फेब्रुवारी महिन्यात मोसंबी नारंगी या हिंदी नाटकाचा हेदराबादमधे प्रयोग बघितला. मराठी माणूस मोहित टाकळकरने नाटकाचे दिग्दर्शन केले होते म्हणून नाटक बघायचे ठरविले. मोहित टाकळकरच्या नाटकांबद्दल बऱ्याचदा वाचले होते तेंव्हा ती उत्सुकता देखील होती. त्याच बरोबर ती नाटके डोक्यावरुन जातात ती भिती सुद्धा होती. माझ्या सुदैवाने माझी नाटकाच्या दिग्दर्शका सोबत तेथे भेट सुद्धा झाली. तसेच व्योमकेश बक्षी फेम रजत कपूर हे देखील एक आकर्षण होतेच. नाटक उशीरा सुरु झाले. आयोजकांनी मग तिथल्या कँटिनमधे फुकटात चहा दिला. इटरनेशनल एअरलाइन्सचे विमान उशीरा सुटल्यासारखे वाटले. ते पण असेच एअरपोर्टवर लाँजमधे जेवायला देतात. हल्ली जी फॉर्मेटलेस (याला नाटकाच्या भाषेत काय म्हणतात देव जाणे) पद्धतीतली नाटक होत असतात हे नाटकही त्यातलेच होते. नाटकाला ठराविक असा ढाचा नव्हता, नाटकात एंट्री, एक्झीट असली तरी ब्लकआउट करुन दुसरा प्रवेश असे काही होत नव्हते. नाटक सिनेमाचे शूटींग आणि दोन ज्युनियर आर्टिस्ट अशा एका सूत्रात असले तरी त्याला विशिष्ट असे कथानक नव्हते, एकच पात्र विविध भूमिका वठविते होते आणि तेही वेशभूषा न बदलता. नेपथ्थही लवचिक होते. थोडासा बदल करुन विविध दृष्य उभी केली जात होते. वग नाट्यात नाही का एक उडी मारली की नारद पृथ्वीवरुन स्वर्गात आणि उलट उ़डी मारली की स्वर्गातून पृथ्वीवर येतो. वग नाट्य आणि लक्ष्मण देशपाडे यांचे वऱ्हाड चालले लंडनला सारखा एकपात्री प्रयोग हे एकत्र करुन त्यात उत्तम प्रकाश योजना, ध्वनी अशी आधुनिक तंत्रज्ञाने मिसळली तर जे मिश्रण तयार होइल हे तसच काहीस होतं. सिनेमामधे जसे दृष्यामागून दृष्य बदलत जातात तशीच जादू रंगमंचावर घडत होती.
हे नाटक एका आयरीश नाटकाची हिंदी आवृत्ती होती. इशकं बनारसी या सिनेमाच्या शूटींगमधे काम करनारे दोन ज्युनियर आर्टिस्ट मोसंबी आणि नारंगी यांची ही गोष्ट होती. त्या सिनेमाचे शूटींग वाराणसीला चाललेले असते. सिनेमाच्या शूटींगचे दृष्य नेपथ्थ आणि दोन कलाकारांच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे उभे केले जाते. प्रसंगानंतर प्रसंग अशी दृष्ये उभी होत जातात. जुनियर आर्टिस्टचे आय़ुष्य, त्यांची स्वप्ने आणि वास्तव हे सारे अस्सल बनारसी भाषेचा तडका देऊन रंगमंचावर उभे केले होते. भाषा काहीशी शिवराळ होती त्याच पद्धतीचे विनोद सुद्धा होते. या साऱ्यातून सिनेमातल्या जुनियर आर्टिस्टला गर्दितला एक चेहरा यापलीकडे फार किंमत नसते हे चित्र तुमच्या मनात उभे होत जाते. मला ती बाहुबलीमधली गर्दी आणि त्या गर्दीत दिसनारे चेहरे आठवत होते. जुनियर आर्टिस्ट त्याच्या गरजा, भावभावना, स्वप्न याला या गर्दीत किंमत नसते हे तीव्रतेने जाणवत होते. थोडा विचार केला तर हे दृष्य सर्वत्रच असते. बांधकामाच्या साईटवर काम करनाऱे कामगार किंवा राजकारणाच्या सभेला बोलवलेली गर्दि सारखीच भासते. There is crowd at bottom so nobody cares for individual हेच विदारक सत्य विविध दृष्यातून उभे होत होते. दृष्य माध्यामाची ताकत काय असते ते जाणवत होते. एका प्रसंगात जवळचा नातेवाईक वारला तरी दोघांनाही हसरा चेहरा करुन उभे राहायचे असते. प्रचंड असा परिणामकारक प्रसंग होता. संपूर्ण नाटकात त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची भूमिकाच नाही त्याचा फक्त फोन येतो. त्याचे दोन सहकारी दिग्दर्शकानी सांगितले तसे जुनियर आर्टिस्टच्या गर्दिकडून करुन घेतो. कॉर्पोरेट म्हणा, राजकारण म्हणा सर्वत्र अशा प्रकारचे हाय कमांड असते. नाटक संपले तरी नाटकातील काही दृष्ये सतत डोळ्यासमोर राहतात. हे सारे जितक्या सफाईने तुमच्या समोर घडते ते अचंबित करणारे होते.
