एखादी गोष्ट आपल्याला हवी असते , व ती अगदी अनपेक्षित रित्या आपल्याला मिळते तेव्हा आपली जी परिस्थिती होते तीच सध्या आपली या लॉकडाऊन मध्ये झालीये. आपल्याला अचानक का होईना पण सुट्टी मिळालीये. पण ते २-3 दिवस असतं तर ठीक होतं. आता २ आठवडे झालेत , अजून एक आठवडा बाकीच आहे. त्यातही सध्याची परिस्थिती पाहता ही सक्तीची सुटी आणखी वाढते की काय ? अशी धास्तीही आहे. बरं घरात बसून रोज नवी करमणूक तरी काय शोधायची हा प्रश्न आणखी त्रासदायक. पण त्यावर ईलाज पण आपणच शोधायचाय.
आपल्यातले बरेच लोक असे आहेत की जे कधीकाळी काहीतरी छंद जोपासत होते , कलागुणांना वाव देत होते पण करियर व ईतर गर्दी गोंधळात ते सगळं मागे पडत गेलं. मनातून आपल्याला हे सगळं जाणवत होतंच पण “वेळ नाही” या कारणाखाली आपण आपल्याच आवडीच्या गोष्टींपासून फारकत घेतलेली होती. सतत वेग व घाई मध्ये आपण बांधले गेलो होतो. पण या कोरोना रुपी निन्द्काने आपल्याला सक्तीचा का होईना , आपल्यासाठी , आपल्या कुटुंबासाठी , आपल्या छंदांसाठी वेळ मिळवून दिला आहे . त्याचा मस्त वापर आपण करून घेऊ शकलो तर ही लढाई आपण खऱ्या अर्थाने जिंकलो अस म्हणता येईल.
परवा मी डॉ आनंद नाडकर्णी सरांचं भाषण ऐकत होतो त्यात त्यांनी खूप छान विचार सांगितला. ते म्हणतात की आपण जर या बंदीकाळात स्वत:मध्ये काहीच Value-addition केली नाही तर आपण हा सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने मिळालेला वेळ निव्वळ वाया घालवला असे होईल.
आणि खरं पाहिलं तर फक्त छंद असंच कशाला , आपण आणखीनही काही गोष्टी करू शकतो. आपल्या घरी आपले आई वडील असतील ,मोठी किंवा वयस्कर माणसं असतील त्यांना आपण काही छोट्या छोट्या पण उपयोगी गोष्टी शिकवू शकतो. रामदासांच्या “जे जे आपणांसी ठावे ..... “ या प्रसिद्ध ओळींप्रमाणे आपल्याला येत असणाऱ्या काही गोष्टी , ज्या भलेही आपल्याला छोट्या वाटतात पण इतरांकरता त्या तितक्या सोप्या नसतील त्या त्यांना शिकवू शकतो. अगदी फोनपे , गुगलतेज कसं वापरावं , ऑनलाईन बुकिंग करणे , पैसे भरणे , मराठी मध्ये टाईप करणे , विडीओ कॉल कसे करायचे ईतक्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवू शकतो. याच्यातून त्यांना झालेला आनंद पाहण्यात सुद्धा खूप मजा येईल तुम्हाला. मी तर आमच्या बऱ्याच Whatsapp गृप वर सांगितलं की कोणाला हे काही शिकायचं असल्यास मला फोन करा मी शिकवेन. सहज वेळ निघून जातो शिकवण्यात.
आपल्याला काही गोष्टी येत नाहीत असं आपल्याला या Quarantine आधी लक्षात आलं असेल कधीतरी पण वेळेअभावी आपण त्याकडे लक्ष दिलं नसेल , तर त्या गोष्टी आपण आत्ता करू शकतो , शिकू शकतो.
रोजच्या रामरगाड्यात आपण सर्वात जास्त दुर्लक्ष केलेली गोष्ट म्हणजे आपली तब्येत , आपलं शरीर . या सक्तीच्या सुटीत आपण आपल्या तब्येती कडे , शरीराकडे लक्ष द्यायला शिकू , शरीराला व्यायामाची सवय लावू.
