शिक्षण संपून नोकरीला लागल्यापासून एक चुकार विचार नेहमी मनात यायचा, ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस या चक्रातून आपली नोकरी करण्याचं वय संपल्यानंतरच सुटका होईल का? अगदी एखादा आठवडा का होईना, अगदी निवांत घरीच राहता येईल का? कुठे जाणं नाही, गर्दी-रहदारीत अडकणं नाही, कसली धावपळ नाही. म्हणजे कसं जगणं मोबाईलच्या एयरोप्लेन मोडप्रमाणे अत्यावश्यक गरजांच्या मोड वर टाकून शांत राहायचं.
हा विचार जसा मनात यायचा, तसाच पटकन निघूनही जायचा. कदाचित त्यालाही कळलेलं असावं की माझं निवृत्तीचं वय बरंच दूर आहे. काही नियोजनपुर्वक निवृत्ती घेणारे भाग्यवान सोडले नोकरी करणार्या अथवा व्यवसाय करणार्या प्रत्येकाच्या मनात हा विचार कधी ना कधी आलाच असेल आणि त्यावर काही पर्याय नाही म्हणून असा विचार मनातून झटकून टाकला असेल.
मात्र अचानक ही वेळ आली. नव्हे नियतीने म्हणा वा निसर्गाने म्हणा, ही वेळ सक्तीने लादली. माझ्यावर, माझ्या नातेवाईकांवर, माझ्या शेजार्यापाजार्यांवर, माझ्या शहरातील, राज्यातील, देशातील प्रत्येकावर. जगातील बहुतांश माणसांवर. काहींना आपल्या धावण्याचा वेग कमी करावा लागला आहे, काहींना आपलं धावणं पुर्णतः थांबवून घरात शांत बसावं लागलं आहे. एखाद्या दिवसाच्या "बंद"नेही विस्कळीत होणारे जनजीवन गेले आठ दिवस नजरकैद अवस्थेत चालू आहे. अर्थात स्थलांतरीत मजुरांसारख्या काही दुर्दैवी जीवांच्या नशीबी ही त्यातल्या त्यात बरी अशी नजरकैदही नाही हे ही तितकेच खरे.
डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात पसरलेला कोरोना विषाणू चीनच्या बाहेर पडणार नाही याच भ्रमात सारे जग होते. "काहीही खातात लेकाचे. यांना हा कोरोना गेला की कुकर लावायला शिकवायला हवे" असा विचार आपण करत असतानाच कोरोनाच्या महामारीने जगभर थैमान घातले, आपल्या देशातही शिरकाव केला आणि आपण सावध झालो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार कार्यरत झाले आणि एक दिवस तोंडाला रुमाल बांधून दबकत दबकत ऑफिसला जाणं बंद होऊन वर्क फ्रॉम होम सुरु झाले सार्यांचे.
या सक्तीच्या स्थानबद्धतेमुळे यापुर्वी मनात येणारा चुकार विचार सत्यात उतरला आहे. अगदीच रीकामा वेळ नसला तरी घराबाहेर पडणंच बंद झाल्याने फावला वेळ मिळत आहे. मनात आलं की बुकशेल्फवरील एखादं पुस्तकं उचलून वाचणं चालू करता येतंय. "पुढे वेळ मिळाला की शिकू" असं म्हणत शिकणं पुढे ढकललेली CSS ही वेबसाईट्सच्या पेजेसना सुंदर बनवणारी भाषा मुळातून शिकतोय. मागे कधीतरी उत्साहात विकत घेतलेला आणि नंतर अडगळीत पडलेला व्हायोलीनही बाहेर काढून युट्युबवरील व्हिडीओ पाहत शिकण्याचा प्रयत्न करुन पाहीला, आणि ये अपने बसकी बात नही हे लक्षात येताच ठेवूनही दिला.
या लॉकडाऊनमध्ये कधी नव्हे तो तो आपल्याला थांबून विचार करायला वेळ मिळाला आहे. संध्याकाळी बाल्कनीत येऊन जेव्हा निर्मनुष्य रस्त्याकडे पाहतो, तेव्हा मनात विचार येतो की शेवटी निसर्गाने माणसाला त्याची जागा दाखवून दिली आहे. अगदी चंद्रावर पाऊल ठेवणार्या माणसाला उघड्या डोळ्यांनीही न दिसणार्या आणि सजीवही नसणार्या विषाणूने त्याला हतबल केलं आहे. लागण होताना त्याने देश, धर्म, जात, पंथ, लिंग, गरीब-श्रीमंत असा कोणताच भेदभाव पाळलेला नाही. स्वतःला प्रगत समजणार्या, आधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध असणार्या देशांमध्येही त्याने हजारो बळी घेतलेत. कायम भौतिक प्रगतीच्या मागे ऊर फुटेस्तोवर धावणार्या, संरक्षणाच्या नावाखाली विध्वंसक, संहारक अस्त्रे निर्माण करणार्या माणसाला त्याने सक्तीने थांबायला लावलं आहे, त्याच्या प्राथमिकता काय आहेत याचा विचार करायला लावलं आहे.
चीनमध्ये जसा कोरोना आटोक्यात आला आहे तसा तो इतरत्रही येईल. मात्र प्रश्न हा आहे की इथून पुढे तरी माणूस शहाणा होईल का?
प्रतिक्रिया
2 Apr 2020 - 8:49 am | प्रचेतस
सक्तीची विश्रांती सर्वांच्याच नशिबी आलीय.
