पित्तखडे आणि पित्ताशयदाह
तेल आणि तूप हे आपल्या आहारातले प्रमुख मेद पदार्थ. स्वयंपाक रुचकर होण्यात त्यांचे मोठे योगदान असते. मात्र हे मेद पचण्यास तसे जड असतात. त्यांचे पचन सुलभ होण्यासाठी आपल्या पचनसंस्थेतील पित्ताची (bile) खूप गरज असते. पित्त हा पाचकरस मुळात यकृतात तयार होतो आणि नंतर तो पित्त्ताशयात साठवला जातो. पित्तरसामध्ये अनेक घन पदार्थ असतात. त्यातील काही घटकांचे एकमेकाशी असलेले तुलनात्मक प्रमाण हे महत्वाचे असते. जर काही कारणाने यात बिघाड झाला तर पित्तखडे निर्माण होतात. त्यातून पुढे अन्य काही समस्या निर्माण होऊ शकतात. हा आजार समाजात बऱ्यापैकी आढळतो. त्याची मूलभूत माहिती करून देण्याचा या लेखाचा उद्देश आहे.
लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधारे असेल:
१. पित्ताशय : रचना व कार्य
२. पित्तातील घटक पदार्थ
३. पित्तखडे : निर्मिती आणि प्रकार
४.आजाराची कारणमीमांसा
५. लक्षणे व रुग्णतपासणी
६.आजाराचे दीर्घकालीन परिणाम
७ .प्रयोगशाळा व प्रतिमा चाचण्या
८. उपचार आणि प्रतिबंध
पित्ताशय : रचना व कार्य
आपल्या पचनसंस्थेतील यकृत, पित्ताशय (gall bladder) आणि लहान आतडे यांचा संबंध खालील चित्रात दाखविला आहे. यकृत आणि पित्ताशयांच्या नलिका एकत्र होऊन अखेर लहान आतड्यांत उघडतात. त्याद्वारे पित्तरस हा पचनादरम्यान आतड्यांत सोडला जातो.
पित्तरस प्रथम यकृतात तयार होतो. पुढे तो नलिकांद्वारे पित्ताशयात पोचतो. तिथे सुमारे ५० मिली रस एकावेळेस साठवलेला असतो. पित्ताशयात त्यातील पाणी शोषले जाऊन तो अधिक दाट होतो.
जेव्हा अन्नातील मेद लहान आतड्यांत शिरतात तेव्हा तिथून CCK हे हॉर्मोन स्त्रवते. त्याच्या प्रभावामुळे पित्ताशयाचे आकुंचन होऊन त्यातील रस आतड्यांत सोडला जातो. त्याच्यातील विशिष्ट क्षारांमुळे मेदाचे पचन होण्यास मदत होते.
पित्तातील घटक पदार्थ
यकृतातील पित्ताचे घटक असे:
• पाणी : ९७%
• पित्तक्षार : ०.७%
• बिलीरुबीन : ०.२%
• मेद पदार्थ : ०.५%
• अन्य क्षार
वरील मेद पदार्थांत कोलेस्टेरॉल, मेदाम्ले व लेसिथिन यांचा समावेश होतो. त्यापैकी कोलेस्टेरॉलचा एक मूलभूत गुणधर्म असा आहे की त्याचे छोटे खडे सहज तयार होऊ शकतात. पण, असे होऊ नये याची दक्षता लेसिथिनकडून घेतली जाते. या दोन्ही घटकांचे प्रमाण असे राखलेले असते की कोलेस्टेरॉल हे नेहमी विरघळवलेल्या स्थितीत राहते.
पित्तखडे : निर्मिती आणि प्रकार
पित्ताशयात पित्तातील पाणी शोषले जाऊन ते दाट होत असते. या प्रक्रीयेदरम्यान पित्तातील काही घन पदार्थ न विरघळलेल्या अवस्थेत राहू शकतात. जर त्यांचे प्रमाण वाढते राहिले तर मग ते लहान स्फटिकांच्या रुपात वेगळे जमा होऊ लागतात. पुढे ते तिथल्या म्युकसमध्ये पकडले जाऊन तिथे गाळ तयार होतो. कालांतराने अनेक छोटे स्फटिक एकमेकात विलीन होऊन पित्तखडे तयार होतात. हे खडे २ प्रकारचे असतात:
१. कोलेस्टेरॉलयुक्त आणि
२. बिलिरूबिनयुक्त.
आता या दोन्ही प्रकारांची कारणमीमांसा पाहू.
कारणमीमांसा
• कोलेस्टेरॉलयुक्त खडे: हे तयार होण्याची प्रक्रिया मध्यमवयानंतर वाढू लागते तसेच ते तुलनेने स्त्रियांत अधिक होतात. एखाद्या व्यक्तीत खालील घटक किंवा आजार असल्यास खडे होण्याची प्रक्रिया अधिक संभवते:
१. लठ्ठपणा
२. गरोदरपण : अनेक वेळा आल्यास
३. आजाराची अनुवंशिकता
४. मधुमेह व उच्चरक्तदाब
५. काही औषधांचे परिणाम: मुख्यत्वे गर्भनिरोधक गोळ्या आणि रक्तातील मेदाचे प्रमाण कमी करणारी काही औषधे.
