h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 18px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
}
स्मरणगुंजन
"दादरला पोर्तुगीज चर्चसमोरच्या अमर हिंद मंडळ या उघड्या - म्हणजे छप्पर नसलेल्या मैदानी सभागृहात रात्रीची वसंत व्याख्यानमाला चाले. शाळाकॉलेजात असताना मी हजेरी लावलेल्या या व्याख्यानमालेने भाषणाची बांधणी कशी करावी, एकेक मुद्दा मांडून त्यावर तर्कशुद्ध विचार कसा करावा, मुद्देसूद विश्लेषण कसे करावे याचे वस्तुपाठच दिले."
अनंत काणेकर, म.वा धोंड. माधव मनोहर अशा अनेक विचारवंतांची व्याख्याने संस्मरणीय होती. म.वा. धोंड यांचे एक भाषण आठवते आहे. विचारस्वातंत्र्य या विषयावरील परिसंवादात त्यांनी स्वातंत्र्य या शब्दाची अफलातून चिरफाड केली होती. शालान्त परीक्षेत एका विषयात पहिला आलेला बाळ्या नाईक आता नेहमी माझ्याबरोबर असे. आता उशिरा आठवले - अवध्यवरील परिसंवादात माझ्याबरोबर तोच होता.
व्याख्यानमालेचे पहिले ज्ञानसत्र एप्रिल १९४८मध्ये आयोजित करण्यात आले होते.
स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या तंत्रानुसार चालणारे. एकदा आपण स्वतःचे म्हणून जे काही तंत्र असते, त्या तंत्राप्रमाणे चालू लागलो की त्या विशिष्ट तंत्राचे आपण गुलाम होतो किंवा त्या तंत्राच्या सीमेबाहेर आपल्याला जाता येत नाही. म्हणजेच स्वातंत्र्य या शब्दाचा जो प्रचलित अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे, तसे काही स्वातंत्र्य वगैरे असूच शकत नाही.
व्यवस्थापनाचा अनुभव घेण्याआधी हे धडे मिळाल्यामुळे समस्यांची, प्रमेयांची, तसेच Exciseच्या कारणे दाखवा नोटिशींना देण्याच्या उत्तरांची मांडणी करणे पुढे सोपे गेले.
सार्वजनिक गणेशोत्सवात विविधरंगी कार्यक्रम असत. गणेशोत्सव हा उत्सव आहे. उत्साहाचे अणि चैतन्याचे झरे घेऊन एकमेकांना आनंद देत नात्यांचे धागे बळकट करीत खाण्यापिण्याची लयलूट करीत व्यक्तिमत्त्वे फुलवणारा उत्सव. गणपती असेल तिथे सुंदर सजावटी, नेत्रदीपक रोशणाई, पेढेमोदक आणि संगीतभर्या चैतन्याची वर्दळ. आपला देवाधर्मावर विश्वास असो वा नसो, आनंदाच्या या जलशात भाग न घेाऊन कसे चालेल? गणेशोत्सव उंबरठ्यावर आला की आम्ही आसपासच्या विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यक्रम पत्रिका पाहत असू. मग दहा दिवस कोणकोणत्या कार्यक्रमाला जायचे याचे मनसुबे रचले जात. राम मारुती रोड, वनिता समाज, खांडके बिल्डिंग नं ९ इ. मंडळे दर्जेदार कार्यक्रमांबद्दल ख्यातकीर्त होती. त्यातला तेव्हा नावीन्यपूर्ण असलेला कार्यक्रम म्हणजे अभिरूप न्यायालय. यात एखाद्या लोकप्रिय नामवंतावर खटला भरला जाई.
एकदा विद्याधर गोखले यांच्यावर खटला भरला होता. सुरुवातीला परिचय करून देताना प्रि. मनोहर जोशींनी "हे फक्त ‘गोखले’च नव्हेत, तर ‘विद्याधर’ही आहेत" अशी मस्त सुरुवात केली होती. खटला सुरू होताना न्यायाधीश प्रथम आरोपीचे नाव विचारतात, मग राहण्याचे ठिकाण, व्यवसाय वगैरे.
नाव-पत्ता सांगितल्यानंतर न्यायाधीशांनी गोखल्यांना विचारले की "आपला व्यवसाय काय आहे?"
"सारे पत्रकार मला नाटककार समजतात आणि सारे नाटककार मला पत्रकार समजतात."
"तुम्ही स्वतःला कोण समजता?"
“मी स्वतःला युगपुरुष समजतो.” असे गमतीदार उत्तर त्यांनी दिले अणि नंतर शेरशायर्या पेश करून, प्रश्नांना भलतीच गमतीदार वळणे देऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली होती.
शास्त्रीय संगीताच्या मैफलींना माझा अग्रक्रम असे. अनेक रंगलेल्या, संस्मरणीय मैफलींनी माझ्या मनावर ठसा उमटवला आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वार्धात नवीन, ताज्या दमाच्या गायकांच्या मैफली होत. उत्तरार्धात सुप्रसिद्ध गायकांच्या. प्रभाकर कारेकर, उदयराज गोडबोले, रामदास कामत अशा ख्यालगायकीत तेव्हाच्या ताज्या दमाच्या गायकांनी मैफली नेहमीच मस्त रंगवल्या आणि आम्हांला कधीही निराश केले नाही. पण फक्त ख्यालगायकी आणि उपशास्त्रीय. ध्रुपद-धमार नसे. सोबत जाणकार मिलिंद कासरलकर असे. शिवाय शास्त्रीय संगीतातले फारसे न कळणारे पण नाट्यगीतात रस असणारे बाळ्या नाईक, बाळा कुळकर्णी, नार्या ऊर्फ नारकर माझ्यासोबत असत. फक्त भावगीते आणि सिने-संगीत यात रस असणारा चंदू मांजर्डेकरही बरोबर येई. मन रमले तर बसे, नाहीतर थोड्या वेळाने परत जाई. गाणे रंगत नसेल तर मात्र त्याची उपस्थिती आनंददायक ठरे. कसे, त्यासंबंधी नंतर कधीतरी. सध्या पुन्हा गणेशोत्सवाकडे वळू या.
राम मारुती रोड सार्वजनिक गणेशोत्सवाचे व्यासपीठ पदपथावर. श्रोतृवृंद मोठा असला की श्रोत्यांनी संपूर्ण रस्ता व्यापून जाई. काही श्रोते बरोबर पाट, लाकडी स्टूल, कापडी बैठक वगैरे आणत. मध्येच मोटार आली की श्रोते उठून बाजूला होत. मोटार गेली की पुन्हा जागेवर. तेव्हा तिथे रहदारी इतकी कमी असे की कार्यक्रम संपेपर्यंत एक-दोनच मोटारी जात. मध्येच पावसाची सर येई. मंडपाबाहेरचे श्रोते छत्र्या उघडून उभे राहत आणि पाऊस गेला की पुन्हा ओल्याचिंब जागी बसत. पाट, स्टुले पुसली जात, तर कापडी बैठका आता पिशवीत जात. पण ना कधी गायक-वादकाचा रसभंग झाला, ना कधी रंगलेल्या श्रोत्यांचा. बहुधा वनिता समाजातली बिस्मिल्लाजी आणि व्ही.जी. जोग यांच्या जुगलबंदीची अशीच एक संस्मरणीय मैफील आठवते. विशेषतः त्यातला राग जोग आणि त्यातले त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सौंदर्यपूर्णतेने मांडलेले दोन्ही गांधार. व्ही.जी. ‘जोग’ असल्यावर राग जोग हवाच नाही? माणिक वर्मांचा, श्रोत्यांच्या फर्माइशीमुळे अनेक वेळा ऐकलेला जोगकंस तर अजून कानात निनादतो आहे.
बहुधा १९७२ साल असावे. राम मारुती रोडला भीमसेनजींची मैफल होती. पंचविशीच्या आसपासचे तरणेबांड असे एक नवीनच तबलजी साथीला होते. आयोजकांनी तबलजींची खास ओळख करून दिली होती. गायनाला एक अभिनव शैलीतली, आत्मविश्वासपूर्ण, उत्स्फूर्त, आक्रमक, तरीही मान्यवर गायकाचा अधिक्षेप न करणारी अफलातून साथ लाभली आणि मोठ्या मनाच्या भीमसेनजींनी त्या तरुण तबलजीला मुक्त वाव देत मनापासून त्याची जाहीर वाहवा केली. कालांतराने आठवणींतले तपशील धूसर झाले आहेत. बहुधा पूरिया कल्याण, काफी ठुमरी, अभोगी आणि एकदोन भजने अशी ती मैफिल असावी. त्या अविस्मरणीय मैफलीतल्या तबलजीचे नाव आहे पं. सुरेश तळवलकर. ख्यालगायनाला आता अतिदुय्यम, बोटचेपी भूमिका सोडून वाद्यसंगीताला असते तेवढी आक्रमक नसली तरी मनमोकळी तबलासाथ देण्याचा नवा trendsetter पायंडा आता पडला होता.
गजानन वाटव्यांचे नाव घेतल्याशिवाय मी ‘पुढेऽऽ कसेऽऽ जाऽऽऊं?’ पाकिस्तान युद्धानंतरचे, म्हणजे १९६५ सालचे दिवस. ‘यमुनाकाठी ताजमहाल’ वगैरे गाजलेल्या गीतांबरोबर ते नव्या कविता, नवी गीते कधी मुक्तछंदात तर कधी अनवट चालीवर म्हणत. किरकोळ शरीरावर घातलेला त्यांचा वेष अगदी साधासुधा असला, तरी उत्साही व्यक्तिमत्त्व, प्रयोगशीलता आणि नव्या कविता यामुळे ते तरुणाईत फार लोकप्रिय झाले. शिवाय नव्या कविता म्हणताना ते मिस्कील शैलीत उपस्थित रसिकांपैकी एखाद्याची/एखादीची ‘तू का ग लाजलीस’, ‘गजरा कुणासाठी माळलास’, ‘अरे जरा माझ्याकडे पण बघ की’, ‘अरे, ती नाही, मी गातो आहे आणि इतका काही वाईट नाही गात आहे’ अशी नर्मविनोदी शैलीत गंमत करीत. अर्थातच सभ्यतेच्या मानमर्यादा राखूनच. पारंपरिक तसेच नवीन स्त्रीगीतेही असत. (‘नन्हासा दिल मेरा मचल मचल जाय’ च्या चालीवरचे एक स्त्रीगीत होते. पण त्याचे शब्दच आता आठवत नाहीत.)