बाकी माणूस चुकांमधून शिकतो म्हणतात पण ते फारसं प्रत्यक्षात येत नाही, हे दिवस गेले तर परत ये रे माझ्या मागल्या असंच होणार.
2 Apr 2020 - 8:52 am | प्रकाश घाटपांडे
हीच भीती मनात आहे. या दिवसात ध्वनीप्रदूषण वायुप्रदुषण प्रचंड कमी आहे.
2 Apr 2020 - 9:49 am | कुमार१
गेल्या काही वर्षांपासून आम्ही घरात रोज १ तास पत्ते खेळत आहोत. त्याचा सध्या तर आम्हाला खूप उपयोग होत आहे. आम्ही एका वेळेस अर्धा तास असे दोनदा खेळतो. त्याची विभागणी अशी असते:
१. नेहमीचे पत्ते: यात आमचा आवडता खेळ आहे ‘रशियन रमी.’ पारंपारिक रमीत आपल्याला सर्व पाने शेवटपर्यंत हातात ठेवावी लागतात. ते थोडे ‘ओझे’ वाटते. या उलट या खेळात आपापले अनुक्रम लागले की ते पत्ते खाली मांडावे लागतात. अशा तऱ्हेने हातातील भार हलका होत शेवटी एकजण सुटतो आणि खेळ संपतो.
२. ‘UNO’ पत्ते : हा वेगळाच प्रांत आहे. हे पत्तेही वेगळे असतात. यात चार रंगाची पाने आहेत. रंगावर रंग किंवा अंकावर अंक असे करत पाने खाली टाकायची. विशिष्ट पान एखाद्याने टाकल्यास पुढच्याने शिक्षा म्हणून २/४ पाने उचलायची, असा हा खेळ आहे. ज्याचा हात प्रथम रिकामा होतो, तो जिंकला.( हाच खेळ नेहमीचे पत्ते वापरूनही खेळता येतो, काही संकेत वापरून).
आलटून पालटून हे दोन्ही प्रकार खेळायला मजा येते. तसेच या खेळांमुळे आपण तो वेळ इ-उपकरणांपासून लांब जातो हाही फायदा.
2 Apr 2020 - 3:31 pm | मोदक
१) खाली मांडायचे म्हणजे ओपन करायचे की कुणाला न दाखवता खाली ठेवायचे..?
२) ..आणि समजा पहिला तीनपानी सिक्वेन्स लागला म्हणून पत्ते खाली ठेवले आणि नंतर त्यातलेच चौथे पान आले तर खालचा सिक्वेन्स उचलायची परवानगी असते का..?
३) जर (२) प्रमाणे परवानगी नसेल तर पत्ते खाली ठेवणे बंधनकारक कसे करणार..? शेवटी हातात एकच सिक्वेन्स राहिला पहिजे.. असे कांही नियम..?
2 Apr 2020 - 4:40 pm | कुमार१
खाली मांडायचे म्हणजे
>>>
उघडच मांडायचे. उदा. एकाच प्रकारचे ७,८,९.
आता अजून एक. समजा एखाद्याने वरील पाने खाली लावली आहेत तर त्यानंतर इतर खेळाडू त्या अलीकडचे/पलीकडचे एकेक पान पण जोडू शकतात. म्हणजे ६ /१०. थोडक्यात इथून पुढे हा खेळ काहीसा ‘ब दा म७’ सारखा होतो.
2 Apr 2020 - 5:27 pm | मोदक
भारी आहे.. धन्यवाद नवीन माहिती सांगितल्याबद्दल..!!
2 Apr 2020 - 5:31 pm | कुमार१
यात फक्त अनुक्रमच लावतात. ३ /४ राजे /राण्या, इ. चालत नाही.
शेवटी एक पान मिटण्यासाठी ठेवावे लागते.
2 Apr 2020 - 9:56 am | चांदणे संदीप
आधी सहा ते आठ तास काम चालू होतं. चहा, नाश्टा, फोन, गप्पा, बाहेर चक्कर टाकून येणं वगैरे सगळ पकडून. आता सकाळी दहाच्या ठोक्याला कामाला सुरूवात करतो आणि फक्त एक लंचचा ब्रेक घेऊन संध्याकाळी आठला काम बंद करतो. म्हणजे काटेकोर नऊ तास वगैरे रोज काम होतं आहे, जे कदाचित लॉकडाऊननंतरही शक्य होणार नाही.
नाही म्हणायला, सकाळी आणि संध्याकाळी रामायण मालिकेमुळे चांगला विरंगुळा होत आहे. नऊ दिवस कसे गेले कळालंसुद्धा नाही. असेच बाकीचेही जाऊदे आणी लॉकडाऊननंतर चांगली सुट्टी मिळू दे रे देवा महाराजा! ;)
सं - दी - प
2 Apr 2020 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्लीशी सहमत. सध्या सर्वांना सक्तीची विश्रांती आहे म्हणून माणसाच्या गुणांना किंचित शहाणपण आल्यासारखे वाटते, तो केवळ भास आहे, माणूस शहाणा होणार नाही. सध्या जीवावर संकट बेतलय म्हणून माणसाचे असलेले षड्रिपू कासवाच्या मानेसारखे जरासे आत ओढ्ल्या गेले आहेत. सध्या सर्वांना सक्तीची विश्रांती आहे. आणि निव्वळ अगदी मनापासूनची विश्रांती नाही, विश्रांती सहन करावी लागतेय. जरा वातावरण निवळू द्या, मग म्हणाल की हाच तो माणूस आहे का जो संचारबंदीच्या काळात देवमाणूस वाटत होता.
बाकी, प्रत्येक दिवस विषाणु आणि त्याच्या संबंधित नव-नव्या बातम्यांनी वातावरण ढवळून निघत आहेत. लोकांची बेफ़िकिरी आणि वाढत चाललेली रुग्णाची भर, काही मृत्यु आणि अनेक रुग्ण बरेही होत आहेत ही दिलासा देणारी गोष्टी आहेत. जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढत आहेत, आणि दररोजच्या मजुरीवर पोट भरणा-या अनेक कुटुंबाची वाताहत होत आहे.
सामाजिक जवाबदारी म्हणून आम्ही काही मित्रांनी परिसरातील जे अत्यंत गरजू लोक आहेत जे संचारबंदीमुळे कामावर जाऊ शकत नाही, अशांना गहु, तांदुळ, दाळ तेल साखर पुरवायचं ठरवलं आहे, ज्यामुळे काही काळ त्यांचा उपासमारीत जाणार नाही, असे वाटते.
बाकी, नेटावर पडीक असल्यामुळे काल रात्री एक भयकथेचा कच्चा ड्राफ़्ट उतरला होता, थोडा वेळ लिहिलं. तो आवेग ओसरला आणि ठेवून दिलं. कथाजागर या पुस्तकातल्या काही कथा वाचल्या.श्री म. माटे यांची, तारळ खो-यातील पि-या आणि जी.ए.कुलकर्णी यांची विदूषक कथा. बाकी, मिपावर पडीक आहेच.
-दिलीप बिरुटे
2 Apr 2020 - 11:41 am | चौकटराजा
माणसाने प्रगति केली त्यात अभियान्त्रिकी प्रगतीचा मोठा वाटा आहे. यात संशोधकाचा एक फायदा असा आहे की त्यात फक्त जड सृष्टीशी मुकाबला आहे. जीव वैज्ञानिकांचे काम यापेक्षा अधिक कठीण आहे . त्यात सूक्षम पातळीवर काय चालले आहे हे पाहण्यासाठी आजचे कितीही प्रगत असले तरी मायक्रोस्कोप अपुरे आहेत. परत त्यात स्वत: चा जीव धोक्यात जाण्याचाही संभव. पण " आरोग्य " या मूलभूत गरजेकडे अक्षम्य हेळसांड झालेली आहे. पुतळे ,उत्सव , चित्रपट निर्मिती , अवकाश संशोधन , मिलिटरी यात गरज नसताना पैसा मानव जातीने घातला आहे . या महामारीच्या निमित्ताने आरोग्य हा एक्सपेंडिचर हेड चे महत्व अधोरेखित होणार आहे. ते जर झाले नाही तर मोठ्या प्रमाणावर नरसंहार करायला निसर्गाला .आवडेलच . व्हायरस न्रिमितीला निसर्गाला फारसा खरच येत नाही . फक्त एका मानवी पेशीला गुलाम करायचे की हजारो व्हायरस सुसाट !
2 Apr 2020 - 12:43 pm | धर्मराजमुटके
मिपा आणि ऐसीवर अरविंद कोल्हटकर नावाचे गृहस्थ होते. जुन्या जमान्याच्या गोष्टी (म्हणजे आठवणी) छान लिहायचे ते ! हल्ली दिसत नाहीत.
प्लेगच्या महामारीच्या आठवणी असणारे हयात आहेत काय ? किंवा त्या आठवणी लहानपणी ऐकलेल्या आहेत काय ?
2 Apr 2020 - 1:28 pm | चौकस२१२
भारतात २१ दिवस घरबंदी त्यामुळे निदान तात्पुरते का होईना एक लक्ष्य आहे लोकांना ...
इकडे तसे नाही त्यामुळे विचित्र उदासीनता ...
- रोज मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांचं आणि इतर मंत्र्यांचं घोषणांचे एक जणू वेळापत्रक ठरले आहे येथे ...ते पाहणे / ऐकणे आणि आपण त्यात कुठे बसतो ते पाहणे ..हे एक काम,
- दोन लढे चालू आहेत एक विषाणू बरोबर आणि दुसरा आर्थिक परिणाम ...(भारतात जसे गृह हे चर्चेचे महत्वाचे खाते असते इकडे अर्थ हे खाते जास्त महत्वाचे आणि चर्चेचे असते )
-अजूनही हिवाळ्याला २ महिने आहेत त्यामुळे मुख्य फ्लू चा मौसम झाल्यावर देशातील कोरोना परिस्थिती टिपेला पोचेल असे तद्न्य म्हणत आहेत ,, (या शनिवारी फ्लू ची वार्षिक लस टोचून घेणे)
- एकूण हि परिस्थती ६ महिने तरी राहील असे गृहीत धरून सरकार पाऊले टाकीत आहे हेतू हा कि जी काही पाऊले टाकू ती आपल्याला ६ महिने किंवा अधिक राबवता आली पाहिजे .. पंतप्रधान म्हणाले ..
- सर्व कामगारांना त्यांच्या जमलेल्या रजेच्या दुप्पट पण अर्ध्या पगारी रजा घायला आज पासून परवानगी,
- पाळणाघरे जी आधीच ६०% सबसिडी होती ती रविवार पासून १००%
- भाडेकरूंना भाडे देता येत नसेल तर हुसकावता येणार नाही हे घोषित पण मग मालकाला गृहकर्ज असेल तर त्याला बँक काही १००% सुटी देणार नाहीये ... त्यामुळे त्याबद्दल काय होतंय याची वाट पाहणे (प्रत्येक मालक काही गडगंज असतो असे नाही हे सरकार लक्षात घेईल अशी अपेक्षा )
- उद्योगात सरकार निर्यात वाल्यांचे फ्रेट साठी पैसे देणार ( बराचसाउच्च प्रतीचा माल हा प्रवासी विमान कंपन्यांच्या नेहमीच्या उड्डाणने होत असल्यामुळे आणि ती उड्डाणे रद्द झाल्यामुळे र्मोठा परिणाम)
- चीन मधून खाण्यापिण्याचं गोष्टी येण्यावर देश अवलंबून नसला तरी अनेक पडद्या आड च्या गोष्टी साठी चीन वर अवलंबून त्यामुळे अदृश्य काळजी आहेच
- काही उद्योगांवर विचित्र प्रणाम आणि त्यामुळे निर्माण होणारे सामाजिक पेच उदाहरणार्थ क्रूझ जहाजांवर अडकलेले प्रवासी )
- बागेत मेथी, वांगी आणि कोथिंबीर लावली आहेत .. बघू कसे काय येते ते रविवारी बहुतेक खायची इटालियन किंवा व्हिएतनामी तुळस , मिरच्या लावण्याचा विचार आहे
-आंतरजालावर मराठी पुस्तके कुठे आहेत का ? माहिती हवी आहे
2 Apr 2020 - 6:08 pm | सतिश गावडे
Marathi : Books by Language ईथे जूनी मराठी पुस्तकं आहेत. बरीचशी धार्मिक प्रकारातील आहेत.
3 Apr 2020 - 3:37 pm | Nitin Palkar
एका संकेत स्थळाचा पत्ता :
http://www.esahity.com/
ही साईट उघडून बघा...
2 Apr 2020 - 1:35 pm | सस्नेह
कायप्पावर एक चिंतनीय ढकलपत्र आलं आहे.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जगभर प्रदूषणाची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. हरीण, मोर पक्षी शहरांमधून मुक्त संचार करु लागले आहेत. झाडं हिरवीगार, समुद्रकिनारे लख्ख, इआकाश निळंभोर, हवा शुद्ध !
....कहीं असली व्हायरस हमही तो नही ?
2 Apr 2020 - 3:34 pm | मोदक
कहीं असली व्हायरस हमही तो नही ?
भारी थेअरी आहे.
आणखी एक थेअरी घ्या.. ऑक्सिजन माणसावर स्लो पॉयझनिंग करतो आणि एक जीव ७०-८० वर्षात हळू हळू संपवून टाकतो.
:D
2 Apr 2020 - 3:51 pm | सस्नेह
इथे कुणाला मरायची घाई आहे :D
2 Apr 2020 - 6:20 pm | शाम भागवत
तुम्हाला ८० वर्षांपेक्षा जास्त जगण्यासाठी शुभेच्छा.
:)
2 Apr 2020 - 5:58 pm | चौकटराजा
डॉ जॉन डोयर यांचे एक पुस्तक आहे . त्याचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. त्याची सुरुवातं मुळी " वी इट थाऊसंड्स ऑफ व्हायरसेस अँड बॅक्टिरिआ एव्हरी मिनिट अँड स्टील मॅनेज टू लिव्ह फॉर डेकेडस ! " हू रेकॉग्निझ देम अँड किल देम ??? .................. द मिरक्युलस इम्यून सिस्टम .
वरील विधानच सांगते माणूस हा देखील एक मोठा धोकादायक ऑरगॅनिझम आहे . ( त्याच्यातील स्वार्थी वृत्ती , खुनशी वृत्ती , प्रगतीने त्याने केलेले धोके याचा बायोलॉजिकल धोक्यांशी काही संबंध नाही .) आता धोकादायक कुणाच्या साठी .....? जे त्याचे शत्रू आहेत त्यांच्या साठी म्हंजे १ जीवाणू २ विषाणू ३ बुरशी ४ परजीवी ई याखेरीज असात्म्यता , विषारी वायुप्रयोग ,प्रचंड रक्तस्त्राव हीही मरण्याची इतर संभवनीय कारणे आहेत.
पण सर्वानी आपली विचारशक्ती मानवी संबंध या पलीकडे नेऊन विचार केला तर असे आढळून येईल की निसर्गात माणसाबरोबर या चार शत्रू ना देखील जगण्याचा अधिकार आहे. सबबी हा सनातन लढा आहे. त्यापुढे गरीब श्रीमंत लढा ,भांडवल शाही समाजवादी लढा , हिंदू मुसलीम लढा ,आय टी आयटीतर लढा हे फार गौण आहेत.
2 Apr 2020 - 6:15 pm | सतिश गावडे
हे वाक्य विचार करायला लावणारे आहे. आपण माणसं जेव्हा पृथ्वीचा आणि पर्यावरणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा तो माणसाच्या परिप्रेक्षात करतो. जणू काही पृथ्वीवरील संसाधनांवर पहीला हक्क मानवाचा आहे. ईतर जीवसृष्टी दुय्यम आहे.
