मूळ पेशी : रोगोपचाराचे प्रभावी अस्त्र

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
22 Apr 2019 - 7:32 am

मूळ पेशींचे शास्त्रीय नाव आहे Stem cells. वैद्यकविश्वात विविध अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता नियमित होतात. त्याच धर्तीवर निरोगी व्यक्तीतील मूळ पेशींचे देखील प्रत्यारोपण एखाद्या रुग्णात करता येते. रक्ताच्या काही गंभीर आजारांत अशी प्रत्यारोपणे आता नियमित होतात. ‘बोन मॅरो’ चे प्रत्यारोपण हा शब्दप्रयोग आपल्यातील बरेच जणांनी ऐकला असेल. या विषयावर आधारित काही चित्रपट देखील प्रदर्शित झालेले आहेत.
गेल्या काही दशकांत विकसित झालेल्या या विज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी हा लेख. शरीरातील मूळ पेशींचा मूलभूत अर्थ, त्यांचे गुणधर्म व कार्य, प्रयोगशाळेत उत्पादन आणि कोणत्या आजारांत त्या प्रत्यारोपित करतात याची माहिती आपण करून घेऊ.

मूळ पेशी म्हणजे काय?
आपल्या शरीरात अनेक प्रकारचे अवयव आहेत आणि त्यांची कार्ये भिन्न आहेत. त्यानुसार या अवयवांतील पेशी देखील भिन्न रचनेच्या (differentiated) असतात. मात्र जन्मतःच आपल्याला काही पेशी अशा मिळतात की त्या अभिन्न स्वरूपाच्या (undifferentiated) असतात. त्या शरीराच्या मूलभूत पेशी असतात. त्यांना विशिष्ट अवयवाचे असे काही काम लगेच करायचे नसते. थोडक्यात त्या ‘सर्व अवयवांसाठी उपलब्ध’ (हरकाम्या) अशा पेशी असतात. अशा या जनकपेशींना ‘मूळ पेशी’ म्हटले जाते.

pict

गुणधर्म आणि कार्य
आपल्या वाढीसाठी शरीरातील प्रत्येक पेशीचे विभाजन सतत होत असते. एखाद्या मूळ पेशीचे जेव्हा विभाजन होते तेव्हा दोन शक्यता असतात:
१. तिच्या विभाजनानंतरची पुढची ‘पिढी’ ही मूळ पेशीच राहते किंवा,
२. या नव्या पेशींचे रुपांतर विविध अवयवांच्या विशिष्ट पेशींमध्ये होते. उदा. त्यातील काही रक्तपेशी, स्नायूपेशी वा मेंदूपेशी होतात.
३. काही अवयवांत ( पचनसंस्था व अस्थिमज्जा) जुन्या पेशी मरणे आणि नव्या तयार होणे अशी उलाढाल सतत चालू असते. तिथे तर मूळ पेशींची खूप मदत होते. तिथल्या गरजेनुसार त्या खूप मोठ्या प्रमाणात विभाजित होतात.

मूळ पेशींचे प्रकार
१. गर्भावस्थेतील मूळ पेशी : जेव्हा एखादा गर्भ ४ दिवसांचा होतो तेव्हापासूनच या संपूर्ण शरीराच्या जनकपेशी म्हणून काम करतात.
२. प्रौढत्वातील मूळ पेशी: या विशिष्ट अवयवांत वास्तव्य करतात आणि तिथल्या विशिष्ट पेशींची निर्मिती करतात.

प्रयोगशाळेतील निर्मिती

मूळ पेशींचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांची प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणे आवश्यक होते. त्यासाठी सुरवातीस संशोधकांनी उंदीर व तत्सम प्राण्यांवर प्रयोग केले आणि त्या पेशी वेगळ्या काढल्या. १९९८ मध्ये मानवी गर्भापासून अशा पेशी वेगळ्या काढण्याचे तंत्र विकसित झाले. त्यासाठी कृत्रिम गर्भधारणा तंत्र (IVF) वापरून प्रयोगशाळेत मानवी गर्भ तयार केले जातात. मग त्यातील मूळ पेशींची वाढ करून त्यांचा अभ्यास केला जातो.

पुढे हे विज्ञान अधिकाधिक विकसित झाले आणि २००६मध्ये त्यातील एक नवा टप्पा गाठला गेला. आता संशोधकांनी प्रौढ व्यक्तीतील सामान्य पेशींच्या जनुकांत काही बदल घडवले आणि त्यांचे रुपांतर मूळ पेशींत केले.

