अती तातडीची चर्चा टेबलावर घेतली आहे. सर्वांनी प्रतिसाद देवून प्रतिवाद करावा अन यातून काय निष्पन्न होईल ते सांगावे.
तर मागच्या आठवड्यात उन्हाळ्यात पाणी थंड होण्यासाठी मातीचा एक माठ घेतला. ते पाणी पिण्याच्या उद्देशाने साठवले जाते. तर या माठातून पाणी गळते आहे. म्हणजे एकदम माठ रिकामा होवून "काय माठ आहे!? काहीच राहत नाही तुझ्या डोक्यात!" अशा अर्थाचे नाही तर थेंब थेंब तळे साचे याच्या उलट थेंब थेंब माठ गळे या अर्थाचे थेंब थेंब पाणी गळते आहे. सत्वर मला वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं असे न आठवता, माठाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं असे सुचू लागले. लगोलग मी बायकोस मी बोलीले की बये माठाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं. मंग ती म्हनं की चला जावा लई चावट हाईसा. आवं हतं माठ गळतूया अन तुमाला लय गानं आठवतयं व्हय. कायतरी करा आन त्ये पानी गळनं बंद करा.
तर आता तो गळका माठ गळ्यात पडला आहे. तो परत करणंही शक्य नाही कारण घेते वेळी तो तपासून पाणी वगैरे भरून पाहीलेला होता.
आणि नक्की पाणी कोठून (म्हणजे माठातूनच पाणी गळते आहे पण नक्की कोणत्या भागातून) ते समजत नाही. माठ जेथून वरच्या भागात छोटा होत जातो त्या भागापासून साधारणपणे खाली माठ गळत आहे. म्हणजे निम्मा माठच गळका की हो. अन तेथपासून खाली संपूर्ण गोलाई ओली झाल्यासारखे दिसत आहे. अर्थात किचन ओट्याला सहाजीकच एका बाजूला पाणी जाण्यासाठी उतार असतोच. तर त्या मुळे एका भागातून पाणी उतरून थेंब थेंब तेथूनच गळत आहे. त्या थेंबांना एकत्र करण्यासाठी स्पंज ठेवले आहे पण ते स्पंज संपृक्त होवून त्या स्पंजामधूनच पाणी गळायला सुरूवात होते. स्पंज वारंवार ठरावीक अंतराने पिळून काढणे हे अगदी पिळवणारे काम आहे.
तर मंडळी, अशा गळक्या माठाचा गळकेपणा नेमका कुठे आहे हे शोधण्याची काही पद्धत आहे काय?
मला एक कल्पना सुचली आहे. तशी ती इतर कुणालाही सुचली नसेल
असे मला अजिबात म्हणायचे नाही पण गळक्या माठातले पाणी शोधण्यासाठी तर नक्कीच सुचली नसेल. पण काही सांगता येत नाही जर एखाद्याने हि पद्धत गळकी टाकी किंवा गळके पाईप शोधण्यासाठी उपयोगातही आणली असू शकते. पण गळका माठ माझेच पेटंट असू दे बरं का!
तर मंडळी, (पुन्हा पुन्हा मंडळी म्हणणे म्हणजे रेडीओवर आपली माती अन त्यांची झालेली माती हे सदर चालू असल्यासारखे वाटते. असो.)
अशुद्ध पाण्यातले बॅक्टेरीआ, जंतू नष्ट करण्यासाठी पोटॅशिअम परमँगनेट (KMnO4) या द्रव्याचे खडे त्या पाण्यात टाकण्याची पद्धत आहे. पावसाळ्यात विहीरीचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी या पोटॅशिअम परमँगनेटचे खडे विहीरीत टाकलेले मी देखील पाहिलेले आहे. पोटॅशिअम परमँगनेट पाण्यात टाकले तर पाणी थोडे गुलाबी किंवा थोडे जास्त प्रमाण झाले तर जांभळे होते. असे पाणी आपण पिवू शकतो.
