लॉकडाऊन : सोळावा दिवस

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in काथ्याकूट
9 Apr 2020 - 9:03 am
गाभा: 

गोडी अपूर्णतेची

प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करुन सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येस परतले. भरताने स्वागताची सगळी तयारी केली होती.राजप्रासादाच्या मार्गावर दुतर्फा असणाऱ्या सुंदर आणि रेखीव वास्तूंच्या गवाक्षात,सौधात नगरजनांनी पुष्पवृष्टी करण्यासाठी गर्दी केली होती. दुंदुभीच्या साथीने रामाचा जयघोष आसमंतात दुमदुमून गेला होता. राजप्रासादात रामाचं भावपूर्ण स्वागत झालं. माता कौसल्या,कैकेयी भेटही झाली. वसिष्ठऋषींच्या मार्गदर्शनाखाली ऋत्विज, ब्रह्मगण, राज्याभिषेकाच्या सिद्धतेत व्यग्र झाले. युवराज्ञी सीता स्वतः जातीने राज्याभिषेकाच्या तयारीत लक्ष घालुन होत्या. न जाणो कोणती कमतरता राहू नये म्हणुन दक्ष होत्या..आणि तो मंगल दिवस उजाडला...

सभामंडपात सर्व निमंत्रितांना रामानं वंदन केलं. वसिष्ठ ऋषींनी रामाला आणि सीतेला रत्नमय सिंहासनावर यथाविधी आसनस्थ केलं. अभिषेकानंतर रत्नखचित मुकुट रामाच्या मस्तकावर विराजमान झाला. शत्रुघ्नानं शुभछत्र धरलं आणि त्रिवार जयजयकार झाला. अयोध्याकुमार राम आता राजा झाला होता.. मात्र सीतेच्या मनात एक हुरहुर दाटुन आली होती. ज्या दिवसाची इतक्या आतुरतेने वाट पाहत होते, ज्याच्या तयारीसाठी दिवसरात्र एक केले होते..तोच विचार..तोच ध्यास..तेच लक्ष्य. .तो दिवस आला आणि गेला देखील..आता पुढे काय..रितेपण..

सिद्धीस कार्य जाता येते सुखास जडता।
जडतेत चेतनेला उरतो न कोणी त्राता।

म्हणुनच की काय वयाच्या अवघ्या एकवीसाव्या वर्षीच ज्ञानेश्वरांनी संजीवनसमाधी घेतली. पण हे झाले लौकिकापलिकडचे. आपल्यालाही हा अनुभव येतोच. आपण तेव्हा काय करावं या विचारात असतानाच टी.व्ही. वर एक जाहिरातीत पाहिली. त्यात अक्षयकुमार सांगतो तसं...तुम्ही थांबू नका..कणीक मळता आलीय ना,पोळी लाटुन बघा..नकाशे बनताहेत,बनु द्या, गोल पण होतील..वरणभात जमलंय ना..पुलाव करुन बघा, आईच्या रेसिपीला तुमच्या स्टाईलने बनवा. तेल गरम आहे ना..भजी बनवा..पण थांबू नका. बस् तेच करायचं.

आज लाॅकडाउनमुळे कित्येक कुंचले रंगात बुडाले, लेखण्या सरसावल्या, वाद्यांवरची धूळ झटकली गेली, अडगळीतली पुस्तके बाहेर आली, सुगरणींची कल्पकता वाढली. काही दिवसांनी हा लाॅकडाउन उठेल तेव्हा फक्त एक करायचं, हे सगळं परत गुंडाळुन ठेवायचं नाही. गरुडासारखी उंच भरारी घेता येत नसेल तर हरकत नाही, म्हातारीचं पीस बनुन उडू या. आनंद उडण्यात आहे. कुणी सांगावं एक दिवस गरुडभरारी पण घेता येईल. फक्त थांबायचं नाही.
पेर्ते राहुन कर्ते बनु या,
क्षणस्थ राहुन मार्गस्थ होऊ या,
शुभास्ते पंथानः संतु ।

-दिपाली ठाकूर

प्रतिक्रिया

उत्कृष्ट लेख. एक वेगळा विचार.
सुरुवात चपखल आणि शेवटही.

लौकिकापलीकडल्या लोकांनी किंवा महात्म्यांनी जे केलं ते केलं. सध्या ज्या कोणाला रितेपणा वाटत असेल त्यांना योग्य दिशा देणारं प्रकटन.

फुटूवाला's picture

9 Apr 2020 - 9:24 am | फुटूवाला

तुम्ही थांबू नका.. +१

शाम भागवत's picture

9 Apr 2020 - 9:34 am | शाम भागवत

मस्त लिहिलंय.
थांबला तो संपला हेच खरे.
आजही तेच लागू आहे.
२१ दिवसांनंतरही तेच लागू असणार आहे.

नंतरही लिहा काही. थांबू नका.

शाम भागवत's picture

9 Apr 2020 - 9:51 am | शाम भागवत

या लाॅकडाऊन मुळे ९ वर्षांनी हा दुसरा लेख आलाय. ;)

पहिलाही लेख असाच नविन विचार मांडणारा होता.<\a>

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2020 - 8:35 pm | चौथा कोनाडा

पहिला लेख वाचला, ९ वर्षांनी हा दुसरा लेख ही.
प्रतिसाद दिल्याच्या काही खाणाखुणा सापडतात का ?

चांदणे संदीप's picture

9 Apr 2020 - 9:59 am | चांदणे संदीप

अत्यंत आवडला.

सं - दी - प

कुमार१'s picture

9 Apr 2020 - 10:08 am | कुमार१

एक वेगळा विचार..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2020 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवीन विचार आवडला. ''सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता'' अगदी पटणारं. आयुष्यभर धडपड चाललेली असते. यव करु आणि समाधानी होऊ, त्यव करु आणि समाधानी होऊ. एक वेळ हे सर्व होऊन जाते आणि पुढे काय ? पुढे काही तरी नवं येतं. थांबून जाण्यात जगण्यात मजा नाही. रामायणातलं अतिशय सुंदर असा दाखला दिला आहे.

थांबायचं नाही, हा संदेश देणारं लेखन आवडलं लिहित राहा. आता तुम्ही म्हणता म्हणून कागदपत्रांची फाईल काढतो आणि जरा व्यवस्थित लावतो. नुसते विखरुन गेलेत सर्व कागदपत्रे.

बाकी, मिपावर पडीक आहेच. आज आमच्या मित्रपरिवारांनी बेचाळीस कुटूंबाला जी हातावरची, त्यांना लॉकडाऊन कामावर जाता येत नाही, अशांना गहू तांदुळ आणि काही वस्तु देण्याचं ठरवत आहोत, हे आमचं कार्य सिद्धीस गेलं म्हणजे स्वतःलाच एक समाधान.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

9 Apr 2020 - 10:30 am | सुबोध खरे

आजच माझ्याकडे एक व्हिडीओ आला आहे. तुम्हाला पाठवून देतो

हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाचा प्रमुख एका दुकानात जाऊन आपल्याकडचा शिधा देऊन त्याऐवजी शॅम्पू आणि साबण सारख्या वस्तू मागतोय. दुकानदाराने विचारल्यावर तो सांगतोय कि माझ्या कडे २००-२५० किलो आटा तसेच इतर शिधा जमा झालाय.

याचकाची वस्तुथिती काय आहे हे पाहूनच दान करावे असे आता मला वाटायला लागले आहे.

दान सत्पात्री असावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2020 - 12:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्हीडीयो पाहिला. लोक किती गरजू आहे, आणि खरंच त्याला कशाची गरज आहे. किती गरज आहे,
हे सर्व पाहुनच मदत केली पाहिजे. नसता अशी नसती आफत सुरु होते.

सदरील व्हीडीयोत ज्याला मदत केली गेली होती. पीठ आणि काही वस्तू तर तो एका दुकानदाराला देऊन
त्या बदल्यात दुसर्‍या वस्तु ज्या की त्याची गरज नाही. अशा तो मागत आहे.

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

9 Apr 2020 - 11:02 am | प्रकाश घाटपांडे

मात्र सीतेच्या मनात एक हुरहुर दाटुन आली होती. ज्या दिवसाची इतक्या आतुरतेने वाट पाहत होते, ज्याच्या तयारीसाठी दिवसरात्र एक केले होते..तोच विचार..तोच ध्यास..तेच लक्ष्य. .तो दिवस आला आणि गेला देखील..आता पुढे काय..रितेपण..>>>> मी काय म्हणतो सीते, भविष्याच्या चिंतेने तू वर्तमानकाळ का खराब करुन घेतीयेस? वर्तमानाचा आनंद तर घे. मनुष्य कायमच सुखी वा कायमच दु:खी कधी नसतो.खर तर प्रत्येक जण कायम एकटाच असतो.काही माणस, आपल्या नातेवाईकांमधे,मित्रांच्या गोतावळ्यात राहूनही आतून एकटीच असतात. विलक्षण एकटेपणा, loneliness असतो त्यांच्यात........
तु विद्याधर बापट यांचा साप्ताहिक सकाळ मधील तरुण म्हातारपण हा लेख जरुर वाच. लिंक देतो.
तरुण म्हातारपण
मस्त गदिमांच गीतरामायण ऐक. रितेपण वाटल की मिपावर ये टाईमपास करायला. काय पटतय का?

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2020 - 11:29 am | चौथा कोनाडा

सुरेख लेख, सीतेच्या अपुर्णत्वाचा वेध घेता घेता शेवटी पेर्ते राहुन कर्ते बनु या, हा दिलेला संदेश महत्वाचा आहे !

आज आपल्या लाडक्या गुड्डी जया भादुरी यांचा वाढ्दिवस आहे (७२ पुर्ण होऊन ७३ व्या वर्षात प्रवेश) ! त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
त्यांचं हे गाणं मला खुप आवडतं

मदनबाण's picture

9 Apr 2020 - 11:56 am | मदनबाण

सीतेवरुन सीताफळ आठवले !

अवांतर :- देशद्रोही समाजाची ठळक लक्षणे !
Coronavirus : काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्याच्या अंतयात्रेला गर्दी, अनेकांचा जीव धोक्यात !
ही देशद्रोही पिल्लावळ स्वतः मरतीलच पण समाजाला इन्फेक्ट करण्यास कारणीभुत होतील हा धोका फार मोठा होत चालला आहे. फुरोगामी अश्या घटनांचा उल्लेख कधीच करत नाहीत हे तुम्हाला आत्ता पर्यंत कळलेच असेल म्हणा !

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Dil De Diya Hai... :- Cover by Sampreet Dutta [ Masti ]

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2020 - 1:33 pm | चौथा कोनाडा

मदनबाण, +१

प्रचेतस's picture

9 Apr 2020 - 12:41 pm | प्रचेतस

अतिशय सुरेख लिहिलंय.
खरंच, ह्या लॉकडाऊनमुळे रितेपण आलंय खरं, पण आपत्तीतूनही संधी शोधत नवे काही शिकता येतंय, नवे काही करता येतंय, नवे काही लिहिता येतंय, नवे काही वाचता येतंय.

ईट कंकडोको एक करके फिर आशियाना बनाना कब मना है .... है रात अन्धेरी पर दिया जलाना कब मना है
अशी आम्हाला अकरावीला एक कविता होती. तिची आज आठवण येते.

मी २००३ साली स्वयं सेवानिवृत्ती पत्करली. त्यानन्तर गेल्या १७ वर्शात एकही नोकरी केली नाही. पत्नीची नोकरी होती. पण खाजगी शाळा पगार बेतास बात.
पण "देवदयेने मला लाभली जगा वेगळी श्रीमन्ती हो ,, भाग्यवती मी भाग्यवती .." असे एक जुने गाणे आहे. तीच माझी गत आहे ! गेले १७ वर्षे काही ना काही प्रोजेक्ट काढीत गेलो. त्यातले एकही प्रोजेक्ट पैसे मिळविण्याचे नव्हते. अपवाद म्हन्जे गायक राहुल देशपान्डे याच्या लग्नाच्या अल्बमात फोटोशॉप चे काम केले त्याचे थोडे पैसे मिळाले खरे ! आचार्य अत्रे व पु ल देशपान्डे यान्च्या बरोबर माझ्यावर गोनिदा व अनिल अवचट यान्चा प्रभाव आहे. अत्रे म्हणतात लहान मुलाला जसे इथे इथे तिथे पहावेसे वाटते तसे मी आयुष्यात सत्तत लहान मुलाच्या उत्सुक ,जिज्ञासू नजरेने पहात आलो .तसे माझे झाले., रितेपणा हा माल ठाउकच नाही. सुदैवाने आन्तर्जालाच्या निमित्ताने ज्ञानाचा इतका अफाट सागर सफरी करायला मिळाला आहे की बस ! गोनिदा व अवचट यानी आपण किती साधे जीवन जगताना आनंद घेऊ शकतो हे दाखवून दिले ! पी येल सारखी विनोदबुद्धी आहे पण दानधर्म नाही करता आला. ते ही जमवू कधी तरी !

मी ८० वर्षे कोण जगले याचा विचार करीत नाही. पस्तीशीतच कोण गेले याचा विचार करतो . दैवाने आपल्याला सर्वसाधारण आयुर्मर्यादा दिली याचे सार्थक आहे.
चुलीवरील स्वयपाकापासून पाईप मधून येणार्‍या वायू पर्यन्तचा बदल आपल्या पिढील पहायला मिळाला ही भाग्यचीच गोष्ट! कोणत्याही गोष्टीचा छन्द लागायला करोनाचे आगमन व्हायलाच हवे का ...... ? हा प्रश्न आपण सर्वानी स्वतः लाच विचारावा. व्रुद्धपण सर्वाना येते . अशावेळी मुळे जवळ नसली ,नातेसम्बध दूर गेले तर आपले छन्दच आपले सवंगडी होऊन येतात . सन्गीताचा नाद नुसती शीळ मारून गुन्गुणूनही करता येतो . त्यासाठी ग्रॅण्ड पियानोची आवश्यकता नाही पण छंद लागण्याची कुठे शाळा नसते हो ! ना त्याचे कुठे दुकान असते !

सुबोध खरे's picture

9 Apr 2020 - 7:19 pm | सुबोध खरे

चौरा साहेब
दंडवत घ्यावा
__/\__

शाम भागवत's picture

9 Apr 2020 - 7:02 pm | शाम भागवत

खरंय.

झेन's picture

11 Apr 2020 - 9:50 am | झेन

अगदी खरं आहे. छान लिहिले आहे.

चौराकाका पहिल्या ओळी पासून सर्व प्रतिसाद भिडतो. ते ग्रॅंड पियानोचं मात्र जरा... वाजवणारा पट्टीचा असेल तर कसलाही कर्कश्शपणा न येता आख्ख्या ऑर्केस्ट्राच काम एक वाद्य करतं राियली ग्रॅंड.

गणेशा's picture

29 Apr 2020 - 5:16 pm | गणेशा

भारी विचार

आज लाॅकडाउनमुळे कित्येक कुंचले रंगात बुडाले, लेखण्या सरसावल्या, वाद्यांवरची धूळ झटकली गेली, अडगळीतली पुस्तके बाहेर आली, सुगरणींची कल्पकता वाढली. काही दिवसांनी हा लाॅकडाउन उठेल तेव्हा फक्त एक करायचं, हे सगळं परत गुंडाळुन ठेवायचं नाही. गरुडासारखी उंच भरारी घेता येत नसेल तर हरकत नाही, म्हातारीचं पीस बनुन उडू या. आनंद उडण्यात आहे. कुणी सांगावं एक दिवस गरुडभरारी पण घेता येईल. फक्त थांबायचं नाही.

एकदम बरोबर

वामन देशमुख's picture

29 Apr 2020 - 6:07 pm | वामन देशमुख

लेख आवडला.