मूळ पेशी आणि रोगोपचार
शरीरातील अनेक रोगांत विशिष्ट अवयवाच्या काही पेशी खूप दुबळ्या होतात किंवा नाश पावतात. अशी अवस्था झाल्यावर त्या अवयवाचे कार्य थांबते आणि रुग्णास एखादा आजार होतो. अशा वेळेस पारंपरिक औषधोपचार हे फारसे उपयुक्त नसतात. त्याचबरोबर अशा काही तीव्र औषधांचे दुष्परिणाम देखील घातक असतात. त्यादृष्टीने इथे काही मूलभूत पातळीवरचे उपचार करता येतील का यासाठी संशोधन झाले. आधी थेट इंद्रिय प्रत्यारोपण यशस्वी झाले. त्याचीच पुढची पायरी म्हणून मूळ पेशींच्या प्रत्यारोपणाची कल्पना पुढे आली. १९७०च्या दशकात त्याचे सूतोवाच झाले. तेव्हा असे प्रत्यारोपण एक प्रकारच्या रक्तकर्करोगासाठी केले गेले. त्याचे अनेक प्रयोग झाल्यावर हळूहळू ही उपचारपद्धती वैद्यकात रुजली.

आज जवळपास ७०हून अधिक रोगांच्या उपचारांसाठी या पेशींचा वापर होतो. त्यामध्ये मुख्यतः रक्तपेशींच्या आजारांचा समावेश आहे. त्यांना नजरेसमोर ठेऊन आता या उपचार पद्धतीची माहिती घेऊ.

मूळ पेशींचे प्रत्यारोपण

याचे २ मूलभूत प्रकार आहेत:
१. स्वपेशी –प्रत्यारोपण : यात ज्या व्यक्तीवर उपचार करायचे आहेत तिच्याच शरीरातून मूळ पेशी बाहेर काढल्या जातात. पुढे त्यांच्यावर काही प्रक्रिया करून त्या पुन्हा त्याच व्यक्तीत सोडल्या जातात.

२. परपेशी- प्रत्यारोपण : यात एका व्यक्तीवर उपचार करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीतील पेशींचा वापर केला जातो.
प्रत्यारोपणासाठी मूळ पेशींचे स्त्रोत :
शरीरातील मूळ पेशी ३ ठिकाणांहून मिळवता येतात.

• अस्थिमज्जा
• नवजात बालकाची नाळ, आणि
• रक्तप्रवाह
आता दोन्ही प्रकारांचे विवेचन करतो.

• स्वपेशी- प्रत्यारोपण

हे खालील आजारांत उपयुक्त असते:
१. मल्टीपल मायलोमा
२. लिम्फोमा
३. ल्युकेमिया (AML)
४. मज्जातंतूचा ट्युमर
५. काही ऑटोइम्यून आजार.


स्वपेशी- प्रत्यारोपण प्रक्रिया

ही समजण्यासाठी लिम्फोमाचा रुग्ण एक उदाहरण म्हणून घेऊ.
१. प्रथम या रुग्णाच्या शरीरातून मूळ पेशी बाहेर काढतात. मग त्यांच्यावर प्रक्रिया करून त्या थंड तापमानात साठवतात.
२. आता या रुग्णाच्या आजारासाठी केमोथेरपी + रेडीओथेरपीचे उपचार दिले जातात. त्यामुळे कर्करोगपेशींचा नाश होतो. (त्याचा दुष्परिणाम म्हणून रुग्णाच्या अस्थिमज्जेची जननक्षमता दाबली जाते).

३. आता या रुग्णाच्या साठवलेल्या मूळ पेशी त्याच्या रक्तात सोडल्या जातात.
४. या ‘नव्या’ पेशींपासून नवीन निरोगी रक्तपेशी निर्माण होऊ लागतात.

या प्रक्रियेचे फायदे:
१. उपचारानंतर जंतुसंसर्गाचा धोका कमी असतो.
२. रुग्णाच्या शरीराने स्वतःच्याच मूळ पेशी नाकारण्याची प्रक्रिया अत्यंत दुर्मिळ असते.

* परपेशी- प्रत्यारोपण
हे खालील आजारांत उपयुक्त असते:
1. अनेक प्रकारचे ल्युकेमिया
2. थॅलसिमीआ
3. सिकल सेल अ‍ॅनिमिया
4. तीव्र इम्युनोडेफीशियन्सीचा आजार.

