h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
}
div.chitra1 {
max-width:400px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:300px;
margin: auto;
}
रायगडचे रजपूत किल्लेदार (१६८९ ते १७०७)
"रायगडाबद्दल आपल्याला १६८९ पर्यंत, म्हणजे झुल्फिकार खानाने रायगड घेतला तोपर्यंतची माहिती विश्वसनीय साधनांत मिळते. १७३३ नंतरची, म्हणजे बाजीराव पेशवे आणि प्रतिनिधी यांनी रायगड घेतल्यानंतरची माहिती अस्सल कागदांसकट ‘रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था' या शं.ना. जोशी यांनी पेशवे दप्तर चाळून एकत्र केलेल्या पुस्तकात आपल्याला मिळते. 'रायगडची जीवनकथा' या आवळसकरांच्या पुस्तकात पोलादपूरच्या चित्रे शकावलीतली एक नोंद आणि सिद्दीच्या काळातली एक व्यवस्था याचे टिपण आहे. या व्यतिरिक्त रायगडवर १६८९ ते १७३३ या प्रदीर्घ काळात काय झाले, हे आपल्याला काही माहीत नाही."
१६८९मध्ये झुल्फिकार खानाने रायगड घेतला, त्या वेळी मराठ्यांचे रायगडावरीन दप्तर नष्ट झाले आणि काही कागद उरले नाहीत असे कारण त्यासाठी दिलेले सापडते. मला असे वाटले की मराठी दप्तर जरी नष्ट झाले, तरी मोगल दप्तर तरी टिकून राहिले असावे, म्हणून त्या दृष्टीने मी तपास केला. त्यात मला गडाविषयी नाही, तरी गडाच्या किल्लेदारांबद्दल एक नवीन पत्र आणि इतरही बरीच काही माहिती सापडली. म्हणून माझ्यासारख्याच नवीन काही शोधू अथवा वाचू इच्छिणार्या इतिहासप्रेमींसाठी आणि संशोधकांसाठी ती इथे एक लेखात देतो आहे.
१६८९मध्ये रायगड जिंकल्यावर बादशाहने सुरसिंग याला किल्लेदार नेमले अशी नोंद आहे. रायरीचा फौजदार म्हणून अब्दुल रझ्झाकखान हा काम पाहताना आपल्याला दिसतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की रायगडचा फौजदार आणि रायगडचा किल्लेदार हे वेगळे हुद्दे होते. फौजदार म्हणजे मोगलांनी रायगडचा जो सरकार - म्हणजे एक मोठा जिल्हा पाडला होता (औरंगाबाद सुभ्यात) त्याचा मुख्य. त्याकडे लष्करी आणि मुलकी असे दोन्ही अधिकार होते. पण किल्ल्यावर त्याचा हुकूम चालत नसे. किल्ल्यावर खुद्द बादशाह किल्लेदार नेमी आणि त्याचा - म्हणजे सुरसिंग याचा अधिकार रायगड किल्ल्यावर चाले.
बादशहाची समजूत अशी होती की मराठ्यांना काबूत ठेवण्यासाठी रजपूत किल्लेदार बरे. आणि तसेही मुसलमान मनसबदार आपले ऐशआराम सोडून वाऱ्या-पावसात दूर डोंगरदर्यांत काबाडकष्ट करण्यास मुश्किलीने तयार होत. हे रजपूत किल्लेदार आपल्याला प्रत्यक्ष मराठ्यांविरुद्धच्या युद्धक्षेत्रातच सापडतात. इतर ठिकाणी आपल्याला ते आढळत नाहीत. काही उदाहरणे - पुरंदरचा किल्लेदार खानचंद बुंदेला, लोहगडचा किल्लेदार अटलसिंह, सुधागडचा किल्लेदार सेनापत, रायगडचा किल्लेदार शिवसिंग, साताऱ्याचा किल्लेदार सत्रसाल राठोड, परळीचा किल्लेदार रावतमल झाला, दौंडचा ठाणेदार मानसिंग (राठोड) असे काही रजपूत अधिकारी आपल्याला आढळतात.
रतलामचे राजे आणि त्यांची वंशावळ
तर हा सुरसिंग (आणि नंतरचा शिवसिंग) हे कोण? याचा तपास मी प्रथम केला. मला असे आढळून आले की हे रतलामचे रजपूत राजे, पिढीजात मुघल मनसबदार. त्यांचे विसाव्या शतकातील वारस डॉ. रघुवीर सिंग यांनी आपल्या घराण्याचा इतिहास हिंदीतून - 'रतलाम का प्रथम राज्य' - अत्यंत मेहनतीने दुर्मीळ कागपत्रे जमवून लिहिला आहे. हे राज्य फक्त ३६ वर्षे टिकले. नंतर छत्रसाल आणि केशवदास यांनी सीतामहू इथे त्याचे पुनरुज्जीवन केले.