हे खडे स्त्रियांत अधिक प्रमाणात का होतात हा कुतूहलाचा विषय आहे. स्त्रीच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही हॉर्मोन्स त्यास जबाबदार आहेत. त्यांच्या प्रभावाने पित्तरस अधिक दाट होतो, त्यातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते तसेच पित्ताशयाचे आकुंचनकार्य देखील मंदावते. अनेक वेळा गरोदर राहिलेल्या स्त्रियांत प्रोजेस्टेरॉनची पातळी सातत्याने वाढलेली राहते.( स्त्रीमध्ये पित्तखडे होण्याची ४ प्रमुख कारणे ‘F’ या अक्षराशी संबंधित आहेत : Fat Fertile Females ऑफ Forty ! ).
दीर्घकालीन मधुमेहात कोलेस्टेरॉलची रक्तपातळी वाढलेली राहते आणि पित्तात जाणाऱ्या कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते राहते.
• बिलिरूबिनयुक्त खडे
बिलिरूबिन हे रंगद्रव्य हिमोग्लोबिनच्या विघटनातून तयार होते. निरोगी अवस्थेत शरीरात रोज ठराविक प्रमाणात लालपेशी मृत होतात आणि मग त्यातल्या हिमोग्लोबिनच्या विघटनातून बिलिरूबिन तयार होते. लालपेशींच्या काही आजारांत नेहमीच्या कित्येक पट पेशी मरतात आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात बिलिरूबिन तयार होते. अशा वेळेस त्याचे पित्तातील प्रमाण वाढलेले असते. पुढे त्याचा कॅल्शियमशी संयोग होऊन काळ्या रंगाचे खडे तयार होतात.
काही रुग्णांत वरील दोन प्रकारच्या खड्यांचे मिश्रण होऊन ‘मिश्रखडे’ देखील बनू शकतात.
लक्षणे व रुग्णतपासणी
पित्तखड्यांची निर्मिती प्रक्रिया आपण वर पहिली. आता संबंधित रुग्णास त्याचा काय त्रास होतो ते पाहू. हा आजार झालेल्या सुमारे ५५% रुग्णांना या खड्यांचा कोणताच त्रास होत नाही. ते खडे पित्ताशयात शांत पहुडलेले असतात ! बाकीच्या रुग्णांत मात्र परिस्थिती बिघडते. पचनादरम्यान जेव्हा पित्ताशय आकुंचन पावते, तेव्हा त्याच्यात साठलेल्या खड्यापैकी १-२ खडे सरकून पित्तनलिकेत अडकतात. आता मात्र रुग्णास वेदना (colic) होते. ती सुमारे तासभर टिकते. नंतर पित्ताशय जेव्हा सैल पडते तेव्हा खडे पुन्हा नलिकेतून मागे जातात आणि त्यामुळे वेदना थांबते. एकदा का अशी प्रवृत्ती झाली की अशा प्रकारचा त्रास (attacks) अधूनमधून होत राहतो. तो किती काळाने होईल याचा काही भरवसा नसतो. जेव्हा जेवणात मेदांचे अधिक्य असते तेव्हा हा त्रास बळावतो.
ही वेदना जेवणानंतर साधारण तासात सुरु होते. रुग्णास पोटात मध्यभागी किंवा उजव्या बाजूस दुखते. ही वेदना सतत होत राहते आणि काही तास टिकते. त्याच्या जोडीला रुग्णास भरपूर घाम येऊन मळमळ व उलट्या होऊ शकतात. सुरवातीस बरेच रुग्ण हा acidity वा पचनाचा त्रास आहे असा तर्क करून त्यावरील सामान्य औषधे स्वतःच घेतात. पण त्याने काही फरक पडत नाही.
आजाराचे दीर्घकालीन परिणाम
एकंदरीत पाहता हा आजार कधी निद्रिस्त तर कधी उफाळून येतो. त्यामुळे आतड्यांत मेदांचे पचन बिघडत जाते. ज्या रुग्णांत खडे पित्तनलिकेत वारंवार अडकू लागतात त्यांच्यात कालांतराने काही अनिष्ट परिणाम दिसतात. पित्ताशय हळूहळू आकाराने मोठे होते आणि पुढे त्याचा दाह होतो. वेळप्रसंगी त्यात जंतूंची वाढ होऊ लागते. आजार खूप काळ वाढता राहिल्यास पित्ताशय कडक होते आणि त्याचे कार्य संपुष्टात येते. काही रुग्णांत हे खडे मुख्य पित्तनलिकेत वारंवार अडकू लागतात. जर का अशा अडकण्याने ती नलिका बंद झाली तर मग पित्त उलट्या मार्गे रक्तात उतरते. अशा रुग्णाच्या रक्तातील बिलिरूबिनचे प्रमाण वाढते आणि त्याला कावीळ झाल्याचे दिसते. क्वचित काही रुग्णांत स्वादुपिंडाचाही दाह होऊ शकतो.