परपेशी- प्रत्यारोपण प्रक्रिया
इथे परक्या व्यक्तीची दाता म्हणून निवड करावी लागते. सुयोग्य दाता होण्यासाठी खालील निकष लावले जातात:
१. सर्वसाधारण निरोगी अवस्था व व्यसनांपासून अलिप्तता
२. रक्ताची रुटीन तपासणी व रक्तगट
३. रक्तातील पांढऱ्या पेशींतील HLA या प्रथिनांचे वर्गीकरण (typing). दाता व रुग्ण यांची ‘HLA-जुळणी’ हा मुद्दा इथे सर्वात महत्वाचा असतो. या जुळणीची टक्केवारी जितकी जास्त तितके चांगले.
४. विषाणूजन्य आजारांच्या तपासण्या
५. छातीचा क्ष-किरण, इसीजी, इ.

दाता निवडीचा प्राधान्यक्रम :
खाली दिलेल्या पर्यायांत क्र.१ हा सर्वोत्तम असतो. तो न मिळाल्यास उतरत्या क्रमाने पुढे जातात.
१. रुग्णाचे (असल्यास) एकसमान जुळे भावंड : इथे ‘जुळणी’ तंतोतंत होते.
२. सख्खे भावंड
३. प्रथम दर्जाचे भावंड (cousin)
४. बऱ्यापैकी ‘जुळणारी’ त्रयस्थ व्यक्ती. यासाठी अनेक इच्छुक दाते ‘पेशी-पेढी’त नोंदलेले असतात.
५. नवजात बालकाच्या नाळेतील पेशी : हा पर्याय लहान मुलांसाठी वापरला जातो.

प्रक्रियेनंतरचे औषधोपचार:

जेव्हा रुग्णास त्याच्या एकसमान जुळ्या भावंडाच्या पेशी दिल्या जातात तेव्हा या प्रक्रियेनंतर immunosuppressive औषधे द्यायची गरज नसते. मात्र अन्य परक्या व्यक्तीच्या पेशी दिल्यानंतर ती द्यावी लागतात. याचे कारण म्हणजे रुग्णाचे शरीर परक्या पेशींना स्वकीय समजत नाही. त्यातून जी शरीर-प्रतिक्रिया उमटते ती या औषधांनी दाबावी लागते.
तसेच या प्रक्रियेनंतर सर्वच रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविक आणि अन्य काही औषधे दिली जातात.

मूळ पेशी व अन्य रोगोपचार

वर आपण पहिले की मूळ पेशींचे उपचार हे प्रामुख्याने रक्तपेशींचे आजार आणि दुबळी प्रतिकारशक्ती यांसाठी वापरले जातात. याव्यतिरिक्त अन्य काही आजारांतही त्यांचा उपयोग होऊ शकतो. असे आजार आहेत:
१. त्वचेचे काही जनुकीय आजार
२. जन्मजात एन्झाइम्सचा अभाव
३. हृदयस्नायूचे आजार.
४. मज्जातंतूचे काही आजार
५. पूर्ण पेशीनाश करणारे आजार

यांपैकी काही आजारांत प्रयोगशाळेत वाढवलेल्या मूळ पेशींचा वापर करून पाहण्यात येत आहे. हे प्रयोग गुंतागुंतीचे आहेत. यासंबंधी अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. भविष्यात त्याचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
****************************************************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

लेखाचे नाव बघुनच कळले की हा तुमचा लेख असणार.

आनन्दा's picture

22 Apr 2019 - 8:39 am | आनन्दा

पण थोडक्यात आटपलात

कुमार१'s picture

22 Apr 2019 - 9:40 am | कुमार१

धन्यवाद !
हा लेख याहून वाढवायचा झाल्यास त्या प्रक्रियेचे तांत्रिक तपशील लिहावे लागतील, जे सामान्य वाचकाच्या गरजेचे नाहीत.
प्रश्नांच्या अनुषंगाने प्रतिसादांत पूरक माहिती देता येईल.

बाप्पू's picture

22 Apr 2019 - 10:13 am | बाप्पू

माझे काही प्रश्न :
काही दिवसापूर्वी मूळ पेशी वापरून 2 रुग्णांची HIV लागण पूर्णपणे बरी झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्याबद्दल आपणास माहिती असल्यास थोडी सविस्तर लिहिता का

मूळ पेशी याबाबत खूप संशोधन चालू आहे. आणि बऱ्याच विकरांवर हे उपचार काही अंशी यशस्वी झालेले पण मी पाहिलेत. याच गतीने संशोधन होत राहिले तर येत्या 10 किंवा 15 वर्ष्यामध्ये हि उपचार पद्धती कोण कोणते माईलस्टोन गाठू शकेल असे आपणास वाटते?