रतलामचा पहिला राजा - रतनसिंग ( राज्यकाल १६५६-५८) -> रामसिंग (१६५८-८३)-> शिवसिंग (१६८३-९१?).
रघुवीर सिंग यांच्या मते शिवसिंग १६९१ मध्ये वारला आणि त्याला कुणी वारस मुलगा नसल्याने रतलामचे राज्य त्याच्या भावास मिळाले, जे औरंगझेबाने काही वर्षातच खालसा केले. पण अखबारात आणि साकी मुस्तेदखान याने लिहिलेल्या 'मासिर-ए-अलामगिरी' या ग्रंथात शिवसिंगचे उल्लेख १७०७ सालापर्यंत येतात. अखबारात त्याला पुत्र झाला असे म्हणले आहे. त्यामुळे मी खबर आणि साकी मुस्तेदखानाची माहिती प्रमाण मानली आहे.
शिवसिंगचे रायगडाहून लिहिलेले पत्र १९ ऑक्टोबर १६८९ जमीन इनाम
अस्सल नोंदी तिरप्या अक्षरांत (इटॅलिक्समध्ये) आहेत. माझे निष्कर्ष वेगळे, सरळ अक्षरांत लिहिले आहेत.
रायगड किल्ला मोगलांना देण्याचा तह
मोगलांचा रायगडला वेढा आणि तहाबद्दलच्या काही नोंदी पुढीलप्रमाणे आहेत.
१० जुलै १६८९
तळकोकणचा फौजदार अब्दुऱ्रज़ाकखान याने लिहिले की : तळकोकणचा प्रदेश ताब्यात आणण्यासाठी माझ्यापाशी दोन हजार पायदळ शिपाई तैनात करण्यात आले होते. त्यापैकी शंभर शिपाई पोहोचले. बाकीचे पळून गेले. त्यांच्या जागी इतरांची तैनाती होईल अशी आशा करतो. यावर त्या प्रांताच्या दिवाणाला माणसे पाठविण्यासंबंधी हुकूम देण्यात आला.
११ जुलै १६८९
बादशहांना कळविण्यात आले की : रायरी (रायगड) च्या किल्लेदाराचा वकील हा आका अलीखान याच्याकडे आला. भेट व्हावी म्हणून त्याने निरोप केला. आका अलीखान याने वकिलाला एतिकादखानाकडे (हाच जुल्फिकारखान) पाठविले आहे.
१५ जुलै १६८९
शमशीरबहादुरला पुढील हुकूम देण्यात आला : तुम्ही (रायगडजवळ) राजा अनूपसिंग व मन्सूरखान यांच्या ठाण्यापाशी जाऊन राहावे. रायरी (रायगड) किल्ल्यातील गनिमाची माणसे उपासमारीने किल्ल्याच्या बाहेर आली की त्यांना हुजुरात पाठवावे.
शके १६११ शुक्ल संवछरे (इ. स. १६८९-१६९०) - जेधे शकावली
[१ ] कार्तिक मासी (४ नोव्हेंबर १६८९) रायगडा सला करून मार्गसीर्ष सुध २ रविवारी (३ डिसेंबर १६८९) रायगड मोगलास दिल्हा संभाजी राजे याचे पुत्र सिवाजी राजे यास तुलापुरास औरंगजेब यासी नेले पातशाहे त्यास हप्त हजारी केले शाहू राजे नाव ठेविले [2]
४ नोव्हेंबर १६८९
एतिकादखान याला जुल्फिकारखान ही पदवी देण्यात आली.
(१. सेतुमाधवराव पगडी यांनी मूळ फारसीतून केलेले मराठी भाषांतर मी वापरले आहे. पाहा ‘मोगल दरबारची बातमीपत्रे खंड - १, २, ३.
२. जेधे शकावली - शिवचरित्र प्रदीप पान ३५)
१ जुलैच्या नोंदीवरून असे दिसते की मराठ्यांचा वकील हा बहुधा काही बोलणी करण्यासाठी मोगली छावणीत आला होता. त्यावरून असे वाटते की तहाच्या वाटाघाटीचा प्रयत्न निदान ११ जुलैपासून तरी चालू असावा. जेधे शकावलीतल्या नोंदीत तह करून रायगड दिला असे लिहिले आहे. इथे फितुरीचा कुठेही उल्लेख नाही. सूर्याजी पिसाळ फितूर झाला असला, तरी ती गोष्टी १६८९मध्ये नव्हे, तर नंतर बऱ्याच वर्षांनी घडली आहे. वाईच्या देशमुखीसाठी तो मुसलमान झाला आणि त्याचे नाव शेख फत्तेउल्ला ठेवण्यात आले होते. तरीही तो १७०४ साली मोगलांना सोडून परत ताराबाईस जाऊन मिळालेला दिसतो. आवळसकरांनी हा मुद्दा आणखी पुराव्यासकट मांडला आहे.[3] त्यामुळे सूर्याजी पिसाळच्या फितुरीमुळे रायगड पडला किंवा इतर कोणी फितूर झाला या म्हणण्याला पुरावा सापडत नाही.
