अनुक्रमणिका | इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा | मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक | कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ ! | हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन | रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर | बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस | युरिआ व क्रिअॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक | ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’ वर शिक्कामोर्तब
नववर्षाच्या शुभेच्छांसह सादर करीत आहे : आरोग्य लेखमालेतला ७ वा भाग...........
******************************************
'युरिआ’ हा शब्द उच्चारताच बहुतेकांच्या डोळ्यासमोर शेतीतले ‘युरिआ खत’ येते. साहजिकच आहे, कारण त्याच्या जाहिराती आपण विविध माध्यमांत बघत असतो. हेच युरिआ आपण आपल्या शरीरातही तयार करतो आणि रोज लघवीवाटे उत्सर्जित करतो.
‘क्रिअॅटिनीन’ हा युरिआसारखाच एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. आपण तो शरीरात तयार करतो आणि तोही लघवीवाटे उत्सर्जित होतो. थोडक्यात हे दोन्ही नायट्रोजनयुक्त पदार्थ एकाच जातकुळीतले आहेत. दोन्हीही आपल्या रक्तात असतात आणि लघवीतून बाहेर पडतात. त्यांच्या रक्तातील पातळीचा आणि मूत्रपिंडाच्या कार्याचा जवळचा संबंध आहे. मूत्रविकाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या ज्या रक्तचाचण्या नियमित होतात त्यामध्ये हे दोन्ही घटक अग्रस्थानी असतात.
या लेखात आपण या दोघांची मूलभूत माहिती, त्यांच्या वैद्यकीय उपयुक्ततेतील फरक आणि संबंधित मूत्रविकारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
युरिआ
याचे विवेचन चार भागात करतो :
१. शरीरातील उत्पादन
२. शरीरातून उत्सर्जन
३. आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी, आणि
४. इतर रोचक माहिती
शरीरातील उत्पादन
आपण आहारातून प्रथिने घेतो. त्यांचे पचन होऊन अमिनो आम्ले तयार होतात. ही आम्ले प्रथम शरीरातील प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात. यातून जी बाजूला उरतात त्यांचे पेशींमध्ये विघटन होते आणि त्यातून CO2 आणि अमोनिया बाहेर पडतात. हा अमोनिया रक्तात साठू देणे इष्ट नसते कारण तो मेंदूसाठी खूप घातक असतो. म्हणून अमोनियाचे रुपांतर युरिआ या निरुपद्रवी रसायनात करण्याची जबाबदारी आपले यकृत घेते. अशा तऱ्हेने युरिआ हा न वापरलेल्या नायट्रोजनचा उत्सर्जनीय पदार्थ आहे.
अन्य एका प्रकारेही युरिआची निर्मिती शरीरात होत असते. आपल्या पेशींमध्ये रोज ‘उलाढाल’ चालू असते. त्यात सतत काही प्रथिनांचे विघटन होत असते. त्यांच्या अपचयातून (catabolism) सुद्धा युरिआ तयार होतो.
शरीरातून उत्सर्जन
यकृतात युरिआ तयार झाल्यावर तो रक्तात येतो. आपले सगळे रक्त हे ‘शुद्धीकरणा’साठी मूत्रपिंडात येते. मूत्रपिंड ही एक प्रकारे चाळणी आहे. जेव्हा रक्त त्यातून जाते तेव्हा ‘टाकाऊ’ पदार्थ हे मूत्रमार्गात पाठवले जातात, तर उपयुक्त पदार्थ हे रक्तातच टिकवले जातात. त्यानुसार बराचसा युरिआ हा लघवीत जातो आणि काही प्रमाणात रक्तात उरतो.
मनुष्याच्या शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे पूर्णपणे विघटन झाल्यावर युरिआ हा प्रमुख अंतिम पदार्थ आहे, हे आपण पाहिले. या संदर्भात निसर्गातील अन्य जीवांशी आपली तुलना करण्याचा मोह होतो. मासा हा तर जलचर. तो त्याच्या नायट्रोजनचा शेवट अमोनियात करतो आणि हा पदार्थ भसाभस पाण्यात सोडून देतो, जे त्याच्या भवती मुबलक असते. त्यामुळे त्याला अमोनियाचे युरिआत रुपांतर करण्याची तसदी घ्यावी लागत नाही.
याउलट पक्ष्याचे बघा. तो पडला हवाई प्राणी. त्याच्याकडे पाण्याचे जाम दुर्भिक्ष. त्यामुळे त्याच्या नायट्रोजनचे रुपांतर तो ‘युरीक अॅसिड’ मध्ये करतो. हे रसायन उत्सर्जित करायला पाण्याची फारशी गरज भासत नाही. त्यामुळेच पक्षाची लघवी ही खऱ्या अर्थाने ‘शू’ नसून ‘शी’च असते!
आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी
अशा आजारांचे आपण तीन गटात वर्गीकरण करूया:
१. मूत्रपिंडाचे आजार : जर कोणत्याही कारणाने इथली ‘चाळणी’ यंत्रणा (glomerulus) बिघडली तर मग युरिआ आणि अन्य टाकाऊ पदार्थ रक्तात साठू लागतात.
२. मूत्रमार्गातील अडथळे : यात मूत्राशय व मूत्रनलिकांच्या आजारांचा समावेश होतो. उदा. मूतखडे, प्रोस्टेटची मोठी वाढ, गर्भाशयमुखाचा कर्करोग.
मूतखडे हे मूत्रमार्गातले अंतर्गत अडथळे असतात तर बाकीच्या आजारांनी मूत्रमार्गावर बाहेरून दाब पडतो. अशा अडथळ्यांमुळे मूत्रपिंडाच्या चाळणी यंत्रणेवर ‘उलटा दाब’ (back pressure) येतो आणि चाळणी प्रक्रिया कमी होते.
३. युरिआचे वाढलेले उत्पादन : याची दोन प्रकारची कारणे आहेत :
(अ) उच्च प्रथिनयुक्त भरपूर आहार : समजा एखाद्याने एखादे दिवशी मस्तपैकी एक ‘चिकन हंडी’ फस्त केली, तर पुढचे काही तास युरिआची पातळी बऱ्यापैकी वाढते! आपल्या रोजच्या आहारातील प्रथिनाच्या प्रमाणानुसार युरिआची पातळी बदलती असते.