त्यामुळे त्यांचा कुठे कार्यक्रम असला की बहुतेक तरुणी इथे. तरुणी इथे म्हणून तरुणही इथेच हे ओघाने आले. मग त्या वेळी सुरू असलेल्या आसपासच्या इतर कार्यक्रमांत तरुणाई बहुधा नसे. काही लोकांना उदरशूल न उद्भवला तरच नवल. मग वाटव्यांना नियोजनबद्ध रितीने डावलले गेले असे म्हटले जाते. आणि बघता बघता ते केव्हा स्मृतीआड गेले कळलेच नाही. या गोष्टी कळण्याचे माझे तेव्हा वय नव्हते. आमच्या शेजारच्या पाटकरकाकांच्या घरात याबद्दल बोलले जाई.
माझ्या मनावर खोल कोरलेले आणि हृदयावर ठसा उमटवणारे गणेशोत्सवातले कार्यक्रम म्हणजे कथाकथन आणि काव्यगायन. द.मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील हे कथाकथनाचे त्रिकूट. या त्रिकूटाच्या जोडीला कधी वसंत सबनीस तर कधी गिरिजा कीर असत. सुरुवातीला व.पु. काळे असत. नंतर ते नोकरीच्या वा व्यावसायिक व्यापामुळे नसत. व.पुं.च्या ‘शहरी’ कथांत वेगवान संवाद असत. व.पुं.च्या 'जेपी जो जेपी', 'पतंग' इ. कथा आठवताहेत. दमांच्या ‘बापाची पेंड’, ‘धोक्याचे वळण’, व्यंकटेशांची ‘मारुतराया’, ‘तपासणी’, पाटलांची ‘पाहुणचार’, ‘धिंड’ या कथा तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. माझे सोबती असत पाटकरकाका आणि त्यांची कन्या जयबालाताई, बाळ्या नाईक, चंदू मांजर्डेकर, बाळा कुळकर्णी आणि नार्या ऊर्फ नारकर. इथे मात्र चंदूची चैन असे. सांगली जिल्ह्यातले माणदेशजवळचे त्याचे गाव. माडगूळकरांच्या पात्रांचीच भाषा त्याच्या घरी बोलली जाई. या कथा आम्ही सर्वांनी वाचलेल्या होत्या. द.मां.ची रामा खरात, बाबू पैलवान, नाना चेंगट वगैरे पात्रे अजूनही कधीतरी नजरेसमोर जिवंत होऊन वावरतात. ‘कोन गाव पाव्हनं?’ हे शब्द उच्चारत हात उंचावून देवळातली घंटा वाजवण्याचा अभिनय करणारे तांबुलओष्ठित व्यंकटेश अजूनही कधी नजरेसमोरून झर्रकन सरकतात. पाटील तर व्यासपीठाचे राजेच. गावकर्यांच्या घोळक्यात धिंड हाकीत सहज वावरताहेत असे वाटणारे. त्यांच्या ‘पाहुणचार’मधले मास्तर पहाटे पहाटे जेवणाचे अफाट, भरगच्च ताट समोर आल्यावर ‘लावा त्वांड’ हे उद्गार ऐकून बापुडवाणे झालेले दिसतात. ‘ढांग टिकटाक टिकटाक’च्या तालावर गावगल्ल्यांमधल्या दृश्यासह धिंड समोर साकारते. ढोलताशांच्या पुढे शंकर पाटील मिस्कील चेहर्याने स्फूर्तिदायक हातवारे करणारे. गिरिजा कीरांच्या कथेतली ‘इंटरव्ह्यू’ देणारी लाजरी मुलगी कधी ओझरती दिसते. सबनीसांचे कविसंमेलन त्यांच्या रांगड्या, मिस्कील आवाजात ‘श्रोते - आखुडलेले, खुडलेले, डलेले, लेले, ले’ ही वेगळीच गंमत कानावर आलीसे वाटते. झरझर बदलणारे नॉन डिजिटल थ्री डी व्हर्च्युअल नेपथ्य. अर्थातच मनश्चक्षूंचे. हे सारे आठवले की मन वढाय वढाय होते आणि गतकाळात धाव घेऊ पाहते.
काही वर्षांपूर्वी कधीतरी चित्रवाणीवर व.पुं.ना पाहिले आणि पाहवलेच नाही. चेहर्यावरचीच नव्हे, तर कथनातलीही रया पूर्ण गेली होती. गजानन वाटवेंच्या बाबतीत मात्र तसे झाले नाही. अचानक केव्हा तरी त्यांच्यावरचा ‘निरांजनाची वात’ हा कार्यक्रम चित्रवाणीवर झाला. वयपरत्वे चेहर्यावरची रया गेली होती. पण उत्साह आणि ऊर्जा बर्यापैकी. बरे वाटले होते. चित्रवाणीवर एका सोहळ्यात द.मा. हल्ली एकदा दिसले होते. अगदी खणखणीत आवाज ऐकून बरे वाटले. फक्त चश्म्याचा नंबर वाढलेला वाटला. आता द.मां.ना ऐकू कमी येते म्हणून ते खूप मोठ्ठ्याने बोलतात. माईकसमोर देखील. पण अजूनही तस्सेच मिस्कील बोलतात असे समजते.
माझ्या पिढीतल्या तरुणाईला दीर्घकाळ तरुण ठेवले ते मंगेश पाडगावकरांनी. सहज समजणारी आणि स्वप्नांच्या प्रेमनगरीत लीलया सफर घडवणारी पाडगावकरांची कविता. ‘शुक्रतारा’ने किती पिढ्यांचे भावजीवन समृद्ध केले ते सांगता येणार नाही. त्यांचा तो मनावर गारुड करणारा, भावगर्भ, दैवी आवाज, ते सोपे शब्द, ती सहजता, ते कविता म्हणू लागले की शब्द आपणहोऊन साकार होऊन अर्थ सांगताहेत असे वाटे. प्रखर दिवा लावल्यावर दागिन्यातली हिरेमाणके चमकू लागतात, तसे काहीतरी. हल्लीच अचानक गावातल्या ग्रंथालयात ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हा काव्यसंग्रह हाती आला आणि पुन्हा स्वप्नांच्या दुनियेत हरवलो. पाडगावकरांनी स्वप्ने दाखवली, तर बापटांनी लावणीतल्या शृंगारातले निखळ सौंदर्य दाखवले. शब्दात जणू ढोलकीचा नादमय ठेकाच गुंफलेला. नृत्यांगनेच्या पावलातली वीज समरगीतातून येताना मात्र ढगातून कडाडणारी बिजली बनून अवतरे. पामरांना भूलोकीवरून यमदूत उचलतात. पण अप्सरांचे नृत्यगाणे आणखी रंगावे म्हणून दुष्ट इंद्राने बापटांना लवकरच किडनॅप करून नेले. बापट लवकर गेल्यामुळे माझ्या मनातल्या त्यांच्या आठवणी धूसर झाल्या आहेत. मोजून एकदोनदाच मी त्यांना पाहिले आणि ऐकले. पाडगावकरांची बालकविता वेगळी, तर विंदांची वेगळी. विंदांबद्दल लिहिणारा मी कोण? विंदांना काव्यगायनात पाहायच्या अगोदर त्यांचा आवाज ऐकला होता. रेडिओवरच्या ‘मुंबई ब’वरील ‘भावसरगम’मध्ये. ‘मागू नको सख्या, जे माझे न राहिलेले ….. ’ ही कविता भावगर्भ आवाजात त्यांनी म्हटली होती आणि रसास्वाददेखील ऐकवला होता. पद्मजा फेणाणीच्या आवाजात दहाएक वर्षांपूर्वी हे गीत ‘मुंबई एफ एम गोल्ड’वर ऐकले आणि थरारून गगनात गेलो. हे सारे कविराज म्हणजे निसर्गाचा एकेक अलौकिक चमत्कार आहेत. काही भव्यदिव्य पाहिले की आपण नतमस्तक होतो. स्मृतींचा अमोल ठेवा उधळून हे तर हृदयातच घर करून आहेत. आता माथा कुठे टेकवायचा?
बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सवात एक दिवस शारीरिक स्पर्धांसाठी आणि एक संध्याकाळ स्थानिक कलाकारांच्या नाटकांसाठी राखून ठेवलेला असे. शक्यतो रविवारी सुटीच्या दिवशी दिवसा होणार्या शारीरिक स्पर्धात अॅथलेटिक्सच्या मोजक्या प्रकारांबरोबरच मडके फोडणे, गाढवाला शेपूट लावणे, तीन पायांची शर्यत, पीठ पैसा, चमचा लिंबू, चमचा गोटी, बटाटा शर्यत, संगीत खुर्ची इ. मनोरंजक स्पर्धादेखील असत. 'पीठ पैसा'नंतर स्पर्धकांचे चेहरे पाहून भरपूर हशा पिके. या स्पर्धा अजूनही कुठेकुठे सुरू आहेत हे पाहून बरे वाटते. संध्याकाळच्या नाटकातले स्थानिक कलाकार बहुधा ऐतिहासिक नाटके पसंत करीत. त्यात कितीही अभिनिवेश आणता येत असे आणि शूरांच्या भूमिका करून तरुणींवर छाप पाडण्याचे तरुणांचे ते एक साधनदेखील होते. नाटक बसवताना भीम, अर्जुन, शिवाजी, संभाजी इ. भूमिका कोणी करायच्या यावरून कलाकारांची आपसात मस्त खडाजंगी होत असे. नंतर ‘काल्पनिक ऐतिहासिक नाटके’ आली. यात काहीही काल्पनिक प्रसंग घुसवलेले असत.
‘एका गाढवाची कहाणी’ हा रंगनाथ कुलकर्णींचा एकपात्री प्रयोग आठवतो आहे. पण खोल ठसा उमटवला आहे तो दादू इंदुरीकर (दादा कोंडकेंचे मामा) यांच्या ‘गाढवाचे लग्न’ने. ‘विच्छा माझी पुरी करा’ गणेशोत्सवात पाहिले की अँटोनिओ डी’सिल्व्हा हयस्कूलमध्ये ते आठवत नाही. अँटोनिओ डी’सिल्व्हा हायस्कूलमधल्या भावरम्य कार्यक्रमांबद्दल नंतर कधीतरी.
भावजीवन समृद्ध करणार्या अगणित मराठी, हिंदी, इंग्लिश गाण्यांबद्दल गायक-गायिका-वादकांबद्दल लिहावे तेवढे कमीच. त्यांचे ऋण कसे फिटेल? त्यांची अवीट गाणी ऑर्केस्ट्रामधल्या नवोदितांना वाव आणि रसिकांना अपार आनंद देत होतीच. कधी प्रमिला दातार यांचा वृंद असे, तर कधी झंकार म्युझिक सर्कल. आवडते गाणे कधी खाजगी, तर कधी सार्वजनिक गणेशोत्सवात कानावर पडताना आनंद होई. पाठीवर दामोदरला बांधून घोड्यावरून जाणार्या झाशीच्या राणीवरचे प्रमिला दातारच्या आवाजातले गीत नंतर कधीच ऐकले नाही. ‘तू-नळी’वर मात्र अजून आहे.
