित्त होऊन किरकोळ स्वरूपात सुरू झालेल्या पाठदुखिच्या त्रासाने २०१९ च्या दिवाळी नंतर पुन्हा डोके वर काढले. ह्यावेळी वेदनांची तीव्रता पूर्वीपेक्षा जरा जास्त होती. फॅमिली डॉक्टरांच्या उपचारांनी दहा-बारा दिवस झाल्यावरही काहीच फरक पडत नसल्याने त्यांच्याच सल्ल्याने मग पाठ आणि कमरेचा एक्स-रे काढला. त्यात पाठीच्या माणक्यात एल-4 आणि एल-5 मधली गॅप कमी झालीअसल्याचे निदान झाले. त्यानंतर दिलेल्या नवीन औषधांनी काही दिवस आराम पडायचा पण पुन्हा दोन-चार दिवसांनी दुखणे सुरू व्हायचे. पुढे जानेवारी महिन्यात वेदना अगदीच असह्य झाल्यावर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याचा सल्ला दिला.

सर्व आधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने आणि मुख्य म्हणजे कॅशलेस मेडीक्लेम साठी TPA च्या यादीत नाव असल्याने ह्या सुपर स्पेश्यालिटी हॉस्पिटलची निवड केली होती. पहिल्या मजल्यावरील OPD मध्ये तिथल्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी माझी तपासणी करून केस पेपरची फाइल तयार करून दिल्यावर तळ मजल्यावरच्या Casualty Ward मध्ये पुढील तपासण्या आणि उपचारांना सुरुवात झाली. आधी ECG, ब्लड प्रेशर, शुगर वगैरे चेक करून झाल्यावर मला माझ्या आयुष्यातील पहिले सलाईन त्यात कुठलेतरी इंजेक्शन टोचून लावण्यात आले. ते संपल्यावर मग जिना चढून किंवा लिफ्टने जायला मी तयार असतानाही नियमांवर बोट ठेवत व्हीलचेअरवर बसवून एक्स-रे काढण्यासाठी पहिल्या मजल्यावरच्या रेडिओलॉजी विभागापर्यंत माझी मिरवणूक काढण्यात आली. आयुष्यात पहिल्यांदाच व्हीलचेअरवरून केलेल्या त्या प्रवासात अजूबाजूने येणारे जाणारे लोक ज्या दयार्द्र, सहानुभूतियुक्त वगैरे नजरेने माझ्याकडे पाहत होते त्यामुळे प्रचंड लाज वाटत होती.

एक्स-रे काढून बाहेर आलो तर अॅडमिशन, हेल्थ इन्शुरन्सचे फॉर्म्स आणि सिक्युरिटी डिपॉझिट भरण्याची प्रक्रिया पार पाडून आलेला माझा भाचा 'आकाश' आणि ऑफिसहून थेट हॉस्पिटलला पोहोचलेल्या आमच्या सौभाग्यवती समोरच्या खुर्च्यांवर बसून माझी वाट बघत होते. मला व्हीलचेअरवर बसलेल्या अवस्थेत बघून बायकोला तिथे रडुच कोसळले. तिला शांत करण्यासाठी मी उठून उभा रहात "मला व्यवस्थित चालता येतंय, पण हॉस्पिटलच्या नियमांनुसार असे बसवण्यात आलंय " हे सांगत असताना चालकाच्या भूमिकेतील वॉर्डबॉयने ( बॉय कुठले, त्यांना वॉर्डअंकल म्हणणे योग्य ठरेल!) "अहो साहेब तुम्ही उठू नका, कुठल्या डॉक्टरांनी बघितले तर मला बोलणी खावी लागतील" असे सांगत माझ्या दंडाला धरून मला पुन्हा व्हीलचेअरवर बसवले. आकाशने त्यांना मला कुठला वॉर्ड अॅलॉट केलाय ते लिहिलेला कागद दाखवल्यावर चौथ्या मजल्यावरील माझ्या वॉर्ड पर्यंत येऊन ती मिरवणूक थांबली. पेशंटसाठी असलेला गणवेश घालायला लाऊन मला बेडवर झोपवण्यात आले. लगेच नर्सने दोन इंजेक्शन टोचून दूसरा मोठा सलाईन लावला आणि त्यांच्याकडून दिली गेलेली औषधे आणि वापरलेले साहित्य तसेच यापुढे द्यायची औषधे लिहिलेले प्रिस्क्रिप्शन बायकोच्या हातात देत तळ मजल्यावरील फार्मसीतून ती आणण्यास फर्मावले.

पुढचे तीन दिवस असंख्य पेनकिलर इंजेक्टेबल्स लहान मोठ्या सलाईनच्या माध्यमातून दिल्यानंतर माझ्या वेदना थोड्या कमी झाल्यावर MRI स्कॅन करण्यासाठी पुन्हा व्हीलचेअरवर बसवून पहिल्या मजल्यावर नेण्यात आले. तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता OPD च्या वेटिंग हॉल मधून जातो. आपला नंबर येण्याची वाट बघत तिथे बसलेल्या अनेक जणांमध्ये दोन-तीन ओळखीचे चेहरे तर होतेच, पण नेमका त्यात आईला तपासणीसाठी घेऊन आलेला कॉलेज मधला एक मित्रही होता. मला असे नेताना पाहून तो बसल्या जागेवरून उठून माझी चौकशी करायला आला. त्यालाही माझ्या दुखण्या बद्दल सांगून अशा अवस्थेत का नेण्यात येत आहे त्याचे स्पष्टीकरण देताना पुन्हा लाजिरवाणे झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी राऊंडला आल्यावर डॉक्टरांनी MRI स्कॅनच्या रिपोर्ट मध्ये एल-4, एल-5 आणि एस -1 ह्या ठिकाणी गडबड आढळून आल्याचे आणि त्यामुळे Nerve Compression झाल्याने वेदना होत असल्याचे स्पष्ट केले. पुढचे काही दिवस औषधे, नियमित फिजिओथेरपी आणि भरपूर आरामाची गरज असून फार काही गंभीर नसल्याने सर्जरी करण्याची आवश्यक नसल्याचेही सांगितले. झाले मग त्याच दिवशी संध्याकाळ पासून डिसचार्ज मिळेपर्यंतचे पुढचे चार दिवस मला रोज तळमजल्यावर फिजिओथेरपी साठी नेण्यात आले. कसे नेले असेल ते सांगायची गरजच नाही. :)

