लॉकडाऊन : विसावा दिवस

सौंदाळा's picture
सौंदाळा in काथ्याकूट
13 Apr 2020 - 9:06 am
गाभा: 

लॉकडाऊन आता ३० एप्रिलपर्यंत वाढलाय.
जेव्हा १६ मार्चच्या आसपास पुण्यातल्या काही माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली तेव्हा त्यात आमची कंपनी नसल्याने आम्ही कंपनीला यथेच्छ शिव्या दिल्या. यथावकाश आमच्या कंपनीने पण ही परवानगी दिली ३१ मार्चपर्यंत (तेव्हा २१ दिवसाचे लॉकडाऊन जाहीर झालं नव्हतं) सुरुवातीचे काही दिवस मस्त गेले, रोज सकाळी ९.३० ते संध्याकाळी ७.३०/८ पर्यंत काम करायचं नंतर पत्ते, कॅरम, लुडो खेळायचं. घरी जेवायला पण मिसळ पाव, इडली सांबार, पुलाव वगैरे उत्तम बडदास्त होती. चार पाच दिवस झकास गेले.

काम/ उदयोगधंद्यांबद्दल थोडे :
मग हळू हळू परिस्थितीच्या वजनाची कल्पना सगळ्यांनाच आली. सुरुवातीचा उत्साहपण मावळून काळजीत रूपांतरित झाला होता. घरी काम करणाऱ्या दोन्ही बायकांना मार्चचा पगार देऊन सुट्टी दिली. ऑफिसचं काम तर जोरात होतंच. शेवटी बायको म्हणाली की ऑफिस असतं तर बरं झालं असतं ऑफिसपेक्षा जास्त काम करतोयस तू घरून. खरच मी ज्यावेळी ऑफिसला निघायचो त्यावेळी काम चालू करतो आणि ज्या वेळी घरी यायचो त्यावेळी बंद. दीड तास तर असाच वाढला. दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये अर्धा पाऊण तास चकाट्या मारायचो. आता १५,२० मिनिटात जेवण आटपलं की बॅक टू वर्क. खरच सांगतो आमच्या टीमचे काम तर जोरात चालू आहे आधीपेक्षा. रिझल्ट पण तेच म्हणतायत. पण मला एक वाटतं या लॉक डाऊन मूळे भविष्यात एक होईल की पीपल मॅनेजरची खरोखर किती गरज आहे यावर प्रश्नचिन्ह उभे राहील. आता हाकायला मेंढरच नाहीत तर मेंढपाळ करणार काय? आमच्याकडे १४-१५ मेंढरांवर १ मेंढपाळ आहे, माझ्यामते मेंढपाळांचे हे प्रमाण खूपच जास्त आहे आणि हे कमीत कमी ५० पर्यंत तरी जायला पाहिजे. असो.

चाकण MIDC मधल्या दोन मित्रांना फोन केले, दोघांचे वर्कशॉप आहेत. कामगारांना मार्चचा पूर्ण पगार देऊन सुट्टी दिली आहे, एप्रिलचं माहीत नाही. भोसरी, तळेगाव, चाकण येथल्या उत्पादन कंपन्यांना खूपच फटका बसलाय. आमच्या कंपनीचा मालक म्हणतोय कोरोना ही आपल्यासाठी इष्टापत्ती ठरेल. सगळ्या पाश्चात्य देशानी प्रोडक्शन, सप्लायसाठी चीनवर अवलंबून राहून मोठी चूक केली आहे ती त्यांना आता उमगेल आणि परत उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण होईल. याचा आपल्याला फायदाच होईल. पुढे ४/५ दिवसातच बातमी आली की जपान चीनमधले प्रोडक्शन बंद करण्यासाठी त्यांच्या कंपन्यांना पैसा पुरवणार. थोडा हुरूप आला बातमी वाचून. याचे खरच दुरोगामी परिणाम होणार आहेत, काय होईल देव जाणे.

सोसायटीबद्दल थोडे :
पेपरवाले, दुधवाले गेटवर वॉचमन केबिनजवळ पेपर, दूध ठेऊन जातात, लोक त्यांच्या सवडीने घेऊन जातात. शेजारची फॅमिली मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात परदेशातून आली. हातावर शिक्के होतेच पण ते अतिशय जबाबदारपणे वागले. टेरेसमध्येसुद्धा दिसले नाहीत. सोसायटीमधल्याच एका दुकानदाराला सांगून त्यांना भाजीपाला, किराणा सोसायटी गेटपर्यंत मिळत होता. तिकडून सोसायटी सदस्य त्यांच्या दरवाज्यात आणून ठेवायचे. त्यांनी १४ दिवसाचा विलगिकरण अवधी यशस्वीपणे पूर्ण केला. यानंतर दोन दिवसातच महापालिकेला त्यांच्या परदेश प्रवासाची माहिती मिळाली, आरोग्य विभागाचे लोक आले त्यांना सांगूनसुध्दा त्यांनी ऐकले नाही आणि परत या फॅमिलीवर १४ दिवसांचा वनवास लादून गेले. तोसुद्धा आता संपला.

वरच्या मजल्यावरील एका ७४ वर्षांच्या आजोबांना पोटात दुखायला लागले अचानक. टेस्ट केल्यावर पोटात गाठ आहे समजले आणि मागच्या आठवड्यात पुण्यातील प्रथितयश सर्जनने शस्त्रक्रिया करून गाठ काढली, गाठ पहिल्या टप्प्यातील कर्करोगाचीच होती. आजोबांचा मुलगा घरीच असल्याने सर्व गोष्टी पटापट झाल्या. आजोबा घरी आलेसुद्धा. कोरोना नसता तर टेस्ट आज करू, उद्या करू झाले असते आणि रोग कदाचित बळावला असता पण सर्वजण घरी, प्रथितयश सर्जन सुद्धा ताबडतोब उपलब्ध होते. ( इतरवेळी किमान आठवडा लागला असता).
बिल्डींगचा कचरा नेणाऱ्या मावशी रोज येतात. १ एप्रिलला आधीच ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी त्यांना बोनस म्हणून काही रक्कम दिली, समाधान दिसले बाईंच्या चेहऱ्यावर.