(आ) जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो तेव्हा. उदा. उपोषण, मोठा जंतूसंसर्ग इ.
इतर रोचक माहिती
युरिआचे विवेचन संपवण्यापूर्वी आपल्या सार्वजनिक जीवनातील एक प्रसंग सांगतो. समजा, आपण एखाद्या अपरिचित ठिकाणी समारंभास गेलो आहोत. तिथे आपल्याला बराच वेळ काढायचा आहे. काही वेळाने आपल्याला लघवीची जाणीव होते आणि मग आपण ‘ते’ ठिकाण शोधू लागतो. कोणीतरी आपल्याला हातवारे करून ते कुठे आहे ते सांगतो. जसे आपण त्या मूत्रालयाच्या जवळ येतो तसे आपले ‘स्वागत’ होते त्या ‘परिचित’ वासाने !
हा भरून राहिलेला वास असतो अमोनियाचा. अनेक लोक जेव्हा एखाद्या लहान जागेत लघवी करत असतात तेव्हा त्यातील युरिआचे अंश हे त्या मूत्रभांड्यांमध्ये पसरून राहतात. हळूहळू त्या युरिआचे नैसर्गिक विघटन होऊन अमोनिया वायुरूपात पसरू लागतो. तेव्हा आपल्याकडे सार्वजनिक मूत्रालय शोधताना दिशादर्शक पाटीपेक्षा वासाचाच अधिक उपयोग होतो !
जे युरिआ आपल्या शरीरात तयार होते तेच आपण कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेतही करू शकतो. विज्ञान संशोधनातील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. आज युरिआचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन केले जाते. या युरिआचा वापर हा शेती, रासायनिक उद्योग आणि वैद्यकातील औषध म्हणून केला जातो.
* * * *
क्रिअॅटिनीन
हा शब्द युरिआ इतका परिचित नाही याची कल्पना आहे. तो युरिआचा ‘भाउबंद’ आहे हे आपण वर पाहिले. म्हणजेच लघवीतून उत्सर्जित होणारा एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. रक्तातील त्याची नेहमीची पातळी तर खूप कमी – युरिआच्या साधारण एक तीसांश. नेहमीप्रमाणे त्याचेही विवेचन तीन भागात करतो:
१. शरीरातील उत्पादन
२. उत्सर्जन आणि
३. आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी
शरीरातील उत्पादन
आपल्या हाडांवरचे जे स्नायू असतात (skeletal muscle) त्यांच्यात क्रिअॅटिन-पी नावाचे एक उच्च उर्जायुक्त संयुग साठवलेले असते. स्नायुंच्या कार्यादरम्यान त्यातील उर्जा वापरली जाते. मग बाकी उरते ते क्रिअॅटिन. आता यातून पाण्याचा एक रेणू आपोआप निघून जातो आणि तयार होते क्रिअॅटिनीन.
प्रत्येक व्यक्तीमधील स्नायूंचे आकारमान (mass) स्थिर असते. त्या प्रमाणात त्यांच्यात ठराविक क्रिअॅटिन-पी असते. दररोज त्यातील ठराविक क्रिअॅटिनचे क्रिअॅटिनीनमध्ये रुपांतर होते. त्यामुळे क्रिअॅटिनीनची रोजची रक्तपातळी ही युरिआच्या तुलनेत बऱ्यापैकी स्थिर असते. या बाबतीत लिंगभेद मात्र महत्वाचा आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या स्नायूंचे आकारमान कमी असल्याने त्यांची क्रिअॅटिनीनची रक्तपातळी कमी असते.
उत्सर्जन
युरिआप्रमाणेच रक्तातले क्रिअॅटिनीन हे मूत्रपिंडाच्या चाळणी प्रक्रियेतून जाते आणि त्यातले बरेचसे लघवीवाटे बाहेर पडते. त्यामुळे त्याची रक्तपातळी कमी राहते.
आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी
वर युरिआच्या विवेचनात मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रमार्गातील अडथळे यांचा उल्लेख आला आहे. या दोन्हींमध्ये क्रिअॅटिनीनची रक्तपातळी अर्थातच वाढते. जेव्हा मूत्रपिंडाच्या चाळणी- प्रक्रियेत दोष निर्माण होतो तेव्हा युरिआची रक्तपातळी ही क्रिअॅटिनीनपेक्षा अधिक वेगाने आणि खूप जास्त वाढते.
आता युरिआ व क्रिअॅटिनीनच्या रक्तपातळी संदर्भात एक फरक ध्यानात घेतला पाहिजे. जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो, तेव्हा फक्त युरिआच वाढते; क्रिअॅटिनीन नाही. जेव्हा क्रिअॅटिनीन वाढते तेव्हा मूत्र-यंत्रणेत नक्कीच कुठेतरी गडबड झालेली असते. त्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गांच्या आजारांमध्ये क्रिअॅटिनीन हा युरिआपेक्षा अधिक संवेदनशील निर्देशांक मानला जातो.
प्रयोगशाळेत आपण जेव्हा युरिआ व क्रिअॅटिनीनच्या रक्तपातळी मोजतो तेव्हा युरिआची चाचणी ही बरीच सरळसोट आहे, तर क्रिअॅटिनीनच्या चाचणीत काही तांत्रिक समस्या आहेत आणि युरिआच्या तुलनेत अचूकता कमी आहे. या कारणासाठी मूत्रविकारांसाठी जेव्हा चाचण्यांची गरज लागते, तेव्हा युरिआ व क्रिअॅटिनीन हे दोन्ही जोडीने मोजले जातात. मूत्र- रुग्णांच्या रिपोर्टस मध्ये हे दोघे अगदी नवराबायकोसारखे वावरत असतात !
युरिआ व क्रिअॅटिनीनच्या मर्यादा
या दोघांची रक्तपातळी मोजणे ही मूत्रविकारांच्या निदानातील प्राथमिक पायरी आहे. याबाबतीत त्यांच्या उपयुक्ततेबरोबरच त्यांच्या काही मर्यादाही लक्षात घ्याव्यात. मूत्रपिंडाच्या अगदी सुरवातीच्या बिघाडाचे निदान करण्यासाठी त्यांचा तसा उपयोग नसतो. जेव्हा चाळणी-यंत्रणेचे काम कमी होत होत निम्म्यावर येते तेव्हाच क्रिअॅटिनीनची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढते. म्हणजेच क्रिअॅटिनीनची पातळी ‘नॉर्मल’ असली तरी याचा अर्थ ‘मूत्रपिंडाचे कार्य छान चाललेले आहे’, असे नेहमीच म्हणता येणार नाही.
तरीसुद्धा रुग्णाचे थोडेसे रक्त घेऊन करता येणाऱ्या या दोन्ही सुटसुटीत चाचण्या आहेत. त्यामुळेच एक शतकाहून अधिक काळ त्यांनी मूत्र-चाचण्यांच्या यादीत आपले अग्रस्थान टिकवले आहे.
मूत्रपिंडाच्या आजाराची अनेक कारणे असतात. त्यामध्ये दीर्घकालीन मधुमेह आणि उच्च-रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. अशा बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत त्यांना मूत्रपिंड-विकार जडला की तो दीर्घकालीन (chronic) होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांची देखभाल करताना अनेक चाचण्या नियमित कराव्या लागतात. त्यामध्ये अर्थातच युरिआ व क्रिअॅटिनीनचा समावेश असतो. त्यांच्या पातळीतील चढउतारावरून आजार कितपत नियंत्रणात आहे ते कळते. त्यांचे क्रमशः रिपोर्टस् हे एक प्रकारे रुग्णाचे प्रगतीपुस्तकच असते. त्यानुसार रुग्णाच्या भावी उपचारांची दिशा ठरवता येते.
समारोप
शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे विघटन पूर्ण झाल्यावर युरिआ तयार होतो. यकृतात तयार झालेला युरिआ हा नंतर मूत्रपिंडाद्वारे लघवीत उत्सर्जित होतो.
आपल्या स्नायूंमधल्या क्रिअॅटिनपासून रोज ठराविक क्रिअॅटिनीन तयार होते आणि तेही लघवीत उत्सर्जित होते. मूत्रविकारांच्या निदानामध्ये युरिया व क्रिअॅटिनीनची रक्तपातळी मोजणे या प्राथमिक चाचण्या आहेत. त्यांच्या उपयुक्तता आणि मर्यादा आपल्याला या लेखातून समजल्या असतील अशी आशा करतो.
या लेखाच्या निमित्ताने आपणा सर्वांना आयुष्यभर उत्तम मूत्र-आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो.
*****************************************************************************
प्रतिक्रिया
1 Jan 2018 - 2:58 pm | एस
दीर्घ उपोषणाने क्रिअॅटिनीनची पातळी वाढते असे अण्णा हजारे यांच्या उपोषणासंबंधित बातम्या वाचून समजले होते. रक्तात युरिआ आणि क्रिअॅटिनीन यांची पातळी वाढल्यास कोणते दृश्य परिणाम होतात? पित्ताच्या गांध्या येण्याशी त्याचा काही संबंध आहे का?
2 Jan 2018 - 12:35 pm | कंजूस
कुमार१ यांचे पुर्वीचे आरोग्यविषयीचे लेख
बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस
20 Dec 2017
लिंक:http://www.misalpav.com/node/41676
रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर
3 Dec 2017
3 Dec 2017
लिंक:http://www.misalpav.com/node/41581
हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन
15 Nov 2017
लिंक:http://www.misalpav.com/node/41474
कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ
8 Nov 2017
लिंक:http://www.misalpav.com/node/41421
मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक
25 Oct 2017
लिंक:http://www.misalpav.com/node/41353
इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा
16 Oct 2017
लिंक:http://www.misalpav.com/node/41287
कर्करोगाचा विळखा
21 Sep 2017 -
लिंक:http://www.misalpav.com/node/41018
उपवासाचे ढोंग
20 Sep 2017
लिंक:http://www.misalpav.com/node/40992
2 Jan 2018 - 12:52 pm | कुमार१
दंडवत स्वीकारावा.
1 Jan 2018 - 3:29 pm | कुमार१
दीर्घ उपोषणाने शक्य आहे
रक्तात युरिआ आणि क्रिअॅटिनीन यांची पातळी वाढल्यास कोणते दृश्य परिणाम होतात? >>>>>
या पदार्थांचे असे परिणाम नसतात. त्यामागील मूत्रपिंड-विकाराची लक्षणे दिसतील.
त्वचा खाजेल पण गांधी नाही येणार
1 Jan 2018 - 6:28 pm | आनन्दा
प्रोटीन सप्लिमेंटमुळे पण क्रिएटीन वाढते ना?
1 Jan 2018 - 6:41 pm | कुमार१
प्रोटीन सप्लिमेंटमुळे पण क्रिएटीन वाढते ना?>>>≥
युरीआ बऱ्यापैकी वाढते
1 Jan 2018 - 7:12 pm | तिमा
अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त लेख. इतक्या सोप्या भाषेत याआधी अशी माहिती वाचायला मिळाली नव्हती. लिहित रहा, आम्हाला एज्युकेट करा, शरीरशास्त्राबद्दल.
1 Jan 2018 - 7:45 pm | चाणक्य
सहमत. आवर्जून वाचावे असे लिखाण असते कुमार१ यांचे.
2 Jan 2018 - 7:03 pm | पुंबा
++११
शिवाय शंकानिरसन करतात हे मोठे काम खरोखर.
डॉ. कुमारसाहेब, आपल्याकडून असेच अभिनिवेशहीन तसेच माहितीपूर्ण लिखाण नव्या वर्षात देखिल मिपाकरांना वाचावयास मिळो.
2 Jan 2018 - 7:26 pm | कुमार१
पुंबा, आभार
तुमच्या सारख्या जाणकार वाचकांच्या बळावरच ही लेखमाला चालू आहे
1 Jan 2018 - 7:27 pm | कुमार१
तिमा, तुमच्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आभार !
1 Jan 2018 - 7:50 pm | पिंगू
क्रिअॅटिनीनची पातळी आणि हृदयविकार/किडनीची सूज यांचा काही संबंध आहे का?
1 Jan 2018 - 8:11 pm | कुमार१
पिंगू, उत्तम प्रश्न. तुमच्या प्रश्नाने मला गाडीवरून उठवून डेस्कटॉपवर बसवले आहे. उत्तर देतो खालील मुद्द्यांत :
१. दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराच्या (CKD) १ ते ५ अशा स्टेजेस असतात. त्या ‘चाळणी यंत्रणेची क्षमता (GFR) मोजून निश्चित केल्या जातात. स्टेज १ ही ‘ठीक’ स्थिती तर स्टेज ५ ही सर्वात वाईट असे असते. त्यानुसार ‘क्रिअॅटिनीनची पातळी वाढत जाते.
२. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार (म्हणजेच वाढलेले क्रिअॅटिनीन) >> रक्तात पाणी व सोडियम जास्त साठते >> volume वाढतो >> उच्च रक्तदाब.
३. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार >>> हृदयविकार >> heart failure
४. उच्च रक्तदाब हे दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराचे कारण आणि परिणाम असे दोन्ही आहे! (Hypertension is both a cause and a consequence of Kidney disease.)
1 Jan 2018 - 9:41 pm | कुमार१
उच्च रक्तदाब.>> हृदयाचा पम्प करायचा ताण वाढला >> हृदयाचे failure
त्यामुळे CKD ची वाढलेली स्टेज हृदयासाठी लै वाईट.
3 Jan 2018 - 8:05 pm | पिंगू
धन्यवाद. फारच छान माहिती मिळाली.
19 Jan 2018 - 5:13 pm | चौकटराजा
माझी सध्याची मूत्र यूरिया व क्रिआटिनिन रिडिंग सामान्य आहेत. पण मायक्रोअल्बौमिन ३० आहे . याचा अर्थ चाळनीत बिघाड व्हायला सुरूवात झाली आहे. याला किडनी फेल्युअर स्टेज २ असे नाव आहे.
19 Jan 2018 - 5:51 pm | कुमार१
अनुभव लिहिल्याबद्दल आभार.
तब्बेतीची काळजी घ्यावी
1 Jan 2018 - 7:56 pm | Nitin Palkar
अतिशय माहितीपूर्ण!
'प्रोस्टेटची मोठी वाढ' या संबंधी अधिक माहिती द्याल का? यावर शस्त्रक्रिया हाच उपाय आहे का?
1 Jan 2018 - 8:24 pm | कुमार१
प्रोस्टेटची मोठी वाढ >>> ही दोन कारणांनी असते:
१. वयानुरुप होणारी सौम्य (Benign)
२. तिच्या कर्करोगाने होणारी (malignant)
तूर्त वयानुरुप होणारी सौम्य (Benign)चाच विचार करू :
१. पारंपरिक उपचार - शस्त्रक्रिया
२. अलिकडे काही औषधांमुळे ती वाढ बर्यापैकी रोखणे शक्य होत आहे.
एका सर्जन मित्राने सांगितले की कालौघात ह्या आजाराचा उपचार "सर्जिकल" कडून "मेडिकल" कडे झुकत आहे. हे वाक्य पूर्ण खरे झाल्यास ते रुग्णांस वरदान ठरेल.
टीप : वरील माहितीबाबत तज्ञां मध्ये मतांतरे असतील, हे नक्की. तेव्हा "आपापल्या डॉ. चा सल्ला घ्या. "कोणती औषधे" हे मी इथे लिहीणार नाही. क्षमस्व.
1 Jan 2018 - 8:32 pm | Nitin Palkar
धन्यवाद!
1 Jan 2018 - 9:45 pm | प्रमोद देर्देकर
या आधी शरीरशास्त्रा विषयी इतक्या सोप्या भाषेत कधी वाचले नव्हते.
लिहीत रहा. अतिशय उपयोगी आहे. आम्ही सगळे भाग वा.खु. साठवत आहोत.
2 Jan 2018 - 7:11 am | कुमार१
सर्वांचे मनापासून आभार.
आपल्या सहभागा नेच चांगली चर्चा होत आहे
2 Jan 2018 - 10:42 am | आनन्दा
एक विनंती आहे, तुम्ही पहिले सगळे लेख गोळा करून एक लेखमाला तयार करावी.. जसे की समथिन्ग लाइक हसतखेळत शरीरशास्त्र किवा तत्सम.. म्हणजे आम्हाला शोधणे देखील सोपे जाईल.
2 Jan 2018 - 11:16 am | कुमार१
आनंदा, आभार.
अनुक्रमणिका करण्यासाठी साहित्य संपादकांना दोनदा विनंती करून झाली आहे.
अद्याप प्रतिसाद नाही.
तुम्ही काही सुचवता का?
2 Jan 2018 - 11:56 am | आनन्दा
सा सं कडून होणे शक्य नसेल तर पुढच्या भागात तुम्हीच मागच्य सगळ्या भागांच्य लिंक द्या. म्हणजे आपोआप ट्रॅक होइल
2 Jan 2018 - 12:06 pm | कुमार१
धन्यवाद, तसेच करेन
2 Jan 2018 - 8:06 pm | आदूबाळ
नमस्कार कुमार. अनुक्रमणिका करण्यात काही तांत्रिक अडचण येते आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत. दरम्यान, आनंदा यांनी सुचवल्याप्रमाणे तुम्ही प्रतिसादात लेखांचे दुवे टाकू शकल्यास तूर्तास प्रश्न सुटेल.
2 Jan 2018 - 8:11 pm | कुमार१
आबा, सहकार्याबद्दल आभारी आहे !
2 Jan 2018 - 8:26 pm | कुमार१
स.न.
माझ्या आरोग्य लेखमालेची अनुक्रमणिका करताना खालीलप्रमाणे फक्त ७ लेख घ्यावेत :
'इनसुलिन (१६/१०/ १७) पासून युरिआ.. (१/१/१८) पर्यन्त.
पुढे नवे होतील तसे कळवेन
आभार आणि नववर्ष शुभेछा !
24 Apr 2024 - 9:02 pm | चौथा कोनाडा
ही अनुक्रमणिका झाली की नाही या बद्दल उत्सुकता आहे.
25 Apr 2024 - 7:35 am | कुमार१
ती नाही होऊ शकलेली.
त्यानंतर कोविड19 लेखमालासाठी अनुक्रमणिका करावी अशी पण विनंती केली होती. परंतु संपादकांनी कळवले की अनुक्रमणिका करण्याचे काम बंद आहे.
2 Jan 2018 - 12:00 pm | उपेक्षित
किडनी स्टोन होऊ नये या साठी काही सोपे उपाय सांगू शकता का ?
2 Jan 2018 - 12:24 pm | कुमार१
ते होऊ नयेत यासाठी भारतीय हवामानात असे करता येईल:
१. दर २४ तासात २.५ ते ३ लिटर पाणी पिणे ( उन्हाळ्याच्या तीव्रतेनुसार ठरवणे)
२. ‘अ’ दर्जाची शहरे सोडून अन्यत्र राहणाऱ्यांनी पिण्याचे पाणी व्यवस्थित गाळून घेणे. यात सोप्या candle फिल्टर पासून लय भारी उपकरणांपर्यंत अनेक पर्याय आहेत. त्यावर फार चर्चा न करता आपल्या बुद्धीस पटेल ते वापरावे.
३. काय खाऊ नये .... वादग्रस्त आणि मतांतरे असलेला प्रश्न ! काहींच्या मते या भाज्या टाळा / कमी खा : आळू, पालक, मेथी, टोमाटो, कोबी व वांगे. यात oxalates जास्त असतात.
४. जर ‘युरीक असिड’ ची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढलेली असेल तर शाकाहारी व्हा; अंडे जरूर खा.
५. काय जास्त खा ?...... आहारतज्ञ सांगू शकतील.
६. फार लोकांचा सल्ला घेऊ नका, मनातील गोंधळ वाढेल !!
2 Jan 2018 - 7:08 pm | सुबोध खरे
आपल्या ताजमहालाला माझी एक वीट
Diet and renal stone formation.
वरील दुवा वाचावा.
यात सांगितलेला DASH आहार खालीलप्रमाणे
DASH आहार (Dietary Approaches to Stop Hypertension)
हा आहार म्हणजे भरपूर फळे भाज्या आणि कमी मलईचे दूध (होल ग्रेनस)म्हणजेच कोंडा न काढता केलेली पीठे ( मैद्यासारखे पदार्थ टाळून)
कमी चरबीयुक्त मांसाहार इ इ.
http://dashdiet.org/what_is_the_dash_diet.asp
हा आहार आणि भरपूर पाणी पिणे.
ज्यांना मुतखडा आहे त्यांनी रोज "कमीत कमी" तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे आणि जर उन्हात काम करत असलात तर या तीन लिटर मध्ये दर दोन तासाला अजून एक लिटर या दराने पाण्याचे प्रमाण वाढवावे. आपले पाण्याचे प्रमाण ३ लिटर पेक्षा जास्त असेल तर आपली मुतखडा होण्याची प्रवृत्ती ८० % ने कमी होते या
आपली लघवी जर दिवसात "अडीच लिटर" होत असेल तर आपले मुतखडे होण्याचे प्रमाण ६० % ने कमी होते.
स्रोत -- हॅरिसन टेक्सटबुक ऑफ इंटर्नल मेडिसिन
कॅल्शियम खाल्याने मूतखडा होतो हा एक गैरसमज आहे. असे असते तर तंबाखू /गुटखा खाणाऱ्या प्रत्येक माणसाला मुतखडा झाला असता.
उलट कॅल्शियम कमी घेतल्याने आहारातील ऑक्झलेट जास्त प्रमाणात शोषले जाऊन ऑक्झॅलेटचे खडे मात्र होतात.
त्यामुळे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ कमी करण्याचे काहीही कारण नाही.
आहारातील या भाज्या/ पाले भाज्या कमी करण्याचे कोणतेही कारण नाही कारण वरील भाज्या/ पालेभाज्या अन्न अल्कलाईन ठेवतात त्यामुळे मुतखड्याला प्रतिबंध होतो. मग त्यातील ऑक्झलेट जास्त असले तरी आपल्या आहारातील कॅल्शियम व्यवस्थित असेल तर चिंता करण्याचे कारण नाही.
2 Jan 2018 - 7:51 pm | कुमार१
सुबोध, तुमच्या सोन्याच्या ‘विटेबद्द्ल’ आभार !
अहो, हे ‘काय खाऊ नये’ बद्दल मूत्रशल्यविशारदांमध्ये देखील इतके मतभेद आहेत की आपण डॉक्टर सुद्धा गोंधळून जातो!
मला वाटते की तो पाण्याचा मुद्दा सर्वांनी ध्यानात घ्यावा एवढेच.
2 Jan 2018 - 8:30 pm | सुबोध खरे
पाण्याचा मुद्दा सर्वांनी ध्यानात घ्यावा एवढेच.
+१
माझ्याकडे येणार्या सर्व रुग्णांना मी एवढेच सांगतो. --
पाणी प्यायल्यामुळे केवळ लघवीला जास्त वेळा जावे लागेल हे सॊडले तर काहीही "नुकसान" नाही. पाणी फुकट मिळते. मी तुम्हाला जो सल्ला देतो आहे त्यात माझा "पाच पैशाचा" फायदा नाही. मी तुम्हाला कोणतीही जडीबुटी किंवा तत्सम औषध देत नाही. ( अशा कोणत्याही किंवा आयुर्वेदिक अथवा होमीयोपॅथीक औषधाने खडा गेलेला मी गेल्या २७ वर्षात पाहिलेला नाही). मुतखडा होण्याची तुमची प्रवृत्ती आहे त्यासाठी आयुष्यभर औषध घेणे हा अनैसर्गिक उपाय आहे. आयुष्यभर पाणी पिणे यात अनैसर्गिक काहीच नाही. बाकी सर्व आपली मर्जी.
मुतखडयाचे ६० रुग्ण आणि पित्ताशयातील खडयाचे जवळजवळ ४५ रुग्ण मी तीन वर्षे पर्यंत सोनोग्राफी करून पाठपुरावा केला (याचे मुळ असे आहे पुण्यात मी १९९१ ते १९९७ या काळात ए एफ एम सी ला क्ष किरण विभागात कामाला होतो तेंव्हा आलेले लष्करातील (सैन्य आणि वायुसेना) यातील रुग्ण जेंव्हा वरील खड्यांचे निदान होत असे तेंव्हा त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जात असे. बरेच रुग्णांनी मला असे विचारले कि आम्ही आयुर्वेदिक किंवा होमियोपथिक उपचार करून पाहू का? मी त्यांना हो असे सांगत असे.आणि जुना रिपोर्ट घेऊन सहा महिन्यांनी परत या असे सांगत असे. त्यावर ते सर्व आपापल्या माहितीच्या आयुर्वेदिक किंवा होमियोपथिक डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत असत. यात पुण्यातील अत्यंत कीर्तिमान आणि दिग्गज डॉक्टर आहेत आत्ता मला आठवते आहे त्यात डॉक्टर हबू (होमेओपाथ) वैद्य खडीवाले, वैद्य वेणी माधव शास्त्री जोशी, वैद्य चंद्रशेखर जोशी आणि इतर.
हे सर्व रुग्ण लष्करातील लोक असल्याने त्यांना सोनोग्राफी फुकट असे.असे वर म्हटल्याप्रमाणे मी रुग्ण ३ वर्षे पर्यंत "पाठपुरावा" केला.माझ्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे एकही रुग्णाचा एकही खडा गेल्याचे मला आढळले नाही(मुतखडा १ सेमी पेक्षा कमी असेल तर तो स्वतः हून मुत्रावाटे निघून जाऊ शकतो असे रुग्ण यात गृहीत नाहीत)
यामुळे पित्ताशयातील खडे किंवा मुतखडा या रोगांवर आयुर्वेदिक किंवा होमिओपथि च्या औषधाचा उपयोग होतो असे मला वाटत नाही.
या तपासणी मध्ये माझा वैयक्तिक पूर्वग्रह (bias) आधुनिक वैद्यकशास्त्राकडे आहे हे गृहीत धरले तरी दृष्टीस दिसणाऱ्या गोष्टी दृष्टीआड करणे मला तरी पटत नाही.http://www.misalpav.com/comment/459557 या धाग्यावर मी वरील प्रतिसाद दिला होता.
3 Jan 2018 - 12:37 pm | महेश हतोळकर
साध्या पाण्यापेक्षा शहाळ्याचे पाणी जास्त लाभदायक असते असे म्हणतात. कितपत खरं आहे हे?
3 Jan 2018 - 12:57 pm | कुमार१
मूतखड्यांच्या संदर्भात ते पाण्यापेक्षा अधिक उपयुक्त आहे असे काही सिद्ध झालेले नाही.
त्याचा काहीसा अल्कलाईन गुणधर्म हा विशिष्ट खडे विरघळवण्यासाठी उपयोगी पडेल. पण भरपूर पाणी पिणे हे अधिक महत्वाचे आहे.
बाकी जुलाब होत असताना त्याचा 'सलाइन' सारखा परिणाम उपयुक्त आहे.
3 Jan 2018 - 1:32 pm | महेश हतोळकर
धन्यवाद
16 Feb 2018 - 1:01 pm | उपेक्षित
धन्स kumar जी आणि खरे डॉक
उशिराने पोच देतोय क्षमस्व...
16 Feb 2018 - 2:00 pm | कुमार१
उपेक्षित, आभार.
अहो, क्षमस्व नको! आरोग्यविषयक लिखाण वाचले जातेय हे बघून समाधान वाटते
21 Jun 2018 - 7:13 pm | माझीही शॅम्पेन
डॉक्टर साहेब , ह्या वर जास्त प्रकाश टाकू शकाल का ? मी तुमचा युरिक ऍसिड / गौट चा लेख वाचला आहे पण अंड कस काय उपयुक्त आहे हे कळेना , सध्या मी युरिक ऍसिड लेव्हल जास्त झाल्याने उपचार घेत आहे
तुमचे लेख इतके सुंदर आहेत कि अगोदरच पोच द्यायला हवी होती , क्षमस्व !!!
21 Jun 2018 - 7:26 pm | कुमार१
धन्यवाद. सांगतो.
शाकाहारी व्हा म्हणजे लाल मांस व मासे बंद करा कारण त्यात Purines चे प्रमाण खूप आहे.
याउलट अंड्यात purines कमी असल्याने ते खाल्ले तरी युरिक पातळी विशेष वाढणार नाही.
मथितार्थ:
कुठले तरी प्राणिज अन्न खायचेच असेल तर अंडे जरूर चालेल; त्याने गाउट ला फायदा नाही होणार .
13 Nov 2018 - 1:39 pm | माझीही शॅम्पेन
धन्यवाद डॉक्टर साहेब , खूप दिवसांनी प्रतिसाद देतोय राग नका मानू , गाऊट साठी काय खाऊ नये हैच लिस्ट मोठी होत चाललीये
तुम्हाला थोडा वेळ असेल तर , भाज्या , फळे , कंदमुळे ह्यात काय निर्धास्तपणे खाऊ शकतो ह्याची लिस्ट देता येईल , आंतरजालावर कधी कधी परस्परविरोधी माहिती मिळते , जस काही जण म्हणतात मोड येणारी कडधान्ये अजिबात खाऊ नये , काही म्हणतात कडधान्ये थोड्या फार प्रमाणात चालतात
13 Nov 2018 - 2:10 pm | कुमार१
मोड येणारी कडधान्ये अजिबात खाऊ नये >>>> असहमत.
मूग, चवळी इ. मोड आणून शिजवून जरूर खा. पावटा, वाटाणा इ वर बंधन ठीक आहे. जर शाकाहारी अधिक अंडे खाणारे असाल तर उत्तम. मग आहाराचा फार विचार करू नका. मद्यपान नकोच.
अलीकडच्या संशोधनानुसार आहारापेक्षा जनुकीय घटक अधिक महत्त्वाचे आहेत.
ते लक्षात घ्या व मस्त जगा !☺️
2 Jan 2018 - 4:52 pm | सान्वी
धन्यवाद, तुमच्या मालिकेमुले खूप प्रश्नांची उत्तरे मिलत आहेत. सध्या वारंवार ऐकू येण्यार्या विशेषत: स्त्रीयांच्या संदर्भात थायराइड किंवा TSH बद्दल ही लिहावे ही विनंती.
2 Jan 2018 - 5:53 pm | कुमार१
सानवी, आभार
थायरॉईड हा अर्थातच माझ्या यादीतील विषय आहे
नक्की लिहिणार !
2 Jan 2018 - 6:19 pm | सान्वी
धन्यवाद आणि आभार. पुलेशु
3 Jan 2018 - 11:54 am | urenamashi
कुमार सर,आपण अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी लेखमाला चालू केल्यामुळे अगम्य असणारी वैद्यकीय माहिती तेही अतिशय सोप्या भाषेत मिळत आहे. त्यामुळे खूप खूप आभारी आहे
3 Jan 2018 - 12:28 pm | कुमार१
उरेनामाशी, आभारी आहे.
वाचकांना माला उपयुक्त वाटली याचे समाधान आहे
तुमच्या Id बद्दल कुतूहल आहे. हे आडनाव आहे की अन्य काही?
3 Jan 2018 - 9:08 pm | अनिंद्य
@ कुमार१,
तुमच्या वैद्यकीय विषयावरच्या लेखांची यादी ह्या लेखाच्या प्रारंभी दिली हे उत्तम झाले.
सोप्या शब्दात माहिती सांगण्याची तुमची हातोटी आवडते. प्रतिसादकर्त्याच्या शंका-प्रश्नांना उत्तर देण्यास तुम्ही अजिबात कंटाळा करत नाही हे अधिकच आवडते.
पु भा प्र,
अनिंद्य
3 Jan 2018 - 9:22 pm | कुमार१
अनिंद्य, मनापासून आभार !
बाकी तुमचे माल दिव मस्त चालू आहे. त्यातले आवडणारे फोटो मी क्रमाने माझ्या मोबाइल च्या मुखपृष्ठावर घेत असतो ☺
नववर्षाच्या शुभेच्छा!
4 Jan 2018 - 7:05 pm | कुमार१
या दोन पदार्थांच्या निमित्ताने काही मूत्रविकारांवर चर्चा केली याचे समाधान आहे.
मुतखडे व प्रोस्टेट या नेहेमी च्या आजारांवर चर्चा होणे स्वाभाविक होते
तसेच मूत्रपिंड विकार व उच्च रक्तदाब यांचे एकमेकांशी असलेले दुष्टचक्राचे नाते समजावता आले
या मालेतील पुढचा लेख काही दिवसांनी लिहीन. त्यामध्ये एक महत्त्वाचे प्रथिन आणि एक अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय यांचे विवेचन असेल
तोपर्यंत रजा घेतो.
धन्यवाद!
26 Jan 2018 - 12:47 pm | OBAMA80
कुमारजी, सोप्या शब्दात ही एरवी किचकट वाटणारी माहिती सांगण्याची तुमची शैली आवडली. बर्याच गोष्टी नव्याने कळाल्या.
उच्च रक्तदाब व आजकाल सगळ्यांना भेडसावणारा मधुमेह यावर सविस्तर लिहावे ही नम्र विनंती.
26 Jan 2018 - 1:01 pm | कुमार१
ओबामा 80, आभारी आहे.
तुमच्या सूचनेची नोंद घेत आहे.
11 May 2018 - 10:07 am | कुमार१
मूतखडे हा साधारणपणे प्रौढांचा आजार मानला जातो. परंतु गेल्या दोन दशकांत हा विकार शालेय मुलांमध्येही वाढल्याचे दिसते आहे. अशा मुलांवर केलेल्या संशोधनातून एक नवी माहिती मिळाली आहे. असे खडे होण्यामागे प्रतिजैविकांचा(antibiotics) मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर हे महत्वाचे कारण आहे. खालील गटांतील प्रतिजैविके यास कारणीभूत आहेत:
१. Cephalosporins
२. Fluoroquinolones
३. Nitrofurantoin / methenamine
ही प्रतिजैविके मुलांतील श्वसनदाह आणि मूत्रमार्गदाह यासाठी उपचार म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जातात. तेव्हा त्यांचा हा दुष्परिणाम लक्षात घेता ती अत्यंत काळजीपूर्वक वापरली पाहिजेत.
24 May 2018 - 11:24 am | कुमार१
पिण्याच्या पाण्यातील रसायने आणि मूतखडे होण्याचा धोका हा सतत संशोधनाचा विषय आहे. अगदी प्रगत देशांत सुद्धा सर्व लोकांना “शुद्ध” पाणी मिळतेच असे नाही.
अलीकडील संशोधनातून पाण्यातील काही रसायने आणि मूतखडे व्हायचा धोका यावर अधिक प्रकाश पडला आहे.
१. धोका वाढवणारी पाण्यातील रसायने :
Trichloro propane
Organic Carbon
Trichloro acetic acid
Zinc
२. धोका कमी करणारी रसायने:
बाय कार्बोनेट
सेलेनियम
बेरियम
मॅग्नेशियम
सोडियम व पोटॅशियम.
20 Aug 2019 - 12:21 pm | MipaPremiYogesh
Sorry for very late reply. It's really superb narration, hats of you dr. Could you please write about Cirrhosis?
20 Aug 2019 - 12:36 pm | कुमार१
धन्यवाद !
आरोग्य लेखन कधीही वाचावे, त्यात उशीर मानू नये. तुमची सूचना चांगली आहे; विचार करेन.
20 Aug 2019 - 12:51 pm | जॉनविक्क
अगदी हेच समजून पेपरात येणाऱ्या आरोग्य विषयक पुरवण्या हटकुन वाचायचो, आणि काही आठवड्यातच माझी खात्री झाली की मी लवकरच कुठल्यातरी आजाराचा बली ठरणार. नुसती शिंक आली तरी जीव घाबरा होऊ लागला, अमुक तमुक तर चे हे सिपम्तम नाहीना :) शेवटी ते पुरवण्या वाचन मी बंद केले ते आपले लेख समोर येई पर्यंत असेच होते.
पण आपले लिखाण माझ्या आयुष्यातले पहिले असे लिखाण आहे जे वाचून मनात भीती न्हवे महितीने घर करायला सुरुवात केली. अतिशय धन्यवाद सर.
20 Aug 2019 - 1:08 pm | Rajesh188
कोणत्या तरी दोन घटकांच्या प्रमाणाचा ratio म्हणजे criatinin ना?
20 Aug 2019 - 1:54 pm | कुमार१
* जॉन, अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
अशीच उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न नेहमीच करेन.
* राजेश,
नाही, तुमचा गैरसमज दूर करतो. युरिआ व creatinine ही दोन स्वतंत्र रसायने आहेत. काही मूत्रपिंड विकारांत या दोन्हीच्या पातळीचे गुणोत्तर विचारात घेतात.
20 Aug 2019 - 3:32 pm | जालिम लोशन
हे पण मुत्रपिंडाच्या विकाराचे एक दृश्यलक्षण आहे का?
20 Aug 2019 - 4:02 pm | कुमार१
होय, हे महत्वाचे दृश्य लक्षण आहे. या आजारात रक्तात पाणी व सोडियम जास्त साठून राहते म्हणून सूज येते. गाला पेक्षा ती डोळ्यांभोवती असते.
7 Jan 2021 - 11:37 am | कुमार१
आधुनिक मूत्रपिंडशास्त्राचे पितामह म्हणून गौरविलेले डॉ. Donal O'Donoghue यांचे नुकतेच कोविडमुळे निधन झाले. त्यांना संशोधन कार्याबद्दल २०१८ मध्ये ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर हा मानाचा पुरस्कार मिळाला होता.
आदरांजली.
14 Mar 2024 - 7:24 am | कुमार१
जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त सर्व संबंधित रुग्णांना शुभेच्छा !
महाराष्ट्रातील वास्तव ( बातमी छापील मटा 14 मार्च 2024) :
१. गेल्या चार वर्षांमध्ये राज्यातील 1731 रुग्णांना मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत प्राण गमवावे लागले आहेत.
२. सध्या राज्यात सहा हजार रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत.
अपेक्षा :
१. अवयवदानासंबंधी जनजागृती वाढावी
२. कृत्रिम मूत्रपिंड संशोधन गेली अनेक वर्षे चालू आहे. त्यास गती मिळावी.
22 Mar 2024 - 5:51 pm | कुमार१
एकाच व्यक्तीत एकावेळी दोन मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण
(dual kidney transplant)
ही विशेष शस्त्रक्रिया दिल्लीच्या एम्स रुग्णालयात करण्यात आली. या घटनेतील ‘दाता’ 78 वर्षीय मेंदूमृत व्यक्ती होती तर ‘घेता’ डायलिसिसवर असलेली 51 वर्षीय स्त्री आहे. या घटनेत दाता व घेता या दोघांचीही शारीरिक परिस्थिती पाहता घेणाऱ्या व्यक्तीला दात्याचे एकच मूत्रपिंड कार्यासाठी पुरणार नव्हते.
नेहमी जेव्हा एखाद्या व्यक्तीत एकाच मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करतात त्यासाठी काही निकष ठरवलेले असतात. त्यामध्ये 65 वर्षावरील दाता निवडला जात नाही. परंतु भारतातील अवयवदानाची प्रतीक्षा यादी आणि पुरवठा यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेता काही रुग्णांच्या बाबतीत हे निकष शिथिल केले जातात.
65 वर्षे वयावरील दात्याची मूत्रपिंडे कमी कार्यक्षम असतात. या घटनेत त्याची दोन मूत्रपिंडे प्रत्यारोपित केली असल्याने ती घेणाऱ्या व्यक्तीला सुमारे दहा वर्षांचे आयुष्य तरी मिळेल अशी डॉक्टरांना आशा आहे.
22 Mar 2024 - 6:39 pm | नगरी
चौकटराजा काळजी घ्या.
मी या सर्व अहुभावूतून गेलो.
आणि जात आहे.
22 Mar 2024 - 7:46 pm | कुमार१
चौकटराजा यांचे २०२१मध्येच निधन झालेले आहे.
त्यांची आठवण येतच राहते..
25 Mar 2024 - 7:32 pm | सुधीर कांदळकर
पुढील मजकूर वाचतांना समाधान होते. वा! झकास. अद्यतन वाचतांना शेवटचे दोन परिच्छेद वाचतांना पुन्हां एकदा हा अनुभव आला. धन्यवाद.
21 Apr 2024 - 10:54 am | कुमार१
वयोमानानुसार होणाऱ्या प्रोस्टेट वाढीसाठी अलीकडे अनेक आधुनिक उपचार उपलब्ध होत आहेत. त्यापैकी एक नवा उपचार म्हणजे युरोलिफ्ट ही सोपी क्रिया.
यामध्ये डॉक्टरांच्या तपासण्याच्या खोलीतच संबंधित रुग्णाच्या मूत्रमार्गातून काही implants बसवले जातात. त्यांच्यामुळे प्रोस्टेट वर उचलली जाऊन ती मूत्रमार्गात अडथळा करत नाही. रुग्णाला कमीत कमी त्रास होणारी ही क्रिया आहे (minimally invasive procedure)
सध्या भारतात ती निवडक केंद्रांवर केली जात असून त्यामध्ये बंगलोर व पुण्याचा समावेश आहे.
पुण्यातली बातमी आजच्या छापील मटामध्ये आहे.