कुमार१'s picture

22 Apr 2019 - 10:31 am | कुमार१

चांगले प्रश्न.

१. मूळ पेशी वापरून 2 रुग्णांची HIV लागण पूर्णपणे बरी झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्याबद्दलची माहिती सविस्तर लिहिता का? >>>>

ज्या दोन रुग्णांचा बातमीत उल्लेख होता त्यांची माहिती देतो. दोघांना खास टोपणनावे दिलीत.

१. ‘बर्लिन’ रुग्ण: या एड्सच्या रुग्णास पुढे ल्युकेमिया देखील झाला होता आणि त्यासाठी मूळ पेशी उपचार दिले गेले. ज्या दात्याच्या पेशी वापरल्या त्याच्या जनुकात एक विशिष्ट बिघाड होता. या बिघाडाने HIV-प्रतिकार होतो ! असा हा दुहेरी फायदा झाला.
रूग्णाची लक्षणे नाहीशी झाल्याने २००६ पासून त्याची HIV-विरोधी औषधे बंद केलेली आहेत.

२. ‘लंडन’ रुग्ण:. यालाही एड्स बरोबर लिम्फोमा झाला होता. याची ती औषधे २०१७ पासून बंद आहेत.

वैद्यकीय परिषदांत त्या दोघांवर चर्चा झाल्या आहेत. आता हा आजार “बरा” झाला म्हणजे नेमके काय ते बघू. दोन मुद्दे असतात:

१. रुग्णाची सर्व संबंधित लक्षणे नाहीशी झाली, औषधे बंद केल्यावरही तब्बेत चांगली आहे. याला ‘functional’ बरे होणे असे म्हणतात.
२. रुग्णाचे शरीर आता संपूर्णपणे “विषाणूशून्य” झाले आहे. याला म्हणायचे ‘अंतिम बरे’ होणे.

...... पहिल्या मुद्द्यावर सर्व तज्ञांचे एकमत आहे. पण, दुसऱ्याबाबत मात्र मतभेद आहेत !

कुमार१'s picture

22 Apr 2019 - 10:42 am | कुमार१

२. याच गतीने संशोधन होत राहिले तर येत्या 10 किंवा 15 वर्ष्यामध्ये हि उपचार पद्धती कोण कोणते माईलस्टोन गाठू शकेल ? >>>

याचा उल्लेख लेखात केलाच आहे : खालील आजारांवर यशस्वी उपचार होऊ शकतील.

१.त्वचेचे काही जनुकीय आजार
२. जन्मजात एन्झाइम्सचा अभाव
३. हृदयस्नायूचे आजार.

४. मज्जातंतूचे काही आजार, उदा. अल्झायमर आजार, पार्किन्सन आजार, इ.
५. पूर्ण पेशीनाश करणारे आजार , उदा. मधुमेह-प्रकार १.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2019 - 10:36 am | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत वेगाने प्रगत होत असलेल्या व तांत्रिकदृष्ट्या किचकट असलेल्या रोगोपचारपद्धतिचे सुंदर विवेचन ! हा विषय इथे इतक्या सुगमपणे मांडल्याबद्दल तुमचे अभिनंदन !

हल्ली काही सुरस व आश्चर्यकारक वाचायची इच्छा झाली तर काल्पननिक कथा वाचण्याऐवजी मी या विषयातल्या संशोधनाच्या प्रगतिचा मागोवा घेऊ लागतो... आणि प्रत्येक प्रयत्नात, कोणत्याही लोकप्रिय कादंबरीवाचनापेक्षा जास्त, आश्चर्य आणि आनंद झाल्यावाचून राहत नाही ! :)

या विषयात चाललेले संशोधन आणि त्यातून निष्पन्न होत असलेले व्यावहारीक परिणाम... सामान्य माणसाला सहजपणे थापेबाजी वाटेल इतके... अविश्वनिय आहेत.