घरातले रहाटगाडगे :
आई बाबांचा मॉर्निंग वॉक बंद आहे, घरातल्या घरात सकाळी/संध्याकाळी फिरतात. भाजी, किराणा सध्या बिग बास्केटवरून चालू आहे. पण त्याचे डिलिव्हरी स्लॉट फुल्ल असतात. रात्री बिग बास्केटशी कुस्ती खेळल्यावर कधी कधी मिळतात. स्लॉट मिळाला की आनंद; काय सालं आयुष्य आहे. भाजी बरी असते, २/३ वेळा फळं पण मागवली होती, ठीक होती. फक्त एक दिवसाआड दूध आणायला कधी मी कधी बायको जाते.

मुलीच्या शाळेतल्या शिक्षकांचे गुगल ड्राइव्हवर व्हिडीओ, वर्कशीट येतात त्याप्रमाणे बायको तिचा अभ्यास करून घेते. बायकोने स्वतः मात्र ऑनलाइन कोर्सेसचा धडाका लावलाय. सिक्युरिटी, AI, ML, पायथॉन एक ना दोन. तिचा कॉलेजचा अभ्यासक्रम लॉकडाऊन नंतर २/३ दिवसातच शिकवून संपला. झूम लेक्चर्स झिंदाबाद. आमच्या इंजिनीअरिंगच्या ग्रुपवर पण सरांकडे चौकशी केली ते पण म्हणाले झूमवर लेक्चर्स चालू आहेत, उपस्थिती ४०/५०% बरीच मुलं गावी गेली तिकडे डेटा स्पीड नाही म्हणून ती जॉईनच करत नाहीत. परीक्षा कधी, शेवटच्या वर्षाच्या मुलांचे कॅम्पस प्लेसमेंटचे काय होणार? माहीत नाही अजून तरी.

काम झाल्यावर घरी सगळे मिळून जुने फोटो बघत बसतो. टीव्हीला १ टीबीची हार्डडिस्क लावलेली आहे आणि कारभारणीने फोटोंचे एकदम पद्धतशीर वर्गीकरण केले आहे त्यामुळे मजा येते बघायला, अगदी पुरवून पुरवून बघतोय आणि सर्व मिळून ते प्रसंग परत जगतोय. पोपिलोन वाचताना तुरुंगात तोदेखील एकांतवासात असेच करत असे हे वाचलेलं आठवलं आणि तसंच कधी काळी आपल्याला करायला लागेल असं वाटलं नव्हतं. रात्री मेंढीकोट, ३०४, ५/३/२, बदाम सत्ती वगैरे. ९ ला रामायण आहेच. आमची आजी मात्र खुश आहे, वय ९० असल्याने ती तशी पण बाहेर पडत नव्हतीच पण आता सगळे घरी असल्याने गप्पाटप्पाना आलेला ऊत, पत्ते मधे मधे चहाची आवर्तनं आणि बरोबर धुडगूस घालायला ४ वर्षांचा पणतू; या वयातही बदाम सत्ती खेळताना कुठले पान अडवायचे, ५/३/२ ला कोणती पाने आहेत, कोणती ऑलरेडी गेली सगळं लक्षात. म्हातारी खुश आहे एकदम.

यु ट्यूब वरून बरीच नाटकं पण डाऊनलोड केली आहेत, ती बघण्यात पण वेळ छान जातो. मात्र नाटक लाईव्ह बघताना जिथे गडगडाटी हास्य येतं तिकडे घरात बघताना फक्त खिक्क होतं. चलता है, इतका फरक तर पडणारच. शनिवार, रविवारी तर संध्याकाळी मिटिंग्ज सेट झालेल्या असतात. कधी वडिलांच्या बाजूचे नातेवाईक, कधी आई, कधी बायको तर कधी आजीच्या माहेरचे नातेवाईक यांचे व्हिडीओ कॉल असतात. व्हाट्सएप व्हिडिओ कॉलला ४ जणांचे लिमिटेशन आहे म्हणून गुगल ड्युओ, झूम चालू केलं. अर्धा / एक तास कसा जातो समजतच नाही.

किचनमध्ये थोडं :
तसा मी किचनमध्ये असतो बरं का पण शक्यतो नॉन व्हेज करायलाच. व्हेज स्वतःहुन करायला ती झिंगच येत नाही तर काय करू? मागच्या १५/२० दिवसात मी व्हेज बिर्यानी, रगडा पॅटिस मधले पॅटिस, पास्ता (मॅक्रोनी- वल्लीबुवा झिंदाबाद) आणि पाडव्याला पायनाप्पल शिरा केला होता घरच्यांच्या एकंदर रिस्पॉन्सवरून सर्व पदार्थ बरे झाले असावेत.

