"ट्रिपल एम"[मेथी मुर्ग मलई] + तंदुरी गार्लिक नान

केडी's picture
केडी in पाककृती
8 Apr 2020 - 4:54 pm

1

गेल्या रविवारी "ट्रिपल एम" म्हणजे मेथी मुर्ग मलई चा बेत केला. सोबत तव्यावर केलेले कणकेचे (व्हिट) तंदुरी गार्लिक नान.

चिकन (साधारण ९०० ग्राम) ला कसुरी मेथी, दही, आलं लसूण, गरम मसाला लावून घेतला. हे रात्रभर किंवा किमान ४ तास मॅरीनेट करत ठेवावे (फ्रिज मध्ये).
कांदा (२ माध्यम आकाराचे), आलं, लसूण, हिरवी मिरची मिक्सर मधून बारीक करून, तेलावर परतून घेतली. थोडी हळद तिखट घातली. २ जुड्या मेथी बारीक चिरून ह्यात घातली आणि भरपूर परतून घेतली (आधी कडू लागते, पण कडवटपणा भरपूर परतून घेतल्यामुळे कमी होतो). ह्यात चिकन टाकून आता ते परतून घ्या (पाणी नको, चिकन ला पाणी सुटेल त्यात शिजवायचे आहे). झाकण लावून मंद आचेवर शिजवून घ्या (साधारण ३० ते ४५ मिनिटे). चवीनुसार मीठ घालून मर्जीनुसार ह्यात फ्रेश क्रीम घालावे!

गार्लिक नान साठी आपली नेहेमीची कणिक घावी, जरा जाडसर पराठा/नान लाटावा. एकीकडे एक लोखंडी तवा (नॉन-स्टिक नको, कारण आपण तो उलटा करून नान भाजणार आहोत) गॅस वर तापवत ठेवावा.

आता नान ला एकाबाजूने पाणी लावावे. पाणी लावलेली बाजू तव्यावर टाकून गॅस कमी करावा. वरच्या बाजूला, बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर आणि कलोंजी हाताने थापावी. नान वर थोडे फोड आले कि तवा उलटा करून आता लसूण लावलेली बाजू गॅस वर धरून सगळीकडून नीट भाजून घ्यावी.
नान ला ब्रशने मस्त बटर लावावे.

Step1 Step2     
Step3 Step4

[ वरील फोटो हे मागे केलेल्या गार्लिक नान चे आहेत, यावेळेला पोरांना भुका लागलेल्या त्यामुळे फोटो नाही काढले करतानाचे ]

गरम गरम, नान मेथी मुर्ग मलई चिकन सोबत सर्व्ह करावे.

शाकाहारी लोकांनी चिकन ऐवजी पनीर किंवा मशरूम वापरून करावे. अर्थात मॅरिनेशन रात्रभर ची गरज नाही. मशरूम घालून उत्तम लागतं हे.

      
2

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2020 - 5:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंबर एक. पैकीच्या पैकी मार्क्स. लॉकडाऊनच्या काळात असे चिकन वगैरेच्या पाककृत्या फॉल समजल्या जातील.
बाय द वे, लॉकडाऊनचा भयान काळ संपल्यानंतर जर देवानं विचारलं काय हवंय, तर यादीत तुमची ही डिश मागेन. :)

-दिलीप बिरुटे

केडी's picture

8 Apr 2020 - 6:26 pm | केडी

मंडळ आभारी आहे! :-)

प्रशांत's picture

8 Apr 2020 - 8:41 pm | प्रशांत

असेच म्हणतो

आणि लॉकडाऊन संपला कि तुमच्याकडे (केडी) येतो.

केडी's picture

8 Apr 2020 - 9:46 pm | केडी

या हो सरपंच!
;))

चांदणे संदीप's picture

8 Apr 2020 - 5:29 pm | चांदणे संदीप

केडी नाव वाचून धावत आलो आणी वारल्या गेलो.

