h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
padding:20px;
}
div.chitra1 {
max-width:400px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:300px;
margin: auto;
}
गणपतीची आई गौराई
गणपती आले की त्याच्या पाठोपाठ त्याची आईसुद्धा, 'हा नीट पोहोचला असेल ना? हल्ली इतकी वाहनं झालीयेत आणि हा आपला उंदीर सोडायला तयार नाही, त्यातच सार्वजनिक गणपतीचे स्वयंसेवक आपण गणपती असल्याच्या थाटात धक्काबुक्की करताना बाया-बापड्यांचेही भान राखत नाहीत, (या बाया खरोखरच बापड्या असतात, बरे का! एकही ताई ब्रसुद्धा उच्चारत नाही. या बायांना मात्र माझ्या बाळाने बुद्धी द्यायला हवी की त्यांच्या घरच्या देव्हाऱ्यातही मीच आहे म्हणून)' अशा काळजीने आणि लेकराचा थाट पाहायला येते.
गौरीच्या सणाचा गाजावाजा कोकणात आणि इतरही सगळीकडे फारच. कारण गौर म्हणजे माघारी येणारी माहेरवाशीण, आणि तिला घ्यायला येणारा सकरोबा म्हणजे शंकर हा जावई, असे मानले जाते. माझी आई खास गौरीसाठी मुराळी लावून देत असे, माझा दोन नंबरचा भाऊ खास तेवढ्यासाठी यायचाच. आता तोही नाही आणि आई तर आधीच गेली.
गौर आणायची, तीही माहेरवाशिणीकडूनच म्हणून माहेरवाशीण गौरीच्या सणाला येणारच. तिन्हीसांजेला गौरी येतात आणि त्याच रात्री बारा वाजता शंकर तिला घेऊन जायला येतो, अशी श्रद्धा. म्हणजे बघा हं, मुलीने माहेरी तर यायचे, पण तिच्या नवऱ्यालाही तिच्याशिवाय चैन पडू नये, असे तिचे स्थान सासरघरात असले पाहिजे. अशी एक सुखाची भावना आईवडिलांच्या मनात असते. त्याच्याशी सुसंगत ही परंपरा आहे.
गौरी येतात त्या दिवशी दादरचा फूलबाजार फुलांच्या बरोबरीने तेरड्याच्या झाडांनी, गौरीच्या हातांनी - म्हणजे कळलावीच्या, हळदकुंकवाच्या रंगांच्या फुलांनी भरून जातो. ही फुले गौरीच्या पंजाच्या ठिकाणी तळतापप्रमाणे लावायची.
निसर्ग आणि मानवाचे सख्य होते, तेव्हापासून मानव निसर्गाच्या आवाहनाला, त्याच्या निरीक्षणामुळे आलेल्या अनुभवातून साथ देत आल्यामुळे ज्या काही परंपरा निर्माण झाल्या आहेत, त्यात गौरीसाठी तेरड्याच्याच झाडांचा वापर केला जातो.
तेरड्याचीच झाडे का वापरायची? असा प्रश्न मी आईला विचारला होता, तेव्हा तिने उत्तर दिले होते, "अगं, तेरड्याची फुलं तीन दिवस टिकतात आणि गौरही तिसऱ्या दिवशी जाते. पूर्वी मुखवटे किंवा मूर्ती नसत, म्हणून हे तेरड्याचं रोप गौरीचं प्रतीक मानलं जातं आणि त्याचा तो मान आहे."
गौराईला आणायला पाणवठ्यावर जायचे. सुपात सगळी तयारी आई करून देत असे. इथला पाणवठा म्हणजे पूर्वी एक विहीर होती, मग नळ असत. आता पाण्याच्या टाक्या.
तेरड्याची मुळासकट पाच रोपे, केळीच्या सोपाने बांधून सुपाच्या बंद भागाकडे शेंडे करून ठेवायची. हे सूपसुद्धा धुऊन, वाळवून त्याच्या उघड्या भागाला ओल्या हळदीकुंकवाची बोटे ओढलेली असत, शिवाय नव्या सुताने तो पुढला भाग गुंडाळलेला असे. त्यात हळदकुंकू, नारळ, तांदूळ, विडा, अगरबत्ती, काडेपेटी, लखलखीत घासलेला पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या आणि एक रुमलाइतका, पांढरा पण हळदीचा पाण्यात भिजवून सुकवलेल्या कापडात बांधलेली सुपारी आणि तांदळाची ओटी, एका पळसाच्या पानावर नैवेद्यासाठी ठेवलेला गूळ.
मग आम्ही गौर आणायला निघायचो. सोसायटीतल्या सगळ्या छोट्या मुली तयारच असायच्या. छोटा भाऊ घंटा वाजवत निघाला की सगळ्या सामील व्हायच्या. सोसायटीच्या आवरातली पाण्याची टाकी किंवा एखादे फळझाड, हा पाणवठा.