छत्रपती राजाराम महाराजांचे रायगड घेण्याचे प्रयत्न
इ. स. १६९१ जून ४ रोजी राजारामाने हणमंतराव घोरपडे व त्याचा नातलग कृष्णाजी यांस सरंजाम ठरवून दिला. त्या वेळी राजाराम लिहितो, ‘महाराष्ट्रधर्म पूर्ण रक्षावा हा तुमचा संकल्प जाणून उभयतांस जातीस व फौजखर्चास सहा लक्ष होनांची नेमणूक चालविण्याचा निश्चय करून दिधली असे. पैकी रायगड प्रांत ......... काबीज केल्यावर पाऊण लाख होन द्यावयाचा निश्चय केला असे.’[4]
इ. स. १६९२ मे १३ या दिवशी राजारामाने मावळांतील लोकांस एक पत्र लिहिले. त्यात म्हटले आहे,“सांप्रत रायगड हस्तगत करून घेणे हैं कार्य बहुतच थोर आहे, हें रामचंद्रपंताने तुम्हांस सांगितले आहे. तुम्ही गड घेण्याच्या यत्नात आहा. सध्यां आम्ही आबाजी सोनदेव यास पाठविले असून त्यास रायगड हस्तगत करण्याची आज्ञा केली आहे. ते करावयाचें राजकारण करितील. तुम्ही त्यांस अनुकूल होऊन रायगडची 'हारी' करावी. स्थल हस्तगत करून फकत्तेचें वर्तमान कळवा; तुमचे विशेष उर्जित करू“
या दोन पत्रांवरून आपल्याला छत्रपती राजाराम महाराजांच्या रायगड परत घेण्याविषयीच्या प्रयत्नांची माहिती कळते. दुर्दैवाने किल्ला मराठ्यांच्या हाती आल्याचे दिसत नाही.
१२ जानेवारी १६९३
रायरी (रायगड) इस्लामगडच्या फौजदार याने विनंती लिहून पाठविली. ती पुढीलप्रमाणे,
पुण्याहून इस्लामगड (रायगड)पर्यंतच्या वाटेचे रक्षण व्हावे, म्हणून मी तीन ठाणी कायम केली आहेत. हुजुरातर्फे या ठाण्यासाठी पथके पाठविण्यात यावीत. बादशहांनी आज्ञा केली की : दोनशे स्वार आणि चारशे पायदळ वरील ठाण्यावर तैनात करण्यात यावी.
- परगणा चांदूरशी संबंधित.
विनंती ही की : पन्नास मन्सबदार माझ्यापाशी तैनात करण्याचे हुकूम होते. त्यापैकी पंधरा तैनात झाले आहेत. मुहमदबेग वगैरे वीस माणसे तैनात करण्यात यावीत. त्यांना पाठविण्याचा हुकूम देण्यात आला व त्यांचे जाणे न झाल्यास दुसऱ्यांना तैनात करावे असे ठरले.
१६ एप्रिल १६९३
शिवसिंग हा यारअलीबेगच्या मार्फतीने मुसलमान झाला. त्याला खिलतीची वस्त्रे देण्यात आली.
(३. 'रायगडची जीवनकथा' - शां.वि. आवळसकर
४. शिवचरित्रसाहित्य खंड ५ लेख ६ व 'स्थिरबुद्धी राजाराम' - गो.स. सरदेसाई
५. मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड ८ लेख ४३ पान ४६ - वि.का. राजवाडे)
हा शिवसिंग कोण हे नक्की कळत नाही. सहसा मुसलमान झाल्यावर त्याचा उल्लेख अखबारात नवीन मुस्लीम नावाने यायला हवा. पण तो नंतरही रायगडचा किल्लेदार शिवसिंग असा आला आहे. त्यामुळे असे वाटते की हा शिवसिंग वेगळा असावा.
रायगडच्या संरक्षणाचे मोगलांचे प्रयत्न आणि मराठ्यांचे हल्ले
३० ऑक्टोबर १६९३
बादशहांनी मुहंमद आदिल वगैरे दहा गुर्जबर्दार (दंडधारी) यांना रायरी (रायगड च्या भोवती रात्रंदिवस गस्त घालण्यासाठी पाठविले.