सं - दी - प

केडी's picture

8 Apr 2020 - 6:32 pm | केडी

आभारी आहे!
_/\_

सौंदाळा's picture

8 Apr 2020 - 9:46 pm | सौंदाळा

जबरदस्त
तोंपासू
लॉक। डाऊन मधे चिकन कुठे मिळालं? ऑनलाइन मिळू शकेल का पिंपरी चिंचवड मध्ये

जवळचा आमिर चिकन वाला (५०० मीटर वर)सोसायटीच्या मेंन गेट ला आणून देतो, लॉक डाउन मुळे बाहेर जाणे वर्ज आहे.

मी ऐकतोय की फ्रेश टू होम, लीशीस डिलिव्हरी देत आहेत घरपोच.

मीअपर्णा's picture

9 Apr 2020 - 7:50 am | मीअपर्णा

फोटो तर कातिल आहेतच. चवही जबरी असणार. नान मला कधी घरी करता येत नाहीत. आणखी डिटेल्स द्याल का नान बनवण्यासाठी आणि तुमचे नान गव्हाच्या पीठाचे म्हणता पण पहिल्या लाटलेल्या फोटोत इतके पांढरे कसे दिसतात? थोडा मैदा मिक्स करता का? पीठ सैल भिजवायचे का?

:)

मी लिहिलंय की नान चे फोटो मागे केलेल्या नान चे आहेत, तेव्हा मी मैदा आणि पीठ मिक्स (सम प्रमाणात)असे केलेले। यंदा जे केले ते घरी भिजवलेल्या कणकेचे आहेत, त्यात मैदा वैगेरे काहिही घातलेलं नाही।

पीठ नेहेमीप्रमाणे भिजवलेले होते, त्यामुळे वेगळे काही केलं नाही। पाहिजे तर गोळा मळताना थोडं तुपाचे/तेलाचे बोट लावा (मी नाही लावलं).

मीअपर्णा's picture

10 Apr 2020 - 3:13 am | मीअपर्णा

हो मला वाटलं ते नानही गव्हाचेच. माझी मुलं नेहमी फ्रोजन किंवा रेस्ताँ. चे नान खातात. कदाचीत सुरुवातीला अर्ध हे आणि अर्ध ते पीठ वापरून पाहिन. मग नंतर पूर्ण गव्हाचं प्रकरण हातात घेईन.

धन्यवाद :)

चौकस२१२'s picture

10 Apr 2020 - 7:30 am | चौकस२१२

केडी, तंदूर नसल्यमुळे ओव्हन मध्ये करायचा प्रयत्न काही वेळा केला पण कडक झाले... तुम्ही दाखवलेल्या उलट्या तव्या ची कल्पना करून बघायला पाहिजे
आणि पिठात काय घालावे? ताक वैगरे?

वर म्हंटल्याप्रमाणे ह्यावेळी सध्या कणकेचे केले, बाकी मैद्याचे नान च्या बऱ्याच पद्धती आहेत, अंड घालून, दही घालून अगदी यीस्ट घालून सुद्धा

जी सोयीची पडेल ती रेसिपी वापरा कणिक मळताना...

अनन्त अवधुत's picture

9 Apr 2020 - 9:02 pm | अनन्त अवधुत

फोटो पाहुन, एकदा तरी करुन बघावी लागेल.

वामन देशमुख's picture

10 Apr 2020 - 2:41 pm | वामन देशमुख

एकेकाळी, केडी (म्हणजे कायम डुलक्या) असं विडंबन केलं होतं,
आज मात्र केडी (म्हणजे कायम डेलिशिअस) असं गंभीरपणे म्हणतो!

प्रशांत's picture

7 May 2020 - 2:20 pm | प्रशांत

काल गार्लिक नान बनवण्याचा प्रयत्न केला जमला (चांगला दिसतो) का बघा...

1

केडी's picture

7 May 2020 - 7:22 pm | केडी

सरपंच! क्या केहने!
वाह, दिलखूष कर दिया...
सोबत काय होते??

चौकस२१२'s picture

7 May 2020 - 6:08 pm | चौकस२१२

दिसतोय चांगला.. पेरलेली लसूण जरा जास्त वाटतीय !
पीठ कसे भिजवले? यात काय होते ते थोडे फुगवे लागते का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तंदूर नसताना त्यासारखे भाजले कसे? ओव्हन मध्ये कि कसे