तर मंडळी, आपण पुन्हा आपल्या गळक्या माठाकडे वळू या. अशा या गळक्या माठात पाणी भरून जर या पोटॅशिअम परमँगनेट (KMnO4) द्रव्याचे खडे त्या पाण्यात टाकले तर ते पाणी गुलाबी किंवा जांभळे होईल अन मग तेच पाणी सछिद्र माठातून जेथे गळका भाग असेल तेथून गळेल. असेच झाले तर आपल्याला नक्की कोणत्या भागाकडून माठ गळतो आहे ते शोधता येईल. असे मला वाटते.
तर मंडळी, असे खरोखर होईल का? अशाने माठाची गळती शोधता येईल का?
अन आता पुढचा प्रश्न.
जर वरील पद्धतीने माठाची गळती शोधली तर ती थांबवायची कशी? काही ठिकाणी अशा गळक्या माठांना सर्रास सिमेंटचा लेप लावल्याचे पाहण्यात येते. अर्थातच या पद्धतीत माठ नक्की कुठून गळतो आहे हे तपासून पाहण्यात येत नाही अन अंधारात बाण मारल्यासारखे सार्या माठालाच सिमेंटचा लेप लावला जातो.
परंतू या सिमेंटच्या लेपनामुळे माठाची सछिद्रता कमी होवून पाणी थंड होण्याच्या क्षमतेवर परिणाम निश्चित होईल.
आणखी एक, असा हा गळका माठ कच्चा असतो काय? म्हणजे पक्का भाजला गेला नसावा काय? अशा कच्या माठाला जर गॅसवर उलटा करून तापवीले तर तो पक्का होईल काय?
आणखी एक. कोणताही मातीचा माठ (या ठिकाणी चांगला माठ घ्या हं. गळका नव्हे.) साधारण वर्ष, दोन वर्ष किंवा तिन चार वर्षे पाणी गार करतो. नंतर त्याची सछिद्रता कमी कमी होत जावून त्याचे पाणी थंड होण्याचे प्रमाण कमी कमी होते. असा माठ तापवला किंवा तारेने आतून घासला तर मग त्यातील बुजलेल्या छिद्रांचे गुणधर्म बदलतील काय? अन मग असे करण्याने तो माठ पाणी जास्त थंड करण्यासाठी वापरात येवू शकतो काय?
हे असे आपण माठ पुन्हा पुन्हा वापरणार नाही पण एक शक्यता लक्षात घेतली तर काय करता येवू शकते ते आजमावणे चालू आहे बाकी काही नाही.
तर मंडळी, अशा गळक्या माठाचा नेमका गकळेपणा शोधायचा अन तो गळकेपणा कसा थांबवायचा हा प्रश्न आहे.
प्रतिक्रिया
12 Apr 2019 - 7:03 pm | उगा काहितरीच
मला वाटते की माठ गळत नसून पाझरत असावा. कच्चा १००% नाही कारण कच्चा असेल तर पाणी टाकले की लगेच खाली बसतो. थोडी सच्छिद्रता कमी करावी ,म्हणजेच थोड्या भागाला सिमेंटचा पातळ थर द्यावा.
17 Apr 2019 - 1:38 am | पाषाणभेद
माठ अर्ध्याच्या वर पाझरतो आहे. म्हणजे माठाचे दुकानच बंद.
12 Apr 2019 - 7:11 pm | शेखरमोघे
पोटॅशिअम परमँगनेट वापरूनच पहा ना. नक्की कुठून माठाची गळती होत आहे हे जर कळले तर फक्त तेथेच सीमेन्ट किन्वा इतर काहीही वापरून गळती थाम्बवता येईल. .
17 Apr 2019 - 1:39 am | पाषाणभेद
करून बघायला पाहीजे.
12 Apr 2019 - 8:11 pm | कंजूस
अध्यात्मिक किंवा रूपक धागा असल्यास अमचा पास. ( म्हणजे नापास हो!! टनटनटन . पुढच्या वर्षी याच वर्गात भिंती खरवडणार.)
17 Apr 2019 - 1:40 am | पाषाणभेद
कंजूसा तू कोराच राहीलास रे. (हळू घ्या बरं का कंजूष शेठ.)
