वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.
ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.
कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!
घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.
तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.
तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.
त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.
मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.
सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.
आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!
तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.
त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.
बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.
डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.
पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.
२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.
खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.
डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ
ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/
डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4
मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.
एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.
--------------------------------------------------------------
(श्री. शाम भागवत यांचा खालील एक प्रतिसाद लेखात समाविष्ट केला आहे.)
एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते.
यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात.
तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा.
प्रतिक्रिया
8 Oct 2018 - 7:34 pm | सुबोध खरे
माझ्या समजाप्रमाणे आणि मी वाचलंय त्या तुटपुंज्या ज्ञानावरून मी एवढे सांगतो कि व्यायाम रिकाम्या पोटी केला किंवा थोडेसे काहून केला तर जळणाऱ्या कॅलरीत फारसा फरक पडत नाही. कारण रिकाम्या पोटी तुमचे शरीर STARVATION MODE मध्ये असते ज्यामुळे शरीर शक्यतो ऊर्जा वाचवण्याच्या प्रयत्नात असते त्यामुळे तुम्हाला जास्त घाम येत नाही आणि तुमचे शरीर उष्णता वाचवते म्हणून व्यायामात जास्त ऊर्जा खर्च झाली तरी शरीरातून उष्णतेचा उत्सर्ग कमी झाल्याने एकंदर कॅलरीचा व्यय दोन्ही स्थितीत साधारण सारखाच राहतो.
अगदीच रिकाम्या पोटी व्यायाम केला असता काहि लोकाना चक्कर येण्याची शक्यता असते. अशा लोकांनी एखादे केळे किंवा सफरचंद किंवा एखादी पोळी खाऊन व्यायाम करावा.
साधारणपणे जड पोटावर व्यायाम करू नये तसेच सकाळी उठून पूर्ण रिकाम्या पोटावरची व्यायाम करू नये असेच बरेचसे स्रोत सांगतात.
16 Mar 2019 - 8:39 pm | सुबोध खरे
किती लोकांचे वजन नित्यमित रित्या(SUSTAINED) कमी झाले आहे हे समजून घ्यायला आवडेल.
पाच किलो कमी झाले होते पण परत वाढले म्हणणारे भरपूर आहेत.
16 Mar 2019 - 9:15 pm | चामुंडराय
डॉ. जेसन फ़ंग ने वजन वाढीसाठी थर्मोस्टॅट सारखी संकल्पना मांडली आहे.
थर्मोस्टॅट जसा तापमान नियंत्रित करतो तसा इन्सुलिन हा वजनाचा वजनोस्टॅट आहे असे त्याचे म्हणणे आहे.
ज्या लोकांचे वजन पुन्हा वाढले असेल त्यांनी जास्त वेळा इन्सुलिन स्रवून (म्हणजेच दोन पेक्षा जास्त वेळा खाऊन) त्यांचा वाजनोस्टॅट वरती सेट केला असेल.
आणि त्याचा परिणामस्वरूप त्यांचे वजन वाढले असेल. डॉ. दीक्षित हे डायट नसून जीवनपद्धती (लाईफ स्टाईल) आहे.
17 Mar 2019 - 10:09 pm | सुचिता१
माझे ६० वरुन ५७ वर आले आहे. (उंची ५.४ ) स्थुल नव्हते . पण कमी झालेले वजन स्थी र आहे.
शिवाय ही जीवन पध्धत आचरणात सोपी आहे.
18 Mar 2019 - 9:31 am | मोहन
मी जुलै २०१८ पासून नियमित दिक्षीत आहार पाळत आहे. ६ किलो वजन कमी झाले, HbA1C 5.4 from 5.9. घट्ट झालेले सर्व कपडे निट व्हायला लागलेत . थोडा मनावर ताबा ठेवता आला तर आचरणात आणायला खूप सोपी आहार पद्ध्ती आहे.
