होसूर: एक उनाड रविवार (पुर्वार्ध)

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in भटकंती
1 Apr 2020 - 1:37 pm

शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता जेवण करून जरा रिलॅक्स होतोय तर मोबाईल वाजला, बघितलं तर ऑफिसच्या मुरूगनाथनचा कॉल, कॉल घेत असताना थोडा चमकलोच, म्हटलं आता कसा काय याचा कॉल ?

मुरूगनाथन: हॅलो, फ्री ?
मी: यस, फिनिश्ड डिनर जस्ट नाऊ, व्हाट्स स्पेशल ?
मुरूगनाथन: प्लॅनिंग आऊटिंग व धिस संडे. मोकळा आहेस ना रविवारी?
मी: हो, काय विशेष ? कुठं जायचंय?
मुरूगनाथन: माझा मेव्हणा चेन्नईहुन येणार आहे शनिवारी. मी, अनुप्रिता (मुरूगनाथनची बायको) आणि मेव्हणा नंदी हिल्सला जायचं म्हणतोय. तू पण येणार असशील तर तर आपल्याला कॅबने जाता येईल, वेळ आणि खर्च दोन्हीनं सोयीस्कर होईल !
मी: वॉव ! येईन ना मी, नक्की येईन.
मग फोनवरच येण्याजाण्याच्या वेळा, काँट्रिब्युशन वै उरलेले बाकीचे तपशीलही ठरवून टाकले.

तेव्हा बंगलोरच्या ऑफिसला होतो, मुरूगनाथन माझा कलीग. ( माझे ऑफिस कलिग्ज ) त्याच्या बायकोशी, म्हणजे अनुप्रिताशी मागच्या महिन्यातल्या शिल्हांदरा आऊटिंगला ( आमचं शिल्हांदरा आऊटिंग ) चांगलीच ओळख झाली होती, त्यामुळं या दाम्पत्याबरोबर सहलीला जाणयासाठी काहीच संकोच नव्हता. मलाही नंदीहिल्स बघायची उत्सुकता होतीच !

शनिवारी सकाळी बॅकसॅक, पाण्याची बाटली इ जुजबी तयारी करून ठेवली, रविवारी पहाटे ५ वाजता माझ्या इथून पिकअप करणार असल्यामुळे लवकर झोपणे भाग होते. रात्रीचं जेवण करण्याआधी जस्ट पुन्हा मुरूगनाथन फोन.

मुरूगनाथन: हॅलो, आपल्या उद्याच्या आऊटिंगचा एक प्रॉब्लेम झालाय.
मी: बाप रे, आता काय झालं ?
मुरूगनाथन: अनुप्रिताचे काका राहायला आलेत आज संध्याकाळी. आऊटिंग कॅन्सल करावं असं वाटतंय.
मी: बर. त्यांना आऊटिंगला यायचं का ते विचार. ते येणार असतील तर जात येईल की !
मुरूगनाथन: ठीक आहे, बघतो विचारून.
मी: नाही तर असं का करत नाहीस, तुम्ही सगळे जा आउटिंगला, मी बघेन माझं काही तरी.
मुरूगनाथन: धिस विल बी गुड, मी मेसेज टाकतो, काय ठरतंय ते.

मी म्हटलं, नाही तरी ऐनवेळी मोठी गाडी मिळायला अडचण येईल, त्यापेक्षा होऊ दे त्यांची फॅमिली ट्रिप !
अश्या तऱ्हेने नंदीहिल्सला भेट द्यायची संधी जशी अचानक आली तशी गेली सुद्धा !

रविवारी मग जरा निवांतच उठलो. चहा,बिहा उरकला अन अंघोळ करत असताना आपण एकटेच जवळ कुठंतरी आऊटिंगला जावं असा विचार सुरु झाला. येस्स, होसूरला जायचं ! ठरलं, तिथल्या चंद्र चुडेश्वर या शिवमंदिरास भेट द्यायची, रविवार सत्कारणी लावायचा !