या विषयातली दोन महत्वाची अत्याधुनिक तंत्रज्ञाने :

१. मूलपेशी वापरून केली जाणारी अवयवांची त्रिमिती छपाई (3D printing of organs, using stem cells) : यामध्ये, मूलपेशी छापखान्यातील शाईप्रमाणे वापरून, त्रिमिती प्रिंटरच्या सहाय्याने, प्रयोशाळेत नवीन अवयव "छापले" जातात.

२. मूलपेशी वापरून केली जाणारी अवयव निर्मिती (Production of organs, using stem cells) : यामध्ये, प्रथम अवयवाचा साचा (scaffolding) बनवून, त्यावर मूलपेशींची वाढ करून, प्रयोशाळेत नवीन अवयव "बनवले" जातात.

गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित होत असलेली ही दोन तंत्रज्ञाने, शरीशास्त्राच्या तंत्रज्ञानशास्त्रज्ञांनाही आनंदाश्चर्याने चकीत करणारी आणि अगदी काल्पनिक विज्ञानकथांमध्ये शोभून दिसतील अशीच आहेत.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/28985202
https://blog.cirm.ca.gov/tag/3d-printing/
https://eandt.theiet.org/content/articles/2018/05/human-corneas-3d-print...

काही शास्त्रज्ञांनी तर एक भन्नाट गुगली टाकला आहे...

"मूलपेशी वापरून त्रिमिती छपाईचे तंत्र" वर दिले आहे. त्याविरुद्ध, या शास्त्रज्ञांनी, "त्रिमिती छपाईने मूलपेशी बनवण्याचे तंत्र" शोधले आहे... आहे की नाही "उलटी गंगा" ! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2019 - 11:09 am | डॉ सुहास म्हात्रे

कल्पनेहूनही जास्त आश्चर्यकारक वास्तव पहायचे असल्यास, या तंत्रज्ञानाकडे एक नजर टाकणे, पुरेसे आहे !!!

कुमार१'s picture

22 Apr 2019 - 11:00 am | कुमार१

अनेक धन्यवाद ! सुंदर चित्रमय प्रतिसाद.

हल्ली इतर काही सुरस व आश्चर्यकारक वाचायची इच्छा झाली तर काल्पनिक कथा वाचण्याऐवजी मी या विषयातल्या संशोधनाच्या प्रगतिचा मागोवा घेऊ लागतो... आणि एकाही प्रयत्नात आश्चर्य आणि आनंद झाल्यावाचून राहत नाही. >>>> + ११११११११

खरेच, थक्क करणारी प्रगती !

अनिंद्य's picture

22 Apr 2019 - 2:05 pm | अनिंद्य

लेख आणि पूरक प्रतिसादांतून आश्चर्यचकित करणारी माहिती मिळाली.

हे असे वाचले की मानवजीवन अधिक सुसह्य करण्यासाठी चाललेल्या शास्त्रज्ञाच्या धडपडीचे कौतुक वाटते.

खिलजि's picture

22 Apr 2019 - 4:34 pm | खिलजि

कुमार साहेब ,, फार माहितीपूर्ण लेख आहे.. सुंदर आणि सहजरित्या शंब्दांची मांडणी , यावरुण आपले आपल्या कामावर किती प्रेम आहे हे दिसून येते आणि त्यानुषंगाने भाषेवरचेही ...
मला एक प्रश्न पडला आहे तो हा , कि मी असे ऐकून होतो कि तारुण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बरेच नट नट्या स्टेमसेल थेरपीचा वापर करायच्या , ते खरे आहे का ? आणि या पद्धतीमुळे कर्करोगही होऊ शकतो का ? मला वाटत हा मी विचारलेला प्रश्न या लेखाला अनुसरून आंही आहे तरी उत्तर अपेक्षित आहे ..

उगा काहितरीच's picture

22 Apr 2019 - 5:05 pm | उगा काहितरीच

छान लिहीलंत.

कुमार१'s picture

22 Apr 2019 - 5:22 pm | कुमार१

अनिंद्य, खिलजी व उ का.
***
>>> तारुण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बरेच नट नट्या स्टेमसेल थेरपीचा वापर करायच्या , ते खरे आहे का ? आणि या पद्धतीमुळे कर्करोगही होऊ शकतो का ? >>>>>

प्रश्न कुतूहलजनक आहे खरा. पण अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहिले असता या प्रकाराला दुजोरा मिळत नाही.
काही सौंदर्यवर्धनातील धंदेवाईक मंडळी अशा प्रकारे पैसे कमावतात असे वाचनात आले.
**
समजा, येनकेन प्रकारेन माणूस आयुष्यमान वाढवायचे असे उद्योग करू लागला, तर मात्र कर्करोगाचा धोका वाढेल. हे पाठय पुस्तकातील वाक्य बघा:
As people live longer, many more will develop cancer !