संक्रांत हॉस्पिटल मध्येच साजरी झाल्यावर साधारणपणे ८०% बरा झाल्याचे जाहीर करून चौदा दिवस घ्यायची औषधे, पुढील दोन महीने सक्त विश्रांती आणि घराजवळच्या कोणत्याही फिजिओथेरपिस्ट कडे किमान १० दिवस फिजिओथेरपी घेण्याचा सल्ला, सहा महिन्यांपर्यंत फोर व्हीलर आणि शक्यतो आजन्म टु व्हीलर न चालवण्याचे अशक्य कोटीतले बंधन व पंधरा दिवसांनी पुन्हा तपासणी साठी यायला बाजावून साडेआठ दिवसांनी माझी तिथून मुक्तता झाली.

तिथे मिळणारा सकाळचा चहा, नाश्ता, संध्याकाळचा फलाहार, साधे असले तरी चविष्ट असे दुपारचे आणि रात्रीचे जेवण आणि दूध, डॉक्टरी इलाज व सेवातत्पर नर्सिंग स्टाफ ह्या गोष्टी समाधानकारक असल्या तरी रोज मध्यरात्री दीड वाजता मध्यम आकाराची सीरिंज खुपसून तपासणी साठी छटाकभर रक्ताचा नमूना घ्यायला येणारी पॅथलॉजीस्ट आणि पहाटे पाच वाजता बेडशीट, उशीचा अभ्रा, चादर आणि पेशंटचे कपडे बदलायला ढकलगाडी घेऊन येणारे कर्मचारी ह्यांच्यामुळे होणारी झोपमोड मात्र त्रासदायक होती. अशा कामांसाठी ह्या आडनिडया वेळा ठरावण्यामागे हॉस्पिटल प्रशासनाचे काय लॉजिक असावे हे परमेश्वर जाणे!

आपण बऱ्यापैकी बरे होऊन बाहेर पडलो ह्याचे समाधान सोडले तर एकंदरीत हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा माझा हा पहिला वहिला अनुभव अगदीच वाईट नसला तरी चांगला म्हणावा असाही नव्हता.

घरी आल्यावर तासभर फिजिओथेरपिस्ट कडे जाण्याचा अपवाद वगळता सक्त विश्रांतीला सुरुवात झाली. ऑफिसला जाणे बंद झाल्याने, आज ह्या लॉकडाउनच्या काळात आपल्यापैकी अनेकांच्या वाट्याला आलेले 'वर्क फ्रॉम होम' माझ्यासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सुरू झाले. डेस्कटॉप आणि लॅपटॉप समोर बसून काम करण्यावर अनेक मर्यादा आल्याने पडल्या पडल्या फोनवरच थोडेफार काम होत होते. एकतर फोनवर वाचन आणि टंकनाचा मला अतिशय तिटकारा आहे त्यात भर म्हणून फोनच्या स्क्रीन वरील बारीक अक्षरे वाचण्यास त्रास होऊ लागला. तो लांबवर धरला तर बऱ्यापैकी वाचता येत होते म्हणून नेत्रचिकित्सकाकडे जाऊन डोळे तपासून घेतले. जवळचा नंबर लागल्याचे निदान झाल्यावर आता आपली प्रौढत्वाकडे वाटचाल सुरू झाल्याचा साक्षात्कार झाला

१ फेब्रुवारीला आयुष्यातल्या पहिल्या चष्म्याची खरेदी झाली. हा नवीन दागिना घातल्यावर वाचता छान येऊ लागले मात्र पाच-सात मिनिटे झाली की प्रचंड डोकेदुखी सुरू व्हायची. होईल काही दिवसांत सवय म्हणून वाचताना नेटाने चार-पाच दिवस लावला पण व्यर्थ! त्यामुळे अगदीच अत्यावश्यक काही वाचायचे असेल तरच त्याचा वापर होऊ लागला आणि ह्याची परिणीती एक यूट्यूब वगळता माझ्या आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या 'मिपा' सहित सर्वच समाज माध्यमांपसून दुरावण्यात झाली असल्याने हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत वाईट होता.

सक्त विश्रांतीचे दोन महीने संपत आल्याने आता माझ्या आजारपणामुळे रखडलेली काही कामे हाती घेणे गरजेचे होते. अशा कामांमध्ये खोपोली - पेण महामार्गावर पेणजवळ पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या शेतजमिनीवर ठिबक सिंचन यंत्रणा बसवण्याचे काम अग्रभागी होते. त्यासाठी आवश्यक असलेल्या साधन सामुग्रीची खरेदी पुण्याला भरलेल्या 'किसान' ह्या भव्य कृषि प्रदर्शनात १२ डिसेंबर २०१९ रोजीच करून झाली होती. अठरा मार्चला एक दिवसा आड आमच्या झाडांना पाणी घालण्याचे काम करणाऱ्या गावातल्या मनुष्याची पत्नी बाळंत झाल्याने तो सुमारे आठवडाभर येऊ शकत नसल्याचे सांगणारा फोन आला. मग आठवडा भर पाणी घालणे आणि त्याचबरोबर ठिबक बसवण्याचे अशी दोन्ही कामे करण्यासाठी मी आणि माझा भाचा आकाश १९ मार्च रोजी संध्याकाळी तेथे दाखल झालो.

