गणपती आले..

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in लेखमाला
3 Sep 2019 - 6:00 am

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
} h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
img1 {
float: right;
}

गणपती आले..

"गावात ठरावीक दुकानं ही नेहमीच भाड्याने दिलेली असायची. तिथे एक धंदा कधी चालायचाच नाही. दिवाळीत फटाके, आकाशकंदील असायचे. ते संपले की कोकणातून येणारे आंबे, फणस मांडले जायचे. पावसाची झड सुरू झाली की आंबे आवरले जायचे आणि त्याच दुकानांत राख्या मांडल्या जायच्या "

एखाद्या दुकानात मात्र लोखंडी मांडण्या लागायच्या. मग रात्री अवचित शे-दीडशे पांढऱ्या मूर्ती कुठूनतरी यायच्या. लहान-मोठ्या आकाराच्या ह्या मूर्ती जपून प्लॅस्टिकने झाकल्या जायच्या. त्यांना पूर्ण रंग दिलेले नसायचे. दुसऱ्या दिवसापासून ते उरलेलं रंगकाम शटर उघडं ठेवून सुरू व्हायचं.

"गणपती आले", आम्ही म्हणायचो..

आषाढधारांनी कोसळणारा पाऊस वातावरणात रुतून बसलेला असायचा. सगळ्या आसमंतात तो राखी करडेपणा साचलेला असायचा. रस्त्यावरची माती आणि डांबर वाहून गेलेलं असायचं. स्लीपरने उडणारा चिखल पाठीवर रांगोळी काढायचा. ओलसर गार कपड्याने शाळेत जायचं जिवावर आलेलं असायचं. वाहत्या साचल्या पाण्याचे, शेवाळाचे, स्टाफ रूममधल्या उकळत्या चहाचे वास वर्गात फिरत राहायचे. जीव जड झालेला असायचा.

आणि मग एक दिवस गटारी यायची. दर्दी लोक खास सुट्टी काढायचे. मटणाच्या दुकानापुढे रांग लागायची. आदल्या रात्री कळपाने आलेल्या शेळ्याही दुकानामागे रांगेत बांधलेल्या असायच्या. घरोघरी मसाल्यांचे गंध रेंगाळायचे. खाऊन पिऊन तुस्त झालेली माणसं पोटातलं सुख डोळ्यावर ओढून झोपी जायची. आखाड संपलेला असायचा. हसत नाचत श्रावण यायचा.

नागपंचमी यायची, नाग घेऊन गारुडी फिरायचे. नागाचे दात काढलेत की गारुड्याचा मंत्र पॉवरफुल आहे, ह्याचे वाद रंगायचे. उन्हापावसाचा खेळ सुरू व्हायचा. उन्हात पाऊस पडायला लागला की "नागडा पाऊस, नागडा पाऊस" असं ओरडत आम्ही हातावर थेंब घ्यायचो.

श्रावणी शुक्रवार यायचा. स्टाफ रूममध्ये चणे उकडले जायचे. कागदाचा द्रोण आणि पुठ्ठ्याचा चमचा आपणच करायचा असायचा. नुसत्या मिठावर उकडून काढलेल्या चण्यात, एखादी मिरची कापून टाकली जायची. अप्रतिम चव लागायची. वातावरण उजळलेलं असायचं. राखाडी करडेपणा संपून श्रावणी सण सुरू व्हायचे. उगाचच सगळं छान वाटायला लागायचं. श्रावणी सोमवार सुरू झालेले असायचेच. निर्जळी सोमवारचं व्रत तेव्हा अनेक काकू करायच्या, कुठेतरी उद्यापन असायचं. लगबग असायची. आयुष्य भोळं होतं.

राखीबंधन होऊन जायचं. भरल्या हाताने मुलं दहीहंडी फोडायला जायची. हंड्याही तेव्हा कॉर्पोरेट नव्हत्या. फारतर चार-पाच थरांची दहीहंडी असायची. आपापल्या मित्रमंडळाची बंद गळ्याची बनियन छापून घेतली जायची. ती घालून दहीहंडीत मिरवलं जायचं.

आता प्रतीक्षा असायची गणपतीची.