१० मार्च १६९४
रायरी (रायगड) चा फौजदार अब्दुलऱ्हमानखान याने पुढीलप्रमाणे वृत्त पाठविले
जोकीबेग वगैरे जमीनदार मला सोडून गेले. मी त्यांना लिहिले की, तुम्ही येऊन लष्करात दाखल व्हा. ते पालीखेडच्या किल्ल्याजवळ उतरले होते. मराठ्यांनी रात्री त्यांच्यावर छापा घातला. जोकीबेगसहित अकरा माणसे ठार व सतरा माणसे जखमी झाली. या लोकांनी पाचाडच्या सावकराकड्न कर्ज काढले होते. माझेही चार हजार पाचशे, त्यात रोख्याच्या कागदाशिवाय दोन हजार पाचशे होते. त्यांनी सावकरांकडून बारा हजार रुपये कर्ज घेतले. मी मध्यस्थी होतो. सावकार मला तगादा करीत आहेत व हुजुरात येऊन तक्रार गुदरण्याच्या विचारात आहेत. बादशहांनी एतिमादखानाला (सुरतेचा अधिकारी) हुकूम द्यावा की, माझी व सावकारांची बाकी देण्यात यावी.
मरहूम फतेह जंगच्या माणसांच्या मोबदल्यात अद्याप कोणी येथे तैनात होऊन आले नाही. लवकर पथक तैनात व्हावे. नानाराव वगैरे मराठे तैनात आहेत. त्यांच्या ऐवजी दुसरे तैनात व्हावेत. तोफखान्याच्या रक्षणासाठी आणि देखरेखीसाठी ही व्यवस्था व्हावी. बक्षीउल्मुल्क मुखलिसखान यांनी चौकशी करून कळवावे अशी बादशहांनी आज्ञा केली.
१७ मार्च १६९४
रायरी (रायगड) चा फौजदार अब्दुऱ्रज़ाकखान याने अर्ज पाठविला की :
अब्दुऱ्रहीम वगैरे माझ्याशी तैनात होते. त्यांची येथून बदली होऊन ते गेले आहेत. त्यांच्या जागेवर अद्याप कोणी आले नाहीत. आज्ञा झाली की : जितकी माणसे कमी झाली असतील त्यांच्या जागी दखनी माणसे नेमण्यात यावी.
शिसेचे गोळे व दारू अद्याप आली नाही. आज्ञा झाली की : खान फीरोज जंग (गाजिउद्दीन) च्या लष्करातून दोनशे बाण, अहमदनगर आणि बहादुरगड येथून शिसेचे गोळे, व सुरतेतून वर्षभराचा दारूगोळाही पाठवावा.
पाचाडच्या ठाण्यासाठी दहा तोफा दंडराजपुरीच्या किल्ल्याहून व सरंजाम सुरतेहून मागवून द्यावा. आज्ञा झाली की : सुरतेचा अधिकारी एतिमादखान याने व्यवस्था करावी.
माझ्या पायदळातील बरेच शिपाई इस्लामगड (रायगड)च्या मोरचेलवर नेमले आहेत. मला त्यांची खात्री वाटत नाही. त्यांच्या ऐवजी इतर माणसे नेमण्याविषयी फौजेच्या दिवाणाला हुकूम व्हावा. आज्ञा झाली की : तोफखान्याच्या दारोग्याच्या सल्ल्याने माणसे नेमावी.
सुरसिंग याचा मृत्यू आणि शिवसिंग किल्लेदार
५ मे १६९६
इस्लामगड उर्फ रायरी येथील बातम्यावरून कळले की : रायरीचा किल्लेदार सूरसिंग हा मरण पावला. त्याला दीड हजार जात व चवदाशे स्वार अशी मन्सब होती. बादशहांनी सूरसिंगाच्या जागी त्याचा मुलगा शिवसिंग याची रायरीच्या किल्लेदारीवर नेमणूक केली. शिवसिंगाला चारशे जात व दोनशे स्वार अशी मन्सब होती. तीत बादशाहांनी तीनशे जात व आठशे स्वार आशी भर घातली. त्याला एकंदरीत एक हजार जात व एक हजार स्वार अशी मन्सब झाली. याशिवाय त्याला पन्नास लाख दाम (सुमारे पन्नास हजार रुपये) बक्षीस म्हणून देण्यात आले.