सुरुवातीच्या तीन वर्षांत ह्या जागेला काटेरी तारेचे कुंपण घालणे, बोअर वेल खोदणे, पाण्याची साठवणूक करण्यासाठी भूमिगत टाकी बांधणे, आवश्यक तिथे मातीची भर घालून व उंचवट्याच्या ठिकाणी JCB द्वारे खुदाई करून जमिनीची सपाटी करणे अशी कामे करून झाल्यावर मग दोन वर्षांपूर्वी ज्या झाडांना वाढीसाठी तुलनेने जास्त कालावधी लागतो अशी नारळ, फणस, आंबा, काजू, चिकू, आवळा लाल जाम, सफेद जाम, पेरू, लिंबू अशी झाडे लावली असून त्यांची वाढ आता छान झाली आहे, तर मागच्या जून महिन्यात पावसाळा सुरू होताना पपई, कडीपत्ता, वांगी, भेंडी, मिरची, दुधी भोपळा, टोमॅटो, कार्ली, मका, आलं आणि पुदिन्याची रोपे मोठया हौशीने ( आणि थोड्याश्या आज्ञानाने ) लावली होती. पण गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे त्यापैकी फक्त दोन पपईची झाडे, आठ कडीपत्ता व तीन वांग्याच्या रोपांनीच तग धरली आहे. पपई मस्त फळांनी लगडली आहे. तसेच डिसेंबर २०१९ मध्ये किसान प्रदर्शनातून आणलेली चंदनाची दोन, सिताफळाचे एक, केशर आंब्याचे एक आणि पेरूची दोन कलमे अजून बाल्यावस्थेत आहेत त्यांना पावसाळा सुरू झाला की जमिनीत लावणार आहे.
पपई
नारळ आणि जाम
काजू
देवगड हापूस
चंदन
सीताफळ आणि केशर आंबा
पेरू

फार्म हाऊस ही कल्पना कितीही रम्य असली तरी त्यात सहलीसाठी एखाद दोन दिवस मुक्काम करणे इतपत ठीक, पण वारंवार अशा ठिकाणी येऊन रहाण्याची आमच्या कुटुंबात कोणालाच आवड नसल्याने आम्ही त्याठिकाणी घर न बांधता फार्म पासून जवळच पेण शहराच्या निकट शांत आणि निसर्गरम्य अशा परिसरात बांधकामाला सुरुवात झालेल्या एका टाउनशिप प्रकल्पात स्टुडिओ अपार्टमेंट बुक केला होता. गेल्यावर्षी मे महिन्यात ह्या नवीन घराचा ताबा मिळाल्याने अधून मधून फार्म वर कामासाठी किंवा वीकएंड साजरा करण्यासाठी आल्यावर आमच्या मुक्कामाची छान सोय झाली आहे.

१९ तारखेला संध्याकाळी आम्ही इथे पोहोचलो आणि त्याच रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा सामना करण्यासाठी रविवारी २२ मार्चला सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत एक दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पेणला बाजारात जाऊन पाण्याच्या पंपाची खरेदी केली आणि मग तो बसवण्यासाठी आणखीन काय काय वस्तु लागतील आणि तो बसवण्यासाठी कधी येणार हे विचारायला प्लंबरला फोन केला तर ते महाशय पुतणीच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले असून चार दिवसांनी परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही किमान आठवडाभर राहण्याच्या तयारीने आलो असल्याने पंप बसवण्यास दोन चार दिवस उशीर झाला तरी काही फरक पडत नव्हता. मग त्या दिवशीचा संध्याकाळ पर्यंतचा वेळ आणि दूसरा संपूर्ण दिवस फार्मवर द्रवरूप खत तयार करण्यासाठी बसवलेल्या प्लॅस्टिकच्या ड्रम्स मध्ये जवळच्या गोठयातून आणलेले शेण, गोमूत्र आणि इकडे तिकडे पसरलेला काडी-कचरा वाळलेली पाने, गवत वगैरे साहित्य जमा करून त्याचे बारीक तुकडे करून भरण्यात आणि झाडांना पाणी घालण्यात गेला.

२२ मार्चचा संपूर्ण दिवस घरात बसून जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन केले आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता टाळ्या, थाळीनाद, घंटानाद करण्याच्या पंतप्रधानांच्या विनंतीला मान देऊन बाल्कनीत उभे राहून थाळीनादही केला.

तेवीस तारखेला दोन मजूर बोलावून इतस्तहा वाढलेले गवत, तण, रानतुळशीची झाडे काढून टाकून ठिबक सिंचनासाठी आणलेले पाईप्स पसरवण्याच्या कामाला सुरुवात केली. चोवीस तारखेला संध्याकाळी सांगितल्या प्रमाणे चार दिवसांनी प्लंबर महाशय हजर झाले आणि फुट व्हॉल्व, सक्शन पाईप, डिलिव्हरी पाईप वगैरे वगैरे सामानाची यादी लिहून देऊन "सकाळी हे सर्व घेऊन या, उद्या पंप बसवून टाकू" असं सांगून निघून गेले, आणि नेमकी त्याच रात्री मोदी साहेबांनी मध्यरात्री पासून २१ दिवसांसाठी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली.

पंचवीस तारखेपासून भाजीपाला, डेअरी, बेकरी, किराणा अशी जीवनावश्यक वस्तूंची व खते, बी-बियाणे, किटकनाशके अशा कृषीपयोगी सामानाची दुकाने सुरू रहाणार होती पण प्लंबिंगचे साहित्य मिळू शकेल अशी हार्डवेअरची दुकाने बंद रहाणार असल्याने आता लॉकडाउन संपेपर्यंत ते सामान मिळण्याची शक्यता नसल्याने हाती घेतलेले काम तर अर्धवट रहाणारच होते वर जिल्ह्यांच्या सीमा सील झाल्याने आमचा घरी परतण्याचा मार्गही बंद झाला होता.