गाण्यांवरून आठवले. ‘शायद मेरे शादी का खयाल दिलमे आया है, इसीलिये मम्मीने तुम्हे चायपे बुलाया है’ या गाण्याला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली होती. एकदा गणेशोत्सवाच्या काळात आमचा एक परदेशस्थ मित्र खालीद खान ऊर्फ खाजाम, मी आणि आमचा अविवाहित मित्र जाड्या ऊर्फ विवेक वैद्य असे तिघे बसने कुठेतरी जाऊन दादरला येत होतो. गल्ल्यागल्ल्यात कर्णे बदबदा गाणी ओतत होते. माहीमपासून दादरपर्यंत बहुतेक ठिकाणी तेच गाणे ऐकू आले होते. बसमध्ये आम्ही दोघे जाड्याकडे पाहत गालातल्या गालात अर्थपूर्ण हसत होतोच, शेवटी उतरल्यावर ‘जा तेरेकू चायपे बुलाया है’ असे म्हणून हस हस हसलो होतो. तो अजूनही अविवाहित आहे. त्याला अजूनही एखाद्या श्रीमंत जरठसुंदरीच्या प्रतीक्षेत असायला आमची काहीच हरकत नाही. गमतीदार आठवणींचा अजिबात तुटवडा नाही.
मेहदी हसनच्या ईपी/एलपी रेकॉर्ड्स - तबकड्या ऐकल्या होत्या. विपुल केसांच्या तरण्याबांड जगजीत सिंगला प्रथम पाहिले ते दूरदर्शनवरच. तरुण जगजीतच्या गळ्यातून भारदस्त मखमली स्वर निघताना पाहून आश्चर्य वाटले आणि हरखून गेलो होतो. या दोघांनीही कवितेचे, गझलेचे बोट न सोडताच रसिकांना स्वरांच्या नंदनवनाची मस्त सफर घडवली. हे गझलिये गणेशोत्सवात केव्हा दिसतात याची वाट पाहत होतो. पण सार्वजनिक गणेशोत्सवांमधल्या कार्यक्रमांचे स्वरूपच बदलत गेले. नंतर गुलाम अलीच्या कॅसेट्स आल्या. पण आता आशा मालवली होती.
कालपरत्वे कार्यक्रमांचे स्वरूप बदलत गेले. शास्त्रीय संगीत, नाटके हद्दपार होऊन सिनेमे आणि ‘रेकॉर्ड डान्स’ आले. पांढरे कापड दोन खांबांना चार दोर्यांनी ताणून बसवले की लागला सिनेमाचा पडदा. आमच्या घरी सिनेमा पाहाण्यावर बंदी होती. त्यामुळे मी सिनेमे जवळजवळ पाहिलेच नव्हते. नाटकाला जातो म्हणून घरी खोटे सांगून मी सिनेमाला जात असे. शास्त्रीय संगीतात फारसा न रमणार्या चंदूची चंगळच. पडद्याच्या दोन्ही बाजूला प्रेक्षक बसत. इथे बाळ्या चंदूबरोबर आमच्याबरोबर चित्रपट दर्दी बबन ऊर्फ सूर्यकांत वाघमोडे असे. याने ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘केला इशारा जाता जाता’ यासारखे कित्येक मराठी चित्रपट दहावीस वगैरे वेळा पाहिलेले आहेत. गर्दी टाळायला जंजीर हा सिनेमा आम्ही पडद्याच्या मागील बाजूने पाहिला होता. प्रोजेक्टरच्या विरुद्ध बाजूने म्हणजे पडद्याच्या मागून डाव्याचे उजवे दिसे. त्यात अमिताभ बच्चन उजव्या हाताने पिस्तुल चालवताना दिसला. बाकी सारी पात्रे डावखुरी. सिनेमे न पाहिल्यामुळे मला तेव्हा कलाकार ओळखता येत नव्हते आणि अजूनही नाही येत. त्यात डाव्याचे उजवे. मग बाळ्या, चंद्या आणि बबन सर्वांन ऊत येत असे. सुध्या हा कोण रे? तो कोण रे? असे उगाचच विचारून माझी फिरकी घेतली जाई आणि बहुतेक वेळा उत्तर चुकल्यामुळे त्यांना मज्जा येत असे. कधी मी मुद्दाम बाळ्याला डिवचले की तो ‘सुध्याऽऽ आता तोडीन’ अशी धमकी देत असे. पण त्याने माझ्यावर कधीच हात उचलला नाही.
रेकॉर्ड डान्समध्ये पाचदहा वर्षांच्या चिमण्या मुली अर्धवस्त्रा वेषभूषेत कामुक अभिनय आणि शारिरिक हावभावांबरोबर धोकादायक अशा अतिवेगवान शारिरिक कसरती करताना दिसत. नंतर कार्यक्रमांचे स्वरूप बदलत गेले. तेव्हाच्या मित्रमंडळातले एकेक पोटापाण्यानिमित्त मार्गी लागलो आणि गणेशोत्सवातल्या कार्यक्रमांना जाणे थांबलेच.
कालानुसार होणारे बदल वाईटच असतात असे नाही. पुढे कार्यक्रमांसाठीचा निधी कमी होऊन देखाव्यांकडचा निधी वाढला. प्रथम लुकलुकत संगीताच्या ठेक्यावर इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या आधारे प्रकाशाकृतींचे आकार-रंगरूप बदलणारी – नाचर्या वीज-दीपमाळांची चमकदार, आकर्षक अशी वाहती आरास अवतरली. खर्च वाढल्यामुळे तो निघायला काही ठिकाणी दानपेटीत पैसे टाकायला वा देणग्या द्यायला अधूनमधून ध्वनिक्षेपकातून आवाहन केले जाऊ लागले, तर कुठे कुठे चक्क प्रवेशमूल्य आकारले जाऊ लागले. काही असले, तरी सार्वजनिक गणेशोसवातले देखावे स्थानिक कलावंतांना भरपूर वाव देऊन गेले.
शीव कोळीवाड्यात गणेशोत्सवात कॉम्प्युटरचा देखावा उभारला, म्हणून बहुतेक प्रमुख मराठी वर्तमानपत्रात बातमी आली होती. ही बातमी दूरदर्शनच्या मराठी बातम्यांतही आली. चि. तेव्हा पाच-सहा वर्षांचा होता. म्हणजे १९८८-८९च्या आसपासचे साल असावे. तेव्हा फार कोणी संगणक पाहिलाही नव्हता. मग रविवार साधून त्याला तो दाखवला. गर्दी टाळायला सकाळी लौकर गेलो, तरी चांगली पन्नासेक जणांची रांग होती. गणपतीचे मखर हे नेपथ्याच्या साहित्याने बनवलेले दहा-पंधरा फूट उंच अशा सीआरटी पडद्याचे प्रतिरूप होते. त्यात पारदर्शक पडद्यामागे गणपती. सीआरटीतली प्रतिमा आहे असे वाटणारा. गणपतीवर बदलत्या रंगात प्रकाशाचे झोत. पुढ्यात जुळत्या प्रमाणाच्या आकारात भलामोठ्ठा कळफलक. कळफलकावर स्पष्ट दिसणारी अक्षरे, चिन्हे आणि आत रंगीत दिवे. उंदरालाच माउसची भूमिका आली असावी. पण तेव्हा मला माउस काय असतो आणि संगणक कसा चालतो हे माहीतच नव्हते. त्यामुळे माउस होता की नाही हे कळलेच नाही. चिन्हांचाही अर्थ ठाऊक नव्हता. पण देखावा यथार्थ असावा. कार्यकर्ते चांगले होते. छोटा मुलगा कुतूहलाने, कौतुकाने पाहतो आहे असे पाहून त्यांनी हवा तेवढा वेळ दिला. दहाएक मिनिटे देखावा डोळ्यात साठवल्यावर मुलाचे समाधान झाले आणि कार्यकर्त्यांचे आभार मानून आम्ही निघालो. फोटो काढायची हौस असल्यामुळे स्वयंचलित कॅमेर्यात नेहमी रोल असे. पण दुर्दैवाने घरून निघतानाच कॅमेरा न्यायचे सुचले नव्हते. संगणक कसा असतो हे तो देखावा पाहणार्यांना कळले. नंतरच्या काळात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, भारतीय संसद भवन, बंगलोरचे विधान भवन अशा सुप्रसिद्ध वास्तूंच्या देखण्या प्रतिकृती गणेशोत्सव्यात दिसू लागल्या, तर काही प्रागतिक मंडळे ‘झाडे वाचवा’, ‘पर्यावरणाचा र्हास थांबवा’ असे सामाजिक संदेश देखाव्यातून देऊ लागले. वाहतुकीच्या लाल दिव्यापलीकडचा यमराजदेखील कुठेतरी होता.
सार्वजनिक म्हटले की माणसे आलीच. चार माणसे जमली की स्वार्थ, हेवेदावे, राजकारण, अन्याय, धुसफुस, दांडगाई हे आलेच. ते कोणालाही चुकणार नाही. पण सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे फक्त ‘वर्गणीसाठी दांडगाई, विसर्जनाच्या उपद्रवी मिरवणुका, वाहतुकीचा खोळंबा आणि भयंकर प्रदूषण’ एवढेच नाही. पुलंच्या भाषेत विसर्जनात सर्जन आहे. यात तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळतो हे नक्की. बुद्धीला आणि सर्जनशीलतेला चांगले वळण मिळते, गुन्हेगारीकडे वळू पाहणारी काही सर्जनशील पावले नकळत विधायक कार्याकडे वळतात. संघटकांच्या व्यवस्थापन कौशल्याला चालना मिळते. शिवाय त्यामुळे समाजाची, देशाची अर्थव्यवस्थाही प्रवाही राहते.