थोडक्यात काय आहे ? “रोज युद्धाचा प्रसंग आम्हा !!” असा सूर काढत बसण्या पेक्षा “सुखदुःखे समे कृत्वा” अश्या नजरेतून आपण या वेळाकडे पाहिलं तर दिवस खूप सुसह्य जाईल.
आपल्यातले बरेच लोक नोकरीपेशा असतील , बरेच उद्योजक असतील . आपल्या सगळ्या लोकांना हा वेळ एक खूप छान “ठेहराव” देणारा आहे. आपण आपले रेज्युमे अपडेट करू शकतो , लिंक्ड इन प्रोफ़ाईल नीट करू शकतो. जे लोक स्वत:चा धंदा / उद्योग करतात , आपण आपले पुढील “बिजनेस प्लान” ठरवून त्याला कागदावर मांडून ठेवू शकतो.
इतकंच कशाला ? आपल्याला या वेळाने “किती कमी संसाधानात व पैशात” आपण आपला निर्वाह करू शकतो हे सुद्धा शिकवलंय. याचा वापर करून आपण येथून पुढे आपल्या पैशांचा , आपल्या संसाधनांचा सुयोग्य व उचित वापर कसा करू शकतो हे पण शिकू शकतो , शिकवू शकतो.
शेवटी काय आहे ? रडत बसणाऱ्या माणसाला दिवस सरत नाही अन काम करणाऱ्या माणसाला दिवस पुरत नाही अशी स्थिती आहे.
मी सुद्धा हे Quarantine सुरु झाल्यापासून बरेच छोटे छोटे उपक्रम केले . मुलासोबत चित्रकला , त्याला रंगवहीत रंगवायला शिकवणे.
स्वयपाकाची आवड असल्याने नवे पदार्थ करून बघितले ,
कॅलीग्राफी खूप आवडते तर ती करून पाहतो रोज. ईतकच काय बोरू व शाईने लिहून पहावं अस मनात आलं , ते ही करून बघितलं.
मी स्वत: Corporate Trainings देतो विविध आस्थापनांत . त्या करता काही नवीन कोर्सेस बनवता येऊ शकतात का ? असा विचार केला , आपल्या मिपा वरच्या मोद्काशी बोललो व तसा नवीन कोर्स तयार केला. काही नवनवीन गोष्टी UDEMY सारख्या एका जबरदस्त संकेत स्थळावरून शिकलो , शिकतोय.
मला स्वत:ला RUNNING करता यायचे नाही , तर या १०-१२ दिवसाचा उपयोग करून घेऊन , वेगवेगळ्या Marathoner मित्रांकडून सल्ले व मार्गदर्शन घेऊन नीट पाळायला शिकलो. २०० मीटर पळालो की दम लागायचा , आता 3 वगैरे किमी हळू का होईना पण सहज पळता यायला लागलंय.
करायला गेलं तर खूप आहे फक्त त्या एका मुक्त नजरेनी बघायची गरज आहे. आलेला प्रत्येक क्षण हा “कसा घालवायचाय?” असा विचार केला तर २४ तास घालवणं मुश्कील होऊन बसेल , पण तेच त्या ऐवजी जर आलेल्या प्रत्येक क्षणात “स्वत:ला कसं जास्तीतजास्त गुंतवून ठेवायचंय ?” असा विचार केला तर २४ तास काय २४ दिवसही कमी पडतील असं मला वाटतं.
शेवटी काय संत एकनाथ म्हणतात तसं ..
माझ्या मनाचें तें मन । चरणीं ठेवावें बांधून
मग तें जाऊं न शके कोठें। राहे तुमच्या नेहटें
मनासी तें बळ । देवा तुमचें सकळ
एकाजनार्दनी देवा । मन दृढ पायीं ठेवा !!