जगभरात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अवाढव्य लोकसंख्येच्या आपल्या देशाला ह्या महामारी पासून वाचवण्याचा हाच सर्वात प्रभावशाली उपाय असल्याचे लगेच लक्षात आल्याने प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करण्यास जराही वेळ लागला नाही. पण हे झाले माझ्यापुरते, आता आकाशची समजूत कशी काढायची हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहीला. गेल्याच वर्षी ग्रॅजुएशन पूर्ण झाल्यावर बाहेर कुठे नोकरी न करता मला माझ्या व्यवसायात मदत करणारा हा माझा भाचा! वय लहान, एकुलता एक असल्याने सगळ्यांचा प्रचंड लाडोबा, अजून जगाचा फारसा अनुभव नाही, आई-बाबा, मित्र मंडळी आणि घरा पासून कधी इतके दिवस लांब राहण्याचा प्रसंग आलेला नाही, माझ्या पाठीच्या दुखण्यामुळे शारीरिक कष्टाच्या कामांवर खूपच मर्यादा आल्यामुळे माझ्या मदतीच्या नावाखाली खरंतर माझी काळजी घेण्यासाठी तो आठवडाभरासाठी माझ्या बरोबर आला होता. पण काल ही २१ दिवसांच्या लॉकडाउनची बातमी ऐकल्यावर मात्र तो प्रचंड निराश झाला.

आता इतके दिवस आपण दोघेच घरात बसून करणार काय? सकाळचा नाश्ता आणि एक वेळ जेवायला जातो ते तात्यांचे हॉटेल पण बंद होणार. त्यात इथे स्वीगी, झोमॅटो अशा सर्व्हिसेस नाहीत, डॉमिनोज, पिझ्झा हट, मॅक डोनाल्डस नाही, आपल्या दोघांना फार काही खायला बनवता येत नाही मग एवढे दिवस आपण खाणार काय? घरात असलो तर मोबाईलला धड नेटवर्क नाही, वाय-फाय सुविधेमुळे इंटरनेट असले तरी PUBG, Vainglory, Auto Chess हे गेम खेळायला आवश्यक तेवढा हाय स्पीड मिळत नसल्याने गेम लॅग होतो मग खेळू कसा? असे अनेक प्रश्न त्याला पडले होते. आधीचा जनता कर्फ्यू आणि त्या पाठोपाठ झालेला लॉकडाउन हे दोन्ही प्रकार मी पण पहिल्यांदाच अनुभवत होतो त्यामुळे त्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्याक्षणी जरी माझ्याकडे नसली तरी आता आपले कसे होणार ह्याची चिंता अजिबात वाटत नव्हती.

मी त्याला थोडं समजवायचा प्रयत्न करत असताना तात्यांचा फोन आला, घराच्या आत नेटवर्क वीक असल्याने बोलायला म्हणून बाहेर बाल्कनीत गेलो. "काय हो बातमी समजली का? उद्या पासून सगळं बंद होणार आहे. आज जेवायला थोडे लवकर या" असे ते बोलल्यावर मी हो समजली बातमी, येतो आम्ही १० मिनिटांत असे सांगून फोन ठेवला. हे तात्या म्हणजे एकदम भारी माणूस! आमच्या कॉम्प्लेक्सच्या मेन गेट समोरच ह्यांचे दोन दुकानाचे गाळे आणि मागे घर आहे. त्यातल्या एका गाळयात छोटेसे हॉटेल आणि दुसऱ्यात किराणा मालाचे दुकान. अडीच वर्षांपूर्वी सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर, पूर्वनियोजन करून बांधलेल्या ह्या घरात ते आणि त्यांची पत्नी पेणहून इथे स्थलांतरित झाले. मुलगा संदेश आणि सून पेणलाच रहातात. संदेश दिवसभर हॉटेल सांभाळायला येतो आणि रात्री परत घरी जातो. आम्ही ज्या दिवशी ह्या प्रकल्पात फ्लॅट बुक केला त्या दिवसापासूनच माझे आणि त्यांचे ऋणानुबंध जुळले. नंतर बांधकामाची प्रगती पाहण्यासाठी बऱ्याचदा इथे येणे-जाणे होत होते त्यामुळे ते अधिकच घट्ट होत गेले. घराचा ताबा मिळाल्यानंतर ते माझ्या आजारपणा पर्यंतच्या जवळपास प्रत्येक वीकएंडला मी आणि माझी बायको इथे मुक्कामास येत होतो आणि आमच्या इथल्या वास्तव्यात सकाळचा नाश्ता आणि एकवेळचे जेवण इथेच व्हायचे. तीच प्रथा गेले ५ दिवस मी आणि आकाशही पाळत होतो.

जेवताना त्याला पडलेल्या प्रश्नांचा विषय निघाल्यावर तात्यांनी त्याला सांगितले की "खाण्या पिण्याची चिंता तु अजिबात करू नकोस. आपलं हॉटेल उद्यापासून ग्राहकांसाठी बंद असलं तरी घर मागेच आहे. त्यामुळे तुला हवा तो नाश्ता आणि जेवायला हवा तो पदार्थ बनवून देण्याची जवाबदारी माझी. तसंच किराणाचे दुकान सुरूच रहाणार आहे तेव्हा बाकीच्या सटर फटर वस्तुही मिळतीलच." त्यांचे हे शब्द ऐकल्यावर त्याच्या मनावरचे दडपण थोडे कमी झाले.

जेवण उरकून आम्ही मेन गेट मधून आत आलो तेव्हा गार्डन मधल्या गझेबो मध्ये दोन्ही बिल्डिंग मधली काही मंडळी लॉकडाउन विषयी चर्चा करत बसली होती. आम्हालाही त्यांनी चर्चेत सहभागी होण्यासाठी बोलावले.
गार्डन आणि गझेबोचा थोडा थोडा भाग.