रजत कपूरने तीन ते चार आणि तसेच अजित सिंग पलावत ने तीन ते चार भूमिका साकारल्या होत्या. दोन्ही कलाकार कसलेले होते त्यामुळे ते सहज वेगवेगळ्या भूमिकेत शिरत होते. वेशभूषा न बदलता दोन्ही कलाकार सहज भूमिका वठवत होते. बनारसच्या भाषेचा लहेजा रजत कपूरने मस्त पकडला होता. नेपथ्य उत्तम होते. दिग्दर्शकाने रंगमंचाचा व्यवस्थित वापर केला होता. हे नाटक दृष्यांचे होते संवादाचे नाही त्यामुळे नाटकाची प्रकाश योजना आणि ध्वनी तुम्हाला चकीत करुन जातो. प्रकाश योजना बदलून तुमच्या समोरील दृष्य सिनेमाच्या फिल्मसारखे बदलून जाते. सतत दिसनारे बनारसचे घाट, सिनेमाचे शूटिंग, पसरलेला कचरा हे सार नॉर्मल लाईटमधे येत. तर पुढच्याच क्षणाला दोघेही नावेत बसले आहेत असे दृष्य जेंव्हा येते लाइट बदलून दुसराच प्रसंग उभा राहतो. तीच गोष्ट दारुच्या अड्डयाची. ध्वनीयोजना ही या नाटकाचे शक्तीस्थळ होते. वाहनाऱ्या गंगेचा आवाज, गंगेत पाय धुताना येणारा आवाज, हिरोइनच्या चालण्याचा आवाज असे सारे आवाज हुबेहुब येतात. हे सारे आवाज तुमच्यासमोर निर्माण केले जातात रेकॉर्डेड नाही.
नाटकाल सलग असे कथानक नाही. माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकासाठी सलग कथानक नसल्याने नाटक पकड घेत नाही. केवळ दृष्यात्मकता उत्तम असली तरी सरकत जाणारी, उत्सुकता ताणून धरनारी गोष्ट हवी होती असे वाटत होते. दृष्य माध्यमाची ही ताकत वापरुन हीच गोष्ट फार जास्त बुद्धिवादी न करता सरळ सांगितली असती तर ती अधिक लोकांपर्यंत पोहचली असती असे मला वाटत होते. नाटकात खूप प्रयोग करताना नाटकाचे मूळ हरवत आहे का असाही एक विचार डोक्यात आला. कदाचित अशा नाटकांना सरधोपट, रंजक कथानकाची अपेक्षा ठेउन जाऊ नये. त्यामुळे नाटकातील दृष्यांचा छान आस्वाद घेता येतो. नाटकाला बरीच बंगाली मंडळी आली होती. बरेच वयोवृद्धही होते. एकेकाळी उत्पल दत्त वगैरे मंडळींनी बंगाली नाटक गाजविले होते. कदाचित तशा नाटकांचा प्रेक्षक वर्ग असावा. यातली बरीच मंडळी मध्यांतरानंतर निघून गेले. कदाचित उशीर झाल्यामुळे निघून गेले असतील. त्या मंडळींना जाताना बघून उत्पल दत्त यांचे एक वाक्य आठवले. 'There are attempts being made to intellectualize theater. In my opinion it will do more harm to theater than good.' आज बंगालमधे नाटकांची काय अवस्था आहे माहित नाही. मराठी आणि काही प्रमाणात गुजराती नाटक सोडले तर कुठेही व्यावसायिक नाटक नाही हे मागे वाचले होते. तेंव्हा 'नाटक नेमके कसे असावे?' असा प्रश्न मला पडला.
नाटक: मोसंबी नारंगी
मूळ लेखक: Marie Jones (Irish play)
हिंदी रुपांतरण: अशोक मिश्रा
दिग्दर्शक: मोहित टाकळकर
अभिनेते: रजत कपूर आणि अजित सिंग पलावत
प्रतिक्रिया
9 Apr 2020 - 12:29 pm | कुमार१
फक्त हे दुरुस्त व्हावे ही सूचना
>>>
"रजित" कपूर असे हवे.
... रजत वेगळे , ते आपले 'कॉर्पोरेट वाले.
9 Apr 2020 - 4:48 pm | मित्रहो
चूक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद. मी संपादन करु शकत नाही. संपादकांनी दुरुस्ती करावी. आता माझ्या हे लक्षात राहील