अन हे माझ्या लक्षातच आले नाही. आणखी पैलू पाडले असते ना.
12 Apr 2019 - 9:00 pm | बाप्पू
मी स्वतः हे try केलेलं नाहीये.. पण डोक्यात आले म्हणून सांगतो.
मोठा प्रकाश असणारा बल्ब घ्या.. आणि चालू करा..
त्या बल्ब वर माठ उलटा ठेवा, आणि इतर बाकीचे सर्व लाईट बंद करा.
जर काही सूक्ष्म छिद्र असेल तर तिथून प्रकाश किरण बाहेर आलेले दिसेल..
संशयित छिद्र अगदीच लहान असेल तर या प्रयोगाचा उपयोग होण्याचे शक्यता कमी आहे.. पण ट्राय करायला हरकत नाही..
17 Apr 2019 - 1:36 am | पाषाणभेद
माठ इंजिनीअरींगचे विद्यार्थी बनवत नाहीत, ग्लास ट्रेसींग करायला. एकदम आरपार.
12 Apr 2019 - 9:18 pm | यशोधरा
त्या माठात एखादे झाड लावा.
17 Apr 2019 - 1:37 am | पाषाणभेद
झाड लावले अन मग त्याची मुळे जाणार कोठे? त्या पाझरणार्या छिद्रातून येतील काय?
17 Apr 2019 - 9:23 am | यशोधरा
कामच झाले की तुमचे मग! ब्येष्ट.
12 Apr 2019 - 10:50 pm | चित्रगुप्त
अवं तिकडं त्या शिरेलीतल्या मडमा नं बाप्प्ये जरा खुट्टं जालं तर भरतार नं बाईल बदलतात, अनं हितं तुमाला माठ बी बदलवंना व्हंय ?
17 Apr 2019 - 1:43 am | पाषाणभेद
हा हा हा.
वर्ष सा म्हईने झालं तरी बी त्या दोघी एकालाच धरून बसत्यात. आन बाकीचेबी बघत्यात.
आपली बाईल एका माठाचे पैकं वाया जातील म्हनूनशान आपला जीव घ्येत्यात बघा.
13 Apr 2019 - 12:02 am | पिंट्याराव
हे म्हणजे पेरणा बोटभर अन इडंबन हातभर...असा प्रकार झालाय...
बरोबर का नाही पाषाणभेद?
17 Apr 2019 - 1:44 am | पाषाणभेद
ह्ये बाकी बराबर वळखलं बघा.
खाली टाकनारच व्हतू की बघा दोनोळीचा धागा कसा पिएचडीचा प्रबंध करायचा ते. तुमीच आमचं हिरो बघा.
13 Apr 2019 - 2:23 am | कंजूस
माझ्या माहेरचा माठ आहे तो.
किंवा
माठाच्या मातीशी नाळ जोडली आहे
किंवा
प्रश्न गळक्या माठाचा नसून बूँद से जा रही, नया माठ से नही आयेगी।
किंवा
माथेरान महाबळेश्वरऐवजी माठात गेला वीकेन्ड.
17 Apr 2019 - 1:47 am | पाषाणभेद
आसं कसं बायकोनी घेयेल माठ म्हंजी काय बोलायचीच चोरी बघा. आता गळका का असेना पन पदरी पल्ड अन पवित्र झालं आसं झालं बघा.
13 Apr 2019 - 3:13 am | चित्रगुप्त
हा डायलाक ऐका :
".... आवं हतं माठ गळतूया अन तुमाला लय गानं आठवतयं व्हय. कायतरी करा आन त्ये पानी गळनं बंद करा...."
उपाय एकचः
13 Apr 2019 - 10:04 am | ज्ञानोबाचे पैजार
एका जागतिक महत्वाच्या प्रश्र्णाला थेट हात घातल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
माठाला इंदूलेखा महाभृंग तेल लावून पहा एखाद वेळी गळायचा थांबेल.