कालांतराने देखाव्यात यांत्रिक हालचाली आल्या. ही आपल्या रोबॉटिक्सची पहाट असावी. आता तर शाळकरी मुलेसुद्धा ‘आर्ड्युआनो’, ‘रॉसबेरी पाय’ वगैरे साधने वापरून विविध प्रदर्शनांतून यांत्रिक करामती करून दाखवतात. काही भारतीय मुलांनी आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनातल्या स्पर्धा वा निबंधस्पर्धा जिंकल्याचे आपण पाहतो. चौदा विद्या आणि चौसष्ट कलात आता संगणक आणि रोबॉटिक्स यांची भर पडून पंधरा विद्या आणि पासष्ट कला झाल्या आहेत. नुसते दोष दाखवणे कोणालाही जमेल. पण ते दूर करायचे व्यावहारिक असे अभिनव मार्ग दाखवणे महत्त्वाचे आहे. विसर्जनाच्या जलस्रोत दूषित करणार्या संकल्पनेला डिजिटल व्हर्च्युअल पर्याय उपलब्ध करून, या पर्यायाला ग्लॅमर देऊन हळूहळू बदलायला हवी. धडाक्याने बदलू गेले तर विरोध होऊन सारेच ओम् फस होऊ शकेल. सुधीर कांदळकरने केले तर कुत्रादेखील बघणार नाही. पण करिश्मांकित, वलयांकित अमिताभ बच्चनने केले, मा. मुख्यमंत्र्यांनी केले, मा. सेनाप्रमुखांनी, मा. राजसाहेबांनी, मा. पवारसाहेबांनी वा मा. सरसंघचालकांनी केले तर लाखोंच्या संख्येने एकगठ्ठा अनुयायी मिळतील आणि (कदाचित ‘बंद’ होतो तसे जबरीने वा हडेलहप्पीने का होईना, पण) विधायक परिवर्तन जलद घडेल. परंतु प्रतिगामी स्वयंघोषित संस्कृतिरक्षक असे घडू देतील का?
मोजके अपवाद वगळता गणेशोत्सवात काय, आंबेडकर जयंतीला काय, नानक जयंतीला काय वा ईदला काय, हजारो माणसे एकत्र जमली तरी गुन्हे फारसे घडत नाहीत, याचे मला कौतुक वाटते. असे होऊ शकते, कारण या समुदायातील प्रत्येक भाविकाच्या मनातली श्रद्धा, शांतिप्रियता आणि मानवतेवरचा विश्वास. असे असले, तरी समाजातले विचारवंत या उत्सवांच्या सादरीकरणातले जे दोष दाखवतात ते काढून टाकणे अत्यावश्यक आहे हेही खरेच. खासकरून रुग्ण, अतिवृद्ध आणि अपंग तसेच गर्भवती स्त्रिया आणि अर्भके यांची गैरसोय टाळणे अत्यावश्यक आहे. गणेशोत्सव तसेच उपरोल्लेखित इतर उत्सवांच्या मंडळांनी आपल्या कार्यकक्षेतील अशा कमकुवत गटातील व्यक्तींची उत्सव सुरू करण्यापूर्वीच नोंद ठेवली पाहिजे आणि उत्सवकाळात त्यांच्या खाजगी आयुष्यात अधिक्षेप न करता त्यांना चोवीस तास सुरक्षा, तसेच दिवसातून ठरावीक वेळा निदान फोनवरून त्यांची चौकशी करून जरूर असेल तेव्हा जरूरीप्रमाणे वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका आणि इतर आवश्यक असतील त्या सेवा पुरवल्या पाहिजेत. इमारतीतल्या अशा एखाद्या कुटुंबाला दिवसाला चार चार तासांच्या पाळ्या लावून आलटून पालटून अकरा दिवस सेवा देणे निदान बहुमजली सहनिवास इमारतीत तरी अशक्य नाही. अधूनमधून मॉक ड्रिल्सच्या रूपात चाचण्या घेणेदेखील आवश्यक आहे. अथा तो लेक्चरबाजी.
भाईंदरला आमची इमारत रस्त्याला खेटून. नवघर रोड हा अतिवाहता रस्ता. सज्जातून रस्त्यावरची गंमत दिसे. संध्याकाळी चारच्या सुमाराला अनंतचतुर्दशीच्या गणेशविसर्जन मिरवणुकींमुळे कमालीचा गोंगाट आणि कोलाहल सुरू होई. इमारतीचे सज्जे हाऊस फुल्ल होत. फोन आला तर आम्ही तिसरा मजला सोडून तळमजल्यावर राहायला गेलो, असे फोनपलीकडच्याला वाटे. सौ. आणि चि. अर्थातच सज्जात मिरवणुकीची गंमत बघत. वॉकमनचे शीर्षध्वनी हे कर्णस्त्राण म्हणूनदेखील उपयुक्त असतात, हा शोध मला लागला होता. मी दारे-खिडक्या बंद करून कानांना कर्णस्त्राणे लावून वॉकमनवर गाणी ऐकत मस्त वाचन करीत असे. आमच्या शेजारी एक शीख कुटुंब राहत असे. भाभीजी मिस्कील होत्या. जोरजोराने दरवाजा ठोठावत. कर्णस्त्राणातूनही ऐकू येईल एवढ्या जोरात. दरवाजा उघडला की आत घुसून खिडक्या उघडून पुस्तक खाली ठेवलेले असेल तर ते उचलून जप्त करायच्या. आणि ‘नीचे तो देखिये, कितनाऽऽ मझा है, किताब रखिये और आऽऽप भी इस मझे का लुत्फ उठाऽऽइये. आप पढते हैं तो हमाऽऽरा सर दर्द करता है’ असे म्हणायच्या. एक तर हल्ला अनपेक्षित आणि मला त्यांचे पंजाबी ढंगाचे हिंदी फारसे कळत नसे. माझ्या थोबाडावर अकरा एकोणसाठ. अर्थातच ही धमाल बघायला त्यांच्याभोवती आजूबाजूची बायकामुले असतच. मग मला पुस्तक परत देऊन ‘नाराज नाऽऽ होना भाईसाऽऽब’ म्हणून दिलगिरी व्यक्त करून ‘चलिये, परशाऽऽद तो खाइयेऽऽ’ म्हणून हातावर प्रसादाचे पेढे ठेवून भाभीजी माझी नाराजी कमी करीत. इमारतीतलीच हन्साबेन आणि तिचे दोन मोठे शाळकरी मुलगे संजू-राजू बघ्यांमधून होऽऽ करून टाळ्या पिटत. या भाभींना मस्का मारून असे करायला तेच भरीला पाडत. अर्थातच आमच्या सौ.ची देखील याला फूस असावी. असे दोनतीन वर्षे तरी झाले. नंतर त्यांनी (आम्हांला विटून?) घर बदलले. नंतर आम्ही घर बदलले.
भाईंदरला आमच्या समोरची इमारतदेखील रस्त्यापलीकडे रस्त्याला खेटूनच. त्या इमारतीत चौथ्या मजल्यावर एक मध्यमवयीन जोडपे राहत असे. हा उत्साही, दिलदार मराठी माणूस बीपीसीएलमध्ये बर्यापैकी हुद्द्यावर होता. त्याची गुजराथी बायको नोकरीबिकरी करीत नसे. मूलबाळ नव्हते. दोघेही फार उत्साही आणि हौशी होती. अनंतचतुर्दशीच्या दिवशी सकाळी घरात स्वखर्चाने अक्षरशः शेकडो पाव, पोतेभर बटाटे, सोबत बेसन, मिरच्या-कोथिंबीर, तेलाचे डबे वगैरे घरात आणून ठेवी. दुपारचे जेवण झाल्याबरोबर बायको कामाला लागे. तीन वाजले की त्याच्या इमारतीतली एकदोन मुले त्याच्या सज्जात जमत, तर एकदोन मुले रस्त्यावर उभी राहत. बायको आणि कामवाल्या ताई वडे तळत. मुले पावात चटण्या भरून वडापाव बनवीत आणि वर्तमानपत्रात एकेक गरमागरम वडापाव बांधून पुड्या बनवत. मिरवणूक आली की वरून पिशवीभर पुड्या दोरीने खाली सोडत. कधी मुले खालच्या मुलांकडे वडापावाच्या पुड्या फेकत आणि ती क्रिकेट खेळणारी मुले अचूक झेल घेत. खालची मुले मिरवणुकीतल्या माणसांना पुड्या वाटत. हंडी फोडत फिरणार्या गोविंदांनादेखील तो असाच वडापाव वाटत असे. दुसर्या दिवशी त्याचा चमू इमारतीसमोरचा रस्ताही स्वच्छ करीत असे. ईश्वरसेवा करणार्या लोकांची सेवा हीदेखील ईश्वरसेवाच, अशी त्याची श्रद्धा होती. हौस म्हणजे हौस. त्याच्या सश्रद्ध हौशीच्या श्रीमंतीचे कौतुक वाटते.
मालाडला जाईपर्यंत माझा ‘भाईसाब’वरून ‘काका’ असा उद्धार – चुकलो – अपग्रेडेशन - झाले होते. सहनिवासाच्या खाजगी बसमध्ये कळले की ‘लालबागचा राजा’ एक जागृत देवस्थान असून तिथे मोठी रांग असते. बसमधील तरुण-तरुणी "काका, तुम्हाला ‘राजा’चे दर्शन घ्यायचे असेल तर सांगा, आपली ओळख आहे, दहा मिनिटात दर्शन घडवू" असे माझ्या कुंतलरंग हरवलेल्या कल्ल्यांकडे पाहात सांगत. आपुलकीच्या त्या आमंत्रणाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानत असे. जरी सश्रद्ध असलो, तरी असा रांगेची शिस्त मोडून नक्कीच गेलो नसतो हा भाग वेगळा. पण सार्वजनिक गणेशाच्या प्रसादाच्या स्वरूपात पुढे आलेले पेढेमोदक मी ऑफिसच्या बॅगेतल्या डब्यात ठेवीत असे. कुठे बनलेले कशाचे बनवलेले असतील आणि किती हातातून फिरलेले असतील कोण जाणे. पावसाळ्यात उगीच पोटबीट बिघडायचे. मालाड रेल्वे पुलाखाली गायवाली बसे. अजूनही बसत असेल. ओळखीचे कोण पाहत नाही असे पाहून हळूच त्या गायीला असा जमवलेला प्रसाद कधीतरी मी घाऊक स्वरूपात देत असे. कोणी घरच्या गणपतीलादेखील बोलवत.