2 Apr 2020 - 11:01 pm | शाम भागवत
आमचे आजून थोडेसे
25 Mar 2019 - 7:06 pm | चौकटराजा
पुन्हा डॉ जॉन डोयर यान्चे वाक्य आठवले ...इव्हन इफ ऑल युवर सिस्टम्स आर ओके, यू विल डाय आयदर विथ कॅन्सर ऑर न्युमोनिया ... दॅर् इज गिफ्ट ऑफ एजिन्ग !
दुसरे असे की सर्व गोष्टी लिनियर लॉजिक ने घडतात असे नाही तर क्वान्टम लोजिक म्ह्णण्जे अत्यन्त गुन्तागुन्ती स्वरूप कारणाच्या समुच्च परिणाम म्हणून होतात ,याच गुन्तागुन्तीचे दुसरे नाव " दैव" !
2 Apr 2020 - 10:04 pm | कानडाऊ योगेशु
कायप्पा वर एक मेसेज आला होता. कोरोना इज नेचर्स क्युअर टु एलिमिनिट ह्युमन व्हायरस!
2 Apr 2020 - 6:18 pm | शाम भागवत
२९ फेब्रुवारीला नर्मदा परिक्रमा सुरू झाली. असं काही असलं की, मी वर्तमानपत्र वगैरे वाचायचे बंद करतो. गप्पा मारणे कमी करून किंवा बंद करून जप वाढवायचा प्रयत्न करतो. आम्ही ६८ जण होतो. ६६ जण अहमदनगरच्या क्षीरसागर महाराजांचे शिष्य होते. मी व बायकोच फक्त बाहेरचे. पण आम्ही दोघे जप करणारे असल्याने आम्हाला ते व त्यांना आम्ही ऑड मॅन आऊट वाटलो नाही.
तरीपण मोबाईल आपल्याला जगापासून विशेषतः घरापासून, मित्रमंडळींपासून वेगळे होऊ देत नाही. हे या ट्रीपमध्येही जाणवत होतं. मोबाईल वापरायचा नाही असं म्हणूनही कोणीतरी फोटो काढा असं म्हणायचं. एकदा का मोबाइल उघडला की, ..........
तर आम्हा ६८ जणांना एकत्रित सूचना देण्यासाठी कायप्पावर ग्रुप केला होता, तो बघायला लागायचा. एकदा का कोणत्याही कारणासाठी मोबाईल उघडला की, मग काय होतं ते काय सांगायला पाहिजे काय? :) मोबाइल म्हणजे छोटा पण कल्पना करता येणार नाही इतकी प्रचंड ताकद असलेला इडियट बॉक्सच आहे.
पण माझा तो मोबाइलच हरवला. बायको जरा हिरमुसली. पण मी तर एक छान संधी मिळालीय अस समजायचं ठरवलं. एका क्षणात ६८ जण सोडल्यास, सर्व जगापासून अलिप्त झालो. फक्त "नामस्मरण" हा विषय निघाला की मग मात्र मला तोंड बंद ठेवणे शक्य व्हायचे नाही. :) :) तरीपण इतरांनाच जास्त रस नसल्यामुळे २-३ वेळेसच तोंड उघडायला लागले. घरचे राहू देत. मित्रमंडळी सुद्धा आठवली नाहीत. कोरोना, मोदी, ठाकरे पवार वगैरे तर खिजगणतीतही नव्हते. मिपा, मायबोली व कायप्पा शिवाय आपण आरामात जगू शकतो हा विश्वास दिवसेंदिवस वाढतच चालला होता.
१८ मार्चला परत आलो. नवीन कार्ड विकत घेतले. पण एवढ्यात फोन विकत घ्यायचा नाही हे ठरवून टाकले होते. घरच्यांना हे कसे पटवायचे ते मात्र कळत नव्हते. शेवटी त्यांना सांगून टाकले की, रिलायन्सचा ५जी फोन येतोय. तेव्हाच घेऊ. सध्या तरी तात्पुरती वेळ मारून नेता आलीय.
थोडक्यात माझे सोशल मिडिया डिस्टंटिंग किंवा लॉकडाऊन सुरू होऊन महिना होत आलाय. आता त्यात सोशल डिस्टंटिंगची भर पडलीय. पण खूप मस्त वाटतंय. फक्त ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्याबद्दल काळजी वाटतीय. पण त्याबाबत आपण फक्त विचार करू शकतोय, बाकी काही करता येणं शक्य नाही हेही कळतंय. असो.
शनिवारी नेहमीप्रमाणे पहाटे लवकर जाग आली. सवयीने जपाला बसलो. पण सतत आद्य शंकराचार्यकृत देवी अपराध क्षमापन स्तोत्राची आठवत होत होती. मी नेहमी स्तोत्रे वगैरे म्हणणारा नाही. त्यामुळे असे का होतंय ते काही कळत नव्हतं. पण नर्मदा परिक्रमेत क्षीरसागर महाराजांचे शिष्य भरपूर स्तोत्र वगैरे रोज म्हणत असत. त्यामुळे असं होत असेल अशी मी मनाची समजूत घालत होतो. येवढ्यात लक्षात आले की हे स्तोत्र तर आपण नर्मदा यात्रेत कधीच म्हटले नव्हते.
आज अठ्ठावीस तारीख आहे. एका वेगळ्याच वातावरणात राहावयाच्या प्रयत्नाला बरोबर एक महिना झालाय. त्यामुळे असे होत असेल असेही वाटले. पण या विचारात फारसा दम नव्हता.
माझे वडील गुरुचरित्राचा पाठ दरमहिन्यांत करत असत. त्या सात दिवसात हे स्तोत्र तसेच करुणात्रिपदी म्हणत असत. त्यांचा आवाज ही चांगला होता व शास्त्रीय गाण्याचं पण अंग होतं. रात्रीचे आठ-साडेआठ वाजलेले असत. दिवे बंद करून देवापुढे समई, निरांजन व उदबत्ती लावलेली असे. सगळीकडेच शांतता पसरलेली असे. आई वडील सर्वात पुढे बसलेले असत व आम्ही चारही भावंडे मागे बसलेले असू. वडील मोठ्याने म्हणत असत व आम्ही फक्त श्रवणभक्ती करायचे. वडिलांचे ते भावपूर्ण म्हणणं आठवलं की आजही तात्काळ अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात. अंदाजे पन्नास पच्चावन वर्षांपूर्वीच्या घटनांबद्दल लिहितोय मी.
मी त्या वेळेस शाळेत होतो. त्यामुळे मला शब्द वगैरे आजही आठवत नाहीयेत. आठवतंय ते चाल, नाद आणि वडिलांचा भावनेने ओथंबलेला आवाज. आजही पहाटे अचानक तेच आठवत होते. पण आज मात्र शब्द काय असावेत याचं कुतूहल निर्माण झालं होतं. ह्या कुतूहलाने मला फार काळ जप करू दिला नाही. गुगलदेवाला शरण जाऊन http://web.bookstruck.in/book/chapter/45823 या साईटवरून शब्द मिळवले. त्या साहाय्याने वडिलांच्या चालीत स्तोत्र म्हणून पाहिले. मस्त वाटले. थोडावेळ तसाच बसून राहिलो. परत एकदा म्हणावेस वाटल्याने परत एकदा म्हणून पाहिले. निव्वळ आठवणीतल्या चालीमुळे शब्दफोड करणे जमून गेले होते.
थोड्यावेळाने स्तोत्राच्या अर्थाबद्दल कुतूहल निर्माण झाले. मग त्याच साईटवरील अर्थ वाचून काढला. काहीतरी राहतंय, सगळा अर्थ नीट येत नाहीये अशी भावना सारखी मनात येत होती. ही रचना शंकराचार्यांनी नामस्मरणाच्या महती सांगण्यासाठी तर रचलेली नाही ना? असं काहीतरी मनात येत होतं.
नुकताच नर्मदा परिक्रमा करून परत आलेलो होतो व त्या यात्रेत नामस्मरणाबद्दल विचारांचे जे काही आदान प्रदान झाले होते. त्यामुळेच मला असं काहीतरी वाटतंय अशी मी माझ्या मनाची समजूत घालत होतो. पण शेवटी आपल्याला काय वाटते ते स्वैर भाषांतर म्हणून लिहून काढायला काय हरकत आहे असे वाटल्याने ते शनिवरी व रविवारी कच्च्या स्वरूपात लिहून काढले. शुद्धलेखन तपासण्याची सोय फक्त मनोगतावरच असल्याने ते काम तिथेच पार पाडत होतो. मनोगतावर ही एक चांगली गोष्ट आहे. तसेच लेख अप्रकाशित ठेवून सेव्ह करता येतो. त्यामुळे जसं सुचेल तसं त्यात भर घालत होतो.
दोन दिवस सगळं कसं छान चाललं होतं. एवढ्यात तो लेख प्रकाशीत झाला. कसा झाला ते काही कळलं नाही. मी जरा हिरमुसल्या सारखा झालो. अजून बरंच काही लिहायचं होतं. पण आता ते सगळं गुगल ड्राइव्ह वर चढवलंय. तेव्हापासून जप करायचा, लेखावर विचार करायचा. जेवायला बोलावले की, जेवायचे. असा मस्त कार्यक्रम चाललाय. दीक्षितांच्या कृपेमुळे दोनदा जेवले की तोंड उघड्यासाठी बाकी कशाची जरूरी भासत नाही. आणि........
नामस्मरण किंवा देव्यपराधक्षमापन स्तोत्राबद्दल काही ऐकण्यांत घरातल्या इतरांना फारसा रस वाटत नसल्याने सध्या मौनव्रतही चालू झालंय. :) फक्त स्वतःशीच भरपूर बोलतोय. फोन नसल्यामुळे त्यात अजिबात व्यत्यय येत नाहीये. :)
काल का परवा माबो उघडला. प्रथम फुकटात विनासायास वेटलॉस बद्दलची स्वतःच स्वतःवर लादून घेतलेली जबाबदारी पार पाडली. मग मिपावर तो धागा अद्ययावत करण्याशिवाय पर्यायच नव्हता. मिपा उघडला. जबाबदारी पार पाडली. पण................
लागलीच संगणक बंद काही करता आला नाही. लॉकडाऊन: पहिला दिवस ते सहावा दिवस वाचून काढलं. आज ७-८-९ पूर्ण केलं. म्हटलं, आपणही त्यात भर घालावी. म्हणून हा उद्योग आज करतोय.
_/\_
2 Apr 2020 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>देव्यपराधक्षमापन स्तोत्राबद्दल काही ऐकण्यांत घरातल्या इतरांना फारसा रस वाटत नसल्याने सध्या मौनव्रतही चालू झालंय.
''न मंत्रं नो यंत्र तदपि च ना जाने स्तुतिमहो....
लिहा तुम्ही या स्तोत्राबद्दल.