(६. काही उदाहरणे - महदाजी हा मुसलमान झाला. त्याला इस्लाम गालिब हे नांव देण्यात आले. दालचंदाचा मुलगा खुशालचंद हा मुसलमान झाला. त्याचे नाव अब्दुल हादी ठेवण्यात आले. जोधराज हा मुसलमान झाला. बादशहाने त्याचे नाव अब्दुल मोमीन असे ठेवले. गजपत उर्फ अबदुल माबूद याची मुले मुसलमान झाली. त्यापैकी जगपत याला अबदुल मोजद हे नाव देण्यात आले आणि रघुपत याला अबदुल वदूद हे नाव देण्यात आले.)
६ मे १६९६
आज्ञा झाली की : राहिरी (रायगड)चा फौजदार अब्दुऱ्रज़ाकखान याला लिहा की, शिवसिंग तेथे येऊन पोहोचेपर्यंत किल्ल्या (रायगड) च्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
३ सप्टेंबर १६९६
रायरी (रायगड)चा फौजदार अब्दुऱ्रज़ाकखान याचे विनंतीपत्र बादशहांच्या नजरेखालून गेले. त्याने काही मागण्या केल्या होत्या.
-बादशाही हत्ती-घोड्यांना खुराक म्हणून द्यावी लागणारी रक्कम माफ व्हावी. बादशहांनी ती माफ केली.
-(शिवसिंग?) फर्मान, खिलतीची वस्त्रे व घोडा या माझ्या वडिलांच्या (सुरसिंग?) मृत्यूच्या सांत्वनार्थ मिळणाऱ्या वस्तू मिळाव्या. बादशहांनी मान्य केले.
-शिवसिंग(?) हत्तीचे नुकसान झाले. त्याची जबाबदारी सुरसिंगावर घालण्यात आली. तो मरण पावला. नुकसानीची माफी देण्यात यावी. बादशहांनी मान्य केले.
(दोन मुहरम) एकवीस जून १६९९
रायरीचा (रायगड) किल्लेदार व फौजदार शिवसिंग याने आपल्याला पुत्र झाला म्हणून एक हजार रुपये नजर म्हणून पाठविले. बादशहाने मुलाचे नाव प्रीतसिंग (पर्वतसिंग?) ठेवले.
शिवसिंग सिंहगडच्या पायथ्याशी मोगल छावणीत
अब्दुल रज़ाकखान हा वारलेला दिसतो, कारण त्याला मरहूम असे संबोधित केले आहे. बादशहास सैन्यबळ कमी पडू लागले होते असे दिसते. यासाठी त्याने किल्ल्यातील शिबंदी बोलवून घेतली. मराठ्यांकडे या काळात मात्र विपुल आणि मोठमोठ्या संख्येची सैन्ये दिसतात.
सत्तावीस मे १७००
रायरी (इस्लामगड, रायगड)चा किल्लेदार व फौजदार शिवसिंग याने विनंती लिहून पाठविली की
आपण परवानगी देत असाल तर माझे काका मुकुंदसिंग यांना येथे ठेवून मी हुजुरात येईन. बादशहांनी विनंती मान्य केली नाही.
सहा मार्च १७०३
शिवसिंग (रायगडचा किल्लेदार) याचा मावसभाऊ अगर मामेभाऊ (खाळूजाद) आणि गोपलसिंग कछवा ह्याचा मुलगा बिशनसिंग मनसबदार हा मरण पावला.
तीन एप्रिल १७०३
मरहूम अब्दुल रज़ाकखान (रायगडचा फौजदार) याचा दत्तक मुलगा मुहंमद जाफर याची मनसब वाढविण्यात आली.
पाच मे १७०३
बादशहाने बक्षी रूहुल्लाखान यास पुढीलप्रमाणे आज्ञा केली - “रायरी (रायगड)चा किल्लेदार शिवसिंग हा हुजुरात आला आहे. बक्षिंदाबक्ष (सिंहगड) या किल्ल्यापासून इस्लामगड (रायगड) पर्यंत हे अंतर, रस्त्याची परिस्थिती आणि ठाणी ह्यांच्या संबंधीचा तपशीलवार वृत्तांत ह्याच्याकडून लिहून घेऊन माझ्यापाशी पेश करा.
पंचवीस मे १७०३
हरकऱ्यांच्या तोंडून काल बातमी कळली ती अशी, “शिवसिंग याच्या सैन्यांतील नोकर हे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी बादशाही छावणीच्या बाहेर चालले होते. इतक्यात शत्रूंचे, (मराठ्यांचे) सात स्वार त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांनी घोडे पळविले. ही बातमी कळताच शिवसिंग याने मूली (?) या गावापर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्याने घोडे सोडविले, याशिवाय त्याने त्यांच्या चार घोड्या पकडल्या, शत्रू पळून गेले.