पण मंडळी, घरी यंदा मत्स्य दुष्काळ झाला हो. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च दणकून मासे हादडतो. यंदा जानेवारीत घरात आजारपणामुळे मासे झालेच नाहीत. फेब्रुवारीत तीन चारदा खेकडे, सुरमई, करली, कोळंबी झाली. मार्चपासून सगळं बंद. खापी, मुडदूसे, बांगडूले, माकुळ, सौंदाळे, तिसऱ्या काही तोंडाला लागलेच नाही. चिकन/ मटण उपलब्ध आहे ऑनलाइन (धन्यवाद केडी भाऊ) पण आई, बायको आणून देत नाहीत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मंडईत शेवटची फेरी झाली होती तेव्हा येता येता सोड्याचा भाव विचारला होता, दिघीचे सोडे रुपये सातशे फक्त पाव किलो होते (मागच्या वर्षीच्या जवळ जवळ दुप्पट महाग) म्हणून घेतले नाहीत नंतर बघू म्हणून. आता घरकारीण येता जाता म्हणतेय चिकन/ मटण नको पण सुकट असतं तर काही तरी तोंडीलावणं केलं असतं. दर रविवारी हा संवाद होतोय आणि माझ्या दुःखाला डागण्या मिळतायत. काही अट्टल बेवड्याना दारू न मिळाल्याने रुग्णालयात भरती केले अशी बातमी परवाच वाचली आणि हीच वेळ प्रदीर्घ काळ मासे न खाल्ल्याने माझ्यावर येऊ नये हीच प्रार्थना.

समारोप :
सध्या परिस्थितीला पुर्णपणे शरण गेलो आहे. सरकारच्या सर्व आदेशांचे पालन करत आहे. आई, बाबा, आजीचा रोजचा दिवस कसा जातो याचा अंदाज आला. लॉकडाऊनच्या आधी घरात वीकडेजमधे माझा संवाद जवळपास नसायचाच याची पण जाणीव झाली.

मिपाही खूप आधार देत आहे या काळात. आपल्याबरोबर कोणतरी गप्पा मारायला आहे असं वाटत राहतं. मी रोज सकाळी मिपावरील नवे लेखन आणि रात्री शेवटच्या पानापासून मागे मागे वाचत येतोय. (अभ्यास वाढवतोय) मिपाच्या स्थापनेपासूनचे लेख वाचायला मज्जा येतेय खूप.
हा आयुष्याला लागलेला कोरोनाचा फिल्टर जेव्हा निघेल त्यावेळी या फिल्टरमधून झिरपलेले चार सुख-दुःखाचे क्षण जे अदरवाईज कधीच मिळाले नसते ते माझ्या पुढच्या जगण्यात सकारात्मक बदल घडवतील असाच माझा प्रयत्न असेल.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

13 Apr 2020 - 11:01 am | प्रचेतस

छान लिहिलंय एकदम. सध्या जवळपास प्रत्येकाचंच आयुष्य थोड्याफार फरकानं काहीसं असूच चालू आहे. पैसे मात्र बरेच वाचताहेत हल्ली :) पेट्रोल खर्च वाचतोय, बाहेरचं अनावश्यक खाणं वगैरे बंदच, स्विगी वगैरे चालू असलं तरी तिथून मागवायला धजावलं जात नाही. अनावश्यक खर्च जवळपास संपुष्टात आलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2020 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनावश्यक खर्च जवळपास संपुष्टात आलाय.

तुम्हा रेग्युलर बसणारे उठणारे यांचा खर्च बराच कमी झाला असेल याच्याशी सहमत आहे. आमचं कधी तरी हौशी मौजीचा मामला. :) (ह.घ्या)

बाय द वे, तरीही पहिल्यांदा पॉकेटात बरेच शिल्लक पैसे दिसत आहेत. मित्र-मैत्रीणी नाहीत, गप्पा नाहीत. घरुन गप्पा होतात पण त्या फार यांत्रिक गप्पा आहेत. लॉकडाऊनचा हाही इफेक्ट आहेच. काल चेस खेळायला येतो बोललात आणि आला नाहीत. अहो, हारजीत चालत राहते. आज व्यस्त असल्यामुळे मला जमणार नाही. मोबाईलवर गुगल कॅमेरे इन्स्टॉल करुन पानाफुलाचे फोटो काढायचे आणि आपणच भारी म्हणायचं आणि डिलिट करायचं. अवघड आहे लॉकडाऊन. ड्युटीवर असलो की सुटी पाहिजे, यव करु आणि त्यव करु असे म्हणायचो. सुटीची हौस झाली. धन्यवाद.

न दोस्त की, न दुश्मनो की रहगुजर में रहे
ये वक्त वो है कि हर शख्स अपने घर मे रहे.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

13 Apr 2020 - 12:21 pm | प्रचेतस

=))

काहीही हं सर.

आज वेळ काढा जमल्यास खेळायला.

कंजूस's picture

13 Apr 2020 - 11:04 am | कंजूस

छान.
बहुतेक मुंबईत गेटवे कट्ट्याला भेट झाली होती. सौंदाळा नाव का ठेवले हे विचारले होते ते आठवले. या नावाचा मासा असतो हे तेव्हा कळले. पण खाऱ्या पाण्यातले मासे पुण्यात मिळतात का?

प्रचेतस's picture

13 Apr 2020 - 11:32 am | प्रचेतस

मिळतात ते बर्फाच्या क्रेट्समधून आलेले, ताजे मिळतच नाहीत. ते तर खुद्द मुंबैत देखील मिळत असतील का नाही शंकाच आहे.

सौंदाळा's picture

13 Apr 2020 - 10:06 pm | सौंदाळा

बरोबर काका,
गेट वे कट्ट्यानंतर मिपावर निद्रिस्त अवस्थेत होतो, मात्र सर्व लेख वाचत असायचो. 4 वर्षांपूर्वी दुर्बीण घेतली होती तेव्हा पण तुम्ही मार्गदर्शन केले होते. लॉकडाऊनमूळे परत मिपावर आलो, आता सक्रिय राहण्याचा प्रयत्न करेन.

पिवळा डांबिस's picture

14 Apr 2020 - 3:38 am | पिवळा डांबिस

तू सौंदाळो असान पुण्यात रवतंस म्हणजे तां पण एका प्रकारचा 'लॉक-डाऊन' च की रे!!!
:)

सौंदाळा's picture

14 Apr 2020 - 7:51 pm | सौंदाळा

काय करणार काका आता,
क्रेट मधलेच मासे नशिबात आहेत ते पण आता बंद झाले.
अवांतर: ते तुमच्या जॉर्ज कॉल्डवेलशी बोलून कोरोनाला मारायला डेंजरस रेणू बनवा की एखादा.
बाकी तिकडे पश्चिम किनाऱ्यावर मासे मिळतायत का?
(डांबिस काकांचा मत्स्याहारी पुतण्या) - बर्फातला सौंदाळा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2020 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज सकाळी डोळे उघडल्याबरोबर मोबाईल उघडून तुमचा लेख वाचला. आवडला म्हणून प लॅपटॉप उघडून प्रतिसाद लिहायला बसलो की दोनदा लाईट गेली. लॅपटॉपच्या बॅट्रीत प्रॉब्लेम असल्यामुळे शुन्य सेकंदाचाही बॅकप नसतो. नंटर वाट्सॅपवर प्राध्यापकांच्या गृपवर परिक्षा आणि मा. कुलगुरुंशी संघटनेचे पदाधिकारी आज ऑनलाईन संवाद साधणार त्या काही मुद्द्यांवर वाट्सॅपवर दळण दळलं.

बाकी, लेखन वाचलं अतिशय मनातलं लॉकडाऊनच्या काळातलं अतिशय तरल चित्र म्हणून तुमचं लेखन वाटलं आणि आवडलं. जवळपास अनेकांच्या घरातला अनुभव तुम्ही अतिशय सुरेख मांडला आहे. आमच्याही घरातलं साधारणतः चित्र असंच असतं. भाजी काय करावी या विषयावर आमच्या कानावर आदळतील असा संवाद चाललेला असतो. पण इग्नोर हा गुण मिपावर आलेला असल्यामुळे तिकडे लक्ष देत नाही. मुलं कॅरम,चेस, आणि वाटलंच तर पुस्तकं उघडतात. अभ्यास करा म्हणून मागे लागत नाही.

काल प्लेष्टोरवरुन एक अ‍ॅप डालो करुन आपल्या देशातून-देशावरुन कोणकोणत्या देशाची विमाने कुठून कुठे जात आहेत किती जातात, काय नावं आहेत हा खेळ खेळत बसलो. आता ते अ‍ॅप कोणतं. (सर्च करुन शोधायचं आयतं कोणालाही काहीही मिळणार नाही) नंतर ट्वीटरवर नेत्या मंडळीची ट्वीटं वाचत बसलो. नंतर मेडीकल एजुकेशन अ‍ॅन्ड ड्र्ग्स डिपार्टमेंटचा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट्चा दरदिवशी येणारा रिपोर्ट्स वाचत बसतो. हे जे कोणी काम करीत आहे, ते व्यक्तीगत मला खूप आवडलं आहे. किती संख्या इतर देशात या आठवड्यात काय परिस्थिती होती. भारतात काय परिस्थिती आहे, हे पाहतांना आपल्याकडील रुग्ण संख्या कमी आहे हे पाहून बरं वाटतं असे म्हणावे लागते. आपल्याकडे टेष्ट कमी आहेत हे खरं असलं तरी अजून ही महामारी भारतात नियंत्रित आहे असे वाटते.

मुसलमान मराठी संतकवी हे रा.चि.ढेर्‍यांचं पुस्त्क वाचतोय सध्या. आणि सोबतीला सखे पावसात भिजतांना हे आत्माराम कुटे यांचं कवितेचं पुस्तक हातात आहे. नेहमीप्रमाणे मिपावर पडीक आहेच. स्वतःच ठरवलं होतं की लॉकडाऊनच्या प्रत्येक धाग्यात लिहित राहीन. उद्याच्या धाग्यानंतर मिपावरुन ब्रेक घेऊ असे वाटत आहे. (शक्य नै ते ) कृष्णासारखं एकाच गोष्टीत रमायचं नाही. गोकूळ सोडलं ते सोडलंच तसं. ;)

-दिलीप बिरुटे

नावातकायआहे's picture

13 Apr 2020 - 12:53 pm | नावातकायआहे

https://www.flightradar24.com/ टाईम पास...

नावातकायआहे's picture

13 Apr 2020 - 12:55 pm | नावातकायआहे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2020 - 1:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे पण मस्त आहे. आभार.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2020 - 12:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त टाईमपास आहे. आवडलं मला. आपल्या डो़क्यावरुन, गावावरुन कोणतं विमान जातंय हे बघायला मजा येतं.
टाईमपास आहे, आणि माहितीपूर्णही आहे.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

13 Apr 2020 - 1:08 pm | चौथा कोनाडा

भारी लिहिलंय !
सोसायटीतल्या आजोबांची शस्त्रक्रिया विनासायस पार पडली हे दिलासा देणारे !

ऑफिस असतं तर बरं झालं असतं ऑफिसपेक्षा जास्त काम करतोयस तू घरून.

असं माझ्याही काही मित्रांच झालंय !

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Apr 2020 - 1:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

सगळ्या आयटी वाल्यांची अवस्था इथुन तिथुन सारखीच आहे. त्यामुळे वाक्या वाक्याशी सहमत आहे.

मॅन्युफॅक्चरिंगवाले घरी बसुन वैतागलेत तर आयटी वाले घरी बसुन वेगळ्या तर्‍हेने वैतागलेत. क्लायंट फार्मा कंपनी असल्याने कामे थांबण्याची शक्यता नाहीच.जॉब चालु आहे याचे समाधान मानावे तर कामाच्या तासांचा काही हिशोबच राहिला नाहिये. शनिवार असो की रविवार, फोन वाजला की लाव कानाला. ५० जणांच्या टीम वर एक मुकादम असल्याने कुठे काय फाटलेय त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागतेय. त्यात सगळेच घरुन काम करत असल्याने प्रत्येकाशी फोनवर किवा चॅटवर बोलावे लागते. एकीकडे दिवसाला १००-१५० मेल कोसळत असतात. लोक सिंगापुर / युरोप/ युएस मध्ये पसरलेत त्यामुळे कोण कधी येतो जातो त्याप्रमाणे त्याला पकडावे लागते. रेग्युलर मीटीन्ग्मध्ये वाढ झाली आहे कारण ३ शिफ्ट्मध्ये लोक असल्याने सगळे एकत्र येउन रोजचे अपडेट शेअर करावे लागतात.
असो.
असो. कामाची सवय आहेच त्यामुळे तक्रार करण्याचे कारण नाही. फक्त या लॉक डाउन मुळे सगळे डी आर /बी.सी.पी (संकटकाळी वापरण्याचे पर्यायी प्लॅन) बोंबलले आहेत. कारण जगभर हीच परिस्थिती असल्याने पर्यायी प्लॅनच राहिलेला नाही.

लॉक डाउन उठला तरी यापुढे जवळ्पास सर्वच आयटी (आणि ईतरही) कंपन्यांचे वर्क मॉडेल नक्कीच बदलेल. आंतरदेशीय प्रवास कमी होतील, व्हिडिओ कॉन्फ्रन्सेस वाढतील, कामाचे स्वरुप बदलेल .कदाचित ५० ट्क्के स्टाफ कायम घरुनच काम करेल जेणेकरुन हजारो लोकांसाठी सुसज्ज कॅम्पस बाळगा, वीज,पाणी, कॅब, ए.सी. या सोयी करायची डोकेदुखी कमी होईल. पर्मनंट जॉब कॉट्रॅक्ट्मध्ये बदलतील. देशांतर्गत प्रॉडक्टस ने काम चालविण्यावर भर राहील (एका अर्थाने स्वदेशीचा मंत्र)

जगभरातील अर्थव्यवस्थेवर काय प रिणाम होतील हे येणारा काळच सांगु शकेल. अर्थात हे सर्व डोक्यात येणारे पर्याय किवा मित्रांशी बोलुन सुचलेल्या गोष्टी आहेत. ते १००% बरोबर असल्याचा दावा नाही.

शेवटी हे संकट लवकरात लवकर संपु देत अणि गाडी रुळावर येउदे हीच देवाकडे प्रार्थना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2020 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयटियन्स, शासकीय निमशासकीय कंपन्यातील कर्मचारी आणि त्यांच्या वेतनावर कामावर नोक-यांवर नक्कीच परिणाम होणार आहे. भविष्यकाळ कठीण असणार आहे. खरं तर या विषयावर कोणी तरी स्वतंत्र धागा काढ़ायला हवा.

अर्थशास्त्र विषयाचे किंवा या विषयातील तज्ञ माहिती सांगतीलच लॉकडाऊन नंतर सर्वच व्यवसाय पूर्वपदावर यायला बराच कालावधी लागेल.ग्रॉस व्हेल्यु एडेड ( GVA) चं खुप नुकसान झालेलं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईपर्यन्त बरेच नुकसान झालेलं असेल.

असंघटीत कामगारांसाठी शासन वटहुकुम काढ़णार अशी एक बातमी होती, खरं तर कमी जास्त फटका सर्वांना बसणार आहे पण शासनाच्या स्तरावर ज्या लाखो कामगारांची नोंदच नाही त्यांना काय उपयोग ?
आज जे लाखो लोक रस्त्याने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पायी चालत आहेत ते लोकं, तसेच महाराष्ट्र च्या सीमेवर सध्या अडवलेले 6.5 लाख मजूर, अडकून पडलेले काही लाख लोकं, त्यांच्या नोंदीच शासन दरबारी नाहीत, त्यांना सरकारच्या कायद्याचा लाभ मिळणार नाही.

माहिती नाही, भविष्यकाळाच्या नोंदी काय असतील त्या निमुटपणे साक्षीदार होऊत.

-दिलीप बिरुटे

" ज्यांच्या नोंदी सरकारी नाहीत त्यांना सरकारची मदत कशी मिळणार.. "अगदी योग्य मुद्दा
म्हणूनच गेल्या काही वर्षात जे अति लघु उद्योगांचे नोंदणीकरण, छोटी उद्योगांचे डिजिटाईझशन / बँकिंग झाले आहे ते पुढे उपयोगी पडेल...
दुर्दैवाने काही पक्ष याला केवळ विरोधासाठी विरोध करतात आणि समाजाचे नुकसान करतात
"देटा / माहिती" जमा करणे, त्याची छाननी करणे आणि वापर करणे याचाच सदुपयोग पण होऊ शकतो...फेसबुक सारखे दुरुपयोग करताना हि सापडले हे हि खरे किंवा अति टोकाचं भांडवशाहीत याला पण "व्यक्तिस्वातंत्र्यवर गदा" म्हणून विरोध होतो हे हि दुर्दैव

एक समाजनिक स्वास्थ्याचे अनुभव देतो.. पूर्वी एकदा मित्राला फुफुसाचा काही रोग झाला होता जो मोठ्या एअर कोंडिशन टॉवर मधून होऊ शकतो ...तो ज्या देशात राहत होता तिथे अशी यंत्रणा होती कि पॅथॉलॉजि चे जे निकाल आहेत ते एकतर आपोआप त्याच्या डॉक्टर कडे जायचेच पण जर काही ठराविक रोंगसंबंधी काही ठराविक पातळी पेक्षा जास्त आढळून आले तर ते सरकार ला पण कळायचे...आणि मग त्याला दोन्ही सरकार कडून आणि त्याचं डॉक्टर कडून फोन आले कि लवकर येऊन भेटा
हे "डेटा मॅचिंग " मुळे शक्य झाले, डॉक्टर आणि पॅथॉलाजी हे दोन्ही खाजगी व्य्वव्यास पण त्यांन्चि सरकार यंत्रणेशी जोडणी अशी कि अश्या प्रसांगी "समाजस्वास्थ्य" साठी सरकार चे नियंत्रण पण