किंवा माठाला आतून आणि बाहेरुन एमसीलचे एक जाडसर आवरण लावा
किंवा त्या माठा पेक्षा आकाराने मोठा अजून एक माठ घ्या. हा गळाका माठ त्या माठात ठेवा गळणारे पाणी आपोआप नव्या मोठ्या माठात जमा होईल
किंवा सरळ त्या माठाची भाजी करुन टाका आणि पॉट भर खा
किंवा त्या माठाला रंगवून टाका आणि दुचाकी चालवताना तो हेल्मेट सारखा डोक्यावर घाला. हेल्मेटचा खर्च वाचेल.
किंवा त्याच्या गळ्यात (म्हणजे माठाच्या) एक दोरी अडकवुन त्याचा पिशवी सारखा उपयोग तुम्ही करु शकता. म्हणजे भाजी आणायला पिशवी ऐवजी माठ घेउन जायचे.
किंवा त्यात रोज दही लावुन ठेवा, संध्याकाळ पर्यंत चक्का तयार,
किंवा अभिषेक पात्रा ऐवजी हा माठ वापरा,
किंवा माठाला बोलायला शिकवा आणि कोणत्याही राजकिय पक्षाला तो विका सध्या निवडणुकीच्या वातावरणात भाषणे करण्या साठी माठ हवेच असतात
पैजारबुवा,
13 Apr 2019 - 10:49 am | पुणेकर भामटा
अतीशय अभ्यासपूर्ण प्रतीसाद !
13 Apr 2019 - 6:27 pm | ज्ञानोबाचे पैजार
माठा शेजारी लोटी, वाटी, सांडशी, बशी, विळी, कात्री, पळी, किसणी, परात यासारखी एखादी किंवा या सारख्या अनेक वस्तु असतील तर त्या वस्तु तिकडून ताबडतोब दूर हलवा. त्या ऐवजी बत्ता, कालथा, कप, चमचा, ताट, पेला, पाटा, वरवंटा, मिक्सर, ओव्हन अशा वस्तु त्याच्या जवळ ठेवा. गळणे आपोआप कमी होइल.
खरेतर त्याची जागा बदला. एखाद्या आजन्म ब्रम्हचार्याला जबरदस्तीने जर गोव्याच्या अंजुना किंवा कलंगुट बीच वर नेउन ठेवले आणि तो जर तिथे चळला तर त्यात त्याचा काय दोष? माठाची जागा स्वयंपाक घरात नाही तर पडवीत असावी.
तसेही माठाला जेव्हा पासून नळ लावायची पध्दत सुरु झाली तेव्हा पासून या माठांचे फार हाल व्हायला सुरुवात झाली आहे. अजकाल तर माठांना रंगवतात काय आणि त्यावर नक्षा काय काढतात अरे रे. असे माठ म्हणजे आपल्या आय पी एल मधल्या वेगवान गोलंदाजांसारखे दिसतात. म्हणजे नावाला वेगवान गोलंदाज पण हरभजनही त्यांना सिक्स मारतो.
पूर्वीचे माठ कसे अॅलन डोनाल्ड किंवा ग्लेन मॅक्ग्रा सारखे होते. त्यांचे काम एकदम चोख असायचे. त्यांना हमखास विकेट मिळायच्याच. पण ते कधी ओपनिंगला यायच्या फंदात पडले नाहीत. असेच जुने माठ होते. फ्रीज मधे पाणी काय गार होइल असे थंड पाणी या माठात असायचे.
असो गेले ते दिवस आठवणी
पैजारबुवा,
13 Apr 2019 - 7:12 pm | नाखु
आताशा कुणाला माठ म्हणायची सोय राहिली नाही.
विलायती शाळा असेल तर माठ म्हणजे काय ते सांगण्यासाठी वेळ द्यावा लागेल.गोकुळाष्टमीला जे माठसदृष्य मडके,मटके बांधले जाते त्याकडे फारसे लक्ष्य न देता, आलेल्या मठ्ठ आणि घट्ट तारकांकडे ध्यान दिले जाते.