प्रयोगशाळा व प्रतिमा चाचण्या
रुग्णास निव्वळ पित्तखडे झालेले असतील तर रक्त-लघवीच्या तपासण्यांची गरज नसते. मात्र जर त्याच्या जोडीने पित्ताशयदाह झाला असल्यास रक्तचाचण्या उपयुक्त असतात. त्यामध्ये रक्तपेशी, बिलिरूबिन आणि काही एन्झाइम्सची मोजणी यांचा समावेश होतो. आजाराच्या तीव्रतेनुसार या घटकांच्या पातळीत वाढ होते.
प्रतिमा चाचण्यांपैकी सोनोग्राफी (USG) ही चाचणी निदानासाठी सर्वोत्तम आहे. गरोदर स्त्रीवरदेखील ती निर्धोकपणे करता येते. या तपासणीत मध्यम व मोठ्या आकाराचे खडे सहज समजतात. तसेच दाहप्रक्रियाही समजते.
उपचार
(या लेखाची व्याप्ती फक्त आधुनिक वैद्यकातील उपचारांपुरती मर्यादित आहे. तथापि वाचकांनी त्यांना अन्य पद्धतीचे अनुभव असल्यास प्रतिसादांत जरूर लिहावेत).
आपण वर पहिले की बऱ्याच जणांना पित्तखडे झालेले असतात पण त्याचा कोणताही त्रास होत नसतो. किंबहुना त्या व्यक्तीत या खड्यांचा शोध अन्य काही कारणासाठी पोटाची सोनोग्राफी करताना लागतो ! अशा रुग्णांवर उपचाराची गरज नसते. फक्त नियमित काळाने सोनोग्राफी करून खड्यांचा अंदाज घेतात.
ज्या रुग्णांना आजाराची लक्षणे वारंवार जाणवू लागतात त्यांच्यासाठी उपचारांची गरज असते. आता उपचारांची फक्त रूपरेषा देत आहे.
या आजारासाठी ३ प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत:
१. औषधे
२. लिथोट्रिप्सी
३. पित्ताशय शस्त्रक्रियेने काढून टाकणे.
प्रत्येक रुग्णाच्या आजाराचे स्वरूप आणि गांभीर्य बघून योग्य त्या उपचाराची निवड केली जाते.
१. औषधे: ज्या रुग्णांत खड्यांचा आकार खूप लहान आहे, ते कोलेस्टेरॉलयुक्त आहेत आणि पित्ताशयाचे कार्य चांगले आहे, अशांमध्ये याचा विचार करता येतो. यासाठी पित्तक्षाराच्या गोळ्या खाण्यास देतात. त्याने खडे विरघळू शकतात. त्या दीर्घकाळ घ्याव्या लागतात आणि जेमतेम ४०% रुग्णांत त्याचा उपयोग होतो. त्यांच्यातही उपचार बंद केल्यावर खडे पुन्हा उद्भवण्याची शक्यता बरीच असते. हे सर्व पाहता या उपचारास डॉक्टर सहसा पसंती देत नाहीत. मात्र ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया अन्य काही कारणाने करता येत नाही अशांसाठी याचा विचार करतात. तसेच जे रुग्ण शस्त्रक्रियेस खूप घाबरतात त्यांच्या समाधानासाठी वेळप्रसंगी याचा तात्पुरता वापर करता येतो !
लिथोट्रिप्सी
हा उपचार शस्त्रक्रियेस पर्याय म्हणून काही रुग्णांत वापरता येतो. खडे जर लहान असतील आणि पित्ताशयाचे कार्य चांगले असेल तर याचा विचार करतात. या तंत्रात उच्च उर्जेच्या ध्वनीलहरी वापरून शरीरावर shocks दिले जातात. त्यामुळे आतील खडे फुटून त्यांचा भुगा होतो, जो पुढे पित्तनलिकेतून आतड्यांत पोचतो आणि त्याचा निचरा होतो. हे तंत्र रुग्णास भूल न देता सहज वापरता येते. पण, या उपचारानंतर खडे पुन्हा निर्माण होण्याची शक्यता राहतेच. काही रुग्णांत याच्या जोडीला औषधे देता येतात.
पित्ताशय शस्त्रक्रिया
वरील दोन उपचारांच्या मर्यादा पाहता हा उपाय सर्वोत्तम ठरतो. जेव्हा खड्यांचा त्रास वारंवार होऊ लागतो तेव्हा पित्ताशय काढून टाकण्याची शिफारस आहे. ही शस्त्रक्रिया आता बहुसंख्य रुग्णांत laparoscopic पद्धतीने करतात. यात पोटावर अगदी लहान छेद देऊन सुटसुटीत शस्त्रक्रिया करता येते. काही ठराविक रुग्णांत मात्र पारंपारिक जुन्या पद्धतीची शस्त्रक्रिया करतात. दोन्ही पद्धतींचे आपापले फायदे-तोटे असतात. पित्ताशय काढून टाकल्यानंतर काही रुग्णांत पित्तनलिकेत पुन्हा खडेनिर्मिती होऊ शकते. थोडक्यात, एकदा का हा आजार झाला की तो आयुष्यभर पिच्छा पुरवतो !
प्रतिबंध
पित्तखडे निर्माण होऊच नयेत यासाठी कोणताही ठोस उपाय नाही. परंतु ज्या रुग्णांत ते होण्याचा धोका अधिक असतो त्यांना पित्तक्षाराच्या गोळ्या देऊन पाहता येते. ज्या रुग्णांत खडे झालेले आहेत त्यांचा भावी त्रास (वेदना) कमी होण्यासाठी आहारातील मेदांचे प्रमाण मर्यादित ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे फायद्याचे ठरते.
समारोप
पित्तखडे हा मध्यमवयीन प्रौढांमध्ये बऱ्यापैकी आढळणारा एक पोटविकार. स्त्रियांत तो पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. आधुनिक आहार आणि जीवनशैलीने जे काही आजार वाढत्या प्रमाणात आढळू लागले त्यापैकी हा एक. पित्तखड्यांच्या २ प्रकारांपैकी कोलेस्टेरॉलयुक्त खडे जास्त प्रमाणात आढळतात.. पोटावरील अतिरिक्त चरबी, मधुमेह, उच्चरक्तदाब आणि मेदांची वाढलेली रक्तपातळी या समूहाचाच पित्तखडे हा एक सदस्य आहे. बऱ्याच रुग्णांत हे खडे निद्रिस्त असतात. पण जर का ते त्रास देऊ लागले तर त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे हितावह असते.
*********************************************************************
(चित्रे जालावरून साभार).
प्रतिक्रिया
7 Jul 2019 - 11:26 pm | Rajesh188
हा प्रश्न ह्या लेखा शी संबंधित नाही .
शरीरातील सर्व अवयव हे अत्यंत शिस्तीत काम करत असतात .हे कसे काय
शरीर नामक biological इंजिन उत्तम रित्या चालावे म्हणून avshkaya ते घेणे आणि जे नको ते नाकारणे हे कोणती यंत्रणा ठरवते .
शरीर नामक biological इंजिन ची योग्य रचना पुरुष आणि स्त्री chya मिलनाने होते .
पण जी रचना होते आहे ती योग्यच आहे हे ठरवून त्या प्रमाणे मानवी biological इंजिन
चा निर्मिती होते त्या वर supervision kon karat
8 Jul 2019 - 4:42 am | जॉनविक्क
उदा. जेवण झाले की पचनक्रिया काम सुरु करते अन्न पुढे सरकत राहते, जो पर्यंत काही गडबड झालेली नसते मेंदू या संदर्भातील आवश्यक त्या सूचनांचे शरीरासोबत दळणवळण विनातक्रार(?) करत राहतो आणि जर काही गडबड होत असेल तर त्याची लक्षणेही प्रकट करतो.
8 Jul 2019 - 12:10 am | Rajesh188
आणि सर्व काही dna आणि गुणसूत्र हे ठरवतात हे सांगू नका.
8 Jul 2019 - 7:45 am | कुमार१
फक्त पचनसंस्थेशी संबंधित विषयावर चर्चा व्हावी ही सूचना.
धन्यवाद.
8 Jul 2019 - 8:13 am | सुधीर कांदळकर
पित्त खवळणे हा वाक्प्रचार वापरला जातो.
भावनोद्रेकाचा पित्तविकाराशी काही संबंध कह्रेच आहे का?
मालिकेतील आणखी एक माहितीपूर्ण, मुद्देसूद, नीटनेटका आणि तरीही सुंदर लेख. अतिशय कठीण विषय कुशल मांडणीमुळे सोपा करून दाखवला आहे. धन्यवाद.
या दोन वाक्यांमधून आपले लेखन किती पूर्वग्रहविरहित आणि संतुलित आहे हे ध्यानात येते. हॅट्स ऑफ.
8 Jul 2019 - 2:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
मालिकेतील आणखी एक माहितीपूर्ण, मुद्देसूद, नीटनेटका आणि तरीही सुंदर लेख. अतिशय कठीण विषय कुशल मांडणीमुळे सोपा करून दाखवला आहे.
+१०००
8 Jul 2019 - 9:47 am | कुमार१
सुधीर, उत्साहवर्धनाबद्दल आभार !
भावनोद्रेकाचा पित्तविकाराशी काही संबंध आहे का?
>>>>>>>>तुम्ही हा प्रश्न विचारला ते बरे झाले. त्यानिमित्ताने एक खुलासा.
यकृताचा पाचकरस Bile आहे. त्याचे पारंपरिक भाषांतर आपण ‘पित्त(रस)’ असे करतो. मात्र आयुर्वेदानुसार “पित्त” ही अगदी वेगळी संकल्पना आहे. एका आयुर्वेदाचार्यांचे मतानुसार ‘ Bile = पित्त’ हे भाषांतर चुकीचे आहे.
या लेखातील पित्तरस = bile, ज्याचा संबंध पचनापुरता आहे.
भावनोद्रेक व “पित्तविकार” ही आयुर्वेदिक संकल्पना असावी. माझा त्याचा अभ्यास नाही.
8 Jul 2019 - 11:53 am | उगा काहितरीच
यानंतर रुग्णाला काही त्रास होतो का ? पित्ताशय हे १००% निरूपयोगी तर अवयव नाही. (अशी माझी समजूत आहे.) मग ज्या रुग्णात पित्ताशय काढून टाकले आहे त्याच्या दैनंदिन जीवनात काय फरक पडतो ?
8 Jul 2019 - 12:17 pm | कुमार१
*
पित्ताशय काढून टाकण्यानंतर रुग्णाला काही त्रास होतो का ?
>>>>सुमारे १०% रुग्णांना दीर्घकालीन जुलाब होतात.
*
पित्ताशय हे १००% निरूपयोगी तर अवयव नाही. (अशी माझी समजूत आहे.
) >>>>निरुपयोगी नाही, पण ‘जगायला’ अत्त्यावश्यक नाही !
*
मग ज्या रुग्णात पित्ताशय काढून टाकले आहे त्याच्या दैनंदिन जीवनात काय फरक पडतो ?
>>>मेदांचे पचन निरोगीपणाइतके व्यवस्थित होत नाही. पण हळूहळू पचनसंस्था जमवून घेते. अशा व्यक्तीने एका जेवणात मोजके मेद (३ ग्राम पर्यंतच) खावेत. थोडक्यात २ मोठी भरपेट जेवणे टाळून ५ मोजकी जेवणे करणे हितावह.
8 Jul 2019 - 12:18 pm | Rajesh188
पित्त वाढण्याचे परिणाम विविध व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे होतो का?
म्हणजे मी दोन प्रकारचे परिणाम बघितले आहे पित्त वाढले की काही लोकांना उलटी होते आणि पित्त बाहेर टाकले जाते .
तर काही लोकात ते अंगावर बाहेर फेकले जात नाही त्या मुळे अंगावर पुरळ येतात .
हे असे का असेल डॉक्टर
8 Jul 2019 - 12:44 pm | कुमार१
राजेश,
एकूणच ‘पित्त’ या शब्दाबाबत समाजात गोंधळ आहे.( तूर्त आपण आयुर्वेदातील “पित्त(प्रकृती)” बाजूला ठेवू. )
आता काही खुलासा:
१. आपल्या जठरात तीव्र HCl हे आम्ल असते. त्याच्या अधिक्याने बऱ्याचदा उलट्या होतात. याला Hyperacidity असे म्हणावे.
२. पचनाच्या काही तीव्र आजारांत पित्ताशयातील Bile उलट्या प्रवाही जठरात येते आणि उलटीत बाहेर पडते. याला म्हणायचे Bilious vomiting .
३. काविळीच्या काही रुग्णांना अंगाला खाज (pruritus) येते. ती bile salts साठल्याने असते.
४. त्वचेवरील ‘पुरळ’ हा वेगळा प्रकार असून त्याची इथे गल्लत करू नये.
8 Jul 2019 - 12:57 pm | खिलजि
माहितीपूर्ण लेख .. आवडला ..
8 Jul 2019 - 3:22 pm | जालिम लोशन
सुगम शब्दात छान समजावुन सांगीतले आहे. आर्युवेदात पचनसंस्थेच्या विकारासंदर्भात आधुनिक वैद्यकशास्त्रापेक्षा जास्त परिणामकारक ऊपाय, उपचार ऊपल्ब्ध आहेत.
8 Jul 2019 - 3:48 pm | कुमार१
आरोग्यलेखन आवडीने वाचणाऱ्या वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !
10 Jul 2019 - 10:03 am | कुमार१
मला व्यनितून पित्ताशय काढून टाकण्याबद्दल एक चांगला प्रश्न आला आहे. हा थोडा विस्तारित विषय आहे. सर्वांचे माहितीसाठी सादर.
काही अवयवांच्या गंभीर आजारांत ते शस्त्रक्रियेने काढून टाकावे लागतात. त्यापैकी काही काढल्याने जीवनमानात फरक पडत नाही. तर काहींच्या काढण्याने तडजोडी स्वीकाराव्या लागतात.
शरीरातील काही महत्वाचे अवयव काढून टाकले तरी माणूस जगू शकतो. यानिमित्ताने त्यांची यादी सादर करतो:
१. पित्ताशय
२. आन्त्रपुच्छ्
३. टॉन्सिल्स
४. प्लीहा
५. जठर व मोठे आतडे
६. गर्भाशय
७. स्त्री व पुरुषाची अंडाशये, शिस्न
८. फक्त १ फुफ्फुस
९. फक्त १ मूत्रपिंड
(यादी १००% पूर्ण नाही; फक्त महत्वाचे अवयव घेतले आहेत).
10 Jul 2019 - 10:51 am | गवि
ऑ?
10 Jul 2019 - 11:56 am | कुमार१
तुमच्या “ऑ” चे उत्तर दोन टप्प्यात देतो. आधी जठर.
जठराच्या काही कर्करोगात पूर्ण जठर काढले जाते. त्यानंतर असे सुघटन करतात. (चित्र पाहा : शस्त्रक्रियेयेपूर्वी व नंतर)
अन्ननलिका थेट लहान आतड्याला जोडली जाते. आता यानंतर उद्भवणारे प्रश्न आणि त्यावरील उपाय :
१. शस्त्रक्रियेनंतर ५ दिवस तोंडाने काहीच देत नाहीत.
२. पुढे जेव्हा रुग्णाचे जेवण चालू होते तेव्हा त्याला उलट्या, पोटात मुरडा व जुलाब हे त्रास होतात.
३. आता एका वेळेस मोजके असे दिवसातून ६-८ वेळा जेवायचे. पाणी जेवणाबरोबर न घेता तासभर आधी वा नंतर प्यायचे.
४. प्रत्येक घास खरेच ३२ वेळा चावून गिळायचा !!
५. दरमहा ब-१२ जीवनसत्वाची इंजेक्शन्स घ्यायची .
10 Jul 2019 - 11:30 am | वरुण मोहिते
सोप्या भाषेत मी वाचत असतो सगळे
10 Jul 2019 - 12:18 pm | कुमार१
वरुण, धन्यवाद !
गवि,
आता मोठे आतडे जर पूर्ण काढले तर पुढचे पर्याय असे:
१. लहान आतड्याचा शेवटचा भाग थेट गुदद्वारास जोडणे.
२. काही रुग्णांत मात्र पोटाच्या त्वचेवर भोक करून तिथेच लहान आतडे जोडावे लागते. त्या भोकावर कायमस्वरूपी प्लास्टिक पिशवी लावतात. सर्व विष्ठा त्यात गोळा होत राहते.
10 Jul 2019 - 12:38 pm | गवि
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. उत्तम माहिती. पण एकूण भयंकर प्रकार दिसतो. एकूण बंधने पाहता या अवयवांशिवाय मनुष्य जिवंत राहू शकतो हे वाक्य या दोन अवयवांच्या बाबतीत खरेच "जिवंत राहतो इतकेच" असे म्हणावे लागेल.
10 Jul 2019 - 1:20 pm | कुमार१
एक गम्मत बघा !
जठर काढल्यावर काही काळ शरीर-वजनात प्रचंड घट होते. त्या काळात मेदसाठ्यांचे झपाट्याने विघटन होते. त्यात कोलेस्टेरॉल खूप प्रमाणात पित्तात सोडले जाते. त्यातून पित्तखडे तयार होतात !! ☺️
10 Jul 2019 - 12:18 pm | कुमार१
वरुण, धन्यवाद !
गवि,
आता मोठे आतडे जर पूर्ण काढले तर पुढचे पर्याय असे:
१. लहान आतड्याचा शेवटचा भाग थेट गुदद्वारास जोडणे.
२. काही रुग्णांत मात्र पोटाच्या त्वचेवर भोक करून तिथेच लहान आतडे जोडावे लागते. त्या भोकावर कायमस्वरूपी प्लास्टिक पिशवी लावतात. सर्व विष्ठा त्यात गोळा होत राहते.
10 Jul 2019 - 1:33 pm | टर्मीनेटर
माहितीपूर्ण लेख आणि उद्बोधक चर्चा, बरीच नवीन माहिती मिळाली.
विशेषतः एवढे अवयव काढून टाकूनही मनुष्य जिवंत राहू शकतो हि माहिती आश्चर्यकारक आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा!
10 Jul 2019 - 2:09 pm | कुमार१
एकूण बंधने पाहता या अवयवांशिवाय मनुष्य जिवंत राहू शकतो हे वाक्य या दोन अवयवांच्या बाबतीत खरेच "जिवंत राहतो इतकेच" असे म्हणावे लागेल. >>>>>
माझ्या माहितीतील एका डॉ.चे मोठे आतडे काढल्यावर त्यांना ती प्लास्टिकची विष्ठा-पिशवी बसवली होती. ती बाळगत ते तब्बल ४० वर्षे जगले आणि त्यांनी उत्तम व्यवसाय देखील केला !
10 Jul 2019 - 2:13 pm | टर्मीनेटर
कल्पनातीत आहे हे सगळं.
10 Jul 2019 - 2:24 pm | कुमार१
@ टर्मि.
तुम्ही वरच्या प्रतिसादात डावीकडे जी उभी फिकट रेघ मारली आहे, ती कशी टंकतात ?
10 Jul 2019 - 3:23 pm | टर्मीनेटर
प्रतिसाद टंकताना वरती जे ऑप्शन्स दिसतात त्यातल्या H च्या शेजारील " (Quote Sign) वर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे tags दिसतील
<blockquote></blockquote>
त्यात <blockquote> (या ठिकाणी) </blockquote> जो मजकूर किंवा वाक्य कोट करायचे असेल ते पेस्ट केले कि तसे दिसेल.
दुसरा पर्याय: Shift + alt + Q प्रेस केल्यावर सुद्धा <blockquote> </blockquote> हे tags दिसतील.
तिसरा पर्याय: स्वतःच मजकुराच्या आधी <blockquote> आणि शेवटी </blockquote> हे tags टाईप करायचे. पहिली पद्धत जास्त सोपी आहे.
10 Jul 2019 - 3:24 pm | गवि
ओह. त्यांनीही दिलं उत्तर. उत्तम.
10 Jul 2019 - 3:27 pm | टर्मीनेटर
Cross Reply :)
10 Jul 2019 - 3:23 pm | गवि
सध्या त्यांच्याऐवजी मी उत्तर देतो. अवतरण चिन्ह अशी खूण असणारं "quote" हे एक बटण टेक्स्टबॉक्सच्या वर असतं. ते दाबलं की ब्लॉक कोट टॅग्ज अवतीर्ण होतात. या दोन टॅग्जमध्ये जे लिहू ते खालीलप्रमाणे दिसतं.
विशिष्ट टेक्स्ट सिलेक्ट करुन मग ते बटण दाबलं तरी चालतं.
10 Jul 2019 - 3:34 pm | कुमार१
धन्यवाद,
शिकून घेतो
10 Jul 2019 - 3:42 pm | कुमार१
6
10 Jul 2019 - 2:43 pm | जालिम लोशन
थोडी माहिती वय झाल्यावर किंवा काही विकारांमध्ये peristalsis कमी झाल्या मुळे किंवा बंद झाल्यामुळे परसाकडला होत नाही. एनिमापण देता येत नाही. हाताने विष्ठा बाहेर काढावी लागते. परगेटिव, लॅक्झेटीव कशाचाही ऊपयोग होत नाही. ह्या वरील ऊपायांवर द्या. सध्या काळे बेदाणे भिजवुन देत आहे. त्याने खडे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. soft stool formation आहे.
10 Jul 2019 - 3:17 pm | कुमार१
सवडीने तो विषय बघू. भरपूर तंतूयुक्त आहार घ्यावा ही सर्वसाधारण सूचना.
गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
10 Jul 2019 - 10:38 pm | जालिम लोशन
age related आहे म्हणुन तज्ञांनी हात टेकले. diabetic neuropathy, nepheropathy पण जोडीला आहेत.
11 Jul 2019 - 7:45 am | कुमार१
मग तुमच्यासाठी घरगुती उपायच ठीक . पालेभाज्या व पाणीदार फळांचे प्रमाण चांगले ठेवा.
कुठलाही 'जालीम' उपाय नको ☺️
शुभेच्छा !
11 Jul 2019 - 2:16 pm | जालिम लोशन
:—)
10 Jul 2019 - 10:17 pm | बाप्पू
माझा हि ek प्रश्न...
पित्त तयार करण्याच्या प्रक्रियेत गडबड झाली तर?? म्हणजे प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त पित्त तयार होऊ लागल्यावर शरीर कसे रिऍक्ट करते???
11 Jul 2019 - 9:45 am | कुमार१
बाप्पू,
प्रथम पित्त = bile याबद्दल आपण बोलत आहोत.
१. हे यकृतात तयार होते आणि त्याचा हेतू मेदांचे पचन आणि काही गोष्टींचे उत्सर्जन असा असतो.
२. ते ठराविक प्रमाणात शरीराच्या गरजेइतकेच तयार होते. ती अत्यंत नियंत्रित प्रक्रिया असते.
३. कमी प्रमाण होणे हे यकृतविकाराच्या शेवटच्या टप्प्यात (failure) होईल किंवा काही जनुकीय आजारांत. त्यामुळे मेद-पचन होणार नाही.
४. प्रमाण वाढण्याचे काही कारण नसते. त्यातील कोलेस्टेरॉल किंवा बिलीरुबिन या घटकांचे प्रमाण आजारानुसार वाढू शकेल.
11 Jul 2019 - 12:06 pm | अनिंद्य
वैद्यकीय विषयाला क्यूट काव्यात्मक शीर्षक !
आधी लेख कोणत्या विषयावर असावा हे समजले नाही पण पुढ्यात तुमचे नाव बघून अंदाज आला.
आटोपशीर लिहिण्याची आणि चर्चेत आलेल्या प्रश्नांना झटपट मुद्देसूद उत्तरे देण्याची तुमची हातोटी खास आहे.
पु ले शु.
11 Jul 2019 - 1:06 pm | कुमार१
अनिंद्य, धन्यवाद.
शीर्षकात थेट आजाराचे नाव लिहिणे जरा रुक्ष वाटते म्हणून एक प्रयोग.
मला सुद्धा कधीकधी आजार, औषध, रिपोर्ट्स ...यातून बाहेर पडावेसे वाटते ना.
11 Jul 2019 - 1:41 pm | Rajesh188
डॉक्टर .
मानवी शरीरातील सर्व अवयव.
त्यांची गर्भात असल्या पासून कशी वाढ होते ते .
आणि सर्व अवयवांना
करावे लागणारे काम आणि सर्वात महत्वाचे त्यांचा एकमेकाशी असलेला संबंध ह्या विषयावर सविस्तर लेख लिहावा ही विनंती
11 Jul 2019 - 2:24 pm | अथांग आकाश
मस्त माहितीपूर्ण लेख!! धन्यवाद.
विषयाला साजेसे चित्र न मिळाल्याने माझा विना चित्राचा असा वि-चित्र प्रतिसाद ;)
11 Jul 2019 - 2:45 pm | कुमार१
राजेश,
तुम्ही सुचवलेला विषय हा निव्वळ एका लेखाचा नसून पुस्तक लिहिण्याएवढा मोठा आहे ! बघूया दमादमाने.
अथांग आ,
तुमचा प्रतिसाद अजिबात वि-चित्र नसून मला त्यातील अदृश्य चित्र जाणवले आहे ! भावना पोचल्या.
11 Jul 2019 - 2:58 pm | Rajesh188
डॉक्टर.
तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा लेख मालिका लिहावी मी सुचवलेल्या विषयावर .
12 Jul 2019 - 8:18 am | कुमार१
आपणा सर्वांच्या सहभागाने चर्चा चांगली झाली. लेखाचा विषय जरी पित्तखडे असला तरी 'पित्ताचा त्रास' हा विषय अधिक चर्चेत आला. आता 'पित्त' या बद्दलचे गैरसमज दूर झाले असतील ही आशा.
वाचकांनी सुचवल्यप्रमाणे Hyperacidity ह्या विषयावर सवडीने लिहीन.
धन्यवाद !
12 Jul 2019 - 12:22 pm | MipaPremiYogesh
खूपच अप्रतिम लिहिले आहे डॉक्टर. धन्यवाद. मी ऍसिडिटी च्या लेखाची वाट पाहीन.
12 Jul 2019 - 12:24 pm | MipaPremiYogesh
माझ्या वडिलांचे १५-२० वर्षांपूर्वी पित्ताशय काढले गेले होते खूप जास्त प्रमाणात पित्ताचे खडे झाले म्हणून. त्यांनतर जास्त त्रास नाही झाला पित्ताशय नसले तरी. अजूनतरी.
12 Jul 2019 - 1:41 pm | कुमार१
अभिप्रायाबद्दल आभार !
तुमच्या वडिलांना शुभेच्छा !
12 Jul 2019 - 1:52 pm | लई भारी
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख आणि सुटसुटीत मांडणी. वाचायचा राहून गेला होता.
माझ्या वडिलांना साधारण दीड वर्षांपूर्वी हा त्रास झाल्याने बराच त्रास होऊन शेवटी पित्ताशय काढून टाकले.
उगाच उत्सुकता म्हणून त्या दरम्यान याविषयी डॉ. मित्राकडून माहिती घेत होतो त्यावेळी काही गोष्टी ओझरत्या समजल्या होत्या; आता नीट समजले!
आपण सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. म्हणजे, सुरुवातीला वडिलांना नवरात्रीच्या उपवासांमुळे त्रास सुरु झाला असे म्हणून स्थानिक डॉ. कडून पित्त वगैरे उपचार. नंतर काविळीचे निदान आणि एका डॉ. नी तर फक्त साधी कावीळ आहे एवढंच सांगितलं.
दुसऱ्या डॉ. कडे नेतानाच असह्य दुखायला लागलं होत - तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो अटॅक होता हे आता लक्षात येतंय. सोनोग्राफी नंतर खूप जंतुसंसर्ग आहे म्हणून ERCP करता येणार नाही म्हणून आठ दिवस ऍडमिट करून दाह शांत केला(बहुधा).
महिन्याभराने लॅप्रोस्कोपीने शस्त्रक्रिया नियोजन झाले, आदल्या रात्री पर्यंत सर्जन खात्रीने म्हणाले होईल नीट, काही विशेष नसत त्यामुळे १-२ दिवसात घरी. ऐनवेळी त्यांना लक्षात आलं की आत प्रचंड संसर्ग झाला आहे त्यामुळे ओपन शस्त्रक्रिया करावी लागली. मग हॉस्पिटल मुक्काम/रिकव्हरी सगळाच त्रास वाढला.
अजून पुढे एक twist :-) काही दिवसांनी सोनोग्राफी मध्ये कळलं की आतड्याच्या टोकाला एक खडा अडकून बसलाय! बहुधा तो 'आडवा' नव्हता, त्यामुळे तसा त्रास काहीच नव्हता. शेवटी परत महिन्याभराने ERCP करून तो बाहेर काढला. डॉक्टरांच म्हणणं होत की त्यावेळी आत रक्तस्त्राव वगैरे सांभाळताना जो 'कट' घेतला त्यामुळे तो अर्धवट राहिला असावा वगैरे. (हि निश्चित अचूक माहिती नसावी, मला साधारण समजले ते असं!)
खूप वेदनादायक अनुभव होता. सुदैवाने अजून काही त्रास नाही. पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पाळायला सांगेन आता.
12 Jul 2019 - 6:21 pm | कुमार१
ल भा, धन्यवाद.
तुमच्या वडिलांचा अनुभव कटू असला तरी तुम्ही हे कथन छान केले आहे - अगदी वैद्यकीय बारकाव्यासहित.
त्याबद्दल तुम्हाला मिपातर्फे एखादी आरोग्य पदविका द्यायला हरकत नाही ! ☺️
आणि हो, वडिलांना शुभेच्छा.
13 Jul 2019 - 7:58 pm | दीपक११७७
नेहमी प्रमाणे माहिती पुर्ण लेख.
धन्यवाद.