असंघटित कामगारांसाठी शासन कशा प्रकारे न्याय देऊ शकते ? ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2020 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बातमीत असं म्हटलं होतं की, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यवसायविषयक आरोग्य या सर्वांचे मिळून एकच कायदा करायचा. आता या कायद्यात जसे की इतर वेळी संघटीत असणार्‍या कामगारांना तात्पुरते कामावरुन काढले (ले ऑफ) तरी सर्वप्रकारची कायदेशीर देणी द्यावी लागते. परंतु ९० टक्के कामगार हे असंघटीत क्षेत्रातले आहेत ते कामगार सामाजिक सुरक्षितता कायद्यात येत नाहीत. आता जर कोरोनामुळे कामगार कपात होऊ नये म्हणून आणि असे झाल्यास असंतोष निर्माण होऊ शकतो म्हणून असे पाऊल सरकारला उचलावे लागत आहे. असंघटीत कामगारांना त्यांचे पूर्ण वेतन देऊन किंवा इतर ठिकाणी जशी कामागाराची सुरक्षितता जपल्या जाते तशी नियमानुसार सुरक्षितता झाल्याशिवाय अशा कामगारांना तुम्हाला काढता येणार नाही म्हणून सामाजिक सुरक्षा वटहुकुम काढण्याच्या विचारात सरकार आहे, असे बातमीत म्हटलेले होते.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

13 Apr 2020 - 2:40 pm | चौकटराजा

खरे तर वाढते यांत्रिकीकरण व कामासाठी हातांची गरज यावर फार पूर्वीपासून समाजातील विचारवंत विचार करीत आहेत . 1957 साली आलेला चित्रपट टांगा विरूद्ध बस याच्यावर भाष्य करतो. याउलट अशीही मांडणी केली जाते की ... ज्याने पोट दिले आहे त्याला घासाची काळजी असतेच. आणखी एक द्रुष्टीकोन असा की माणसे नवनवीन क्षमता अंगी बाणतील. आणखी एक बाब अशी की आजही लोक सुशिक्षित असले तरी दोन मुलाना जन्म देतातच सबब लोकसंख्या वाढतच रहाणार व मागणी कमी होणार नाही. तेंव्हा जे काही लोक उद्याचे जे भेसूर चित्र रंगवितात तो त्यांच्या मनाचा प्रोब्लेम आहे . जागतिक अर्थ्व्यवस्थेचा नाही. 1957 साली आलेला नयादौर व आज फरक असा आहे की त्यावेळी टांगा व मोटर ही माणसाशिवाय चालूच शकत नाही इतपतच ज्ञान माणसाला होते. आज इस्तंबूल मधील एक आख्खी मेट्रो लाईन चालकाशिवाय वापरात आहे अगदी यशस्वीपणे. युरोपात अनिक बसेस मधे कंडक्टर नाही. अनेक मॉलमधे वॉचमेन नाहीत. उद्या ए आय ( क्रुत्रिम बुद्धीमतत्ता ) तंत्र विकसित झाले की सेवा क्षेत्रात व्यवस्थापकाची गरजच काय असा प्रश्न त्या कम्पनीचा कॉस्ट अकाउंटंन्सी विभाग उपस्थित करील. विडिओ कोंफरस म्हणेल तुम्ही केवळ चर्चेसाठी मुबई ते सिएटल प्रवास कशासाठी करताय ..? जे काम घरून माणूस करतो ते काम पी सी म्हणतील आम्ही परस्पर करतो की. 2030 पर्यंत याची धग अगदी कृषी सह सर्व क्षेत्राना जाणवेल .बोलाचीच कढी असलेले शिक्षण ,बॅन्किंग, विमा ही क्षेत्रे तर इतक्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल होतील की स्कूल बस ही इतिहास जमा करावी लागेल.

विडिओ कोंफरस म्हणेल तुम्ही केवळ चर्चेसाठी मुबई ते सिएटल प्रवास कशासाठी करताय ..?
यावरून एक चित्रपट आठवला.. कामासाठी सतत भ्रमंती करणाऱ्या वयक्तिरेखेवर आधारित... "अप इन द एअर " जॉर्ज क्लुनी

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Apr 2020 - 5:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

बँकिंग विमा क्षेत्रे तर आत्ताच काहीच्या कही डिजिटल झाली आहेत. कितीतरी म्युचुअल फंडच्या साईटवर प्रश्न टंकला की बहुतेक वेळा चॅट बॉट उत्तर देतो. आमच्या कंपनीतही टेक्निकल अणि काही प्रमाणात एच. आर/फायनान्स कामासाठी बॉट वापरात आहेत. अगदीच आडवा तिडवा प्रश्न विचारला तर चॅट माणसाकडे ट्रान्सफर केली जाते. ड्रायव्हर नसलेल्या कार्/मेट्रो फार लांब नाहीत. अर्टिफिशियल ईंटेलिजन्स, रोबोटिक्स, मशिन लर्निंग वगैरे परवा पर्यंत बझ वर्ड वाटत होते जे आज प्रत्यक्षात आले आहेत.
थोडक्यात १९ व्या शतकात झालेली औद्योगिक क्रांती, नंतरची कॉम्प्युटर क्रांती, मग ईंटरनेट्चा/माहीतीचा विस्फोट आणि आताची ही रोबोटिक क्रांती-- या सगळ्यांमुळे अनेक जॉब गेले/जातील अणि नवीन येतीलही, फक्त तो बदल आपण कसा अंगिकारतो ते बघायचे