18 Mar 2019 - 10:18 am | ज्ञानोबाचे पैजार
इथे शाम भागवत यांचा धागा वाचून या व्रताची माहीती मिळाली त्या नंतर त्यांचा यु-ट्युब व्हिडीओ पाहिला. व साधारण जुलै महिन्यात डाएट सुरु केले. मी तसा लठ्ठ पणा कडे झुकलेलो आहे. डाएट सुरु केले त्या वेळी वजन ९३ किलो एच बी ए १ सी ५.६० व इन्सुलिन ११.३० असे होते. त्या मुळे व्हॉट्सप ग्रूप वर मला त्यांनी प्री-डायबेटीक ग्रुप मधे टाकले. खरेतर हा माझ्यासाठी एक धक्का होता. कारण माझा रोजचा व्यायाम आणि सायकलिंग गेल्या ११ वर्षात कधी चुकले नव्हते. अर्थात ११ वर्षात कधी वजनही कमी झाले नव्हते उलट ते वाढतच होते.
दिवसातुन दोन वेळा जेवणे सुरुवातीला अतिशय जड गेले पण निश्चयाने ते सुरु ठेवले. व्यायाम कमी होउ दिला नाही. रोज कमीत कमी ४ ते ५ कप चहा प्यायची सवय होती. तो सोडणे खूपच अवघड गेले. पण ज्या दिवशी डाएट सुरु केले त्या दिवसापासून चहा सुध्दा निश्चयाने बंद केला. पहिले पंधरा दिवस प्रचंड त्रासात गेले. पण असे झाले तर काय करायचे त्याची माहिती डॉ दिक्षीतांनी व्हीडिओ मधे दिली होती. मी त्याचा आधार घेत नेटाने डाएट सुरु ठेवले.
मागिल साधारण ९ महिन्यात मी एकदाही दुध साखरेचा चहा प्यायलो नाही (साधारण ८ ते १० वेळा बीनसाखरेचा काळा चहा, ज्यांच्या कडे पाहुणा म्हणून गेलो होते त्यांना कानकोंडे वाटू नये म्हणून) या काळात माझ्या ठरलेल्या खाण्याच्या दोन वेळा सोडून एकदाही खाण्या साठी तोंड उघडले नाही. त्यातला ब्रेकफास्ट बंद करणे ही तर मोठी काळजीची गोष्ट होती माझ्यासाठी. पण तो बंद केल्याने काही फरक पडत नाही हे पहिल्या ८ दिवसात लक्षात आले अणि माझा आत्मविश्र्वास वाढला. त्या आधि मी दिवसातून कमीतकमी ४ ते ५ वेळा खायचो आणि ४ ते ५ कप चहा प्यायचो. आता दोन वेळा दणकावून भुक लागते. त्यातले दुपारी भरपेट जेवतो व रात्री पोटा पेक्षा थोडे कमी जेवतो. बरं हे काही ठरवून झाले नाही. आपोआप झालेला हा बदल आहे. जेवायला डॉक्टरांनी ५५ मिनिटे वेळ दिला आहे पण कधिही १५ ते २० मिनिटांपुढे हा वेळ जात नाही.
या काळात माझे वजन ८ किलो कमी झाले पँटींचे माप बदलले. आता पट्टा लावल्या शिवाय जुन्या पँट घालता येत नाहीत. तीन महिन्या पुर्वी केलेल्या चाचण्यांमधे एच बी ए १ सी ५.३० व इन्सुलिन ८.० असे निघाले. आता परत नव्या चाचण्या करायच्या आहेत.
पुर्वी सायकल वरुन पिरंगुटला कंपनीत जायला मला १तास ४५ मिनिटे लागायची तो (साधारण २६ कि.मि) (मधे २ छोटे घाट) आता सायकल वरचा भार ८.६०% कमी झाला पण लागणारा वेळ मात्र २०% कमी झाला आहे. हेच अंतर आता मी १ तास २० मिनिटात कापतो. म्हणजे या वेडाचा माझ्या तब्बेतीवरही याचा कुठलाही परीणाम झाला नाही.
एकच तोटा झाला की मधेआधे पार्ट्यांना मी खात नसल्यने अनेक मित्र मित्र नाराज झाले. बर्याच जणांनी दिक्षीत डाएट कसे अव्यवहार्य आहे हे पटवण्याचा प्रयत्न सुध्दा केला. अनेक जणांनी अनेक प्रकारे या वेडेपणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. (त्यात काही डॉक्टर लोक ही आहेत) पण प्रत्येक वेळी तो यु ट्युब व्हिडीओ मला आधार देत होता. काही दिवसांपूर्वी वारजे पुणे येथे झालेले डॉक्टरांचे व्याख्यान ऐकायला आवर्जून गेलो होतो.
घरच्यांनाही माझे हे नवे खुळ किती दिवस टिकते याची काळाजी होती. माझ्या पत्नीने तर माझ्या बरोबर बेट लावली होती की एक महिन्या पेक्षा जास्त टिकून दाखव म्हणून. आज मला सांगायला आनंद होतो आहे की आता तीनेही हे व्रत स्विकारले आहे आणि मागचे चार महिने ते कसोशीने पाळण्याचा ती प्रयत्न करत आहे.
ऑफिस मधलेही ३ ते ४ जण माझ्या बरोबर या वेडेपणात सहभागी झाले आहेत. त्यांनाही या व्रताचे फळ नक्की मिळेल याची मला खात्री आहे.
अशीही माझ्या दिक्षीत व्रताची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण.
पैजारबुवा,
18 Mar 2019 - 11:58 am | सस्नेह
अभिनंदन आणि लगे रहो, पैजारबुवा !
18 Mar 2019 - 12:05 pm | सुबोध खरे
http://www.misalpav.com/comment/reply/42935/1003107
हा प्रयोग एक महिना नव्हे तर सलग सहा महिने करा तरच शाश्वत परिणाम (sustainable results ) मिळतील.
हे लिहीण्याचे कारण हेच आहे कि आपण आरंभशूर असतो.
पैजारबुवा यांनी दाखवलेल्या सातत्याचे कौतुक आहे आणि त्यांच्या यशामुळे इतरांना प्रोत्साहन मिळो हीच ईश्वर चरणी इच्छा
18 Mar 2019 - 3:00 pm | शाम भागवत
पैजारबुवा,
तुम्हाला
_/\_
तुमच्यावर विश्वास ठेवणारी माणसे या जिवनशैलीचे अनुकरण करायला लागणारच. यात मला काही शंका नाही. आपल्यासारख्या जुन्या जाणत्यांच्या अशाच स्फूर्तिदायी अनुभवांमुळे आणिकांना प्रेरणा मिळो.
20 Apr 2019 - 12:31 pm | चामुंडराय
https://www.zee5.com/tvshows/details/kanala-khada/0-6-1177/kanala-khada-...
23 Apr 2019 - 11:58 pm | शाम भागवत
धन्यवाद.
_/\_
31 Mar 2020 - 7:54 pm | शाम भागवत
Submitted by जयेश केलकर on 10 March, 2020 - 14:32
मायबोलीवरील माझ्या ह्याच लेखावर ही नवीन प्रतिक्रिया आलीय ती इथे वरती पोस्ट केलीय.
जयेश केळकर यांनी लेखाची जी लिंक दिली आहे, त्या लेखाच्या शेवटी, लेखकाने त्याचे निष्कर्ष मांडले आहेत ते खाली देत आहे.
दोन जेवणाच्या मधे १६ तासांचे अंतर हा लेखकाचा मुख्य प्रयत्न आहे व त्याचे निष्कर्ष माडले आहेत. काहीवेळेस या नियमाला ते अपवाद करतात हेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे. मात्र ते अपवादच असतात. Happy
ज्याला या लेखातील माहितीची खरोखरच जरूरी आहे त्याचेकडून लिंक उघडायचा आळस होऊ नये म्हणून हा भाषांतराचा उद्योग करतोय.
Happy
@जयेश केळकर
_/\_
आता लेखकाच्या शब्दांत, त्यांनी जे इंग्रजीत लिहिले आहे, ते मराठीत भाषांतर करून लिहितो. अर्थात हा त्या लेखाचा शेवटचा पॅरा आहे.
"आणि मधुमेह बरा करण्यासाठीच्या माझ्या प्रयत्नांना मिळालेले फळ आता सांगतो.
मी माझा मधुमेह बरा करण्यात यशस्वी होतो आहे.
1- माझ्या ग्लूकोजची पातळी (जरी मी थेट दोन चमचे साखर खालो तरी) कधीही 120 च्या वर जात नाही. ( हे सुरवातीला सुमारे २५० होते. २२३.०८ असताना त्याचे २५० का केले? कुणास ठाऊक Happy )
2-माझा एचबीए1सी सुमारे 6 आहे. ( हे सुरवातीला ९.४ होते.)
३ मी एका दमात ६ कि.मी. चालत असलो तरी मला श्वास अपुरा पडतोय असे वाटत नाही. किंवा दम लागत नाही.
4- मी सक्रिय आहे.
५ माझ्या त्वचेवरील सुरकुत्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे मी माझ्या वयापेक्षा खूपच तरुण दिसतोय असं लोकं म्हणायला लागलेत.
(अनाहितांना आकर्षित्त करणारे वाक्य आहे हे. Happy )
६ मला सकारात्मक उर्जेने भरल्यासारखे वाटतंय व आपोआपच माझ्याकडून इतरांना मदत केली जात आहे. मी (नव्याने ?) सुतारकाम, प्लंबिंग, घरातील शेती शिकलो आणि आहार नियोजनात डिप्लोमादेखील मिळविला.
7- मी आता इतरांना विनामूल्य आहार योजना सुचवतो. जरी आपणास आपल्या स्वतःच्या आवडीनुसार आहार योजना बनवून पाहिजे असेल तर आपण ती माझ्याकडून विनामूल्य मिळवू शकता.
८ माझा सरासरी रक्तदाब २१०/११० असायचा तो आता 140/90 पर्यंत आलाय. कोणत्याही औषधोपचार न करता ही प्रगती छान आहे असं मला वाटतं. आणि हो, माझ्यावर विश्वास ठेवा मी ३-४ किमी चालल्यानंतर तो रक्तदाब चक्क कमी होतो!!!!!!
9 माझी कोलेस्टेरॉलची पातळी योग्य आहे.
मधुमेह बरा करण्याच्या प्रक्रियेत मला एक आयता बोनस मिळालाय. माझे वजन आता 81 किलो आहे. डाएट सुरू करायच्या आधी ते 110 किलो होते.
ही एक (८ वर्षांची) दीर्घ कथा आहे. त्यामुळे लिहिण्याच्या ओघात मी बरेच तपशील सांगायचे विसरलो असेन. परंतु, आपल्याकडे काही प्रश्न असल्यास मला विचारण्यास लाजू नका.
सर्वांना फुकटात उपलब्ध असलेल्या पुस्तकातून कोणीही कोणतीही माहिती जशी आरामात मिळवू शकतो, (आणि त्या बदल्यात ते पुस्तक काहीही मागत नाही की तक्रार करत नाही. (म्हणजे गुगलच की हो Happy ) अगदी त्याप्रमाणे मला जी काही माहिती आहे, मला जे काही अनुभव आले आहेत, प्रत्येक गोष्ट मी कशी अंमलात आणली ते सर्व संगतवार मी सांगायला तयार आहे."
(अवांतरः पण त्यांना प्रश्न कसा विचारायचा? ते मात्र मला कळलेले नाही. कारण लेखकाचा इमेल पत्ता मिळालेला नाही. कॉमेंटस मधे लिहिल्यावर उत्तर मिळत असावे असे वाटते. कारण, कॉमेंटस करताना आपला इमेल विचारला जातो. आपला इमेल पत्ता अप्रकाशीत राहील असं सांगितलं जातंय खरं
असो.
एक सूचना : भाषांतरांत चूक झालेली असल्यास मूळ इंग्रजी लेख हा आधारभूत मानावा. Happy
31 Mar 2020 - 11:08 pm | शाम भागवत
मी माझा हा लेख मायबोलीवरही टाकला होता.
वरील मेसेज मायबोलीवर आलाय.
मी त्याबाबत खालीलप्रमाणे उत्तर दिलंय.
रॅगो यांनी दिलेल्या लिंकमधील https://byebyediabetesandobesity.wordpress.com/ लेख ५ भागात आहे. लिंक बद्दल कुतूहल निर्माण होण्यासाठी पहिल्या भागाचे संक्षिप्त भाषांतर करत आहे. लेखक सैन्यात असून सद्या कर्नल या हुद्यावर काम करत आहेत.
माझी गोष्ट डिसेंबर २०१५ मध्ये त्रिवेंद्रम मिलिटरी हॉस्पिटलमध्ये सुरुवात झाली. मला मधुमेहाचा प्रकार 2 असल्याचे निदान झाले होते. रक्तातील साखर ४१५ आणि एचबीए1सी ९.७ असल्याचं निदान झालं होतं. वयाच्या 45 व्या वर्षी मला याची अपेक्षा नव्हती. माझ्या आहारातून साखर काढून टाकली गेली आणि मला नियमित व्यायाम करण्यास सांगितले गेले… !!! नियमीत व्यायाम, पोट रिकामे न ठेवणे व नियमीत औषधे घेणे हा माझ्या नित्य जीवनाचा भाग बनला. मी तर त्या व्यतिरिक्त प्राणायामालाही सुरवात केली होती!!!
रक्तातील साखरेच्या पातळीनुसार औषधांत चढउतार व्हायची व वजन कमी करण्यासाठी डॉक्टर मला ‘अधिक व्यायाम’ करायला सांगायचे. पण माझे वजन वाढतच चालले होते. २०१६ सालात असंच काहीतरी चालू होतं. तरीही डिसेंबर २०१६ ला वजनाने १०० री गाठली.
मग मात्र मी एक जीम लावली. १५ किमी चालायला लागलो. एकदा तर अर्ध मॅरेथाॅनमधेही भाग घेतला. वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदीक औषधेही घेऊन पाहिली. पण कशाचाही कायम स्वरूपी फायदा झाला नाही. डिसेंबर २०१७ ला माझे वजन १०७ किलो झाले होते.
मला आता समजले की दिवसेंदिवस मी अधिक वजनदार होत आहे. शरीर लवचिकता गमावत आहे. अॅसिडीटी, उच्च बीपी आणि पंचनसंस्थेसंबंधी समस्या मला त्रास देत आहेत. माझी गुडघेदुखी आणि पाठीच्या खालच्या बाजूस दुखणे हे सगळे याचेच परिणाम आहेत.
पहिल्या भागानंतर भाग २,३,४ मधे त्यांनी केलेले प्रयत्न आहेत.
भाग ५ हा अंतीम आहे. त्यात ते म्हणतात.
जुलैच्या १८ च्या शेवटी माझी पोस्टिंग त्रिवेंद्रमहून पाटण्याला झाली.
मार्च २०१९ ला माझ्या वैद्यकीय आरोग्याचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी, वर्गीकरण वैद्यकीय मंडळाचा हॉस्पिटल (एमएच), दानापूर (पाटणा) च्या डॉक्टरांशी भेट घेतली. दानापूरच्या डॉक्टरांनी प्रथम मी काही औषधे घेतो का? त्याची चौकशी केली.
पहिल्या चाचणी अहवालात एचबीए1सी 5.5 पाहिल्यावर मला पुन्हा माझी रक्त चाचणी देण्यास सांगण्यात आले… !!!
Happy
ईसीजी, थायरॉईड आणि अगदी डोळयातील पडदा समाविष्ट करण्यासाठी कसून तपासणी केल्यावर मात्र डॉक्टरांनी माझ्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ते म्हणाले की माझ्या वैद्यकीय केसशीटमधून “मेटाबोलिक सिंड्रोम” हा शब्द काढून टाकायला त्यांना खूप आनंद होतोय. त्यांना त्याविषयी कोणतीही लक्षणे दिसलीच नाहीत!!!!
त्यांनी या भागात अजून बरेच काही लिहिले आहे. ज्यांना कुतूहल असेल ते लिंक उघडून वाचतीलच म्हणा. Happy
रॅगो यांनी लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.
_/\_