लहानपणी घरातले शाळेत सोडून जातात
तेंव्हा दोन पर्याय असतात समोर. एकतर आजूबाजूला रडणाऱ्या सगळ्यांसारखं भोकाड पसरून रडणे किंवा पाणी डोळ्यातच थोपवत शाळा सुटायच्या घंटेची वाट बघणे.
आपण दुसरा निवडतो. खरंच किती शिकतो ना स्वत:कडूनच?
परीक्षा देत देत मोठे व्हायला लागतो
एखादा पेपर जातो अवघड. वाटत झालं आता, मार्क्स कमी पडणार आणि ते तसे पडतातही.
वडील सहामाहीच्या प्रगतीपुस्तकावर सही करताना काही म्हणत नाहीत पण ते मार्क्स आपल्याच डोळ्यात खुपतात
मग पुढच्या चाचणीत आपण त्या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून ते जेतेपदाच्या निशाणीसारखे मिरवत आणतो प्रगतीपुस्तकावर.
वडिलांचे चष्म्यांमागून हसणारे डोळे दिसतात
खरंच किती शिकतो ना आपण स्वत:कडूनच?
कॉलेजमध्ये गाडी घेऊन येणारं कोणीतरी कसं कूल आहे हे सगळं जग सांगतं पण आपण मात्र संध्याकाळच्या बसमध्ये जागा पकडायची असेल तर बसस्टाॅपच्या थोडं पुढे थांबावं लागतं हे समजून घेतलेलं असतं. खरंच किती शिकतो ना आपण स्वत:कडूनच?
काही क्लासमेट्स मास्टर्ससाठी परदेशात जातात, आपण वडिलांची झिजलेली चप्पल बघतो आणि मनात ठरवतो पहिल्या पगारातून त्यांना मस्त बूट घ्यायचे.
नोकरी शोधताना कळतं की खरंच वास्तव किती अवघड आहे. रोजचे नकार ऐकून घरी आल्यावर आईच्या डोळ्यात नवी आशा असते आपण डोळ्यातलं पाणी लपवतो. तिने केलेली भाजी मुकाट्याने संपवतो आणि नंतरच्या आवारावरीलही तिला मदत करतो. खरंच किती शिकतो ना आपण स्वत:कडूनच?
धडपडून लागलेल्या पहिल्या नोकरीचा पहिला पगार होतो. घरी येतानाच त्यातला निम्मा संपवून येतो आपण.
चपलेच्या कुरबुरीला सरावलेले वडिलांचे पाय त्या मऊ बुटात जाऊन बसतात आणि आईसाठी आणलेल्या साडीचा रंग सुंदर कि तिच्या हसऱ्या पण पाण्याने भरलेल्या डोळ्यांचा हे आपल्यालाच धूसर दिसायला लागतं. खरंच किती शिकतो ना आपण स्वत:कडूनच?
दुनियेच्या बाजारात सगळं विकत मिळतं असे लोक म्हणत असताना आपण एखाद नातं जीवापाड जपतो, पगारातले अर्ध्याच्या वर पैसे मित्राच्या गरजेला उभे करतो. खरंच किती शिकतो ना आपण स्वत:कडूनच?
संसाराला लागल्यावर कळतं आजपर्यंत लहानच होतो आपण जबाबदाऱ्यांच्या जगात.
आयुष्याची जोडीदारीण, आपल्याला अखंड साथ देत तीही होत असते मोठी. मग एक दिवस कळतं तिला तिचा बाप हवाय. तेंव्हा आपणच बनायचा प्रयत्न करतो तसं, तिला सर्वतोपरी सुरक्षित आणि आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो. मग कधीतरी कळतं तीही झालीये कि आपली आई. आपण न बोलता सगळं उमजून घेणारी. तिच्या मनाचा स्वतःच्या आधी विचार करायला लागतो आपण. खरंच किती शिकतो ना आपण स्वत:कडूनच?
पुढे एक दिवस आपलं बछडं आपल्यालाच येऊन बिलगतं आणि म्हणतं
“कसं जमवलंस सगळं? मला तुझ्यासारखं जमेल का रे?” त्याच्या डोळ्यात आपल्याबद्दलचा अभिमान बघत आपण डोळे पुसतो. त्याला सांगतो सापडत जाईल तुला रस्ता स्वत:वर विश्वास ठेव आणि शिकणं सोडू नको.
कारण दुसरं कोणीही नसलं तरी तू असशीलच स्वत:ला मार्ग दाखवायला.
प्रतिक्रिया
10 Nov 2019 - 6:51 pm | पद्मावति
सुरेख लिहिलंय.
10 Nov 2019 - 7:55 pm | पलाश
बालवाडीत दाखल होतानाचा पोराचा आकांत ऐकणं आयांना फार अवघड जातं. पण मोठं होणं टाळता येत नाही. जगात एकटं सोडायलाच लागतं.
मुलाचं त्या वेळचं शिक्षण ते थेट ते मूल स्वतः पालक होईतोपर्यंतच्या विविध पायर्यांवरचं शिक्षण हा एक खूप मोठा पल्ला कमी शब्दांतही अगदी नीटसपणानं मांडला आहे. फार छान. _/\_
10 Nov 2019 - 9:13 pm | सुचिता१
अप्रतिम!!
संपूर्ण प्रवास सुंदर शब्द रचनेत मांडला आहे.
11 Nov 2019 - 8:45 am | गड्डा झब्बू
भावस्पर्शी लेखन.
11 Nov 2019 - 10:45 am | श्वेता२४
यातलं बरंचसं वास्तवात अनुभवलंय. समंजस जोडीदार व अपत्य मिळणायला नशीबच लागतं. पाळणाघरात सोडून येताना हल्ली मुलगाच समजुत काढतो.... आई मी ललनाल नाही हं.... तु जा आपीशला...न लौकल ए. खरंच किती शिकतो आपण यातून?
11 Nov 2019 - 1:24 pm | हजारो ख्वाईशे ऐसी
सर्वांना खूप धन्यवाद :)
11 Nov 2019 - 7:00 pm | दुर्गविहारी
खूपच सुंदर आणि चटका लावून जाणारे
19 Nov 2019 - 2:55 pm | वाघमारेरोहिनी
खरंय
26 Nov 2019 - 4:05 pm | मुक्त विहारि
आम्हाला दुनियाच शहाणपण शिकवून जाते.
26 Nov 2019 - 5:11 pm | स्मिता.
शेवट वाचून डोळ्यात टचकन पाणी आलं!
मला नेहमीच काळजी वाटते की हे सगळं माझ्या लहानग्याला जमेल की नाही. मी लहान शहरात, एकत्र कुटुंबात, खूप सुरक्षित वातावरणात मोठी झाले. आता परिस्थिती खूप वेगळी आहे.
पण मुलं मात्र आपली ही काळजी फोल ठरवतात हा अनुभव आहे. आपण शिकलो तसेच ते ही परिस्थितीनुसार शिकत जातात.
26 Nov 2019 - 8:28 pm | जॉनविक्क