तिथे पोहोचल्यावर एक मोठा खडा घेऊन तो तांब्यातल्या थोड्या पाण्याने धुवायचा आणि तांब्यातल्या पाण्यात सोडायचा. हाच तो सकरोबा, म्हणजे शंकर म्हणून स्थापन केला जातो. मग तेरड्याच्या रोपांची मुळे धुऊन, ती रोपे सुपाच्या उघड्या भागाकडे शेंडे करून ठेवायची. हळदकुंकू वाहून त्यांची आणि तांब्याची पूजा करायची, अगरबत्ती, नैवेद्य दाखवून सुपारीच्या ओटीचे कापड रोपांना बांधून, शेंड्याकडची बाजू समोरच्या बाजूला करून, सूप उचलून डोक्यावर घेतले की सगळे टाळ्या वाजवत, घंटा-झांजांचा गजर चालू करत.
एव्हाना आई इमारतीच्या दाराशी आरती आणि भाकरतुकडा, पाण्याचा तांब्या घेऊन, येऊन उभी राहिलेली असे. भाकरतुकडा ओवाळून टाकत असे, सगळ्यांच्या डोळ्यांना पाणी लावीत असे, पायावर पाणी घालत असे. औक्षण करीत असे.
घराच्या दारात गौर आली की आई दारात उभी राहून तीन वेळा विचारत असे, ''गौर कशाच्या पावलांनी आली?'' त्याला, अनुक्रमे "सोन्यामोत्याच्या पावलांनी आली", "धनधान्याच्या पावलांनी आली" आणि ''सुखासमाधानाच्या पावलांनी आली" अशी उत्तरे दिली कीच आत घेत असे.
मग घरात सगळीकडे गौर फिरवायची आणि मांडलेल्या पाटावर ते सूप ठेवायचे. मग आई गौरीची स्थापना करून तिच्या नैवेद्याची तयारी करीत असे. गौर माहेरवाशीण असल्याने आल्या आल्या ती माहेरची भाजीभाकरीच गोड मानून खाणार, ही मान्यता असल्याने तिच्यासाठी खास कवळ्याची पालेभाजी आणि तांदळाची भाकरी हाच नैवेद्य.
रात्री बारा वाजता सकरोबा (शंकरोबा) म्हणून तांब्यातून आणलेला खड्याची स्थापना तांब्यासकट करायची. त्या तांब्याला टोपी घालून त्याची पूजा करायची, लामणदिव्याने त्याला आणि गौरीला ओवाळायचे. दुसऱ्या दिवशी मात्र माहेरवाशिणीसाठी आणि जावईबापूंसाठी मटण आणि तवशाचा, म्हणजे मोठ्या पिकलेल्या काकडीचे गोड वडे, कोकमसार, भात, कांदा, लिंबू असा खासा बेत असतो. आणि गौर जाताना वरण, भात, गावठी मटार भाजी, तांदळाची खीर, पुरी किंवा वडे असा बेत असतो. इथे खीर आणि कवळ्याची भाजी यांची कृती देत आहे.
तांदळाची खीर.
१. चार वाट्या तांदूळ
२. दोन नारळांचे जाड आणि पातळ दूध
३. चार वाट्या गूळ
४. जायफळ कीस लागेल तसा
कृती:-
१. तांदूळ तासभर आधी धुऊन, निथळून घ्या.
२. आधण पाण्यात वैरा.
३. बोटचेपे शिजले की नारळाचे पातळ दूध घालून शिजवा.
४. पूर्ण शिजले की रवीने किंवा डावाने हाटून घ्या.
५. गूळ चिरून घाला आणि नीट विरघळवून घ्या.
६. नारळाचे दूध घालून ढवळत राहा. (इथे ढवळत राहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण नाहीतर खीर फुटते.)
७. उकळी फुटली की गॅस बंद करा.
गावठी लाल तांदूळ आणि नैसर्गिक गूळ, नारळाचे दूध पारंपरिक रेसिपी.
कवळ्याची भाजी
साहित्य:-
१. १ जुडी कवळ्याची भाजी. (ही भाजी या दिवसात खूप मिळते. ही रानभाजी आहे.)
२. दोन कांदे.
३. ३-४ हिरव्या मिरच्या.
४. ४-५ पाकळ्या लसूण.
५. दोन चहाचे चमचे तेल.
६. चवीनुसार मीठ.
७. ओले खोबरे मूठभर
कृती:-
१. भाजीची नुसती पाने काढून घ्या.
२. गरम तेलात लसूण ठेचून घाला. त्यात हिरव्या मिरच्या मोडून घाला. परतून घ्या.
३. बारीक चिरलेला कांदा त्यात घालून छान परता.
४. मग पाने घाला.
५. मिनिटभरात भाजी शिजतेच. मीठ घालून उतरवा.
६. वरून ओले खोबरे घालून वाढा.
यासह कढत पाण्याचे आधण घालून केलेली तांदळाची भाकरी.