प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर एकूण नऊ इमारतींमध्ये मिळून साडेतीनशे सदनिका असे आमच्या कॉम्प्लेक्सचे स्वरूप असून त्या नऊ पैकी आजघडीला तयार झालेल्या दोन इमारतीत असलेल्या सगळ्या ८२ सदानिकांची विक्री झालेली असून त्यामध्ये ४८ कुटुंबे रहायला आलेली आहेत. उरलेले सदनिका धारक मुंबई, ठाणे, पुणे, पनवेल अशा विविध शहरांमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास असून अधून-मधून विकेंडला इथे येतात. दोन्ही सोसायटींची नोंदणी गेल्या वर्षीच झाली असून आधी झालेल्या मंथली मिटिंग्स पैकी दोन मिटिंग्सना उपस्थित राहिलो असल्याने बऱ्याच जणांशी तोंडओळख होती तसेच सर्व सभासदांचा व्हॉट्सॲप ग्रुप असल्याने काहीजणांशी थोडाफार संपर्क होता, तर तीन जणांशी चांगली मैत्रीही झालेली होती.

एकंदरीत सुरू असलेल्या चर्चेचे मुख्य विषय 'सर्व सभासदांना कॉम्प्लेक्सच्या बाहेर न पडता जीवनावश्यक वस्तू कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील?' व 'सोशल डिस्टंसिंगचे पालन करून मनोरंजनासाठी काय करता येईल?' हे होते.

भाजीपाल्याचा प्रश्न आदिवासी कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहाचे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अनिल सरांनी चुटकी सरशी सोडवला. आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करून वसतिगृहाला पुरवणाऱ्या पुरवठादाराला त्यांनी फोन करून विचारणा केली असता त्याने एक दिवसा आड सकाळी ९ ते १० ह्या वेळेत भाजीचा टेम्पो कॉम्प्लेक्स मध्ये आणून लावण्याचे आश्वासन दिले.

पोल्ट्री व्यावसायिक अमीर भाईंनी त्यांचा ग्राहक असलेल्या एका चिकन शॉप वाल्याकडून रोजच्या रोज ऑर्डर प्रमाणे चिकन आणून देण्याची व्यवस्था करून दिली.

मनोरंजनाच्या विषयावर बराच वेळ चर्चा झाली. क्लब हाऊस मध्ये चालणारे कॅरम आणि चेस असे खेळ सुरू ठेवावेत की नाही ह्यावर बराच खल झाल्यावर चेस खेळताना समोरा समोरच्या खेळाडूंमध्ये १ मीटर पेक्षा कमी अंतर रहात असल्याने त्याने सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होईल म्हणून चेस बंद करावा. तसेच कॅरम खेळताना चार जण असल्यास शेजारी बसलेल्या दोघांमध्ये अंतर कमी रहात असल्याने तो केवळ दोनच खेळाडूंनी खेळावा असे ठरले. बॅडमिंटन पण डबल्स न खेळता सिंगल्स खेळावे. तसेच हे दोन्ही खेळ एका वेळी एकाच घरात राहणाऱ्या दोन व्यक्तींनीच खेळावेत असे ठरल्यावर मीटिंग बरखास्त झाली.

दुसऱ्या दिवशी आम्हा दोघांनाही बरीच उशिरा जाग आली. आजपासून तात्यांचे हॉटेल बंद असल्याने नाश्ता पार्सल आणायला मी खाली उतरल्यावर मग आई, ताई आणि बायको अशा सर्वांशी फोनवर बोलून घेतले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे घरात डाळ तांदूळ वगैरेचा साठा किती आहे ते चेक करून मग साधारण महिनाभरासाठी किती सामान लागेल ह्याचा अंदाज बांधून तशी यादी तयार केली आणि त्याप्रमाणे आकाश सामान आणायला जाऊन ते घेऊन आला.

त्या दिवशी दुपारचे जेवण म्हणून मुगाच्या डाळीची खिचडी असा बनवायला साधा सोपा मेनू होता. मग लागोपाठ दोन साऊथ इंडियन डब्ड पिक्चर्स बघून झाल्यावर संध्याकाळी साडेसात पर्यंत क्लब हाऊस मध्ये कॅरम खेळलो. जवळपास दहा वर्षांनी स्ट्राइकर हातात घेतल्याने एक एक सोंगटी घालवताना दमछाक होत होती. त्या नंतर थोडावेळ कॉम्प्लेक्स मधल्या बाप्पाच्या देवळाच्या पायरीवर बसून वेळ घालवल्यावर रात्रीचे जेवण मात्र तात्यांच्या घरीच केले. अशा रीतीने पहिला दिवस तरी कंटाळा न येता पार पडला होता.
कॉम्प्लेक्स मधले बाप्पाचे देऊळ

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून चहापाणी करून सात वाजताच फार्म वर पोचलो. पाणी घालण्याचे काम तासाभरात आटपल्यावर तात्यांकडून नाश्ता पार्सल घेऊन घरी परतलो. मग दुपारच्या जेवणासाठी यू ट्यूब वर रेसिपी बघून जीरा राईस आणि दाल तडका बनवला. अंदाज चुकल्याने तो एवढा जास्ती बनला होता की आम्हाला तो रात्रीच्या जेवणालाही पुरला. बाकी दिवस कालच्या प्रमाणेच पिक्चर्स बघून आणि कॅरम खेळून व्यतीत केला.

तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुप वर मत्स्य प्रेमींसाठी खुशखबर आली होती. कोणातरी सभासदाच्या मित्राचा मत्स्य शेतीचा व्यवसाय होता. त्याने त्या मच्छी वाल्याला दिलेल्या आमंत्रणवरून तिलापिया जातीचे ज्यांना इथे फंटूश म्हणतात ते जीवंत मासे आणि कोळंबी विक्रीसाठी आणली होती. हा हा म्हणता त्याचे सर्व मासे संपले आणि त्यालाही सर्व मत्स्य प्रेमींनी सोमवार आणि गुरुवार सोडून रोज मासे आणायची गळ घातली. मग त्याचाही इथे राबता सुरू झाला.