सरत्या पावसाळ्यात गणपती यायचे. पाऊस आहेही आणि नाहीही असा पडत असायचा. दहा-बारा दिवस आधी एखाद्या मैदानात मंडप ठोकला जायचा. लग्नाचे दिवस नसल्याने मंडपवाल्यांना, स्पीकरवाल्यांना काम नसायचं. कुठूनतरी वीज घेतली जायची, नाहीतर सरळ मीटरच्या अलीकडे वायर चिकटायची. मित्रमंडळ नावाचा जमाव पावती पुस्तकं घेऊन घरोघरी फिरायचा. कुठे आग्रहाने, कुठे गोडीने तर कुठे कुणाच्या नावाने जळवून जास्तीत जास्त वर्गणी वसूल केली जायची. मंडळाच्या सीमारेषा असायच्या. त्या रेषेवर ज्या बिल्डिंग असायच्या, तिथे दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते जायचे. मचमच व्हायची. प्रकरण शक्यतो बोलाचाली होऊन मिटवलं जायचं.

त्याच वेळी घरोघरी गणपतीची तयारी सुरू असायची. पूर्वेच्या बाजूला तोंड येईल असा घरातला एखादा कोपरा रिकामा केला जायचा. घरात असेल तर ठीक, नाहीतर शेजारून एखादं टेबल आणलं जायचं. गणपतीसाठी म्हणून घरात एक मल्मली चादर असायची. ती मागच्या गणपतीनंतर धुऊन घडी घालून ठेवलेली असायची. ती बाहेर निघायची. पलंग सरकवले जायचे, कपाटावरची जळमटं निघायची, रॉकेलने फॅन पुसले जायचे. निरमाचा फेस करून, घासून घासून लाद्या धुतल्या जायच्या. दरवाजे सर्फमध्ये बुडवून, ओल्या फडक्याने पुसले जायचे. घर नवं दिसायला लागायचं.

रेशनवर रवा आलेला असायचा. प्रसादाला लागेल आणि नंतर संपेल म्हणून डालडा विकत घेऊन ठेवला जायचा. देशी तूप वगैरे चैन तेव्हा नव्हती. उकडीच्या मोदकाचं प्रस्थ कोकणातल्या घरांत होतं, पण घाटी पब्लिक तळलेल्या मोदकाची तयारी करायचे. खोबरं, नारळ आणून ठेवले जायचे. येणाऱ्याजाणाऱ्या लोकांसाठी चहा-साखर जास्तीचं भरलं जायचं. शिवसेनेच्या शाखेवर धारा तेल मिळायचं, जरा स्वस्त आणि चांगलं असायचं. लोक रांगा लावून ते खरेदी करायचे. पोटोबाची तयारी पूर्ण झालेली असायची, कुटुंब आता विठोबाच्या तयारीला लागायचं.

Pineapple
ठरलेल्या दुकानात जाऊन मूर्ती निवडली जायची. काही जणांकडे सीरिज असायची - म्हणजे अष्टविनायक किंवा तसं काही. इतर लोक आपल्या आवडीने मूर्ती निवडायचे. गणपती पूजन करायला पुरोहित वगैरे कोणी बोलवायचं नाही. पूजेची तयारी म्हणून आपापल्या पद्धतीने सुपाऱ्या, अगरबत्त्या आणल्या जायच्या. गणपती पूजनाची पुस्तकं मागवली जायची. फुलं-हार आधीच सांगून ठेवले जायचे. घरातलं तांब्याचं ताम्हण, पळी बाहेर निघायचे. एखादी चांदीची निरंजन असेल तर कोलगेट पावडर लावून ते साफ केलं जायचं. झब्बे पायजमे किंवा एखाद धोतर, असेलच तर पितांबर धुऊन घेतलं जायचं. एखादा हौशी विकतही घ्यायचा. पुढे दिवाळी येणारच असायची, त्यामुळे इतर कपडे घेणं मात्र टाळलं जायचं. पांढऱ्या-काळ्या टोप्या उन्हं द्यायला बाहेर निघायच्या. आरतीला आणि पूजेला टोपी लागायचीच.