वीस ऑगस्ट १७०३
रायरीचा किल्लेदार व फौजदार शिवसिंग हा हुजुरात आहे. त्याला मुहंमद अमीनखान पाशी तैनात करण्यात येऊन पाठविण्यात आले.
शिवसिंग पुण्याचा आणि रायगड सरकारचा फौजदार
नऊ नोव्हेंबर १७०३
रायरी (रायगड)चा किल्लेदार व फौजदार शिवसिंग याने विनंती अर्ज केला, त्यात पुढीलप्रमाणे मागण्या केल्या होत्या:-
पुण्याची फौजदारी आणि त्याला जोडून असलेली इतर कामे यावर माझी नेमणूक करण्यात यावी. त्याची मनसब वाढविण्यात आली व मनसब देण्यात आली, येथून अनेक चाकरांना हुजुरात बोलावण्यात येते. हा किल्ला सरहद्दीवर आहे. हे बोलावून घेणे, बंद करण्यात यावे. कुणाला तरी येथून गेलेल्या चाकरांची परिस्थिती पाहण्यास पाठवावे. विनंती मान्य करण्यात आली,
रायगड किल्ल्यातील नौकर लोकांचा पगार फार थकला आहे. सुरत बंदराच्या खजिन्यातून त्यांना पगार देण्यात यावा.
(३ शाबान) एक डिसेंबर १७०३
रायरी (रायगड)चा किल्लेदार व फौजदार व पुण्याचा ठाणेदार शिवसिंग याची मनसब वाढविण्यात आली.
सहा मे १७०४
आजमगड उर्फ पुरंदरचा किल्लेदार जानबाजखान याने पुढीलप्रमाणे विनंती केली :--
किल्ल्यात तैनात असलेले बंदूकची पगार न दिल्यामुळे आणि धान्याच्या महागाईमुळे कठीण परिस्थितीत आहेत. त्यांचा पगार मिळावा. बादशहाने आज्ञा केली की, दक्षिणच्या तोफखान्याचा अधिकारी मन्सूरखान याचा नायब मुहंमद जफर याच्याबरोबर पगार बाकीची रक्कम पाठविण्यात यावी, म्हणजे जागेवर जाऊन पगार वाटून देता येईल.
किल्लेदाराची दुसरी विनंती अशी की, “माझे कुटुंबीय आणि माझी सरंजाम सामग्री ठेवण्यास सोईचे जावे म्हणून मुहिआबाद उर्फ पुणे हे ठाणे माझ्याकडे देण्यात आले होते. पण अलीकडे त्या मार्गाच्या रक्षक म्हणून (राहदार) शिवसिंग याची नेमणूक झाली आहे. मी आज्ञा करतो की, मौजे चिंचवड वगैरे ही काही अटीवर मला तनखा जहागीर म्हणून देण्यात यावी. विनंती मान्य झाली नाही.
अकरा मे १७०४
मरहून अरबखानाचा मुलगा हशमतउल्ला हा रसूलाबादचा ठाणेदार होता. त्याला शिवसिंगाच्याऐवजी पुण्याचा फौजदार म्हणून नेमण्यात आले.
तेरा मे १७०४
रायगडचा किल्लेदार व फौजदार शिवसिंग हा पुण्याचाही ठाणेदार होता. पुण्याहून त्याला बदलल्यामुळे तितक्यापुरती त्याची मनसब कमी करण्यात आली.
अठरा ऑक्टोबर १७०४
बादशहाने आज्ञा केली की, रायगडचा किल्लेदार व फौजदार शिवसिंग याला त्याच्या तैनातीच्या जागेवर पोहोचविण्यात यावे. शिवसिंग हा हुजुरात होता. त्याने हमीदोद्दीन खान व मतलबखान यांना सांगितले की, माझ्या काही मागण्या आहेत. मला काही दिवसांचा अवसर मिळाला तर मी माझ्या विनंत्या बादशहापाशी मांडेन आणि नंतर माझ्या तैनातीच्या जागेवर (रायगड)ला जाईन. यावरून बादशहांना विनंती करण्यात आली. बादशहा म्हणाले, "शिवसिंगच्या विनंत्या बक्षी सदरुद्दीन याने मांडाव्या. त्याचा निकाल लागल्यावर शिवसिंगाने आपल्या स्थळी जावे."
यानंतर १७०७ साली औरंगझेबाच्या मृत्यूनंतर शिवसिंग हा किल्ला सिद्दी याकूदखान याच्या हवाली करून उत्तर भारतात परतलेला दिसतो. सिद्दीने त्यास पोहोचविण्यास धर्म सावंत व होन सावंत सुभेदार ससैन्य दिले होते. यानंतर जंजिऱ्याहून सिद्दी याकूदखान याच्यामार्फत रायगडकडील प्रदेशाचा कारभार चालू झाला. सिद्दी जोहर हा रायगडचा किल्लेदार झाला.