हा नैवेद्य झाला की माहेरची भाजी भाकरी खाऊन गौर सुखावते आणि गौरीला तेज येते.
श्रेयनिर्देश: भाजी प्रचि १ आणि भाकरी प्रचि - जागु
प्रतिक्रिया
6 Sep 2019 - 9:09 am | यशोधरा
वा, वा! गौराई आल्या!
माहेरवाशिणी सुंदर दिसताहेत. खूप कोडकौतुक चालते ह्यांचे. :) करायलाच हवे!
6 Sep 2019 - 10:33 am | महासंग्राम
आला भादवा महिना
गवर लेकीला आणा
आली गवराई घरात
सडा रांगोळी दारात
झाला आनंद गगनात
वाजवा भानूर जोसात
आली गौराई अंगानी
दोन दिसांची पावणी
इंद्र राजाची म्हेवनी
शंक्रूबांची कांता
गजाननाची माता
हिमगिरी तिचा पिता
वट्या भरा ग जाता-जात
दहीभात देती हाता
---------------------
गुंज गुंज डोळे
अंगणामधी खेळे
अंगणीच्या ग नारीनं
शिवाशिव केली
शिवाशिव केली ग
नगरीभाईर गेली
नगरीच्या नारीनं ग
पंचारती केली
आरती घालू नये
पिरती ग घालू
किती घालू सोनं
आमच्या ग गौराईला
जोडण्याचं लेणं
( हे गीत याच रीतीने इतर दागिने गुंफून लांबू शकते)
----------------------------------------------------------------------------
सोनियाच्या पावलान
गवर आली माहेरा
रानंमाळ हिंडली ग
भाजीभाकर जेवली
( हे गीत याच रीतीने दहीभात, श्रीखंड-पुरी आणि इतर पदार्थ गुंफून होईपर्यंत म्हंटले जाते)
------------------------
पंढरपुरामंदीं काचेचा बंगला
रुक्मिणी सजली ग विठू कुठे गेला
इथं होता इथं होता गेलं मंदिरात
माझ्या जोडव्याला शोभा सये राघूरंगात
( हे गीत याच रीतीने सगळे रंग गुंफून होईपर्यंत म्हंटले जाते)
------------------------------
झिम्मा
झिम्मा घाली झिम्मा
झिम्म्यायाच्या राती
सासू बाळाई कुठं गेली
तिच्यासाठी तर भिंगरी केली
त्या भिंगरीचा बाई तुटला तातू
मेल्या गोप्यानं केला काय घातू
मेल्या गोप्याचं मी काय केलं
माझं हिंगाचं पोतं त्यानं न्हेलं
संदर्भ : श्रावण भाद्रपद -सरोजिनी बाबर
6 Sep 2019 - 10:55 am | यशोधरा
किती मस्त!
6 Sep 2019 - 1:20 pm | नूतन सावंत
किती सुंदर गाणी.सरोजिनी बाबर यांनी, 'एक होता राजा'नावाच्या पुस्तकाचे संपादन केले आहे त्यात या प्रकारची प्रतयेक सणाची गाणी, उखाणे-कोडी आणि नाव घ्यायचे उखाणे,लोककथा, लोकगीत,ओव्या आशा लोकसंगीताचे संकलन केले आहे,खूप मोठे, जवळजवळ चारध्ये पानांचे पुस्तक आहे का तुमच्याकडे?
6 Sep 2019 - 1:21 pm | नूतन सावंत
किती सुंदर गाणी.सरोजिनी बाबर यांनी, 'एक होता राजा'नावाच्या पुस्तकाचे संपादन केले आहे त्यात या प्रकारची प्रतयेक सणाची गाणी, उखाणे-कोडी आणि नाव घ्यायचे उखाणे,लोककथा, लोकगीत,ओव्या आशा लोकसंगीताचे संकलन केले आहे,खूप मोठे, जवळजवळ चारध्ये पानांचे पुस्तक आहे का तुमच्याकडे?
6 Sep 2019 - 11:44 am | पद्मावति
सुरेख जमलाय लेख अगदी आणि रेसेपी फोटो पण.
6 Sep 2019 - 12:42 pm | जालिम लोशन
छान लेख आणी प्रतिसाद
6 Sep 2019 - 1:39 pm | चिगो
सुंदर लेख.. आमच्याकडे गौरी/महालक्ष्मी बसायच्या. जेष्ठा आणि कनिष्ठा.. त्यांच्यासाठी अनारसे, करंज्या/ लाडू चिवडा इत्यादी फराळाची तयारी जवळपास सातेक दिवसांआधीच सुरु व्हायची. गौरी पूजनाच्या दिवशी सोळा भाज्यांचं, कढी/वडे /भजी/ पुरणपोळी असं पंचपक्वानांचं ताट प्रसाद म्हणून असायचं..
बाब्बौ.. मटण? इथं मला मेघालयात, घरापासून दोन हजार किलोमीटरवर पण चिकन-मटण खायला मनाई आहे गौरी-गणपतीमधे..