गणेशोत्सव काळात आकस्मात कोण कुठे भेटेल आणि घरच्या गणपतीला आग्रहाने बोलवेल काही सांगता येत नाही. ’नाहीतर तुम्ही इथे पुन्हा कधी येणार?’ असा आग्रह काही तुसडेपणाने टाळता येत नाही. गणपतीला गेले की एक बरे असते. समोर फराळ आला की कशाला, कशाला म्हणून खोटे आढेवेढे घ्यावे लागत नाहीत. परंतु एखाद्या घरी जावे की न जावे हा निर्णय त्या घरातील स्वच्छता आणि पाकनैपुण्य कसे आहे या बाबतीतला आपल्या अनुभवाचा बोल ऐकून घ्यावा. नाहीतर रसनेला आणि उदराला बोल लावावा लागेल. एखाद्या घरी भाविकांची गर्दी असतानाच जावे. भाविकांच्या गर्दीत ‘दर्शन घेतले का’ म्हणून विचारले तर हो म्हणावे आणि ‘फराळ मिळाला का’ म्हणून विचारले तर स्वच्छता, पाकनैपुण्य वगैरे पाहून धोरणीपणे हो वा नाही म्हणावे आणि हो असेल तर समोर आलेला फराळ देवाचा प्रसाद म्हणून मनसोक्त झोडावा, अशी माझी अनाचारसंहिता आहे. असेच आमच्याच सहनिवासी संकुलात एकदा एका घरी जावे लागले. अनपेक्षितपणे कुठे गेलो तरी मी माझ्या हवेतल्या रथातूनच जातो. त्या घरी बोलावणार्या वात्रट किशोरीची मी "हे बरं आहे, फराळ न देता मिळाला का म्हणून विचारायचं. असं करू नकोस बरं, नाहीतर गणपती चकणा नवरा देईल हं तुला!" अशी अनवधानाने (श्रीगणेशाची क्षमा मागून) फिरकी घेतली होती. पण नवी पिढी फारच चलाख आहे. "काका, गणपती मला चकणा नवरा देईल तो तुम्हाऽऽला प्रसाद दिला म्हणून हो!" अशी माझीच टोपी उडवत तिने मला फराळ दिला होता. "माझ्या सान्निध्याने मुलेमाणसे अशी हुशार होतात बरे का!" असे म्हणून मी तिला त्वरित कौतुकाने कुर्निसातही केला होता. पण पुढे "तरीही तू चुकते आहेस बालिके, मी पुण्यवान असल्यामुळेच देवाने वीस वर्षांपूर्वीच मला 'प्रसाद' दिला आहे, हे विसरू नकोस" असे तिला दटावलेदेखील. आमच्या चिरंजीवाचे नाव प्रसाद आहे. असे फुटाणे दहाबारा दिवस सर्वत्र फुलत असतात.
गणेशविसर्जन मिरवणुकीत एक चांगला बदल घडलेला आहे. पूर्वी काही धटिंगण गुंड मिरवणुकींबरोबर दारूच्या नशेत असत आणि रस्त्यावरून जाणार्या बसच्या खिडक्यांमधून आत गुलाल फेकत. खासकरून सुंदर मुलींच्या दिशेने. मी एकदा बसमध्ये असताना असे घडले. गुलाल टाकणार्याला एका प्रवाशाने "तू येऊन दाखव, बसमध्ये किती माणसे आहेत ते बघ, कसा आपल्या पायावर चालतोस ते पाहतो" असे आव्हान दिले होते, ते आठवते आहे. शिवाय मिरवणुकीत सहभागी होणार्यांच्या अतिउत्साहाने मिरवणुका मंदगतीने चालत. पोलिसांच्या कडक कृतींमुळे हे अपप्रकार अगोदर कमी झाले. नंतर पोलिसांनी उत्सव समित्यांबरोबर बैठका घेऊन सौजन्यसंहिता पाळण्याचे आवाहन केले. आता मिरवणुकींवर जातीय अतिरेक्यांचे हल्ले होऊ शकतात या भीतीने मिरवणुकीच्या कडेने तगडे लाठीधारी संरक्षक स्वयंसेवक असतात. हे स्वयंसेवक मिरवणुकीतील गुंड आक्रमकांना असे अपप्रकार करूं देत नाहीत. शिवाय हल्ल्याच्या भीतीने मिरवणुका जलद चालतात आणि वाहतुकीचा फारसा खोळंबा न करता सोहळा लवकर संपतो. वाईटातून चांगले निघते ते असे. आता विसर्जनाच्या दिवशी रस्त्याच्या दुतर्फा अनेक सधन भाविक उत्स्फूर्तपणे सेवा केंद्रे उभारून स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याची, चहाची तसेच पोहे, बटाटेवडे इ. खाद्यपदार्थांची विनामूल्य सोय करतात. सधन नसलेले भाविक या केंद्रांवर विनामूल्य सेवा देतात.
आज मुंबई पोलिसांना गणेशोत्सवातले अकरा दिवस अविरत काम करावे लागते. दोनदोन चारचार दिवस घरी राहायलाही मिळत नाही. घर दिसते ते स्नान करून कपडे बदलण्यापुरते. पण त्यांची गैरसोय मात्र कधी होत नाही. कारण आता त्यांचे घर बनलेले असते अखिल मुंबई. एखाद्या रिकाम्या घरात, नाहीतर गणेशोत्सवाच्या मंडपात त्यांच्या चहापाण्याची, न्याहारीची, जेवणाखाण्याची, वामकुक्षीची, झोपण्याचीही सोय ईश्वरकार्य समजून भाविक मनोभावे करतात आणि गुन्हेही घडू देत नाहीत. मुंबईतल्या गणेशोत्सवातल्या काही सक्रिय गणेशभक्तांचे विस्तारित कुटुंब - एक्स्टेन्डेड फॅमिली इतके विस्तृत वा एक्स्टेन्डेड असते की त्यात पोलिसांबरोबर खाजगी सुरक्षा रक्षक, पोस्टमन, पालिका सफाई/पाणीपुरवठा खाते कामगार इ. सेवकदेखील येतात. निदान लोकसंख्येचा मोठा भाग असलेल्या कनिष्ठ मध्यमवर्गात तरी जातीयतेच्या, प्रांतीयतेच्या, सीमा तब्बल अकरा दिवस तरी पुसून टाकणारे हे निरीक्षण मुंबईपुरतेच आहे.
आता या लेखावर शेवटचा हात फिरवतांना मी स्मृतिगंधाने भारून गेलेलो आहे. सौ चित्रवाणीवर फेरफटका - चॅनल सर्फिंग - करता करता अचानक एका वाहिनीवर थबकली. ओ.पी. नय्यर त्यांच्या डौलदार ठेक्याच्या अमर मेलडीतून रेशीमधारा सांडत माझ्या अंगावरून मोरपिसे फिरवत माझा रथ जमिनीपासून आणखी दोन अंगुळे वर नेत आहेत आणि आशाताईंच्या स्वर्गीय स्वरांतून सांगताहेत -
लिख दो किताब-ए-दिल पे कोई ऐऽऽसी दास्तां,
जिसकी मिसाऽल दे न सकें साऽऽत आसमां
ही फर्माइश शिरसावंद्य आहेच. पण माझ्या जिव्हाळ्याच्या मुंबईतली ‘दास्तां’ आधीच ‘दिल पे’ लिहिलेली होती. त्यातले ‘थोडेसे किंवा भरमसाट’ (हा जाड्याचा शब्दप्रयोग) इथे दिले. अशा या उत्कट क्षणी सर्व वाचकांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून हे (शेवटी वेळ फुकट गेला म्हणून मला श्या न घालता?) वाचल्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन हा लेख इथे संपवतो.
प्रचि श्रेयनिर्देश : आंतरजालावरून साभार.
प्रतिक्रिया
6 Sep 2019 - 9:11 am | यशोधरा
वा! फार सुरेख!
आयुष्य श्रीमंत करणाऱ्या आठवणी!
आम्हांलाही ह्यात सहभागी करून घेतलेत, आभार!
6 Sep 2019 - 9:45 am | महासंग्राम
सुंदर आठवणी
बाकी आमची ९० च्या दशकातली पिढी याबाबतीत दुर्दैवी आम्हांला समजेपर्यंत कथाकथन, गायन मैफिल वगैरे प्रकार सार्वजनिक गणेशोत्सवातून कमी होते आणि त्याची जागा VCR आणून चित्रपट पाहणे यांनी घेतली होती. आता तर ते हि बाद झालं फक्त संगीतखुर्ची तेवढी उरली
6 Sep 2019 - 9:53 am | कुमार१
आठवणी मस्त आहेत.
>>>>>> अगदी ! आमच्या कॉलेजमध्येही यांचे आणि वपुंचे कार्यक्रम नियमित होत असत. त्याकाळी भारावून जात असे.
>>>>
आमच्या घरी वर्षातून २ चित्रपट हा नियम होता. एक उन्हाळी व दुसरा दिवाळी सुटीत. शाळा-कॉलेज चालू असताना चित्रपट निषिद्ध !
या दबणुकीला मी इंटर्नशिपमध्ये वाट मोकळी करून दिली. ग्रामीण भागात आम्ही ६ महिने होतो. तिथे दर आठवड्याला नवा चित्रपट येई. त्याकाळात कॉलेज जीवनात राहून गेलेले सर्व अधाशासारखे बघून टाकले.
6 Sep 2019 - 10:36 am | टर्मीनेटर
सुधीरजी तुमच्या आठवणींच्या पेटाऱ्याच्या डायमेंशन्स काय आहेत ते सांगाल का?
मला त्या अमर्याद लांबी x रुंदी x उंची अशा असाव्यात असे वाटतंय.
वर यशोधरांनी म्हंटल्या प्रमाणे "आयुष्य श्रीमंत करणाऱ्या आठवणी!"...
खूप छान लिहिलंय 👍 मजा आली वाचायला!
6 Sep 2019 - 11:46 am | अनिंद्य
@ सुधीर कांदळकर,
सुंदर स्मरणरंजन - स्मरणगुंजन ! आठवणींचा सुंदर गोफ विणलाय तुम्ही.
लेखातील विद्याधर गोखल्यांचा उल्लेख बाबांना वाचून दाखवला आणि त्यांच्याही आठवणींचा धबधबा कोसळला. रविवार लोकसत्तातले त्यांचे लिखाण बाबा हमखास वाचत, उर्दू भाषेवरचे गोखल्यांचे प्रभुत्व, योग्य जागी उर्दू शायरी पेरण्याचे कसब याबाद्दल बोलले, भरभर अनेक दाखले दिले.
तुमच्या लेखामुळे माझा दिवस साजिरा झाला.
अनेक आभार !
6 Sep 2019 - 12:06 pm | मूकवाचक
_/\_
6 Sep 2019 - 1:26 pm | पद्मावति
अप्रतिम लेख. फारच सुरेख.
6 Sep 2019 - 2:43 pm | सोत्रि
झक्कास !आठवणीचा खजीना बालपणीचा काळ डोळ्यापुढे नाचवून गेला.
-(गणपतीत पड द्याच्या उलट्या बाजूने सिनेमे पाहिलेला) सोकाजी
6 Sep 2019 - 4:00 pm | सुधीर कांदळकर
धन्यवाद.
@ डॉ. कुमार१, टर्मिनेटर, सोत्रि: सिनेमा पाहाण्यावर बंधन असलेले, कथाकथनाचा आनंद लुटणारे, पडद्यामागून सिनेमा पाहणारे कुणीतरी आहेत हे वाचून फार बरे वाटले.
@अनिद्यजी: तीर्थरूपांना माझा प्रणाम सांगा आणि धन्यवाद पोचवा.
@यशोताई, महासंग्राम, मूकवाचक आणि पद्मावती तुमच्या प्रोत्साहनामुळेच लिहावेसे वाटते.
पुनश्चः सर्वांना धन्यवाद.
6 Sep 2019 - 5:30 pm | चौकटराजा
१९५० सालच्या दरम्यान जन्माला आलेली आमची पिढी जगाच्या इतिहासात भाग्यवान आहे असा माझा ठाम दावा आहे. खरे तर आम्ही १९४० च्या दरम्यान जन्माला येतो तर या भाग्ययोगात आण्खी भर पडली असती. असो.सदरचे निवेदन मला माझ्या तारुण्यात घेउन गेले. १९६० ते १९७५ या काळात मिळेल त्या जागी जाउन सिनेमा पहायचा हे एक ध्येय असायचे .मग व्ही सी आर आले . यातील माणिक वर्मा, भीमसेन जोशी, वपु यान्च्याशी प्र्त्यक्श बोलण्याचा योग देखील आला. जोगकंस माणिक वर्मा, अभोगी भीमसेन जोशी ही नाती अतूट अशी होती. धूल का फूल या सिनेमात "नन्हासा दिल मेरा मचल मचल जाय" हे गीत वाटव्यांच्या " फान्द्यावरी बान्धैयले मुलीनी हिन्दोळे " या गीतवरून दत्ता नाईकानी बान्धले. निरागस ,नितळ स्वभावाचे मिश्कील गजानन वाटवे हे मी पाहिलेल्या काही अविस्मरणीय माणसापैकी एक . मन हलहळायला लागले की म्हातारपण आले असे समजावे असे म्हणतात पण आजच्या प्रगतीशील ,विस्मयकारी भारतापेक्षा तो सुखसंवाद असलेला भारत देश अधिक स्मरणीय वाटतो. सुधीर जी नी " त्या भाग्यवान पिढिच्या शिलेदाराची भूमिका मस्त वाठवली आहे . खरे तर भूमिका कल्पनेने साकारलेली असते हे तर त्यानी प्रत्यक्ष अनुभवले आहे !
6 Sep 2019 - 7:54 pm | सुधीर कांदळकर
इथेही आहे हे पाहून बरे वाटले. माणिक वर्मा - जोगकंस आणि भीमसेनजी - अभोगी हे अगदी खरे.
नन्हासा दिल मेरा हे धूलका फूल मधले आहे आणि एन दत्तांनी वाटव्यांचे गाणे नेले हे ठाऊकच नव्हते. मला फक्त सुरावट जाणवली होती.
बिसमिल्ला खां आणि व्हीजी जोग हे तर बहार आणीत. जोग मधूनच व्हायोलीनवर दादिडदाडासारखा झाला वाजवीत. 'तुमसे नाम हो सजनी' मधल्या मारुबिहागाची धून ही दोघांची मिळून ओळख बनली होती. कोणतेही नक्षीकाम करतांना मधूनच एखादी अनपेक्षित अशी जीवघेणी मींड घेत की ज्याचे नाव ते. दोघांचे सवाल जबाब तर लाजबाब असत. विरंगुळा म्हणून ते एकमेकांची स्वतःच्या वाद्यावर नक्कल द्खील करीत. कधी दिलका खिलौनाची पण फर्माईश होई.
चौरासाहेब आठवणी जागविल्यात. आता यावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागणार. अनेक अनेक धन्यवाद.
7 Sep 2019 - 10:33 am | चौकटराजा
मी एक रसिक म्हणून दोनच कलावंताच्या वाकून पाया पडलो अर्थात इतर अनेक कलावंताविषयी प्रचंड आदर असूनही। ते दोना कलावंत म्हणजे वायलिन वादक पं। व्ही जी जोग यांच्या पाया चैतन्य हॉल चिंचवड येथे तर ओ पी नय्यर यांच्या पाया पडलो त्यांचे " शारदा " या निवासस्थानी !
6 Sep 2019 - 9:55 pm | जालिम लोशन
लिखाणाची सुदंर शैली
7 Sep 2019 - 8:26 am | ज्ञानोबाचे पैजार
स्मरणगुंजन आवडले आणि वाचता वाचता मीही माझ्या लहानपणीच्या आठवणीत रमून गेलो.
आमच्या घरा जवळ गणेशोत्सवात रस्त्यावर कापडी पडदा उभा करुन त्या वर सिनेमा दाखवण्याचा कार्यक्रम असायचा.
मी सिनेमा पहायला पडद्याच्या दुसर्या बाजूची जागा पकडायचो. बघताना खुप मजायायची कारण इथे उजवा माणूस डावरा दिसायचा.
"मै तुलसी तेरे आंगन की" "कश्मीर की कली" "डॉन" असे अनेक सुपरहिट सिनेमे मी या पडदा थेटर च्या दुसर्या बाजूने पाहिले आहेत.
रच्याकने :- मुंबई गणेशोत्सवात होत असलेले सकारात्मक बदल वाचून बरे वाटले. या बाबतीत आमचे पुणे चार पावले मागेच आहे.
पैजारबुवा,
7 Sep 2019 - 8:48 am | दुर्गविहारी
बालपणीच्या बर्याच आठवणी जागवून गेलेला धागा. अर्थात यातील बर्याच गोष्टी मी अनुभवल्या नाहीत. पण लिखाण मनाला भावले. छान !
7 Sep 2019 - 12:11 pm | तुषार काळभोर
आमचं उत्पादन ऐंशीच्या मध्यातलं.
नव्वद्दीच्या आधी आम्ही मुंढव्यात राहायचो. आता ती जागा मगरपट्टा सिटीच्या मागच्या बाजूला आहे. तेव्हा घरचे गणपती 'बघायला' पुण्यात जात नसत. फक्त घरात गणपती असायचा.
९१ला आम्ही हडपसरला आलो. आणि साधारण ९२-९३ नंतर आम्ही 'पुण्यात' गणपती बघायला जाऊ लागलो.
(अवांतर - त्यावेळी हडपसर महानगरपालिकेत असलं तरी हडपसर हे गावच होतं- हे गाव अजूनही तसंच आहे- आताच्या भोसले गार्डन, मगरपट्टा ससाणेनगर भागात पूर्ण शेती होती. बहुतेक सगळी बागायत. शहर आणि हडपसर यांच्या मध्ये 'कॅम्प' असल्याने शहरापासून तुटक भाग होता. त्यामुळं कॅम्पाच्या पलिकडच्या भागाला 'पुण्यात जाणे' असं म्हणायची सवय लागली).
९६-९७ मध्ये मी हट्ट करून आणि ५-६ मित्र गोळा करून एक 'बाल मित्र मंडळ' स्थापन केलं. आम्ही रीतसर वर्गणी पुस्तक छापून घेतलं होतं. बाकी छोटी मंडळं तयार बिनानावाची पुस्तकं आणायची. त्यामुळं आम्हाला पाच ते दहा रुपये वर्गणी सहज मिळायची. एकून जमा वर्गणी पाचशेच्या आसपास व्हायची. मग पहिल्या वर्षी आम्ही वासे विकत आणले. दुसर्या वर्षी लोखंडी पत्रे. असं करत २००९ मध्ये जवळचं एक छोटं दत्त मंदीर 'टेकओव्हर' केलं. तेव्हापासून ते आमच्याच मंडळाच्या व्यवस्थापनात आहे. ते सुधारलं. आता तिथं सप्टेंबर मध्ये गणेशोत्सव आणि डिसेंबरात दत्त जयंती साजरी करतो. उद्या गणेशोत्सवातील सत्यनारायण पूजा आहे.
असो. तर १९९९ ला दहावी पर्यंत घरच्यांसोबत जाणं व्हायचं. घरून संध्याकाळी सातला निघायचं. पुलगेटला गाडी लावून रिक्षाने लक्ष्मी रस्त्याने शक्य तेव्।ढं पुढं जायचं. बारा-साडेबारापर्यंत देखावे बघून परत घरी यायला दीड-दोन वाजायचे. तेव्हा हडपसर मध्ये ही हलते देखावे, म्युझिकच्या तालावर नाचणारी रोषणाई खूप मंडळं करायची. नव्या सहस्रकात कार्यकर्त्यांचा देखाव्यातला उत्साह कमी झाला अन त्यांना विसर्जन मिरवणूकीत उत्साह वाटू लागला. आता एकही मंडळ देखावा करत नाही. केवळ मोठा मांडव. त्यात एक मोठी मूर्ती. एक छोटी मूर्ती. दोन मोठे स्पीकर्स. दिवसभर गणपतीची गाणी. आणि एक स्पीकर्सची भिंत असलेली विसर्जन मिरवणूक.
पुण्यात पण आता देखावे फारसे नसतात. तिथंही मुख्य आकर्षण आणि मुख्य उत्साह विसर्जन मिरवणुकीवर केंद्रित झालाय.
आता मी बायको आणि मुलाला घेऊन जातो. सातला निघायचं. लाल महालाच्या जवळ गाडी लावायची. मग कसबा-दगडूशेठ-मंडई-तुळशीबाग-नातूबाग-(शनिपारच्या मागे एक मंडळ अजूनही देखावे करतं- मग बहुतेक तुळशीबागेतल्या अगत्य की अक्षय नावाचं हॉटेल आहे, तिथं जेवण. मग दहा-साडेदहापर्यंत घरी.
मुलाला प्रश्न पडत असेल- यात एवढं विशेष काय आहे!
7 Sep 2019 - 10:18 pm | सतिश गावडे
अगत्य प्युअर व्हेज. छान जेवण असते इथले. (कदाचित अबक, मंडई आणि तुळशीबागेतील तंगडतोडीनंतर इथे पोटात जाणारे दोन घास आपोआपच गोड लागत असतील. :) )
7 Sep 2019 - 12:13 pm | सुधीर कांदळकर
वा! चौरासाहेब वा!! मी मात्र बॅकबेंचर. दूरच राहात असे. कारण मग टिंगलटवाळी करता येते.
जालीम लोशन, दुर्गविहारी धन्यवाद.
@ज्ञापै आणि सोत्रि: पडद्यामागून सिनेमा पाहणे आवडले. आत्ता अचानक आठवले. मुंबईत भारतमाता सिनेगृहात एकदा दोन आरसे बसवले होते. तिथे मी कुंकवाचा करंडा हा चित्रपट पाहिला. आता नीट आठवत नाही पण त्यामुळे बाल्कनीतून पण आरशावरचा पडदा जवळ दिसे. पण दोन आरसे वापरल्यामुळे डावेउजवे बदलत नसे. चित्रपटापेक्षा आरशांचेच कौतुक होते. नंतर अल्पकाळातच ते आरसे काढून टाकले.
7 Sep 2019 - 12:25 pm | श्वेता२४
छान लिहीलंय
7 Sep 2019 - 12:27 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
छान आठवणी जागवल्यात.
7 Sep 2019 - 4:04 pm | जव्हेरगंज
7 Sep 2019 - 7:58 pm | प्रचेतस
आपले लेख वाचायला नेहमीच आवडतात.
तुमच्या स्मरणांद्वारे जुन्या काळची मस्त सफर घडवलीत. धन्यवाद.
7 Sep 2019 - 9:27 pm | मायमराठी
वाचनाने तृप्त होता येतं का? या प्रश्नाच्या होकारार्थी उत्तराचं प्रात्यक्षिक हा लेख मानतो. आपण एवढं ओघवतं लिहीत गेलात आणि आम्हाला त्या त्या काळांत नेऊन पुढे पुढे सरकवत ( रांग न लावता) आपल्या समृद्ध शैलीत बाप्पांचे आणि तत्कालीन समाजाचे दर्शन घडवलंत. जास्त लिहून आपल्या लिखाणाच्या ऐश्वर्याने मनांत उमटलेलला छाप माझ्याच शब्दांनी बिघडवत नाही.
आपल्या "कुंतलरंग गेलेल्या कल्ल्यांत .."अजून खूप काही दडलंय. ते जाणून घ्यायला आवडेल __/\__ .
7 Sep 2019 - 10:11 pm | सुधीर कांदळकर
धन्यवाद.
पैलवानजी, श्वेता२४, गौरीताई, जव्हेरगंज आणि प्रचेतस अनेक अनेक धन्यवाद.
@मायमराठी: आपला प्रतिसाद देखील श्रीमंत आहे. अनेक अनेक धन्यवाद.
@ज्ञापै आणि सोत्रि:भारतमातामधला आरसेपडदा. जवळजवळ ४० वर्षांच्या कालावधीत आठवणीतले तपशील हरवले होते. एकच आरसा होता. मुख्य पडदा बाल्कनीसमोर होता. आणि पडद्यामागची प्रतिमा पुढील रांगासमोरच्या आरशातून दिसे.
7 Sep 2019 - 10:13 pm | सतिश गावडे
सुंदर लिहीलं आहे काका. इतकं ओघवतं आहे लेखन की वाचताना वाटत होतं आपण त्या काळात वावरत आहोत. तुम्ही मुंबईतील गणेशोत्सवातील बदलांचं वर्णनही छान केलं आहे.
मी कोकणातून पुण्यात राहायला येण्याच्या आधी पुण्यातील गणेशोत्सवबद्दल खूप ऐकलं होतं. मात्र पुण्यात येऊन गणेशोत्सव पाहील्यावर घोर निराशा झाली. पुण्यातील गणेशोत्सव म्हटलं की फक्त कानठळ्या बसवणारे ढोल-ताशे वादन, कर्णकर्कश आवाजात वाजणारी (आणि देवभक्तीशी दुरान्वयानेही संबंध नसणारी) गाणी आणि ह्रदयाची कंपनं वाढवणार्या डिजेच्या भींती हेच आठवतं. आणि यात कुणालाच काही गैर वाटत नाही. जणू काही हीच संस्कृती आहे आणि हीच देवभक्ती आहे.
7 Sep 2019 - 10:29 pm | राजेंद्र मेहेंदळे
वा सुधीरजी
दादरच्या/मुंबईच्या गणेशोत्सवाची मस्त सफर घडवुन आणलीत. हे वाचुन माझ्या लहानपणी/तरुणपणीच्या कल्याणातील आठवणी जाग्या झाल्या.
उत्सवाच्या दोन महिने अगोदरपासुन मंडळांच्या बैठकी, पदाधिकारी निवड, मग वर्गणी जमविणे, देखावा कोणता करायचा ही चर्चा, ठरलेल्या मुर्तीकारांकडुन हवी तशी मुर्ती बनवुन घेणे, एक आठवडा आधी मंडप उभारणे ह्या सगळ्याची धांदल चालु व्हायची.
ऐंशीच्या सुमारास घरोघरी टी.व्ही. आला नव्हता, त्यामुळे दहीहंडी, शिवजयंती, गणपती उत्सव, दिवाळी, नवरात्र ह्या दर्दी प्रेक्षक श्रोत्यांसठी पर्वणी असायच्या. प्रत्येक मातबर मंडळांचे वेगवेगळे कार्यक्रम असायचे. कार्यक्रम पत्रिका बघुन रोज कुठे जायचे ते ठरवायचे. सुभेदार वाड्याचा गणपती म्हणजे गावचा गणपती. तिथली पत्रिका ८० टक्के जाहिरातीनी भरलेली असायची. अगदी त्या जाहिराती देखील कुतुहलाने वाच ल्या जायच्या. पानभर जाहिरात देणारा मोठा मातबर समजला जाई. मराठी गाण्यांचा कार्यक्रम असेल तेव्हा सर्वात जास्त गर्दी होई. वाड्याचा चोउक भरुन जाई. नंतर क्लोज सर्कीट टि.व्ही. आले. मग गांधी चौकात सतरंज्या टाकुन बसायची सोय केली जाई.
एक रात्र गणपती बघायचा प्रोग्राम असे. ग्रुपने गावभर फिरत रात्रभर गणपती बघायचे. जरीमरी, लक्ष्मी मार्केट, गोकुळपुरा,महाजन वाडी, कासार हाट अशा ठिकाणी विशेष गर्दी असे कारण दरवर्षी काहीतरी नवीन आयडिया लढवुन देखावे (बहुधा हलते) केले जात. काहि मंडळे मात्र सुंदर मुर्तींकरीताच प्रसिद्ध होती. कल्याणातील बहुतेक सार्वजनिक गणपती एकादशीलाच विसर्जीत होत. कोणीतरी मला सांगितले की चतुर्दशीला पुण्यात जायचे असते म्हणुन :)
एकादशीला मानाच्या गणपतींची मिरवणुक असे. ती बाजारपेठ, गांधी चौक, दुध नाका, पारनाका, टिळक चौक, अहिल्याबाई चौक, सहजानंद चौक ते काळा तलाव अशी जाई. दुधनाका हा मुसलमान मोहल्ला असल्याने तिथे मिरवणुका जास्त रेंगाळत आणि नाचायला जास्त मजा येई.
मग हळुहळु व्याप वाढले, घरोघरी टि.व्ही. आल्याने लोक बाहेर पडेनासे झाले. गर्दी जमेनाशी झाली ,महागाई वाढली, मंडळांचे बजेट कोलमडु लागले, माणिकचंद गुटख्याच्या जाहिराती झळकु लागल्या पुढे त्या व्हाईटकॉलर (ऑक्झिरिच पाण्याच्या) झाल्या वगैरे वगैरे.
पुण्यात आता जमल्यास एखाद रात्री मानाचे ५ गणपती बघुन येतो.चतुर्दशीला संध्याकाळी डेक्कनला जातो आणि दोन चार तास धमाल करतो. बास.
8 Sep 2019 - 9:43 am | सुधीर कांदळकर
गावडेसाहेब आणि रामे, पुण्यातल्या आणि कल्याणमधल्या गणेशोत्सवातली छान माहिती दिलीत.
अनेक, अनेक धन्यवाद.
12 Sep 2019 - 10:35 pm | सिरुसेरि
सुरेख आठवणी
16 Sep 2019 - 11:52 am | सुधीर कांदळकर
धन्यवाद.
16 Sep 2019 - 3:00 pm | नूतन
खरंच आठवणी जागवणारा लेख.
मिरासदार कंपनी चं कथाकथन,मंतरलेल्या चैत्रबनात यासारख्या कार्यक्रमांचा आस्वाद गणेशोत्सवातच घेतला होता.
17 Sep 2019 - 8:25 pm | आंबट चिंच
छान जुन्या आठवणी जागवल्या आहात साहेब तुम्ही.
तुमचे सर्वच लेख नॉस्टेल्जिक करणारे असतात.
19 Sep 2019 - 7:08 pm | सुधीर कांदळकर
नूतनजी आणि आंबट चिंच: अनेक, अनेक धन्यवाद.
20 Sep 2019 - 8:31 am | विजुभाऊ
सुंदर. नॉस्टाल्जीक केलेत साहेब
20 Sep 2019 - 11:09 pm | धर्मराजमुटके
सुंदर स्मरणचित्रे ! माणुस भुतकाळात रमतो ते उगाच नाही !
गणेशोत्सवाची खरी मजा झोपडपट्टी, चाळ संस्कृती मधे होती आणि अजुनही आहे. फ्लॅट सिस्टीमात का कोण जाणे पण माणूस एक मर्यादा पाळून, मोजून मापूनच व्यक्त होतो.
मलादेखील बालपणीचे / कुमारवयातील गणेशोत्सव लख्खपणे आठवतात.
गणपती बसायच्या आधीच महिनाभर अगोदर मंडळाची मिटींग होई, त्यात दर घरटी किती वर्गणी काढायची आणि मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणी खजिनदार कोण होणार या वरुन तुंबळ युद्ध होत असे. त्याअगोदर मागील वर्षाच्या पदाधिकार्यांची खर्चावरुन बिनपाण्याची हजामत करण्यात येत असे. शेवटी ज्यांना भांडता येत नाही आणि पदाधिकारीही होता येत नाही अशा सभासदांच्या मदतीने वादावर पडदा टाकला जात असे. एकदोन वयोवृद्धांना मार्गदर्शकाची म्हणजेच राष्ट्रपती समकक्ष पदे दिली जात.
त्यानंतर वर्गणी गोळा करण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम असे. मंडळाचे झाडून सारे सभासद यात उत्साहाने सामिल होत. दारासमोरचा घोळका पाहून बरेच जण निमुटपणे वर्गणी काढून देत. ज्यांच्याघरी एकादशी आणि शिवरात्र मुक्कामास असे तिथे २-४ तरी फेर्या मारायला लागायच्या. काही बाप्ये वर्गणीची रक्कम कमी करण्यासाठी घरातल्या बाई'माणसा'ला पुढे करीत. एखादे पात्र मागील वर्षाचा हिशेब ठेवा मग वर्गणी देतो असे आव्हान द्यायचा.
अशी आव्हाने नंतरच्या काळात वाढू लागली आणि गणेशोत्सव मंडळांचे वार्षिक छापायची सुरुवात झाली. मी त्या काळात नुकतेच डीटीपी आणी प्रिंटींग कामांची सुरुवात केली असल्यामुळे आमच्या मंडळाचे काम तर मला मिळायचेच त्याबरोबर विभागातील इतर मंड्ळांची, इतर उत्सवांची कामे देखिल मिळू लागली. मात्र अहवाल छापणे हे एक दिव्य असायचे, दर दोन तासांनी मंडळाचे पदाधिकारी यायचे, ह्याच्या शुभेच्छा छाप, त्याचे नाव / जाहिरात छाप असे सुचना करायच्या. एका पदाधिकार्याने दिलेल्या सुचना दुसर्यास मान्य नसायच्या. अहवालाशेवटी देणगीदारांची नावे छापण्याची प्रथा होती. त्यात अगदी १० रुपयापासून देणगी दिलेल्यांची नावे छापावी लागत. हे सदर बिनचूक होण्यासाठी प्रचंड मेहनत लागायची, नाहीतर पुढील वर्षी अगदी १० रुपये देणगी देणारादेखील अहवालात नाव नाही, नावात चुक आहे, रक्कम चुकीची छापली आहे यावरुन वाद घालायचा.
त्याखालोखाल महत्वाचा विभाग म्हणजे वार्षिक ताळेबंद ! याची डावी आणि उजवी बाजू जुळविणे मंडळांच्या कार्यकर्त्यांना कधीही शक्य व्हायचे नाही कारण काही महत्वाचे खर्च यात दाखवायची सोय नसे. मग मी पतपेढ्यांचे अहवाल छापून तयार झालेल्या नजरेने हे काम चुटकीसरशी करुन टाकीत असे. त्यामुळे काही झाले तरी धंदा दुसरीकडे जाणार नाही याची शाश्वती झाली.
मंडळांच्या अध्यक्षांचे मनोगत, विभागातल्या राजकीय व्यक्तींनी मंडळाला दिलेल्या शुभेच्छा हे स्वतःच्याच मनाने लिहिल्यामुळे शाळा सोडल्यानंतर माझी निबंधलेखनात चांगलीच प्रगती झाली. शिवाय सेनेच्या नेत्याच्या आजुबाजूच्या पानावर काँग्रेसच्या नेत्याचे फोटो येऊन चालत नसे. थोडक्यात अहवाल साध्या सरळ मराठीत असला तरी त्यामागे ब्रिटनच्या घटनेत नसतील तेव्हढे अलिखित नियम असायचे. हे सगळे अगदी गणपती स्थापन झाला तरी सतत चालू असे. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी सत्यनारायण पुजा आणि स्थानिय कलाकारांचे वेगवेगळे कार्यक्रम असत. त्या दिवशी ह्या अहवालाचे उद्घाटन असे त्यामुळे काहीही करुन अहवाल त्या दिवशी छापून आणणे गरजेचे असायचे.
गणेशोत्सवात दहा दिवस मंडपात जागरण होत, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात. आमच्या आजुबाजूला धोबीघाट होता आणि बरेच कनौजिया भय्ये राहायचे. त्यांच्याकडून चांगल्या प्रमाणात वर्गणी मिळायची शिवाय ती मंडळी अहवालात व्याकरणाच्या, रकमेच्या चुका काढत नसत त्यामुळे त्यांना खुश ठेवण्यासाठी १० दिवसातला (म्हणजे रात्रीतला) १ दिवस 'बिरहा का रंगीन मुकाबला" आयोजित केलेला असायचा. उरलेल्या दिवसांपैकी बायकांच्या गुणप्रदर्शनासाठी एक दिवस ( म्हणजे संगीतखुर्ची वगैरे), एक दिवस बच्चेकंपनीसाठी राखून ठेवलेला असायचा. बाप्पाला दिवसभर स्वस्तुतीपर गीते ऐकायचा कंटाळा येत असणार हे जाणून त्याला ती गीते अधूनमधूनच ऐकवली जायची. बाकी वेळात त्याला त्या त्या वर्षीची फिल्मी गीते ऐकवली जायची.
रात्री बाप्पाच्या सेवे खंड पडू नये म्हणून कार्यकर्ते जागरण करत असत. पुरुषमंडळी मांडवात बसून पत्यांचे डाव मांडत. दिवसभराच्या गमतीजमती एकमेकांना सांगत, कोणत्या मंडळाने कोणता देखावा केला, कोणत्या राजकारण्याने कोणाला सपोर्ट केला याच्या चर्चा झडत. चहाची आवर्तने होतं.
थंड चहा पिणार्या कार्यकर्त्यांना मात्र आडोसा जवळ करावा लागत असे.
एकदा एका भक्ताने देवाची खुप आराधना केली आणि देव प्रसन्न झाला तेव्हा भक्ताने वर मागीतला की देवा, माझा खिसा आणि हात कधीही रिकामा राहू देऊ नकोस. देवाने प्रसन्न होऊन भक्तास तंबाखुची पुडी दिली. तेव्हापासून तंबाखू भक्तांचा हात आणि खिसा कधीही रिकामा राहत नाही. देवाचा हा प्रसाद रात्री मंडपात सढळ हस्ते एकमेकात वाटला जात असे.
थोडक्यात ते दहाही दिवस / रात्री कार्यक्रमांची रेलचेल असे. दोनवेळेच्या आरतीसाठी मात्र कार्यकर्ते शोधून शोधून आणावे लागत. त्याच्यातही ९९% जयदेव जयदेव वाले असत. उरलेल्या १% ना आरत्या आणि त्याच्या चाली तोंडपाठ असत. मात्र एकदा आरत्या सुरु झाल्या की सगळे त्यात तल्लीन होत असत. गणपती, शंकर, दुर्गा, विठ्ठल, सत्यनारायण, दशावतार, ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ आणि शेवटी घालीन लोटांगण अशी आरत्यांची चढती कमान असायची.
आहे त्या बजेटमधे सगळ्यांनाच खुश करायचा मंड्ळाचा प्रामाणिक प्रयत्न असे. त्यामुळे एक दिवस बिरहा का मुकाबला, एक दिवस कोकणी बुवांचे डबलबारी भजन, एकदिवशी घाटी लोकांचे किर्तन, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, गणेश दर्शन कायक्रम असे समाजातील प्रत्येक घटकास अपील होतील असे कार्यक्रम आखलेले असत. कोकणी बुवांची डबलबारी भजने बहुतेक वेळा चित्रपटांच्या चालींवर रचलेली भक्तीगीते अशा स्वरुपाची असत. 'अमुकतमुक बुवा परब वि. फलाणे बिस्ताने .....कर यांचा भजनाचा सामना' अशी मोठ्या धामधुमीत जाहिरात करण्यात येत असे. त्यांची पायाने वाजावायची पेटी बघायला मला फारच आवडत असे. बुवांच्या पाठोपाठ पखवाज वाल्यांची देखील वाहवा होत असे.काही वर्षी 'बाल्या डॅन्स' सुद्धा आयोजित करण्यात येत असत.
भजन किर्तनाचे कार्यक्रम शक्यतो तरुण पदाधिकार्यांना विश्रांतीची गरज असेल असे दिवस पाहून आयोजित केलेले असत.
एखाद रात्री मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांची आणि चाळीतील रहिवाशांची इतर मंडळांचे गणपती पाहायची टुम निघे. मग चाळीतील एक दोघांकडे ट्रक होते त्यात बसून रात्रभर गणपती आणि देखावे बघीतले जात. तरुण मंडळींचा कल गणेशदर्शन अधिक देवीदर्शन असा असायचा. या काळात अनेक सेटींग्स व्हायच्या. पुढे पुढे मात्र नवरात्रोत्सवाच्या वाढत्या प्रस्थाने गणेशोत्सवाला ह्या जबाबदारीतून मुक्त केले.
अमुक अमुक गल्लीचा राजा हे संबोधन बाप्पाला अगदी प्रथमपासूनच चिकटलेले असावे. त्याकाळी मुंबईत भाई लोकांचे फार प्रस्थ होते. चेबूंरचा छोटा राजनचा गणपती, मरोळ नाक्याचा गणपती आणि असे अनेक भाईलोकांचे गणपती अगदी प्रसिद्ध होते. भाई जितका मोठा तितका त्याचा गणपती मोठा असे समिकरणच होते म्हणा ना ! हे गणपती आवर्जुन बघीतले जात. त्याकाळी दादरचा सिद्धिविनायक, माटुंग्याचा जीएसबी, लालबागचा राजा, तेजुकाया मँशनचे राजे देखील होते मात्र ते आज इतकी महती पावलेले नव्हते.
अनंत चतुर्दशीच्या आदल्या रात्री सत्यनारायण पुजा आणि इतर दिवशी झालेल्या स्पर्धांचे निकाल, बक्षीस वाटप समारंभ आणि विभागातील मान्यवर राजकीय नेत्यांचे सत्कार, महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम असे. हा दिवस सगळ्यात महत्त्वाचा. इतर आठही दिवस हजर नसलेली मंडळी देखील हजर राहायची. एखादा " झंकार ऑर्केस्ट्रा" असायचा. रात्री पोलीस आले तरी १० चा नियम तितक्या प्रभावीपने लागू नव्हता. ते देखील समजूतदारपणे थोडावेळ थांबून नंतर निघून जायचे. पुजेला बसण्याचा मान त्या त्या वर्षी लग्न झालेल्या नवीन जोडीला मिळे.
शेवटचा दिवस म्हणजे विसर्जन. सुरुवातीच्या काही वर्षी आम्ही जुहू चौपाटीला विसर्जन करत असू मात्र मग काही दिवसांनी पवई तलाव जवळ म्हणून तिकडे विसर्जन होऊ लागले. शेवटचा दिवशी झाडून सगळे लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला जमत असत. तो रस्त्यावर केलेला नाच, चौपाटी जवळ केलेली शेवटची धीरगंभीर आरती आणि मग बाप्पाचा रिता चौरंग आणि त्यावर बाप्पाच्या पार्थीव मुर्तीवरची परत आणलेली माती, दुसर्या दिवशी सकाळी त्याची आरती आणि मग सत्यनारायण पुजेची उत्तर पुजा असा कार्यक्रम होऊन गणेश उत्सवाची सांगता होते.
मन पुन्हा म्हणते बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या....
लेखापेक्षा प्रतिसाद मोती जड झाला असल्यास माफ करा... धन्यवाद !
21 Sep 2019 - 8:58 am | यशोधरा
सुरेख लिहिलंय, आवडलं.
21 Sep 2019 - 7:33 am | सुधीर कांदळकर
धन्यवाद विज्ञ्भाऊ आणि धर्मराजजी.
@ धर्मराजजी: आपण छान स्वारस्य घेऊन वाचले आहे. धन्यवाद. मंडपातले दृश्य जवळजवळ सगळीकडे सारखे असे त्यामुळे ठाऊक होते. छापण्याच्या या प्रगतीतले मात्र ठाऊक नव्हते. उत्सवाचा एक वेगळाच पैलू तुमच्यामुळे कळला.
मस्त.