प्रतिक्रिया
9 Sep 2019 - 8:36 am | यशोधरा
अभ्यासपूर्ण लेख. तुम्ही अधिक लिहावयास हवे.
9 Sep 2019 - 9:27 am | ज्ञानोबाचे पैजार
तुमच्या चिकाटीची कमाल वाटते. इतकी किचकट माहिती एकत्र करुन त्याची वर्गवारी करुन मग अशी रंजकपणे वाचकांच्या समोर मांडण्याचे कसब वाखाणण्या जोगे आहे. तुमच्या व्यासंगाला शि.सा.न.
रच्याकने :- झलक वाचतानाच अंदाज येत होता की ते तुमचेच लिखाण असावे म्हणून
पैजारबुवा,
9 Sep 2019 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संदर्भासहित अतिशय अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.
मिपाबरोबर प्रसिद्ध नियतकालिकांमधे लिहिले पाहिजे.
-दिलीप बिरुटे
9 Sep 2019 - 11:34 am | महासंग्राम
सूर्याजी पिसाळाबद्दलचा मोठा गैरसमज केलात आपण धन्यवाद !
पुलेशु
9 Sep 2019 - 12:29 pm | पद्मावति
अभ्यासपुर्ण आणि रंजक माहिती.
9 Sep 2019 - 12:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण आणि पुराव्यांसकट लिखाण !
9 Sep 2019 - 6:14 pm | तुषार काळभोर
....
9 Sep 2019 - 7:02 pm | दुर्गविहारी
उत्तम माहिती. बाकी राजपुत सरदारांबाबत निरीक्षण पटले.
10 Sep 2019 - 8:55 am | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच सखोल माहितीने भरलेला लेख.
हा किल्ला म्हणजे नेमका कुठला? पालीजवळचा सरसगड्/सुधागड?
10 Sep 2019 - 9:39 pm | मनो
मूळ शब्द पाहून सांगतो
11 Sep 2019 - 1:18 am | मनो
पगडी यांनी पालीखेड असाच शब्द दिला आहे. मूळ फारसी अखबार शोधला पण तो काही आत्ता सापडत नाही. पाली जवळचा सुधागड असावा असा अंदाज आहे
10 Sep 2019 - 11:05 am | माहितगार
माझ्या मते उपरोक्त लेखाच्या आधारे २ निरीक्षणे नोम्दवता यावीत
१) काही वेळा औरंगजेबाच्या मुघल सेनेस सैन्यबळाच्या अभावाचा सामना करावा लागत होता
२) काही वेळा पगारांच्या थकबाकी रहात होत्या ज्याची पुर्तता करण्यासाठी औरंगजेबाच्या सुरतेतील खजिन्याचा आधार घेतला जात होता.
ऐतिहासिक काळात सर्व साधारणपणे भारतीय सैन्य मनुष्यबळाची उपलब्धता शेतीकामे संपल्या नंतर होत असावी त्यामुळे शेतीच्या हंगामात सैन्यकामासाठी मनुष्यबळाची कमतरता भासली असू शकते. दुसरे सैन्यासोबतचा मोठा फौजफाटा लुटीच्या उत्पन्नाच्या आकर्षणाने येत असे लूट आटोपल्यावर परततहि असावा तिसरे गनिमी काव्याम्ना तोंड देणे आणि किल्यांना दिर्घकालिन वेढे लावणे तसेच दक्षिणेत तामीळनाडू पर्यंत अभियाने राबवणे या सर्व कारणांमुळे मनुष्यबळ कमी पडत असेल
औरम्गजेबास सुरतेच्या खजिन्यातून उचल करण्याएवढी आर्थीक चणचण का भासली असावी याचा मात्र निटसा उलगडा होत नाहीए औरंगजेबाच्याच काळात सर्वाधिक भारत मुघल अमला खाली होता या दृष्टीने त्याचा महसूल सुरतेवर मदार ठेवावी लागावी एवढा कमी होण्याचे कारण प्रथम दर्शनी समजत नाही. औरंगजेब तसा उधळ्यापण नव्हता. सैन्यबळाची कमतरता भासते म्हणून पगार वाढवावे लागले असतील अशी एक शक्यता असू शकते पण आर्थीक चणचणीचा पूर्ण उलगडा होतोय का या बद्दल साशंकता वाटते.