त्याही एकाच दिवसात बर्याच ठिकाणी लटके लटके दहीहंडी हात हलवा गर्दी जमवा यात व्यग्र असल्याने त्या लटकलेल्या कुठल्याही माठाकडे पहात नाहीत.
गेलाबाजार रिक्षावाले स्टॅंड वर माठ रांजण भरून ठेवायचे आता आधी ताडपत्री पिशव्या आणि आता कापड गुंडाळून बिसलेरी बाटल्या भरून तुझं तू माझं मी योजनेत सहभागी झाले आहेत.
मुळात माठाचे काम पाझरणे आहे,पाघळण्यासाठी माणसं कार्यरत आहेत.
तस्मात या भागावर श्री श्री अमूकतमूक अमृत कलश असे लिहून,तिवईखाली छोटी पिंड ठेवावी,त्यातील पाणी फक्त ५१ रूपये देणार्या भाग्यवंताना द्यावे आणि भागाबद्दल सुरस आणि चमत्कारिक कथा समूहात पसरवून द्यावात
तसही खातरजमा न करता पुढे ढकलण्यात धन्यता मानणारे असेपर्यंत तुम्हाला भाग्यवंताची ददात नाही.
आडबाजूला असलेला नाखु पांढरपेशा
17 Apr 2019 - 2:45 am | पाषाणभेद
ह्ये दोन्ही उपाय एकदम आवल्डे.
13 Apr 2019 - 12:55 pm | वकील साहेब
मठात पाणी थंड होण्यासाठी माठाचा बाहेरील पृष्ठभाग ओला राहणे गरजेचे असते. त्यासाठी माठ सच्छिद्र बनवलेला असतो. पूर्वीच्या काळी माठ बनवतांना म्हणे ओल्या मातीत गाढवाची लीद (विष्ठा) टाकत असत. ख.खो.दे.जा.
गाढवाच्या लिदेत गवताचा तंतुमय भाग जास्त असतो. तो मातीत मिसळल्याने तयार माठ भाजताना त्यातील गवताचा भाग आपसूक जळून जातो. आणि माठ सच्छिद्र बनतो. माठात पाणी टाकल्यावर माठ सच्छिद्र असल्याने काही पाणी झिरपून बाहेरील पृष्ठभागावर राहते. मोठ्या पृष्ठभागावर त्या तुलनेत कमी पाणी आल्याने त्याचा हवेशी संपर्क होवून पाण्याचे बाष्पीभवन होते. परंतु त्यासाठी लागणारी उर्जा आतील पाण्यातून घेतली जाते. साहजिकच माठाच्या आतील पाणी थंड होते. माठाची सच्छिद्रता जास्त असल्यास अतिरिक्त पाणी पाझरल्याने पाणी खाली टपकायला सुरवात होईल.
अधिक वापर झालेला २-३ वर्षे जुना माठ शेवाळ किंवा मातीचे कण यासारखे घटक बारीक छिद्रांमध्ये अडकून त्याची सच्छिद्रता कमी झाल्याने एकतर पाणी टपकणे कमी होईल किंवा छिद्र कमी होण्याचे प्रमाण जास्तच झाले तर माठातून आवश्यक तितकेही पाणी न झिरपल्याने माठात पाणी थंड होणार नाही. अशा वेळी माठ पुन्हा भाजला किंवा गरम केला तर त्याची सच्छिद्रता वाढेल का? करून पाहायला हरकत नाही.
गळक्या माठात पाणी भरून जर या पोटॅशिअम परमँगनेट (KMnO4) द्रव्याचे खडे त्या पाण्यात टाकले तर ते पाणी गुलाबी किंवा जांभळे होईल अन मग तेच पाणी सछिद्र माठातून जेथे गळका भाग असेल तेथून गळेल. असेच झाले तर आपल्याला नक्की कोणत्या भागाकडून माठ गळतो आहे ते शोधता येईलका याबद्दल शंकाच आहे. कारण माठाच्या सच्छिद्रतेने सर्वच भागातून कमी अधिक प्रमाणात पाणी झिरपत असल्याने सर्वच भागातून असे गुलाबी किवा जांभळे पाणी बाहेर पडेल. मग अशा वेळी नेमकी तृटी कशी सापडणार?
त्या ऐवजी असे केले तर? माठ आडवा ठेवून त्यात दोन तांबे पाणी टाकायचे. एका विशिष्ट कालावधीत त्यातून गळणाऱ्या पाण्याची नोंद ठेवायची. नंतर माठ गोल फिरवायचा त्यात दोन तांबे इतकेच पाणी ठेवायचे परंतु पहिले मठाचा जो आतील भाग भिजला होता त्या ऐवजी दुसरा भाग भिजला पाहिजे असे करायचे. तिथून गळणाऱ्या पाण्याचीही नोंद ठेवायची. असे करत करत माठाच्या सर्व भागातील टप्प्या टप्प्याने चेक करून नेमकी गळती शोधू शकतो. करून बघायला काय हरकत आहे ?
17 Apr 2019 - 2:47 am | पाषाणभेद
पोटॅशिअम परमँगनेट (KMnO4) जास्त पाझरले तर तेथूनच जास्त गळती आहे असे समजावे.
13 Apr 2019 - 1:23 pm | शब्दानुज
यापेक्षा एक सोपा उपाय आहे. आपल्या वर्तमानपत्राच्या आडव्या पट्ट्या कापा आणि माठाला कडेने गुंडाळत खालीपर्यंत या. दोन पट्ट्यांमद्धे ठराविक अंतर ठेवा. एखादी ठराविक पट्टी जास्त भिजलेली असेल (तसेच तिथून खालच्या पट्या जास्त अोल्या होत जातील.सर्वात वरची अोली पट्टी शोधा.) असे करत जाऊन एक पट्टा तुम्हा भेटेले. त्याच्या आजुबाजूना पुन्हा जरासे मोठे कागद लावा आणि तपासत रहा. शेवटी तो ठराविक भाग सापडेल जिथून गळती चालू आहे.
पट्ट्या जास्त भिजत असतील तर जाडसर कागद वापरा.
17 Apr 2019 - 2:49 am | पाषाणभेद
वर्तमानपत्राचा कागद म्हणजे टीपकागदासारखा काम करेल. नक्की कोठे गळतो ते समजणे अवघड वाटते.
13 Apr 2019 - 9:49 pm | ऋतुराज चित्रे
अगदी सोपा उपाय ! माठ अर्धा भरा व त्यात चुना टाकून पाणी ढवळा एक दिवस तसाच ठेवा. चुना छिद्रात जाऊन बसेल, चुन्याचे पाणी ओतून द्या व माठात पाणी पूर्ण भरून वापरायला सुरूवात करा. वरील पाण्यावर दाब कमी असल्याने पाणी कमी प्रमाणात पाझरून संपूर्ण माठ कायम ओला राहून आतील पाणी थंड राहील.
17 Apr 2019 - 2:50 am | पाषाणभेद
चुन्याने तो माठ अछिद्र बनू शकतो.
14 Apr 2019 - 3:20 pm | तेजस आठवले
तो माठ कोणाच्या तरी टाळक्यात घाला नाहीतर त्यात फ्रीजचे गार पाणी घालून माठाचा पोपट करा.
नाहीतर त्यात धान्य साठवा. थंडीच्या दिवसात पोपटी करायला वापरा.
किंवा गळका माठ उंच तिवईवर ठेवून त्याखाली दुसरा न गळणारा माठ ठेवा आणि दुप्पट गार पाणी प्या.ह्या प्रक्रियेचे इंटिग्रेशन करून घरगुती पातळीवर बर्फाचा व्यवसाय करू शकता.
अवांतर : मोठ्या क्षमतेच्या बल्बची युक्ती बरी वाटतेय
17 Apr 2019 - 2:51 am | पाषाणभेद
आले आले लाईनीत आले तुम्ही.
14 Apr 2019 - 10:29 pm | गामा पैलवान
पाषाणभेद,
वर उल्लेखलेल्या दोन युक्त्या मला अंमळ पसंत पडल्या. पहिली कागदी पट्ट्या गुंडाळण्याची आणि दुसरी माठ फिरवून गळतीची नोंद ठेवण्याची.
याच धर्तीवर माझा तोडगा असा की माठ पूर्णपणे भरून गळू द्यावा. ज्या पातळीला पाणी स्थिर होईल, त्या पातळीस तडा असणार आहे. एकदा का पातळी निश्चीत झाली की मग वरील दोन युक्त्या वापरून तड्याची नेमकी जागा शोधता येईल.
आ.न.,
-गा.पै.
17 Apr 2019 - 2:52 am | पाषाणभेद
निम्मा माठच गळका आहे. अगदी त्याच्या कमरेपासून वर पाझरतो आहे. निम्या माठास सिमेंट लावले तर कामच झाले माठाचे.
15 Apr 2019 - 1:39 pm | बोलघेवडा
माठाभोवती एखादे स्वच्छ सुती कापड गुंडाळा जसे की जुनी साडी, धोतराचा , चादरीचा तुकडा. बाहेर आलेले जास्तीचा पाणी हा तुकडा शोषून घेईल आणि माठातील पाण्याला अजून गार करेल. काट्याने काटा काढण्यासारखा प्रकार.
आम्ही हा प्रकार नेहमी करतो. मस्त थंडगार पाणी मिळते.
17 Apr 2019 - 2:53 am | पाषाणभेद
एकदम ठिपकतो आहे तो. टिप टिप टिप टिप बरसा पानी पानी मे आग लगाई.
15 Apr 2019 - 2:07 pm | आनन्दा
माठाला पिशवी लावून बघा काम होतंय का?
17 Apr 2019 - 2:55 am | पाषाणभेद
जुन्या काळी बायका कमरेला पिशवी लावायच्या बघा. एकदम तसे.
15 Apr 2019 - 10:39 pm | मदनबाण
मला आता माठ घ्यावा लागेल असं दिसतय !
बादवे... दफोराव माठातल्या पाण्यात वाळा टाकुन ठेवा, लयं भारी पाणी लागत ! जगावेगळा प्रयोग म्हणजे अत्तर बाजारात १ नंबर खस अत्तर मिळते [ जे अजिबात सिंथेटिक नसते ] त्याचा फकस्त १ थेंब या माठातल्या पाण्यात टाकावा... बास्स्स... उन्हाळ्यातल अमॄत तयार ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Bina Zindagi Se Koi | The Kroonerz Project | Ft. Bhavya Pandit | Anurag Mishra
17 Apr 2019 - 3:02 am | पाषाणभेद
खस का इत्र डालके
पीते है पानी इन्सान यहा
इत्र तो बहाना है
पानी जैसा इत्र कहा
माशा हाकला, माशा हाकला
16 Apr 2019 - 4:17 pm | विजुभाऊ
मदन बाण यांचे म्हणणे आहे की अत्तर टाकल्याने माठाची गळती थांबेल
17 Apr 2019 - 3:03 am | पाषाणभेद
अत्तर टाकले तर माठ आणखी मुरकतो, लाजतो.
अन पाणी गळणे आणखीनच चालू होते.
तुम्ही सांगीतले का त्यांना? की मी सांगू?
17 Apr 2019 - 7:59 am | उगा काहितरीच
अजून एक मस्त उपाय आहे.
टप्पा पाडणे !
पद्धत : माठ घेऊन गच्चीवर जा. ग्यालरी पण चालेल. फक्त ग्यालरी ला ग्रील वगैरे नको. वरून माठ अशा प्रकारे खाली टाकायचा की टप्पा पडून परत वर आला पाहिजे. बघा , माठाची गळती १००% बंद होते. व पाणी पण अगदी जसे पाहिजे तसे थंड होते.
टीप : प्रत्यक्ष माठाचा टप्पा पाडण्याआधी कमी हवा भरलेला फुटबॉल व जास्त हवा भरलेला बास्केट बॉल त्या जागेवरून खाली फेकून टप्पा बरोबर येतोय याची खात्री करा. अजून एक टीप म्हणजे , टप्पा पाडायच्या आधी माठ पूर्णपणे पाण्याने भरला आहे याची खात्री करून घ्या.
उपाय केल्यानंतर कसा वाटला ते जरूर कळवा.
- उका.
17 Apr 2019 - 9:08 am | बाप्पू
मस्त उपाय.. :=) :=) :=)
17 Apr 2019 - 10:52 am | टर्मीनेटर
पंक्चर काढणाऱ्यांची क्लुप्ती वापरून बघायला हरकत नाही. आतून बाहेरून संपूर्ण कोरडा केलेला माठ एका मोठ्या आकाराच्या टब मध्ये दाबून धरला तर पाणी बाहेरून आत झिरपलेला भाग ओला झाल्याने मोठं छिद्र सापडेल बहुतेक. पाणी जर आतून बाहेर झिरपते तर बाहेरूनही आत झीरपायला पाहिजे. अर्थात माठाचे तोंड मोठे असेल तर ते शोधायला जास्ती सोपे पडेल.
वरील उपाय करून बघितलेला नाहीये, फक्त सुचला म्हणून टंकला :)
17 Apr 2019 - 11:59 am | वकील साहेब
माठ जर पाण्यात पालथा बुडवला तर जेथून गळती असेल तिथे बुडबुडे येतीलच की,
17 Apr 2019 - 1:00 pm | खिलजि
पाषाणभेद तुम्हाला माठाच्या सायकल बद्दल लिहायचे होते ना .. फक्त हो किंवा नाही एवढेच उत्तर द्या ..
22 Apr 2019 - 7:42 am | पाषाणभेद
नही....कभी नही.
उलट माठ री-सायकल करायचे उपाय विचारतो आहे.
17 Apr 2019 - 5:11 pm | गामा पैलवान
पाषाणभेद,
मला वाटलं की लहानसा तडा गेलाय. अर्धा माठ निकामी झाला असेल तर तो बदलून घेणे हा तार्किक मार्ग दिसतोय.
पण तडा लहानसाच असेल तर तो कंबरेच्या पातळीस आहे हे निश्चित. त्यात खालपासून पाणी भरून तडा तळाच्या दिशेने किती लांबवर गेलात ते शोधता येईल.
आ.न.,
-गा.पै.
22 Apr 2019 - 7:49 am | पाषाणभेद
कंबरीया ओ थारी कंबरीया
कमरके निचे क्या है कमरचे निचे
तुझी हालतीया कंबर जस झुलतीया झुंबर
मेरे रश्के कमर
माझ्या कमरंला कमरंला लचक भरली
तेरी कमरीया दिल ले गयी
तेरी पतली कमर तेरी तिरछी नजर
म्हटले तरी माठ पाझरतोच आहे. सिमेंट लावून बंद केला तरच उपाय होईल.
18 Apr 2019 - 10:12 am | सुबोध खरे
माठाला आतून चुना लावून घ्या म्हणजे
१) गळत असेल तर थांबेल
२) कुणाला तरी चुना लावल्याचे समाधान मिळेल
३) जाता जाता थोडेसे कॅल्शिअम पण पोटात जाईल
22 Apr 2019 - 7:50 am | पाषाणभेद
येथे ढेप व चुनी मिळेल.
तर मी येथे ढेप वचुनी मिळेल असे वाचायचो. काय माहीत तसेच लिहीले असावे त्याने. लहान होतो. समजत नव्हते तेव्हा.
18 Apr 2019 - 2:33 pm | बबन ताम्बे
माठ भरून ठेवा आणि त्यापुढे संत गोरा कुंभार या चित्रपटातील "फिरत्या चाकावरती देशी....विठ्ठला, तू वेडा कुंभार " हे भक्तीगीत लावा. माठ पाझरायचा थांबेल.
घटाघटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे :-)
22 Apr 2019 - 7:56 am | पाषाणभेद
घट नव्हे हो घट लहान असतात.
हा माठ आहे, मस्त मोठा.
माझी राणी भरल्यात दोन्ही माठ गळतंय पाणी हे गाणं पहा म्हणजे समजेल.