-दिलीप बिरुटे
2 Apr 2020 - 6:50 pm | शाम भागवत
रंगीत तालीम म्हणून इथे बघू शकता.
http://www.manogat.com/node/26579
शिवाय जेव्हा माझे पूर्ण लिहून होईल, तेव्हां वाचायचे की नाही तेही खूप अगोदरच ठरवता येईल.
:)
सर, फक्त विनोद करतोय हं.
_/\_
2 Apr 2020 - 7:23 pm | सतिश गावडे
मनोगतावर जाऊन तुमचा देव्यापराधक्षमापनस्तोत्र वरील लेख वाचला. छान लिहीलं आहे. वरील अनुभवकथनही आवडलं __/\__
2 Apr 2020 - 7:58 pm | शाम भागवत
_/\_
गावडे सरांकडून पाठीवर थाप!!!!!
मस्तच वाटतंय.
परत एकदा, मनापासून _/\_
3 Apr 2020 - 10:55 am | संजय क्षीरसागर
कोणताही मंत्र फारतर मनाची एकसंधता साधतो तो कितीही शुद्ध आणि कितीही प्राचीन असला तरी. मंत्राचं काम फक्त शब्दांचं ध्वनीत रुपांतरण करणं इतकंच आहे. थोडक्यात, मेंदूत चाललेली मनाची अनिर्बंध बडबड, मंत्र म्हणून किंवा जप करून एकमार्गी होऊ शकते.
तस्मात, लेखात वर्णन केलेल्या प्रचंड सायासाची गरज नाही, साधा ॐ सुद्धा मनलावून म्हटला तर तेच काम करतो. इतकंच काय एखादं रंगून जाऊन म्हटलेलं गाणं सुद्धा तेच काम करतं.
मंत्र किंवा जपाची भानगड अशी की या गोष्टी मनाचा प्रवाह थांबवू शकत नाहीत, त्या शब्दांचं रुपांतर ध्वनीत करतात; पण साधकाला त्यामुळे मनापासून मुक्तता मिळाल्याचा भास होतो. या प्रक्रियेचा पुढे नाद लागतो आणि त्यापुढे बाकीच्या गोष्टी व्यर्थ वाटू लागतात कारण त्यांच्यात रस घेतला तर बॅकग्राउंडला पुन्हा मनाची बडबड सुरू होते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ध्वनी शून्यता किंवा शांतता हे आपलं स्वरूप आहे, कोणताही मंत्र किंवा जप जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तीचा बोध होणं असंभव आहे.
3 Apr 2020 - 10:57 am | शाम भागवत
:)
3 Apr 2020 - 10:59 am | शाम भागवत
मी माझं स्वरूप “शांतता“ आहे हे जाणून शांत राहावयाचे ठरवले आहे.
_/\_
3 Apr 2020 - 11:12 am | संजय क्षीरसागर
कारण ती स्थिती आहे; ते कुणा व्यक्तीचं स्वरूप नाही. मनाच्या सर्व क्रिया थांबल्यावरची ती स्थिती आहे.
वरच्या प्रतिसादात तुम्ही म्हटलंय " फक्त स्वतःशीच भरपूर बोलतोय. फोन नसल्यामुळे त्यात अजिबात व्यत्यय येत नाहीये. :) " ही मनाचीच प्रक्रिया आहे.
3 Apr 2020 - 11:31 am | शाम भागवत
अहाहा,
प्रतिक्रिया वाचून कोणतीच उर्मी उठत नाहीये.
खरंच किती शांत वाटतंय.
_/\_
3 Apr 2020 - 11:47 am | संजय क्षीरसागर
हे छान झालं !
3 Apr 2020 - 12:16 pm | शाम भागवत
खरं आहे.
तुमच्यामुळे मी नक्की किती शिकलोय हे माझं मलाच तपासायला जमत.
पुन्हा एकवार तुम्हाला मनापासून धन्यवाद.
_/\_
3 Apr 2020 - 8:11 pm | संजय क्षीरसागर
परिक्रमा ही सुद्धा अशीच व्यर्थ पायपीट आहे, कारण ज्याला शोधायचंय तो कधी तसूभरही हललेला नाही ! स्थिती हलणं असंभव आहे, पण परिक्रमी मात्र नाहक शारिरिक अपेष्टा करून छळ ओढवून घेतात आणि मग त्यावर भारंभार लेख आणि पुस्तकं लिहीतात !
3 Apr 2020 - 8:20 pm | शाम भागवत
मी मात्र एनजाॅय केलं. पावलांच्या तालावर जप करायला इतकी मजा येते ना की बस्स. जप करत असूनही मन कसं शांत व प्रसन्न असतं.
:)
;)
4 Apr 2020 - 11:40 am | संजय क्षीरसागर
तालावर पावलं नाचणं हे नृत्य आहे आणि त्यानी शरीर आणि मनाची एकतानता साधते; पण त्यासाठी परिक्रमेची पायपीट करण्याची आवश्यकता नाही.
4 Apr 2020 - 12:09 pm | शाम भागवत
तुम्ही नका करू.
पण मला करू द्या ना.
प्लीज.
:)
4 Apr 2020 - 12:31 pm | संजय क्षीरसागर
त्यामुळे कुणाच्या परिक्रमेला माझ्या प्रतिसादांनी अडथळा कसा होईल ? अर्थात, अचल शोधायला पायपीट व्यर्थ आहे हे ज्याला समजेल तो पारिक्रमेचा नाद सोडेल > यासाठी हा प्रतिसाद
4 Apr 2020 - 1:07 pm | शाम भागवत
मी सद्या प्रत्येक चलामधील अचल शोधायच्या खटपटीत आहे. त्यामुळे पायपीट मस्ट झालीय.