10 Sep 2019 - 10:07 pm | मनो
मोगल सैन्याला पैसे कमी पडत होते हे अनेक उदाहरणातून दिसते. सैनिकांचे अनेक वर्षांचे पगार बाकी असत. पगारासाठी दंगे होत असत. बादशाह कटकसरीबरोबरच कंजूसीबद्दल पण प्रसिद्ध होता. मराठ्यांना किल्ला खाली करण्यासाठी मोगल सरदार जेवढी रक्कम गुप्तपणे देत असत, तेवढेच रुपये बादशाह त्या सरदाराला इनाम म्हणून उघडपणे बक्षीस देत असे.
भावी निजाम याने काढलेले उद्गार प्रसिद्ध आहेत - औरंगझेबाने शहाजहान बादशहाच्या काळात साठलेला सर्व खजिना दक्षिणेत खर्च केला, तरीपण काम झाले नाही (मामला न बस्त). सतत युद्धामुळे दक्षिणेच्या सुभ्यात शेतीचे उत्पन्न काही येत नसे, म्हणून लांबून पैसे मागवले जात, आणि वाटेतले मराठे स्वार ते पैसे लुटत असत, म्हणून दहा, वीस हजाराची सैन्ये खजिना आणण्यास रवाना करावी लागत. थोडा काळ पैसे असत, मग पुन्हा बरेच महिने पैशाचा दुष्काळ पडे.
जुन्या काळात मोठी सैन्ये बाळगणे हा खर्चिक मामला होता, फक्त सदाशिव राव भाऊच्या सैन्यास महिना सहा ते नऊ लाख रुपये लागत (बाकी पेशव्याचे वेगळे). १६४६ साली संबंध मुघल राज्याचे उत्पन्न २२ कोटी, त्यात १९ कोटी मुलुख जहागीर दिलेला, म्हणजे ३ कोटी बादशहाचे उत्पन्न होते.
ब्रिटिश सैन्यात मात्र पगारात नियमितता होती, ईस्ट इंडिया कंपनीने लढाईसाठी मोठी कर्जे इंग्लंडमध्ये जमवली होती, बंगालमधून भरपूर पैसे जमा केले, आणि त्या पैश्यावरच साम्राज्याचा पाय रचला.
11 Sep 2019 - 9:19 am | माहितगार
रोचक माहिती
13 Sep 2019 - 9:45 am | शैलेन्द्र
बरोबर, ह्या युद्धाने मोगल साम्राज्याची कंबर मोडली, जशी पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाने ब्रिटिशांची मोडली.
10 Sep 2019 - 1:07 pm | अनिंद्य
छान माहिती !
10 Sep 2019 - 10:02 pm | तुषार काळभोर
एखाद्या मोहिमेवर किंवा लढाईत कामी आल्यावर कुटुंबियांना अतिरिक्त मोबदला/नुकसानभरपाई मिळायची का?
11 Sep 2019 - 1:29 am | मनो
रायगडची जीवनकथा मधुन -
रायगडची जीवनकथा
रायगडवर बालपरवेसी असत. ज्या सरकारी नौकरांचा लढाईंत मृत्यू होई, त्यांच्या लहान मुलांस बालपरवेसी म्हणून सरकारी खर्चाने वयांत येईपयंत सांभाळत. इ. स.१७७६–७७ मध्ये रेवदंड्यास शत्रूचा वेढा पडला असता रायगडकरी मदतीस गेले होते; त्यांतील दोन माणसे ठार झाली. त्यांतील संभाजी जागड याची आई व धाकटा भाऊ यांस बालपरवेसी म्हणून २० रुपयांची नेमणूक सरकारांतून मिळाली. अब्दुल रहमान त्याच वेढ्यात कामास आल्यामुळे त्याची आई व भाऊ यांस बालपरवेसी म्हणून २० रु. दरसाल मंजूर झाले. [समापेरो. भा. २ क. ६२९ पृ. १४१ ते १४३]. ही माणसे गडावर न रहाता आपल्या गावी आपल्या घरी रहात असत. ज्यांना हे अशक्य असे, ते गडावर रहात. इ. स. १७७७–७८ त रायगडावर तीस बालपरवेसी होते [अप्र. कागद रु. नं. ७९].
11 Sep 2019 - 4:07 pm | सुधीर कांदळकर
अतिशय कठीण, आव्हानात्मक काम. डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखे. हॅट्स ऑफ्फ.
लेख आवडला. सूर्याजी पिसाळांबद्दलचा पूर्वग्रह पुसलात. धन्यवाद.
13 Sep 2019 - 9:40 am | शैलेन्द्र
खूप वेगळी आणि महत्वाची माहिती मिळाली, सुंदर लेख.
13 Sep 2019 - 1:40 pm | श्वेता२४
खूपच नवीन माहिती. तुमच्या इतिहासातील व्यासंगाला दंडवत.