डेकोरेशन नावाचा एक खास कार्यक्रम असायचा. सुरुवातीला फक्त पुठ्ठयाचं डेकोरेशन असायचं. त्यामागे एखादं निसर्गचित्र चिकटवलं जायचं. नंतर थर्माकोल मिळायला लागलं. पातळ थर्माकोल शीट, ब्लेड, डिंक, रंग, टाचण्या आणि वेगवेगळ्या रंगाची चमकी-टिकल्या हा मुख्य कच्चा माल असायचा. चित्रकला चांगली असलेला कलावंत टाइपचा एखादा मुलगा माहितीत असायचाच. मग रात्री दोन वेळा चहा आणि काहीतरी नाष्टा ह्या मोबदल्यात हा मुलगा यायचा. रात्र जागवली जायची.
अशीच जागरणं सार्वजनिक मंडपातही व्हायची, पण तिथला नजारा वेगळा असायचा. एखादा सुतार, दोन-चार कलाकार मुलं, त्यांच्या हाताशी चार-सहा सांगकामे असा संपूर्ण चमू असायचा. खिळे, फेव्हिकॉल अस्ताव्यस्त पडलेले असायचे. नाक्यावरच्या हॉटेलवाल्याला जेवणाची ऑर्डर असायची. कधीकधी इतरही सोय असायची. कोणतंही काम न करणारे काही पदाधिकारी रात्री टेबल टाकून पत्ते कुटायला बसायचे. हे सगळे मिळून एक-दोन रात्री जागवायचे. पुढच्या जागत्या रात्रींची ही बहुधा सुरुवात असायची.

गणपती बसल्यावर ऋषीपंचमी येणार असायची. आई सात ऋषींच्या सात शिळा आणून ठेवायला सांगायची. ह्या विशिष्ट प्रकाराच्याच लागायच्या. बांधकामाला आणलेल्या खडीतून त्या उचलून नेल्या की ओरडा बसायचा. नदीतून घासून गुळगुळीत झालेले गोटे लागायचे. ते कधीकधी जवळ मिळायचे नाहीत. मग खाडीजवळ जाऊन घेऊन यायला लागायचे. ओलेत्याने ऋषींची पूजा होणार असायची.

मग श्रीगणेशचतुर्थीच्या आदल्या दिवसाची संध्याकाळ यायची. ज्यांचा गणपती दीड दिवसांचा असायचा, तो शक्यतो संध्याकाळीच आणला जायचा. खास गणपतीचा पाट असायचा. तो आदल्या दिवशीच धुऊन पुसून ठेवला जायचा. मुलं गोळा व्हायची. टाळ, एखादी ढोलकी, पळी, ताटली घेऊन उत्साहात गणपती आणायला मंडळी निघायची. सार्वजनिक गणपतीसाठी बऱ्याचदा सजवलेली हातगाडी असायची. तिच्या चारी बाजूला केळीचे खुंट, फुलांच्या माळा लावून माफक सजावट व्हायची. नाशिक ढोल अजून आले नव्हते. तरीही बँडवाले असायचेच. बऱ्याचदा ते खास श्रीगणेशचतुर्थीच्या काळात आसपासच्या खेड्यातून आलेले असायचे. ते सुपारीची वाट बघत नाक्यावर किंवा मूर्तीच्या दुकानजवळ उभे असायचे. सुपारी ठरली की ते आपापल्या पिपाण्या साफ करायचे. घसा ओला करायचे. गणपती हा त्यांच्यासाठी सिझन असायचा. लंबोदर बाप्पा सगळ्यांच्या पोटाची काळजी घ्यायचा.

वाजत गाजत देव घरोघरी यायचे. खूप उशिरा मंडपातही यायचे. मंडपातल्या मूर्तीची विधिवत पूजा व्हायची. रात्रीच्या अंधारात मखरात ठेवलेल्या मूर्तीपुढे समई तेवत राहायची. मध्यरात्री कधीतरी जाग यायची. मग सहज मंडपात नजर टाकली जायची. कोणीतरी पत्ते खेळत असायचं. कोणी बाजूला पेंगत असायचं. सगळ्या वातावरणात एक निवांतपणा रेंगाळत असायचा.

देवही जणू आपल्या भक्तांची गाऱ्हाणी ऐकायला सज्ज होत असायचा.

गणपती आलेला असायचा.

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2019 - 8:09 am | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम चित्रण. :)

यशोधरा's picture

3 Sep 2019 - 8:14 am | यशोधरा

सुरेख लिहिलंय.
सरलेल्या अत्तराचा दरवळ मागे राहावा, असं.

अलकनंदा's picture

4 Sep 2019 - 3:57 pm | अलकनंदा

सरलेल्या अत्तराचा दरवळ

अगदी. साध्या, घरेलू गणेशोत्सवाच्या आठवणी मनात रेंगाळतात. हल्लीचे गणपती आणि एकूण वातावरण पाहताना अधिक. आताचे वाईट आहे असेही नाही, पण लेखात वर्णिलेले अधिक सुंदर होते, देखणे होते, हेही खरेच.

फारएन्ड's picture

3 Sep 2019 - 8:22 am | फारएन्ड

मस्त वातावरणनिर्मिती आहे! आमचाही घरचा आणि सार्वजनिक गणपती आठवला!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2019 - 9:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ लेखन आवडले.

-दिलीप बिरुटे

सुधीर कांदळकर's picture

3 Sep 2019 - 9:01 am | सुधीर कांदळकर

मस्त वेगवान आणि चित्रदर्शी लेखन. आवडले.

पद्मावति's picture

3 Sep 2019 - 1:04 pm | पद्मावति

फारच सुरेख लिहिलंय. अगदी ओघवती आणि चित्रदर्शी लेखनशैली.

टर्मीनेटर's picture

3 Sep 2019 - 1:44 pm | टर्मीनेटर

मस्त लेख! आणि सुंदर लेखनशैली!

जालिम लोशन's picture

3 Sep 2019 - 1:45 pm | जालिम लोशन

अगदी वाहते पाणी, शेवाळे, आणी चहा वास देखील जाणवला.

पद्मश्री चित्रे's picture

3 Sep 2019 - 2:32 pm | पद्मश्री चित्रे

सुरेख चित्रण. श्रावण आठवला लहानपणीचा.

दुर्गविहारी's picture

3 Sep 2019 - 5:19 pm | दुर्गविहारी

याला म्हणायचे अक्षरचित्र ! फारच सुंदर लिखाण !! आता हा काळ गेलेला आहे. तेव्हा त्या आठवणी निदान धाग्याच्या रुपात पुढच्या पिढीला माहिती होतील

किसन शिंदे's picture

3 Sep 2019 - 6:49 pm | किसन शिंदे

शिवसेना शाखेतल्या धारा तेलाच्या पिशव्या, पावसाळ्यातले वाहत्या पाण्याचे शेवाळाचे स्टाफरूमधले वाफाळते वास, भूतकाळ अचूक शब्दात पकडला आहे भौ तू !! सुरूची मिसळ खौ घाल्तो, य इकडं.

स्वाती दिनेश's picture

3 Sep 2019 - 8:23 pm | स्वाती दिनेश

सुरेख , चित्रदर्शी...
सारे काही डोळ्यासमोर उभे राहिले.
स्वाती

झक्कास, नाॅस्टॅल्जिक करणारं लिखाण!

- (काम न करणारा पदाधिकारी) सोकाजी

कंजूस's picture

4 Sep 2019 - 6:44 am | कंजूस

मंडळ आभारी आहे.
झकासच.

तुषार काळभोर's picture

4 Sep 2019 - 7:38 am | तुषार काळभोर

आता काल परवापर्यंत, म्हणजे ९६-९७ पर्यंत हे असंच होतं!

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Sep 2019 - 9:00 am | ज्ञानोबाचे पैजार

काही काळापूर्वीच्या गणेशोत्सवाची लगबग अचूक टिपली आहे
सध्या रेडीमेडच्या जमान्यात हे मजा थोडीशी कमी झाली आहे.
आता ढोल ताशे आणि डॉल्बी चा जमाना आहे.
पैजारबुवा,

प्रशांत's picture

4 Sep 2019 - 5:33 pm | प्रशांत

फारच सुरेख लिहिलंय. गावाकडील सार्वजनिक गणपती उत्सव आठवला!

नाखु's picture

4 Sep 2019 - 9:23 pm | नाखु

भन्नाट लिहिले आहे
ज्याने रेशनची लाईन आणि वाट अनुभवलीय त्यालाच डालडा,रव्याचे मोल समजेल.

चाळ नावाची वाचाळ वस्ती अनुभवी रहिवासी नाखु पांढरपेशा

Madhavi1992's picture

11 Sep 2019 - 5:10 pm | Madhavi1992

सुरेख लिहिलंय. झक्कास

शैलेन्द्र's picture

13 Sep 2019 - 9:46 am | शैलेन्द्र

सगळ्यांचे आभार

नूतन's picture

15 Sep 2019 - 2:29 pm | नूतन

आठवणी जागवल्या