:) :) :)
4 Apr 2020 - 7:34 pm | सुबोध खरे
अण्णासाहेब किर्लोस्करांनी जाळला तोच खरा धूप
बाकी सर्व व्यर्थ आहे.
5 Apr 2020 - 11:31 am | संजय क्षीरसागर
त्याला शोधण्यासाठी पायपीटीची गरज नाही !
3 Apr 2020 - 11:26 am | चौथा कोनाडा
शाम भागवतजी, छान प्रकटन.
2 Apr 2020 - 6:32 pm | सुबोध खरे
शुद्धलेखन तपासण्याची सोय फक्त मनोगतावरच असल्याने ते काम तिथेच पार पाडत होतो. मनोगतावर ही एक चांगली गोष्ट आहे. तसेच लेख अप्रकाशित ठेवून सेव्ह करता येतो.
मी गुगल (इनपुट साधन) मध्ये टाईप करतो आणि स्वतःलाच इ मेल करतो जेंव्हा त्यात भर घालायची असेल तेंव्हा तेच प्रत कॉपी पेस्ट करतो आणि वाचता वाचता शुद्ध लेखन सुद्धा तपासतो.
त्यामुळे मिसळपाव वर त्याची उणीव जाणवली नाही.
अर्थात आपला लेख/प्रतिसाद संपादन करण्याची सोय नाही त उणीव जाणवतेच.
2 Apr 2020 - 6:47 pm | शाम भागवत
आता गुगल ड्राइव्ह व बराहा.
:)
2 Apr 2020 - 6:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उद्या सकाळी भारतीय प्रमाणवेळेला ठीक ९:०० वाजता पुन्हा देशाला उद्देशून ''मेरे प्यारे देशवासियो'' म्हणुन उद्या भाषण आहे. रात्रीची वेळ बदलली आहे. उद्या काय धक्का देतील काय माहिती.
-दिलीप बिरुटे
2 Apr 2020 - 6:45 pm | शाम भागवत
दिवसाउजेडी धक्का दिला तर काय होतं ते तपासून पाहायचं असेल.
जर दिवसाउजेडी दिलेला धक्का विरोधकांना जास्तं त्रास देतो असं लक्षात आल्यास, वेळ कायमची बदलू शकते.
कृ.ह.घ्या.
:)
2 Apr 2020 - 7:02 pm | कंजूस
नमस्कार घ्या हो शाम भागवत. अनुभव आवडले.
---------
बाकी ५जी फोन येण्याची वाट पाहू नका. ४जी फोन घेऊन टाका. जिओ कार्ड टाका. सर्वसाधारण कामे करण्यासाठी - विडिओकॉल, लाईव टिवी, युट्युब डाऊनलोड्ससाठी त्याला भरपूर स्पीड आहे.
2 Apr 2020 - 7:25 pm | शाम भागवत
अगोदरचं कार्ड जीओचच होतं. फोन हरवल्यावर ते ब्लॉक करून टाकलं होतं. तेच परत त्याच नंबरने १७ मार्चला घेऊन टाकलंय. पण कायप्पातून वाचण्यासाठी फोन टाळलाय. कोणाचे फोनही येत नाहीयेत. जवळच्या लोकांना लँन्डलाईन नंबर माहितीय. त्यामुळे फारशी अडचण येऊ नये असं वाटतंय. तसंही, मला फोन करण्यापेक्षा सगळे नातेवाईक बायकोलाच फोन करत असतात. ती सगळ्यांशीच (मी सोडून ;) ) नीट व सविस्तर बोलते. :)
का कुणास ठाऊक, लोकांतापेक्षा एकांतच बरा वाटतोय. त्यासाठी परिस्थितीही खूप अनुकूल आहे. कुठेतरी जाऊ असं म्हणायची, बायको व मुलाला संधीच राहिलेली नाही. अन्यथा आतापर्यंत ५-६ हजाराचे पेट्रोल भरून गाडी चालवण्याची कामगिरी निदान एकदा तरी झाली असती. मलाही गाडी चालवायची हौस जरा जास्तच आहे. रस्त्यावर जास्त गर्दी असली तर मला जास्त मजा वाटते व आत बसलेल्यांना काळजी. :) असो.
तर फोन बद्दल बोलायचं तर, सगळी म्हातारपणाची लक्षणे असावीत बहुधा. म्हातारचळच म्हणणार होतो. पण म्हटलं, दिवेलागणीला तरी चांगलं बोलावं. :)
बाकी कामासाठी आयपॅड प्रो व वायफाय आहेच. पण मी सध्या आयपॅड प्रो तमीळ सद्गुरूंचे यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी वापरतोय. बाकी काही कळलं नाही तरी निदान इंग्रजी तरी सुधारतंय का बघायचंय. ;)
3 Apr 2020 - 1:19 am | टवाळ कार्टा
लॉकडाउनमुळे बाकी काही असो पण द सगासार लिहिते झाले हे काय थोडे आहे
14 May 2020 - 8:05 pm | गणेशा
या लॉकडाऊनमध्ये कधी नव्हे तो तो आपल्याला थांबून विचार करायला वेळ मिळाला आहे
बरोबर..
तुझा झगा ग.. असली कविता लिही कि पुन्हा