होसूर हे बंगलोरपासून ४० किमीवर. आणि दोन्हीच्या बरोबर मधे इसी आयटी पार्क आणि माझं राहण्याचं पीजी. म्हणजे पीजी पासून फक्त २०-२२ किमीवर ! तसं खूपच जवळ, बसनं फक्त अर्ध्या तासावर ! पटकन आवरून सॅक घेऊन चालत इसी सर्कलला गाठलं. कॉर्नरच्या रुचीसागरमध्ये या हायवे वर रुचीसागर मध्ये डोसा अन एक झकास फिल्टर कॉफी मारून हाय-वे वर आलो. हा म्हणजे बेंगलोर-चेन्नई हायवे, होसूर, वेल्लोर मार्गे.

KSRCTBUS

एसटी बसचा स्टॉप इथे होताच. तिथं बसची वाट बघत असलेल्या एकाला होसूर बसबद्दल विचारलं, तो म्हणाला येईलच इतक्यात, आणि हो, केएसआरटीसीने जा, स्वस्त आहे, तामिळनाडू एसटी महाग आहे. मस्तच टीप दिली होती त्यानं, अवांतर बोलत असतानाच आलीच केएसआरटीसी बस. फार गर्दी दिसत नव्हती, आत शिरलो, बसायला खिडकीपाशी जागा मिळाली. रू. २० चं तिकीट काढलं. आणि खिडकी बाहेर पाहत प्रवासाची मजा घेऊ लागलो. बोम्मासॅन्ड्रा, अत्तिबेळे ही गावं थोड्यात वेळात मागं टाकली अन तामिळ भाषेतले बोर्ड्स दिसू लागले. एसटीनं तामिळनाडूत प्रवेश केला होता.

जसजसं होसूर जवळ यायला लागलं तसं बसचा वेग मंदावू लागला. हायवेच शहराच्या अलीकडे वर फटाक्यांच्या मोठ्या कमानी फटाक्यांचे मोठे स्टॉल दिसले, मंडप वै टाकून छानशी सजावट केलेले हे स्टॉल्स भव्य होते, गाड्या पार्क करून लोक खरेदीसाठी गर्दी करत होते. होसूर हे फटाक्यांच्या घाऊक बाजारासाठी प्रसिद्ध आहे. तामिळनाडूच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे शिवकाशी इथं तयार होणारे फटाक्यांच्या कंपन्यांचे फार पूर्वीपासून इथं मोठी गोडाउन्स आहेत, त्यामुळे इथल्या घाऊक बाजारातुन संपूर्ण कर्नाटक आणि आणि इतर अनेक राज्यांशी व्यवहार करायला हे सोयीस्कर स्थान पडते.

FIRECRACKERMANDAP

आता पुढे शहरातील वर्दळ सुरु झाली होती. फ्लेक्स अन तामिळ नेत्यांचे भव्य कटाऊट्स एकमेकांशी स्पर्धा करत होते. पुढे मोठा उड्डाणपूल लागला बस त्यावर न जाता सर्व्हिस रोडला लागून पुलाखालून उजव्या बाजूला एसटी स्टॅन्डही कडे शिरली. सिग्नलला बस थांबली, काही लोक उतरत होते, मी ही उतरलो.

थोडं पुढं गेले कि गावातली बाजारपेठ सुरु झाली. एका रिक्षावाल्याला चंद्रचुडेश्वर मंदिराला येण्याविषयी विचारल्यावर दोनशे रू मागितले, फार वाटले. म्हटलं, हाताशी भरपूर वेळ आहे, चालत जाता येते का ते पाहावे. बाजारपेठेत चालायला सुरुवात केली. विविध प्रकारच्या दुकानांनी त्यांचा दिवस सुरु केला होता, व्यवहारांची व्यापाऱ्यांची लगबग सुरु झाली होती. फुलंहारांची दुकाने सजली होती, सुंदर रंग अन मनमोहक सुवास यामुळं बाजारपठेच्या गल्ल्या सुगंधाने दरवळून गेल्या होत्या.

आठ दहा क्रॉसरोडस पार केल्यावर एका कॉर्नरला अचानक बऱ्यापैकी गर्दी दिसली. मोर्चा तिकडं वळवला, अरे, हि तर चहा-नास्तावाली गल्ली होती, सकाळचा नास्ता चहा घेऊन दिवस सुरु करणाऱ्या लोकांची स्टॉल्स पुढे गर्दी दिसत होती, कमी गर्दीचं दुकान गाठावं म्हणून आणखी थोडा आत चालत गेलो. अहा, चहाच्या सुंदर वासानं माझं नाक काबीज केलं. वाडाछाप दुमजली इमारतीतलं जुनाट काळपट चहाचं दुकान त्याच्यापुढची गर्दी अभिमानानं मिरवत होतं, चहाचा ग्लास पटवण्यासाठी दाटिवाटीत हातांची स्पर्धा सुरु होती. मी पण घुसलो. व्वा, काय सेटअप होता. टेबलावर विस्तवाच्या शेगडीवर जुन्या पदहतीचे पितळेचे दोन बंब वाफ सोडत होते. एकात चहाचं डीकॉशन अन दुसऱ्यात गरम पाणी ! बाजूच्या पितळी पातेल्यात उकळत असलेलं दूध. त्याच्या बाजूला ग्लासचा ढीग. चहा देणारे हात रिकामे झालेले ग्लास वेगाने गरम पाण्याने धूत होते, दुसऱ्या बंबाची तोटी सोडून त्या स्वच्छ ग्लासात चहा-डीकॉशन ग्लासात सोडत होते. पितळी पातेल्यात उकळत असलेलं दूध त्वरेने त्या ग्लासात ओतलं जायचं, काळपट कोरा चहा दूध ओतल्यावर झकास लाल रंग धारण करायचा, या सगळ्या हालचाली नजरबंदी करणाऱ्या होत्या.

TEAGLASSSTALL

चहाचा दरवळ धुंद करून टाकत होता. मी एक ग्लास घेऊन आतच बाकड्यावर कोपऱ्यावर जाऊन बसलो. चहाचा एक घोट घेतला. अहा, क्या बात हैं ! चहा असावा तर असा, क ड ss क ! असा कीलर चहा पहिल्यांदाच घेतला होता ! आजूबाजूची जनता चहा घेत त्यांच्या गप्पात रंगली होती. शहरी कष्टकरी लोकांपासून ते माझ्या सारख्या पांढरपेशे लोकांपर्यंत या मैफिलीत रंगले होते ! चहा निवांतपणे संपवला. थोडावेळ आजूबाजूचा परिसर, माणसं त्यांचे आवाज असा कोलाहल माहोल अनुभवत राहिलो. निघताना आणखी एक चहा मारायचा मोह झालाच, चलो, और एक पेग म्हणत पुन्हा तल्लफ भागवून घेतली !

गल्लीतून बाहेर येऊन एकाला मंदिराचा रस्ता विचारल्यावर त्याने त्या रस्त्याच्या टोकाशी हात दाखवून सांगितलं "त्या कॉर्नरवरून शेअर रिक्षा मिळेल, ती टेकडीच्या पायथ्याला सोडेल. नाहीतर अर्ध्यापाऊण तासात चालत देखील जाता येईल" म्हटलं ठीकाय, बाजारपेठेतून रमतगमत चालत निघालो. रोज आयटी पार्क मधील चकचकीत इमारती, तिथले सॉफिस्टिकेटेड लोक बघणे यांच्या गावातला रामरगाडा, माणसं बघणं एक आनंददायी अनुभव होता. बाजारपेठेतली जुनीपानी दुकानं, सुतळीदोरखंडाच्या दुकानापासून ते मोबाइल रिचार्जच्या दुकानापर्यंत चाललेले व्यवहार बघणं आकर्षक होतं. अचानक एका दुकानात रंगीत मांडणी केलेली दिसली. बघितलं तर त्या सुपाऱ्या होत्या. पाटयांमधल्या विविध रंगी आकर्षक सुपाऱ्या दिसत होत्या पान-कात-तंबाखू-सिगारेट-चुना दुकानातल्या. बऱ्याच दिवसांत सुपारी नव्हती खाल्ली, घेऊन टाकला मग एक मिक्स पॅक. नंतर रोज रात्री जेवण झाल्यावर चवीनं चघळली. वर्षभर पुरली.

SUPARIABCD

रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला पोहोचून शेअररिक्षा पकडली २० रुपयांत गावच्या बाहेर मंदिर टेकडीच्या पायथ्याशी सोडलं. टेकडी छोटीच होती, चढायला सुरुवात केली. गावाचा कोलाहल मागे पडून शांत वातावरणात छान वाटत होतं. जानेवारी संपत आल्यामुळे हवाही किंचितगार सुखावह होती. गोल खडकवाला हा रस्ता म्हणजे शॉर्टकट होता.