चौकटराजा's picture

13 Apr 2020 - 6:52 pm | चौकटराजा

याविषयी खरे तर आमच्या सारखी म्हातारी माणसेच जास्त स्वतःचे डोके खात असतात . तरीही गम्भीरपणे यावर अनेक विडिओ मराठीत देखील आहेत . .तन्त्रज्ञानाच वेग माणसांच्या नवीन क्षमता स्वतः मधे आणण्याच्या वेगापेक्षा नेहमी जास्त असतो. कारण उत्तम ग्रहण शक्ती असलेले फार कमी असतात. बरेचसे पाठान्तर करून " घोका ओका" मधे प्रवीण असतात. काहीना जेमतेम ती ही बुद्धी असते. मग संशोधनाचे सोडाच ! माझ्या मते २१ वे शतक " प्रामुख्याने बायॉलॉजीचे असणार आहे. जे रोजगार फक्त सरावाने जमतात त्याना फारसे भवितव्य नाही. मात्र भावनिक पणे जे खर्च होतात त्याना मरण नाही. उदा. लग्नात फोटो अल्बम काढणे ,हनीमूनला जाणे. गणपती बसविणे. खन्डेनवमी. ई ई ई काही वानगीदाखल. अन्न वस्त्र निवारा ,वहातुक, सन्देश दळ्णवळण ,आरोग्य, सन्शोधन ( फक्त विज्ञान विषयक ) ,उर्जा, पाणी, वन सम्पत्ती याना मरण नाही !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2020 - 2:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

salary

-दिलीप बिरुटे

चीनमधला रोबोट टांगा बनवणारा माणूस दुसरीपर्यंतही ( तिकडची) शिकलेला नै!
(तो कोण ते आयतं शोधून देणार नाही. आपलेआपण फोनवर बोटं चेपायची किंवा "हे गूगल कोण रे तो? विचारायचं.)

अमचा फोन "हे गूगल" ऐकलं की लगेच जागा होतो आणि "शरद, वॉट क्यान आइ डू फोर यू?"
विचारतो.
"हाई, शरद, वॉट डु यु वॉन्ट?"उलट विचारतो तेव्हा ती बाय
" यू स्टोल माइ लाईन!!" वरडते.
आता गं बया!!

शेखरमोघे's picture

13 Apr 2020 - 7:47 pm | शेखरमोघे

ही आवाजी आज्ञेवर काम करणारी मन्डळी नको तेथे लुडबूड करू शकतात. मुलीकडे अमेरिकेत असताना हातातल्या ताज्या साप्तहिकातला या मन्डळीन्वरचा एक लेख (माझ्याच करता चहा करणार्‍या) माझ्या बायकोला वाचून दाखवत होतो - त्यात लिहिलेले वाचले - लबाडी करत शाळेतला मुलगा गृहपाठ आपण करण्याऐवजी विचारेल "Alexa, what is 6+9?". मी पुढे काही वाचण्याआधी खाडकन मागेच स्थित Alexa उत्तरली "Fifteen!!"

प्रशांत's picture

13 Apr 2020 - 4:00 pm | प्रशांत

छान लिहिलंय. थोड्याफार फरकानं काहीसं असूच चालू आहे.

MipaPremiYogesh's picture

13 Apr 2020 - 4:14 pm | MipaPremiYogesh

छान लिहिले आहे. How to connect harddisk to TV? Through HDMI Cable?

सतिश गावडे's picture

13 Apr 2020 - 8:20 pm | सतिश गावडे

हल्ली बहुतांश टीव्हीना युएसबी पोर्ट असते. टिव्हीला युएसबी पोर्ट असल्यास हार्ड डिस्क युएसबी पोर्टच्या माध्यमातून जोडू शकता. मात्र हार्ड डिस्कमधली गाणी वाजवायची किंवा चित्रफिती पाहायच्या किंवा इतर फाईल्स पाहायच्या असतील तर ते टिव्हीमध्ये ती क्षमता आहे की नाही यावर अवलंबून असते.

टिव्हीला युएसबी पोर्ट असेल तर पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क मधील गाणी वाजवता येतात. टिव्ही थोडा अधिक प्रगत असेल तर चित्रफितीही चालतात.

सामान्यतः मेमरी डीव्हाईस इतर उपकरणांना जोडण्यासाठी युएसबी पोर्ट वापरतात.

HDMI Cable चा उद्देश थोडा वेगळा आहे. जेव्हा तुम्हाला एका उपकरणाचा ऑडीओ/व्हिडीओ आऊटपुट दुसर्‍या उपकरणावर ऐकायचा असतो किंवा पाहायचा असतो तेव्हा स्ट्रीमींग करण्यासाठी एचडीएमआय वापरतात. उदा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर चा ऑडीओ/डिस्प्ले टिव्ही किंवा प्रोजेक्टरवर पाहणे, सेटटॉपबॉक्सचा सिग्नल टिव्हीला पाठवणे.

तुमचा प्रश्न नेमकेपणाने विचारलात तर नेमके उत्तर देता येईल. :)

सरांबरोबर बुद्धिबळाचे २ डाव लावता आले. दोन्ही जिंकता आले, काल मात्र गुल्लूदादाबरोबर हरलो.

window.addEventListener("message",e=>{e.data&&"6603264"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});

window.addEventListener("message",e=>{e.data&&"6603268"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2020 - 4:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज सकाळी राशीभविष्य वाचलं होतं त्यात लिहिलं होतं की जवळच्या माणसापासून मनस्ताप. डावा डोळाही दिवसभर फडफडत होता. दोनचार वेळी घराच्या आवारात मांजर आडवं गेलं होतं. आज पुस्तकं लावत होतो तेव्हा पालही अंगावर पडली होती, तेव्हाच ठरवलं होतं की आज वल्लीने आपल्याला बुद्धीबळ खेळायचं आव्हान दिलं तरी इग्नोर करायचं. लाडीगोडीला भुलायचं नाही. पण रामायण मालिकेत जसं रावणाला भलं बुरं काही कळत नव्हतं तसंच माझं झालं आणि मी वल्लीच आव्हान स्वीकारलं.

पहिल्या डावात फार सहज हरलो, तिथे तुमचा फूकट काँफीडन्स वाढला. एका पराभवाने आजच्या दिवस शहाणं व्हायला पाहिजे होतं. पण दुसर्‍या डावात जिंकून वचपा काढू असे वाटले. आणि तुमच्या भूलथापीला बळी पडलो. दुसर्‍या डावात तसं सहज हरलो नाही. तुमचा हत्ती लॉकडाऊनम्धे पुरता बंदीस्त असल्यामुळे त्याचा नाद करता आला नाही.तोवर महाभारतातल्या पितामह भिष्मासारखा शरपंजरी अवस्थेत पोचलो होतो. आपण खूप चांगलं खेळता आजही चांगले खेळले. पराभव मान्य आहे.

आता कृपया दोन दिवस माझ्या वाटेला जाऊ नये, सहकार्य करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

13 Apr 2020 - 5:26 pm | प्रचेतस

हारजीत तर होतंच असते सर, आपण फक्त आपलं कर्म करायचं, ते म्हणजे खेळणे.

सतिश गावडे's picture

13 Apr 2020 - 8:27 pm | सतिश गावडे

सर, तुमच्यावर रामायण आणि महाभारत पाहून अंमळ जास्तच प्रभाव पडला आहे असं वाटतं. त्यात तुम्ही मराठीचे प्राध्यापक त्यामुळे तुमच्या प्रतिभेला बहर आला आहे. उपमा अलंकाराचा गुलमोहर फुलला आहे तुमच्या या प्रतिसादात. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2020 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरं तर प्रचेतस यांना पाहून त्यांच्याशी बोलून माझ्या प्रतिभेला बहर येतो, त्यांचं जालावर असणं माझ्यासाठी उत्साहवर्धक असतं अर्थात आता तशी पूर्वीसारखी मैत्री राहीली नाही. तरीही.....

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

13 Apr 2020 - 4:36 pm | प्रचेतस

window.addEventListener("message",e=>{e.data&&"6603270"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});

गुल्लू दादा's picture

13 Apr 2020 - 5:00 pm | गुल्लू दादा

मस्त झाला सामना.

सतिश गावडे's picture

13 Apr 2020 - 8:37 pm | सतिश गावडे

घर, सोसायटी आणि कामाची जागा अशा तिन्ही ठिकाणी काय चालू आहे याचा धावता आढावा :)

अभिजीत अवलिया's picture

13 Apr 2020 - 9:42 pm | अभिजीत अवलिया

"ऑफिसचं काम तर जोरात होतंच. शेवटी बायको म्हणाली की ऑफिस असतं तर बरं झालं असतं ऑफिसपेक्षा जास्त काम करतोयस तू घरून."
— हा हा. सेम परिस्थिती. त्यात लाॅकडाऊन असल्याने "'रिसोर्स' घरीच असणार, जातोय कुठे" हे मॅनेजमेंटला माहीत आहेच. त्यात त्या रोजच अधिकच्या लाॅकडाऊन स्पेशल मीटिंगा अटेंड करा, हाताखालच्या लोकांचा डेली स्टेटस् घेऊन रिपोर्ट बनवा ही नावडती कामे गळ्यात पडलीत.

सौंदाळा's picture

13 Apr 2020 - 10:01 pm | सौंदाळा

सर्वांचे धन्यवाद,
प्रशांत मालकांचे लेखनाला उद्युक्त केल्याबद्दल आभार.

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2020 - 2:31 am | श्रीरंग_जोशी

करोना व्हायरसच्या संकटादरम्यान घर, नोकरी अन भोवतीचे उद्योगधंदे यांचा थोडक्यात पण उत्तम आढावा घेणारा लेख आवडला.

चौकस२१२'s picture

14 Apr 2020 - 6:17 am | चौकस२१२

माहिती आणि तंत्रन्यान (आय टी) सोडून इतर क्षेत्रात आणि विविध राज्यात/ देशात काय फरक पडला आहे त्याबद्दल मिपाकरांनी लिहावे अशी विनंती

मजूर वर्गाचे फार हाल झाले आहेत,सरकारने त्यांच्यासाठी व्यवस्थित आखणी व कृृृृृृृृृती करायला हवी होती,
21 मार्चला बसने घरी येतांना स्टाॅपवर एका

मजूराला बघितले, काहीही सामान नाही,
अतिशय दमलेला, त्याला रेल्वे पकडायची
होती, बिहारचा होता, मला
इतकी दया आली,वाटल हा कधी व कसा
पोचणार घरी त्याच्या.

भाऊ, एकदम भारी लिहिले आहे.. वाचून एकदम रिफ्रेश व्हायला झाल... मस्त..
सौंदाळा नावाचा मासा असतो हे आज कळाले..

आम्ही सुरमई खायला पुणा गेट ला जातो.. आपला एक खादाडी कट्टा तिकडे पण केला होता खूप वर्षा पूर्वी.. करू कधी तरी नंतर पुन्हा..

बाकी लिहीत रहा.. मस्त लिहिता तुम्ही