पिठल्याच्या वड्या

जुइ's picture
जुइ in पाककृती
9 Apr 2020 - 12:46 am

मंडळी नुकतीच रामनवमी होऊन गेली. चैत्रात माझ्या आजोळी रामाचे नवरात्र असते. तर या दिवसांमध्ये रामाला नैवेद्य म्हणून अनेक प्रकार केले जातात. जसे की लापशी खीर, पिठल्याच्या वड्या, धिरडी आणि गुळवणी इत्यादी. बर्‍याच वर्षात पिठल्याच्या वड्या करायच्या मनात होत्या. तर या चैत्रात केल्याही, हो तशाही सध्या भाज्या मिळतीलच असे नाही. कमी साहित्य आणि अगदी झटपट होती ही पाकृ.

साहित्य:

  • १ वाटी बेसन
  • १/२ चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • १ मोठा चमचा तिखट
  • १/२ चमचा साखर
  • फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग

सजावट: सुके खोबरे, कोथिंबीर आणि खसखस

कृती:

मोठ्या भांड्यात बेसन घ्यावे. त्यात हळद, मीठ आणि साखर घालून एकत्र करावे. आता त्यात पाणी घालत पातळ करावे. गाठी होवू देऊ नये. तसेच मिश्रण खूप पातळ करू नये. मग कढईत तेल घ्यावे. तेल तापले की त्यात जिरे, मोहरी, हिंग घालावे. तडतडले की त्यात बेसनाचे मिश्रण ओतावे. आता सगळ्या बाजूंनी चांगले हालवत एकत्र करावे. पिठले अगदी घट्ट गोळ्या सारखे होईल. मग झाकण ठेवून २-३ चांगल्या वाफा काढाव्यात. लगेच एका ताटाला तेलाचा हात लावून घ्यावा. पिठल्याचा गोळा त्यात काढावा. पाण्याचा हात लावून लगेच वड्या थापून घ्याव्यात आणि कापाव्यात.

फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावे. फोडणी झाली की वड्यांवर ती पसरावी. सजावटीसाठी मग सुके खोबरे, कोथिंबीर आणि खसखस घालावी. या वड्या नैवेद्यासाठी केल्या जात असल्याने मी त्यात कांदा आणि लसूण घातले नाही. तुम्ही लसूण घालून फोडणी देऊ शकता.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Apr 2020 - 12:44 pm | प्रचेतस

व्वा..! मस्त पाककृती.
पाटवडी म्हणतात त्या ह्याच का? का ह्यांची पाटोड्यांची पाकृ वेगळी आहे?

सस्नेह's picture

9 Apr 2020 - 4:04 pm | सस्नेह

मस्त दिसतायत . आमच्याकडे झुणक्याच्या वड्या म्हणतात.

तुषार काळभोर's picture

13 Apr 2020 - 6:44 am | तुषार काळभोर

आमच्याकडं यांना पाटवड्या म्हणतात. पण इकडं त्या बहुतेक पितृ पंधरवड्यात केल्या जातात. :)

यालाच सुरळीच्या वड्या देखील म्हणतात का ? नसल्यास काय फरक आहे ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Badshah - Genda Phool | JacquelineFernandez | Payal Dev

रुपी's picture

17 May 2020 - 9:46 pm | रुपी

मस्तच!
आमच्याकडे आमरसाबरोबर तोंडी लावायला या वड्या बनवतात.

Prajakta२१'s picture

17 May 2020 - 10:45 pm | Prajakta२१

आमच्याकडे पण पाटवड्या म्हणतात