कधी पेण मध्ये तर कधी आमच्या वरच्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या राहील भाईंशी माझी आधीपासूनच मैत्री झाली होती. पेण मध्ये फेमस असलेल्या हुसेन बिर्यानी हाऊस ह्या दुमजली हॉटेलचा हा मालक आता हॉटेल्स बंद करण्यात आल्याने इथल्या शांत वातावरणात लॉकडाऊनचा कालावधी व्यतीत करण्यासाठी चौथ्या दिवशी सह कुटुंब येऊन थडकला. त्याच्या घरी रोज सकाळच्या जेवणात फिश आणि रात्रीच्या जेवणात गावठी चिकन बनायचे. मी मासे खाणे तर लांबच राहिले शेजारी बसून जरी कोणी खात असेल तरी मला मळमळायला लागते हे त्याला माहीत असल्याने सकाळी नाही पण रोज रात्री माझ्यासाठी चिकन घेऊन यायचा. मला मांसाहार अगदीच वर्ज्य नसला तरी तो करण्याचे माझे प्रमाण अगदी अत्यल्प आहे. अशात चार रात्री गावठी चिकन खाल्ल्याने माझ्या शरीरात उष्णता वाढून मला तोंड आले. अक्षरक्ष: पाणी पितानाही तोंडाची आग आग होत होती. नशिबाने माझ्याजवळ गमेक्स ची बाटली होती. दिवसातून चार-पाच वेळा ते टाळ्याला लावल्याने मला खूप आराम मिळाला.

पाचव्या दिवशी पासून पेण मध्ये वडापाव आणि पॅटीस साठी सुप्रसिद्ध असलेल्या 'हरी' ने वडापाव आणि पॅटीसची आणि समर्थ चायनीज रेस्टॉरंट ने चायनीज फूडची होम डिलिव्हरी द्यायला सुरुवात केल्याचे शुभ वर्तमान समजले.
झाले मग रोज संध्याकाळी कोणासाठी काय मागवायचे ह्याची ग्रुपवर विचारणा होऊन सर्वांची एकत्रित ऑर्डर दिली जाऊ लागली. मेन गेटवर वॉचमनच्या केबिन मध्ये जाऊन प्रत्येकाने आपापले पैसे देऊन आपल्या नावाचे पार्सल घेऊन यायचे.

आठव्या दिवशी कॅरम आणि बॅडमिंटन खेळणे बंद करण्यात आले. त्यासाठी कारण ठरली वडखळ जवळील JSW ही कंपनी. महाराष्ट्रातील लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवून, लोखंडी पत्रे, सीमेंट अशा कुठल्याही जीवनावश्यक वस्तूंमध्ये न मोडणाऱ्या गोष्टींची निर्मिती करणारी ही कंपनी महाराष्ट्र सरकारच्या कृपेने सुरूच होती आणि आहे. सुरुवातीला कंपनीच्या कामगारांची ने -आण करणाऱ्या बसेस गावकऱ्यांनी काही ठिकाणी अडवण्याचे तसेच फोडण्याचे प्रकार घडल्यावर एस. टी. महामंडळाच्या बसेस त्यांच्या दिमतीला देण्यात आल्या. पनवेल, कळंबोली, उरण, पेण, अलिबाग, माणगाव अशा विविध ठिकाणांहून तेथे कामाला येणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्या कंपनीमुळे जर कोरोंना बाधितांची संख्या रायगड जिल्ह्यात आणि पर्यायाने महाराष्ट्रात वाढली तर त्याची संपूर्ण जवाबदारी जिल्हाधिकारी 'निधी चौधरी' आणि ह्या गंभीर प्रकरणात धृतराष्ट्र बनुन जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या महाराष्ट्र सरकारची आहे हे नमूद करून ठेवतो. आमच्या सोसायटी मधील दोन जण त्या कंपनीत कामाला असून त्यांनाही कामावर बोलावण्यात आले. लॉकडाऊनचा पहिला आठवडा ते बोलवूनही जात नव्हते पण नोकरी जाण्याच्या भयाने त्यांनी शेवटी जायला सुरुवात केली. आधी सोसायटी मधून कोणीच बाहेर जात नव्हते तो पर्यंत ठीक होते पण आता अशा बदललेल्या वातावरणात कोणताही धोका पत्करायला नको म्हणून सर्वांनी मिळून खेळणे बंद करण्याचा निर्णय घेतला.

खेळणे बंद झाल्यावर मग रोज रात्री थोडावेळ गार्डन मध्ये, जास्त जण असतील तर लॉन वर बसून आणि कमी जण असतील तर गझेबो मध्ये मस्त मैफिल रंगते. आधी तोंड ओळख असलेले सभासद आता ह्या महिन्या भराच्या कालावधीत एकमेकांशी फार छान कनेक्ट झाले आहेत. सोसायटी म्हणजे एक खूप मोठा परिवार असल्यासारखे वाटू लागले आहे. लॉकडाउन संपल्यावर घरी परत गेल्यावर खूप चुकल्या चुकल्या सारखे वाटेल हे नक्की !

ह्याच प्रकारे एक दिवसा आड फार्मवर जाऊन झाडांना पाणी घालणे शक्यतो एक वेळचे जेवण आणि एक दिवसा आड नाश्ता साठी यू ट्यूब वर रेसिपीज बघून नवनवीन पदार्थ घरीच बनवायला सुरुवात केली. असे करत करत आता काही पदार्थ छान बनवता येऊ लागलेत. त्यात मिसळ, कांदे पोहे, कॉर्न खिचडी, दाल तडका, जीरा राईस, ढोकळा, अंडा मसाला, थालीपीठ, आणि इलेक्ट्रिक तंदूर मध्ये तंदूर रोटी आणि नान अशा पदार्थांचा समावेश आहे. लॉकडाउन संपेपर्यंत आणखीन काही नवीन पदार्थ बनवण्यास शिकण्याचा मानस आहे.

आकाश त्याच्या आई वडलांपासून दूर आणि मी माझे आई वडील आणि बायको पासून दूर असल्याची एक खंत, २ एप्रिलला असलेला आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि परवाच झालेला बायकोचा वाढदिवस हे दोन्ही साजरे करायला आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र नव्हतो ही रुखरुख सोडली तर फार्म वरची कामे, पिक्चर्स बघणे, जेवण नाश्ता बनवणे आणि भरपूर झोपा काढणे, सोसायटीच्या मागे असलेल्या रानात जाऊन आंबे तोडणे अशा सगळ्या गोष्टीत अजिबात कंटाळा न येता दिवस कसे पटापट चाललेत ते समजतच नाहीये.

गेल्या काही महिन्यात मिपावर प्रकाशित झालेले कित्येक दर्जेदार धागे तसेच ह्या लॉकडाउन मालिकेतील आधीचे एकतीस धागेही वाचता आले नाहीयेत , त्यांवर प्रतिसाद देता आले नाहीयेत ह्याचीही खंत आहेच. ते सर्व वाचण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. हा लेख लिहिण्यासाठी प्रशांतने बऱ्यापैकी आधी कल्पना देऊन मुबलक वेळ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार आणि जगावर आलेले हे COVID-19 नावाचे संकट लवकरात लवकर टळो ही ईश्वरचरणी प्रार्थना !

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

25 Apr 2020 - 3:45 pm | कुमार१

सुरेख वृत्तांत.
फळशेती सुंदर आहे. ती लगडलेली फळे मोहात पाडताहेत ! त्यांचा सुवास फोटोतून पोचलाय !
शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Apr 2020 - 4:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण चांगले झालात हे वाचून बरं वाटलं, दवाखान्याचा तपशीलही उत्तम लिहिला आहे. दवाखान्यातले प्रसंग आवडले असे म्हणता येत नाही. प्रचंड दु:खी चेहर्‍यांच्या त्या परिसरात साला आपला जीव गुदमरुन जातो. पहिली अट म्हणजे गंभीर राहावे लागते. साला माझा स्वभाव असे वातावरण फार काळ सहन करु शकत नाही. बाकी वृत्तांत तपशीलवार लिहिलाय आवडला. फळबाग भारी. पेरुच्या फोटोपर्यंतचा भाग वाचला. बाकीचं नंतर वाचतो. बाकी, नव्या लेखनाला क्लिकवण्यापूर्वी कैरीचा फोटो पाहिला. कैरी कापून मिठासोबत कशा लागतील या कल्पनेने तोपासू.

-दिलीप बिरुटे

ज्योति अळवणी's picture

25 Apr 2020 - 4:52 pm | ज्योति अळवणी

वा!

मस्त लिहिलंय. मजा आली वाचायला. पुढील पावसाळ्यात आलं पाहिजे बुवा तुमचा फार्म बघायला. यावेळच काही खरं नाही. लादलेलं बॅचलर life मस्त enjoy करा

ज्योति अळवणी's picture

25 Apr 2020 - 4:52 pm | ज्योति अळवणी

वा!

मस्त लिहिलंय. मजा आली वाचायला. पुढील पावसाळ्यात आलं पाहिजे बुवा तुमचा फार्म बघायला. यावेळच काही खरं नाही. लादलेलं बॅचलर life मस्त enjoy करा

प्रचेतस's picture

25 Apr 2020 - 5:25 pm | प्रचेतस

विस्तृत आणि तपशीलवार लेख. तब्येतीची काळजी घ्या. लॉकडाऊनमुळे वेगळं राहायला लागलं, अडकून पडलात तरी सुखरूप आहात हे महत्वाचे, हेही दिवस जातील. तुमचा फार्म बघायला आवडेल.

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2020 - 5:48 pm | संजय क्षीरसागर

लिहायला घेतलेला लेख, आज संपवलात असं वाटलं !

जेम्स वांड's picture

25 Apr 2020 - 6:06 pm | जेम्स वांड

खास संजयजी "टर्मिनेटर" भावे स्टाईल लेखन आवडले बरंका फर्मास एकदम!. जोरदार वाटलं एकदम, तुमचं हॉस्पिटलमध्ये असण्याचा अनुभवही हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचे तर विशेष कौतुक वाटते. मणके अन पाठीचे दुखणे एकंदरीतच विचित्र फार, थोडी काळजी घ्या, लवकर बरे व्हा मग इजिप्त सारखं अजून एखादं सीमोल्लंघन लवकरच काढा ह्या शुभेच्छा.

चौथा कोनाडा's picture

25 Apr 2020 - 8:07 pm | चौथा कोनाडा

हॉस्पिटल आणि व्हील चेअरचा किस्सा भारी !
सगळे फोटो आवडले !

टर्मिनेटर आजारी हे मला अभ्या.. कडून मागेच कळले.
लेख आणि फार्महौस आवडले. पण पेणमधले घर ते बाग जवळ आहेत का? कसे जाता?

सरनौबत's picture

25 Apr 2020 - 9:44 pm | सरनौबत

वेलकम बॅक! मस्त लिहिलंय. मजा आली तुमचे अनुभव वाचून

गणेशा's picture

26 Apr 2020 - 9:14 am | गणेशा

छान लिहिले आहे...
आज सगळे धागे वाचायला काढलेत 31, 30, 29, 28
नेमका हा धागा दिसलाच नव्हता

लिहीत रहा.. वाचत आहे.

लावलेली झाडे पाहून जास्त मस्त वाटले..

हा एकटाच धागा जनातलं मनातलं या विभागात आहे, बाकीचे काथ्याकूट मध्ये असल्याने हा मिस झाला होता वाचायला आज

@ कुमार१ , प्रा.डॉ.दिलीप बिरुटे , ज्योति अळवणी
आपल्या प्रतिसादांसाठी मनःपुर्वक आभार!

@ कुमार१ :- आपल्या शुभेच्छा, आजारपणाच्या काळात नियमितपणे संपर्कात राहून, माझे रिपोर्टस तपासून तुम्ही दिलेली माहिती आणि बहुमोल सल्ल्यांबद्दल आपले विशेष आभार.

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे :-

साला माझा स्वभाव असे वातावरण फार काळ सहन करु शकत नाही.

अगदी खरं आहे, आपला आजार कितीही किरकोळ असला तरी तिथले ते गंभीर वातावरण, औषधांचा एकत्रितपणे येणारा तो टिपिकल वास ह्यामुळे मनावर एक प्रकारच्या उदासीचा थर जमा होतो.

@ ज्योति अळवणी

पुढील पावसाळ्यात आलं पाहिजे बुवा तुमचा फार्म बघायला.

जरूर या! तुमचे स्वागत आहे..

मी पण येईल.. असेही लॉकडाऊन उठल्यावर सायकलवर पाली, आणि मग सुधागड ट्रेक करायाचे मनात आहे..
तेंव्हा नक्कीच तुमच्या कडे यायला आवडेल...

टर्मीनेटर's picture

26 Apr 2020 - 11:39 am | टर्मीनेटर

@ गणेशा
आपल्या प्रतिसादासाठी मनःपुर्वक आभार!
जरूर या! तुमचेही स्वागत आहे.

@ प्रचेतस , संजय क्षीरसागर , जेम्स वांड
आपल्या प्रतिसादांसाठी मनःपुर्वक आभार!

@ प्रचेतस:-

तुमचा फार्म बघायला आवडेल.

जरूर या! तुमचे स्वागत आहे..

@ संजय क्षीरसागर:-

लॉकडाऊन सुरु झाल्यावर लिहायला घेतलेला लेख, आज संपवलात असं वाटलं !

हो, तसंच काहीसं झालंय 😀

@ जेम्स वांड:-

थोडी काळजी घ्या, लवकर बरे व्हा मग इजिप्त सारखं अजून एखादं सीमोल्लंघन लवकरच काढा ह्या शुभेच्छा.

आपला आपुलकीचा प्रतिसाद आणि शुभेच्छांसाठी मनःपुर्वक आभार!

टर्मीनेटर's picture

26 Apr 2020 - 11:35 am | टर्मीनेटर

@ चौथा कोनाडा , कंजूस , सरनौबत
आपल्या प्रतिसादांसाठी मनःपुर्वक आभार!

@ चौथा कोनाडा:-

सगळे फोटो आवडले !

धन्यवाद! 🙏

@ कंजूस:-

पेणमधले घर ते बाग जवळ आहेत का? कसे जाता?

घर आणि फार्म मध्ये अडीच किलोमीटरचे अंतर आहे. सहसा बाईक वरूनच जातो पण काही सामानाची ने-आण करायची असल्यास कार चा वापर करतो.

@ सरनौबत:-

वेलकम बॅक! मस्त लिहिलंय. मजा आली तुमचे अनुभव वाचून

आभारी आहे! 🙏

MipaPremiYogesh's picture

26 Apr 2020 - 3:21 pm | MipaPremiYogesh

वाह संजयजी एकदम सविस्तर वृतांत. काळजी घ्यावी, एकदम मस्त आहे तुमचे फार्म, मिपाकट्टा करू एकदा..

टर्मीनेटर's picture

28 Apr 2020 - 11:42 am | टर्मीनेटर

मिपाकट्टा करू एकदा..

कल्पना आवडली! मी तयार आहे त्यासाठी 👍

Nitin Palkar's picture

26 Apr 2020 - 9:28 pm | Nitin Palkar

तुमची वर्णन शैली अतिशय चित्रदर्शी आहे. लेख आवडला.

टर्मीनेटर's picture

28 Apr 2020 - 11:44 am | टर्मीनेटर

आपले मन:पूर्वक आभार!

वामन देशमुख's picture

28 Apr 2020 - 12:53 pm | वामन देशमुख

लेख त्या दिवशीच वाचला होता पण प्रतिसाद द्यायला थोडासा उशीर झाला. सविस्तर वृत्तांत आवडला. फोटोंमुळं वाचायला मजा आली.

BTW,
टर्मिनेटर हे तुमचं सदस्यनाम, मी (आणि आमच्या दोघीही) अर्णीअंकलचा आणि टर्मिनेटर फ्रॅन्चाइसीचा पंखा असल्यामुळं मला आवडतं.

जॉन कॉनर आणि सारा कॉनरचा उल्लेख झाल्याशिवाय आमच्या घरी दिवस मावळत नाही. सध्या लॉक डाउन असल्यामुळं तर जजमेंट डे, राइज ऑफ द मशिन्स आणि इतर भागांचा रतीब सुरु असतो. रॉबर्ट पॅट्रिक आणि क्रिस्टेना लॉकेनच्या नकला तर नेहमीच सुरु असतात.

टर्मीनेटर's picture

29 Apr 2020 - 1:59 pm | टर्मीनेटर

@ वामन देशमुख
प्रतिसादासाठी आपले मन:पूर्वक आभार!
तुमच्या प्रमाणेच मी देखील अर्णीअंकलचा आणि टर्मिनेटर फ्रॅन्चाइसीचा पंखा आहेच, पण अजूनही सिरिज मधला सहावा "Terminator: Dark Fate" बघायचा राहून गेला आहे.

जॉन कॉनर आणि सारा कॉनरचा उल्लेख झाल्याशिवाय आमच्या घरी दिवस मावळत नाही. सध्या लॉक डाउन असल्यामुळं तर जजमेंट डे, राइज ऑफ द मशिन्स आणि इतर भागांचा रतीब सुरु असतो. रॉबर्ट पॅट्रिक आणि क्रिस्टेना लॉकेनच्या नकला तर नेहमीच सुरु असतात.

हे फारच आवडले! लगे रहो!!

सौंदाळा's picture

29 Apr 2020 - 9:53 pm | सौंदाळा

टर्मिनेटर, लेख मस्तच झालाय.
लॉक डाऊन मूळे आता तुम्ही फडझाडासाठी ११०% वेळ देत असाल.
तुमच्या कष्टाचे "फळ" थोड्या दिवसातच तुम्हाला मिळो हीच इच्छा.
लवकर खणखणीत बरे व्हा आणि भरपूर लेख लिहा.

टर्मीनेटर's picture

6 May 2020 - 3:05 pm | टर्मीनेटर

@ सौंदाळा : आपल्या दिलसे प्रतिसदासाठी मन:पूर्वक आभार!