अनेक प्रश्न आणि काही सोल्युशन्स ! TCGN अर्थात टेक केअर गुड नाईट !

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
5 Apr 2019 - 12:59 pm

… तुम्ही नेटबॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग वापरता ?
तुमची मुले व्हॉट्स ॲप किंवा इतर कुठले नेट चॅटिंग करतात ?
तुम्ही फेसबुक सारखे सोशल मीडियावर अपडेटस ठेवता ?
तुम्ही तुमच्या ई-मेल अकाऊंटचा पासवर्ड किती दिवसांतून बदलता ?
यापैकी काहीही करत असाल तर तुमचा अविनाश नक्कीच होऊ शकतो !
बदलत्या टेक्नोलॉजीच्या या जमान्यात तुम्ही स्वत:चं , स्वत:च्या कुटुंबाचं, स्वत:च्या मालमत्तेचं संरक्षण करण्यास समर्थ आहात अशी खात्री आहे तुमची ? बदलत्या सामाजिक कक्षा, संस्कृती आणि लाइफ स्टाईल याचं संपूर्ण भान आपल्याला आहे असा विश्वास आहे तुमचा ? आपण आपल्या मुलांना शंभर टक्के ओळखतो असं हृदयापासून वाटतंय तुम्हाला ?
...मग नक्की पहा तुम्ही TCGN अर्थात टेक केअर अँड गुड नाईट !
एका संपन्न उच्च मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाची आणि त्या कुटुंबाने सायबर क्राईमविरुद्ध घेतलेल्या झुंजीची अनोखी कहाणी !
भर सभागृहात सुधीर देशपांडे सांगतो आहे आपला मित्र अविनाश पाठक याची, त्याच्या कुटुंबावर आलेल्या एका, घर उध्वस्त करणाऱ्या वादळाची कहाणी प्रेक्षकांना. सर्वांनी यातून बोध घ्यावा, शहाणे व्हावे आणि मुख्य म्हणजे बदलत्या नवनवीन टेक्नॉलॉजीबद्दल सर्वांनी स्वत:ला अपडेट ठेवावे म्हणून.
बारावीला मार्क कमी पडले म्हणून डिप्लोमा झालेला, आता वयाची पन्नाशी पार केलेला अविनाश मोठ्या कंपनी मध्ये उच्च पदावर नोकरीला आहे. पण सध्याच कंपनीने नवीन जबाबदारी सोपवली म्हणून व्ही आर एस घ्यायला निघालेला आहे. नवीन जबाबदारीमध्ये एक नवीन सॉफ्टवेअर शिकावे लागणार त्यानंतर पुढेही नवीन नवीन ट्रेंड्स शिकावे लागणार आणि नवीन काही शिकण्याची आता माझी तयारी नाही म्हणून मी व्ही आर एस घेतो आहे असं पत्नी आसावरीला सांगतो. बारावीला मार्क कमी पडले म्हणून आसावरी डॉक्टर होण्याचे स्वप्न सोडून एम. ए. सायकोलॉजी करून कौन्सेलर म्हणून काम करतेय. मोठा मुलगा (बारावीला भरपूर मार्क मिळवून)बी.इ. होऊन पुढे इंजिनिअरिंगचं उच्च शिक्षण घ्यायला अमेरिकेत, धाकटी मुलगी सानिका सेकंड इयर बी. कॉम. (बारावीला मार्क कमी पडले म्हणून !). या सगळ्यांची आर्थिक जबाबदारी पेलण्याइतकी पुंजी आपल्याकडे आहे, असा विश्वास आसावरीकडे व्यक्त करताना, अमेरिकेतील मुलगा स्वत:ची आर्थिक गरज स्वत: काही प्रमाणात तरी पुरी करेल, अशी सार्थ अपेक्षा ठेवून आहे. पण मुलगा त्यावर साफ पाणी फिरवतो आणि अजूनही आपल्याला बापाच्या पैशांची गरज असल्याचे स्पष्ट करतो. कुटुंबियांच्या साशंक भूमिकांच्या पार्श्वभूमीवर, आर्थिक स्थितीबद्दल आणि स्वत:च्या क्षमतेबद्दल पूर्ण आत्मविश्वास ठेवून अविनाश व्ही आर एस घेतो, आपली अधुरी स्वप्ने जगण्यासाठी, आणि एका वेगळ्याच नाट्याला सुरुवात होते !
व्ही आर एस ची सेंडऑफ पार्टी एन्जॉय करताना त्याचा जिवलग मित्र मोहन आणि त्याची पत्नी प्रज्ञा त्याला अमेरिकेत असलेल्या मुलाबद्दल ऐकले ते खरे काय असे विचारतात. म्हणजे तो एका अमेरिकन मुलीबरोबर लिव्हइन मध्ये राहतो हे खरे काय असे विचारतो. हे ऐकून टेबलाशी बसलेली सानिका आणि मोहनची मुलगी पौर्णिमा एकमेकीत नेत्रपल्लवी करून उठून जातात. अविनाश व आसावरी याबद्दल माहिती नसल्याचे सांगतात असे सांगतात की आम्ही मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन वाढवले आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मोहन व त्याची पत्नी प्रज्ञा मात्र जुन्या विचारसरणीचे. आपल्या मुलीवर काटेकोर नजर ठेऊन तिला आधुनिक राहणीमानाचे कोणतेही स्वातंत्र्य देत नसतात.
युरोप फिरून यायचे आपले पहिले स्वप्न पूर्ण करताना अविनाश आसावरीचा आर्थिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हसून सोडून देतो. युरोपमधून आल्यावर विमानतळावरून घरी परत येण्याआधीच त्याला पहिला धक्का बसतो. मोहनचा फोन येतो की अविनाशने त्याला उसने म्हणून देऊ केलेल्या पाच लाख रुपयांचा चेक बॅंकेत बॅलन्स नाही म्हणून बाऊन्स झालाय. बॅंकेत पन्नास लाख असताना चेक बाऊन्स झाला याचा अविनाशला धक्का बसतो. बॅंकेत फोन करायला गेल्यावर दुसरा धक्का बसतो. ते युरोपला जाताना त्याचा मोबाईल ऑफ केलेला तो ऑन केल्यावर सिम कार्ड चालत नाही. मग घरी न जाता ते परस्पर बॅंकेत जातात. तिथे गेल्यावर तिसरा धक्का बसतो. अविनाशच्या अकाउंट मध्ये पन्नास लाखांपैकी फक्त साडेचार लाख शिल्लक असतात ! आणि ही रक्कम त्याने स्वत:च विथड्रॉ केली असल्याचे रेकॉर्डला दिसत असते. प्रत्यक्षात युरोपला गेल्यानंतर अविनाशने काहीही रक्कम काढलेली नाही !
पोलिसात रीतसर तक्रार करून झाल्यावर सायबर क्राईमचे इन्स्पेक्टर पवार सांगतात की प्रोसिजरप्रमाणे केसचा तपास यथावकाश लागेल पण पैसे परत मिळतील याची गॅरंटी नाही !!
कपाळाला हात लाऊन अविनाश आणि आसावरी घरी येतात तर आणखी एक संकट वाट पहात असतं.
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सानिकाचा एक संशयास्पद व्हिडीओ कुठल्यातरी साईटवर व्हायरल झाल्याचे सानिका त्यांना सांगते. आणि तो खरा असल्याचेही सांगते. पण तो कोणी केला, ज्या व्यक्तीसह तो चित्रित झाला त्याचा ठावठिकाणा काहीही तिला माहिती नसते. त्याचे तिला माहिती असलेले नाव अर्थात बोगस आहे हे समजते.
पोलिसांच्या तपासावरून हे उघडकीस येते की अविनाशच्या अकाउंटमधून पैसे उडवणारा व ‘तो’ व्हिडीओ टाकणारा माणूस एकच आहे !
...आता शिल्लक असलेल्या साडेचार लाखात कसे काय भागवायचे या विचारात चाचपडत असतानाच दुसऱ्या दिवशी मोहनचा फोन येतो की त्यःची मुलगी पौर्णिमा हॉस्पिटलमध्ये असून ती सिरिअस आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आणखी एक धक्कादायक गोष्ट समजते.
पौर्णिमा ही आदल्या दिवशी कुठल्यातरी फालतू दवाखान्यात जाऊन अबॉर्शन करून आलेली होती आणि तिथून दोन दिवस आपल्या मित्राकडे जाऊन राहण्यासाठी निघाली असताना जबरदस्त ब्लीडींग झाल्यामुळे रस्त्यातच पडली !
ही गोष्ट तिच्या आईवडिलांना म्हणजे मोहन आणि प्रज्ञाला, तिला कुणीतरी हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर समजली !
हे एकामागून एक असे धक्के व्ही आर एस घेतलेला अविनाश पचवू शकत नाही. तो कोसळतो. आधी तो आणि आसावरी एकमेकांना दोष देतात.
..पण मग नंतर अविनाश जिद्दीने उभा राहतो. पत्नी आणि मुलीला विश्वासात घेतो, त्यांना आश्वासित करतो आणि या चोराचा छडा लावण्यासाठी पत्नी आणि मुलीच्या तसेच पोलिसांच्या मदतीने सुचेल ते करतो.
...आणि अखेरीस ‘त्या’ चोराचा छडा लावण्यात यशस्वी होतो !
कसा ? ते प्रत्यक्ष चित्रपटातच पहा !!
चित्रपटाचे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक आणि दमदार आहे. ही जणू तुमची आमचीच कहाणी आहे. आपल्या आजूबाजूलाच घडणारी , रोजच्या जीवनात कानावर येणारी. त्यामुळे प्रेक्षक कथानकाशी चटकन रिलेट होतात. चित्रपटात कोणतीही फिल्मी स्टाईल नाही तरीही चित्रपट अतिशय वेधक झाला आहे. शेवट तर अतिशय हृदयस्पर्शी आहे.
सुधीर अविनाशची ही सगळी कहाणी प्रेक्षकांना सांगून सभागृहाच्या बाहेर पडतो आणि गाडीत वाट बघत बसलेल्या मुलीसह बाहेर रस्त्यावर येतो. तो मुलीला म्हणतो की माझ्या कार्यक्रमासाठी तू सभागृहात येऊन का बसत नाहीस ? तेव्हा ती म्हणते की बाबा मी तिथे आले तर तुम्हाला शरमिंदे वाटेल. तुम्हाला माझी लाज वाटते !
...जेव्हा तुम्ही हे सांगण्याचे धाडस कराल की ही तुमचीच कहाणी आहे तेव्हा मी सभागृहातच नव्हे तर स्टेजवर येऊन बसेन आणि मी केली तशी चूक तुमच्यापैकी कुणी करू नका असे आवर्जून सांगेन !
थोडक्यात, ही कहाणी माझीच आहे हे सांगायचे धाडस पन्नाशी पार केलेल्या सुधीरकडे नाही पण अजून विशीसुद्धा न ओलांडलेल्या, नव्या पिढीची प्रतिनिधी सानिकामध्ये आहे !
अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट पाहण्यास उपलब्ध आहे. अवश्य पाहावा आणि आपल्या मुलांनाही पाहण्यास सांगावा असा चित्रपट !

जीवनमानसमीक्षा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

5 Apr 2019 - 1:04 pm | विजुभाऊ

सिनेमाचे नाव सांगा की भाऊ

सस्नेह's picture

5 Apr 2019 - 1:14 pm | सस्नेह

तेच सांगून ऱ्हायलो ना भौ !
TCGN !

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Apr 2019 - 1:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

"टेक केअर गुड नाइट" हेच नाव आहे चित्रपटाचे.

जुना आहे. चित्रपटगृहात एक दोन वर्षांपूर्वी पाहिला आहे. नेहमीपेक्षा वेगळी पण सुंदर कथा आणि तेवढाच दर्जेदार अभिनय आहे.

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2019 - 1:16 pm | मराठी कथालेखक

चांगला चित्रपट आहे, मी थिएटरला पाहिला होता. कथानकापेक्षा अभिनय आणि संवाद यांमुळे अधिक मजा आली.

इरावती हर्षे एका प्रसंगात मुलीला म्हणते "आम्ही असा काही विचार केला नाही.. नसते एकेकाची बुध्दी.." (की असेच काहीसे शब्द होते आता नेमके आठवत नाहीत) ह्या प्रसंगातला म्हंटलं तर साधासाच विनोद पण अभिनयाने अगदी परिणामकारक झाला आहे आणि थिएटरमध्ये भरपूर हशा वसूल करतो.

कुमार१'s picture

5 Apr 2019 - 2:16 pm | कुमार१

+ १

तुषार काळभोर's picture

6 Apr 2019 - 6:16 am | तुषार काळभोर

ओळख पण चांगली करून दिलीय.

मराठीत अशा विषयावरचा सिनेमा आला म्हणून आश्चर्य वाटलेले, पण 'असा आधुनिक' विषय असूनही चांगला बनलाय.

चांगला कालसुसंगत विषय या सिनेमात हाताळला आहे.

मांडणीही उत्तम केली आहे. अवश्य पाहण्याजोगा.

हा लेखही उत्तम.

हा लेख वाचला आणि काल सिनेमा पाहिला. आवडला. प्रमुख व्यक्तिरेखांइतकीच महेश मांजरेकरांनी साकारलेली भूमिकासुद्धा आवडली.

असंका's picture

7 Apr 2019 - 2:16 pm | असंका

नक्की बघणार...

धन्यवाद या सुरेख ओळखीबद्दल....!!

लई भारी's picture

30 Apr 2019 - 11:54 am | लई भारी

तुमच्या या धाग्यामुळेच हा चित्रपट आवर्जून बघितला. सर्वांनी निश्चित बघायला हवा.
ओळखीच्या लोकांमध्ये सिम-क्लोनिंग किंवा डुप्लिकेट-सिम वापरून केलेले फ्रॉड बघितले आहेत. त्यामुळे आपण सगळेच याला बळी पडू शकतो.
सगळ्यांनीच सावध राहायला हवं हे खरंय!

लई भारी's picture

30 Apr 2019 - 12:04 pm | लई भारी

बाकी, सगळ्यांनी काम छान केलंय! मांजरेकरांच काम पण चक्क आवडलं :)
"मला हे इंटरनेट, मोबाईल कळत नाही; पण तरी सुद्धा मला जमेल तसा मी छडा लावणारच!" हा ऍटिट्यूड आणि "आपण एवढे कोलमडलोय, तर मुलीची काय अवस्था असेल? तेव्हा आपण तिच्या सोबत राहूया!" हे आवडलं.

थोडक्यात, ही कहाणी माझीच आहे हे सांगायचे धाडस पन्नाशी पार केलेल्या सुधीरकडे नाही पण अजून विशीसुद्धा न ओलांडलेल्या, नव्या पिढीची प्रतिनिधी सानिकामध्ये आहे !

हे अगदी जाणवलं!

इरामयी's picture

18 Jul 2019 - 11:50 am | इरामयी

Interesting. हा चित्रपट चित्रपटगृहांत आलाच नाही का?

तुषार काळभोर's picture

18 Jul 2019 - 1:34 pm | तुषार काळभोर

गेल्या रैवारी टीव्हीवर पण दाखवला.

जालिम लोशन's picture

20 Jul 2019 - 12:07 am | जालिम लोशन

नक्की बघणार, सांगितल्या बद्दल धन्यवाद.

नाखु's picture

20 Jul 2019 - 5:07 pm | नाखु

दोन्ही मुलांसोबत पाहिला, भन्नाट चित्रपट आहे.
आणि नातेसंबंधात गृहित धरले तर काय काय होते ते फार विलक्षण पद्धतीने दाखविले आहे.

धन्यवाद एका चांगल्या चित्रपटांची शिफारस केल्याबद्दल.

मध्यमवर्गीय मिपाकर नाखु पांढरपेशा

जेम्स वांड's picture

20 Jul 2019 - 5:38 pm | जेम्स वांड

हा सिनेमा वॉच लिस्ट मध्ये ऍड केलाय!.

मदनबाण's picture

20 Jul 2019 - 5:42 pm | मदनबाण

पहायला हवा असे वाटते...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आई शप्पथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना... :- MALAAL

मुक्त विहारि's picture

23 Jul 2019 - 6:34 am | मुक्त विहारि

धन्यवाद. ..

सिनेमा बघीनच असे नाही, पण परिक्षण वाचून उत्सुकता वाढली.

श्वेता२४'s picture

26 Jul 2019 - 5:05 pm | श्वेता२४

वेगळी कथा आहे. नक्की पहावा, विशेषत: आजची तरुणाई व त्यांचे पालक यांचे भावविश्व नेमके पकडले आहे.

साधारण याच ष्टोरीचा एक इंग्रजी शिनेमा पाहिला आहे.
आता नेमके नाव आठवत नाही.
सचिन खेडेकर ने सिंघम मधे रंगवलेला गोट्या सोडला तर त्याचे दुसरे कोणतेही काम आवडले नाही.
अविनाश नारकर सारखा हा पण दिसला की डोक्यातच जातो.
पैजारबुवा,

गड्डा झब्बू's picture

26 Jul 2019 - 5:42 pm | गड्डा झब्बू

मगतर हा शिणुमा बघूच नका तुम्ही. इतका कृत्रिम अभिनय वाटतो त्याचा कि मेंदूला पुरळच येईल!
बाकी सगळ्यांची कामे चांगली आहेत पण नटसम्राट सचिन खेडेकर पक्का डोक्यात गेला.