मराठी कथालेखक's picture

22 Apr 2019 - 5:51 pm | मराठी कथालेखक

मूळपेशी संबंधित तंत्रज्ञानाचा वापर करुन पुढे माणसाचे आयुष्यमान वाढवता येईल का ?
एक कल्पना
समाजाच्या / जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा व्यकींना (अर्थात त्यांच्या मर्जीनेच) प्रदीर्घ (१५०-२०० वर्षे) व निरामय आयुष्य लाभावे याकरिता सरकारे प्रयत्न करतील आणि या थेरपीचा खर्च उचलतील.

कुमार१'s picture

22 Apr 2019 - 7:09 pm | कुमार१

मला वाटते की ती फक्त कल्पना म्हणूनच ठीक आहे !

कानडाऊ योगेशु's picture

22 Apr 2019 - 8:28 pm | कानडाऊ योगेशु

मागे कधीतरी वाचले होते कि येणार्या काळात डिझायनर बेबी ही संकल्पन सत्यात उतरु शकेल. म्हणेज तुमचे मूल कसे असावे हे तुम्ही ठरवु शकाल. ह्यात केवळ लिंगच नाही (जेंडर) तर त्याच्या बाकीच्या क्वालीटीज पण गुणसूत्रांच्या कॉम्बिनेशन नुसार तुम्ही ठरवु शकाल. ऐकावे ते नवलच आहे.

कुमार१'s picture

22 Apr 2019 - 8:46 pm | कुमार१

डिझायनर बेबी ही संकल्पन सत्यात उतरु शकेल >>>

या प्रकाराचे शास्त्रीय नाव आहे ‘Germline अभियांत्रिकी’. यात कृत्रिम गर्भधारणा करून प्रयोगशाळेत त्या गर्भातील जनुकांचे फेरफार करतात.

तूर्त हा विषय वादग्रस्त आणि नैतिकतेच्या चौकटीत न बसणारा आहे. बऱ्याच देशांत त्यावर बंदी आहे.

तरी देखील.....
२०१८मध्ये चीनमध्ये या प्रकारचा एक ‘उद्योग’ चोरून करण्यात आला आणि त्यातून दोन जुळ्या मुली जन्मल्या. यावर खूप टीका झालेली आहे.
फक्त एका बाबतीत याचे समर्थन होऊ शकते. ते म्हणजे ज्या जोडप्यांत एखादा दुर्धर अनुवांशिक आजार आहे, तिथे त्यांच्या अपत्याच्या गर्भातच जनुकीय फेरफार करून तो रोग टाळता येईल. अर्थात यावरही अद्याप वैद्यकविश्वाचे एकमत नाही.

कुमार१'s picture

2 Jan 2020 - 3:32 pm | कुमार१

२०१८मध्ये चीनमध्ये या प्रकारचा एक ‘उद्योग’ चोरून करण्यात आला आणि त्यातून दोन जुळ्या मुली जन्मल्या. यावर खूप टीका झालेली आहे.

>>>
हे कृत्य बेकायदेशीर होते. नुकतीच चिनी न्यायालयाने संबंधित संशोधकांना तुरुंगवास व दंडाची शिक्षा केली आहे.

शरीर गर्भधारणे नंतर विकसित कसे होत जाते याचा शोध चालू असता मूळ पेशी चा शोध निसर्गाने मानवाला बहाल केला आहे .हळू हळू प्राणिविज्ञान व अभियांत्रिकी याचा संकर विकसित होत आहे .आपण समजतो त्यापेक्षा " देव" किती भव्य , सूक्ष्म ,विस्मयकारी डिझाइनर आहे याचे अवाक करणारे दर्शन माणसाला होत आहे. माझा असा अंदाज आहे की २०३० पर्यंत जगाला ग्रासलेल्या मधुमेह व कँसर यावर अत्यंत प्रभावी असे उपाय मूळ पेशी च्या अभ्यासाने सापडतील ! मुळात जनुकात अघोरी फेरबदल जर निसर्ग करीत असेल तर मानवाला मदत करणारे फेरबदल ही निसर्गाच्या पोतडीत असले पाहिजेत हे समजण्याइतका मानव विकसित नक्कीच आहे . यावरून १९७७ दरम्यान अशोक पाध्ये यांनी लिहिलेले " डी एन ए चे गोल गोल जिने " हे पुस्तकी आठवले .मात्र त्यात स्टेम सेल चा उल्लेख असल्याचे आठवत नाही मात्र जेनेटिक रिपेअर केले कल्पना त्यात आहे . या लेखा बद्दल किती धन्यवाद द्यावे ?