आपण आपल्या स्वत:शी , स्वत:च्या मनाशी मैत्री केली की वेळ अपुरा पडेलच ... आपण या संकटातून सगळे सहीसलामत बाहेर तर पडूच , पण एका नव्या स्वत:शी आपली ओळख झालेली असेल.
आपलाच –
ज्याक ऑफ ऑल .
०६ एप्रिल २०२०
प्रतिक्रिया
7 Apr 2020 - 9:20 am | चौकटराजा
मला स्वतः ला गीतेचा पन्धरावा अध्याय मुखोद्गत आहे पण मी तो नवीन मुलाना शिकवणार नाही कारण त्याचा अर्थ जर त्याना सांगायचा असेल तरच त्याचा उपयोग ! नुसतेच अनेक श्लोक पाठ आहेत पण अर्थ माहीत नाही सबब किमत शून्य ! आताच्या आधुनिक युगाच्या गरजा वेगळ्या आहेत. आपल्यला शरीर आहे म्हणून आरोग्य, युग पैशाचे आहे म्हणून अर्थ व लोकशाहीत जगतो म्हणून कायदा यान्चे साधारण ज्ञान तरी १५ वर्शावरील मुलाना आवश्यक आहे. त्याचे अनेक व्हिडिओ यु ट्युब वर आहेत. ते मुलाना दाखवावे. त्यापेक्शा ही लहान मुले असतील तर ओरिगामी हा एक विकल्प असू शकतो. अर्थात मी नेहमीच गुरू पेक्शा शिष्याचे महत्व अधिक मानत आलो आहे. मुलान्ची जिज्ञासा कोणत्या नटीने सरोगेट केले , कोण किती कोटी घेतो .कुणाचे ब्रेकप झाले याभोवती फिरत असेल ( हे माझ्या घरचेच उदाहरण आहे ) तर बाप व्यासन्गी , जिज्ञासू व रामदासान्चा कितीही भक्त असला तरी तो तो़कडा व विवश असतो हे नक्की !
7 Apr 2020 - 9:46 am | चौकटराजा
https://www.youtube.com/watch?v=SFxHQsr-tRw
इथे वळ्णदार अक्षर यावर 1 तसाचा कॅलिग्राफी विडिओ आहे !
7 Apr 2020 - 10:03 am | चौकटराजा
https://www.youtube.com/watch?v=y6xkdyu1pCQ
आजची टीन एजर मुले मोबाईल अडिक्टेड झाल्याने अत्यंत मॅनरलेस व संवाद हीन झालेली आहेत से माझे निरिक्शण आहे. या विडिओत त्याना संवाद्कक्षम कसे करता येईल याचे दर्शन होते.
7 Apr 2020 - 10:34 am | गवि
लेख आवडला.
7 Apr 2020 - 10:41 am | मदनबाण
इथे hydroxychloroquine या औषधावर प्रतिसाद दिला होता. याच औषधा बाबतीत ट्रप्म तात्यांनी आपल्याला धमकी दिली आहे.
तर आम्ही कारवाई करु, जोरदार प्रत्युत्तर देऊ;डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmir
7 Apr 2020 - 10:53 am | सतिश गावडे
ही निर्यातबंदी का आहे याचा शोध घेत असतानाच ही ताजी बातमी वाचण्यात आली.
India partially lifts ban on export of hydroxychloroquine, hours after Trump’s ‘threat’
7 Apr 2020 - 11:09 am | मदनबाण
ट्रम्प तात्यांनी स्वतः देखील एन ९५ च्या मास्कवर निर्यात बंदी घातली होती, कॅनडा यावर नाखुश होता. तात्यांनी देखील आता त्यांची बंदी उठवली आहे.
संदर्भ :- After Trump Bans All N95 Mask Exports, Canadians Remind U.S. That They Helped Americans After 9/11
Trump and 3M reach deal to allow N95 face masks to be exported to Canada
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmir
7 Apr 2020 - 6:54 pm | मदनबाण
ट्रम्प त्यात्यांचा एकाच औषधा मागे धावण्याच्या मागे असलेला उद्देश...
Trump’s Aggressive Advocacy of Malaria Drug for Treating Coronavirus Divides Medical Community
If hydroxychloroquine becomes an accepted treatment, several pharmaceutical companies stand to profit, including shareholders and senior executives with connections to the president. Mr. Trump himself has a small personal financial interest in Sanofi, the French drugmaker that makes Plaquenil, the brand-name version of hydroxychloroquine.
धाग्यातली कॅलीग्राफी सुंदर आहे, हे सांगायचेच विसरुन गेलो !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmir
7 Apr 2020 - 11:29 am | चौथा कोनाडा
मस्त लेखन ! कथन आवडले !
कॅलीग्राफी एकदम छान !
पळण्यात कौशल्य मिळवले हे मानावे लागेल !
7 Apr 2020 - 12:47 pm | बबु
बरेच दिवस खन्ड पडलेला शिवानन्द योग आता परत सुरु करता आला याचा मला आनन्द होतोय. शिवानन्द योगामध्ये प्राणायाम, सुर्य-नमस्कार, व योगासने या तिन्हीन्चा समन्वय असल्याने तो आरोग्यासाठी एक परिपुर्ण व्यायाम आहे असे वाटते.
https://www.youtube.com/watch?v=iUKjuni-6l8
7 Apr 2020 - 1:01 pm | प्रशांत
कॅलीग्राफी मस्त !
7 Apr 2020 - 1:19 pm | अत्रुप्त आत्मा
छान लिहिलंय. पदार्थ कोणता आहे?
7 Apr 2020 - 1:19 pm | अत्रुप्त आत्मा
छान लिहिलंय. पदार्थ कोणता आहे?
7 Apr 2020 - 1:19 pm | अत्रुप्त आत्मा
छान लिहिलंय. पदार्थ कोणता आहे?
7 Apr 2020 - 1:27 pm | Nitin Palkar
लेका बरोबर केलेली चित्रकला सुरेखच. कॅलीग्राफीही अप्रतिम. पाकृचा फक्त फोटो टाकलात, नाव, थोडे वर्णन टाकले असतेत तर लेखाचा मझा वाढला असता. वै म.
7 Apr 2020 - 1:40 pm | कंजूस
करायला गेलं तर खूप आहे फक्त त्या एका मुक्त नजरेनी बघायची गरज आहे.
अगदी अगदी.
पण वेळ आणि आयुष्य पुरत नाही. इथलं आयुष्य १२० करा.
---------
स्टफ्ड टमाटे आवडले. ऐनवेळी टुथपिक न मिळाल्याने टमाट्यांनी वाईट वाटून न घेता हसत आहेत.
-------
चित्रंही छान.
--------
चौकटराजाने डोला मारून प्रतिसाद दिलाय तोही आवडला.
7 Apr 2020 - 3:20 pm | प्रचेतस
मस्त लिहिलंय.
पाकृ पाहून खल्लास झालोय. सविस्तर वर्णन येऊ द्यात.
7 Apr 2020 - 3:26 pm | दुर्गविहारी
बरेच दिवस या धाग्यांवर लिहीण्याचे मनावर घेत होतो, पण प्रतिसाद द्यायचा राहिला होता, आज लिहीतो.
या वाक्याशी शतशः सहमत आणि गेले पंधरा दिवस आचरणात आणतो आहे.
सर्वप्रथम स्वयंपाक शिकायचा राहिला होता, कुकर लावणे, पोहे साबुदाणा खिचडी आणि पोहे करायचे शिकून घेतले.
मुलीला सायकल शिकवायची होती, ती शिकवतो आहे, शिवाय बुध्दीबळ, पत्ते आणि ओरीगामीही चालु आहे. चित्र काढायलाही शिकवतो आहे.
मि.पा.वरची लेखमाला एक वर्ष लिहीली नाही, त्याचे धागे लिहीतो आहे. पुरेसे धागे झाले की पुन्हा मि.पा.वर पोस्ट करायला सुरु करेन.
बराचसा अभ्यास रहिला होता, काही धागे ऑफलाईन सेव्ह करुन ठेवले होते, ते वाचायचे राहिले होते, त्याचे वाचन करतो आहे. ईतिहासाची विशेष आवड असल्याने शिवाजी महाराजांच्या ईतिहासाची महत्वाची साधने म्हणजे सभासदाची बखर, शिवचरित्रप्रदीप आणि शिवभारत वाचून काढले . शिवचरित्रावर काही लेखमाला लिहीणार आहे, त्याची तयारी सुरु आहे.
माझे दोन व्हॉटस अॅप ग्रुप आहेत, "ट्रॅव्हल" आणि "किल्ले आणि ईतिहास". या ग्रुपसाठी भरपुर लिखाण आणि अधिकृत माहिती देणार्या पोस्ट करतो आहे, शिवाय राहून गेलेली पुस्तके वाचणे. मात्र ईतर व्हॉटस ग्रुपवर डोकवणे कमी केले आहे, उगाच निष्फळ चर्चा म्हणजे वायफळाचे मळे फुलवण्यासारखे आहे.
एकंदरीत मस्त आणि भरपुर काही देउन जाणारा काळ आहे, प्रामाणिकपणे सांगायचे तर वेळ पुरत नाही. लोक तक्रार का करत आहेत , समजत नाही ?
7 Apr 2020 - 9:03 pm | चौथा कोनाडा
+१
7 Apr 2020 - 3:33 pm | अनन्त्_यात्री
कधी आणि कुठे पळता?
7 Apr 2020 - 7:01 pm | चौकटराजा
आमच्या मजल्याची रचना अशी आहे की एक 70 फुटाचा सरळ पॅसेज मिळतो. मजल्यावर कुणालाही चालण्याचे व्यायाम नकोत. हे माझ्या पथ्थ्य्यावर आहे. सोशल डिस्टंसिंग चा नियम पाळून सर्व होते. त्य्यात एका संगीत काराची गीते , गायकाची गीते , भजने असे गट केलेत यामुळे 35 मिनिटे कशी गेली ते कळत नाही. मग 8 मिनिटे लवचिकतेचे व्यायाम.आता पुलंचे कथाकथन ही आलेय जोडीला . कालच " म्हैस' ही कथा ऐकत चाललो.
काही मिळालेली शास्त्रीय माहिती..... करोना आता जे चर्चेत असलेले हयड्रो क्लोरोक्विन हे एक इम्युनोसप्रेसन्ट औषध आहे. जिथे आटो इम्युनिटी चे रोग उदभवतात तिथे व मलेरिया मधे ते वापरले जाते. सध्या करोना मधे याचा उपयोग विषाणूला पेशीत प्रवेश मिळू नये यासाठी होतो आहे.शरीरात प्राण वायूचा पुरवठा जितका महत्वाचा त्याहूनही थोडा अधिक कार्बन डाय ओक्साईड वायू बाहेर जाणे अगत्याचे असते ! फुफुसान्ची भूमिका शरीरातील पी एच योग्य पातळीत ठेवण्यात महत्वाची असते.कार्बन डाय ओक्साईड ही त्या मार्गातील एक धोन्ड आहे. यावरून व्हेन्टीलेटर चे महत्व समजून येईल तसेच हिमोग्लोबिनच्या पातळीचे !
7 Apr 2020 - 7:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रकला कॅलीग्राफी आणि पाककृतीही आवडली. लेख आवडला. लिहायला येत जा शेठ.
आज दिवसभर ऑनलाईन चेस खेळलो. बाकी, रुटीन. पडीक ऑन जालावर.
मित्राने दिलेल्या लिंकवर वाल्मिकीरामायणाचे अधले मधले वाटले ते सर्ग वाचले.
-दिलीप बिरुटे
-
7 Apr 2020 - 8:33 pm | शाम भागवत
छान लिंक.
वाचायच्या यादीत टाकलीय.
_/\_
7 Apr 2020 - 8:41 pm | प्रचेतस
माझ्याशी एकही गेम खेळला नाहीत :(
7 Apr 2020 - 9:05 pm | प्रचेतस
गुल्लूदादाबरोबर एक मॅच खेळता आली. खेळ जबरदस्त झाला.
window.addEventListener("message",e=>{e.data&&"6590144"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});
7 Apr 2020 - 9:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शत्रुपक्षाचा वजीर जिवंत झाल्यामुळे तुमचा शत्रुपक्ष जिंकला.
नाय तर मस्त चांस होता. शत्रुपक्ष इकडे धाग्यावर चार पाच दिवस फिरकले नसते.
-दिलीप बिरुटे
8 Apr 2020 - 3:16 pm | गुल्लू दादा
प्रचेतस छान खेळले. थोडी गडबड झाली शेवटी हे खरंय.
8 Apr 2020 - 5:00 am | अर्धवटराव
गेले दोन आठवडे मिपावर काय मस्त मस्त धागे निघताहेत लॉकडाऊनवर... च्यायला... पब्लीक धमाल सुट्टी एंजोय करतय.
आमची मात्र कसोटी बघतय हे घरी राहाणं :( घरुन काम करायचं म्हणजे खरच घरुन काम करायचं असा काहिसा अर्थ काढलाय मालकाने :) स्क्काळी (डबल 'क' लक्षात घ्या मंडळी) एक कप चहा होत नाहि तो थेट कामावर भिडणं होतं.. ते पार रात्री उशीरापर्यंत. हि एफिशियन्सी बघुन आता एरवीसुद्धा आम्हाला घरुनच काम करायला म्हणतोय कि काय मालक अशी अवस्था झाली आहे :)
करा लेकहो, मजा करा.
8 Apr 2020 - 12:06 pm | पक्षी
घरून काम करण्यामुळे काम जास्त वाढलं आहे.
ऑफिसला होतो तेव्हा अर्ध्या तासाचा लंच, नंतर शतपावली, ४ ला चहा, गप्पा. संध्याकाळी परत कॅन्टीन, एक लाँग वॉक, रात्री जिम्, असले उद्योग चालू असायचे.
कंपनीसाठी घरून काम करण्याची पद्धत नवीन असल्याने, सध्या प्रत्येक तासाच्या कामाचा हिशोब एक्सेल मध्ये पाठवावा लागतो. रोज दोन वेळा स्टँड अप मीटिंग. सकाळी उठून सगळं आवरून कामाला बसायचं ते थेट रात्री पर्यंत, मध्ये फक्त जेवण. जेवणं दरम्यानसुद्धा फोन वर बोलण चालू असतं.
सध्या कंपनी कर्मचाऱ्यांसाठी कोरोना सर्वेक्षण आणि blood sample collection संकेतस्थळ बनवत असल्यामुळे रात्रदिवस काम चालू आहे. शनिवार, रविवार सुद्धा काम चालू आहे.
तरीसुद्धा वेळ काढून रामायण, महाभारत मुलांसोबत बघत आहे. बघताना मुलांना प्रश्न पडतात, त्याची उत्तर देणं. मजा येते बघायला, लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. मोगली सुद्धा सुरू झालं आहे दूरदर्शन वर.
8 Apr 2020 - 10:05 pm | चित्रगुप्त
लेख एकंदरित आवडला आणि प्रतिसादही.
हे तर योग्यच आहे, परंतु तरूण पिढीला सुद्धा वॄद्धांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असूनही तिकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष किंवा कधीकधी त्यांची अवहेलना/हेटाळणीही केली जाते, हेही तितकेच खरे. सध्या मिळालेल्या निवांतपणात याचाही विचार व्हावा.
2 May 2020 - 9:36 am | गणेशा
कॅलीग्राफी खुप आवडली..
वेळ सत्कारणी लावणे योग्यच