CCDMTEMPLE

पुढे आणखी चालत गेल्यावर मुख्य रस्त्याला लागलो, चंद्र-चुडेश्वर मंदिराचं दर्शन झालं ! मंदिर टेकडीवरच्या विशाल खडकावर आहे.

CCDMTEMPLE02

प्रवेशद्वारावर शॉर्ट, जीन्स, पंजाबी ड्रेस, लेगिंग्ज असल्या आधुनिक वस्त्रात प्रवेश नाही, साडी, धोतर, पॅन्ट अशी वस्त्रे चालतील अशी ठसठशीत पाटी होतीच. प्रवेशद्वारातून आवारात शिरल्यावर प्रसन्न शांतता जाणवली. उंच कुंपणभिंतीच्या आतील आवर खुप स्वच्छ होते. वर्दळ अत्यंत कमी, दोनचार भाविक होते.

CCDMTEMPLE03

दाक्षिणात्य शैलीतील रंगीत गोपुर.
CCDMTEMPLE04

गोपुराच्या समोरच भिंतीशी फुलं हळदीकुंकु ल्यालेले नक्षीदार नंदी, कदाचित दुसऱ्या कुठल्यातरी ठिकाणावरून इथं आणले गेले असावेत

CCDMTEMPLE05

गोपुराचा समोरून फोटो

CCDMTEMPLE06

या गोपुराला लागून असलेल्या बारापंधरा फूट उंच असलेल्या भिंतींनी मंदिराचा चौकोन बंदिस्त केला आहे. याच भिंतीवर उंचावर चारी कोपऱ्यात लक्ष वेधून नंदी आहेत ! गोपुराच्या उजव्या बाजूकडून मंदिराचे प्रवेशद्वार आहे. तेथून आत शिरलो. फार भलंमोठं नसलं तरी त्याच पैसेपणा चांगलंच जाणवलं. गोपुरापासून पुढं फोटो काढायला परवानगी नाही, त्यामुळं फोटो काढता आले नाहीत. मंदिरात शिल्पकला अशी नाहीच. वरील दगडी छताला आधार देणारे बरेच स्तंभ आहेत, आकारानं मुसळासारखे गोल, त्याच्या बाजूनं फिरताना सुखद गारव्यात गूढपणा भरून राहिलेला जाणवत होता. हवेत रेंगाळणारा इबीताचा (पांढरे भस्म) मंद सुवास गूढपणात भर घालत होता. भाविकांनी / पुजाऱ्यांनी खांबाखांबावर इबीताचे पट्टे मारले होते त्यामुळं इबीताची उपस्थिती ठसठशीतपणे जाणवत होती. गाभाऱ्यात श्री चंद्रचुडेश्वर अर्थात शंकर महादेवाचे शिवलिंग. चन्द्रचुडेश्वर म्हणजे माथ्यावरल्या जटांमध्ये चंद्र धारण करणारा शंकर. येथील शिवलिंगाला जलकंठेश्वर असं देखिल म्हणतात, कारण इथं पिंडीभोवती सतत जलाभिषेक होत असतो. आणि दुसऱ्या बाजूला पार्वती म्हणजे मरागथंबळ या नावाने पुजली जाते. मरागथंबळचा अर्थ आहे पानं-फुलं-झाडं-निसर्ग यांना हरितउर्जा पुरवणारी जन्मदात्री.

CCDMTEMPLE07

असूरांच्या उच्छादाने त्रस्त झालेल्या पार्वतीने त्यांच्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी नदीकाठी घोर तपाला प्रारंभ केला, तिची तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. वर म्हणून पार्वतीने शंकराचे वाहन नंदी याची मागणी केली. प्रसन्न झालेल्या शंकराने ती तात्काळ मान्य करून तिला नंदी भेट दिला, ज्याच्या साह्याने पार्वतीने असूरांचा नायनाट केला. या प्रसंगाची स्मृती म्हणून भगवान शंकरांनी इथेच वास करावा अशी मागणी पार्वतीने केली, शंकराने ती मान्य करून इथंच चंद्रचुडेश्वर म्हणून शिवमंदिरात वास केला अशी कहाणी सांगितली जाते (तमिळ, कन्नड, तेलगू अश्या भाषातही यासंबंधी वेगवेगळ्या लोककथा सांगितल्या जातात)
दुरुन मंदिराची टेकडी नंदीसारखी दिसते असे म्हणतात (मला तरी असे काही जाणवले नाही)

होसूर नगराची स्थापना होयसाळ राजांच्या राजवटीत सुमारे ८०० वर्षांपुर्वी झाली. या मंदिराची बांधणी देखील त्याच काळात त्यांनी केली आणि वेळोवेळी मंदिराचे जिर्णोद्धार केले.

एखाददुसरा भाविक वगळता निरव शांतता होती. मला कसलीच घाई नव्हती. मागच्या ओसरीवर बसकण मारली. मंदिरातली निरव शांतता निवांत अनुभवली. बालपणी गावातल्या वाळवंटातील मंदिरात असा अनुभव घेतला होता हे आठवलं. दुपारचे बारा वाजत आले होते, टेकडीवर येऊन दीड्दोन तास सहज झाले होते. बाहेर येउन प्रदक्षिणा सुरु केली, गेरूचे उभे पट्टे मारलेली भिंत, पॅसेजमध्येही कोणी नाही, अशी शांतनिरवता तिथंही अनुभवली.

CCDMTEMPLE08

मंदिराच्या बाजूला इतर देव-देवतांची छोटी-छोटी देवस्थानं आहेत, चंद्र, सूर्य, गजलक्ष्मी, पंचलिंग वै, तिकडंही थोडी नजर टाकून निघालो.
उतरताना मुख्य मार्गावरून उतरलो. मंदिराच्या उजव्या बाजुस लहान तलाव आहे त्याला मरगता सरोवरम असे म्हणतात. काही पाय-या उतरल्यानंतर डांबरी रस्ता लागला. भाविकांच्या कार व इतर वाहने याच मार्गाने येतजात असतात.

टेकडीवरून दिसणारे होसूरगावाचे दृष्य

CCDMTEMPLE09

उतरताना सुंदरशांत अनुभवासाठी कृतज्ञ होत चंद्रचुडेश्वराचा निरोप घेतला.

CCDMTEMPLE10

लवकरच चालत मुख्य रस्त्याला म्हणजे बेंगलोर हायवे वरून थोडं अलीकडे भाविकांचसाठी चंद्रचुडेश्वर मंदिराच्या स्वागताची कमान आहे तिथं पोहोचलो. तिथून गावात जाण्यासाठी शेअररिक्षा मिळाली. त्यात बसून बाजारपेठेत पोहोचलो. आता भूकची वेळ झाली होती. एक साधं पण छानसं हॉटेल पाहून आत शिरलो.

क्रमश:

(काही प्रचि आंजावरून साभार)

प्रतिक्रिया

छान आहे. वाचतो आहे. तमिळ देवळांच्या बाहेर भिंतींना उभे लालपांढरे पट्टे रंगवले नाहीत तर फटके मारत असावेत. ;)

चौथा कोनाडा's picture

2 Apr 2020 - 5:10 pm | चौथा कोनाडा

लालपांढरे पट्टे रंगवले नाहीत तर फटके मारत असावेत. ;)

हा .... हा .... हा....

धन्यवाद, कंजुस साहेब !

जालिम लोशन's picture

1 Apr 2020 - 4:14 pm | जालिम लोशन

छान

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2020 - 8:34 pm | चौथा कोनाडा

धन्यू जालिम लोशन साहेब !

चेतन सुभाष गुगळे's picture

1 Apr 2020 - 10:07 pm | चेतन सुभाष गुगळे

प्रवेशद्वारावर शॉर्ट, जीन्स, पंजाबी ड्रेस, लेगिंग्ज असल्या आधुनिक वस्त्रात प्रवेश नाही, साडी, धोतर, पॅन्ट अशी वस्त्रे चालतील अशी ठसठशीत पाटी होतीच.

पंजाबी ड्रेस - आधुनिक? आणि पॅन्ट - पारंपरिक?

तृप्तीताईंना कळवलं की नाही?

बाय द वे, सुपारी नका खात जाऊ. विक्रेते लबाड आहेत -

https://www.bhaskarhindi.com/city/news/cheating-betel-nut-shop-raid-on-f...

https://www.bhaskarhindi.com/city/news/directorate-of-revenue-intelligen...

चौथा कोनाडा's picture

2 Apr 2020 - 5:20 pm | चौथा कोनाडा

हो, पंजाबी ड्रेस,पॅण्ट आता त्याच्या नियमांनुसार पारंपरिक आहे.
(टुरिस्ट फ्रेण्डली पॉलिसी, दुसरं काय?

तृप्तीताईंची सध्या काही खबरबात नाहीय (करून झाला कि काय ?)
(ताई दारू विकत घेताना आढळल्या म्हणून त्यांना ताब्यात घेऊन पोलीसजीप मध्ये बसवतानाचा व्हिडो कायप्पावर फिरतोय, खरंखोटं माहित नाही)

सुपारीच्या दोन्ही बातम्या डेन्जर आहेत. भेसळ आता सगळीकडेच आहे.
(पण मी घेतलेली सुपारी कधीच संपवलीय)
धन्यवाद, चेतन सुभाष गुगळेजी.

Sandeep Bagade's picture

29 Apr 2020 - 6:59 pm | Sandeep Bagade

चौथा कोनाडा,
आपण लिहिलेलं प्रवास वर्णन खूपच छान आहे.असे वाटते आहे की मी स्वतःच होसुरला फिरून आलेलो आहे. छान लिहले आहे, उत्तरार्धाची आतुरतेने वाट पाहत आहे

चौथा कोनाडा's picture

4 May 2020 - 12:59 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, Sandeep Bagade सर !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2020 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. काही फ़ोटो दिसतात काही दिसत नाहीत.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

2 Apr 2020 - 5:25 pm | चौथा कोनाडा

गुगल फोटोज मधून "पब्लिक शेअर्ड अल्बम" मधून फोटो टाकलेत, दोन दिसताहेत, बाकीच्यांचा पब्लिक ऍक्सेस का गेला समजत नाहीय.
काय करता येईल या वर ?
धन्यू प्रा. डॉ साहेब !

धर्मराजमुटके's picture

2 Apr 2020 - 11:08 am | धर्मराजमुटके

मला स्वतःव्यतिरिक्त इतर कोणीही फिरायला गेलेले आणि त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन वाचायला फार आवडते. तुमची शैली देखील ओघवती आहे. मजा आली !

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2020 - 8:35 pm | चौथा कोनाडा

मला स्वतःव्यतिरिक्त इतर कोणीही फिरायला गेलेले आणि त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन वाचायला फार आवडते.

हा ... हा .... हा .... :-))

प्रचेतस's picture

2 Apr 2020 - 6:55 pm | प्रचेतस

मस्त लिहिलंय, वर्णन खूपच जबरदस्त. मजा आली वाचून.
हल्ली गूगल फोटोजचं कायतरी बिघडलंय. फोटो कधी दिसतात, कधी दिसत नाहीत. वैताग येतो.

चौथा कोनाडा's picture

3 Apr 2020 - 1:10 pm | चौथा कोनाडा

मस्त लिहिलंय, वर्णन खूपच जबरदस्त. मजा आली वाचून.

खुप खुप धन्यवाद, प्रचेतस.

आज दिसत आहेत सर्व फोटो.
गुगलफोटोला पण दिल्ली सारखा सम-विषम फॉर्म्युला लागू झाला कि काय ?

तुमची लिहायची शैली खूप सुंदर आहे.
मधे मधे टाकलेले फोटोही झकास.
पुढच्या भागाची वाट बघतोय

किल्लेदार's picture

5 Apr 2020 - 5:17 am | किल्लेदार

छान सफर... बसल्याबसल्या उनाडपणे भटकून आलो. :)

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

5 Apr 2020 - 11:57 pm | सौ मृदुला धनंजय...

प्रवास वर्णन खूपच छान .फोटो ही खूप छान आहेत

कंजूस's picture

6 Apr 2020 - 9:02 am | कंजूस

फोटो दिसताहेत.
सुपारी - डावीकडच्या कोपऱ्यात खाली काळी सुपारी 'चिकणी सुपारी'असावी. कच्ची सुपारी अर्धी कापून शिजवून वाळवतात.

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2020 - 9:08 pm | चौथा कोनाडा

हो, कंजूस साहेब.
गेले ते दिवस सुपारी उपभोगायचे. सध्या मुखशुद्धी म्हणून बडीशेप अथवा बडीशेप+जवस्+ओवा वै पाचक खातो.

लहानपणी थोडीफार तांबडी सुपारी खायला बरी वाटायची, आता सुपारी मधली "चिकणी सुपारी" कधीतरी खायलाच आवडते.

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2020 - 11:41 am | चौथा कोनाडा

@ धर्मराज मुटके,
@ सौंदाळा,
@ किल्लेदार,
@ सौ मृदुला धनंजय शिंदे

खुप खुप धन्यवाद !

अनिंद्य's picture

7 Apr 2020 - 2:11 pm | अनिंद्य

@ चौथा कोनाडा,

बंगलोरचा होसूर रोड इथे पोचतो होय !
तुमची उनाड आणि निवांत सहल आवडली.
एव्हड्या फोटुत त्या चहाच्या फोटोवर जास्तच रेंगाळायला झालं :-)

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2020 - 11:12 am | चौथा कोनाडा

तुमची उनाड आणि निवांत सहल आवडली.

धन्यवाद, अनिंद्य !

एव्हड्या फोटुत त्या चहाच्या फोटोवर जास्तच रेंगाळायला झालं :-)

कोणत्याही चहाबाजाला या फोटोची भुरळ पडणारच, बादवे, हा नेटावरनं ओढलेला आहे ! :-)

jo_s's picture

9 Apr 2020 - 1:47 pm | jo_s

वा , छानच लिहिलय
वाचताना माझिही सफर घडली

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2020 - 9:00 pm | चौथा कोनाडा

वाचताना माझिही सफर घडली

धन्यवाद, jo_s !

मस्त सहल. असं अचानक भटकायला जाण्याची मजा काही और असते.

मरागथंबळ ऐवजी मरगथ अंबळ/अम्मन असावे. शंकराची पिंड हिरव्या रंगाची आहे का? मरगद/मरगथ म्हणजे पाचू आणि हिरव्या स्फटिकाच्या शिवलिंगाला मरगद लिंगम म्हणतात हे ज्ञान आत्ताच प्राप्त झाले.

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2020 - 12:04 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, निशाचर.
हो मरगथ+अंबळ चा बोली उच्चार मरागथंबळ असाच करताना ऐकलं होतं. अंबा, अंबळ, अम्मा, अम्मन या सर्वांचा अर्थ आई हाच.
लेखात हे लिहिलेलं आहेच:

मरागथंबळचा अर्थ आहे पानं-फुलं-झाडं-निसर्ग यांना हरितउर्जा पुरवणारी जन्मदात्री.

त्यामुळं मरगथचा अर्थ नक्कीच "हिरवा रंग" असा आहे. हे पार्वतीचे विशेषण आहे.

शंकराची पिंड हिरव्या रंगाची आहे का?

शिवलिंगावरील पुष्पसाजावाटी मुळे पिंडीचा रंग समजला नाही. पण हे मरगद लिंगम खचितच नसावे.

बबन ताम्बे's picture

10 Apr 2020 - 3:35 pm | बबन ताम्बे

तुमची प्रवासवर्णन रंगवायची हातोटी विलक्षणच आहे. वाचताना अगदी तिथेच आहोत असे वाटते. फोटोही अप्रतिम !!
एकदा भेट देऊन यायची खूप इच्छा झाली आहे.

१००मित्र's picture

11 Apr 2020 - 12:45 pm | १००मित्र

पटलं !

चौथा कोनाडा's picture

27 Jun 2020 - 12:34 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, बबन ताम्बे आणि १००मित्र !

१००मित्र's picture

11 Apr 2020 - 12:44 pm | १००मित्र

होसुर हे अगदी बंगलोर च्या काठाशी आहे. इथून तमिळ व्यापारी कन्नड ग्राहकांची शिकार करतात ! (गंमत) ह्याचं लोकेशन तसच आहे अगदी.

चौथा कोनाडा's picture

2 Jul 2020 - 5:41 pm | चौथा कोनाडा

अगदी बरोबर ! इथं तमिळ, कन्नड लोकांची आपापसांत चांगलीच देवाणधेवाण आहे !
धन्यवाद !

चौथा कोनाडा's picture

7 Jul 2020 - 5:53 pm | चौथा कोनाडा