कुमार१'s picture

23 Apr 2019 - 9:48 am | कुमार१

छान प्रतिसाद.

रच्याकने.....

दाता व रुग्णाच्या मूळ पेशी जुळणे हा विषय ‘जन्म’ या मराठी चित्रपटात अगदी नाट्यमयरित्या दाखवला आहे. घटस्फोटाचा दावा लावलेल्या एका स्त्रीच्या तरुण मुलीस एक आजार आहे. आणि त्यावर उपचार म्हणून तंतोतंत जुळणाऱ्या मूळ पेशी हव्या आहेत !
मग काय, ही स्त्री वेगळे राहणाऱ्या नवऱ्याला चक्क परत बोलावते आणि “मला अजून एक मूल दे”, अशी विनवणी करते !
रीमा लागूंची भूमिका असलेला हा सुंदर चित्रपट ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर बघा. यु ट्यूबवर आहे.

या उपचारांतून मुख्यत्वे दोन दुष्परिणाम संभवतात:
१. उपचार प्रक्रियेनंतर Parainfluenza या विषाणूचा संसर्ग होऊन न्यूमोनिया होऊ शकतो.

२. दीर्घकालीन दुष्परिणामांत ‘ट्युमर’ निर्मितीचा धोका राहू शकतो. यापैकी काही ‘ट्युमर’ हे सौम्य असतात तर काही कर्करोगाचेही असू शकतात. मूळ पेशींचा जो अफाट वाढीचा गुणधर्म आहे त्यातून ही शक्यता बळावते. अर्थात यावर अजून बराच अभ्यास व्हायचा आहे. काही तुरळक उदाहरणांवरून ठोस निष्कर्ष काढता येत नाही.

विज्ञान नवीन नवीन यशाची शिखरे पार करतेय हे नक्कीच सर्व मानवजातीसाठी सुधा अभिमानाची गोष्ट आहे
पण तरी सुद्धा असे वाटते की कोणत्याही नवीन उपचार पद्धतीचा फायदाच होईल तोटा होणार नाही असे निष्कर्ष काढण्याची घाई करणे हे पटण्यासारखे नाही
अँटिबायोटिक चा जेव्हा शोध लागला तेव्हा माणसाला अमृत मिळल्याचाच आनंद झाला पण आता असे सिद्ध होतंय की अँटिबायोटिक्स chya जास्त वापर केल्यामुळे औषधांना दाद न देणारे जिवाणू तयार झाले .
Ac मध्ये वापरला जाणारा neutral gas काहीच हानी करणार नाही असा समज होता पण तोच ओझोंचा थर नष्ट करतोय हे समजायला वर्षे गेली.
ही आपल्याला माहीत असलेली सामान्य उदाहरण
आहेत .
त्यामुळे स्टेमसेल थेरपी फायद्याची च असेल असा निष्कर्ष ताबडतोप काढणे घाईच ठरेल

कुमार१'s picture

27 Apr 2019 - 12:48 pm | कुमार१

सध्या सुमारे ७० आजारांत या उपचारांचा फायदा बराच होत आहे.
अन्य काही आजारांबाबत जे दावे केले जात आहेत त्याचे संशोधन अपुरे आहे.
फायदे/तोटे यांचा ताळेबंद अजून १-२ दशकांनी स्पष्ट होईल.

ह्या संशोधनं मध्ये भारत सरकारने सुधा सहभाग घेणे गरजेचं आहे .
भारतात सुधा ह्या क्षेत्रात संशोधन झाले पाहिजे आणि त्या साठी भारत सरकारने investment करावी.
म्हणजे पुढे भविषात स्वस्तात उपचार भारतीय नागरिकांना मिळतील दुसऱ्या देशावर अवलंबून राहवे लागणार नाही

कुमार१'s picture

18 Nov 2019 - 8:16 am | कुमार१

हैदराबाद येथील एल.व्ही.प्रसाद दृष्टी संशोधन केंद्रातील हा एक गौरवास्पद उपक्रम:

डोळ्यातील स्व‍च्छपटल (cornea) अपारदर्शक झाल्याने कित्येकांना अंधत्व येते. अशांना अन्य व्यक्तीच्या नेत्रदानाचा फायदा होतो. पण अद्याप आपल्याकडे या मागणीपेक्षा पुरवठा बराच कमी आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी वरील संस्थेत मूळपेशींवर आधारित संशोधन झालेले आहे. डोळ्याच्या अन्य भागातून मूळपेशी मिळवून त्यांना स्व‍च्छपटल बनवण्याची दीक्षा दिली जाते. अशा प्रकारे नवा स्व‍च्छपटल बनविला जातो. मग तो गरजू रुग्णासाठी वापरता येतो.

२०१८ अखेर अशा प्रकारचे उपचार देऊन सुमारे १४०० रुग्णांना स्व‍च्छ दृष्टी देण्यात यश आलेले आहे. डॉ. डी. बालसुब्रमण्यम या वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखाली हे बहुमूल्य संशोधन झाले.

त्रिवार वंदन !

जॉनविक्क's picture

18 Nov 2019 - 10:23 am | जॉनविक्क

यावरून विचार आला की आशा पेशींची निर9शक्य आहे का की त्या मानवास विशिष्ट स्वभावाचा बनवतील यातील पुढील पायरी म्हणजे विपश्यना सारख्या साधना त्या वयक्तिमध्ये आपसूक चालूच ठेवतील ?

सोत्रि's picture

18 Nov 2019 - 11:42 am | सोत्रि

हा हा हा ...

शाॅर्ट कट टू मुक्ती!

- (पेशीमय) सोकाजी

कुमार१'s picture

18 Nov 2019 - 10:37 am | कुमार१

जॉन,
आधुनिक विज्ञानाची झेप पाहता भविष्यात अशक्य असे काहीच नसावे !
अर्थात उच्चकोटीचे संशोधकच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील.

कुमार१'s picture

21 Mar 2022 - 8:33 am | कुमार१

मूळ पेशींच्या संवर्धनाची भारतात मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. उल्हास वाघ यांचे वयाच्या 91 व्या वर्षी नुकतेच निधन झाले.

एखाद्या मृत व्यक्तीच्या नेत्रदानातून मिळालेल्या नेत्रपटलाच्या संवर्धनावर त्यांनी विशेष संशोधन केले. असा नेत्रपटल पस्तीस दिवसापर्यंत जिवंत ठेवण्यात त्यांना यश आले. त्यांचे हे तंत्रज्ञान अहमदाबाद येथील ढोलका नेत्रपेढी मध्ये वापरले गेले.

आदरांजली !

बोलघेवडा's picture

21 Mar 2022 - 11:43 am | बोलघेवडा

डॉक्टर साहेब, या लेखाबद्दल धन्यवाद. बरीच माहिती कळाली.
मी माझ्या मुलाच्या जन्मवेळी (2014 साली) त्याच्या स्टेम सेल्स एक लॅब च्या मदतीने पुढच्या 20 वर्षासाठी जतन करून ठेवल्या आहेत.
हे तंत्रज्ञान जसजसे विकसित होईल तसतसे त्याचे फायदे वाढत जातील अशी आशा आहे.

नगरी's picture

13 May 2022 - 2:55 pm | नगरी

लेख जितका आटोपशीर आणि सुदंर आहे,तितकेच प्रतिसादही.

नगरी's picture

13 May 2022 - 3:06 pm | नगरी

थोडे अवांतर,
एक इंग्रजी चित्रपट पाहिल्याचे स्मरते,नाव आठवत नाही.त्यातील कल्पना stem cell bank च्या पुढे एक घर जाऊन जन्मतः त्या व्यक्तीचा clone बनवून लॅब मध्ये प्रिझर्व करायचा आणि मुळ व्यक्तीला लागेल तसे त्याचे organs वापरायचे.किती भयानक आणि अमानवीय!

कुमार१'s picture

13 May 2022 - 4:04 pm | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

कुमार१'s picture

17 Jul 2022 - 10:08 am | कुमार१

मानवी हिरड्यांमधून मूळ पेशी काढून त्यांचा उपयोग इजा झालेल्या फुप्फुसाची दुरुस्ती करण्यासाठी करता येईल.

पुणे विद्यापीठातील चमूने डॉ. गीतांजली तोमर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केलेले आहे.

सध्या त्याचे प्राण्यांवरचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत.