नुकताच जालावर अन्यत्र एक धागा निघाला होता की वाचून झालेल्या छापील दिवाळी अंकांचे काय करावे? चर्चेचा रोख हा अंकांचा संग्रह करावा की देऊन टाकावेत, याभोवती होता. अनेकांच्या त्यात सूचना आल्या. त्यातून या धाग्याची कल्पना मनात आली. हाच मुद्दा आपण पुस्तकांना लावून पाहू.
साहित्यविश्वात अजूनही बरेच दर्जेदार साहित्य छापील स्वरूपात प्रकाशित होत आहे. ते आवडीने वाचणारे बरेच वाचकही आहेत. हे साहित्य पुस्तक, मासिक अथवा वार्षिक नियतकालिक या स्वरूपात प्रकाशित होते. नियतकालिकांचे आयुष्य तसे मर्यादित असते. त्या तुलनेत पुस्तके दीर्घकाळ साठवली जातात. या लेखात फक्त पुस्तकांचा विचार करू.
छापील पुस्तके वाचणारे वाचक ते खालील प्रकारे मिळवू शकतात:
१. नवीन विकत घेणे
२. वाचनालयातून
३. रद्दीच्या दुकानातून
४. दुसऱ्याचे उधार घेणे !
वरीलपैकी पहिल्या ३ प्रकारातली निवड मुख्यतः एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार केली जाते. तर चौथा प्रकार हा पूर्णपणे मनोवृत्तीशी निगडित आहे. काही चोखंदळ वाचक पहिले तीनही पर्याय पुस्तकानुसार निवडणारे असू शकतात.
वरच्या पर्याय २ किंवा ४ ची जे निवड करतात त्यांना त्या पुस्तकाच्या साठवणीचा प्रश्न नसतो; वाचून झाले की ते परतच करायचे असते.
आता नवीन पुस्तक विकत घेणाऱ्यांबद्दल बघू. हे खरे पुस्तक शौकीन असतात. पूर्ण विचारांती ते पुस्तक विकत घेतात. त्याचे मनसोक्त वाचन करतात. पुढे त्यावर चर्चा वगैरे केली जाते. मग या नव्याचे नवेपण ओसरते आणि ते पुस्तक घरच्या कपाटात जाते.
वाचनाची आवड म्हणून नियमित पुस्तके घेतली जातात. स्वतःचा संग्रह वाढत जातो. त्यासाठी अर्थातच घरातली जागा व्यापली जाते. एका मर्यादेपर्यंत या संग्रहाचे एखाद्याला कौतुक वाटते. मात्र पुस्तकांच्या अशा दीर्घकाळ साठवणुकीतून काही समस्या निर्माण होतात. जसे की त्यांत धूळ साठणे, वाळवी लागणे. एखाद्या सदनिकेत किती पुस्तके साठवावीत याला अखेर मर्यादा येते. दर्शनी भागात राहतील आणि मनात आले की पुस्तक पटकन काढता येईल असे भाग्य मोजक्या पुस्तकांना लाभते. बाकीची मग बॅगेत बंद होतात तर इतर काही माळा, पलंगाखालचा कप्पा अशा ठिकाणी बंदिस्त होतात. या पुस्तक संग्राहकांचा एक बाणा असतो, " मी ते पुस्तक विकत घेतलंय ना, मग रद्दीत अजिबात देणार नाही". उगाचच कुणाला भेट देण्यात अर्थ नसतो, कारण फुकट मिळालेल्या वस्तूची घेणाऱ्याला सहसा किंमत नसते. त्यामुळे हा घरचा साठा वाढतच राहतो. कालांतराने असे होते की या साठ्यातील कित्येक पुस्तकांना १० वर्षांत हात सुद्धा लावला जात नाही.
आता माझा याबाबतीतला अनुभव लिहितो. जोपर्यंत स्वतः कमवत नव्हतो,तोपर्यंत वाचनाची आवड ही वाचनालायवर भागवावी लागली. जेव्हा कमावता झालो तसे हळूहळू पुस्तक खरेदी सुरू झाली. सुरवातीच्या आर्थिक परिस्थितीत ती मर्यादित होती. तेव्हा २-३ मित्रांमध्ये मिळून एकमेकांची पुस्तके फिरवली जात. त्यामुळे वैयक्तिक साठा कमी होता. पुस्तकाची निगा चांगली राखली जाई. तेव्हा विकत घेतलेले पुस्तक घरी आयुष्यभर ठेवायचे आहे हाच विचार होता. जणूकाही ती एक संपत्तीच होती. हळूहळू वाढत्या कमाईनुसार पुस्तक खरेदी वाढू लागली. जसा घरचा साठा वाढू लागला तसा पुस्तके जपण्यात हयगय होऊ लागली. आता ती वेगवेगळ्या ठिकाणी पसरू लागली. एखादे जुने पुस्तक पुन्हा काढून वाचणेही कमी झाले. तसेच संग्रहात नक्की कुठली पुस्तके आहेत याचेही विस्मरण होऊ लागले.
दरम्यान काही वर्षे परदेशात वास्तव्य झाले. तेव्हा दर सहा महिन्यांनी भारतभेट होई. परदेशात मराठी साहित्य मिळणार नव्हते. तेव्हा ऑनलाइन मागवणे हाही प्रकार सुरू झाला नव्हता. मग दर भेटीत इथल्या पुस्तकप्रदर्शनात जाई आणि अधाशासारखी पुस्तके विकत घेई. परतीच्या प्रवासात बरोबर पुस्तकांची एक वेगळी बॅग असे. या खरेदीत एक प्रकार झाला. प्रदर्शनात जी उपलब्ध असंत त्यातलीच घाईने उचलली गेली. त्यामुळे ती सर्वच कायम संग्रही ठेवावी अशी नव्हती. जेव्हा परदेशातील मुक्काम संपला तेव्हा ती सर्व घेऊन भारतात परतलो. आता मात्र साठा काहीसा आवाक्याबाहेर गेला होता.
मग शांतपणे विचार केला. संग्रहातील बरीच पुस्तके ही 'एकदा वाचायला ठीक' या प्रकारातील होती. अजून एक जाणवले. आपल्या वयाच्या प्रत्येक दशकानंतर आपली वाचनाची अभिरुची बदलत राहते. कॉलेजच्या वयात भयंकर आवडलेले एखादे पुस्तक २० वर्षांनी हातात सुद्धा घेवत नाही. आता माझ्याकडची जेमतेम १० पुस्तके अशी वाटली की जी कायम जवळ बाळगावीत. मग उरलेल्यांचे काय करावे ? प्रथम रद्दीचा विचार देखील नकोसा वाटला. मग जवळच्या वाचनालयात गेलो. त्याचे सभासदत्व घेतलेच होते. तिथे काही दिवस निरीक्षण केले. माझ्याकडे असलेली आणि तिथे नसलेली अशी फारच थोडी पुस्तके होती. मग हळूच तिथल्या ग्रंथपालांना विचारले की अशी काही पुस्तके त्यांना भेट देऊ का ? त्यांचा प्रतिसाद तसा थंड होता. 'बघू, ठरवू', या प्रकारचा. मग मी तो नाद सोडला. मग काही वाचनप्रेमी मित्रांना घरी बोलावले आणि माझा संग्रह दाखविला. त्यांनी न वाचलेली अशी मोजकी ३-४ पुस्तके निघाली. ते ती नेण्यास उत्सुक होते. मग ती मला बिलकूल परत न करण्याचा अटीवर त्यांना देऊन टाकली ! अर्थात उरलेला साठा अजूनही बराच होता.
एका लहान गावातील वाचनालयाचे वृत्तपत्रात निवेदन आले होते. त्यांना वाचून झालेली पुस्तके भेट चालणार होती. त्यासाठी पोस्टाच्या रांगेत उभे राहायची माझी तयारी नव्हती. म्हणून एक कुरियर गाठले. लहान गावी पाठवाल का म्हणून विचारले. ते प्रयत्न करतो म्हणाले. मग मी ५ पुस्तके त्यांना दिली. मात्र ती इच्छित ठिकाणी काही पोचली नाहीत. मी पण त्यांचेकडे पोच मागण्याचा नाद सोडला. ज्या कोणाच्या हाती पडतील त्याला जर वाटले तर तो ती वाचेल, असा विचार करून विषय सोडून दिला.
या दरम्यान दोन साहित्यिकांचे या संदर्भात लेख वाचण्यात आले. एक होता विजय तेंडुलकरांचा. त्या लेखातील प्रसंगातला एक माणूस विचित्र आहे. तो मुंबईच्या बसने प्रवास करतो आहे आणि एकीकडे पुस्तक वाचतो आहे. एकेक पान वाचून झाले की तो ते फाडून काढतो, त्याचा बोळा करतो आणि खिडकीतून तो चक्क फेकून देतो ! या प्रकाराने चकित होऊन लेखक त्याला याचे स्पष्टीकरण विचारतो. तो सांगतो की त्याचे बरेच ओळखीचे लोक फुकटे वाचक आहेत. ते त्याच्याकडचे एखादे पुस्तक निःसंकोचपणे मागतात आणि नंतर परत करायचे जाम विसरून जातात. अशा प्रकारे त्याची बरीच पुस्तके गायब झाली होती. त्यानंतर तो सध्याच्या निष्कर्षावर आला होता. वाचून झाले की फाडुनच टाकायचे, म्हणजे घरी संग्रह नको आणि कुणी फुकट मागायला पण नको ! पुढे जाऊन तो लेखकाला बजावतो, " मुला, अरे जगातील कित्येक मौल्यवान गोष्टी कालौघात नष्ट होतात, तिथे एका पुस्तकाचे काय घेऊन बसलास?"
तें नी रचलेला हा प्रसंग नक्कीच बाळबोध नाही. ( मात्र तो माणूस बोळे रस्त्यात फेकून अस्वच्छता का करतोय हा प्रश्न आपण तूर्त सोडून देऊ !). त्याच्या गाभ्यातील अर्थ काढायचे त्यांनी आपल्यावर सोडून दिले आहे. माझ्यापुरता मी असा अर्थ काढला. पुस्तक एकदा वाचून झाले की बास, त्याचे जतन करायची खरंच गरज असते? हा मुद्दा वादग्रस्त आहे हे कबूल. पण माझ्या बदलत्या विचार आणि परिस्थितीत मी माझ्यापुरता हा अर्थ काढला. त्यामुळे, एखादे वाचलेले पुस्तक जर कायम ठेवावेसे वाटत नसेल तर रद्दीत विकायला काय हरकत आहे, अशी ठिणगी मनात पडली.
दुसरा लेख वाचला तो रवींद्र पिंगेंचा. त्यात सुरवातीस साहित्यिकांचे अहंकार वगैरेचे चर्वितचर्वण होते. पुढे लेखाला एकदम कलाटणी दिली होती. त्यांनी असे म्हटले होते. ज्ञानेश्वर असोत की शेक्सपिअर, पिंगे असोत की एखादा नवोदित लेखक, या सर्वांत एक गोष्ट समान असते. ती म्हणजे, या सर्वांची पुस्तके कधीनाकधी पदपथावर विक्रीस येतात. म्हणजेच पदपथ ही अशी 'साहित्यिक' जागा आहे की जी जगातल्या सर्व लेखकांना एकाच पातळीवर आणते !
( इथे मला ' Death is the greatest equaliser' या वचनाची सहज आठवण झाली). या लेखातील मिश्किलपणा भावला पण त्याचबरोबर विचारांना एक वेगळी दिशा मिळाली. लहानपणापासून मी पदपथावरचे पुस्तक विक्रेते पाहत आलो आहे. तिथून कधी एखादे पुस्तकही विकत घेतले आहे. किंबहुना काही दुर्मिळ पुस्तकांसाठी असे पदपथ धुंडाळणारे शौकीन असतात. तर मुळात एखादे पुस्तक पदपथावर येतेच कसे? अर्थातच कुणीतरी आपल्या संग्रहातील पुस्तक रद्दीत विकल्यामुळेच ! अशा जुन्या पुस्तकांची विक्री करून कुणीतरी आपला चरितार्थ करत आहेच ना. तेव्हा आपल्याकडील पुस्तक रद्दीत विकताना फार अपराधी का वाटावे? शेवटी त्या मार्गे ते कुठल्यातरी वाचकांपर्यंतच पोचते.
अशी वैचारिक घुसळण झाल्यानंतर आता मी माझ्याकडची काही पुस्तके नियमितपणे रद्दीत देऊ लागलो. असे करताना त्या पुस्तकांबद्दलचा आदर मनात ठेवतो. भावनेला मध्ये येऊ देत नाही. आता कपाटातील जागा रिकामी होऊन तिथे नव्याने घेतलेल्या पुस्तकासाठी जागा उपलब्ध होते. या प्रकारची पुस्तकी-उलाढाल आनंददायी आहे. पुस्तके रद्दीत देण्याचा निर्णय पटकन घेता येतो आणि ते दुकान घराजवळ असल्याने अंमलबजावणीही झटकन होते. याउलट पुस्तके दान करण्याचा निर्णय खूप वेळकाढू ठरतो. त्यासाठी योग्य व्यक्ती/संस्था शोधा, त्यांचे कार्यालयीन सोपस्कार हे सर्व आपल्याला बघावे लागते.
अजून एक मुद्दा. आपण बहुतेकांनी आपल्या पदवी शिक्षणा दरम्यान घेतलेली अभ्यासाची पुस्तके (एखादा अपवाद वगळता) यथावकाश रद्दीत दिलीच होती ना. त्या पुस्तकांवर तर आपले आयुष्यभराचे पोटपाणी अवलंबून आहे. तिथे जर आपण रद्दीचा निर्णय सहज घेतो तर मग साहित्यिक पुस्तकांबद्दलच आपण फार भावनिक का असतो ?
गेल्या काही वर्षांत काही पुस्तकवेड्या संग्राहकांबद्दल लेख वाचनात आले. या मंडळींनी घरी प्रचंड पुस्तके साठवली आहेत. त्यांचा संग्रह बघून असा प्रश्न पडतो की त्यांच्या घरात पुस्तके आहेत, की तेच पुस्तकांच्या घरात राहताहेत ! या व्यासंगी लोकांबद्दल मला आदर वाटतो. मी मात्र त्यांच्यासारखे व्हायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले. आपण वाचनातले 'मध्यमवर्गीय' असल्याने आपला संग्रह हा आटोपशीर असलेलाच बरा, हा माझा निर्णय.
खूप मोठा संग्रह जर आयुष्यभर बाळगायचा असेल तर कालानुरूप आता बदलावे लागेल. छापीलच स्वरूपात सर्व साठवायचा हट्ट धरून चालणार नाही. फार जुन्या आणि जीर्ण पुस्तकांची इ फोटो-आवृत्ती करून घेणे हितावह आहे. तसे प्रयत्न काही लोक करीत आहेत हे नक्कीच स्तुत्य आहे. मराठीत जशी इ पुस्तकांची बाजारपेठ वाढेल तसे छापीलच्या साठवणुकीचा प्रश्न कमी होईल.
पुस्तकसंग्रहाबद्दलचे हे होते माझे अनुभवकथन. तुमचेही अनुभव जरूर लिहा. वाचण्यास उत्सुक.
*********************
प्रतिक्रिया
13 Nov 2019 - 9:12 am | गवि
विषय आणि विचार रोचक आहेत. सर्वांना रिलेट करता येणारे.
कागदी छापील पुस्तके आता मागे पडत जातील आणि आपोआप हा प्रश्न कालबाह्य होईल.
13 Nov 2019 - 9:31 am | प्रकाश घाटपांडे
पुस्तके आवरताना मी भ्रमिष्ट होतो.काय ठेवायचे काय नाही हे ठरवता येत नाही .तुमचा लेख वाचताना त्रास झाला . वाचताना ग्रंथालय कथा आणि व्यथा आठवले
13 Nov 2019 - 10:31 am | कुमार१
* गवि, प्रकाश
धन्यवाद व सहमती.
* प्रकाश,
तुमचा तो लेख वाचला, सहमत. त्यावरून एक विडंबन व्याख्या आठवली:
'जिथे ग्रंथांचा लय होतो ते ग्रंथालय !'
13 Nov 2019 - 10:52 am | सुबोध खरे
आपले अनुभव अगदी पटणारे आहेत.
ज्ञानेश्वर असोत की शेक्सपिअर, पिंगे असोत की एखादा नवोदित लेखक,
याबद्दल मला श्री गंगाधर गाडगीळ यांचा एक किस्सा आठवतो आहे.
त्यांनी लिहिले आहे कि मला जेंव्हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेंव्हा मला असे वाटू लागले होते कि आपण आता प्रथितयश लेखक झालो.
हा माझा गर्व एका कीर्ती कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने झटक्यात उतरवला.
तो आपल्या मित्राला विचारत होता की आपल्याला १२ मार्कांसाठी "ज्ञानेश्वर" आहे ना ?
अमृतातेही पैजा जिंके अशी ज्ञानेश्वर माउली फक्त १२ मार्कांना
मग गंगाधर गाडगीळ तर कोण्या झाडाचा पाला
15 Nov 2019 - 8:03 am | पाषाणभेद
हा किस्सा पुलं च्या नावाखाली रजिस्टर्ड आहे असे वाटते.
13 Nov 2019 - 11:54 am | टर्मीनेटर
लेख, विजय तेंडुलकरांचा प्रसंग आणि रवींद्र पिंगेंचा सिद्धांत सर्वच आवडले! त्याचबरोबर एडवर्ड बर्नेज यांच्या ‘प्रोपगंडा’ या पुस्तकाचीही आठवण झाली.
या वाक्याने सुरुवात होणाऱ्या ह्या पुस्तकात लोकांच्या मतांना आणि सवयींना वळण द्यायचे, ‘स्पिन’ देणे हेच प्रोपगंडा पंडिताचे काम असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
१९३० मध्ये बर्नेज Harcourt Brace, & Co, Simon & Schuster अशा काही प्रकाशकांसाठी काम करीत होते. ह्या प्रकाशकांना पुस्तकांचा खप वाढवायचा होता. तेव्हा बर्नेज ह्यांनी हेच केले. लगेच वर्तमानपत्रांतून प्रतिष्ठित व्यक्ती पुस्तकांचे सांस्कृतिक महत्त्व सांगू लागल्या. आर्कीटेक्ट, बांधकाम व्यावसायिक आणि इंटिरियर डेकोरेटर्स यांच्या संघटनांना त्यांनी हाताशी धरले. ही सर्व मंडळी घरात बुकशेल्फ/ पुस्तकांचे कपाट असणे कसे गरजेचे ते सांगू लागली. पुस्तकाचे कपाट असणारे घर प्रतिष्ठित ठरू लागले.
आता कपाट आले म्हणजे त्यात ठेवायला पुस्तकांची खरेदी करणे आले! हे सारे ‘गरज निर्माण करणे’ होते. यात विकली जात होती ‘संस्कृती’ आणि खप वाढत होता पुस्तकांचा.
मुठभर अभ्यासकांची/लेखकांची आवड किंवा गरज असलेल्या वैयक्तिक पुस्तक संग्रहाला अशाप्रकारे प्रतिष्ठेशी/संस्कृतीशी जोडून पेश केले गेले आणि त्यात प्रचंड यशही मिळाले हे आत्ता आत्तापर्यंत आपण पाहतच आहोत 😀 कमीअधिक प्रमाणात आपण सगळेच त्या प्रोपगंडाला बळीही पडले आहोत!
काहीशे वर्षांपूर्वी चर्चच्या पाठींब्याने ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी मिशनरींनी वापरात आणलेला 'प्रोपगंडा' पुढे राजकारण, समाजकारण, युद्धे, व्यवसायवृद्धी, विपणन अशा अनेक कारणांसाठी उत्तरोत्तर प्रगत होत आपल्या दैनंदिन जीवनाचा (नकोसा असलेला) भाग झाला आहे.
13 Nov 2019 - 12:22 pm | कुमार१
* सुबोध,
किस्सा आवडला.
*टर्मिनेटर,
अभ्यासपूर्ण प्रतिसाद.
>>>> + १११
13 Nov 2019 - 12:54 pm | जॉनविक्क
टू बॅड हे ललित दिवाळी अंकात न्हवते.
साठलेल्या भरमसाठ पुस्तकांचे मूल्य तुम्हाला वाचनासाठी 24 तास वेळ रिकामा असेल अथवा तुम्ही वाचनालय चालवत असाल तर आणी तरच असते. आजकाल वाचन फार कमी होते आहेच, पण जेंव्हा वेळ होता तेंव्हा एक आख्खी खोली पुस्तकांनी भरलेली, त्यात कॉम्पुटर (नॉन इंटरनेट) माझे बेड इतकेच सामान. पुस्तके काही व्यवस्थित रचलेली काही अस्ताव्यस्त पडलेली.
आयुष्याचा दीर्घकाळ इथूनच उर्जा मिळण्यात गेला, अक्षरशः 10 -10 तास मी खोलीत, तिथे गेलो की अलिबाबाची गुहा वाटायची. मी आणी मित्र आलटून पालटून कॉम्पुटर वर खेळ खळणे आणी प्रचंड पुस्तके वाचणे, जगाचा विसर पडलेला, आमच्याच विश्वात बेभान आम्ही, प्रत्येक प्रश्नाला, समस्येला उत्तर हे असतेच याचा आत्मविश्वास याच खोलीतून मिळाला.
आता पुस्तके डजनभरही उरली नाहीत, iMac आहे, Mi max 2 आहे, 4g नेटवर्क आहे आणी निर्माण केलेल्या प्रश्नाना सोडवण्यात ऊर्जा खर्च करू नये असे विचारपण आहेत.
13 Nov 2019 - 1:37 pm | लई भारी
हे अगदी पटले :-) म्हणजे relate झालं म्हणा!
तुमच्यासारखीच स्थिती होतीय. अगदी एवढी पुस्तके नाहीत पण आधी जे खूप आवडायचं ते निव्वळ विकत घेतलंय म्हणून ठेवण्यात अर्थ नाही. आता वाचत तर नाहीच.
बाकी किंडल त्यासाठीच घेतला की वाचन वाढेल(जे काही झालं नाही दुर्दैवाने) आणि साठवण्याचा त्रास कमी होईल.
प्रोपागंडा चा मुद्दा भारी आहे!
13 Nov 2019 - 2:12 pm | कुमार१
* जॉन,
अगदी !
* ल भा ,
किंडल वाचनासाठी शुभेच्छा !
13 Nov 2019 - 3:52 pm | सोत्रि
>> पुस्तकांबद्दलचा आदर मनात ठेवतो. भावनेला मध्ये येऊ देत नाही
हे उत्तम!
संग्रही ठेवायची पुस्तके मोजकीच असतात हे आता भारंभार पुस्तके विकत घेऊन आल्यानंतरचे माझे शहाणपण आहे. त्यामुळे रद्दीत पुस्तके देताना भावना आड येत नाहीत.
- (पुस्तक संग्रही) सोकाजी
14 Nov 2019 - 8:23 am | कुमार१
सोत्रि, सहमत.
मुंबईतील पदपथावरील पुस्तक दुकानांबद्दल एक रोचक लेख इथे:
15 Nov 2019 - 8:08 am | पाषाणभेद
मलाही आता तसेच करावे लागेल असे दिसते. कपाटे पुस्तकांनी भरलेली आहेत. अन त्याला गेल्या कित्येक वर्षात हातही लागलेला नाही अशी स्थिती आहे.
छान लेख.
15 Nov 2019 - 8:57 am | कुमार१
पाभे, धन्यवाद.
मलाही आता तसेच करावे लागेल असे दिसते.
>>>
जरूर, त्यासाठी शुभेच्छा !
माझ्या वैद्यक पदवीच्या काळातील एकमेव पुस्तक मी अजून ठेवले होते ते म्हणजे वैद्यक शब्दकोश. आता तो बाळगणे येडेपणाचे असल्याने ते आताच रद्दीत दिले.
15 Nov 2019 - 10:56 am | सुबोध खरे
माझ्या वैद्यक पदवीच्या काळातील शरीर रचना शास्त्राची (ANATOMY) पुस्तके मी अजून ठेवली आहेत कारण शरीर रचनेत काहीही बदल झालेला नाही आणि त्यातील आकृत्या रुग्णांना समजावून सांगण्याच्या कामात येतात.
बाकी एम डी च्या वेळेस घेतलेले रेडिओलॉजिचे मूलभूत पुस्तक अजून ठेवले आहे कारण एक्स रे बद्दल ची माहिती आजकालच्या पुस्तकात फार त्रोटक मिळते.
बाकी सर्व पुस्तके २-३ वर्षात कालबाह्य होतात. परंतु जालावर मोठ्या प्रमाणात माहिती असल्याने पुस्तके घेणे एकंदर कमीच झाले आहे.
15 Nov 2019 - 10:28 am | गुल्लू दादा
पुस्तके साठवावीत इतकं वाचन अजून झालं नाहीये...पण या लेखातून आणि वरच्या सर्व प्रतिसादातून निवडक पुस्तकेच संग्रही ठेवावी हेच प्रतीत होते. याचा नक्की फायदा होईल मला..धन्यवाद.
15 Nov 2019 - 11:21 am | कुमार१
या चर्चेतून लक्षात आले आहे की आपल्यातले बरेच जण संतुलित संग्राहक आहेत. त्या सर्वांना एक विनंती:
तुमच्याकडची कोणती पुस्तके ( कमाल ५ ) तुम्हाला आयुष्यभर बाळगावी वाटतील ती लिहिणार का ?
अर्थात हे आजच्या विचारानुसार असेल.
15 Nov 2019 - 11:41 am | प्रचेतस
१. झाडाझडती: विश्वास पाटील - धरणग्रस्तांच्या आयुष्यावरील विश्वास पाटलांची सर्वोत्तम कादंबरी
२. दुर्गभ्रमणगाथा: गोपाल नीलकंठ दाण्डेकर - कधीही उघडून वाचा, गोनीदांची शब्दश्रीमंती.
३. तुंबाडचे खोतः श्री. ना. पेंडसे - कोकणातल्या खोतांच्या ४ पिढ्यांवरील जबरदस्त द्विखंडी कादंबरी.
४. द गॉडफादर - मारिओ पुझो - बस नामही काफी है.
५. महाभारत सर्व ११ खंड - आयुष्यभरासाठी अनमोल ठेवा. यासम इतर काहीच नाही. विश्वातील सर्वश्रेष्ठ ग्रंथराज.
ह्याशिवाय इतरही अनेक पुस्तके आहेत जपून ठेवावीशी अशी.
15 Nov 2019 - 11:43 am | विनिता००२
चांगला लेख :)
आपण बहुतेकांनी आपल्या पदवी शिक्षणा दरम्यान घेतलेली अभ्यासाची पुस्तके (एखादा अपवाद वगळता) यथावकाश रद्दीत दिलीच होती ना. >> शाळेची पुस्तके मराठी, हिंदी वगैरे मी वाचायला ठेवायचे. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला द्यायची असतीले तर मात्र सगळी द्यावी लागायची. माझी पुस्तक हाताळणी व्यवस्थित असल्याने केवळ नांव टाकल्याने पुस्तक वापरले आहे हे लक्षात यायचे. :)
बाकी गणितीचे पुस्तक रद्दीत द्यायला आवडले असते ;)
मी शक्यतो मोजकीच पुस्तके विकत घेते. मासिके, दिवाळी अंक जे कामाचे वाटत नाही ते रद्दीत देते. कोणाला राग आला तरी चालेल पण पुस्तके मी कोणाला वाचायला ही देत नाही, फार वाईट अनुभव आलेत. एकतर महाग पुस्तके पदराला खार लावून, बरीच वाट पाहून विकत घेतलेली असतात, ती कोणी लांबवणं फार त्रासदायक होतं. :(
15 Nov 2019 - 11:47 am | विनिता००२
तुमच्याकडची कोणती पुस्तके ( कमाल ५ ) तुम्हाला आयुष्यभर बाळगावी वाटतील ती लिहिणार का ?
१. झाडाझडती: विश्वास पाटील - धरणग्रस्तांच्या आयुष्यावरील विश्वास पाटलांची वास्तववादी सर्वोत्तम कादंबरी
२. मृत्युंजय - कधीही, कुठूनही वाचावे असे. मनाच्या फार जवळ
३. राजा शिव छत्रपती - महाराजांबद्दल सर्व काही!
४. पुलं संग्रह
५. जी एं ची पुस्तके - अतिशय वाचनीय
ह्याशिवाय इतरही अनेक पुस्तके आहेत जपून ठेवावीशी अशी.
15 Nov 2019 - 12:12 pm | कुमार१
यादी सादर केलेल्या सर्वांना धन्यवाद !
@विनिता:
अगदी योग्य ! माझ्या आजी आजोबांची पुस्तक उधारीची पद्धत आठवली. त्यांनी एका वहीत पुस्तक-यादी करून त्यापुढे २ स्तंभ आखले होते. उधार देताना त्या घेणाऱ्यांची सही घ्यायचे, दिनांकासह. परत केल्यावर त्याचे देखत सही खोडत.
15 Nov 2019 - 12:32 pm | गड्डा झब्बू
उत्तम लेख, उद्बोधक चर्चा.
विद्यार्थी अवस्थेत पालकांच्या पैशाने घेतलेली पाठ्यपुस्तके आणि विज्ञान प्रदर्शनातून घेतलेली मोजकी पाच सहा पुस्तके वगळता बाकी एकही पुस्तक, मासिक अद्याप खरेदी केलेलं नाही.
लायब्ररी झिंदाबाद !
15 Nov 2019 - 12:47 pm | जॉनविक्क
15 Nov 2019 - 1:04 pm | कुमार१
ग झ, धन्यवाद
'वाचनालय झिंदाबाद' शी बराचसा सहमत.
बऱ्याच वर्षांपूर्वी 'अंतर्नiद' मासिकात 'पुस्तके विकत की वाचनालयातून' यावर वादळी चर्चा झाली होती. प्रत्येक बाजूस आपापले फायदे-तोटे आहेत.
काही वर्षांपूर्वी माझे धोरण असे होते. महाराष्ट्रात वास्तव्य असताना वाचनालय, तर पराराज्य /परदेशात असताना विकत घेणे.
आज मी ८०% वाचनालय आणि २०% विकत, या मताचा आहे.
…
संग्रहाच्या सर्वांच्याच यादी उत्तम ! धन्यवाद.
15 Nov 2019 - 1:55 pm | अनिंद्य
फार विचारप्रवर्तक लिहिले आहे.
पुस्तकांचे ओझे कधीच वाटले नाही तरी दीर्घकाळ मोठा पुस्तकसाठा सांभाळणे महानगरांमध्ये तरी मोठे दिव्य आहे.
मी हे करतो :-
- चाळल्यानंतर पुनर्वाचनयोग्य / खास नाही असे वाटते ते विकतच घेत नाही. ही स्टेप फारच महत्वाची आहे, इथे अधाशीपणावर ताबा ठेवावाच लागतो.
- घरात छापील पुस्तकसाठा मर्यादित ठेवण्याचा सतत प्रयत्न. शहर / घर बदलण्याच्या प्रत्येक संधीचा उपयोग पुस्तके कमी करण्यासाठी करतो. (हेच अन्य सामानासाठीही करतोच) सुमारे १३०० पुस्तके 'दिल्या घरी सुखी राहा' कॅटेगरीत ढकलण्यात यश लाभले आहे.
- वाचून झालेली, पुन्हा वाचण्याची शक्यता कमी असलेली पुस्तके ग्रंथालय, ओळखीचे वाचकमित्र आणि रद्द्दीवाला ह्या क्रमाने निर्ममतेने वाटून टाकतो.
- एखाद्या पुस्तकातले एखादे पान / प्रकरण फारच आवडलेले असेल आणि संग्रही असावेच असे वाटत असेल तर त्याचा स्मार्टफोन किंवा आयपॅड वापरून फोटो काढून ठेवतो, पुन्हा वाचण्यासाठी.
- आता ई पुस्तकांचा / डिजिटल वाचनाचा चाहता आहे. पानं उलटण्याची मजा त्यात नसली तरी ते सोपे/सुलभ वाटायला लागले आहे.
15 Nov 2019 - 4:53 pm | कुमार१
अनिंद्य,
सुंदर प्रतिसाद.
>>>
अगदी !
>>>
दानशूर आहात !
'निर्ममतेने' : हा शब्द खूप आवडला.
15 Nov 2019 - 7:38 pm | सुधीर कांदळकर
या लेखाने माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन पडले. माझ्या पुस्तकांची सौ. आणि चि. यांना अडचण होते. यामुळे मला अजूनपर्यंत खूप वाईट वाटत असे. आता संदर्भग्रंथ सोडून बाकी सारे रद्दीवाल्याला सुपूर्द करतो.
अनेक, अनेक धन्यवाद.
15 Nov 2019 - 7:41 pm | सुधीर कांदळकर
या लेखाने माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन पडले. माझ्या पुस्तकांची सौ. आणि चि. यांना अडचण होते. यामुळे मला अजूनपर्यंत खूप वाईट वाटत असे. आता संदर्भग्रंथ आणि भेट आलेली काही पुस्तके सोडून बाकी सारे रद्दीवाल्याला सुपूर्द करतो.
अनेक, अनेक धन्यवाद.
15 Nov 2019 - 8:51 pm | सुधीर कांदळकर
दोन वेबस्टर डिक्शनर्या. पैकी एक खिसा आवृत्ती. एक मराठी शब्दकोश. फार्माकोलॉजी अॅन्ड फार्माकोथेअकोथेराप्यूटीक्स - सातोस्कर भांडारकर १९८० दोन भागात. एक मेडिकल डिक्शनरी - नर्सिंगची - रद्दीच्य दुकानात घेतलेली. औषधी संग्रह - वासुदेव गणेश देसाई - हे वनस्पतीविषयक.
बाकी सारे रद्दीत देणार. धन्यवाद
15 Nov 2019 - 9:07 pm | कुमार१
सुधीर,
प्रतिसाद व यादीबद्दल धन्यवाद.
दोन वेबस्टर डिक्शनर्या
>>>
मी देखील ऑक्सफर्ड शब्दकोश ठेवणार आहे. कारण सांगतो. आपल्याकडे वीज व आंतरजाल सेवा कधी अचानक कोलमडेल याचा भरवसा नाही. तसेच जगातही कुठे नैसर्गिक आपत्ती आल्यास असे होऊ शकते. अशा वेळेस मला एखाद्या शब्दर्थाची गरज भासली तर मी प्रचंड अस्वस्थ होईन ! म्हणून छापील जवळ हवाच. ☺️
15 Nov 2019 - 9:38 pm | चौकटराजा
मी आय टी वाला नसल्याने मला प्राप्ती मर्यादितच होती. त्यातल्या त्यात मी काही पुस्तके विकत घेतली होती. पणे ते तिथेच थांबले. वाचनात मला काही काळ रहस्यकथा , नन्तर इन्ग्लीश कादम्बर्या रूपान्तरीत वगरे अशी आवड होती पण आता फिक्शन ची आवड अजिबात राहिली नाही. त्यात आंतर्जाल आले.ध्वानीसह
द्रुक अनुभव घेण्याची सोय निर्माण झाली. त्यामुळे शुद्ध साहित्यापेक्शा माहिती साहित्य याकडे मन रमू लागले. यामुळे मी टी व्ही पहात नाही. युट्युब चा भरपूर आनन्द लुटतो. माझ्याकडची बरीचशी पुस्तके सावरकर गन्थालय निगडी येथे देऊन टाकली.
16 Nov 2019 - 7:27 pm | कुमार१
वरील सर्वांची यादी उत्तम, धन्यवाद.
आता समारोप करीत माझी यादी देतो :
१. एक शून्य मी - पुलं ( यातील ५ लेखांसाठी)
२. लक्ष्मणझुला - लक्ष्मण लोंढे
३. बनगरवाडी - व्यं मा ( या आवृत्तीत कादंबरी व त्यांनी स्वतः काढलेली चित्रे पण आहेत)
४. एका कोळीयाने - पुलं ( यातून हेमिंगवे व पुलं अशा दोघांची आठवण म्हणून)
५. कोसला - नेमाडे ( यातील पांडुरंग व सुरेश यांच्या भंकस संभाषणापुरतेच).
16 Nov 2019 - 7:37 pm | यशोधरा
पुस्तके रद्दीत वा तशीही देऊन टाकणे माझ्याच्याने व्हायचे नाही. कधी काळी कोणाला उधार दिलेच तर ते परत येईतोवर माझ्या जीवात जीव नसेल, मी सहसा कोणाला पुस्तके देत नाही, सॉरीच त्या बाबतीत. एकदा एका मैत्रिणीने जीवापाड जपलेले पुस्तक नेऊन अगदी खिळखिळे करून आणून दिले आणि त्याबद्दल तिला काहीही खंत नव्हती, तेव्हापासून कोणालाही पुस्तक देणे बंद केले!
जी पुस्तके संग्रही ठेवीन, तीच घेणे होते. पाचच पुस्तके सांगणे फार कठीण काम आहे, तस्मात पास.
17 Nov 2019 - 10:02 pm | मुक्त विहारि
पुस्तके रद्दीत देणार असाल तर माझ्या घरी खूप जागा आहे.
18 Nov 2019 - 8:00 am | कुमार१
>>>>
जरूर विचार करण्यात येईल. तुम्ही जेव्हा इकडे याल तेव्हा तुम्हाला तो नजराणा सादर करण्यात येईल !!
18 Nov 2019 - 9:30 pm | कुमार१
नुकताच डॉ. राधाकृष्णन यांच्याबद्दलचा एक किस्सा वाचला. ते विद्यार्थीदशेत असताना एका वळणावर त्यांना गणित का तत्वज्ञान यांपैकी एकाची निवड करायची होती. पण घरची खूप गरिबी. त्यामुळे ते चिंतेत होते. त्यांचा हा प्रश्न एकाच्या पुस्तकदानाने सुटला !
त्यांचा तो नातलग तत्वज्ञानात पदवीधर झाला होता आणि आता त्याला त्याची पुस्तके बाळगायची गरज वाटली नाही. मग त्याने ती सर्व राधाकृष्णनना फुकट देऊन टाकली. या देणगीमुळेच त्यांची शिक्षणाची दिशा ठरली. अर्थातच पुढे ते जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ झाले.
18 Nov 2019 - 10:42 pm | जॉनविक्क
म्हणजे नेमके काय झाले ? तसेच 2020 च्या दशकात पुढे ते जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ कसे बनावे यावर कोणी मार्गदर्शन हवे आहे.
14 Jan 2020 - 4:45 pm | कुमार१
हा वाचनीय लेख इथे आहे :
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/patipencil/readers-not-int...
त्याचा सारांश हा आहे:
अन्य क्षेत्रांवर डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला असला, तरी पुस्तकांच्या बाबतीत जागतिक पातळीवर वाचक अजूनही छापील प्रतीच्याच प्रेमात आहेत !
26 Feb 2020 - 10:38 am | कुमार१
नुकतेच घराचे माळे साफ केले आणि बऱ्याच जुन्या पुस्तकांना रद्दीत दिले. त्यामध्ये ऑक्सफर्ड शब्दकोश, ज्ञानकोश यांचा समावेश होता.
ते जपण्यामागे भावनेचाच भाग होता. गेल्या काही वर्षांत त्यांना हातही लावला नव्हता. गुगलकृपेमुळे आता कोश जपायची गरज नाही.
29 Feb 2020 - 4:07 pm | राजेंद्र मेहेंदळे
आमच्या घरी बर्यापैकी पुस्तके साठली आहेत, पण त्याची अडचण होण्यईतकी परीस्थिती आलेली नाही अजुन. माझ्या आवडीची ५ पुस्तकेच सांगणे फार कठीण आहे पण तरीही प्रयत्न करतो.
१.तबला (मुळगावकर)
२. म्रुत्युंजय/श्रीमानयोगी
३. हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन(श्री. एम)
४.शेरलॉक होम्स सीरिज
५. किमयागार/मुसाफीर(अच्युत गोडबोले)
अजुन काही निवडक
टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न (सॅम पित्रोडा)
स्टे हंग्री स्टे फूलिश
दासबोध्/ज्ञानेश्वरी/गुरुचरीत्र/ गोंदवलेकर प्रवचने
चकवाचांदण(मारुती चितम पल्ली)
एका रानवेड्याची शोधयात्रा(कृष्णमेघ कूंटे)
नर्मदे हर हर/साधनामस्त/नित्य निरंजन
बाकी हौसेने आणलेली पण पुर्ण न वाचलेली अनेक
29 Feb 2020 - 4:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
आमच्या घरी बर्यापैकी पुस्तके साठली आहेत, पण त्याची अडचण होण्यईतकी परीस्थिती आलेली नाही अजुन. माझ्या आवडीची ५ पुस्तकेच सांगणे फार कठीण आहे पण तरीही प्रयत्न करतो.
१.तबला (मुळगावकर)
२. म्रुत्युंजय/श्रीमानयोगी
३. हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन(श्री. एम)
४.शेरलॉक होम्स सीरिज
५. किमयागार/मुसाफीर(अच्युत गोडबोले)
अजुन काही निवडक
टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न (सॅम पित्रोडा)
स्टे हंग्री स्टे फूलिश
दासबोध्/ज्ञानेश्वरी/गुरुचरीत्र/ गोंदवलेकर प्रवचने
चकवाचांदण(मारुती चितम पल्ली)
एका रानवेड्याची शोधयात्रा(कृष्णमेघ कूंटे)
नर्मदे हर हर/साधनामस्त/नित्य निरंजन
बाकी हौसेने आणलेली पण पुर्ण न वाचलेली अनेक
1 Mar 2020 - 9:56 am | कुमार१
तुमचा संग्रह छान आहे. आवडला.
वाचन शुभेच्छा !
13 Jan 2021 - 8:39 pm | Nitin Palkar
लेख खूपच आवडला. नवीन पुस्तके विकत घेताना कुठे ठेवावित हा प्रश्न नेहमीच भेडसावत असे, पुस्तकांबरोबर भावनिकरीत्या अधिक गुंतू नये हे जाणवले...
_/\_
15 Jan 2021 - 1:55 pm | Bhakti
मलाही हेच जाणवले
कारण.. तुमच्याकडची कोणती पुस्तके ( कमाल ५ ) तुम्हाला आयुष्यभर बाळगावी वाटतील ती लिहिणार का ?
यावर मी ज्या पुस्तकांची नावे खाली लिहीत आहे,ती क्र.२ आणि ५ पुस्तके आता कोणी कोणी नेली ते अजूनही आठवत नाही....पण जवळ ठेवली असती..
१.श्री संत एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण
डॉ. म.वि.गोखले
२.द दा विंची कोड-डॅन ब्राऊन
३.अल्केमिस्ट - पाउलो कोएल्हो
४.किमयागार-अच्युत गोडबोले
५.ऋतूचक्र-दूर्गा भागवत
14 Jan 2021 - 12:36 pm | चलत मुसाफिर
पुस्तकचोरीला मी चोरी मानत नाही. माझे पुस्तक कुणी चोरले तर ते चोराला दम भरून परत घेऊन येण्यापेक्षा अधिक मी काही करत नाही- म्हणजे चोराशी मैत्री तोडणे वगैरे.
14 Jan 2021 - 1:20 pm | कुमार१
निपा, चमु
धन्यवाद व सहमती.
एका इंग्लिश लेखकाचा किस्सा आहे.
ते ट्रेनच्या प्रवासात बरोबर पुस्तके नेत. ती वाचून झाली की मुद्दाम बर्थवर सोडून देत. ज्याला कुणाला ती नंतर मिळतील त्याने फुकटात का होईना पण वाचावे, हा हेतू.
15 Jan 2021 - 8:57 am | शेखरमोघे
लेख आवडला. अनेक वेळा इतर बाबतीत जसे अधाशीपणाचे दुष्परिणाम अनुभवास येतात तसे पुस्तकान्च्या बाबतीत ही - मग ती विकत घेतलेली असोत अथवा वाचनालयातून आणलेली थप्पी असो.
मी परदेशात असताना माझ्या कामाशी निगडीत म्हणून अनेक देशातील विविध व्यवसायातील कम्पन्यान्चे "Annual Reports" मिळवून, त्यातील आकडेमोडीन्चा अभ्यास करत असे. तिथून हलताना असे सुमारे २५० "Annual Reports" तिथल्या लेखापालान्च्या सन्घटनेला देऊन टाकले. त्यानी त्यावेळी दाखवलेल्या "उत्साहा"वरून तो माझा खजिना त्यानन्तर काही काळातच मोडीत गेला असावा.
मी सभासद असलेल्या पुण्यातल्या काही दशके चालू असलेल्या, इन्ग्रजी आणि मराठीतील काही हजार पुस्तके असलेल्या एका वाचनालयात एकदा काही तरी उलथापालथ सुरू झाल्यासारखे वाटले. चौकशी केल्यावर - जरा "renovation" वगैरे व्हायचे असल्यामुळे काही काळ वाचनालय थोडेसे "मर्यादित" राहील असे सान्गण्यात आले. नन्तर बरीच पुस्तके बान्धाबान्ध करून मागच्या एका जुन्या भागात स्थलान्तरित झाली जिथे ती बघणे, चाळणे असे काही करणेच अशक्य झाले. नवीन सभासद घेणे बन्द करत आणि जुन्या सभासदाना नाउमेद करत ८-१० महिन्यात ते वाचनालय रोडावले, वर्षाभरात बन्द झाले आणि मग जरा "renovation" वगैरे वगैरे सगळे पूर्ण करून मालकाकरता जास्त पैसे मिळवणारे एक "Training Centre" त्या जागी अस्तित्वात आले.
15 Jan 2021 - 3:08 pm | सरिता बांदेकर
लहानपणी वडिल नेहमी सांगत की ज्यांच्याकडे खूप पुस्तकं तो खरा श्रीमंत. जसजशी मोठी झाले तशी ही मध्यमवर्गीय समस्या आड आली. पण पुस्तकं विकत घेतली आणि काही पुस्तकं लोकांना दिलीसुद्धा.पण.......
मी ॲन रॅंडचं एकही पुस्तक कुणाला दिलं नाही अगदी वाचण्यासाठीसुद्धा.तशीच शिवाजी महाराजांची चरित्र
आता मी एक पुस्तक शोधतेय
शांताराम नांवाचं ते मिळालं की ते पण कुणाला देणार नाहीय.
माझ्याकडे पु.लं.ची पुस्तकं तर संग्रही आहेतच पण रामनगरी सुद्धा आहे.
16 Jan 2021 - 10:45 pm | सौंदाळा
शांताराम बरं पुस्तक आहे.
मात्र संग्रही ठेवण्यासारखे वाटलं नाही.
जयवंत दळवी, श्री ना पेंडसे, पुल, वपु, दमा, अत्रे तसेच रॉबिन कुक, सिडने शेल्डन, शेरलॉक होम्स वगैरे संग्रही आहेत.
सगळ्यात अलीकडे घेतलेलं म्हणजे विलबर स्मिथ यांचे 'सेवंथ स्क्रोल'
15 Jan 2021 - 3:54 pm | कुमार१
शेखर, मुद्दा पटला.
भक्ती, संग्रह छान.
सरिता, श्रीमंती आवडली !
....धन्यवाद
15 Jan 2021 - 6:02 pm | चौथा कोनाडा
लेख आवडला.
पुस्तकांचा असो वा इतर कोणताही छंद जोपासताना शेवटी सारासार विचार करुन त्याची दिशा ठरवावी लागते आणि वेळेत आवर घालावा लागतो.
15 Jan 2021 - 8:45 pm | मुक्त विहारि
1. तुम्ही आणि तुमची मुलं
2. सावर रे
3. बोर्डरुम
4. राजा शिवछत्रपती
5. हा तेल नावाचा इतिहास आहे
6. एका तेलियाने
7. बाराला दहा कमी
8. छळछावणीतले दिवस
9. हॅरी पाॅटर
10. कौटिल्याचे अर्थशास्त्र
16 Jan 2021 - 11:14 pm | चांदणे संदीप
वाचनाच्या आवडीमुळे पुस्तके जमवून संग्रह करण्याचा नव्हे ती पुन्हापुन्हा वाचण्याचा मला छंद आहे. पुलंची काही पुस्तके पुन्हापुन्हा वाचताना हसू कसं काय येतं म्हणजे ते सगळे विनोद आधी वाचून त्यावर मनसोक्त हसलेलो असताना, हे मला अजूनही कळालेलं नाही. एकेकाळी दर पगाराला किमान पाचशे रूपयाची पुस्तके घ्यायची असा माझा प्रयत्न होता तो नंतर व्यस्ततेमुळे रोडावला व आता बंदच आहे. पण जेव्हा कधी पुस्तके दिसतात तेव्हा मला पाण्याचा भरलेला तलाव दिसलाय आणि ज्यात आत्ता जाऊन सूर मारावा असं काहीसं होतं. योगायोग म्हणजे डिसेंबरात दोन ऐतिहासिक पुस्तके हातात पडली, पैकी एक मी बरीच वर्षे शोधत होतो. दिवाळी अंकाचं म्हणालं तर आजवर संग्रही करण्याजोगा एकच दिवाळी अंक माझ्या वाचनात आला तो म्हणजे लोकमतचा दुसरा दिवाळी अंक ज्याचे संपादक होते गुलजार!
सं - दी - प
17 Jan 2021 - 5:09 am | कुमार१
सर्व नवीन वाचकांचे अनुभव आवडले. तुमचे संग्रह पण छान आहेत.
रच्याकने…
पुस्तक वाचायचे नसले तरी देखील संग्रह करणारे असतात. त्यांच्याबद्दल इथे लिहिले आहे:
https://www.misalpav.com/node/48054
17 Jan 2021 - 2:33 pm | कुमार१
मार्क ट्वेन यांचा छान विनोद:
"दुसऱ्याला दिलेले पुस्तक कधी परत येत नाही. म्हणून तसे देऊच नका. मी हे स्वानुभवातून सांगतोय. माझे स्वतःचे ग्रंथालय अशाच (उधार) पुस्तकांतून उभे राहिले आहे !"
21 Jul 2021 - 12:37 pm | कुमार१
बुकगंगा वरून ऑनलाइन पुस्तक मागवण्याचा कोणाला अनुभव आहे का ?
माझा पहिलाच प्रयत्न फसला. पुस्तकाची ऑर्डर नोंदली गेली पण पैसे स्वीकारले गेले नाहीत (declined). दोनदा प्रयत्न करून मी नाद सोडून दिला आहे.
नुसती ऑर्डर स्वीकारली जाऊन पुस्तक घरपोच दिल्यावर पैसे द्यायचे, असं काही त्यात असतं काय ?
21 Jul 2021 - 2:46 pm | गॉडजिला
व आपला अनुभव कळवून कलेरिफिकेशन घ्या इतर कोणीच खात्रीने काही सांगू शकणार नाही.
नंबर जस्ट डायल वर मिळून जाईल
21 Jul 2021 - 2:53 pm | सौंदाळा
मी ४ वर्षांपुर्वी 'सारे प्रवासी घडीचे' हे पुस्तक बुकगंगा वरुन मागवले होते (चिंचवड, पुणे).
पैसे आधीच ऑनलाईन भरले होते.
खूप दिवस पुस्तक आलेच नाही (सात दिवसात येणे अपेक्षित होते). मग त्यांना ई-मेल पाठवला, त्यांचा फोन आला आणि काही दिवसात पुस्तक मिळेल असे त्यांनी कळवले.
त्यानंतर पुस्तक व्यवस्थित मिळाले.
21 Jul 2021 - 2:39 pm | टवाळ कार्टा
GO DIGITAL :)
21 Jul 2021 - 2:54 pm | कुमार१
दोघांनाही सल्ल्याबद्दल धन्यवाद !
मी अशा पेचात पडलो आहे की पुन्हा प्रयत्न करेन आणि पुन्हा पैसे स्वीकारले गेले नाहीत, तर नुसतीच ऑर्डर तीन वेळा नोंदली जाईल का ?
नक्की कळत नाही
21 Jul 2021 - 6:44 pm | गॉडजिला
त्यांना परिस्थिती व्यवस्थित सांगा इतर ऑर्डर कॅन्सल होतील आणि पैसेच दिले नसतील तर मग काहीच रिस्क नाही तरी कृपया आधीच्या ऑर्डरचे काय झाले dispatch jhali ki naahi hi चौकशी तोंडी करून मगच ऑर्डर नोंदवा.
माझ्या मित्राने एक पुस्तक बुकगंगा मधून प्रत्यक्ष जाऊन विकत घेतले, घरी परतल्यावर त्याच्या भावाने हे पुस्तक त्याच्याकडे आहे तू कशाला विकत घेतले आल्यापावली परत जा असे सूनावल्यावर तो स्टोअरमधे परत जाऊन त्याने वस्तुस्थिती विशद केली.
त्यांनीही संवेदनशील पुणेकर या उक्तीला जागून त्याची ऑर्डर कॅन्सल केली पुस्तकं परत घेतले व त्या किमतीचे व्हाउचर त्याला बनवून दिले जे वापरून तो ओनलाईल अथवा स्टोअर मधून दुसरे कोणतेही पुस्तक पुढे कधीही केंव्हाही दुसरे पुस्तक विकत घेऊ शकतो :)
त्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम असेल तो असेल बुकगंगा चे लोकं चांगले आहेत असा माझा अनुभव आहे.
21 Jul 2021 - 4:41 pm | वामन देशमुख
✋
मी मागची अनेक वर्षे बुकगंगावरून मराठी पुस्तके आणि विशेषकरून दिवाळी अंक (हैदराबादला) मागवतो आहे.
तुमच्या ऑर्डरच्या पेमेंट मध्ये काही एरर आली असेल. पुन्हा प्रयत्न करून पाहू शकता.
+91 88883 00300 हा त्यांचा व्हत्सप्प नंबर आहे.
21 Jul 2021 - 4:57 pm | कुमार१
नंबर दिल्याबद्दल धन्यवाद !
24 Jul 2021 - 2:13 pm | कुमार१
वरील बुकगंगाचा विषय आता पूर्ण करतो.
तुमच्याप्रमाणेच मलाही बुकगंगाचा पहिला अनुभव खूप चांगला आलेला आहे !
मागवल्या पासून तीन दिवसात पुस्तक घरपोच मिळाले.
सर्वांना धन्यवाद !
21 Jul 2021 - 5:09 pm | कुमार१
शेवटी यूपीआयचा नाद सोडून नेट बँकिंग केले आणि जमले.
आता पुस्तकाची वाट बघतो !
21 Jul 2021 - 6:47 pm | गॉडजिला
आपण डेस्कटॉप वापरून ऑर्डर केली होती की मोबाईलवर ?
डेस्कटॉप असेल तर सर्व ब्राउझरवर upi व्यवस्थित कामं करतेच असे नाही...
21 Jul 2021 - 7:28 pm | कुमार१
लॅपटॉपवरुन केली होती.
यू पी आय गंडते काही वेळेस, बरोबर.
21 Jul 2021 - 6:14 pm | कंजूस
दुसरीपासून चांदोबा पाहणे. चौघे भावंड . तो विकत आणायचे बाबा. एकदा एक छोटी परीक्षा झाल्यावर दप्तरात चांदोबे भरून नेले शाळेत. गुरुजींना दाखवले. पहिली ते चौथी एका वर्गास एकच बाई/गुरुजी दिवसभर असतात आणि तेच भाषा,गणित शिकवतात. त्यांनी त्या दिवशी त्यातल्या गोष्टी वाचून दाखवल्या. आणि शेवटी "पुन्हा असे आणू नको हं" म्हणाले. पण मुलं खुश झाली होती माझ्यावर.
मराठी शाळेत इंग्रजी पाचवीपासून सुरू होतं कखगघ...
त्यामुळे मराठी पुस्तकंच सुरुवातीपासून. वर्गातला एक मुलगा त्याच्याकडे फ्यान्टम ऊर्फ वेताळ ( मराठीत) कॉमिक्स येत ती तो जुनी झाल्यावर देत असे वाचायला. सहावीत जरा वाचायला येऊ लागलं भराभर. बाबा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे (दादर)
सभासद होते आणि ते कामाच्या जागेसमोरच ( कोहिनूर मिल्स नं १) होते. त्यामुळे तिथून पुस्तके येत. पण आमची आवड दक्षता मासिकापुरतीच होती. कादंबऱ्या, शिवाजी, लढाया, यांंत रस नव्हता.
जवळच्या खेळाच्या मैदानाजवळच गुजराती शेटचे मोफत वाचनालय होते. तिथे बसून काकाचौधरी,लोटपोट ,चंदामामा
हिंदी वाचायला सुरुवात झाली सहावीत. ती वाचून झाली की गुजराती चंदामामा रटपरटप करून वाचता येऊ लागल्यावर गुजराती चित्रलेखा मासिकाचाही फडशा पडू लागला.
शाळेच्या वाचनालयात कानेटकर,गाडगीळ, आपटे,फडके,यांची पुस्तके होती पण ती आठवीत गेल्यावरच नावावर घरी नेण्यास मिळू लागली. ती वाचली. पुढे बाबांनी मुं म ग्रं सं सोडून दादर सार्वजनिक वाचनालय सुरु केले. तरीही मराठी कादंबऱ्या दूरच होत्या. म्हणजे वाचाव्याश्या वाटल्या नाहीत. अजूनही वाटत नाहीत. संसारिक दळण कोण वाचणार?
इंग्रजी पहिली कादंबरी पर्ल बकची 'द गुड अर्थ' ती शब्दकोश काढून वाचून काढली. नववीत.
कॉलेजात असताना काही वाचन झालं नाही. पण नोकरीवर लागल्यावर सर्वात प्रथम ब्रिटीश काउन्सिल लाइब्रीचा सभासद झालो. बरीच पुस्तकं आणि लेखक वाचले ( लिट्रेचर, हिस्ट्री, छंद) पेपर ब्याक्स रहस्य कादंबऱ्या नाहीच.
इंग्रजी भाषेचे संदर्भ ग्रंथ मात्र विकत घेतले. ते टाकता येणार नाहीत.
थोडक्यात कथा कादंबऱ्या कधीच विकत घेतल्या नाहीत आणि घेणारही नाही. वाचनालयात न येणारी इंग्रजी पुस्तकं एक महिना बोलीवर स्वस्तात मिळतात काही ठिकाणी. उदाहरणार्थ स्टीव जॉब्ज'चे चरित्र. प्रकाशन किंमत सहाशे रुपये. मुंबईत फुटपाथवर एका महिन्याने ढीग आले. शंभर रुपयाला घ्यायचं, एका महिन्यात परत केल्यास पन्नास रुपये परत. अशी काही पुस्तके ( कलाम,सुधा मूर्ती,टाटा वगैरे)वाचली. एका मित्राकडून इंग्रजीतल्या बेस्ट पेपर ब्याक्सची यादी (२५ नावाजलेले लेखकांची )घेतली. त्याने एकटाकी लिहून दिली. त्यांचे एकेक वाचून पाहिले.
पर्यटनाची आवड असल्याने प्रदर्शनांतून फुकट मिळणारी पत्रकं, नकाशे,पुस्तकं मिळाली ती आहेत (तीसेक किलो.). ती ठेवणार. लोनली प्लानेटची जुन्या आवृत्ती शंभर रुपयांत फुटपाथवर घेतल्या. त्यातली माहिती नेटवरच्या साईटवर नाही. आतापर्यंत विकत घेतलेले सर्वोत्तम पुस्तक 'राजस्थान' - everyman's guide. फुटपाथवरच्या विकणाऱ्याने ते हातावर तोलून वजन बघून "शंभर रुपये" म्हणाला. म्हणजे शंभरसुद्धा त्याला जास्तीच किंमत सांगतोय असं वाटलेलं. रत्न आहे.
21 Jul 2021 - 6:26 pm | कुमार१
छान अनुभव व संग्रह.
28 Aug 2021 - 6:38 pm | कुमार१
‘हंस ‘ , ‘ मोहिनी ‘ व ‘ नवल ‘ या साहित्यिक अंकांचे साक्षेपी संपादक आणि गुणवंत लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आनंद अंतरकर यांचे, शनिवार( २८ ऑगस्ट) रोजी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले